मंदिरं उभारली कुणी, मंदिरांवर श्रद्धा कुणाची, त्याच श्रद्धेने दान टाकणारे लोक कोण अन् त्यावर मालकी सांगणारी जमात कोणाची? आयुष्यभराच्या समर्पणातून तयार झालेल्या आपल्या गाथा कुणाच्या तरी नुसत्या एका शब्दावर इंद्रायणीच्या स्वाधीन करणार्या तुकोबाच्या भक्तीची उंची विठ्ठलाच्या दरबारी हजर होणार्या वारकर्याला लाभली की नाही, याचा यत्किंचितही विचार न करता, ती त्याच उंचीची असल्याचा विश्वास बाळगत त्याच्या पायांना स्पर्श करतात लोक. ती भक्ती जेव्हा साक्षात् परमेश्वराच्या निर्गुण, निराकार स्वरूपासमोर व्यक्त होते, तेव्हा गाठल्या जाणार्या उंचीची तर केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. उगाच का शिर्डीत साईबाबांच्या नुसत्या मूर्तीसमोर उभं राहिलं तरी डोळ्यातून घळाघळा अश्रू ढळू लागतात कित्येक लोकांच्या. उगाच का शेगावीच्या अन्नछत्राला लागणार्या वस्तू पुरविण्यासाठीही रांग लागते अनाम दात्यांची! कारण त्या दानाला श्रद्धेची किनार आहे. भावनांची झालर आहे. दान टाकत पेटीत असलो, तरी हे समर्पण त्या सर्वसाक्षी ईश्वराच्या चरणी केलेले असल्याच्या भावनेनेच तो निश्चिंत होत असतो. आपल्या माघारी मंदिरातल्या पेटीतल्या त्या दानाचे काय होत असेल, हा प्रश्नही त्याच्या मनाला कधी शिवत नाही. कारण त्याचा सदुपयोगच होणार याबाबतचा ठाम विश्वास त्याच्या मनात असतो. शिर्डी असो की शेगाव, तिरुपती असो की भूजमधले स्वामीनारायण मंदिर, इथल्या व्यवस्थापनांनी त्या सदुपयोगाचा आदर्श घालून दिला आहे. भक्तांच्या मनातील श्रद्धेला जराही ठेच लागणार नाही, याची शाश्वती तिथल्या विश्वस्तांच्या वर्तणुकीतून आपसूकच मिळते. पण काही निलाजर्या लोकांनी मात्र, नेमका भक्तांच्या या श्रद्धेवरच आघात केला आहे. भक्तांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला आपण जराही पात्र नसल्याचे, भवानी मातेच्या सान्निध्यात राहूनही ही मंडळी कोडगेपणाच्या दृष्टीने अद्याप ‘सरकारी’च राहिली असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झाले आहे.
धर्म वाईट कधी नव्हताच. तो बदनाम केला, त्याचा बाजार मांडणार्यांनी. लोकांच्या मनातल्या श्रद्धेचा काही लोकांनी कायम व्यापार केला. बडव्यांनी गाभारे घेरले आणि व्यापार्यांनी दानपेट्या. ईश्वराच्या ज्या मूर्तीपुढे नतमस्तक होत लोक दानाच्या स्वरूपात मनातली श्रद्धा व्यक्त करतात, दानाच्या त्या वस्तूंनाच हात घालण्याची चलाखी काही नतद्रष्टांनी चालवायची अन् त्यातून पुन्हा एकदा श्रद्धेची खिल्ली उडविण्याची संधी हवस्या-नवस्यांच्या हाती लागायची, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. मंदिर पुरीचे असो की मग तुळजापूरचे, देवाच्या नावाने दान देणार्यांच्या आस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केलेय् संबंधितांनी. कुठे, खजिन्याचे दरवाजे उघडू द्यायलाच लोक तयार नाहीत, तर कुठे चौकशीत माहिती द्यायला! तुळजापुरात काय घडलं? जिथे खुद्द छत्रपती शिवराय श्रद्धेने आई भवानीच्या चरणी नतमस्तक झाले, त्या मंदिराचा कारभार आजही निझामाने तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा अन् इतकी वर्षे कुणालाही त्यावर साधा आक्षेपही नोंदवावासा वाटू नये, याला काय म्हणायचे? भक्तांचे ठीक, त्यांना तर आपण दानपेटीत टाकलेल्या रकमेचे पुढे काय होते, हेही ठावूक नसते अनेकदा. पण ज्यांनी इतकी वर्षे या मंदिराचा कारभार चालवला, त्या ‘विश्वस्त’ मंडळातल्या सदस्यांनाही चकार शब्द काढावासा वाटला नाही कधी याबाबत? की बर्याच जणांच्या फायद्याची असल्याने सुरू राहिली स्वतंत्र भारतातली ही ‘निझामशाही?’ कुणाला हवे होते या मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे सरकारीकरण? या देशातल्या एकाही मशिदीच्या व्यवस्थापन मंडळावर जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असल्याचे उदाहरण दाखवून द्या! इथल्या एखाद्या चर्चचा कारभार तहसीलदार बघत असल्याचे आढळून आले आहे कधी कुणाला? मग फक्त हिंदूंच्या देवस्थानांचाच कारभार बघण्याची परवानगी असते का सरकारी अधिकार्यांना? बरं, जिल्हाधिकार्यांना बहाल झालेल्या अधिकारांतून मंदिराच्या परिसरातील सुविधांचा दर्जा सुधारल्याची लक्षणे जराही दिसत नाहीत तुळजापुरात, तेव्हा आई जगदंबेच्या चरणी अर्पण झालेल्या ३९ किलो सोन्याचा अन् ६०० किलो चांदीचा अपहार झाल्याच्या बातमीवर अविश्वास व्यक्त करावा, असे दूरान्वयेही वाटत नाही. याला जबाबदार ही दानपेटी लुटणारे तमाम लोक आहेत. उपविभागीय अधिकार्यांपासून, तर मंदिरात काम करणार्या कर्मचार्यांपर्यंत आणि तहसीलदारापासून तर ठेकेदारांपर्यंत सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची तयारी सीआयडीने चालवली आहे. १९९१ ते २०१० या दोन दशकांच्या काळातील अपहाराचा हा मामला आहे. या काळात उस्मानाबादेत कार्यरत राहिलेल्या अकरा जिल्हाधिकार्यांविरुद्धही ठपका आहेच. थेट असो वा मग आडमार्गाने, पण स्थानिक लोकप्रतिनिधींवरही आळ आहेच. दुर्लक्ष केल्याचा. कुठल्याशा तक्रारीवरून सुरू झालेल्या चौकशीतून समोर आलेली ही माहिती जितकी धक्कादायक आहे, त्याहून संतापजनक अन् संशयास्पद बाब ही, या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी सीआयडीला केलेल्या असहकार्याची आहे. झाली आहे तक्रार अन् केली जातेय् चौकशी, तर मंडळाचे पदाधिकारी असलेल्या शासकीय अधिकार्यांनी का स्वीकारावे असहकार्याचे धोरण? का नाही योग्य ती माहिती दिली या अधिकार्यांनी सीआयडीला? यांनी अधिकृत माहिती दिली नाही, मग त्यांनी अपहाराचे आकडे अंदाजाने काढले. आता, अंदाजाने काढलेल्या आकड्यांवर यांचा विश्वास नाही... काय तमाशा चाललाय् हा! एका सार्वजनिक संस्थेला लोकांनी दानात दिलेल्या पैशाचा हिशेब मांडायचा होता, का नाकारली अधिकार्यांनी ती संधी? त्यांचा स्वाभिमान आडवा आला की हेराफेरी? मंदिर परिसरातील ज्या कक्षात दानपेट्या उघडण्याची अट घातली गेली होती, तिथे एकदाही दानपेटी उघडली जात नसेल, पंचनामेही खोटेच तयार केले जात असतील, तर हा सरळ सरळ भक्तांच्या भावनांवरच केलेला आघात आहे. जिथे दानपेट्यांची संख्या तीनवरून सातावर गेली. मंदिराच्या दाराशी येणार्या भक्तांची रीघ आवरता येईना झाली, पेटीत पडणार्या दानाचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे, तरीही व्यवस्था आणि सुविधांचा दुष्काळच? पैसे कमी पडले म्हणून सुविधा उभारता येत नसतील, तर एकवेळ समजताही येईल, पण लोकांनी टाकलेले दान कुणाच्या तरी घशात चालले असेल, तर मात्र माफी नाहीच. मंदिरं उभारली कुणी, मंदिरांवर श्रद्धा कुणाची, त्याच श्रद्धेने दान टाकणारे लोक कोण अन् त्यावर मालकी सांगणारी जमात कोणाची? आयुष्यभराच्या समर्पणातून तयार झालेल्या आपल्या गाथा कुणाच्या तरी नुसत्या एका शब्दावर इंद्रायणीच्या स्वाधीन करणार्या तुकोबाच्या भक्तीची उंची विठ्ठलाच्या दरबारी हजर होणार्या वारकर्याला लाभली की नाही, याचा यत्किंचितही विचार न करता, ती त्याच उंचीची असल्याचा विश्वास बाळगत त्याच्या पायांना स्पर्श करतात लोक. ती भक्ती जेव्हा साक्षात् परमेश्वराच्या निर्गुण, निराकार स्वरूपासमोर व्यक्त होते, तेव्हा गाठल्या जाणार्या उंचीची तर केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. उगाच का शिर्डीत साईबाबांच्या नुसत्या मूर्तीसमोर उभं राहिलं तरी डोळ्यातून घळाघळा अश्रू ढळू लागतात कित्येक लोकांच्या. उगाच का शेगावीच्या अन्नछत्राला लागणार्या वस्तू पुरविण्यासाठीही रांग लागते अनाम दात्यांची! कारण त्या दानाला श्रद्धेची किनार आहे. भावनांची झालर आहे. दान टाकत पेटीत असलो, तरी हे समर्पण त्या सर्वसाक्षी ईश्वराच्या चरणी केलेले असल्याच्या भावनेनेच तो निश्चिंत होत असतो. आपल्या माघारी मंदिरातल्या पेटीतल्या त्या दानाचे काय होत असेल, हा प्रश्नही त्याच्या मनाला कधी शिवत नाही. कारण त्याचा सदुपयोगच होणार याबाबतचा ठाम विश्वास त्याच्या मनात असतो. शिर्डी असो की शेगाव, तिरुपती असो की भूजमधले स्वामीनारायण मंदिर, इथल्या व्यवस्थापनांनी त्या सदुपयोगाचा आदर्श घालून दिला आहे. भक्तांच्या मनातील श्रद्धेला जराही ठेच लागणार नाही, याची शाश्वती तिथल्या विश्वस्तांच्या वर्तणुकीतून आपसूकच मिळते. पण काही निलाजर्या लोकांनी मात्र, नेमका भक्तांच्या या श्रद्धेवरच आघात केला आहे. भक्तांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला आपण जराही पात्र नसल्याचे, भवानी मातेच्या सान्निध्यात राहूनही ही मंडळी कोडगेपणाच्या दृष्टीने अद्याप ‘सरकारी’च राहिली असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झाले आहे. निदान तुळजापूरच्या उदाहरणावरून तरी हेच सिद्ध झाले आहे. या प्रकरणाने अजूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिरांचा कारभार भक्तांनीच बघितला पाहिजे. संबंध असो वा नसो, त्याला स्वारस्य असो वा नसो, कलेक्टरच एखाद्या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असायला हा देश काही अद्याप इंग्रजांच्या राजवटीखाली नाही. मशिदी आणि चर्चच्या कारभारात हस्तक्षेप करायला परवानगी नाकारणारे कायदे या अधिकार्यांना फक्त मंदिराच्या कारभारात धुमाकूळ घालण्याचा अधिकार बिनदिक्कत बहाल करतात, हे कोडेही उलगडले पाहिजे कधीतरी. अन्यथा पेकाटात लाथ मारून हद्दपार केले पाहिजे ते कायदे अन् हे खादाड अधिकारीही...!
No comments:
Post a Comment