Saturday, September 3, 2016

मेळघाट.....


निसर्गसौंदर्याची अशी नुसती उधळण झाल्याने, चित्रपटातील कित्येक दृश्य झक मारतील अशी देखणी निसर्गरम्य ठिकाणं इथे प्रत्यक्षात बघायला मिळतात. सभोवतालच्या पर्वतांच्या पायथ्याशी चारही बाजुने हिरवळ ल्याइलेली जलाशये मन मोहून टाकतात. तर, वळणदार रस्त्यांच्या वर आणि खाली अशी दोन्ही बाजुला वाढलेली घनदाट हिरवी झाडे मनाला भुरळ घालतात ती वेगळीच. झाडांच्या या गर्दीतून जमेल तशी वाट काढत गोल आकाराच्या लहान-मोठ्या दगडांवरून वेगात पुढे सरकणारा तापीचा प्रवाह या मातीचा सुगंध सोबतीला घेऊनच पुढे गुजरातच्या दिशेने मार्गस्थ होतो. वेळ उगवतीची असो की मग मावळतीची, सूर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी ढगांच्या साक्षीने आकाशात फुलवलेली रंगांची उधळणही मन मोहरून टाकणारीच. जीव ओवाळून टाकावा, देहभान विसरून रममाण व्हावे, असाच हा सारा परिसर. पण ही सारी दृश्य हृदयाच्या कप्प्यात साठवून घेण्यासाठी म्हणून मेळघाटकडे धाव घेणार्‍यांची संख्या अजूनही म्हणावी तितकीशी वाढलेली नाही.

वेणीयो से गुंथी है, श्रृंग शैली श्रृंखला
श्रृंगार सोलहसे सजी यह, मेलघाटकी की मेखला
कुठे घनदाट जंगलातून नागमोडी वळणं घेत विखुरलेले छोटेछोटे रस्ते तर कुठे रानावनातल्या भूमीवर हिरवाईची पखरण. कुठे सळसळणारी झाडे तर कुठे खळखळाट करत वाहणारे पाण्याचे प्रवाह. कुठे भूतलाशी साधर्म्य साधत निर्माण झालेली जलाशये, तर कुठे उंच पहाडांवरून जमिनीकडे झेपावणारे पांढरे शुभ्र धबधबे. पहाटेपहाटे सूर्यकिरणांच्या साक्षीने हवेत विरणारे धुके तर कुठे मावळतीच्या कलाने बदलणार्‍या आकाशातल्या रंगछटा...सारेच अद्भूत. सातपुडा पर्वतराजीच्या कुशीत विसावलेला मेळघाट म्हणजे निसर्गसौंदर्याची नुसती लयलूट . अमरावती जिल्ह्यातल्या इनमिन दोन तालुक्यांचाच हा परिसर. निसर्गाने भरभरून दिलेय्‌ या भागाला. पण मुक्तहस्ते झालेल्या या उधळणीसोबत आलेल्या समस्यांचा ससेमिराही आहेच. कुठे रस्त्यांची दुरवस्था तर कुठे रोजगाराचा अभाव. कुठे सुविधांची वानवा तर कुठे पैशाचा ठणठणाट. स्थानिक माणसं जगण्याच्या विवंचनेत कायम धडपडणारी तर बाहेरून आलेली गर्दी म्हणजे जणू पाहुणचाराला आलेली सासरकडची माणसं. बडेजाव मिरवत, काहीएक घेणेदेणे नसल्यागत वागत, खाऊन-पिऊन निघून जाणारी. शासकीय योजनाही जाहीर तर खूप झाल्या पण त्यातल्या थोड्याही अंमलात येत नाहीत. थोड्याशा ईमानदारीनेही आजवर त्याची अंमलबजावणी झाली असती, तर मेळघाटातले आजचे चित्र काही और असते. पण...
ठाण्यापासून तर थेट मध्यप्रदेशातल्या मंडलापर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या सातपुडा पर्वतांच्या विशालकाय रांगा एकेकाळी सार्‍या देशाला उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात विभागण्यास कारणीभूत ठरल्या होत्या. त्यावेळी उत्तरेकडच्या हिमालयाचे केवळ वर्णन तेवढे दक्षिणेतील लोकांना एकून ठाऊक असायचे. नंतरच्या काळात इंग्रज आले. त्यामागून दळणवळणाच्या सुविधा आल्या अन्‌ संपर्काचे मार्ग खुले झाले. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी राबणारा कोरकू आदिवासींचा समूह दूरवरच्या ओरीसाकडून इकडे आणला. उदरनिर्वाहासाठी शेती करण्यासाठी इथले जंगल कापून त्यांना जमिनी बहाल करण्यात आल्या. तीच कोरकू ही आज इथली महत्त्वपूर्ण जमात झाली आहे. त्यापूर्वीपासून इथे राहणारे निहाली लोक मात्र काळाच्या ओघात धर्मांतराला बळी पडले. यात त्यांची निहाली भाषाही लुप्त झाली. पण तेव्हापासून सुरू झालेली जंगलाची कत्तल आणि जमिनी बळकावण्याचे षडयंत्र मात्र अजूनही तसेच कायम आहे. इंग्रजांनी कोरकूंना 1853 मध्ये वाटलेल्या जमिनीचा जो लेखाजोखा आहे, त्या तुलनेत आज या जंगलात राहणार्‍यांची संख्या निदान पाचशे पटींनी वाढली आहे. यात पर्वतीय भागाच्या तुलनेत सपाट भागात लोकांची गर्दी काहीशी जास्तच झाल्याने नऊशे चौरस किलोमीटरच्या धारणी परिसरात सुमारे 190 गावं वसली. 3500 चौरस किलोमीटरच्या चिखलदरा तालुक्यात मात्र दीडशेच्या आसपास गावं तयार झालीत. हे खरंच की यामुळे निदान चिखलदर्‍यात जंगल तरी वाचले आहे. पण धारणी परिसरात मात्र कुपोषणापासून तर रोजगारापर्यंतच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात.
निसर्गसौंदर्याची अशी नुसती उधळण झाल्याने, चित्रपटातील कित्येक दृश्य झक मारतील अशी देखणी निसर्गरम्य ठिकाणं इथे प्रत्यक्षात बघायला मिळतात. सभोवतालच्या पर्वतांच्या पायथ्याशी चारही बाजुने हिरवळ ल्याइलेली जलाशये मन मोहून टाकतात. तर, वळणदार रस्त्यांच्या वर आणि खाली अशी दोन्ही बाजुला वाढलेली घनदाट हिरवी झाडे मनाला भुरळ घालतात ती वेगळीच. झाडांच्या या गर्दीतून जमेल तशी वाट काढत गोल आकाराच्या लहान-मोठ्या दगडांवरून वेगात पुढे सरकणारा तापीचा प्रवाह या मातीचा सुगंध सोबतीला घेऊनच पुढे गुजरातच्या दिशेने मार्गस्थ होतो. वेळ उगवतीची असो की मग मावळतीची, सूर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी ढगांच्या साक्षीने आकाशात फुलवलेली रंगांची उधळणही मन मोहरून टाकणारीच. जीव ओवाळून टाकावा, देहभान विसरून रममाण व्हावे, असाच हा सारा परिसर. पण ही सारी दृश्य हृदयाच्या कप्प्यात साठवून घेण्यासाठी म्हणून मेळघाटकडे धाव घेणार्‍यांची संख्या अजूनही म्हणावी तितकीशी वाढलेली नाही. या परिसराचा सखोल अभ्यास करून पर्यटनाच्या दृष्टिने पर्यटकांसाठी एखादे आकर्षक पॅकेज तयार करण्याची कल्पना नाही म्हणायला काही सामाजिक संस्थांनी, काही राजकीय कार्यकर्त्यानंी सरकारदरबारी मांडली आहे. पण त्याला मूर्त स्वरूप सरकारच्या पुढाकारातूनच प्राप्त होऊ शकणार आहे. मेळघाटातला गावीलगढचा किल्ला, जवळच्या आकोटातला नरनाळ्याचा आणि खांडव्यातील आसीरगडचा किल्ला अशी जुळवणी केली तर इतिहासप्रेमींसाठी अभ्यास आणि पर्यटनाच्या दृष्टिने मोठीच मेजवानी उपलब्ध होऊ शकणार आहे. वाघांसाठी जंगलाकडे धाव घेणार्‍या पर्यटकांना मेळघाटच्या दिशेने वळविण्याचे कसबही पणाला लावण्याची गरजही एव्हाना व्यक्त होते आहे. कधीकाळी इंग्रजांच्या हौसेतून सुरू झालेला मासेमारीचा खेळ आणि त्यातून गवसलेला महासीर नावाचा मासा ही या परिसराची ओळख ठरली होती. काळाच्या ओघात महासीर नामशेष झाला, नव्हे संपलाच. पण इथल्या एका संस्थेच्या पुढाकारातून साकारलेल्या बीजोत्पादनातून महासीर पुन्हा एकदा इथल्या जलाशयात, तापी नदीच्या पात्रात गवसणार आहे. त्या माध्यमातून सुरू होऊ शकणारा विदेशी पर्यटकांच्या आवडीचा अँगिंलगचा खेळ हे देखील मेळघाटकडे गर्दी खेचण्याचे महत्त्वपूर्ण साधन ठरू शकणार आहे. आज या जंगलातील प्रमुख घटक ठरलेल्या कोरकू आदिवासींची संस्कृती, जंगलावर आधारीत त्यांची जीवन पद्धती, जंगलालाच घर अन्‌ जंगलालाच देव मानत जगण्याची त्यांची जगावेगळी तर्‍हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय ठरू शकते. त्यामुळे निसर्ग सौंदर्यापासून तर आदिवासी संस्कृतीपर्यंत आणि ऐतिहासिक किल्ल्यांपासून तर वाघांपर्यंत अशा अनेक बाबी पर्यटकांना मेळघाटकडे आकर्षित करू शकतात. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. कुपोषणासाठी प्रसिद्धी प्राप्त झालेला
मेळघाटचा परिसर क्षमता असूनही पर्यटनासाठी मात्र अजूनही तितकासा विकसित होऊ नये, ही खरं तर शोकांतिकाच. इथली गावं वसवण्यापासून तर अन्य कित्येक बाबी तत्कालीन इंग्रज अधिकार्‍यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या असल्याने आजही इंग्लंडसह अन्य काही देशातील पर्यटकांना मेळघाटचे आकर्षण आहे. तेवढ्यासाठी ते येतात अधूनमधून इकडे. पण ही बाब एन्कॅश करण्याची आपलीच क्षमता अजून सिद्ध होत नाहीय्‌, हेच दुर्दैव. कारण सध्यातरी, इथल्या जमिनी ताब्यात घेऊन पवनचक्क्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा घाट श्रीमंतांनी घातलेला दिसतो. त्यामुळे उंचच उंच पहाडांवर अहोरात्र फिरत राहणारे भलेमोठे पंखे ही देखील या भागाची ओळख ठरते आहे. पण त्यापलीकडे जाऊन या भागात स्थानिकांच्या विकासासाठी पैसा ओतण्याची तयारी मात्र अजून तरी कुणीच दाखवत नाहीय्‌. अगदी सरकारसुद्धा!. सरकारी योजना अद्यापतरी एखाद्या महोत्सवाच्या पलीकडे सरकलेल्या नाहीत. बहुधा म्हणूनच वनजमिनी याला त्याला वाटून टाकण्यात जिल्हा प्रशासनालाही फारसे वावगे वाटत नाही. झाडांची कत्तल रोखण्याबाबतही नेमकी तीच उदासीनता आडवी येते. हे चित्र बदलले पाहिजे. बाहेरचे लोक इथे येऊन श्रीमंत होतील, पैसे कमावतील अन्‌ जंगलात राहणारे निहाल, कोरकू लोक मात्र आयुष्यभर उघडे-नागडेच राहतील, हा ‘बदल’ असू शकत नाही. स्थानिकांची परिस्थिती बदलविणारा ‘बदल’ घडून आला पाहिजे. शासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून  तो घडू शकतो आणि मेळघाटचे रूपही त्यातून पालटू शकते. आवश्यकता आहे ती कुणाच्यातरी पुढाकाराची, सर्वांनी एकमेकांना साद घालण्याची, त्या सादाला प्रतिसाद देण्याची...
===

No comments:

Post a Comment