त्यांना जेलमध्ये जाण्यापेक्षा रस्ते झाडणं सोपं वाटलं. प्रत्यक्षात हे काम करण्याची वेळ येईल तेव्हा ते काम प्रत्यक्षात किती सोपं आहे, याचा अंदाज येईलच त्यांना. तंग जीन्स पॅण्ट अन् त्यावर बापकमाईतून विकत घेतलेला शर्ट घालून रस्त्यांवरून शान मारत मिरवणं आणि चार लोकांसमोर त्याच रस्त्यांवर झाडू मारणं, यातील अंतरही कळेलच त्यांना लवकरच. झाडू हातात घेतल्यानं रस्ते स्वच्छ होतील, पण त्यांच्या मनात साचलेल्या घाणीचं काय, हा न्यायालयानं उपस्थित केलेला सवाल म्हणूनच मोलाचा आहे. मुळात समस्या त्या मनातल्या घाणीचीच आहे. ती साफ न झाल्यानेच ठिकठिकाणी ही दुष्कृत्यं घडताहेत. घाण साफ करण्याची ताकद असलेल्या संस्कारांच्या अभावाची भर त्या समस्येचे स्वरूप दिवसागणिक गंभीर बनवत चालली आहे. ज्या दिवशी घराबाहेर पडणार्या आपल्या बहिणीच्या सुखरूप परत येण्याची चिंता प्रत्येक भावाच्या मनाला सतावेल, त्यानुसार समाजातले त्याचे वागणे सुधारेल, दुसर्याच्या बहिणीकडे बघण्याची त्याची वृत्ती बदलेल, त्या दिवशी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’च्या नियमाची गरज उरणार नाही. मुलींसाठी नियमांची चौकट अन् मुलांना त्या चौकटीबाहेर वावरण्याची मुभा, या भेदाने काही समस्या निर्माण केल्यात. अलीकडच्या काळातील ‘मुक्त जीवनाच्या’ पाश्चात्त्य कल्पनांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे उपभोगवादाच्या मर्यादेपलीकडे मानवी जीवनाची कल्पना खुळचट ठरू लागली आहे, तर उपभोगवादाचे समर्थन हे पुरोगामित्वाचे प्रतीक. बहुधा त्यामुळेच सामाजिक जबाबदार्यांचे भान मागे पडून सुख ओरबाडून मिळवण्याची वृत्ती वाढीस लागते आहे. उपरोक्त प्रकरणात ठाण्यातल्या त्या चार तरुणांचे मद्यधुंदीतले वाहवत जाणे, हा त्याचाच परिपाक आहे.
मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढणार्या चार तरुणांना, सार्वजनिक रस्ते स्वच्छ करण्याची, परवा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जराशी निराळी, शिक्षेच्या पारंपरिक चौकटीबाहेरची आणि म्हणूनच चर्चेचीही ठरली आहे. अशा प्रकारची शिक्षा कायद्यातील नेमक्या कुठल्या तरतुदींनुसार देण्यात आली आहे, असा सवाल काही तज्ज्ञांद्वारे उपस्थित केला जात आहे; तर दुसरीकडे, एक नवा पायंडा या प्रकरणाने निर्माण केला असल्याची भावनाही आता उमटते आहे. काहींना सहज पटणारा, तर काहींना अजीबात न पटलेला हा काहीसा अनोखा वाटणारा पायंडा असला, तरी शिक्षेची एक नवी रीत, निराळी तर्हा म्हणून त्याचा स्वीकार व्हायला काय हरकत आहे? एखाद्याला कारागृहात धाडले म्हणजेच ती कठोर शिक्षा असते, हा प्रचलित समज समाजमनात पक्का घर करून बसला असल्याने आणि त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षेच्या तर्हा शोधण्याची गरजच या समाजाला आजवर कधी न जाणवल्याने असेल कदाचित, पण परंपरा मोडीत काढणारी ही तर्हा न मानवलेली मंडळी आता या प्रकरणी विरोधात उच्चरवात बोलू लागली आहे. वर्षभरापूर्वी दसर्याच्या देवी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दारू पिऊन धिंगाणा घालणार्या ठाण्यातल्या चार तरुणांबाबतचे हे प्रकरण आहे. घटनेनंतर तक्रार दाखल झाली. न्यायालयात केस दाखल झाली. या काळात या दिवट्यांच्या पालकांवर पीडितांचे पाय धरण्याची वेळ आली. त्यांनीही समंजसपणा दाखवला आणि तक्रारी मागे घेण्याची तयारी दाखवली. पोलिसांच्या दंडुक्यांमुळे की जेलमध्ये जाण्याच्या भीतिपोटी, ठाऊक नाही, पण त्या वेळी मर्दुमकी दाखवणारी ही उनाड पोरंही अचानक सुधारली आणि कारागृहात जाण्यापेक्षा त्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर झाडू मारण्याची शिक्षा भोगण्याची तयारी दाखवली. आता कायदेशीर रीत्या कुणाची तक्रारच राहिली नसल्याने या युवकांना शिक्षा होण्याचा प्रश्न उरला नव्हता. तरीही या युवकांना त्यांनी केलेल्या कृत्याची जाणीव व्हायला हवी, या भावनेतून असेल कदाचित, पण न्यायालयाने ती विनंती मान्य केली. एका हॉस्पिटलला पाच-पाच हजार रुपयांची देणगी देण्यासही त्यांना भाग पाडण्यात आले आहे. आता हे चारही युवक पुढील सहा महिन्यांपर्यंत दर रविवारी चार तास सार्वजनिक रस्ते स्वच्छ करणार आहेत. ‘सातच्या आत घरात’चा नियम फक्त मुलींसाठीच का असावा? त्यांच्यासाठी तसा नियम तयार करण्याची वेळ आणणार्या ‘मोकाट जनावरांवर’ कुणी नियंत्रण ठेवायचे? ज्यांना दुसर्यांच्या घरातल्या मुली म्हणजे केव्हाही हात टाकावा अशी वस्तू वाटते, त्यांच्या थोबाडीत हाणायची कुणी? दिल्लीत निर्भयावर निर्दयी अत्याचार करणार्या अन् नंतर वयाचा दाखला देत, लहान म्हणवून घेत, स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कायद्यातील तरतुदींवर निर्लज्जपणे बोट ठेवणार्या किंवा मग मद्यधुंद अवस्थेत मिरवणुकीतील महिलांची छेड काढणार्यांना त्यांच्या निलाजरेपणाची शिक्षा काय द्यायची? इथे कौतुक तर मनाचं मोठेपण दाखवणार्या पीडितांच्या पालकांचं करायला हवं. दाखल केलेली तक्रार मागे घेत त्यांनी या नराधमांच्या भविष्याचा विचार केला. असा विचार एखाद्याच्या अब्रूवर हात घालताना त्या युवकांनी नको करायला हवा होता? त्यांना कुठे जराशीही लाज वाटली होती, ते कुकृत्य करताना? म्हणूनच या युवकांना कारागृहात धाडून तोंड लपविण्याची संधी देण्यापेक्षा, सर्वांसमोर रस्ते साफ करण्याची शिक्षा अधिक मोठी आणि महत्त्वाची वाटली न्यायालयाला. आमच्या मुलींच्या इभ्रतीवर हात घालणारी हीच ती उनाड पोरं असल्याचं सार्या जगाला कळलं पाहिजे अन् दुसर्यांच्या घरातल्या पोरींच्या अब्रूची किंमत काय असते, हे त्या मुलांनाही समजलं पाहिजे. खरं तर शिक्षेचा हा पर्याय या युवकांनीच न्यायालयाला सुचवला आहे. त्यांना जेलमध्ये जाण्यापेक्षा रस्ते झाडणं सोपं वाटलं. प्रत्यक्षात हे काम करण्याची वेळ येईल तेव्हा ते काम प्रत्यक्षात किती सोपं आहे, याचा अंदाज येईलच त्यांना. तंग जीन्स पॅण्ट अन् त्यावर बापकमाईतून विकत घेतलेला शर्ट घालून रस्त्यांवरून शान मारत मिरवणं आणि चार लोकांसमोर त्याच रस्त्यांवर झाडू मारणं, यातील अंतरही कळेलच त्यांना लवकरच. झाडू हातात घेतल्यानं रस्ते स्वच्छ होतील, पण त्यांच्या मनात साचलेल्या घाणीचं काय, हा न्यायालयानं उपस्थित केलेला सवाल म्हणूनच मोलाचा आहे. मुळात समस्या त्या मनातल्या घाणीचीच आहे. ती साफ न झाल्यानेच ठिकठिकाणी ही दुष्कृत्यं घडताहेत. घाण साफ करण्याची ताकद असलेल्या संस्कारांच्या अभावाची भर त्या समस्येचे स्वरूप दिवसागणिक गंभीर बनवत चालली आहे. ज्या दिवशी घराबाहेर पडणार्या आपल्या बहिणीच्या सुखरूप परत येण्याची चिंता प्रत्येक भावाच्या मनाला सतावेल, त्यानुसार समाजातले त्याचे वागणे सुधारेल, दुसर्याच्या बहिणीकडे बघण्याची त्याची वृत्ती बदलेल, त्या दिवशी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’च्या नियमाची गरज उरणार नाही. मुलींसाठी नियमांची चौकट अन् मुलांना त्या चौकटीबाहेर वावरण्याची मुभा, या भेदाने काही समस्या निर्माण केल्यात. अलीकडच्या काळातील ‘मुक्त जीवनाच्या’ पाश्चात्त्य कल्पनांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे उपभोगवादाच्या मर्यादेपलीकडे मानवी जीवनाची कल्पना खुळचट ठरू लागली आहे, तर उपभोगवादाचे समर्थन हे पुरोगामित्वाचे प्रतीक. बहुधा त्यामुळेच सामाजिक जबाबदार्यांचे भान मागे पडून सुख ओरबाडून मिळवण्याची वृत्ती वाढीस लागते आहे. उपरोक्त प्रकरणात ठाण्यातल्या त्या चार तरुणांचे मद्यधुंदीतले वाहवत जाणे, हा त्याचाच परिपाक आहे. या प्रकरणात पीडितांच्या पालकांची समंजसपणाची भूमिका म्हणूनच कौतुकास्पद आहे. जे सामाजिक भान त्या युवकांनी जपणे अपेक्षित होते, ते पीडितांच्या पालकांनी जपले आहे. आपल्या वागण्याने कुणाच्या भविष्यावर काय परिणाम होईल, याची जी जाणिव त्या युवकांनी जपायला पाहिजे होती, ती पीडितांच्या पालकांनी जपली आहे. मोठ्या मनाने माफ करण्याच्या त्यांच्या निर्णयातून या युवकांमध्ये हृदयपरिवर्तन घडेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी. केलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून ही मुलं उद्या जेव्हा रस्ते झाडतील, तेव्हा त्यांच्या वागण्यामागील कारणांची चारचौघात चर्चा होईल, त्यातून यांच्या विचारांत, वागण्यात बदल घडून यावा. समाजातील अन्य सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा. सामाजिक उपक्रम म्हणून ठीक, पण शिक्षा म्हणून रस्ते झाडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असे आचरण प्रत्येकाचे असावे. आपल्या कायद्यात अशा शिक्षांची तरतूद नाही. पण, कायद्याच्या चौकटीपलीकडे असल्या सामाजिक आशय स्पष्ट करणार्या शिक्षांना कुणी विरोध करण्याचे तसे काही कारण दिसत नाही. पण, लोकशाहीचा अतिरेक झालेल्या या देशात तसला विरोध करणार्यांना आवर घालणारी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने, काही कायदेपंडित उद्या काही प्रश्न उपस्थित करतील, याची कल्पना जराशी बाजूला सारून शिक्षेच्या या थोड्याशा आगळ्या तर्हेचे स्वागत करायला काय हरकत आहे? कदाचित मनातली घाण स्वच्छ व्हायला मदत होईल त्याने...!
No comments:
Post a Comment