Wednesday, January 13, 2016

छे, हा तर तमाशा!

इथे कार्यकर्ते पक्षाचे राहिलेच कुठे आहेत. ते तर कुठल्यातरी नेत्याशी बांधील आहेत. असा चरणाशी लीन होणारा गोतावळा निर्माण करण्यातच मग्न राहिलेत या पक्षाचे नेते आजवर. अगदी इंदिरा गांधींपासून तीच परंपरा जपली, जोपासली जात आहे. जेव्हा त्यांना गरज भासली तेव्हा त्यांनी ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची साद’ घातली. जेव्हा स्वत:ला वाटले तेव्हा त्यांनी कॉंग्रेसची शकले केली. जयप्रकाश नारायण यांना बाजूला करण्याची खेळीही त्यांचीच अन् अर्स कॉंग्रेसला वाट मोकळी करून देणारा डावही त्यांचाच. आणिबाणी लादणारेही तेच अन् मग त्यासाठीची माफीची नौटंकी करत निवडणुकी जिंकणारेही तेच. मूर्ख बनणारी जनता अन् हुजरेगिरी करण्यात रमलेली कार्यकर्त्यांची फौज दिमतीला कायम हजर राहात गेल्याने नेहमीच फावत गेले या नेत्यांचे. आता त्यांची परंपरा चालवणारे नेते हुजरेगिरीचा तोच कित्ता गिरवीत आहेत. राहुल गांधी येणार म्हटल्यावर पक्षाचा कार्यक्रम ‘मुंबईत’ आयोजित करण्यापेक्षा, तो आपल्या मतदारसंघात आयोजित करण्यातच स्वारस्य यांना. नाही तर मग राहुल गांधींच्या पुढे मिरवता कसे येईल? आणि पुढेपुढे करून शक्तिप्रदर्शन केले नाही तर मग भविष्यातील उमेदवारीची, पक्षाध्यक्षपदावरील निवडीची तजवीज कशी करून ठेवता येईल? सामान्य जनता, त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीचे यत्न, याचे भान इथे आहे कुणाला? मी, माझे नेतृत्व, माझा मतदारसंघ यातच रमले आहेत सारे. 


तिकडे आंध्रप्रदेशात रंगारेड्डींसमोर रंगलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा किस्सा अद्याप मागे पडलेला नसताना, पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुरोगामित्वाचे दावे छातीठोकपणे करणार्‍या कॉंग्रेस पक्षातली मंडळी हमरीतुमरी करत एकमेकांसमोर उभी ठाकल्याची बातमी येऊन धडकली आहे. झालं काय की, राहुल गांधी येताहेत आपल्या मुंबईत. त्यांच्या दौर्‍याचे नियोजन करायचे म्हणून मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी चर्चेसाठी एकत्र बसले. पण पक्षाच्या उपाध्यक्षांना सार्‍या मुंबईत फिरवावे की संजय निरुपम यांच्या उत्तर मुंबईतच त्यांच्या कार्यक्रमांची आखणी करावी, याबाबत गुरुदास कामत आणि निरुपम यांच्या समर्थकांमध्ये एकमत काही होईना! मग हळूच बाचाबाची सुरू झाली. थोड्या वेळाने मद्याची लढाई गुद्यांवर आली. कार्यकर्ते म्हणविणारे, नेत्यांचे चमचे एकमेकांना भिडले. हातापायी झाली. ‘कॉंग्रेस दर्शन’ प्रदर्शनीतून नेहरूंच्या कारभाराचे वाभाडे काढणार्‍यांनी या वागणुकीतून कॉंग्रेस संस्कृतीचे दर्शन घडविणारा तमाशा नव्याने मांडला. अर्थात चव्हाट्यावरची असली भांडणं, जाहीरपणे होणारा तमाशा, या काही कॉंग्रेस पक्षासाठी नव्या, नवलाईच्या गोष्टी नाहीत. जरासे मागे जाऊन इतिहासाची पाने चाळली तरी त्याची साक्ष पटेल. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पक्षाचा अधिकृत उमेदवार पाडून व्ही. व्ही. गिरींना निवडून आणण्याकरता पक्षाविरुद्ध जाऊन, ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याची’ इंदिरा गांधींनी कार्यकर्त्यांना घातलेली साद असो वा मग सोनिया गांधींना नको म्हणून नरसिंहरावांचे पार्थिव कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फुटपाथवर ठेवण्याची आलेली दुर्दैवी वेळ असो, हा पक्ष असल्या तमाशांचा साक्षीदार राहिला आहे कित्येकदा. पक्षाची युवा आघाडी असलेल्या एनएसयुआयच्या एका राष्ट्रीय परिषदेत राजीव गांधींसमोर कार्यकर्त्यांनी नागपुरात मांडलेला तो उच्छाद आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. कार्यकर्तेच कशाला, नेतेही एकमेकांना जुमानत नहीत इथे. नाईक मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसच्या विधिमंडळ बैठकीतला तो एकमेकांच्या अंगावर उशा फेकण्याचा ‘कार्यक्रम’ पार पडल्यावर शरद पवारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा मुहूर्त साधला होता. तिकडे दिल्लीत सीताराम केसरींची पक्षाध्यक्ष आणि पक्षकार्यालयातून सामानासकट झालेली हकालपट्टीही विस्मरणात गेलेली नाही अजून कुणाच्याच. त्यामुळे, हा अन् असाच इतिहास लाभलेल्या या पक्षाच्या विद्यमान कार्यकर्त्यांनी त्याची री ओढणे तसे नवलाईचे नाहीच! तिकडे इंदिरा-सोनियानिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्पात, तर इकडे स्थानिक नेत्यांच्या पिलावळीचा. पक्षाशी कोणालाच काही घेणेदेणे नाही. यात ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांचा पाऽऽर कचरा होतो. पण त्यांना मोजतो कोण इथे? नेत्यांपुढे हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानणार्‍यांची गर्दी सारी; अन् त्यांचाच बोलबाला आहे सर्वदूर. गुरुदास कामत असोत की संजय निरुपम, यांना काय पक्ष थोडीच वाढवायचा आहे? स्वत:ची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी धडपड चाललीय् सारी. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते दावणीला बांधलेत यांनी पैशाच्या जोरावर. त्याच जोरावर दिल्लीत फुशारकी मारते ही मंडळी. त्याच्याच भरवशार निवडणुकीतली उमेदवारीही मिळवायची, त्याच आधारे लोकप्रतिनिधित्व मिळवायचे अन् त्या समर्थकांनाच एकमेकांशी भिडवून आपली नेतेगिरीही टिकवायची... इथे कार्यकर्ते पक्षाचे राहिलेच कुठे आहेत. ते तर कुठल्यातरी नेत्याशी बांधील आहेत. असा चरणाशी लीन होणारा गोतावळा निर्माण करण्यातच मग्न राहिलेत या पक्षाचे नेते आजवर. अगदी इंदिरा गांधींपासून तीच परंपरा जपली, जोपासली जात आहे. जेव्हा त्यांना गरज भासली तेव्हा त्यांनी ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची साद’ घातली. जेव्हा स्वत:ला वाटले तेव्हा त्यांनी कॉंग्रेसची शकले केली. जयप्रकाश नारायण यांना बाजूला करण्याची खेळीही त्यांचीच अन् अर्स कॉंग्रेसला वाट मोकळी करून देणारा डावही त्यांचाच. आणिबाणी लादणारेही तेच अन् मग त्यासाठीची माफीची नौटंकी करत निवडणुकी जिंकणारेही तेच. मूर्ख बनणारी जनता अन् हुजरेगिरी करण्यात रमलेली कार्यकर्त्यांची फौज दिमतीला कायम हजर राहात गेल्याने नेहमीच फावत गेले या नेत्यांचे. आता त्यांची परंपरा चालवणारे नेते हुजरेगिरीचा तोच कित्ता गिरवीत आहेत. राहुल गांधी येणार म्हटल्यावर पक्षाचा कार्यक्रम ‘मुंबईत’ आयोजित करण्यापेक्षा, तो आपल्या मतदारसंघात आयोजित करण्यातच स्वारस्य यांना. नाही तर मग राहुल गांधींच्या पुढे मिरवता कसे येईल? आणि पुढेपुढे करून शक्तिप्रदर्शन केले नाही तर मग भविष्यातील उमेदवारीची, पक्षाध्यक्षपदावरील निवडीची तजवीज कशी करून ठेवता येईल? सामान्य जनता, त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीचे यत्न, याचे भान इथे आहे कुणाला? मी, माझे नेतृत्व, माझा मतदारसंघ यातच रमले आहेत सारे. यात आडवा येईल त्याला लोळवण्याच्या ईर्ष्येतूनच परवाची कामत-निरुपम समर्थकांची लढाई घडली आहे. नावं तेवढी बदलली. बाकी नेते आणि त्यांची वृत्ती तीच कायम आहे अजून. कालपर्यंत ‘ते’ यांना दरबारात हजर करीत होते. आता ‘यांच्या’ दरबारात यांना कुर्निसात करणार्‍यांची गर्दी जमली आहे. कालपर्यंत कार्यकर्त्यांच्या जोरावर ‘त्यांनी’ हुकमत गाजवली, आता त्याच कार्यकर्त्यांच्या जिवावर ‘हे’ अरेरावी करायला निघाले आहेत. कार्यकर्त्यांच्या नशिबी मात्र कायम दुर्दैवच आहे. ते कालही नेत्यांचा जयघोष करीत होते आणि आजही त्यांच्या वाट्याला नेत्यांच्या जयजयकारापलीकडे काही आलेले नाही. थंड हवेच्या खोलीत किंवा वाहनात बसून ऐश करणार्‍या नेत्यांसाठी उन्हातानात उभे राहाणे हेच त्या कार्यकर्त्यांचे प्राक्तन आहे. आपल्या नेत्याच्या इशार्‍यावर दुसर्‍याच्या अंगावर धावून जायला तो सहज तयार होतो. स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी कुणीतरी आपला, आपल्या बळाचा, आपल्या संख्येचा ‘वापर’ करून घेत असल्याचे त्याच्या ध्यानीही येत नाही. बहुधा म्हणूनच नेतेही बेमालूमपणे कार्यकर्त्यांच्या या भावनांचा बाजार मांडत त्याचा दुरुपयोग करतात. मुंबईच्या टिळक भवनात रंगलेली परवाची कार्यकर्त्यांची लढाई हा त्याचाच परिपाक आहे. ती हमरीतुमरी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधली नाहीच. ती लढाई एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहिलेल्या दोन नेत्यांच्या समर्थकांमधली आहे. ती लढाई पक्षाच्या ध्येय, धोरणं, निष्ठेसाठी नव्हतीच कधी. ती तर व्यक्तिपूजेला समर्पित शक्तिप्रदर्शनाची केविलवाणी धडपड आहे. दौर्‍यावर येणार्‍या राहुल गांधींसमोर हुजरेगिरी करण्यात पुढे कुणी राहायचे यासाठीच्या शर्यतीत आपल्या वजिराचा जय व्हावा म्हणून प्याद्यांनी आपसात चालवलेली ती लढाई आहे. त्याला लढाई म्हणायचे की हमरीतुमरी, त्याला चकमक म्हणायचे की चव्हाट्यावरची भांडणं, ठावूक नाही. पण, पक्षाच्या परंपरेला साजेसा असा तो परंपरागत तमाशा आहे, हे मात्र नक्की!

No comments:

Post a Comment