Wednesday, November 12, 2014

तर्‍हेवाईक माणसं

तशी तर शेंदूर फासलेल्या दगडालाही देव मानून त्याच्यासमोर नतमस्तक होणारी साधी, भाबडी माणसं ही. गावात नेता आला की गर्दी करणारी. वर्दीतला पोलिस दिसला की दूर पळणारी. कुणाविरुद्ध ब्र न काढता मुकाट्यानं अन्याय गिळणारी. पण कधीकधी त्यांच्याही नकळत हैवान जागा होतो त्यांच्यातला. मग त्यासाठीही कारणांचा शोध घेत फिरत राहतात माणसं इथली. पश्‍चिम बंगालातल्या एका गावातल्या जात पंचायतीनं आदेश दिला तर लागलीच गावातल्या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला एका महिलेवर. परवा राजस्थानातल्या एका जात पंचायतीनं आदेश दिला, तर लागलीच निर्वस्त्र करून एका महिलेची धिंड काढली गावकर्‍यांनी. असे का करायचे? यातून एका महिलेवर नव्यानं अत्याचार का करायचा, असले निर्बुद्ध आदेश देण्याचे पंचायतीला कायद्याने अधिकार तरी आहेत का, यापैकी एकही सवाल एकाही ‘जागृत’ माणसानं विचारला नाही. जात पंचायतीला उलट प्रश्‍न करून आपण गोत्यात कशाला या, असा विचार करत सोयीचे राजकारण प्रत्येकाने केले. या क्लिष्ट प्रश्‍नापेक्षा महिलेची धिंड किंवा तिच्यावरचा बलात्कार सोपा वाटलेली माणसंही हीच आहेत बघा!


आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता जराशी निराळीच आहे. एरवी शांत राहणार्‍या इथल्या जनतेला पेटून उठायला लागणारा उशीरही कमालीचा आहे अन् पेटलेल्या जनतेच्या मनातला राग शांत होण्यासाठी लागणारा कालावधीही तेवढाच आश्‍चर्यजनक आहे. इथे अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठीही लोकांना त्या अन्यायाची जाणीव करून द्यावी लागते अन् स्वत:च्या घरापुढचे आंगण स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देण्यासाठीही त्यांना एक ‘मोदी’ लागतो. स्वत:ला हवे तेव्हा रांग मोडून पुढे जाणारेही हेच असतात आणि स्वत: रांगेत उभे असताना ती मोडून कुणी पुढे गेलं तर त्याच्यावर ओरडणारेही हेच! एरवी यांच्या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नसल्याची तक्रार हेच करणार आणि त्यासाठी कुण्या राजकीय पक्षाने आंदोलन उभारले, तर रस्ते बंद केले, वाहतुकीचा खोळंबा केला म्हणून नाकं मुरडणारेही हेच असतात. मनातली देशभक्तीची भावना नव्याने जागृत व्हायलाही इथे स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिनाचे निमित्त लागते. निदान कारगिलचे एखादे युद्ध तरी घडावे लागते. तसे झाले की मग ओसंडून वाहणार्‍या उत्साहाला पारावार राहत नाही. आकाशात दिमाखाने फडकणारे ध्वज मग नकळत खांद्यावर येतात. आसमंतात निनादणार्‍या घोषणांनाही मग कंठ फुटतो. देशभक्तीच्या भावनेलाही धुमारे फुटतात. आधीच बेभान असलेली, वेगवान बाईक्सवरून सुसाट पळणारी तरुणाईही त्या भावनेने अधिकच बेभान होते. देशभक्तीच्या भावनाही मग कानठळ्या बसविणार्‍या आवाजात, जल्लोषात व्यक्त होतात... त्याच बाईक्सच्या वेगात. सुसाट...
सध्या सर्वदूर मेणबत्त्या पेटविण्याचे फॅड आले आहे इथे. निर्भया असो की हेमंत करकरे, सर्वच प्रकरणांत भावना व्यक्त करण्याचे ते सोपे साधन झाले आहे. कुठल्याशा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या तसबिरीपुढे एक दिवस मेणबत्ती पेटवून भावना व्यक्त केल्या की कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचे तेज आयुष्यभर चेहर्‍यावर मिरवायला मोकळे, अशा मानसिकतेत जगणारी माणसंही हीच. स्टार हॉटेलमध्ये वेटरला दोन आकड्यातली सर्वाधिक रकमेची टीप देताना अभिमानाने कॉलर टाईट करणारी आणि बाहेरच्या भिकार्‍याला आठ आण्याची भीक देणेही खिशात चिल्लर नसल्याचा बहाणा करून टाळणारी. इथे एखाद्याचं मरणही क्रिकेटच्या मॅचच्या दिवशी नको असते कुणाला. रस्त्यावरचा अपघात डोळ्यांदेखत घडला तरी तिथनं शक्यतो बाजूने निघून जाणे अधिक पसंत करणारी आणि आपल्या वेळी मात्र आजूबाजूच्यांनी बघ्याची भूमिका घेतली की संतापणारी मंडळी हीच. स्वत: स्वत:च्या सोयीने जगणारी, दुसर्‍यांकडून मात्र आपल्या सोयीने जगण्याची अपेक्षा बाळगणारी...
का वागत असतील माणसं अशी? तशी तर शेंदूर फासलेल्या दगडालाही देव मानून त्याच्यासमोर नतमस्तक होणारी साधी, भाबडी माणसं ही. गावात नेता आला की गर्दी करणारी. वर्दीतला पोलिस दिसला की दूर पळणारी. कुणाविरुद्ध ब्र न काढता मुकाट्यानं अन्याय गिळणारी. पण कधीकधी त्यांच्याही नकळत हैवान जागा होतो त्यांच्यातला. मग त्यासाठीही कारणांचा शोध घेत फिरत राहतात माणसं इथली. पश्‍चिम बंगालातल्या एका गावातल्या जात पंचायतीनं आदेश दिला तर लागलीच गावातल्या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला एका महिलेवर. परवा राजस्थानातल्या एका जात पंचायतीनं आदेश दिला, तर लागलीच निर्वस्त्र करून एका महिलेची धिंड काढली गावकर्‍यांनी. असे का करायचे? यातून एका महिलेवर नव्यानं अत्याचार का करायचा, असले निर्बुद्ध आदेश देण्याचे पंचायतीला कायद्याने अधिकार तरी आहेत का, यापैकी एकही सवाल एकाही ‘जागृत’ माणसानं विचारला नाही. जात पंचायतीला उलट प्रश्‍न करून आपण गोत्यात कशाला या, असा विचार करत सोयीचे राजकारण प्रत्येकाने केले. या क्लिष्ट प्रश्‍नापेक्षा महिलेची धिंड किंवा तिच्यावरचा बलात्कार सोपा वाटलेली माणसंही हीच आहेत बघा!
राजकारण, क्रिकेट अथवा चित्रपटात झळकणार्‍या माणसांची झलक दुरूनही बघण्यात समाधान मानणारी, त्यांच्या यशापयशात सुखदु:ख मानणारी, टीव्हीवरच्या मालिकांमधील कथानकातही आपले आयुष्य धुंडाळणारी. आपल्या सार्‍या समस्यांचे ओझे सरकार आणि प्रशासन नावाच्या यंत्रणेवर सोपवून बिनधास्तपणे स्वत:त रमणारी ही माणसं कधी कुणाच्या राजकारणातला मोहरा झाली, कधी त्याच्या आडून दंगली घडल्या, कधी त्यालाच निशाण्यावर ठेवून कुणाच्या स्वप्नांचे इमले चढले, तर कधी त्यालाच पायदळी तुडवून कुणी सत्तेच्या पायर्‍या चढले. हीच संधी मानून त्याच्या समस्यांचीही तोरणे बांधून काहींनी उत्सव साजरे केलेत. हा मात्र तसाच राहिला. नागवा. समस्या पाचवीला पूजलेल्या अवस्थेत. गर्दीत चेहरा हरवलेला. माणसांच्या गर्दीत माणुसकीचा वेध घेत. आपल्या समस्यांचे ओझे आपल्याच पाठीवर वाहात आणि गार्‍हाण्यांचे गाठोडे आपल्याच उशाशी ठेवून. राहिला प्रश्‍न त्याच्या अपेक्षांचा. त्या तर नेहमी त्याच्याचपाशी राहिल्या. सर्वच स्तरांवर बेदखल. तरीही तो कुणाच्यातरी इशार्‍यावरून कधी भाषेसाठी, कधी आपल्या मुलखासाठी, कधी जाती-पातीसाठी, तर कधी एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आपल्या नेत्यासाठीही तो इमानेइतबारे झगडत राहतो. प्राणपणाने. स्वत:चे अस्तित्व विसरून नेत्याच्या उत्कर्षासाठी...

No comments:

Post a Comment