राणे म्हणाले, फडणवीस तसे हुशार आहेत. अभ्यासू आहेत. पण प्रशासन चालवायला जे ‘चातुर्य’ लागते, ते त्यांच्याकडे नाही. फडणवीसच काय, त्यांच्या सहकार्यांकडेही ते चातुर्य नाही. त्यामुळे हे सरकार कमजोर आहे. खरा आहे राणे साहेबांचा दावा! आदर्श प्रकरणात जे ‘चातुर्य’ अशोक चव्हाणांनी सिद्ध केले, सिंचन घोटाळ्यात जे अजित पवारांनी सिद्ध केले, घरकुल घोटाळ्यात जे चातुर्य गुलाबराव देवकरांना स्पष्ट करता आले...‘त्या’ चातुर्याची वानवा भाजपा नेत्यांमध्ये असेल, खुद्द राणेसाहेब ते मान्य करत असतील, तर राणे साहेब एक लक्षात ठेवा, इथल्या लोकांना आता तसेच सरकार हवे आहे. तुमच्या दृष्टीनं कमजोर असले तरीही....
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतल्या नेत्यांना केवळ सरकारी बंगले हातून जात असल्याचेच दु:ख नाही, तर सत्तेच्या माध्यमातून गमावलेल्या अन्य सर्वच बाबतीतही वेदना होताना दिसताहेत. त्या वेदना वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होतानाही दिसताहेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेऊन अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही. अशात नारायण राणेंना सरकारमधील कमजोरीही दृष्टिपथास पडू लागली आहे. एवढे दिवस तर राणेंना पराभवाच्या दु:खातून सावरण्यासही पुरले नसतील. पण विरोधकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी पोती भरून तयार ठेवल्या आहेत.
फार थोड्या काळाचा अपवाद वगळता राज्य शकट आजवर कॉंग्रेसने एकहाती हाकले. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी सोबतीला होती. वेगवेगळ्या मुद्यांवरून आपसात भांड भांड भांडले तरी सत्तेच्या दोर्या हातून निसटू नयेत याची काळजी यातील प्रत्येकच पक्षाच्या नेत्याने सतत घेतली. एव्हाना निवडणूक जिंकण्याची गणितंही यांना ठावूक झालेली. त्यामुळे लाख भ्रष्टाचार केला, घोटाळे केले, सरकारी तिजोरीची लूट केली, तरी सत्ता यांच्याच हातात राहिली. यंदा मात्र गणित चुकले. लोकांनी केलेल्या निर्धारापुढे निवडणूक जिंकण्याच्या त्यांच्या क्लृप्त्या कुचकामी ठरल्या. लोकांनी खरोखरीच सत्ता यांच्या हातून हिसकावून घेतली. नारायण राणेंसारख्या दिग्गजांना अक्षरश: घरी बसवले. कालपर्यंत कायम मंचावर दिसणारे नेते परवाच्या वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात मंचासमोरील खुर्च्यांवर दुसर्या, तिसर्या रांगेत बसलेले दिसत होते. त्यामुळे वास्तवाचे भान आल्यानंतर यांची तगमग त्यांच्या वागण्या, बोलण्यातून अधिकच तीव्रतेने व्यक्त होऊ लागली आहे. सत्ता गमावल्याच्या वेदना त्यांच्या चेहर्यावरून झळकत आहेत. अन्यथा पदाची शपथ घेतल्यावर चौथ्या, पाचव्याच दिवशी सरकारमधील उणिवा काढण्याचा भलामोठा विनोद राणेंनी केला नसता.
राणे म्हणाले, फडणवीस तसे हुशार आहेत. अभ्यासू आहेत. पण प्रशासन चालवायला जे ‘चातुर्य’ लागते, ते त्यांच्याकडे नाही. फडणवीसच काय, त्यांच्या सहकार्यांकडेही ते चातुर्य नाही. त्यामुळे हे सरकार कमजोर आहे. खरा आहे राणे साहेबांचा दावा! आदर्श प्रकरणात जे ‘चातुर्य’ अशोक चव्हाणांनी सिद्ध केले, सिंचन घोटाळ्यात जे अजित पवारांनी सिद्ध केले, घरकुल घोटाळ्यात जे चातुर्य गुलाबराव देवकरांना स्पष्ट करता आले...‘त्या’ चातुर्याची वानवा भाजपा नेत्यांमध्ये असेल, खुद्द राणेसाहेब ते मान्य करत असतील, तर राणे साहेब एक लक्षात ठेवा, इथल्या लोकांना आता तसेच सरकार हवे आहे. तुमच्या दृष्टीनं कमजोर असले तरीही....
No comments:
Post a Comment