Friday, February 19, 2016

इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब!

कायम दुसर्‍यांवर आरोप करण्याची सवय जडल्याने आणि तोडफोडीची आक्रमक भाषा वापरली की मगच नेतृत्व सिद्ध होते, या कल्पनेत कायम वावरत राहिल्याने, असल्या सकारात्मक बाबींच्या पाठीशी उभं राहण्याचा सरावही नसणार त्यांना. त्यामुळे कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा उपक्रम साहेबांना ‘इव्हेंट’ वाटणे स्वाभाविकच. त्यांनी राहुल गांधी आणि अमित शाहांना एकाच तराजूत तोलून दोघांनाही एकाच टिपेवर धारेवर धरण्याचा प्रकारही तसा नवलाईचा नाहीच. बरं एकाच वेळी सर्वांवर वार केले नाहीत, तर मग उगाच याच्या बाजूचा, त्याच्या बाजूचा असल्याचा आरोप होण्याचा संभव असतो. त्यामुळे एकाच चाबकाने रांगेतील सर्वांना फोडून काढण्याचा कार्यक्रम ओघाने आलाच. तो राजसाहेबांनी परवा आपल्या निवासस्थानी ‘बोलावलेल्या’ पत्रकारांशी बोलताना व्यवस्थितपणे पार पाडला. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अमित शाह... कुणी प्रश्‍न विचारला नाही म्हणून पवार आदी बाकीचे लोक सुटले त्यांच्या हल्ल्यातून. स्वत:ला सत्ता कधी मिळवता आली नाही. त्यामुळे ती राबविण्याचा प्रश्‍नच कधी उद्भवला नाही. त्यामुळे दूर बसून आगपाखड करण्यातच दिवस चाललेत त्यांचे. दुसर्‍याच्या यशातही अपयशाचा धांडोळा घेण्याची सवय त्या नैराश्यातूनच जडली असावी कदाचित! अन्यथा, त्यांच्या आगपाखडीमागील कारण दुसरे काय असणार? अन्यथा, ज्याचा दुसर्‍यांवर आरोप करताय् तसले ‘शो’बाज तर तुम्हीही आहात. साजरे करायला इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब! 
‘‘भाजपाचं सरकार हे ‘शो’बाज सरकार असून, मोदींना दर महिन्यात एक इव्हेंट लागतो....’’ इति राज (साहेब) ठाकरे. 
व्वा! काय गम्मत आहे बघा, ज्यांनी आपलं नेतृत्व आणि नेतृत्वाची तर्‍हा, भाषणं, त्यातले मुद्दे, आंदोलनं, त्याचे विषय... सारंच तोलून-मापून, राजकारणाची गणितं मांडून केलं, ज्यांच्या भाषणाचा एक एक कार्यक्रम ‘इव्हेंट’च्या चौकटीपलीकडे कधी गेला नाही, ज्यांची भाषणं सनसनाटी निर्माण करण्याच्या उद्देशांपलीकडे कधी गेली नाहीत, भाषणच कशाला, दौर्‍यापासून तर आंदोलनापर्यंतच्या प्रत्येक बाबीतून ज्यांनी ‘राज’कारण साधण्याचाच तेवढा प्रयत्न केला, त्या राजसाहेबांना केंद्र सरकारच्या कार्यक्रमात ‘शो’ पलीकडे काही दिसू नयेे, हा चमत्कार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या मनसेच्या वाताहतीतून घडला असावा कदाचित! त्या निवडणुकीत वाट्याला आलेल्या दारुण पराभवानंतर गेले काही दिवस हा पक्ष अन् त्यांचे नेते कुठे दडून बसले होते, हेही कळले नाही कुणाला. आमच्याकडे एकहाती सत्ता द्या आणि बघा मी कसा महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवतो, हे त्यांचे आवाहन जनतेने काही तितकेसे मनावर घेतले नाही. ‘एकहाती’ सत्तेच्या आवाहनाच्या प्रतिसादात या पक्षाचा फक्त ‘एक’ उमेदवार निवडून दिला लोकांनी. त्यामुळे या राज्याचा कायापालट करण्याचं स्वप्न तसंच राहिलं अन् आता पुन्हा एकदा आपल्या राजकीय विरोधकांवर मात करण्याची वेळ साहेबांवर आली. बरं साहेबांचं वैशिष्ट्य असं की वार करायला त्यांना कोणीही चालतो. शब्दांचेच बुडबुडे फुलवायचे असतात, त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण तसे नसतेच. कॉंग्रेस काय अन् शिवसेना काय, मोदी काय अन् पवार काय, जो समोर येईल त्याच्यावर वार करत सुटण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला जातो. सध्या मोदी त्यांच्या रडारवर आहेत. 
बहुधा विधानसभा निवडणुकीतल्या त्या लाजिरवाण्या पराभवाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांना आता जरासा हुरूप आला आहे. बहुतेक जराशी सवडही झाली आहे. त्यामुळे बर्‍याच दिवसांनंतर राज साहेबांचे रोखठोक म्हणविले जाणारे ते कडवे शब्द लोकांच्या कानावर पडले आहेत. अर्थात राजसाहेबांनी कुणाला चांगलं म्हणण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कायम सर्वांवर टीका, कायम सर्वांना शिवीगाळ... बहुधा ‘बातमी’ त्याचीच होत असल्याने आणि खळबळ निर्माण होऊन जनमानसात चर्चाही त्याचीच होत असल्याने असेल कदाचित, पण साहेबांना सवय जडली आहे आता बहुतेक असल्या टीका करण्याची. जमेल त्याच्यावर आसूड ओढण्याची. त्यामुळे हाही वाईट अन् तोही खराब. यालाही झोडप, त्यालाही घे आडवा, असे काहीसे आक्रमक ‘वाटणारे’ धोरण ते जाणीवपूर्वक अमलात आणत असावेत. बिनडोकांचा भरणा असलेल्या समोरच्या गर्दीत तसल्या वागण्या-बोलण्याला प्रसिद्धीही वारेमाप मिळते. आपसूकच टाळ्यांचा कडकडाट होतो. मग साहेबांचे टोल नाक्यांविरुद्धचे आंदोलन राज्यभरात उभे राहण्यापूर्वीच जमीनदोस्त कसे झाले, या नाक्यांवर वसूल केल्या जाणार्‍या टोलविरुद्ध त्यांनी त्यावेळी केलेल्या आवेशपूर्ण गर्जनांचे काय? की तोही इव्हेंटच होता, राजसाहेबांनी तेव्हा साजरा केलेला, हा प्रश्‍न कुणाच्या मनातही उभा राहात नाही. परप्रांतीयांना मारहाण केली म्हणून पक्षातील कित्येक कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या कोर्ट केसेसच्या पार्श्‍वभूमीवर, आपण त्या गावचेच नसल्याचे कोर्टात सांगून स्वत: साहेबांनी करवून घेतलेली स्वत:ची सुटका लोकांच्या केव्हाच विस्मरणात गेली असेल एव्हाना. मग आम्ही कुणासाठी लढलो? त्या मारहाणीनंतर सरकारदरबारी परप्रांतीयांची नोकरभरती बंद झाली का? नंतरच्या काळात किती मराठी तरुणांच्या पदरी पडल्या सरकारी नोकर्‍या? की तोही एक इव्हेंटच होता, साहेबांनी त्यावेळी साजरा केलेला? 
टीव्हीवरच्या कुठल्याशा मालिकेत पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग आहे म्हणून त्याचे प्रदर्शन रोखून धरण्याची बात करणार्‍या साहेबांची नंतर काही दिवसातच बदललेली भूमिकाही एव्हाना विस्मरणात गेलीय् लोकांच्या! मालिकेचा दिग्दर्शक ‘कृष्णकुंज’ वर येऊन भेटून जाण्यापूर्वीचा साहेबांचा तो आक्रमक करारी बाणा अचानक कुठे गायब झाला, तोडफोडीची ती लढाऊ भाषा अचानक कशी मवाळ झाली, असे प्रश्‍नही विचारायला धजावलं नाही कुणी. नंतर काय चमत्कार झाला कुणास ठावूक, पण साहेबांचं हृदयपरिवर्तन झालं अन् मालिका प्रदर्शित होण्याचा मार्ग नकळत मोकळा झाला. विरोधाच्या नौटंकीचा एक इव्हेंट पूर्ण झाला होता...
मराठी बाण्याचा असो की मराठी मुलांना मिळवून द्यावयाच्या नोकर्‍यांचा, मुद्दा निवडणुकीतल्या आश्‍वासनांचा असो की मग त्यावेळी सरकारविरुद्ध पुकारलेल्या भूमिकेचा, टीव्हीचे कॅमेरे समोर बघून हुरूप आल्याने त्या पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांना घेराव घालण्याचा इतिहासातला प्रसंग असो की मग परवा त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वादात उतरलेल्या राहुल गांधींवर साधलेल्या शरसंधानाचा, इव्हेंट तर राजसाहेबांनीच साजरे केलेले दिसताहेत वेळोवेळी... असे असेल तर मग त्यांनाही दरवेळी एक ना एक इव्हेंट लागतोच की! 
‘कृष्णकुंज’चा उंबरठाही न ओलांडता, माध्यमांचा ‘वापर’ करून घेत आपण साजर्‍या केलेल्या फालतू इव्हेंटपेक्षा महाराष्ट्रात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्यास साह्यभूत ठरलेला ‘मेक इन इंडिया’ चा इव्हेंट केव्हाही चांगला. नाही का राजसाहेब? पण कायम दुसर्‍यांवर आरोप करण्याची सवय जडल्याने आणि तोडफोडीची आक्रमक भाषा वापरली की मगच नेतृत्व सिद्ध होते, या कल्पनेत कायम वावरत राहिल्याने, असल्या सकारात्मक बाबींच्या पाठीशी उभं राहण्याचा सरावही नसणार त्यांना. त्यामुळे कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा उपक्रम साहेबांना ‘इव्हेंट’ वाटणे स्वाभाविकच. त्यांनी राहुल गांधी आणि अमित शाहांना एकाच तराजूत तोलून दोघांनाही एकाच टिपेवर धारेवर धरण्याचा प्रकारही तसा नवलाईचा नाहीच. बरं एकाच वेळी सर्वांवर वार केले नाहीत, तर मग उगाच याच्या बाजूचा, त्याच्या बाजूचा असल्याचा आरोप होण्याचा संभव असतो. त्यामुळे एकाच चाबकाने रांगेतील सर्वांना फोडून काढण्याचा कार्यक्रम ओघाने आलाच. तो राजसाहेबांनी परवा आपल्या निवासस्थानी ‘बोलावलेल्या’ पत्रकारांशी बोलताना व्यवस्थितपणे पार पाडला. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अमित शाह... कुणी प्रश्‍न विचारला नाही म्हणून पवार आदी बाकीचे लोक सुटले त्यांच्या हल्ल्यातून. स्वत:ला सत्ता कधी मिळवता आली नाही. त्यामुळे ती राबविण्याचा प्रश्‍नच कधी उद्भवला नाही. त्यामुळे दूर बसून आगपाखड करण्यातच दिवस चाललेत त्यांचे. दुसर्‍याच्या यशातही अपयशाचा धांडोळा घेण्याची सवय त्या नैराश्यातूनच जडली असावी कदाचित! अन्यथा, त्यांच्या आगपाखडीमागील कारण दुसरे काय असणार? अन्यथा, ज्याचा दुसर्‍यांवर आरोप करताय् तसले ‘शो’बाज तर तुम्हीही आहात. साजरे करायला इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब! 

No comments:

Post a Comment