Friday, February 12, 2016

ब्रीज द गॅप

छोट्याशा सेफ्टी पिनमधून मनात डोकावणारी गरिबी आणि तेवढ्याच छोट्याशा बटणातून घडणारे श्रीमंतीचे दर्शन, इवल्याशा झोपडीतला वीतभर परिसर उजळून टाकण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जळणार्‍या चिमणीच्या धडपडीवर मात करण्याचा एखाद्या बंगल्यातल्या नाईट लॅम्पचा प्रयत्न. अजूनही या देशातील काही भागात पेन्सिलीने पाटीवर अक्षरं गिरवण्यात अपयशी ठरलेल्या घटकांच्या स्पर्धेत हातातल्या आयपॅडवर जग शोधणार्‍यांची, खूप खूप पुढे निघून गेलेली गर्दी, पाटीवर झालेली आयपॅडची सरशी, शेतावर घाम गाळून काम करणार्‍यांच्या वीतभर पोटाची भूक भागविण्यास समर्थ ठरलेली कांदा-मिरची-भाकर अन् श्रीमंतीच्या समोर मांडण्यात आलेल्या ताटातील पदार्थांची ओसंडून वाहणारी गर्दी, कुणाच्या व्हॅलेटमधून डोकावणार्‍या नोटा, तर कुठे खिशातल्या चुरगाळलेल्या नोटाही जपून ठेवण्याची कसरत, कुठे सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारी शिधा पत्रिका कुणाच्या तरी जगण्याचा आधार बनते, तर दुसरीकडे त्याच सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारे पासपोर्ट कुणाच्या विदेशवारीचा मार्ग खुला करते, पहिला दुसर्‍या कार्डाच्या वाट्यालाही जात नाही अन् दुसर्‍याला शिधापत्रिकेची गरज कधी भासत नाही. कुठे हातातल्या बांगड्यांना लाभलेली सोन्याची झालर सांभाळण्यात आणि त्याच्या दिखाव्यातच खर्च होणारा वेळ, तर कुठे साध्या काचेच्या हिरव्या चुड्यातूनही सौंदर्याची श्रीमंती शोधण्याचा प्रयत्न...
मुळात, दरी मिटली पाहिजे. समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांतली. काकुळतीला आलेल्या गरिबी आणि झगमगाटातल्या श्रीमंतीमधली. सतत गुलामागत जगणार्‍या काळ्या आणि कायम तोर्‍यात वागणार्‍या गोर्‍या माणसांमधली. जमिनीशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नात रमलेल्या झोपड्या आणि आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करायला निघालेल्या इमारतींमधली. तिथल्या ताटात वाढल्या जाणार्‍या पदार्थांची तजवीज करणार्‍यासाठी दररोज चालणारा संघर्ष आणि त्याच्या नेमक्या विरुद्ध चित्र असलेल्या लेटनाईट पार्ट्यांमधील पदार्थांच्या रेलचेलींमधली. कुणाच्या वाट्याला आलेली कांदा-भाकर, तर कुणाच्या ताटात आलेले पंचपक्वान्न, कुठे कपड्यांचे ढीग बिनकामी पडलेले, तर कुठे त्याच कपड्यांविना अंग उघडे पडलेले ...अंतर हेही कमी व्हायला हवे. 
माणसा-माणसांमधली दिवसागणिक वाढत चाललेली दरी कमी करण्याची कल्पना मांडली गेली आहे एका दिनदर्शिकेतून. एरवी वर्षाच्या सुरुवातीला हाती पडणार्‍या, घराघरातल्या भिंतींवर सजणार्‍या किंवा मग कार्पोरेट कार्यालयांमध्ये साहेबांच्या टेबलाचा एखादा कोपरा सजविणार्‍या दिनदर्शिकेची कल्पना, देवी-देवतांची चित्रे, नैसर्गिक दृश्य, उत्तमोत्तम प्रबोधनात्मक विधानांच्या पलीकडे जाताना दिसत नाही सहसा. पण अशाच, एका छोटेखानी दिनदर्शिकेची जराशी आगळी-वेगळी थीम माणसाला विचार करायला लावणारी, कार्यप्रवण व्हायला सांगणारी ठरली आहे. तसं म्हटलं तर त्यात वेगळं काहीच नाही आणि म्हटलं तर त्यातली प्रत्येक गोष्ट जगावेगळी आहे. हो! या दिनदर्शिकेतील संदेशांची मांडणीच तशी झाली आहे. भुरळ घालणारी. मन हेलावून टाकणारी, तर कधी विचार करायला बाध्य करणारी...
नागपूर शहरात सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणार्‍या ‘मैत्री परिवार’ नामक संस्थेच्या माध्यमातून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, अनुप सगदेव, संजय नखाते, विजय शहाकार, विजय जथे आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ब्रीज द गॅप’ची थीम, प्रसिद्ध कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून अधिक अर्थपूर्ण पद्धतीने समोर आली आहे. जराशी आगळी कल्पना आणि त्याच्या मांडणीची त्याहून वेगळी संकल्पना, यामुळेच असेल कदाचित, पण त्यातील प्रत्येक पानावरील संदेश अधिक प्रभावीपणे, प्रकर्षाने हृदयाला भिडू पाहतोय्. तारखा आणि मुहूर्तांपेक्षाही समाजातली दरी कमी करण्यासाठीची धडपड ध्वनित करणारी ही दिनदर्शिका हाताळण्याची, सांभाळून ठेवण्याची गरज वाटावी एखाद्याला....
छोट्याशा सेफ्टी पिनमधून मनात डोकावणारी गरिबी आणि तेवढ्याच छोट्याशा बटणातून घडणारे श्रीमंतीचे दर्शन, इवल्याशा झोपडीतला वीतभर परिसर उजळून टाकण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जळणार्‍या चिमणीच्या धडपडीवर मात करण्याचा एखाद्या बंगल्यातल्या नाईट लॅम्पचा प्रयत्न. अजूनही या देशातील काही भागात पेन्सिलीने पाटीवर अक्षरं गिरवण्यात अपयशी ठरलेल्या घटकांच्या स्पर्धेत हातातल्या आयपॅडवर जग शोधणार्‍यांची, खूप खूप पुढे निघून गेलेली गर्दी, पाटीवर झालेली आयपॅडची सरशी, शेतावर घाम गाळून काम करणार्‍यांच्या वीतभर पोटाची भूक भागविण्यास समर्थ ठरलेली कांदा-मिरची-भाकर अन् श्रीमंतीच्या समोर मांडण्यात आलेल्या ताटातील पदार्थांची ओसंडून वाहणारी गर्दी, कुणाच्या व्हॅलेटमधून डोकावणार्‍या नोटा, तर कुठे खिशातल्या चुरगाळलेल्या नोटाही जपून ठेवण्याची कसरत, कुठे सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारी शिधा पत्रिका कुणाच्या तरी जगण्याचा आधार बनते, तर दुसरीकडे त्याच सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारे पासपोर्ट कुणाच्या विदेशवारीचा मार्ग खुला करते, पहिला दुसर्‍या कार्डाच्या वाट्यालाही जात नाही अन् दुसर्‍याला शिधापत्रिकेची गरज कधी भासत नाही. कुठे हातातल्या बांगड्यांना लाभलेली सोन्याची झालर सांभाळण्यात आणि त्याच्या दिखाव्यातच खर्च होणारा वेळ, तर कुठे साध्या काचेच्या हिरव्या चुड्यातूनही सौंदर्याची श्रीमंती शोधण्याचा प्रयत्न...
कुठे दोन वर्गांतील घटकांची अगदीच विरुद्ध टोकांवरची जीवनशैली, तेवढ्याच दक्षिणोत्तर टोकावरील त्यांची आर्थिक परिस्थिती, अस्तित्वाच्या लढाईच्या त्यांच्या स्वतंत्र तर्‍हा... कुठे श्रीमंतीच्या झगमगाटात न्हाऊन निघालेली मंडळी, तर कुठे विपरीत परिस्थितीशी झगडण्यासाठी चाललेली कुणाचीतरी धडपड, कुठे कागदाच्या पुडीत गुंडाळलेले फुटाणे कुणाची भूक भागवतात, तर कुठे काचेच्या वाटीतला काजूचा ढीग दारूच्या संगतीलाही पुरत नाही ... बैलगाडीच्या लाकडी चाकांपासून आधुनिक वाहनांच्या रबराच्या टायरपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला तरी समाजातले हे चित्र, त्यातून झळकणारे धगधगते वास्तव बदलले नाही अजून. त्याच वास्तवाचा बोध घेण्याचा, त्या बोधातून ही परिस्थिती बदलण्याचा ध्यास घ्यायला सांगण्याची तर्‍हा, हेच या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य आहे. एरवी महनीय व्यक्तीच्या अनुकरणीय, प्रबोधनात्मक विधानांमधून काही सांगण्याचा प्रयत्न होतोच. नाही असं नाही. पण, ‘मैत्री परिवार’चा हा प्रयोग त्याहून जरासा आगळा आहे. त्यांनी साकारलेल्या यंदाच्या दिनदर्शिकेतून जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते सांगण्याची त्यांची तर्‍हाही जराशी निराळी आहे. एरवी, गरिबांना मदत करा असं सांगणं वेगळं आणि फुटाणे अन् काजूमधली, चिमणी अन् नाईट लॅम्पमधली, भाजलेल्या अन् बेक केलेल्या पदार्थांमधली, कोंडा अन् कुलुपामधली तफावत दर्शवून ती दूर करण्याचा आग्रह धरण्याची बात काही औरच! 
आपल्याच देशात कशाला, माणसामाणसामधली ही दरी जगभरात सर्वदूर अस्तित्वात आहे. कुठे भेद रंगांचा आहे, तर कुठे पैशाच्या आधारावर त्या भेदाचे अस्तित्व टिकून आहे. नाही म्हणायला स्त्री-पुरुषांमधले भेदही आहेतच की! आपल्या देशात त्या जोडीला प्रांत, भाषा, जाती, धर्मासारखे अनेक मुद्दे साथीला उभे राहिले आहेत. त्यामुळे इथे त्या दरीची तीव्रता अधिक जाणवते, एवढेच. त्यामुळे ‘गॅप ब्रीजअप’ करण्यासाठीच्या प्रयत्नांची नितांत गरज इथे आहे, हेही तेवढेच खरे. त्यासाठी पुढाकार घेणारी माणसं मोठ्या संख्येत आहेत इथे. फक्त त्यांच्या हळव्या मनाला साद घालण्याची गरज तेवढी असते कित्येकदा. त्या सादेला प्रतिसाद देत ओंजळीत फुलं घेऊन सरसावलेले हात अनेकांचा आधार ठरू शकतात. एका साध्या दिनदर्शिकेचा या पद्धतीने उपयोग करण्याचा ‘मैत्री’चा हा प्रयत्न, मायेची पखरण करण्यासाठी धडपडणार्‍यांना साद घालण्याचा आहे. त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी परिवर्तन घडवण्याचा आहे. सारीच माणसं दोन दोन पावलं सरसावली, तर आपसातले अंतर कमी होईलच एक दिवस. कुणीतरी पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे. कारण, जगभरात कुठेही असो, माणसामाणसांमधली ही दरी तर मिटलीच पाहिजे...

No comments:

Post a Comment