Friday, February 26, 2016

‘गांधी’ जपला कुणी?

साधेपणाने जगणारे गांधी कुणाला स्वीकारता आले, कुणाला जगता आले सांगा? नेहरूंना की इंदिरा गांधींना? ते तर कायम राजेशाही थाटात जगले, वावरले. त्यांच्या नंतरच्या पिढ्याही त्याच गांधींच्या पुण्याईवर तसलेच राजेशाही थाटातले जीवन जगताहेत. गांधींच्या सत्याग्रह अन् उपोषणाची सर्वाधिक खिल्ली आजवर कुणी उडवली हे तर जगजाहीर आहे. भारतीय विचारांच्या आधारे भारताची पुनर्बांधणी करण्याचा गांधींचा आग्रह कुणी स्वीकारला सांगा? म्हणूनच असेल कदाचित, पण, या देशातल्या सामान्य माणसाच्या मनात गांधी, हत्येनंतरच्या सातव्या दशकातही अजून जिवंत आहे. त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या डागणार्‍यांची तळी कुणी उचलून धरण्याचा प्रश्‍नच नाही. पण, मुद्दा असा आहे की, गांधींच्या विचारांची महती सांगण्याच्या निमित्ताने गोडसेला शिवीगाळ करण्याची संधी साधण्याचे आणि त्याआडून कुणावर तरी निशाणा साधण्याची संधी कायम शोधत राहणार्‍यांनी गांधींचा विचार स्वत:च्या जीवनात कधी आचरणात आणला? नाथुरामच्या कथित समर्थकांना गांधी कळला नसल्याचा कुणाचा दावा असेल, तर मग ज्यांनी सतत गांधीजींचा ‘वापर’ केला, त्यांना तरी त्यांच्या विचारांचे गांभीर्य कुठे कळले आहे? त्यांनी तरी ‘गांधी’ कुठे आचरणात आणला आहे? भिंद्रानवाले मोठा करून राजकारण साधण्याचा मुद्दा असो, की मग इंदिराहत्येनंतर झालेल्या शिखांच्या कत्तलीचे जाहीर समर्थन असो, यात गांधींच्या विचारांचे दर्शन घडते कुठे? 
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुन्हा बरळलेत. कधी नव्हे एवढी प्रसिद्धी, संमेलनाच्या मुहूर्तावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाट्याला आल्याने, बहुतेक प्रसिद्धीचा तो आडवळणावरचा मार्ग चोखाळण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो. संमेलनापूर्वी त्यांना, या देशाचे पंतप्रधान एकेरी संबोधण्याइतके कमी महत्त्वाचे वाटले, आता त्यांना नाथुराम गोडसेमध्ये देशातला पहिला दहशतवादी दिसला आहे! आपल्या बेताल बडबडीतून वादग्रस्त विधाने बाहेर पडतील याची काळजी घेत बरळणे सुरू ठेवले की, प्रसिद्धीचा योग आपसूकच चालून येतो, असा समज झालेल्या सबनीसांना, प्रसिद्धीचे तंत्र एव्हाना चांगलेच अवगत झालेले दिसते. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीचे अगदीच समर्थन करता येत नाही म्हणून तोंडदेखलेपणाने त्याच्या निषेधाची औपचारिकता पार पाडायची आणि मग ओघानेच आल्यागत गोडसेंचाही विषय हाताळायचा. हाताळता हाताळता तो जमेल तेवढा मोठा करत न्यायचा, ही तर्‍हा आता जुनी झाली आहे. फक्त परवा सबनीसांनी ती नव्याने वापरली आहे, एवढेच. 
गांधीहत्येचे कुणी समर्थन करण्याचे कारण नाही. नाथुराम गोडसेंच्या आरत्या ओवळण्याचाही प्रश्‍न उद्भवत नाही. पण, जे जे म्हणून लोक गोडसेला विरोध करण्यासाठी म्हणून गांधींचे मोठेपण सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तरी मुळात ‘गांधी’ कुठे जपला आहे? त्यांनी तर ‘गांधी’ कायम वापरला आहे.
निवडणुकी जिंकण्यासाठी ज्यांनी दंगली घडवल्या ते सांगणार गांधीजींच्या अहिंसेचे मर्म? ज्यांनी या देशावर आणिबाणी लादली ते घालतील महात्म्याच्या अंतरंगातील हळव्या भावनांची सांगड? ज्यांनी कायम त्यांच्या विचारांची हत्या केली, अवहेलना केली, तेच गांधींच्या विचारांची महती छातीठोकपणे सांगत फिरतात, तेव्हा खरी गंमत असते. आयुष्याच्या उत्तरार्धात नेहरूंच्या वागणुकीतून जी अवहेलना महात्मा गांधींच्या अनुभवास आली ती बघता, गोडसेंच्या विरोधात उभी राहिलेली जमात गांधींच्या बाजूने कधी नव्हतीच, त्यांनी फक्त आपल्या राजकारणापुरता ‘गांधी’ वापरून घेतल्याचीच बाब वारंवार स्पष्ट होते. 
गांधीजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. अलाहाबादला असताना एका सकाळी स्नान आटोपून बाहेर पडलेले गांधीजी काहीसे अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेपायी त्यांच्या येरझारा चालल्या होत्या. ते बघून मोतीलाल नेहरूंनी त्यांना सवाल केला. काय झालं ते विचारलं. थोडेसे ओशाळवाणेपणाने महात्मा म्हणाले- ‘‘गड्या, आज मी आंघोळीला जरा जास्तच पाणी वापरले. मी योग्य केलं नसल्याची खंत मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाहीय्.’’ त्यावर पंडित नेहरूंनी त्यांची खिल्ली उडवली. नेहरू म्हणाले- ‘‘काय बोलताय् तुम्ही? पाण्याची चिंता? तिही अलाहाबादेत. जिथे गंगा, यमुना दुथडी भरून वाहतात, तिथे आंघोळीला बादलीभर पाणी अधिकचं वापरलं म्हणून इतकं बेचैन व्हायचं?’’ गांधी म्हणाले- ‘‘इथली गंगा आणि यमुना काही एकट्या मोहनदास करमचंद गांधीसाठी वाहत नाहीत. त्यावर सर्वांचा अधिकार आहे. मी एकट्यानं त्या पाण्याचा गरजेपेक्षा जास्त वापर करणं केव्हाही वाईटच...’’
इतक्या साधेपणाने जगणारे गांधी कुणाला स्वीकारता आले, कुणाला जगता आले सांगा? नेहरूंना की इंदिरा गांधींना? ते तर कायम राजेशाही थाटात जगले, वावरले. त्यांच्या नंतरच्या पिढ्याही त्याच गांधींच्या पुण्याईवर तसलेच राजेशाही थाटातले जीवन जगताहेत. गांधींच्या सत्याग्रह अन् उपोषणाची सर्वाधिक खिल्ली आजवर कुणी उडवली हे तर जगजाहीर आहे. भारतीय विचारांच्या आधारे भारताची पुनर्बांधणी करण्याचा गांधींचा आग्रह कुणी स्वीकारला सांगा? म्हणूनच असेल कदाचित, पण, या देशातल्या सामान्य माणसाच्या मनात गांधी, हत्येनंतरच्या सातव्या दशकातही अजून जिवंत आहे. त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या डागणार्‍यांची तळी कुणी उचलून धरण्याचा प्रश्‍नच नाही. पण, मुद्दा असा आहे की, गांधींच्या विचारांची महती सांगण्याच्या निमित्ताने गोडसेला शिवीगाळ करण्याची संधी साधण्याचे आणि त्याआडून कुणावर तरी निशाणा साधण्याची संधी कायम शोधत राहणार्‍यांनी गांधींचा विचार स्वत:च्या जीवनात कधी आचरणात आणला? खुद्द सबनीसांची कधी सलगी झाली त्या विचारांशी? त्यांना कधी जाणवला गोडसेतला दहशतवादी? नाथुरामच्या ‘त्या’ कृत्याचा त्यांच्या मनातला संताप व्यक्त व्हायला मुहूर्त का लागावा कुठलातरी? नाथुरामच्या कथित समर्थकांना गांधी कळला नसल्याचा कुणाचा दावा असेल, तर मग ज्यांनी सतत गांधीजींचा ‘वापर’ केला, त्यांना तरी त्यांच्या विचारांचे गांभीर्य कुठे कळले आहे? त्यांनी तरी ‘गांधी’ कुठे आचरणात आणला आहे? भिंद्रानवाले मोठा करून राजकारण साधण्याचा मुद्दा असो, की मग इंदिराहत्येनंतर झालेल्या शिखांच्या कत्तलीचे जाहीर समर्थन असो, यात गांधींच्या विचारांचे दर्शन घडते कुठे? 
‘चले जाव’ आंदोलनादरम्यान एका उत्साही कार्यकर्त्याने आवेशात येऊन पोलिस चौकी जाळून इंग्रज सरकारविरुद्ध प्रक्षोभ व्यक्त केला होता. आपल्याच कार्यकर्त्याने केलेल्या त्या हिंसाचाराचा मूक निषेध करत चौरीचौरातला सत्याग्रह क्षणात मागे घेणार्‍या गांधींच्या विचारांचे समर्थक म्हणायचे कुणाला इथे? नक्षल्यांच्या हिंसाचाराचे आडमार्गाने समर्थन करणार्‍या धुरीणांना, की आणिबाणी लादून हुकुमशाही गाजविणार्‍यांना? गोडसे आणि त्याच्या कृत्याचे समर्थन कुणी आडमार्गानेही करता कामा नये. पण, मग दरवेळी ‘गांधी’ पायदळी तुडविणार्‍यांचे समर्थन तरी कसे करायचे, सबनीससाहेब? 
गांधीजींनी एका मर्यादेबाहेर जाऊन मुस्लिमांचे तुष्टीकरण केल्याच्या भावनेतून कुणाच्या मनात संतापाची भावना असेलही कदाचित. पण, त्यांनी या देशाच्या हितार्थ नेहमीच कल्पना मांडली ती ‘रामराज्या’ची, ‘रहीमराज्या’ची नव्हे! पण, इथे तर अनेकांना रामराज्याची कल्पना मानवत नाही. ती स्वीकारली की मग हिंदुत्ववाद स्वीकारल्याचा भास होतो त्यांना. त्यामुळे अंगावर पडलेले झुरळ झटकावे अशा थाटात ते रामराज्याची कल्पना झिडकारतात. एकीकडे ‘गांधी’ स्वीकारल्याची नौटंकी करायची. उच्चरवात त्याचा कंठशोष करायचा अन् दुसरीकडे त्यांनी मांडलेली रामराज्याची कल्पना मात्र नाकारायची, हे कसे चालेल? बरं, कायम त्यांच्या तसबिरी भिंतींवर लावून त्यांच्या साक्षीने सत्तेचा कारभार चालविणार्‍यांनी, गांधीजींची ग्राम विकासाची कल्पना अंमलात आणल्याचे तरी चित्र कुठे आहे? याच्या उलट समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाची कल्पना मांडणारे आणि त्यातून ‘गांधी’ आचरणात आणणारे लोक तर ‘वेगळेच’ आहेत. तरीही त्यांच्या कपाळी कायम शिक्का असतो गांधींच्या विचारांचे विरोधक असल्याचा!
महात्मा गांधींचे नाव घेऊन सत्ता बळकावणार्‍या कालपर्यंतच्या नेत्यांनी सरकारी कारभार चालवताना गांधीजींचा विचार किंचितसाही अंमलात आणला असता, तर आज खेडी बकाल अन् शहरातल्या झोपडपट्‌ट्या भकास झाल्या नसत्या. तसे घडले असते, तर विकासाचा असमतोलही निर्माण झाला नसता अन् आत्महत्या करण्याची वेळही इथल्या शेतकर्‍यांवर आली नसती. पण, गांधीनामाचा कायम जप करणार्‍यांनीच गांधींच्या स्वप्नातली खेडी उजाड केली. फक्त राजकारण साधण्यासाठी तोंडी लावायला ‘गांधी’ वापरला, तर याच्यापेक्षा वेगळे काय घडणार आहे?

Friday, February 19, 2016

इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब!

कायम दुसर्‍यांवर आरोप करण्याची सवय जडल्याने आणि तोडफोडीची आक्रमक भाषा वापरली की मगच नेतृत्व सिद्ध होते, या कल्पनेत कायम वावरत राहिल्याने, असल्या सकारात्मक बाबींच्या पाठीशी उभं राहण्याचा सरावही नसणार त्यांना. त्यामुळे कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा उपक्रम साहेबांना ‘इव्हेंट’ वाटणे स्वाभाविकच. त्यांनी राहुल गांधी आणि अमित शाहांना एकाच तराजूत तोलून दोघांनाही एकाच टिपेवर धारेवर धरण्याचा प्रकारही तसा नवलाईचा नाहीच. बरं एकाच वेळी सर्वांवर वार केले नाहीत, तर मग उगाच याच्या बाजूचा, त्याच्या बाजूचा असल्याचा आरोप होण्याचा संभव असतो. त्यामुळे एकाच चाबकाने रांगेतील सर्वांना फोडून काढण्याचा कार्यक्रम ओघाने आलाच. तो राजसाहेबांनी परवा आपल्या निवासस्थानी ‘बोलावलेल्या’ पत्रकारांशी बोलताना व्यवस्थितपणे पार पाडला. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अमित शाह... कुणी प्रश्‍न विचारला नाही म्हणून पवार आदी बाकीचे लोक सुटले त्यांच्या हल्ल्यातून. स्वत:ला सत्ता कधी मिळवता आली नाही. त्यामुळे ती राबविण्याचा प्रश्‍नच कधी उद्भवला नाही. त्यामुळे दूर बसून आगपाखड करण्यातच दिवस चाललेत त्यांचे. दुसर्‍याच्या यशातही अपयशाचा धांडोळा घेण्याची सवय त्या नैराश्यातूनच जडली असावी कदाचित! अन्यथा, त्यांच्या आगपाखडीमागील कारण दुसरे काय असणार? अन्यथा, ज्याचा दुसर्‍यांवर आरोप करताय् तसले ‘शो’बाज तर तुम्हीही आहात. साजरे करायला इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब! 
‘‘भाजपाचं सरकार हे ‘शो’बाज सरकार असून, मोदींना दर महिन्यात एक इव्हेंट लागतो....’’ इति राज (साहेब) ठाकरे. 
व्वा! काय गम्मत आहे बघा, ज्यांनी आपलं नेतृत्व आणि नेतृत्वाची तर्‍हा, भाषणं, त्यातले मुद्दे, आंदोलनं, त्याचे विषय... सारंच तोलून-मापून, राजकारणाची गणितं मांडून केलं, ज्यांच्या भाषणाचा एक एक कार्यक्रम ‘इव्हेंट’च्या चौकटीपलीकडे कधी गेला नाही, ज्यांची भाषणं सनसनाटी निर्माण करण्याच्या उद्देशांपलीकडे कधी गेली नाहीत, भाषणच कशाला, दौर्‍यापासून तर आंदोलनापर्यंतच्या प्रत्येक बाबीतून ज्यांनी ‘राज’कारण साधण्याचाच तेवढा प्रयत्न केला, त्या राजसाहेबांना केंद्र सरकारच्या कार्यक्रमात ‘शो’ पलीकडे काही दिसू नयेे, हा चमत्कार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या मनसेच्या वाताहतीतून घडला असावा कदाचित! त्या निवडणुकीत वाट्याला आलेल्या दारुण पराभवानंतर गेले काही दिवस हा पक्ष अन् त्यांचे नेते कुठे दडून बसले होते, हेही कळले नाही कुणाला. आमच्याकडे एकहाती सत्ता द्या आणि बघा मी कसा महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवतो, हे त्यांचे आवाहन जनतेने काही तितकेसे मनावर घेतले नाही. ‘एकहाती’ सत्तेच्या आवाहनाच्या प्रतिसादात या पक्षाचा फक्त ‘एक’ उमेदवार निवडून दिला लोकांनी. त्यामुळे या राज्याचा कायापालट करण्याचं स्वप्न तसंच राहिलं अन् आता पुन्हा एकदा आपल्या राजकीय विरोधकांवर मात करण्याची वेळ साहेबांवर आली. बरं साहेबांचं वैशिष्ट्य असं की वार करायला त्यांना कोणीही चालतो. शब्दांचेच बुडबुडे फुलवायचे असतात, त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण तसे नसतेच. कॉंग्रेस काय अन् शिवसेना काय, मोदी काय अन् पवार काय, जो समोर येईल त्याच्यावर वार करत सुटण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला जातो. सध्या मोदी त्यांच्या रडारवर आहेत. 
बहुधा विधानसभा निवडणुकीतल्या त्या लाजिरवाण्या पराभवाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांना आता जरासा हुरूप आला आहे. बहुतेक जराशी सवडही झाली आहे. त्यामुळे बर्‍याच दिवसांनंतर राज साहेबांचे रोखठोक म्हणविले जाणारे ते कडवे शब्द लोकांच्या कानावर पडले आहेत. अर्थात राजसाहेबांनी कुणाला चांगलं म्हणण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कायम सर्वांवर टीका, कायम सर्वांना शिवीगाळ... बहुधा ‘बातमी’ त्याचीच होत असल्याने आणि खळबळ निर्माण होऊन जनमानसात चर्चाही त्याचीच होत असल्याने असेल कदाचित, पण साहेबांना सवय जडली आहे आता बहुतेक असल्या टीका करण्याची. जमेल त्याच्यावर आसूड ओढण्याची. त्यामुळे हाही वाईट अन् तोही खराब. यालाही झोडप, त्यालाही घे आडवा, असे काहीसे आक्रमक ‘वाटणारे’ धोरण ते जाणीवपूर्वक अमलात आणत असावेत. बिनडोकांचा भरणा असलेल्या समोरच्या गर्दीत तसल्या वागण्या-बोलण्याला प्रसिद्धीही वारेमाप मिळते. आपसूकच टाळ्यांचा कडकडाट होतो. मग साहेबांचे टोल नाक्यांविरुद्धचे आंदोलन राज्यभरात उभे राहण्यापूर्वीच जमीनदोस्त कसे झाले, या नाक्यांवर वसूल केल्या जाणार्‍या टोलविरुद्ध त्यांनी त्यावेळी केलेल्या आवेशपूर्ण गर्जनांचे काय? की तोही इव्हेंटच होता, राजसाहेबांनी तेव्हा साजरा केलेला, हा प्रश्‍न कुणाच्या मनातही उभा राहात नाही. परप्रांतीयांना मारहाण केली म्हणून पक्षातील कित्येक कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या कोर्ट केसेसच्या पार्श्‍वभूमीवर, आपण त्या गावचेच नसल्याचे कोर्टात सांगून स्वत: साहेबांनी करवून घेतलेली स्वत:ची सुटका लोकांच्या केव्हाच विस्मरणात गेली असेल एव्हाना. मग आम्ही कुणासाठी लढलो? त्या मारहाणीनंतर सरकारदरबारी परप्रांतीयांची नोकरभरती बंद झाली का? नंतरच्या काळात किती मराठी तरुणांच्या पदरी पडल्या सरकारी नोकर्‍या? की तोही एक इव्हेंटच होता, साहेबांनी त्यावेळी साजरा केलेला? 
टीव्हीवरच्या कुठल्याशा मालिकेत पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग आहे म्हणून त्याचे प्रदर्शन रोखून धरण्याची बात करणार्‍या साहेबांची नंतर काही दिवसातच बदललेली भूमिकाही एव्हाना विस्मरणात गेलीय् लोकांच्या! मालिकेचा दिग्दर्शक ‘कृष्णकुंज’ वर येऊन भेटून जाण्यापूर्वीचा साहेबांचा तो आक्रमक करारी बाणा अचानक कुठे गायब झाला, तोडफोडीची ती लढाऊ भाषा अचानक कशी मवाळ झाली, असे प्रश्‍नही विचारायला धजावलं नाही कुणी. नंतर काय चमत्कार झाला कुणास ठावूक, पण साहेबांचं हृदयपरिवर्तन झालं अन् मालिका प्रदर्शित होण्याचा मार्ग नकळत मोकळा झाला. विरोधाच्या नौटंकीचा एक इव्हेंट पूर्ण झाला होता...
मराठी बाण्याचा असो की मराठी मुलांना मिळवून द्यावयाच्या नोकर्‍यांचा, मुद्दा निवडणुकीतल्या आश्‍वासनांचा असो की मग त्यावेळी सरकारविरुद्ध पुकारलेल्या भूमिकेचा, टीव्हीचे कॅमेरे समोर बघून हुरूप आल्याने त्या पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांना घेराव घालण्याचा इतिहासातला प्रसंग असो की मग परवा त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वादात उतरलेल्या राहुल गांधींवर साधलेल्या शरसंधानाचा, इव्हेंट तर राजसाहेबांनीच साजरे केलेले दिसताहेत वेळोवेळी... असे असेल तर मग त्यांनाही दरवेळी एक ना एक इव्हेंट लागतोच की! 
‘कृष्णकुंज’चा उंबरठाही न ओलांडता, माध्यमांचा ‘वापर’ करून घेत आपण साजर्‍या केलेल्या फालतू इव्हेंटपेक्षा महाराष्ट्रात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्यास साह्यभूत ठरलेला ‘मेक इन इंडिया’ चा इव्हेंट केव्हाही चांगला. नाही का राजसाहेब? पण कायम दुसर्‍यांवर आरोप करण्याची सवय जडल्याने आणि तोडफोडीची आक्रमक भाषा वापरली की मगच नेतृत्व सिद्ध होते, या कल्पनेत कायम वावरत राहिल्याने, असल्या सकारात्मक बाबींच्या पाठीशी उभं राहण्याचा सरावही नसणार त्यांना. त्यामुळे कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा उपक्रम साहेबांना ‘इव्हेंट’ वाटणे स्वाभाविकच. त्यांनी राहुल गांधी आणि अमित शाहांना एकाच तराजूत तोलून दोघांनाही एकाच टिपेवर धारेवर धरण्याचा प्रकारही तसा नवलाईचा नाहीच. बरं एकाच वेळी सर्वांवर वार केले नाहीत, तर मग उगाच याच्या बाजूचा, त्याच्या बाजूचा असल्याचा आरोप होण्याचा संभव असतो. त्यामुळे एकाच चाबकाने रांगेतील सर्वांना फोडून काढण्याचा कार्यक्रम ओघाने आलाच. तो राजसाहेबांनी परवा आपल्या निवासस्थानी ‘बोलावलेल्या’ पत्रकारांशी बोलताना व्यवस्थितपणे पार पाडला. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अमित शाह... कुणी प्रश्‍न विचारला नाही म्हणून पवार आदी बाकीचे लोक सुटले त्यांच्या हल्ल्यातून. स्वत:ला सत्ता कधी मिळवता आली नाही. त्यामुळे ती राबविण्याचा प्रश्‍नच कधी उद्भवला नाही. त्यामुळे दूर बसून आगपाखड करण्यातच दिवस चाललेत त्यांचे. दुसर्‍याच्या यशातही अपयशाचा धांडोळा घेण्याची सवय त्या नैराश्यातूनच जडली असावी कदाचित! अन्यथा, त्यांच्या आगपाखडीमागील कारण दुसरे काय असणार? अन्यथा, ज्याचा दुसर्‍यांवर आरोप करताय् तसले ‘शो’बाज तर तुम्हीही आहात. साजरे करायला इव्हेंट तर तुम्हालाही लागतातच ना राजसाहेब! 

Friday, February 12, 2016

ब्रीज द गॅप

छोट्याशा सेफ्टी पिनमधून मनात डोकावणारी गरिबी आणि तेवढ्याच छोट्याशा बटणातून घडणारे श्रीमंतीचे दर्शन, इवल्याशा झोपडीतला वीतभर परिसर उजळून टाकण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जळणार्‍या चिमणीच्या धडपडीवर मात करण्याचा एखाद्या बंगल्यातल्या नाईट लॅम्पचा प्रयत्न. अजूनही या देशातील काही भागात पेन्सिलीने पाटीवर अक्षरं गिरवण्यात अपयशी ठरलेल्या घटकांच्या स्पर्धेत हातातल्या आयपॅडवर जग शोधणार्‍यांची, खूप खूप पुढे निघून गेलेली गर्दी, पाटीवर झालेली आयपॅडची सरशी, शेतावर घाम गाळून काम करणार्‍यांच्या वीतभर पोटाची भूक भागविण्यास समर्थ ठरलेली कांदा-मिरची-भाकर अन् श्रीमंतीच्या समोर मांडण्यात आलेल्या ताटातील पदार्थांची ओसंडून वाहणारी गर्दी, कुणाच्या व्हॅलेटमधून डोकावणार्‍या नोटा, तर कुठे खिशातल्या चुरगाळलेल्या नोटाही जपून ठेवण्याची कसरत, कुठे सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारी शिधा पत्रिका कुणाच्या तरी जगण्याचा आधार बनते, तर दुसरीकडे त्याच सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारे पासपोर्ट कुणाच्या विदेशवारीचा मार्ग खुला करते, पहिला दुसर्‍या कार्डाच्या वाट्यालाही जात नाही अन् दुसर्‍याला शिधापत्रिकेची गरज कधी भासत नाही. कुठे हातातल्या बांगड्यांना लाभलेली सोन्याची झालर सांभाळण्यात आणि त्याच्या दिखाव्यातच खर्च होणारा वेळ, तर कुठे साध्या काचेच्या हिरव्या चुड्यातूनही सौंदर्याची श्रीमंती शोधण्याचा प्रयत्न...
मुळात, दरी मिटली पाहिजे. समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांतली. काकुळतीला आलेल्या गरिबी आणि झगमगाटातल्या श्रीमंतीमधली. सतत गुलामागत जगणार्‍या काळ्या आणि कायम तोर्‍यात वागणार्‍या गोर्‍या माणसांमधली. जमिनीशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नात रमलेल्या झोपड्या आणि आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करायला निघालेल्या इमारतींमधली. तिथल्या ताटात वाढल्या जाणार्‍या पदार्थांची तजवीज करणार्‍यासाठी दररोज चालणारा संघर्ष आणि त्याच्या नेमक्या विरुद्ध चित्र असलेल्या लेटनाईट पार्ट्यांमधील पदार्थांच्या रेलचेलींमधली. कुणाच्या वाट्याला आलेली कांदा-भाकर, तर कुणाच्या ताटात आलेले पंचपक्वान्न, कुठे कपड्यांचे ढीग बिनकामी पडलेले, तर कुठे त्याच कपड्यांविना अंग उघडे पडलेले ...अंतर हेही कमी व्हायला हवे. 
माणसा-माणसांमधली दिवसागणिक वाढत चाललेली दरी कमी करण्याची कल्पना मांडली गेली आहे एका दिनदर्शिकेतून. एरवी वर्षाच्या सुरुवातीला हाती पडणार्‍या, घराघरातल्या भिंतींवर सजणार्‍या किंवा मग कार्पोरेट कार्यालयांमध्ये साहेबांच्या टेबलाचा एखादा कोपरा सजविणार्‍या दिनदर्शिकेची कल्पना, देवी-देवतांची चित्रे, नैसर्गिक दृश्य, उत्तमोत्तम प्रबोधनात्मक विधानांच्या पलीकडे जाताना दिसत नाही सहसा. पण अशाच, एका छोटेखानी दिनदर्शिकेची जराशी आगळी-वेगळी थीम माणसाला विचार करायला लावणारी, कार्यप्रवण व्हायला सांगणारी ठरली आहे. तसं म्हटलं तर त्यात वेगळं काहीच नाही आणि म्हटलं तर त्यातली प्रत्येक गोष्ट जगावेगळी आहे. हो! या दिनदर्शिकेतील संदेशांची मांडणीच तशी झाली आहे. भुरळ घालणारी. मन हेलावून टाकणारी, तर कधी विचार करायला बाध्य करणारी...
नागपूर शहरात सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणार्‍या ‘मैत्री परिवार’ नामक संस्थेच्या माध्यमातून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, अनुप सगदेव, संजय नखाते, विजय शहाकार, विजय जथे आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ब्रीज द गॅप’ची थीम, प्रसिद्ध कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून अधिक अर्थपूर्ण पद्धतीने समोर आली आहे. जराशी आगळी कल्पना आणि त्याच्या मांडणीची त्याहून वेगळी संकल्पना, यामुळेच असेल कदाचित, पण त्यातील प्रत्येक पानावरील संदेश अधिक प्रभावीपणे, प्रकर्षाने हृदयाला भिडू पाहतोय्. तारखा आणि मुहूर्तांपेक्षाही समाजातली दरी कमी करण्यासाठीची धडपड ध्वनित करणारी ही दिनदर्शिका हाताळण्याची, सांभाळून ठेवण्याची गरज वाटावी एखाद्याला....
छोट्याशा सेफ्टी पिनमधून मनात डोकावणारी गरिबी आणि तेवढ्याच छोट्याशा बटणातून घडणारे श्रीमंतीचे दर्शन, इवल्याशा झोपडीतला वीतभर परिसर उजळून टाकण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जळणार्‍या चिमणीच्या धडपडीवर मात करण्याचा एखाद्या बंगल्यातल्या नाईट लॅम्पचा प्रयत्न. अजूनही या देशातील काही भागात पेन्सिलीने पाटीवर अक्षरं गिरवण्यात अपयशी ठरलेल्या घटकांच्या स्पर्धेत हातातल्या आयपॅडवर जग शोधणार्‍यांची, खूप खूप पुढे निघून गेलेली गर्दी, पाटीवर झालेली आयपॅडची सरशी, शेतावर घाम गाळून काम करणार्‍यांच्या वीतभर पोटाची भूक भागविण्यास समर्थ ठरलेली कांदा-मिरची-भाकर अन् श्रीमंतीच्या समोर मांडण्यात आलेल्या ताटातील पदार्थांची ओसंडून वाहणारी गर्दी, कुणाच्या व्हॅलेटमधून डोकावणार्‍या नोटा, तर कुठे खिशातल्या चुरगाळलेल्या नोटाही जपून ठेवण्याची कसरत, कुठे सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारी शिधा पत्रिका कुणाच्या तरी जगण्याचा आधार बनते, तर दुसरीकडे त्याच सरकारी कार्यालयातून प्राप्त होणारे पासपोर्ट कुणाच्या विदेशवारीचा मार्ग खुला करते, पहिला दुसर्‍या कार्डाच्या वाट्यालाही जात नाही अन् दुसर्‍याला शिधापत्रिकेची गरज कधी भासत नाही. कुठे हातातल्या बांगड्यांना लाभलेली सोन्याची झालर सांभाळण्यात आणि त्याच्या दिखाव्यातच खर्च होणारा वेळ, तर कुठे साध्या काचेच्या हिरव्या चुड्यातूनही सौंदर्याची श्रीमंती शोधण्याचा प्रयत्न...
कुठे दोन वर्गांतील घटकांची अगदीच विरुद्ध टोकांवरची जीवनशैली, तेवढ्याच दक्षिणोत्तर टोकावरील त्यांची आर्थिक परिस्थिती, अस्तित्वाच्या लढाईच्या त्यांच्या स्वतंत्र तर्‍हा... कुठे श्रीमंतीच्या झगमगाटात न्हाऊन निघालेली मंडळी, तर कुठे विपरीत परिस्थितीशी झगडण्यासाठी चाललेली कुणाचीतरी धडपड, कुठे कागदाच्या पुडीत गुंडाळलेले फुटाणे कुणाची भूक भागवतात, तर कुठे काचेच्या वाटीतला काजूचा ढीग दारूच्या संगतीलाही पुरत नाही ... बैलगाडीच्या लाकडी चाकांपासून आधुनिक वाहनांच्या रबराच्या टायरपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला तरी समाजातले हे चित्र, त्यातून झळकणारे धगधगते वास्तव बदलले नाही अजून. त्याच वास्तवाचा बोध घेण्याचा, त्या बोधातून ही परिस्थिती बदलण्याचा ध्यास घ्यायला सांगण्याची तर्‍हा, हेच या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य आहे. एरवी महनीय व्यक्तीच्या अनुकरणीय, प्रबोधनात्मक विधानांमधून काही सांगण्याचा प्रयत्न होतोच. नाही असं नाही. पण, ‘मैत्री परिवार’चा हा प्रयोग त्याहून जरासा आगळा आहे. त्यांनी साकारलेल्या यंदाच्या दिनदर्शिकेतून जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते सांगण्याची त्यांची तर्‍हाही जराशी निराळी आहे. एरवी, गरिबांना मदत करा असं सांगणं वेगळं आणि फुटाणे अन् काजूमधली, चिमणी अन् नाईट लॅम्पमधली, भाजलेल्या अन् बेक केलेल्या पदार्थांमधली, कोंडा अन् कुलुपामधली तफावत दर्शवून ती दूर करण्याचा आग्रह धरण्याची बात काही औरच! 
आपल्याच देशात कशाला, माणसामाणसामधली ही दरी जगभरात सर्वदूर अस्तित्वात आहे. कुठे भेद रंगांचा आहे, तर कुठे पैशाच्या आधारावर त्या भेदाचे अस्तित्व टिकून आहे. नाही म्हणायला स्त्री-पुरुषांमधले भेदही आहेतच की! आपल्या देशात त्या जोडीला प्रांत, भाषा, जाती, धर्मासारखे अनेक मुद्दे साथीला उभे राहिले आहेत. त्यामुळे इथे त्या दरीची तीव्रता अधिक जाणवते, एवढेच. त्यामुळे ‘गॅप ब्रीजअप’ करण्यासाठीच्या प्रयत्नांची नितांत गरज इथे आहे, हेही तेवढेच खरे. त्यासाठी पुढाकार घेणारी माणसं मोठ्या संख्येत आहेत इथे. फक्त त्यांच्या हळव्या मनाला साद घालण्याची गरज तेवढी असते कित्येकदा. त्या सादेला प्रतिसाद देत ओंजळीत फुलं घेऊन सरसावलेले हात अनेकांचा आधार ठरू शकतात. एका साध्या दिनदर्शिकेचा या पद्धतीने उपयोग करण्याचा ‘मैत्री’चा हा प्रयत्न, मायेची पखरण करण्यासाठी धडपडणार्‍यांना साद घालण्याचा आहे. त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी परिवर्तन घडवण्याचा आहे. सारीच माणसं दोन दोन पावलं सरसावली, तर आपसातले अंतर कमी होईलच एक दिवस. कुणीतरी पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे. कारण, जगभरात कुठेही असो, माणसामाणसांमधली ही दरी तर मिटलीच पाहिजे...

Friday, February 5, 2016

न्यायालयाचे असमर्थनीय आवाहन

पण तरीही, कर न भरण्याचे न्यायालयाचे जाहीर आवाहन कुठल्याच परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. राग व्यक्त करणे, न संपणार्‍या भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त होणे, आपल्या अपेक्षेनुरूप बदल यंत्रणेत घडून येत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त होणे समजण्यासारखे आहे. पण, म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ मानल्या जाणार्‍या कार्यप्रणालीविरुद्ध लोकांना चिथावण्याच्या न्यायप्रणालीच्या भूमिकेची री कशी ओढायची? यातून सरकारविरुद्ध असंतोषाची ठिणगी पडेलही कदाचित. पण, त्यातून पेटणार्‍या वणव्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? का, कसा कुणास ठाऊक, पण भरकटत तर सारा समाजच चालला आहे. नैतिकतेच्या बाता खुळचटपणाच्या ठरताहेत सभ्य लोकांंच्या लेखी. इतरांसाठी जगणे मूर्खपणाचे अन् स्वत:च्या सुखाच्या शोधार्थ चाललेली भटकंती महत्त्वाची ठरू लागली आहे अनेकांच्या मते. लोकांची कामे करण्यासाठी चिरीमिरी मागण्याची मानसिकता नेमकी कशासाठी आहे? आणि कुठली व्यवस्था सुटली आहे या मानसिकतेतून? खुद्द न्यायालयातील प्रशासनिक व्यवस्था पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असल्याचा तरी कुठे दावा करता येणार आहे इथे कुणाला? हव्या त्या तारखा मिळवण्यासाठी अन् नको त्या टाळण्यासाठी न्यायालयातले बाबू लोकांकडून पैसे मागतच नाहीत, अशी तरी परिस्थिती कुठे आहे? मग त्या भ्रष्ट व्यवस्थेचं काय करायचं? ती व्यवस्था कुणी सुधरवायची? समाजातला भ्रष्टाचार सरकार संपवेल, ही अपेक्षा तरी कितपत योग्य मानायची अन् तब्बल दोन दशकं सुरू असलेल्या एखाद्या संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निमित्ताने एक दिवस अचानक लोकांना सरकारविरुद्ध चिथवण्याची भाषा तरी कितपत योग्य मानायची? 

समाजातला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सरकारला भाग पाडण्याची आणि तसे होणार नसेल, तर मग सरकारी तिजोरीत कराचा भरणा न करत असहकार पुकारण्याची उच्च न्यायालयाची परवाची भाषा जर खरोखरीच बोलली गेली असेल, तर चिथावणीखोरच म्हटली पाहिजे. सर्वसामान्यांची डोकी भडकाविणारी ही भाषा उद्वेगातून आली असं समजायचं, की त्यातून केवळ सात्त्विक संताप व्यक्त झाला, असं मानायचं, हा खरं तर प्रश्‍नच आहे. लोकशाहीच्या एका स्तंभाने दुसर्‍या स्तंभाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवताना किंबहुना त्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी तेवढ्याच संतापाने व्यक्त करताना, त्याबाबत केवळ निषेध नोंदविण्याचेच नाही, तर बंड पुकारण्याचे केलेले आवाहन सामान्य माणसाच्या भावनांशी सुसंगत मानले, तरी लोकशाही व्यवस्थेला पूरक नाही. साजेसे तर नाहीच नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध पेटून उठण्याच्या त्यांच्या आवाहनाचे फारतर कौतुक करता येईल. पण, त्याचे समर्थन कसे करायचे? 

हे खरेच आहे की, प्रशासनातल्या भ्रष्टाचारात आज सारा समाज भरडला जातो आहे. हेही खरे आहे की, सामान्य माणसाला या व्यवस्थेत मानाचे स्थान नाही. कुणाच्याच खिजगणतीत तो नसतो. खिशात पैसे खुळखुळणार्‍यांचीच इथे चलती अन् त्यांच्यासाठीच इथे अंथरलेल्या पायघड्या आहेत. सत्तेत कुणीही असलं तरी काम करण्याची प्रशासनाची आपली एक स्वतंत्र तर्‍हा असते. आयएएस अधिकारी तर काय, चांदीचा चमचा तोंडात धरूनच जन्माला आले आहेत! मंत्र्यांच्या खालोखाल राजेशाही थाट त्यांच्याही वाट्याला आला आहेच. या सर्वांना पूर्ण अधिकार हवेत. गलेलठ्‌ठ पगार हवेत. सोयी हव्या. सुविधा झाडून सार्‍या हव्यात. फक्त जबाबदारी मात्र कुणालाच नको! एवढा आदर्श घोटाळा घडला तरी दोषी कुणीच नसल्याची जी परिस्थिती समोर आली आहे, ती त्याचाच परिपाक आहे. अधिकारी ऐकतच नसल्याची काही मंत्र्यांची तक्रार, अधिकारीवर्गाच्या असल्याच बेमुर्वतखोर वागणुकीतून येते आहे. ज्या कामासाठी खिसे भरभरून पगार महिन्याकाठी मिळतो, त्याच कामासाठी अधिकच्या रकमेची बाळगली जाणारी अपेक्षा, निदान चिरीमिरी तरी मिळावी म्हणून चाललेला सार्‍यांचाच आटापिटा, अनाकलनीय अन् तेवढाच दुर्दैवी आहे. जे काम विनासायास होणे हा लोकांचा अधिकार आहे आणि ते करणे हे त्या कर्मचार्‍याचे कर्तव्य, ते करायलाही जेव्हा तो अधिकार नसतानाही समोरच्याला अडवून धरतो, त्याच्याकडे पैशाची मागणी करतो, तेव्हा कुणाच्याही अंगाचा तिळपापड होणे स्वाभाविकच. अशा प्रसंगात समोरच्याच्या कानाखाली आवाज काढण्याची इच्छा होणेही तेवढेच नैसर्गिक. याविरोधात सारा समाज पेटून उठला तरच हा प्रकार मोडून काढता येईल, हेही तितकेच खरे! इतकेच काय, पुष्कळदा शासनकर्त्यांचा राजेशाही थाट बघितल्यानंतरही, याचसाठी आपण कर भरतो का, असा प्रश्‍न मनात उभा राहतो. खाजगी विमानांद्वारे होणारे प्रवास, विदेश दौरे अशी सरकारी तिजोरीतून चाललेली त्यांची चैन मन उद्विग्न करून जाते. पण तरीही...
समाजातल्या मागासलेल्या बांधवांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाच्या व्यवस्थापकांवर आहे. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, व्यवस्थापकाने मागितलेला जामीन नाकारताना न्यायालयाने व्यक्त केलेला तीव्र संताप आणि त्यातूनच व्यक्त झालेला हा उद्रेक असावा कदाचित. भ्रष्टाचार निर्मूलनाची आश्‍वासनं पूर्ण करण्याची निवडणुकीच्या काळात देण्यात आलेली आश्‍वासनं पूर्ण करण्यास, तसे न झाल्यास सरकारला जाब विचारण्यासही न्यायालयाने जनतेला बजावले आहे. राज्य सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या या महामंडळात गेल्या दोन दशकांपासून गैरव्यवहार चालले आहेत अन् तो थांबवायला कुणीही समोर येत नाही, ही बाब मन व्यथित करणारी आहे. यावर कठोर ताशेरे ओढताना हायकोर्टाने भ्रष्टाचारात वाया जाणार्‍या अशा गोष्टींसाठी करदात्यांनी कर का भरायचा, असा सवाल उपस्थित केला आहे. सामान्य माणसाच्या मनातल्या भावनाच न्यायाधीशांच्या या सवालातून व्यक्त झाल्या आहेत. प्रचलित भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढत जी सणसणीत चपराक न्यायव्यवस्थेने इथल्या प्रशासनिक व्यवस्थेला हाणली आहे, ती हाणण्याची इच्छा तर प्रत्येक माणसाची होते इथे! फरक फक्त एवढाच आहे की, कधी त्यासाठी हिंमत होत नाही, तर कधी सवड. त्यामुळे आपल्या मनातली भावना उच्च न्यायालयासारखी एक यंत्रणा व्यक्त करीत असल्याचा, आपल्या मनातला संताप न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेली सुज्ञ व्यक्ती व्यक्त करीत असल्याचा आनंदच असणार सामान्यजनांच्या मनात. पण तरीही...
पण तरीही, कर न भरण्याचे न्यायालयाचे जाहीर आवाहन कुठल्याच परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. राग व्यक्त करणे, न संपणार्‍या भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त होणे, आपल्या अपेक्षेनुरूप बदल यंत्रणेत घडून येत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त होणे समजण्यासारखे आहे. पण, म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ मानल्या जाणार्‍या कार्यप्रणालीविरुद्ध लोकांना चिथावण्याच्या न्यायप्रणालीच्या भूमिकेची री कशी ओढायची? यातून सरकारविरुद्ध असंतोषाची ठिणगी पडेलही कदाचित. पण, त्यातून पेटणार्‍या वणव्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? का, कसा कुणास ठाऊक, पण भरकटत तर सारा समाजच चालला आहे. नैतिकतेच्या बाता खुळचटपणाच्या ठरताहेत सभ्य लोकांंच्या लेखी. इतरांसाठी जगणे मूर्खपणाचे अन् स्वत:च्या सुखाच्या शोधार्थ चाललेली भटकंती महत्त्वाची ठरू लागली आहे अनेकांच्या मते. लोकांची कामे करण्यासाठी चिरीमिरी मागण्याची मानसिकता नेमकी कशासाठी आहे? आणि कुठली व्यवस्था सुटली आहे या मानसिकतेतून? खुद्द न्यायालयातील प्रशासनिक व्यवस्था पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असल्याचा तरी कुठे दावा करता येणार आहे इथे कुणाला? हव्या त्या तारखा मिळवण्यासाठी अन् नको त्या टाळण्यासाठी न्यायालयातले बाबू लोकांकडून पैसे मागतच नाहीत, अशी तरी परिस्थिती कुठे आहे? मग त्या भ्रष्ट व्यवस्थेचं काय करायचं? ती व्यवस्था कुणी सुधरवायची? समाजातला भ्रष्टाचार सरकार संपवेल, ही अपेक्षा तरी कितपत योग्य मानायची अन् तब्बल दोन दशकं सुरू असलेल्या एखाद्या संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निमित्ताने एक दिवस अचानक लोकांना सरकारविरुद्ध चिथवण्याची भाषा तरी कितपत योग्य मानायची? 
हे खरेच की, व्यवस्था सुधारली पाहिजे. भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. कारण तुम्ही-आम्ही, प्रत्येक जण त्याचे मुक्तभोगी ठरतो आहोत दररोज. पण, म्हणून सरकार नावाची यंत्रणाच अडचणीत आणण्याचा टोकाचा उपाय कसा योजता येईल त्यासाठी? कर भरू नका हे म्हणायला ठीक आहे. उद्या खरंच तसे घडले, तर काय परिस्थिती उद्भवेल, याचा अंदाज बांधला आहे कुणी? शिवाय, कराचा भरणा न करता लोकांनी सरकारविरुद्ध असहकार पुकारायला इथे परकीयांचे राज्य नाही. त्यामुळे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध माणसं पेटून उठली पाहिजे हे खरंच, पण त्या असंतोषातून भ्रष्टाचार उलथवायचा आहे, व्यवस्था नाही... निदान न्यायव्यवस्थेने तरी हे ध्यानात घेतले पाहिजे. कर न भरण्याच्या विधानाला अमाप प्रसिद्धी मिळेलही कदाचित! कदाचित लोकप्रियही ठरेल ते आवाहन. पण, त्यातून भ्रष्टाचार संपण्याची ग्वाही कोण देणार? हां, व्यवस्था बिघडेल हे मात्र नक्की...!