Saturday, October 10, 2015

चला! आपणही आयपीएलशी संबंध तोडू या!

यात आश्‍चर्य असं की, ‘पेप्सी’ला आता नैतिकतेचे स्मरण झाले आहे. खरे-खोटे देव जाणो, पण त्या कंपनीने जाहीर रीत्या ‘सांगण्यासाठी’ तरी त्याच कारणाचा आधार घेतला आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे जी बदनामी वाट्याला आलीय्, त्याचा त्रागा करून, त्याबाबत जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘पेप्सी’ या स्पर्धेचे आपले प्रायोजकत्व मागे घेणार असल्याची बातमी आहे. बाबा रामदेव ज्याची ‘टॉयलेट क्लीनर’ म्हणून अवहेलना करतात, ज्याच्या निर्मिती आणि विक्री मूल्यात किमान शंभर पटींची तफावत आहे, जे पिल्याने मानवी शरीराला फायदे तर होत नाहीतच उलट झालेच तर फक्त नुकसान तेवढे होते, असे शीतपेय निर्माण करून, त्याच्या विक्रीतून लोकांची फक्त लूट करणार्‍या, त्या लुटीतूनच आयपीएलचे प्रयोजकत्व मिळवण्याकरिता ३९६ कोटी रुपये खर्च करण्याची ताकद कमावणार्‍या ‘पेप्सी’ नामक कंपनीने आता नैतिकतेच्या आधारावर ते प्रायोजकत्व स्वीकारण्यास नकार द्यावा, हे कोडेही जरासे अनाकलनीयच आहे.
पोरांच्या परीक्षेचे दिवस असोत की सणवाराचे. दिवाळी असो की स्वातंत्र्यदिन. यांना काहीच फरक पडत नाही. त्यांनी ठरविलेल्या वेळापत्रकातही कधीच अडथळा निर्माण होत नाही. त्यांचे आपले धंद्याचे गणित सुरू ते सुरूच! घोटाळे झाले, फिक्सिंगचे आरोप झाले, चार-दोन लोकांना अटक झाली, प्रीती झिंटाच्या चाळ्यांनाही या निमित्ताने नको तितकी प्रसिद्धी मिळाली, तरीही प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या आणि भारतीय क्रिकेटरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या आयपीएलची साथ सोडण्याचा निर्णय, ‘पेप्सी’ या त्याच्या मुख्य प्रायोजक असलेल्या कंपनीने घेतला आहे. खरं तर वेगवेगळ्या घटना आणि वादांमुळे आयपीएलची नकारात्मक प्रसिद्धी ही काही काल-परवा सुरू झालेली नाही; किंवा त्यातल्या घोटाळ्यांचे बारकावे काही अलीकडेच बाहेर येऊ लागलेले नाहीत. तरीही या स्पर्धेशी संबंध तोडायला ‘पेप्सी’सारख्या कंपनीला इतके दिवस लागावेत, यावरून ‘पेप्सी’च्या माघारीमागील कारण, ते सांगताहेत तेच असेल, याबाबत शंका व्यक्त करायला बराच वाव आहे. पण एक मात्र आहे, आयपीएलशी ‘नाते तोडण्याचा’ जो निर्णय ‘पेप्सी’ने घेतला आहे, तो निर्णय भारतीय क्रिकेटरसिकांनीही घेण्याची आणि त्या निर्णयानुसार ठामपणे वागण्याची आता खरोखरीच गरज निर्माण झाली आहे. झाली तेवढी पुरे झाली लोकांंची लूट. अजून किती काळ मूर्ख बनायचं लोकांनी? आम्हाला लुटून आमच्याच जिवावर यांनी चैन करायची आणि आम्ही मुकाट्यानं तमाशा बघत राहायचं? क्रिकेट नावाचा खेळ आम्हाला जिवापाड आवडतो हे खरं आहे. पण, आमच्या त्या आवडीचा, आमच्याच खिशातून पैसै उकळून अजून किती काळ बाजार मांडायचा यांनी? आणि आम्ही तरी किती दिवस सहन करायचा हा सारा प्रकार?
हे खरे आहे की, एक ‘पेप्सी’ नावाची कंपनी बाहेर पडल्याने आयपीएलचे काहीच बिघडणार नाही. ‘पेप्सी’ऐवजी अजून दुसरा कुणीतरी प्रायोजकही त्यांना लागलीच सापडेल. नव्हे, ते प्रायोजकत्व मिळवण्यासाठी बीसीसीआयच्या दाराबाहेर प्रयोजकांची रांगही लागली असेल एव्हाना! तेजीत असलेला धंदा आयता चालूून दाराशी येतोय् म्हटल्यावर तो नाकारणार कोण? पण, गेली काही वर्षे क्रिकेटचा हा धंदा ज्या रसिकांच्या खिशात हात घालून, त्यांची लूट करून चालला आहे ना, त्याला आळा बसला पाहिजे आता जरासा तरी. आणि वास्तविकता अशी आहे की, भारतीय क्रिकेटरसिकच त्यावर नियंत्रण घालू शकतात. एक, खेळणार्‍या खेळाडूंचे मोठेपण सोडले, तर गल्लीबोळातल्या क्रिकेटचा दर्जा प्राप्त झालाय् या स्पर्धेला अलीकडे. ज्यांचा प्रत्यक्षात क्रिकेटशी काडीचा संबंध नाही, अशा राजकारणापासून तर चित्रपटापर्यंतच्या आणि उद्योगजगतापासून तर सटोडियांपर्यंतच्या लोकांनी एकत्र येऊन मांडलेला बाजार झालाय् आयपीएलच्या मॅचेस म्हणजे आताशा. ज्याचा कुणीच, कुठेच रेकॉर्ड ठेवत नाही, ज्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचाही दर्जाही कधी प्राप्त करता आलेला नाही, अशा स्पर्धांचा ‘दर्जा’ थेट जमिनीवरून उचलून मात्र पाऽऽर आकाशाला भिडवून ठेवला त्याच्या आयोजकांनी- कुणाच्याही प्रमाणपत्राविना! आणि भारतीय क्रिकेटरसिक? ते आपले क्रिकेटच्या प्रेमाखातर पैशाची उधळण करीत राहिले अन् क्रिकेटचा ‘धंदा’ करणारे लोक त्यांच्या जिवावर स्वत:चा गल्ला भरत राहिले.
सुरुवातीला आयपीएलचा ‘हा’ अँगल कुणाच्याच लक्षात आला नाही. एका सामन्याला शिवसेनेने विरोध केला, तो होऊ देणार नसल्याची नुसती धमकीच शिवसेनेने दिली, तर शरद पवारांसारखे सत्तेत असलेले ‘दमदार’ नेते थेट बाळासाहेबांच्या दाराशी जाऊन उभे राहतात, हे लोकांना पवारांचे क्रिकेटवरील प्रेमच वाटले त्या वेळी. त्यामागील त्यांचे बेरके राजकारण तेव्हा कुणाच्याच ध्यानात आले नाही. जेव्हा क्रिकेटशी कवडीचा संबंध नसलेले लोकही खेळांच्या टीमचे मालक म्हणून समोर येत असल्याचे दिसू-जाणवू लागले, तेव्हा या बड्या मंडळींनी मांडलेल्या व्यापाराचे कंगोरे हळूहळू उलगडू लागले.
भारतीय लोकांच्या मानसिकतेचा, क्रिकेटवरील त्यांच्या प्रेमाचा, या खेळावरील त्यांच्या अपार श्रद्धेचा इतका ‘चांगला दुरुपयोग’ क्वचितच कुणाला करून घेता आला असता एरवी. पण, ते पडले शरद पवार! बेरके, चतुर राजकारणी. असल्या दुरुपयोगाचे नेमके गणित त्यांच्याएवढे चांगल्या पद्धतीने दुसरे कोण मांडू शकणार? त्यांनी ते गणित मांडले. त्याची चांगली प्रसिद्धी केली. गरज पडली तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दारात जाऊन त्यांचीही मनधरणी केली. पण, स्पर्धा घडवून आणायचीच, हा बेत पक्का केला. त्यासाठी सत्ता आणि प्रतिष्ठा पणाला लावली. सर्वसामान्य क्रीडाप्रेमींचे (सॉरी! फक्त क्रिकेटप्रेमींचे) काय, ते तर जीव ओवाळून बसले होते स्पर्धेवर. स्पर्धा कुठे होत आहे, त्याचा दर्जा काय यापेक्षा स्पर्धेत धोनी खेळतोय्, तो षट्‌कारांवर षट्‌कार हाणत आपल्याच भारतीय क्रिकेट संघातल्या एखाद्या बॉलरला नुसता तुडवतोय् म्हटल्यावर लोक सारा सामना डोक्यावर घेतात. यातील प्रत्येक षट्‌कारामागे मांडले गेलेले लाखो रुपयांचे गणित कधी ध्यानातही येत नाही त्यांच्या. ते आपले बॅटस्‌मनने ठोकलेल्या षट्‌कारांवर, बॉलरने घेतलेल्या विकेटवर, कुणीतरी पकडलेल्या कॅचचा मुक्तपणे आनंद लुटत फिदा होतात...
हळूहळू या सामन्यांमागील राजकीय आराखडे आणि पैशाचे लागेबांधे उघड होऊ लागले. लोकांच्या लेखी स्पर्धा म्हणून आयोजित होणार्‍या प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूच्या खेळामागे दडलेले सट्‌ट्याचे खेळही जगजाहीर होऊ लागले. इतके की, अगदी या स्पर्धेची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. त्याच्या आयोजनामागील व्यापारी वृत्तीही जगजाहीर होऊ लागली. लोकांच्या मनात असलेल्या क्रिकेटच्या प्रेमाचे यांनी काढलेले धिंडवडे लोकांना जाणवू लागले. बॉलरने बॉल टाकला, बॅटस्‌मनने तो हवेत उडवला, बॉल सीमेच्या बाहेर... किंवा मैदानावरील एखाद्या खेळाडूच्या हातात झेल... धावफलकावरील बदलते आकडे... काहीही घडलं तरी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष... लोकांना वाटतं क्रिकेटचा खेळ फक्त एवढाच असतो. आयोजकांच्या दृष्टीनं मात्र प्रत्यक्षातला खेळ वेगळाच! त्यांनी तर क्रिकेट या खेळाचा संबंध थेट सट्ट्यातल्या आकड्यांशी जोडून टाकला आणि मग स्पर्धेमागची षडयंत्रं, भामटेगिरी उघड होऊ लागली. कालपर्यंत बिनभरवशाचा मानला जाणारा क्रिकेटचा खेळ यांनी तर नियोजनबद्ध करून टाकला. इथे बाद होण्यापासून तर शतक काढण्यापर्यंत आणि षट्‌कार खेचण्यापासून तर स्पर्धा हरण्या-जिंकण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली असते म्हणतात आणि दुर्दैवाने हे सारे, मैदानावर प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू ठरवत नाही, तर मैदानाबाहेर जुगार खेळणारे लोक ठरवतात म्हणे! यात खेळ राहिलाच कुठे, असा प्रश्‍न भारतीय क्रिकेटरसिकांना अजूनही पडत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
यात आश्‍चर्य असं की, ‘पेप्सी’ला आता नैतिकतेचे स्मरण झाले आहे. खरे-खोटे देव जाणो, पण त्या कंपनीने जाहीर रीत्या ‘सांगण्यासाठी’ तरी त्याच कारणाचा आधार घेतला आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे जी बदनामी वाट्याला आलीय्, त्याचा त्रागा करून, त्याबाबत जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘पेप्सी’ या स्पर्धेचे आपले प्रायोजकत्व मागे घेणार असल्याची बातमी आहे. बाबा रामदेव ज्याची ‘टॉयलेट क्लीनर’ म्हणून अवहेलना करतात, ज्याच्या निर्मिती आणि विक्री मूल्यात किमान शंभर पटींची तफावत आहे, जे पिल्याने मानवी शरीराला फायदे तर होत नाहीतच उलट झालेच तर फक्त नुकसान तेवढे होते, असे शीतपेय निर्माण करून, त्याच्या विक्रीतून लोकांची फक्त लूट करणार्‍या, त्या लुटीतूनच आयपीएलचे प्रयोजकत्व मिळवण्याकरिता ३९६ कोटी रुपये खर्च करण्याची ताकद कमावणार्‍या ‘पेप्सी’ नामक कंपनीने आता नैतिकतेच्या आधारावर ते प्रायोजकत्व स्वीकारण्यास नकार द्यावा, हे कोडेही जरासे अनाकलनीयच आहे. ज्यांची भारतातील बस्तान बसण्यामागील कारणेच मुळात अनैतिक व्यवहारात दडली आहेत, ज्यांना भारतीय ग्राहकांच्या लुटीची, आपण चालवलेल्या त्यांच्या फसवणुकीची कधी तमा बाळगावीशी वाटली नाही, त्या ‘पेप्सी’सारख्या कंपनीलाही ‘बदनाम’ झालेल्या आयपीएलशी संबंध ठेवावेसे वाटत नाही, यातून भारतीय क्रिकेटरसिकांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. आजवर झाली तेवढी पुरे झाली या रसिकांची लूट. पुरे झाला त्यांच्या भावनांचा बाजार. पुरे झाला क्रिकेट नावाच्या खेळाचा ‘धंदा.’ चला! आपणही आयपीएलशी संबंध तोडू या!

No comments:

Post a Comment