Friday, July 3, 2015

कुलदीपकाच्या हट्‌टापायी...!


सारा देश विकास, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, जीडीपीच्या आकड्यांच्या रंगात रंगला असताना, आमच्या गाव-खेड्यातले चित्र मात्र अजूनही शौचालयाचा वापर अन् वंशाचा दिवा जन्माला घालण्याच्या विषयांभोवतीच फिरत राहिले असल्याचे दुर्दैवी, पण धगधगते वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. निदान आमच्या घरात तरी मुलीचा जन्म नको म्हणून चाललेल्या पुरुषप्रधान धडपडीत, वर्षाकाठी पन्नास हजार मुलींचे अस्तित्व आईच्या गर्भातच संपविणारी जमात आमची; तरी चावडीवरच्या प्रगतीच्या गप्पा संपता संपत नाहीत आमच्या. विचारांचे मागासलेपण बगलेत बांधून हिंडताना गरुडभरारीच्या वल्गना करत सुटतो आम्ही! आदिवासी म्हणवणार्‍या गडचिरोलीत मुलींचा जन्मदर समाधानकारक अन् मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मात्र तो कमालीचा घसरलेला? कुणाला प्रगत आणि कुणाला अप्रगत म्हणायचे? कुणाला सुशिक्षित म्हणायचे अन् कुणाला अशिक्षित म्हणून हिणवायचे?
चार भिंतींच्या आत चार पुस्तकं वाचली, की माणसं मोठी होतातच असं नाही, हेच खरं! क्रांती घडली, माणसाचे विचार बदलले, बदललेले विचार कृतीत उतरले, त्यातून प्रगती साधली गेली, अपेक्षित परिवर्तन घडून आले, तरच त्या शिक्षणाला अर्थ. दुर्दैवाने शिक्षणातून घडून आलेले असले परिवर्तन सहसा अनुभवायला मिळत नाही. शिकली सवरलेली माणसं जेव्हा अडाण्यांसारखी, बेताल वागू लागतात, तेव्हा शिक्षणव्यवस्थेची त्यांनी लावलेली वाट अधिकच अधोरेखित झालेली असते. अशा वेळी जुन्या परंपरेची री ओढणेही सुरूच राहते अन् कालबाह्य विचारांचे काहूरही मनात तसेच घोळत राहते. काळ झपाट्यानं बदलत चालला आहे. कालच्या झोपड्यांची जागा आजच्या गगनचुंबी इमारतींनी घेतली, गावाकडे जाणार्‍या मातीच्या रस्त्यांच्या जागी सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आले, सरकारी एसटीची जागा खाजगी कारने घेतली, लोकांचा रस्ता अडवून घरासमोर टाकलेल्या मांडवात लागणारे लग्न आता दिमाखदार मंगल कार्यालयात लागू लागले, अंगावरचे कपडेच नाही, तर पायातल्या बुटांचेदेखील ब्रॅण्डस् बदलले, अगदी हातातल्या सेलफोनच्या स्क्रीनचे कलर्ससुद्धा बदलले, तरीही मनातल्या विचारांचे बुरसटलेपण मात्र तसेच कायम राहिले आहे! कार, बंगला, कपडे, इतर सार्‍या भौतिक बाबी, ज्या आमच्या दृष्टिने प्रगतीचे मापदंड आहेत, त्या खोट्या मापदंडांच्या मागे धावताना वास्तविक विकासाची कास आम्हाला कधी धरताच आली नाही...
घरात वंशाचा दिवा हवाच, या दुराग्रहापायी घरात चौदा मुली जन्माला घालणार्‍या कुटुंबाच्या कोणत्या प्रगतीची गाथा गायची अन् त्यांच्या कोणत्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करायचे? एकीकडे मध्यप्रदेश सरकार मुलींचा जन्म लोकांनी स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या योजना जाहीर करते, तिच्या शिक्षणाचा खर्च उचलते, तिच्या लग्नाची तजवीज म्हणून लाखभर रुपयांचे डिपॉझिट मायबापाच्या स्वाधीन करते, खुद्द पंतप्रधान मुलींना शिकविण्यासाठी सार्‍या देशानं पुढाकार घ्यावा अशी ‘मन की बात’ करतात आणि या देशातल्या बीड नावाच्या गावात मुलींचे गर्भ पाडण्याचा विक्रम एका डॉक्टरच्या नावे नोंदविला जातो? झरीभुजी नावाच्या गावात मुलाच्या हव्यासापायी अठरा वर्षांत चौदा मुलींना जन्माला घालण्याचा प्रकार एका कुटुंबात घडतो? काय तमाशा चाललाय् हा? कुठे चाललो आहोत आम्ही? सारा देश विकास, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, जीडीपीच्या आकड्यांच्या रंगात रंगला असताना, आमच्या गाव-खेड्यातले चित्र मात्र अजूनही शौचालयाचा वापर अन् वंशाचा दिवा जन्माला घालण्याच्या विषयांभोवतीच फिरत राहिले असल्याचे दुर्दैवी, पण धगधगते वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. निदान आमच्या घरात तरी मुलीचा जन्म नको म्हणून चाललेल्या पुरुषप्रधान धडपडीत, वर्षाकाठी पन्नास हजार मुलींचे अस्तित्व आईच्या गर्भातच संपविणारी जमात आमची; तरी चावडीवरच्या प्रगतीच्या गप्पा संपता संपत नाहीत आमच्या. विचारांचे मागासलेपण बगलेत बांधून हिंडताना गरुडभरारीच्या वल्गना करत सुटतो आम्ही! आदिवासी म्हणवणार्‍या गडचिरोलीत मुलींचा जन्मदर समाधानकारक अन् मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मात्र तो कमालीचा घसरलेला? कुणाला प्रगत आणि कुणाला अप्रगत म्हणायचे? कुणाला सुशिक्षित म्हणायचे अन् कुणाला अशिक्षित म्हणून हिणवायचे?
गुजरातेतल्या दाहोड जिल्ह्यातल्या झरीभुजी नामक एका छोट्याशा गावातील एका पस्तीस वर्षीय इसमाचा हा प्रताप आहे. आपल्या घरात कुलदीपक जन्माला यावाच, या हट्टपायी लग्नानंतरच्या अठरा वर्षांच्या काळात तब्बल चौदा मुली जन्माला घालण्याचा या कुटुंबात घडलेला प्रकार, या देशात चाललेल्या विकासाच्या सार्‍या संकल्पनांवर पाणी फेरणारा आहे. ‘आता नको ते बाळंतपण,’ असे कधीतरी कंटाळून बोलून गेलेल्या बायकोला, सवत आणण्याची धमकी देत, दरवर्षी नव्या बाळंतपणाला सामोरे जायला भाग पाडणारा नराधम त्या कुटुंबात ‘बाप’ म्हणून तरी कसा वावरत असेल, याची कल्पनाही करवत नाही! वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा अन् जन्माला घातलेल्या मुलांचा सांभाळ करायला मुलगी. हीच आमच्या वैचारिक प्रगतीची ‘पातळी!’ दूषणे देत जुन्याच परंपरेची री ओढायची अन् वर पुन्हा व्यवस्थेला दोष देत शिव्यांची लाखोळी वाहायची. पहिल्या दोन मुलींची लग्नं करण्याची वेळ आली, तरी आईच्या पंधराव्या बाळंतपणाची तयारी सुरू करायची वेळ येते आणि ती इतक्यात बरीच अशक्त झाली म्हणून लोकांच्या चेहर्‍यावर मात्र चिंतेचे भाव असतात. मुलाचा अट्टहास तर आहेच, पण इतरही अनेकानेक प्रश्‍न या घटनेने निर्माण केले आहेत. जन्मदात्रीच्या आरोग्यापासून तर ज्या दोन मुलींची लग्न झालीत, त्यांच्या लग्नाच्या वयापर्यंतचे ते प्रश्‍न आहेत. सरकारी योजना, कुटुंबकल्याण योजनेचे त्यांनी वाजविलेले तीनतेरा, मुलांचे शिक्षण, त्यांचे पालनपोषण, कुटुंबाची विसकटलेली आर्थिक घडी... सर्वच बाबतीत अजून तरी सरकारी यंत्रणा या घरापर्यंत पोहोचलेली दिसत नाही.
मुळात, ‘मुलगाच हवा’ या हेक्यापायी हा प्रकार घडला आहे. अजूनही घडतो आहे. रूढी, परंपरा, कथित संस्कारांचे भूत मानगुटीवर बसलेले, अशा अवस्थेत जिच्या आगमनाची चाहूल लक्ष्मीच्या पावलांनी नोंदविण्याची कल्पना जिथे मांडली जाते, तिथे मुलीचा गर्भच संपविण्याचे षडयंत्र रचले जाताहेत. तिच्या रूपात लक्ष्मी घरात यावी, तिच्या आगमनाने भाग्य उजळावे, तिच्या अस्तित्वाने सारा आसमंत उजळून निघावा, अशी मनीषा बाळगणार्‍यांच्या गर्दीपलीकडच्या कुणीतरी हे षडयंत्र रचलेले असते, ही बाब त्याहून दुर्दैवी आहे. चौदा मुली तर आल्या आहेतच, आता त्यांचा भाऊ जगात यावा म्हणून धडपडणारे माय-बाप केवळ तिथेच थांबलेले नाहीत. चौदा बहिणींना एक भाऊ पुरेसा नाही म्हणून ते आता सोळावे अपत्य जगात आणण्याच्या तयारीत आहेत! ती माउलीही नवरोबाच्या या मताशी सहमत आहे म्हणे! खरंच कमाल आहे- त्या माउलीचीही अन् तिच्यावर असलेल्या संस्कारांच्या पगड्याचीही! फक्त खंत एवढीच आहे, की यापुढे बाळंतपण वाट्याला नको, असे ती अजूनही ठामपणे नवर्‍याला सांगू शकत नाहीय्. पंधरा अपत्यं जन्माला घातली तरी नवरा अजूनही सवत आणण्याची धमकी देतो आणि या माउलीला अजूनही त्या धमकीची भीती वाटते! त्याविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद ना तिच्यात आहे, ना कुणी तिला त्यासाठी बळ देत! सारेच अजब आहे.
अगदीच नाही असं नाही. परिवर्तन घडून येत आहे हळूहळू. पंतप्रधानांनी केवळ भावनाच व्यक्त केली, तर कित्येक बापांनी मुलीसमवेत फोटो काढून पटापट अपलोड केलेत फेसबूक, ट्विटरवर. जगभर प्रसिद्धी करून घेतली प्रत्येकाने स्वत:ची. स्वत:ला मूलबाळ नसलेले दाम्पत्यही मूल दत्तक घेताना ‘मुलगीच हवी’चा आग्रह धरू लागली आहेत अलीकडे. ऊर अभिमानानं भरून यावा अशीच भूमिका मानायला हवी ती. पण, म्हणून घरात मुलगी जन्माला आल्याची बातमी कानावर पडली की, नाक मुरडणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही अजून. ती संख्या कमी व्हायला हवी. सरकार एक लाख रुपये देते म्हणून मुलीचा जन्म स्वीकारणार्‍यांची गर्दी नको. स्वत:हून मुलगी स्वीकारण्याची भावना रुजायला हवी. मुलगी आमच्या घरात जन्माला येणार असेल, तर तिचे पालनपोषण सरकारी पैशातून का व्हावे, ते आमचे आम्हीच करू, अशी भूमिका स्वीकारणार्‍यांची संख्या वाढायला हवी. या देशात एक महिला राष्ट्रपती होऊ शकल्याचा अभिमान वृथा नाहीच; पण शहरांतल्या झोपडपट्‌टीत राहणारी मोलकरीण अजूनही दारुड्या नवर्‍याचा मार खात त्याच्या धाकातच जीवन जगत असल्याचे चित्र बदलणेही तितकेच गरजेचे आहे. मुलीला भाऊ हवाच, त्यापेक्षाही कुळाचे नाव कायम ठेवणारा ‘दीपक’ कुटुंबाला हवा, या हट्‌टापायी मुलाच्या जन्माची वाट बघत चौदा मुलींना जन्म देण्यास ठाम नकार देणारी ‘कनू’, लग्नाच्या अठरा वर्षांच्या काळात कधीतरी रामसिंग नावाच्या त्या नवर्‍याला भेटली असती, तर चित्र वेगळे राहिले असते कदाचित...!

No comments:

Post a Comment