कोणीही उठतो अन् यांच्या क्रिकेटवरील अफाट प्रेमाचा बाजार मांडून जातो? तरी यांना कानोकान खबर लागत नाही? संबंध काय हो शरद पवारांचा क्रिकेटशी? कोण ती प्रिती झिंटा, चित्रपट जगतात मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर क्रिकेटची एक टीम विकत घेते आणि आम्ही मूर्ख लोक तिची टीम जिंकावी म्हणून मैदानाबाहेर राहून जीवाचे रान करतो? शाहरूख खान त्याच्या आयुष्यात क्रिकेट कधी खेळला होता ठावूक नाही, पण कुठलीशी टीम विकत घेऊन तोही कोट्यवधी रुपयांचा धंदा करून जातो. बरं या हुश्शार लोकांनी व्यापाराची गणितंच अशी काही मांडलेली की यांच्या खिशात जाणार्या कमाईत बाधा ती नाहीच. टीम हरली काय किंवा जिंकली काय, यांचे नुकसान नाही ते नाहीच. नफ्याचे एवढे चांगले गणित ठावूक असल्यावर कोण उतरणार नाही या धंद्यात? अशात सटोड्यांनी थेट खेळाडूंनाच हाताशी धरून त्याचा गैरफायदा उचलला तर दोष कोणाला द्यायचा?
ज्याच्या मागे लोक वेडे झाले आहेत, ज्यासाठी लोक खिशातल्या पैशाची अक्षरश: उधळण करतात आणि तरीही ज्याची इतिहासात कुठेही नोंद होत नाही, अशा क्रिकेटच्या आयपीएल नामक बाजारातील एक धगधगते वास्तव नव्याने अधोरेखित झाले आहे. जो खेळ लोक निखळ आनंद मिळवण्यासाठी बघतात, जो सामना बघायला लोक स्वत:चा किंमती वेळ देऊन जातात, तो क्रिकेट नावाचा खेळ मैदानावरच्या खेळाडूंनी मात्र पैशाचा अन् त्यांच्या साथीला उभ्या राहिलेल्या सटोड्यांनी पाऽऽर जुगाराचा करून टाकला असल्याचे हे धगधगते वास्तव आहे. पैशाचा खेळ मांडून आधीच निकाल ठरवायचे, कोणत्या चेंडूवर कोण बाद होईल अन् कोणत्या चेंडूवर चौकार हाणला जाईल हेही ठरवून ठेवायचे, अन् लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटावर स्वत:चे खिसे भरायचे असा हा ‘गेम’ गेली काही वर्षे या देशात सातत्याने सुरू आहे. प्रिमिअर लीगच्या सामन्यांमध्ये चौकार, षटकारांची बरसात करून रग्गड पैसा कमावून गब्बर झालेले खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशसारख्या टीमसमोर धाराशायी का होतात हेच कळत नाही. बहुधा आयपीएलसारखी तिकडे दर चौकार, षटकारामागे पैशाची तितकीशी उधळण होत नसल्याने तसे होत असावे कदाचित!
राजकारण, चित्रपट आणि उद्योग जगतातील मंडळींनी एकत्र येऊन क्रिकेट रसिकांच्या खिशात हात घालण्यासाठी रचलेल्या या डावात रसिकवर्ग केव्हाच गारद झाला. त्याला कळलेही नाही, तो कसा मूर्ख बनला ते. तो आपला खेळाचा आनंद लुटत राहिला. फारतर गल्लीतल्या एखाद्या सामन्याएवढेच महत्त्व असलेला पण, मोठ्या खेळाडूंच्या सहभागामुळे नको तेवढे महत्त्व प्राप्त झालेल्या आयपीएलच्या पन्नास-पन्नास, सत्तर-सत्तर सामन्यांच्या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार स्वत:च्या कामाचे वेळापत्रक ठरवू लागला. एरवी एका बाजूला उभे राहून विरोधकांशी लढणार्या भारतीय टीमधील क्रिकेटवीर इथे एकमेकांविरुद्ध लढताना बघून आनंदाने टाळ्या पिटू लागला. पण, हा खेळ, नुसता खेळच नाही, तर निकालासह सारी स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आयोजित होते, यासारखा दुसरा विनोद नाही अन् क्रिकेट रसिकांची यासारखी दुसरी फसवणूकही नाही.
सुमारे दोन वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली आणि आयपीएल सामन्यांचे बिंग फुटू लागले. फक्त आणि फक्त पैशासाठीच खेळल्या जाणार्या या स्पर्धेचे आणखीही काही पैलू उघड झाले. लोकांच्या भावनांचा खेळ करून चाललेला जुगार अधिकच स्पष्ट झाला. पैसा कमावण्यासाठी मैदानाबाहेर चालणारी या खेळाडूंची ‘दुकानदारी’ उघड झाली. कधीकाळी चेन्नई सुपर किंग्ज नामक संघाचा चेहरा असलेला, अविभाज्य भाग मानला गेलेला गुरूनाथ मयप्पन क्रिकेटच्या संदर्भात लागणार्या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावायचा म्हणे! आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार्या श्रीनिवासन यांचे जावई असण्याचा पुरेपूर ‘लाभ’ गुरूनाथ मयप्पन यांनी उचलला होता. राजस्थान रॉयल्स संघाशी संबंधित राज कुंद्रा यांनीही तोच धंदा चालवला होता.
क्रिकेट रसिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची लूट केल्यानंतर या दोघांवर आलेली बंदी तशी तकलादूच म्हटली पाहिजे. हे खरे आहे की एका माजी न्यायमूर्तींनी केलेल्या चौकशीतून निदान आरोप तरी ठेवले गेलेत या चोरांवर. पण, मुळात त्यांनी केलेली जनतेची फसवणूक आणि लुटीसाठी बंदी ही शिक्षा असूच शकत नाही. काय बिघडणार आहे त्या बंदीमुळे मयप्पन आणि कुंद्राचे? ज्या दोन क्रिकेट संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे, त्या चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघाचे तरी काय वाकडे होणार आहे या बंदीमुळे? हा नाही तर तो धंदा करतील हे लोक. या नाही तर त्या संघाकडून खेळतील ते खेळाडू. लोकांची लूट करूनही ते आपले मोकळेच! बंदी घातल्यानं कुणाचा जुगार थांबणार आहे की कुणाचे क्रिकेट खेळणे? नको तेवढा धिंगाणा घालून, लोकांची लूटमार करून हे लोक केवळ बंदीची नावापुरती ‘शिक्षा’ भोगून ‘मोकळे’ होणार असतील आणि आम्ही बापुडेही त्यातच समाधान मानणार असू, तर मग ‘शिक्षा’ या संकल्पनेचे संदर्भच बदलावे लागतील आपल्याला. कोण कुठला मयप्पन सासर्याच्या भरवशावर क्रिकेट विश्वात प्रवेश काय करतो, त्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान काय प्राप्त करतो, स्वत:च्या आणि सासर्याच्या प्रतिष्ठेचा गैरवापर करून पैसा काय कमावतो, लगोलग श्रीमंत काय होतो, श्रीमंतीचा वेग अधिक वाढवण्यासाठी रचलेल्या डावात सहभागी काय होतो, सारेच अजब आहे. आणि कोडगेपण बघा केवढे? ज्यांच्या छुप्या परवानगीने हा सारा प्रकार घडून आला, ज्यांचा या सार्या गोरखधंद्याला छुपा पाठिंबा होता, ज्यांनी भारतीय क्रिकेटरसिकांच्या भावनेची या जुगाराच्या माध्यमातून कायम अवहेलना केली, ते बीसीसीआयचे तमाम पदाधिकारी आता न्यायालयाच्या यासंदर्भातील आदेशाचा आदर करण्याची भाषा बोलताहेत! अन् ज्यांनी प्रत्यक्षात चोर्या केल्या, ते वरच्या न्यायालयात दाद मागण्याची गुर्मी दाखवताहेत.
या तमाशाला भारतीय क्रिकेट रसिक अधिक जबाबदार ठरवले गेले पाहिजे. कोणीही उठतो अन् यांच्या क्रिकेटवरील अफाट प्रेमाचा बाजार मांडून जातो? तरी यांना कानोकान खबर लागत नाही? संबंध काय हो शरद पवारांचा क्रिकेटशी? कोण ती प्रिती झिंटा, चित्रपट जगतात मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर क्रिकेटची एक टीम विकत घेते आणि आम्ही मूर्ख लोक तिची टीम जिंकावी म्हणून मैदानाबाहेर राहून जीवाचे रान करतो? शाहरूख खान त्याच्या आयुष्यात क्रिकेट कधी खेळला होता ठावूक नाही, पण कुठलीशी टीम विकत घेऊन तोही कोट्यवधी रुपयांचा धंदा करून जातो. बरं या हुश्शार लोकांनी व्यापाराची गणितंच अशी काही मांडलेली की यांच्या खिशात जाणार्या कमाईत बाधा ती नाहीच. टीम हरली काय किंवा जिंकली काय, यांचे नुकसान नाही ते नाहीच. नफ्याचे एवढे चांगले गणित ठावूक असल्यावर कोण उतरणार नाही या धंद्यात? अशात सटोड्यांनी थेट खेळाडूंनाच हाताशी धरून त्याचा गैरफायदा उचलला तर दोष कोणाला द्यायचा? अन् घडलेही तेच. लोक इकडे बॉलरने टाकलेला एकेक बॉल श्वास रोखून बघत राहिले अन् तो तिकडे त्याच बॉलवर खोर्यानं पैसे कमावीत राहिला. आम्ही आपली नित्याची कामं सोडून आमच्या आवडत्या खेळाडूच्या चौकार, षटकारांवर फिदा होत राहिलो, नंतरचा कित्येक वेळ त्यावरील चर्चेत घालवीत राहिलो, अन् ते बेटे त्यावरून फायद्याचा हिशेब करीत राहिले.
ज्याची जगात कुठेही नोंद होत नाही, ज्याचा कुठेही रेकॉर्ड ठेवला जात नाही, ज्या सामन्यांमधील शतक, अर्धशतकाला काडीची किंमत नाही, त्या स्पर्धांवर जीव ओवाळून टाकणारे, वेळ आणि पैसा व्यर्थ घालवणार्या लक्षावधी लोकांना मूर्खात काढायचे नाही, तर आणखी काय करायचे? समजून उमजून मूर्खासारखे वागणार्यांना लुटण्याचा प्लॅन तयार करणार्यांना तरी काय दोष द्यायचा मग? आयपीएलच्या आयोजकांनी याच्या पलीकडे दुसरे काय केले?
ही सारी मिलीभगत आहे. एखाद्दुसरा कुणीतरी पकडला गेला म्हणून, नाही तर ही लबाडी अजून कितीतरी वर्षे तशीच सुरू राहिली असती. आता कुणीतरी एखादा पकडला गेला म्हणून बाकीच्यांना काही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त होत नाही. तेही तेवढेच लबाड आहेत. मैदानावर खेळणार्या प्रत्येक खेळाडूच्या हालचालींवरून बाहेर पुढच्या क्षणाच्या सट्ट्याची बोली लावणार्या लोकांना मैदानावरचे लोक सामील नाहीत, असे होऊच शकत नाही. दुर्दैव फक्त एवढेच आहे की आम्हीच त्या खेळाडूंच्या मागे वेडेपणाने धावत सुटतो. फसवेगिरीची कल्पना असतानाही सामन्यांची घोषणा होताच त्याची तिकिटे मिळविण्यासाठी गर्दी करतो. या फसवेगिरीला बळी न पडण्याचा निर्धार ज्या दिवशी भारतीय क्रिकेट रसिक ठामपणे घेतील, त्या दिवशी लोकांच्या लूटमारीचा हा नंगानाच थांबेल. अन्यथा या तमाशाला अंत नाही.
No comments:
Post a Comment