Monday, June 22, 2015

अमेरिका : दुसरी बाजू


तारीख: 07 Jun 2015 00:43:30
दोन दशकांपूर्वीच्या मंदीने सारे जग हादरले. अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली. कित्येक लोक त्यावेळी अक्षरश: रस्त्यावर आले. त्यावेळी बसलेल्या मानसिक धक्क्यातून अनेकांना आजवर सावरता आलेले नाही. त्यातली कित्येक माणसं अजूनही रस्त्याने विमनस्क अवस्थेत भटकताना दिसतात. त्या संकटात ज्यांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या, त्यातील कित्येक लोक आज इथल्या रस्त्यांवरून भीक मागताना दिसतात. त्यातील कित्येकांवर बेघर होण्याची वेळ आली. अर्थात इथल्या मोठ्या प्रमाणातील ‘होमलेस’ लोकसंख्येला कारणीभूत केवळ तेवढे एकच कारण नाही. गरीब आणि श्रीमंतांमधली न सांधता येणारी दरी, प्रचंड महागडी आरोग्य व्यवस्था आणि विस्कटलेली कुटुंब व्यवस्था अशा वेगवेगळ्या कारणांमुळेही त्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

‘‘एखाद्या देशाच्या डोक्यावर कर्ज असणे यात आता नवलाई राहिलेली नाही. पण एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलाराच जर पंच्याहात्तर टक्के कर्जाच्या भरवशावर उभा राहिला असेल तर कसे चालेल? ’’
श्रीमंत म्हणविणार्‍या अमेरिका नामक बलाढ्य देशाच्या अर्थव्यवस्थेवर तिथल्या एका अर्थतज्ज्ञाने उपस्थित केलेले हे प्रश्‍नचिन्ह मोलाचे आहे. केवळ महत्त्वपूर्णच नाही, तर या देशाच्या अर्थव्यवस्थेचे पितळ उघडे पाडणाराही तो सवाल आहे. विशेषत: डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या आपसातील राजकीय वादात अडकलेल्या बराक ओबामांच्या कारकीर्दीच्या आर्थिक आघाडीवरील अपयशाचे नेमके विश्‍लेषण करणारा तो प्रश्‍न असतो.
आज सार्‍या जगाच्या नजरेत असलेले या देशाचे चित्र म्हटले तर काहीसे मर्यादीतच आहे. जगाच्या लेखी न्यूयॉर्कमधला टाईम स्क्वेअर म्हणजे अमेरिका. तिथला झगमगाट म्हणजे अमेरिका. आकाशाला भिडणार्‍या तिथल्या इमारती म्हणजे अमेरिका. अमेरिका म्हणजे श्रीमंती. अमेरिका म्हणजे पॉवर. अमेरिका म्हणजे सैनिकी ताकद. अमेरिका म्हणजे सार्‍या जगाला पायदळी तुडविणारी मसल पॉवर. अमेरिका म्हणजे शस्त्रास्त्रांचे कोठार. अमेरिका म्हणजे पायाभूत सुविधांच्या पलीकडले जग. अमेरिका म्हणजे रस्त्यांचे जाळे. अमेरिका म्हणजे त्या रस्त्यांवरून सुसाट धावणार्‍या गाड्या. अमेरिका म्हणजे विमानांची वर्दळ. अमेरिका म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेले राष्ट्र. अमेरिका म्हणजे संशोधनाच्या जगात वाहून घेतलेला देश...
हे सारे खरे आहेच. हा देश पुढारलेला आहेच. पण या देशाचे या पलीकडचेही एक रूप आहे. ऐकून विश्‍वास न बसणारे. वाचून खरे न वाटणारे. गरीब मोठ्या संख्येत असले, त्यांचे प्रश्‍न वेगळेच असले तरी, श्रीमंती आणि पैशाच्या स्पर्धेतून उद्भवलेल्या अनेक समस्या हा देश सध्या अनुभवतो आहे. न्यूयॉर्क शहरातल्या इमारतीच्या उंचीमागील, त्यांच्या मालकांच्या मनातील ईर्ष्या आणि स्पर्धेचे किस्से प्रसिद्ध आहेत. एकमेकांना मागे टाकण्यासाठी लोकांनी आपल्या इमारतींच्या इमल्यांची संख्या कशी वाढवली याच्या सुरस कथा ऐकल्या की या स्पर्धेची कल्पना येते. इथे जपल्या जाणार्‍या व्यक्तिस्वातंत्र्यांच्या अतिरेकातूनही कित्येक समस्यांचा जन्म झालेला आहे.
काहीसे दक्षिण मुंबईतल्या फोर्टसारखे वाटणारे वाशिंग्टन शहर. नवा, आधुनिक लूक असलेल्या इमारती, भरपूर बगिचे. जुना इतिहास सांगणारे पुतळे. स्थानिक नेत्यांच्या नावाने ओळखली जाणारी स्मारकं. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या किंवा व्हिएतनामविरुद्धच्या लढाईत मारल्या गेलेल्या जवानांच्या आठवणी जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मृती स्थाने. एकूण, शहराची धाटणी आणि स्वभाव शांत. इथल्या कित्येक बगिच्यांमध्ये जमलेली बेघर आणि भिकार्‍यांची गर्दी बघितली की या श्रीमंत देशातल्या गरिबीचे रूपही समोर येते.
दोन दशकांपूर्वीच्या मंदीने सारे जग हादरले. अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली. कित्येक लोक त्यावेळी अक्षरश: रस्त्यावर आले. त्यावेळी बसलेल्या मानसिक धक्क्यातून अनेकांना आजवर सावरता आलेले नाही. त्यातली कित्येक माणसं अजूनही रस्त्याने विमनस्क अवस्थेत भटकताना दिसतात. त्या संकटात ज्यांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या, त्यातील कित्येक लोक आज इथल्या रस्त्यांवरून भीक मागताना दिसतात. त्यातील कित्येकांवर बेघर होण्याची वेळ आली. अर्थात इथल्या मोठ्या प्रमाणातील ‘होमलेस’ लोकसंख्येला कारणीभूत केवळ तेवढे एकच कारण नाही. गरीब आणि श्रीमंतांमधली न साधता येणारी दरी, प्रचंड महागडी आरोग्य व्यवस्था आणि विस्कटलेली कुटुंब व्यवस्था अशा वेगवेगळ्या कारणांमुळेही त्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. खिशाला न परवडणारे औषधोपचार, तेवढ्याच महागड्या विमा योजना, वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच घराबाहेर पडणारी पोरं, एक-दुसर्‍यांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याच्या नादात त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेला पालकवर्ग, त्यातून दुरावलेली वा मग कायमची हरवलेली नाती अन् त्यातनंच एकाकी पडणारे म्हातारपण, अशा विविध कारणांमुळे इथे माणसं आयुष्याच्या उत्तरार्धात आश्रयाची सामाजिक स्थाने धुंडाळताना दिसतात. बेघर लोकांसाठी उभारण्यात आलेल्या ‘शेल्टर्स’ची वाढती संख्या आणि सरकारखाती या लोकांबाबत वाढलेली चिंता, या दोन्ही बाबी या समस्यांचे गांभीर्य अधोरेखित करणार्‍या ठरतात.
तशी तर माणसं इथलीही भाबडीच आहेत. विकासाची कास धरणारी, पुरोगामी, स्वत:ला निधार्मिक मानणारी आणि तरीही चौकातल्या फवार्‍याच्या पाण्यातही श्रद्धेने पैसे टाकणारी. मांजर आडवं गेलं की माघारी फिरणार्‍या, वाईट स्वप्न पडू नयेत म्हणून एखादी चीनी वस्तू आडावर लटकाविणार्‍यांची संख्याही कमी नाही इथे. जवळची माणसं हरवून बसल्यानं प्राण्यांचा लळा लागलेली माणसंही भरपूर आहेत. काळ्या-गोर्‍यांचा भेदही आहेच. भेद नाकारणारा कायदा अस्तित्वात असला, तरी कमी दर्जाची म्हणविली जाणारी कामं करायला इथे बहुतांशी काळ्यांची निवड होत असल्याची, गोर्‍यांच्या मनात अजूनही काळ्यांबाबत द्वेष असल्याची बाब लपून राहात नाही. पण एक मात्र खरं की, या देशात कायदे सर्वांसाठी समान आहे. स्त्री-पुरुष, काळा-गोरा, असा भेद इथल्या कायद्यांना मुळातच मान्य नाही. म्हणूनच की काय, पण पीडित महिलांना आश्रय देण्यासाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या आणि महिलांद्वारेच चालविण्यात येणार्‍या घरांमध्ये पीडित समलैंगिकांनाही विनासायास आश्रय मिळतो इथे.
इथल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये खाण्याच्या पदार्थांच्या बिलात वेटरची टीप जोडली जाते किंवा मग ग्राहकाला ती टीप जोडून एकूण बिल अदा करावे लागते. वेटरला किमान वेतन दिले जात नसल्याने टीपची पद्धत अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. या कामगारांना मालक किमान वेतन देत नाहीत म्हणून लोक टीप देऊन ती उणीव भरून काढतात आणि त्यांना टीप मिळते म्हणून मालक किमान वेतनाचा भार उचलण्याची जबाबदारी टाळतात, असे एकूण त्रांगडे आहे. पण इतके प्रगत कायदे तयार करणार्‍या देशाला हॉटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी किमान वेतनाचा कायदा अद्याप का तयार अन् मंजूर करता आला नाही, असा प्रश्‍न स्वाभाविकच उपस्थित होतो.
आकाशात उडणार्‍या आपल्या विमानाच्या खिडकीतून शेजारी काही अंतरावरून धावणारी दुसरी विमानं दिसावीत इतका विमानांचा प्रवास फोफावलेल्या या देशात दळणवळणाच्या इतर सार्वजनिक साधनांचा अभाव मात्र अनेक प्रश्‍न निर्माण करून जातो. कधीकाळी इथल्या कार निर्मात्या कंपन्यांच्या प्रभावातून रचलेल्या गेलेल्या षडयंत्रातून त्याकाळी रस्त्यांवर धावणारी सार्वजनिक वाहनं नंतरच्या काळात अडगळीत पडली. मग लोकांनी स्वत:साठी चारचाकी वाहनांचा पर्याय निवडला आणि कार कंपन्यांचे फावले. दळणवळणाची सर्वाजनिक सुविधा मात्र मागे पडली. नाही म्हणायला रेल्वे आहे. पण तीही खाजगी. कमी प्रतिसादामुळे म्हणा वा मग खाजगीकरणामुळे, पण प्रवासासाठी आकारल्या जाणार्‍या भरमसाठ किमतींमुळे रेल्वेपेक्षा विमानाचा प्रवास परवडला, असे म्हणत लोक रेल्वेचा प्रवास टाळतात. मात्र, या देशातले रस्त्यांचे जाळे, अपघात टाळण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेली वाहतूक व्यवस्था खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे.
आपल्याप्रमाणेच अमेरिकेतही विविध धर्म, वृत्ती, भाषा, बोली, राहणीमान, खानपान, हवामान, सुविधा वा त्याचा अभाव असलेले लोक आणि प्रांत आहेत. सुमारे पन्नास राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांचा विस्तीर्ण पसरलेला असा हा देश आहे. दोन पक्षांभोवती फिरणार्‍या इथल्या सत्तेच्या राजकारणावर प्रभाव मात्र भांडवलदारांचाच आहे. सरकारद्वारे तयार होणारी करप्रणालीही उद्योजकांना हवी तशी तयार केली जात असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेद्वारे वारंवार होतो. इथले लोक सरकार, सरकारची कार्यपद्धती, प्रशासनाने घेतलेले निर्णय, त्यावर होणारी चर्चा याबाबत अतिशय जागरूक असतात. स्वत:ला प्रगत म्हणवून घेणार्‍या या देशात अद्याप एकही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नसल्याची जाणीव त्यांना असल्याचे स्पष्टपणे जाणवते. गेली दोन सत्रे एका ‘काळ्या माणसाने’ राज्य कारभार चालविला, आता एखाद्या महिलेला संधी मिळावी, अशी भावना इथल्या जनतेत प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. पुढच्या दीड वर्षानंतर या देशात होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात येऊ घातलेल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा करताना मात्र लोक त्या उमेदवारांच्या पक्षापेक्षाही त्याची धोरणं, विशेषत: आर्थिक धोरणं, त्याचे विचार, उद्योजकांशी असलेले त्यांचे हितसंबंध, अशा सर्व मुद्यांचा विचार करताना दिसतात. त्यामुळे मतदान करताना हे लोक किती जागरूक असतात याचा प्रत्यय येतो. तरीही या देशातले मतदानाचे एकूण प्रमाण मात्र तितकेसे समाधानकारक नसल्याची बाब तेवढीच आश्‍चर्यजनक आहे.
या देशानं स्वीकारलेली मेरिटोक्रॅसी व्यवस्था माणसांपेक्षाही त्याच्या गुणांना प्राधान्य देणारी असल्याने सार्‍या जगालाच तिचे अप्रूप. भरपूर मोठा भूप्रदेश आणि तरीही केवळ तीनशे दशलक्ष एवढी लोकसंख्या. कमी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली निसर्गसंपदा. साधनसंपत्ती. बहुदा म्हणूनच म्हणूनच या प्रदेशात घरातील मुलांच्या संख्येवर कुठलेच निर्बंध नाहीत. पण महागडे शिक्षण आणि शिक्षणासाठी स्वत:च्या कमाईवर भर देणारी तरुणाई यामुळे अनेकदा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेटर म्हणून काम करणार्‍या मुला, मुलींची संख्या अधिक दिसते. ही मुलं रात्री हॉटेल्समध्ये काम करतात आणि दिवसा कॉलेज. परिणामी शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलेले विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत. पण कुठलंही काम न लाजता करण्याची त्यांची तर्‍हा प्रेरणादायक ठरावी अशीच आहे. फुटपाथवरच्या एखाद्या दुकानात माणसांच्या पायातल्या बुटांची पॉलीश एखादी महिला करते, तेव्हा ना ती आजूबाजूच्या लोकांकडे बघत, ना आजूबाजूचे लोक तिच्याकडे आश्‍चर्याने बघत. श्रीमंत म्हणवणार्‍या या देशात भिकारी मोठ्या संख्येत आहेत. रेल्वे गाडीत गाणं गाऊन किंवा सार्वजनिक बागेत वेगवेगळी इन्स्ट्रुमेंन्ट्‌स वाजवून पैसे कमावणारी लोकं आहेत. फुटपाथवर पिऑनोवर आपल्याला हवी ती धून वाजवीत त्याचा आनंद लुटत आपल्याच तंद्रीत जगणारी जिंदादिल माणसं आहेत. त्या संगीताची कदर करीत त्याच्या झोळीत खिशातला डॉलर टाकणारी माणसंही आहेत अन् संसदेतला कार्यकाळ संपला की कुठल्याशा उद्योजकाला आपली सेवा प्रदान करून पैसा कमावणारे राजकारणीही.
एकीकडे ऍट्लांटिक आणि दुसरीकडे पॅसिफिक अशा दोन महासागरांची किनार लाभलेल्या या देशाच्या समुद्र किनारी भागाचा विकास सुरुवातीपासूनच झपाट्याने झाला. पण त्याला विदेशी आक्रमक अधिक कारणीभूत ठरले. शिवाय आता विकासाची गरजच उरली नसल्याचेही चित्र नाही. अजूनही डकोटा सारख्या राज्यात आरोग्य व्यवस्था नाही. एखाद्या आजारी माणसाला दवाखान्यात पोहोचायला दोन दोन दिवस लागावेत अशी परिस्थिती आहे. एवढ्या कमी लोकसंख्येच्या देशात असलेले प्रचंड सैन्य, त्या सैन्याची शस्त्रसज्जता, अलीकडच्या काळात इथल्या पोलिस यंत्रणेचे होऊ लागलेले सैनिकीकरण एकीकडे त्या देशाच्या शक्तिप्रदर्शनासाठीचे माध्यम ठरत असले तरी स्थानिक नागरिकांना मात्र, ते तितकेसे रुचत नाहीय्. त्यांना त्यातून सरकारच्या अहमपणाचा दर्प जाणवतो. अनेकांना तो अकारण खर्च वाटतो, तर कित्येकांना ती हुकूमशाहीची पहिली पायरी वाटते.
स्वत:ला निधर्मी म्हणवून घेण्यात या देशातील जनतेला अभिमान वाटत असला आणि त्यातून पुरोगामित्वाची झलक दिसत असली, तरी या देशावरचा कॅथॉलिक प्रभाव लपून राहात नाही. लहान वयातच गर्भवती राहणार्‍या मुलींचे प्रमाण खूप जास्त असतानाही त्यांच्या गर्भपाताला विरोध करणारा विचार कॅथॉलिक समुदाय मांडताना दिसतो. दहशतवादी घटनांचा प्रभाव असेल कदाचित, पण मुस्लिमांकडे बघण्याची या देशाची तर्‍हाही अलीकडे बदलल्याचे प्रकर्षाने जाणवत असल्याचे लोक सांगतात. शहरांपासून फार दूर नसलेल्या इथल्या आदिवासी पाड्यांवर शहरांतील विकासाचा प्रभाव अद्याप जाणवत नसला तरी गावांचा कारभार चालविण्यासाठी त्यांनी काढलेली कसिनोची शक्कल मात्र आश्‍चर्यजनक आहे. सरकारच्या परवानगीने चालणार्‍या या मोठमोठ्या कसिनोमध्ये अक्षरश: हजारो माणसं एकावेळी जुगार खेळत बसलेली असतात. त्यांनी जुगारात गमावलेल्या पैशातून आदिवासी पाड्यांचा दैनंदिन कारभार चालतो. अगदी शाळेपासून तर न्यायालयांपर्यंतचा.
फारतर तीनशे वर्षांचा इतिहास असलेला देश. त्यातही इंग्रज, स्पॅनिश अशा बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक. विशेषत: स्पॅनिशचा प्रभाव तर इथे अजूनही जाणवतो. अगदी एखाद्या वर्तमानपत्रात एक बातमी इंग्रजी आणि स्पॅनिश अशा दोन्ही भाषेत झळकावी इतका! अफ्रिकन नागरिकांची संख्याही भरपूर. शेतीचे प्रमाण मोजके. कॉफी, केळी, चॉकलेटसारखे पदार्थसुद्धा बाहेरून येतात. तरीही या बाबींपेक्षाही सैन्यावर होणारा या देशाचा खर्च आणि संशोधनावर देण्यात आलेला भर महत्त्वपूर्ण आहे. न्यू मॅक्सिको मधील लॉ-आलामोस आणि टेक्सास मधली काही गावं केवळ संशोधनकार्यासाठीच समर्पित आहेत. हिरोशिमावर टाकण्यात आलेला बॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया याच लॉ-आलामॉसमध्ये पूर्ण झाल्याचे मानले जाते.
एकूण, माणसं, भूप्रदेश, पैसा, ताकद, सैन्यबळ, तंत्रज्ञान असे सारे काही गाठीशी असलेला जगाच्या पाठीवरील एक बलाढ्य देश गरीबीपासून तर अंधश्रद्धेसारख्या वेगवेगळ्या समस्यांशी कसा झुंजतो आहे, याचे आगळे उदाहरण ठरला आहे अमेरिका! दोन पक्षांभोवती फिरणार्‍या इथल्या सत्तेच्या राजकारणावर प्रभाव मात्र भांडवलदारांचाच आहे. सरकारद्वारे तयार होणारी करप्रणालीही उद्योजकांना हवी तशी तयार केली जात असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेद्वारे वारंवार होतो. इथले लोक सरकार, सरकारची कार्यपद्धती, प्रशासनाने घेतलेले निर्णय, त्यावर होणारी चर्चा याबाबत अतिशय जागरूक असतात. स्वत:ला प्रगत म्हणवून घेणार्‍या या देशात अद्याप एकही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नसल्याची जाणीव त्यांना असल्याचे स्पष्टपणे जाणवते. गेली दोन सत्रे एका ‘काळ्या माणसाने’ राज्य कारभार चालविला, आता एखाद्या महिलेला संधी मिळावी, अशी भावना इथल्या जनतेत प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. पुढच्या दीड वर्षानंतर या देशात होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात येऊ घातलेल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा करताना मात्र लोक त्या उमेदवारांच्या पक्षापेक्षाही त्याची धोरणं, विशेषत: आर्थिक धोरणं, त्याचे विचार, उद्योजकांशी असलेले त्यांचे हितसंबंध, अशा सर्व मुद्यांचा विचार करताना दिसतात.

No comments:

Post a Comment