Friday, May 1, 2015

निषेध, त्या निषेधाचाच व्हायला हवा!

धमण्यांतले रक्त सळसळवायला लावणारा गौरवशाली इतिहास निर्माण करून गेलेलं तडफदार व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवरायांच्या रूपात या महाराष्ट्राने केवळ अनुभवलंच नाही, तर गेली साडेतीनशे वर्षे ते जपलं. डोंगरदर्‍यांत विखुरलेल्या आपल्या राज्यात सदासर्वकाळ रयतेचा राहिलेला त्यांच्या रूपातला ‘जाणता राजा’ कितीही दिवस मागे पडले, तरी इतिहासाच्या विस्मरणात जाणे नाही. दुर्दैव केवळ एवढेच की, इतिहासातले सारे प्रेषित, संत-महात्मे, सामाजिक कार्यातून स्वत:ची ओळख निर्माण करणारे कार्यकर्ते, चळवळी आणि आंदोलनांमधून लोकांच्या हक्काचा लढा उभारणारे नेते- आम्ही आमच्या जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहेत! त्यामुळे राम हिंदूंचा झाला अन् परशुराम ब्राह्मणांचा, शिवाजी मराठ्यांचे झाले अन् आंबेडकर दलितांचे... वैराग्याचे प्रतीक असलेले तुकोबा त्यांच्याही नकळत अवर्णांचे प्रतिनिधित्व करू लागले, तर सार्‍या विश्‍वाच्या कल्याणाची कल्पना मांडणारे ज्ञानेश्‍वर सवर्णांच्या चौकटीत बांधले गेले. अलीकडच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या विभूतीही या प्रकाराला अपवाद राहिल्या नाहीत. अगदी छत्रपती शिवरायसुद्धा! स्वत:ला मावळे म्हणवून घेत त्यांच्या चरित्राचे पोवाडे गाणारे लोक आम्ही, पण त्यांच्या जन्मतारखेबाबतही एकमत होत नाही आमचे!

 
 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या तुलनेत अभिनेता सैफ अलीचे कर्तृत्व काय? बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कारकीर्दीची तुलना होऊ शकेल सैफच्या कारकीर्दीशी? नाहीच होऊ शकत. तरीही इथे सैफचा पद्म पुरस्काराने गौरव होतो अन् सारे आयुष्य एका ध्येयासाठीच्या साधनेकरिता वेचणारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाट्याला एक मोठा पुरस्कार यायला आयुष्याची ९३ वर्षे जावी लागतात! पण, त्या पद्म पुरस्कारावर आणि त्याच्या तकलादू निकषांवर ज्यांना कधी प्रश्‍नचिन्ह उभे करावेसे वाटले नाही, त्या झाडून सार्‍या कथित समाजसेवकांना बाबासाहेबांच्या प्रकरणात मात्र निषेधाचा सूर उमटवावासा वाटतो. ज्यांनी छत्रपतींचे जीवन केवळ अभ्यासले नाही, तर ताकदीने जगापुढे मांडले, नव्या पिढीच्या मनात त्याबाबत अवीट गोडी निर्माण केली, ते बाबासाहेब पुरंदरे लोकांच्या मनात ‘महाराष्ट्र भूषण’ पूर्वीपासूनच होते. आता सरकारच्या वतीने त्याची अधिकृत घोषणा झाली एवढेच! मात्र, तशी घोषणा होताच अनेकांची पोटं दुखू लागली आहेत. गरज नसताना त्यांच्या तोंडून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. निषेधाचा हा सूर आणि त्यांनी चालविलेली आरोपांची ही बरसात तर दुर्दैवी आहेच, पण त्यामागे दडलेल्या विखारी भावना त्याहून अधिक दुर्दैवी आहेत.
धमण्यांतले रक्त सळसळवायला लावणारा गौरवशाली इतिहास निर्माण करून गेलेलं तडफदार व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवरायांच्या रूपात या महाराष्ट्राने केवळ अनुभवलंच नाही, तर गेली साडेतीनशे वर्षे ते जपलं. डोंगरदर्‍यांत विखुरलेल्या आपल्या राज्यात सदासर्वकाळ रयतेचा राहिलेला त्यांच्या रूपातला ‘जाणता राजा’ कितीही दिवस मागे पडले, तरी इतिहासाच्या विस्मरणात जाणे नाही. दुर्दैव केवळ एवढेच की, इतिहासातले सारे प्रेषित, संत-महात्मे, सामाजिक कार्यातून स्वत:ची ओळख निर्माण करणारे कार्यकर्ते, चळवळी आणि आंदोलनांमधून लोकांच्या हक्काचा लढा उभारणारे नेते- आम्ही आमच्या जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहेत! त्यामुळे राम हिंदूंचा झाला अन् परशुराम ब्राह्मणांचा, शिवाजी मराठ्यांचे झाले अन् आंबेडकर दलितांचे... वैराग्याचे प्रतीक असलेले तुकोबा त्यांच्याही नकळत अवर्णांचे प्रतिनिधित्व करू लागले, तर सार्‍या विश्‍वाच्या कल्याणाची कल्पना मांडणारे ज्ञानेश्‍वर सवर्णांच्या चौकटीत बांधले गेले. अलीकडच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या विभूतीही या प्रकाराला अपवाद राहिल्या नाहीत. अगदी छत्रपती शिवरायसुद्धा! स्वत:ला मावळे म्हणवून घेत त्यांच्या चरित्राचे पोवाडे गाणारे लोक आम्ही, पण त्यांच्या जन्मतारखेबाबतही एकमत होत नाही आमचे! याहून दुर्दैव दुसरे कोणते असू शकेल? पण, त्याची खंतही आमच्या मनाला शिवत नाही कधी...
किशोरवयातच मुघलांविरुद्ध लढण्याची शपथ घेणारे, नंतरच्या काळात प्रत्यक्षात ती लढाई लढणारे, त्यासाठी मावळ्यांची फौज उभी करणारे, तोरणा गड ताब्यात घेणारे, अफझल खानाचा कोथळा बाहेर काढणारे, शाहिस्ते खानाची बोटं छाटणारे, परधर्मातील परस्त्रीचा मातेसमान आदर करणारे, राज्यकरभार चालविताना राज्याच्या कृषिक्षेत्रापासून तर महसूल व्यवस्थेपर्यंत सर्वदूर जातीने लक्ष घालणारे, गुप्तहेर व्यवस्थेबाबत जागरूक राहिलेले आणि बहुधा म्हणूनच शत्रूंच्या कारवायांचा सहज सामना करू शकलेले शिवराय; ‘जाणता राजा’च्या माध्यमातून कधी नाटकाच्या प्रभावी सादरीकरणातून, कधी आपल्या ओजस्वी वाणीतून, कधी धारदार लेखणीतून, कधी तेवढ्याच प्रभावी शब्दांतून, कधी पोवाड्यांमधून अगदी सहजपणे उभे केलेत बाबासाहेब पुरंदरे यांनी! नाटक, भाषणं, पुस्तकं, पोवाड्यांच्या माध्यमातून शिवाजी घराघरांत पोहोचविण्याचे कार्य ज्यांनी गेली किमान पाच दशके अविरतपणे चालविले आहे त्यांच्या, कालपर्यंत बेदखल राहिलेल्या कामाची आज कुणीतरी दखल घेतली, एका पुरस्काराने त्या व्यक्तिमत्त्वाचा गुणगौरव करण्याचा छोटासा प्रयत्न सरकारदरबारी झाला, तर त्यालाही गालबोट लावण्याचा प्रयत्न स्वत:ला धुरीण म्हणवून घेणारे या समाजातले काही लोक करताहेत. बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ हा गौरव जाहीर होताच, कासावीस झालेल्या काही लोकांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या भावना पुरंदरेंचा, त्यांच्या आजवरच्या कार्याचा, छत्रपतींबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाचा अवमान करणार्‍या आहेत. बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करणार्‍या किती लोकांनी शिवबांचा इतिहास वाचला याची कल्पना नाही, पण शिवरायांचा तो जाज्वल्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे वास्तवात जगले आहेत, हे जगमान्य असे धडधडीत सत्य आहे.
शिवाजी महाराज त्यांच्या हयातीत जिथे जिथे गेले, तिथे तिथे जाण्याचा, त्या ठिकाणांचे महत्त्व आणि बारकावे शोधण्याचा, भविष्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याचे इतिहासकालीन संदर्भ शोधण्याचा प्रयत्न बाबासाहेब पुरंदरे यांनी आजतागायत सातत्याने केला. ‘आग्रा’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘पन्हाळगड’ अशा एकाहून एक सरस पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शिवकालीन इतिहास शब्दबद्ध केला. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या शेकडो प्रयोगांतून मराठीजनांच्या मनामनांत शिवरायांचे चरित्र रुजविण्याचा मानही त्यांचाच! ज्यांनी कधीकाळी चौथ्या वर्गाच्या पुस्तकातून शिवबांचा इतिहास वाचला होता, त्यांच्यासमोर, डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या दृश्यांमधून आणि स्फूर्तिदायक पोवाड्यांमधून तोच इतिहास नव्याने, तंत्रज्ञानाच्या वापरातून नव्या पद्धतीने उभा करण्याचे श्रेय शिवशाहिरांना द्यायलाच हवे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारतर्फे झालेला प्रयत्न नेमका त्यासाठीच आहे. पण, त्याबद्दल आनंद व्यक्त करायचे सोडून काही लोक, पुरस्कार जाहीर करणार्‍या सरकारवर टीकेचे आसूड ओढायला निघाले आहेत. खरं तर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर खोटा इतिहास लिहिल्याचा आरोप करणारे लोक, जेम्स लेन आणि बाबासाहेबांना एकाच तराजूत मोजायला निघालेले असतात! जेम्स लेनवरून भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये घातला गेलेला धिंगाणा आणि आता पुरंदरेंसाठी जाहीर होत असलेला निषेधाचा सूर एकाच धर्तीवरचा आणि एकाच पातळीवरचा आहे. म्हणूनच तो तेवढाच निषेधार्ह आहे.
पद्म पुरस्कारांची खिरापत वाटताना ज्यांना गेल्या पाच दशकांत कधी बाबासाहेब पुरंदरेंचे नाव आठवले नाही, ती व्यक्ती ‘महाराष्ट्र भूषण’ वाटावी या उंचीची आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात कार्यरत राहिलेल्या आजवरच्या सरकारांनाही या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची दखल घ्यायला नाही म्हणायला उशिरच झाला आहे.
शिवरायांनी आपल्या कर्तबगारीतून घडविलेला इतिहास मोठा, अभिमानास्पद, गौरवशाली आहेच, पण तो इतिहास तेवढ्याच प्रभावीपणे मांडून सतत जिवंत ठेवण्याच्या कर्तबगारीचे महत्त्वही तेवढेच मोठे आहे. इतिहासात अजरामर झालेली माणसं आणि त्यांचे कर्तृत्व नंतरच्या पिढीने जिवंत ठेवायचे असते. नव्या पिढीला त्याबाबत अवगत करायचे असते. इथे तर आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत आणि त्यांच्या घडवणुकीच्या प्रक्रियेतील दादोजी कोंडदेवांच्या सहभागाबाबतच एकमेकांशी भांडत बसलोय्. अशात तो इतिहास जगण्याचे, तरुणाईच्या मनात तो रुजविण्याचे काम करायचे कुणी? ज्या मोजक्या लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत, इतिहासाचा अभ्यास करीत ही गरज पूर्ण केली, त्यात बाबासाहेबांचे नाव फार वरच्या क्रमांकावर आहे. कुणाला पटो वा न पटो, त्यांची तपश्‍चर्या, त्यांचे कार्य आणि त्याचे फलित अतुलनीयच आहे. पण, ज्यांना इतिहासाची पानेही जाती, धर्म आणि राजकारणाच्या चौकटीतच बंदिस्त करून ठेवायची आहेत, त्यांच्याकडून काय वेगळ्या अपेक्षा करायच्या? एक मात्र खरे की, बाबासाहेब पुरंदरेंना हा गौरव प्रदान करण्यास इतका उशीर का व्हावा, याबाबत खेद व्यक्त करायचे सोडून कुणी निषेध करायला निघाले असेल, तर निषेध त्या निषेधाचाच व्हायला हवा...!

No comments:

Post a Comment