Wednesday, October 8, 2014

दरिद्री नेमके कोण?

त्या महाभागांच्या कथित कलाकृतीची नोंदही खरं तर भारताने घेऊ नये. पण त्या हरामखोरांची कृतीच इतकी हीन होती की लाथाडण्यासाठी तरी त्याची दखल भारतीयांना घ्यावीच लागली. गायी चारणारा माणूस ‘इलाईट स्पेस क्लब’चा दरवाजा ठोठावतोय् यात त्या कार्टूनिस्टला विनोद दिसला असेलही कदाचित! पण तमाम भारतीय जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. लेकहो! तुम्ही माना अथवा मानू नका, तुमच्या सहमती वा विरोधाला जराही भीक न घालता त्या क्लबचे दरवाजे या देशासाठी केव्हाच उघडले गेले आहेत. विरोधकांच्या नाकावर टिच्चून या देशातील वैज्ञानिकांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर तिथे स्थान मिळवले आहे. आता बसायचे असेल, तर बसा आमच्या शेजारी गुमान. नाही तर जा उडत!
भारताने अतिशय कमी खर्चात यशस्वीरीत्या साकारलेल्या मंगळ मोहिमेचे कौतुक करायचे सोडून आपल्या मनात साठलेली गरळ ओकण्याचे काम काही नतद्रष्टांनी चालवले आहे. यासंदर्भात एक अपमानजनक कार्टून प्रकाशित केल्यानंतर जगभरातील तमाम भारतीयांच्या तीव्र भावना व्यक्त झाल्यानंतर न्यूयॉर्क टाईम्स सारख्या एका प्रतिष्ठित दैनिकाच्या मालकाचे डोळे उघडले आणि मग माफीनामा जाहीर झाला. अर्थात त्या माफीनाम्यामुळे त्यांचे वैचारिक खुजेपण आणि अकलेचे दिवाळे जाहीर व्हायचे काही शिल्लक राहिले नाही.
भारताची मंगळ मोहीम यशस्वी झाली. केवळ अत्यल्प खर्चातच नव्हे, तर पहिल्याच प्रयत्नात मोहीम यशस्वी करणारा तो जगातला पहिला देश ठरला. सार्‍या भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब ठरली. जगासाठीही ठरायला हवी होती. पण या दोन्ही बाबतीत अपयशी ठरलेल्या काही देशांनी आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवीत भारतावर कुत्सितपणे हसण्याची भूमिका स्वीकारली. या मोहिमेत यापूर्वी यशस्वी ठरलेल्या देशांचे लोक ‘इलाईट स्पेस क्लब’ मध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक गरीब, भिकारडा माणूस म्हणजे भारत त्या क्लबमध्ये प्रवेश मिळावा म्हणून दरवाजा ठोठावतो आहे... असे एक कार्टून कर्मदरिद्री आणि तरीही स्वत:ला शहाणे समजणार्‍या न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केले. साहजिकच त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जगभरातून त्याचा निषेध झाला. मग या बड्या वृत्तपत्राला स्वत:चीच लाज वाटली आणि त्याने भारतीयजनांची माफी मागणारा मजकूर प्रकाशित केला. सदर प्रकरणात या देशाची बूज राखणार्‍या आणि सोशल साईटवरून न्यूयॉर्क टाईम्सला त्याची जागा दाखवून देणार्‍या भारतीयांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर जगभरातील भारतीय नागरिकांचे अभिनंदन करायला हवे. स्वत:ला तिसमारखॉं समजणारे दीडशहाणे भारतीय लोकांनी बजावलेल्या कर्तबगारीचीही कशी खिल्ली उडवायला निघालेत बघा!
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या एका देशाने इथल्या समस्या, परिस्थिती, गरिबीचा सामना करत स्वत:ला प्रगत समजणार्‍या देशांच्या नाकावर टिच्चून हे अभियान यशस्वी करून दाखवल्याने तर जळफळाट झालेला नाही ना, या तमाम प्रगत देशांचा? गरिबीशी लढून कोट्यवधी रुपयांची मोहीम राबविणार्‍या देशाची जागतिक पातळीवर दखल घ्यायचे सोडून, त्याच्या गरिबीची टर उडविण्यातच धन्यता मानणार्‍या देशांना प्रगत म्हणायचे तरी कसे? आणि कशासाठी? मनं अशी खुजीच राहणार असतील, तर करायची काय ती प्रगती? स्वत:ची अस्मिता जपण्याच्या धडपडीत कायम दुसर्‍यांचा दु:स्वास करणारी...! दरिद्री ते आहेत की आपण?

कोत्या मनाचे प्रदर्शन!

मुळात हे व्यंग्यचित्र तयार करणार्‍या आणि ते प्रकाशित करणार्‍यांच्या मनात दडलेल्या अन् भारताबद्दल त्यांच्या नसानसात भिनलेल्या विखारी द्वेषाची झलक यानिमित्ताने जगजाहीर झाली आहे. खरे तर मंगळमोहिमेच्या यशस्वितेतून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासारख्या एका विकसनशील देशाने गाठलेल्या उत्तुंग शिखराचा परिचय सार्‍या जगाला झाला आहे. कालपर्यंत काही विशिष्ट देशांकडे असलेली याबाबतची मक्तेदारी मोडीत काढून भारताने हे यश संपादन केले आहे. पण, इतक्या मोठ्या यशाबद्दल साधी कौतुकाची थाप पाठीवर ठेवण्यासाठीही ज्यांचे हात सरसावले नाहीत, त्यांच्याकडून विशाल हृदयाच्या वागणुकीची अपेक्षा तरी काय करायची? ते तर थिट्या मनाचे प्रदर्शन मांडून बसलेत. एरवी नाही नाही त्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांवर कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव करणार्‍या, एटिकेट्‌स, मॅनर्स ठासून भरल्याचा दावा करणार्‍या देशांना भारताच्या इतक्या मोठ्या यशाची दखल घ्यावीशी वाटत नाही, दखल घेतलीच तरी त्याचा जाहीरपणे उल्लेख करावासा वाटत नाही, उलट असले दर्जाहीन व्यंग्यचित्र प्रकाशित करून आमच्या प्रयत्नांची थट्टा करावीशी वाटते, त्यांच्या बेदरकारीची दखल आम्ही तरी का घ्यावी?
पृथ्वीच्या पाठीवर गरीब देशांची, गरीब माणसांची संख्या कमी नाही. भारतासारख्या देशातही ती संख्या दखलपात्र प्रमाणात आहे. ते वास्तव कुणीच कधीच नाकारलेले नाही. त्याची लाज बाळगण्याचे कारण नाही. कुणी कौतुक करो वा न करो, कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण त्यातून बाहेर पडण्याचे, इथल्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना वर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न चाललेत या देशात. गेल्या काही वर्षांतली बदलती आकडेवारी हे त्याचेच निदर्शक आहे. ज्यांना त्याचा मागमूसही नाही, त्या महाभागांच्या कथित कलाकृतीची नोंदही खरं तर भारताने घेऊ नये. पण त्या हरामखोरांची कृतीच इतकी हीन होती की लाथाडण्यासाठी तरी त्याची दखल भारतीयांना घ्यावीच लागली. गायी चारणारा माणूस ‘इलाईट स्पेस क्लब’चा दरवाजा ठोठावतोय् यात त्या कार्टूनिस्टला विनोद दिसला असेलही कदाचित! पण तमाम भारतीय जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. लेकहो! तुम्ही माना अथवा मानू नका, तुमच्या सहमती वा विरोधाला जराही भीक न घालता त्या क्लबचे दरवाजे या देशासाठी केव्हाच उघडले गेले आहेत. विरोधकांच्या नाकावर टिच्चून या देशातील वैज्ञानिकांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर तिथे स्थान मिळवले आहे. आता बसायचे असेल, तर बसा आमच्या शेजारी गुमान. नाही तर जा उडत!

1 comment: