बलात्काराचा प्रयत्न करणारा मोकाट आणि पीडितेच्या गळ्याभोवती मात्र दोरीचा फास, असे काहीसे दुर्दैवी चित्र तेहरानच्या माध्यमातून सार्या जगाने अनुभवले. जे समाजात अनुभवले, जे कारागृहात भोगले, जे न्यायालयात वाट्याला आले, त्याची मांडणी रेहानाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रातून एका मुलीनं आईकडे व्यक्त केलेल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावना तशा सामान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या असामान्य आहेत. मृत्यूला सामोरे जाताना व्यक्त झाल्या असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. त्यात आईच्या कुशीत दडून अश्रूंना वाट मोकळी करून देण्याची अपेक्षा आहे. मरण दाराशी उभे असल्याचे वास्तव ठावूक असतानाही वडिलांचा हात प्रेमाने हातात घेण्याची आस आहे. सार्या जगातील तरुणींच्या मनातल्या भावना यानिमित्ताने रेहानाच्या पत्रातून व्यक्त झाल्या आहेत. सोबतीला तिथल्या न्याय व्यवस्थेच्या चिंधड्या उडविण्याचे धारिष्ट्यही आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. आणि, आपल्या हयातीत आपण ते बदलू शकलो नसल्याची वेदनाही आहे...
आई, या जगानं मला १९ वर्षे जगण्याचा अधिकार दिला. खरं तर ‘त्या’ काळ्या रात्रीच माझी हत्या व्हायला हवी होती. मला मारून त्यांनी माझे शव शहराच्या कुठल्याही कोपर्यात फेकून दिले असते. मग कुणीतरी तुला बोलावून माझ्या प्रेताची ओळख पटविण्यास सांगितले असते. मग तुला कळलं असतं की, हत्येपूर्वी माझ्यावर बलात्कार सुद्धा झाला होता... माझ्यावर अनन्वित छळ करणारी ‘ती’ व्यक्ती बाहेर मोकाट फिरत राहिली असती. आपल्याकडे त्याच्यासारखी संपत्ती आणि ताकद नसल्यानं आपण त्याचं काहीही बिघडवू शकलो नसतो. तो कधीच गजाआड झाला नसता. मग तू पण त्या वेदनेत लीन होत कसंनुसं आयुष्य जगत राहिली असती. पण नंतरच्या काळात तुझाही मृत्यू याच पीडेने झाला असता. पण हे काही कुठल्या शापामुळे घडलेलं नाही. मला त्यांनी मारलं नाही किंवा माझे शव कुठल्याशा कोपर्यात फेकले नाही. पण गेल्या काळात तेहरानच्या इविन कारागृहातल्या काळकोठडीत दरदिवशी तोच अनुभव मी घेत राहिले. तू, ही माझ्या ललाटावरील रेष समज. कुणालाही दोष देत बसू नकोस. तुला हे चांगलं ठावूक आहे की, मृत्यू म्हणजे काही जीवनाचा अंत नाही...
आई, तूच मला म्हणायचीस ना की, माणसाला मरेपर्यंत आपल्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे म्हणून? जेव्हा मला एक खुनी, आरोपी म्हणून न्यायालयात उभं करण्यात आलं, तेव्हा मी माझ्या डोळ्यांमधून अश्रूचा एक थेंब देखील बाहेर पडू दिला नाही की अभयाची भीक मागितली नाही. तिथं असताना मोठ्यानं ओरडावं असं खूप वाटत होतं. पण मी तसं केलं नाही. का ठावूक आहे, आई? कारण मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता...
तुला ठावूक आहे आई, मी आयुष्यात कधी एक मच्छर सुद्धा मारला नाही. साधा काकरोचही घराबाहेर काढायचा, तर मी मारण्याऐवजी त्याच्या मिशा पकडून त्याला घराबाहेर टाकून यायचे. पण आता माझे विचार बदलले आहेत. मृत्यूपूर्वी मला तुला काही सांगायचं आहे. मृत्यूनंतर माझे शरीर मातीत दबून सडलेले मला चालणार नाही. त्यामुळे फाशीनंतर लागलीच माझ्या शरीराचे विविध अवयव गरजूंना दान देण्यात यावेत...
माझ्या लक्षात आलं आहे की, मला आता या देशातील व्यवस्थेविरुद्धच्या किस्सास नामक कायद्याचा सामना करायचा आहे. माझ्या आयुष्याचं पुस्तक आता शेवटच्या पानापर्यंत पोहोचलं आहे, हे तू समजून का घेत नाहीस? आई, तू नाराज होऊ नकोस. तू नाराज झाली ना की, मलाच माझी लाज वाटायला लागते. या क्षणी मला तुझे आणि बाबांचे हात प्रेमाने हातात घ्यायचेत...
हे पत्र आहे, इराणमधील रेहाना या सव्वीस वर्षीय युवतीचे. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्या नराधमाला जीवे मारण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. त्या ‘गुन्ह्या’साठी जवळपास सात वर्षे ती कारागृहात राहिली. इराणमध्ये अस्तित्वात असलेल्या सध्याच्या समाजव्यवस्थेविरुद्ध वर्तणूक केली म्हणून ‘किस्सास’ कायद्यांतर्गत तिच्यावर खटला चालला. शेवटी चार दिवसांपूर्वी तिला फाशी देण्यात आली महिलांना त्यांचे नैसर्गिक अधिकार नाकारणारी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेविरुद्ध एका महिलेने दिलेला लढा, लढता लढता तिने कवटाळलेला मृत्यू आणि त्या मृत्यूचा सहज स्वीकार करण्याचे औदार्य दाखवताना आईचा भावनावेग सावरण्याचे चालवलेले प्रयत्न... सारेच अद्भुत आहे.
अनेक प्रश्न या प्रकरणातून उपस्थित झाले आहेत. दिल्लीतल्या एका निर्भया प्रकरणातून भारतातली तरुणाई आणि प्रशासन अद्याप सावरलेले नाही. दरम्यानच्या काळात अजूनही कितीतरी ‘निर्भया’ देशाच्या कानाकोपर्यात कुणाच्या तरी वासनेला बळी पडल्यात. त्यांच्यासाठी दिल्लीतल्या इंडिया गेटसमोर कुणाचे मोर्चे निघाले नाहीत, त्यांच्या हार घातलेल्या प्रतिमेसमोर मुंबईतल्या समुद्रकिनारी मेणबत्त्या पेटल्या नाहीत, एवढाच काय तो फरक. बाकी ठरल्या तर त्याही कुणाच्यातरी बलात्काराच्याच बळी! पुरोगामित्वाचे डांगोरे पिटूनही त्यांना न्याय मिळाला नाहीच. मग अजूनही प्रतिगामित्वाशीच झगडणार्या इराणमधील महिलांना तो न्याय सहजतेने मिळेल, अशी अपेक्षा तरी कशी करायची? तिथल्या व्यवस्थेने महिलांचे वर्चस्व साफ नाकारले. बलात्काराचा प्रयत्न करणारा मोकाट आणि पीडितेच्या गळ्याभोवती मात्र दोरीचा फास, असे काहीसे दुर्दैवी चित्र तेहरानच्या माध्यमातून सार्या जगाने अनुभवले. जे समाजात अनुभवले, जे कारागृहात भोगले, जे न्यायालयात वाट्याला आले, त्याची मांडणी रेहानाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रातून एका मुलीनं आईकडे व्यक्त केलेल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावना तशा सामान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या असामान्य आहेत. मृत्यूला सामोरे जाताना व्यक्त झाल्या असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. त्यात आईच्या कुशीत दडून अश्रूंना वाट मोकळी करून देण्याची अपेक्षा आहे. मरण दाराशी उभे असल्याचे वास्तव ठावूक असतानाही वडिलांचा हात प्रेमाने हातात घेण्याची आस आहे. सार्या जगातील तरुणींच्या मनातल्या भावना यानिमित्ताने रेहानाच्या पत्रातून व्यक्त झाल्या आहेत. सोबतीला तिथल्या न्याय व्यवस्थेच्या चिंधड्या उडविण्याचे धारिष्ट्यही आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. आणि, आपल्या हयातीत आपण ते बदलू शकलो नसल्याची वेदनाही आहे...
No comments:
Post a Comment