Saturday, April 9, 2016

दुष्काळाच्या तोंडावर आयपीएलची दिवाळी

क्रिकेटला कुणाचाच विरोध नाही. क्रिकेटच काय, त्याच्या पवार-ललित मोदींनी मांडलेल्या बाजारालाही कुणाचा विरोध नाही. अगदी पवारांच्या पुढाकाराने परवा बारामतीतील स्टेडियमच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला त्यालाही कुणाची आडकाठी नाही. पण मग मराठवाड्यातल्या दुष्काळाची चिंता कोणी वाहायची? एकट्या मुख्यमंत्र्यांनी? दुष्काळाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अन्य मंत्र्यांनी जिवाचे रान करायचे अन् शरद पवारांनी बारामतीत सचिन तेंडुलकर अन् रहाणेच्या उपस्थितीत स्टेडियमच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात वेळ घालवायचा? राधाकृष्ण विखे पाटलांनी राजकीय आरोपांची पतंगबाजी करायची? शेवटी या प्रकरणात न्यायालयाला भावना व्यक्त करावी लागली. सामना होणारच असेल, तर लोकांना महागात पाणी विका अन् त्या पैशाचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करा, अशी मागणी करण्याची वेळ याचिकाकर्त्यावर आली. नेते बेताल वागू लागले की अन्य कुणालातरी जबाबदारीने वागावे लागणारच ना! दुष्काळ विसरून क्रिकेटमध्ये रमलेल्या पवारांनाही जाण व्हावी या जबाबदारीची कधीतरी...! 
शरद पवार आणि ललित मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या क्रिकेटच्या आयपीएल सामन्यांपुढे यंदा महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी स्थिती थिटी ठरली आहे. तिकडे संपूर्ण मराठवाडा पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करीत असताना यांनी चालवलेली आयपीएलची दिवाळी सामान्य माणसालाच काय, अगदी न्यायालयाला देखील आवडलेली नाही. या स्पर्धेच्या आयोजकांनी जनाची आणि मनाची दोन्ही राखत या दुष्काळग्रस्त परिस्थितीची जरा तरी काळजी वाहावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना जी सणसणीत चपराक न्यायालयाच्या माध्यमातून अनेकांच्या थोबाडीत हाणली गेली आहे, त्यानंतरही चित्र फारसे बदलण्याची शक्यता दिसत नाही. तसाही क्रिकेटचा बाजार मांडून बसलेल्यांना राज्यातील दुष्काळाशी काय घेणेदेणे? पण स्वत:ला या राज्यातील राजकारणाचा कर्ताधर्ता मानणार्‍या आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जुळली असल्याचा कायम दावा करणार्‍या ‘जाणत्या राजाला’ही क्रिकेटपुढे दुष्काळ दुय्यम वाटावा, ही बाब अधिक दुर्दैवी आहे. 
यंदा संपूर्ण राज्य, विशेषत: सारा मराठवाडा गंभीर दुष्काळाचा सामना करतोय्. लातूरसारख्या भागात रेल्वेने पाणी पुरविण्याची स्थिती उद्भवली आहे. या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी होणारा पाण्याचा अपव्यव आक्षेपार्ह ठरतो. पण या बड्या नेत्यांना ते सांगणार कोण? आणि सांगण्याचा प्रयत्न कुणी केलाच तर हे ऐकून घेतील याची तरी शाश्‍वती इथे आहे कुणाला? त्यांनी तर या खेळाचा केव्हाच ‘धंदा’ करून टाकला आहे. आनंदापेक्षाही त्यातून मिळणार्‍या पैशाकडेच सर्वांचे लक्ष लागले असल्याने दुष्काळाच्या पेकाटात लाथ मारून सर्वांनी क्रिकेटच्या सेलेब्रेशनवर आणि त्याआडून मिळणार्‍या पैशावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. बरं अडचण अशी की मायबाप रसिकांनीच या व्यापार्‍यांना क्रिकेटचा बाजार मांडण्याची परवानगी दिलेली. ते आम्हाला लुटण्याचा डाव मांडतात आणि लोक लुटण्यासाठी आपले खिसे मोकळे करून सामोरे जातात त्यांना. मग पाणी, विजेच्या अपव्ययासारखे ‘गौण मुद्दे’ लक्षात राहतील कुणाच्या? इथे अंतिम सामन्याच्या निकालापासून तर इतर सामन्यातील चौकार, षटकार, विकेटपर्यंत सार्‍याच गोष्टी मैदानावरच्या खेळाडूंऐवजी मैदानाबाहेरचे सटोडिये ठरवतात, ही बाब पुरती ठावूक असतानाही हजारो लोक वेडे होत क्रिकेटवरील प्रेमापायी जीव ओवाळून टाकतात त्या सामन्यावर. अशात तिकडे लातुरात पाण्यासाठी लागलेल्या रांगा आणि मराठवाड्यात कित्येक ठिकाणी पाण्यासाठी उडालेल्या झुंबडीवर लाठीमार केल्या जाण्याच्या घटनेपेक्षाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील हिरवळ कुणाच्यातरी लेखी अधिक महत्त्वाची ठरते. यातही दुर्दैवाची बाब अशी की, या आयोजनाचे नियोजन खूप अगोदर झाले असल्याचे फालतू कारण पुढे करून सामना रद्द न करण्याची भावनिक विनंती मान्य करण्यावाचून न्यायालयापुढेही दुसरा पर्याय उरत नाही. आणि मग, असले सामने आयोजित करताना इथल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव जपण्याची थोडीशीही गरज तुम्हाला वाटत नाही का, अशी फटकार हाणण्यापलीकडे दुसरे काहीच करता न येण्याची हतबलता दस्तुरखुद्द न्यायालयाच्या वाट्याला येते. मग प्रत्यक्षात दुष्काळाचा सामना करणार्‍या मराठवाड्यातील जनतेला मनातील संतापाला कशी वाट मोकळी करून देता येईल? 
तिकडे पाण्यासाठी लोकांची पायपीट चालली असताना, इकडे मैदानावरची हिरवळ कायम राखण्यासाठी चाललेली धडपड, तिकडे या देशातली कित्येक गावे अजून अंधारात असताना, इकडे दिवसाच्या लख्ख उजेडातील खेळ टाळून रात्रीच्या कृत्रिम उजेडात खेळण्याचा चाललेला अट्टहास कुणालाही आक्षेपार्ह वाटत नाही. कारण, खेळापेक्षाही सेलेब्रेशन, आर्थिक कमाईच्या माध्यमाचे स्वरूप याच लोकांनी क्रिकेटला प्राप्त करून दिले आहे. हे सेलेब्रेशन साजरे करणार्‍यांची अन् त्यांच्या पाठीराख्यांची संख्या एवढी मोठी आहे की, यातील गैरप्रकारांविरुद्ध बोलणार्‍यांनाही आवाज उरला नाही. क्रिकेटच्या सट्ट्याची बातमी कधीतरी खळबळ निर्माण करून जाते, तेवढेच. वर्षानुवर्षे हेच चालले आहे. याही वेळी त्यांच्या बेताल वागण्याची कुणी दखल घेण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नव्हता. पण कुणीतरी हिंमत करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यांची बेजबाबदार वर्तणूक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग लोकांच्या मनातला संताप न्यायालयाच्या माध्यमातून व्यक्त झाला. ज्याची जगाच्या पाठीवर कोणत्याच रेकॉर्डमध्ये नोंद होत नाही, ज्याला काही मूठभर लोकांच्या खाजगी व्यवसायापलीकडे फारसे महत्त्व नाही, अशा आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांपलीकडे ज्यांना नागरिकांचे दु:ख, त्यांच्या समस्या कवडीमोल वाटतात, त्यांच्या कानाखाली सणसणीत आवाज काढण्याचे काम शेवटी न्यायालयाला करावे लागले आहे. क्रिकेटचे सामने आयोजित करताना आणि त्यावर पैशापासून इतर सार्‍या नैसर्गिक, अनैसर्गिक स्रोतांची उधळण करताना जरा इथल्या दुष्काळी परिस्थितीचीही जाण ठेवा, हे पवारांसारख्या कथित ‘जाणत्या राजा’लाही कानपिचक्या देऊन अन्य कुणीतरी सांगण्याची गरज पडते, यावरून क्रिकेटच्या बाजारातून त्यांना मिळणार्‍या लाभाची कल्पना यावी. त्या लाभापुढे त्यांनी मातीमोल ठरवलेल्या जनभावनांची आणि त्याची त्यांनीच उडविलेली खिल्लीही ध्यानात यावी. 
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून सार्‍या राज्याला गंडवल्यानंतर छगन भुजबळ कारागृहातून दुष्काळाची काळजी वाहण्याची नौटंकी करताहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कुठल्याशा सिंचन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आपल्या त्या पत्रातून भुजबळ करतात आणि इकडे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना क्रिकेटच्या वेडापायी दुष्काळाच्या त्याच संकटाचा विसर पडतो, ही अगम्य किमया केवळ पवारांसारखे राजकीय नेतेच घडवू शकतात. 
क्रिकेटला कुणाचाच विरोध नाही. क्रिकेटच काय, त्याच्या पवार-ललित मोदींनी मांडलेल्या बाजारालाही कुणाचा विरोध नाही. अगदी पवारांच्या पुढाकाराने परवा बारामतीतील स्टेडियमच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला त्यालाही कुणाची आडकाठी नाही. पण मग मराठवाड्यातल्या दुष्काळाची चिंता कोणी वाहायची? एकट्या मुख्यमंत्र्यांनी? दुष्काळाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अन्य मंत्र्यांनी जिवाचे रान करायचे अन् शरद पवारांनी बारामतीत सचिन तेंडुलकर अन् रहाणेच्या उपस्थितीत स्टेडियमच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात वेळ घालवायचा? राधाकृष्ण विखे पाटलांनी राजकीय आरोपांची पतंगबाजी करायची? शेवटी या प्रकरणात न्यायालयाला भावना व्यक्त करावी लागली. सामना होणारच असेल, तर लोकांना महागात पाणी विका अन् त्या पैशाचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करा, अशी मागणी करण्याची वेळ याचिकाकर्त्यावर आली. नेते बेताल वागू लागले की अन्य कुणालातरी जबाबदारीने वागावे लागणारच ना! दुष्काळ विसरून क्रिकेटमध्ये रमलेल्या पवारांनाही जाण व्हावी या जबाबदारीची कधीतरी...! 

No comments:

Post a Comment