Friday, April 15, 2016

क्रिकेट चालू द्या, आम्हीच जगणे थांबवतो!

तसेही क्रिकेट बंद करून कसं चालेल? तो तर तुमच्या-आमच्या- सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! राहिला प्रश्‍न आम्हा दुष्काळग्रस्तांचा, तर आमचं आम्ही बघून घेऊ. गरज पडली तर आम्ही आमचं जगणं थांबवू. पण, क्रिकेटचा खेळ कुठल्याही अडथळ्याविना पार पडला पाहिजे. दुष्काळाचा क्रिकेटशी काय संबंध, असा प्रश्‍न आपणच विचारू शकता गावस्करसाहेब. मूर्ख आहेत ते लोक, जे मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाने अस्वस्थ होत कोर्टात धाव घेताहेत. बळीराजाच्या नशिबी आलेल्या वेदना त्यांनी न्यायालयात मांडल्या म्हणून निदान इथे दुष्काळ असल्याची जाणीव तरी सार्‍या देशाला झाली. अन्यथा लोक तसेही तुमच्या संगतीने क्रिकेटच्या रंगात रंगायला तयार झाले आहेतच. पावसाच्या बरसण्याचं काय, नंतरही बघता येईल कधीतरी. क्रिकेटच्या मैदानावरील चौकार, षट्‌कारांची बरसात अधिक महत्त्वाची, नाही का द्रविडसाहेब?खरे आहे गावस्करसाहेब तुमचे म्हणणे. काही लोक ऊठसूठ त्या आयपीएलच्या मागे लागतात. काय आहे ना साहेब, आयपीएल हा इथल्या काही लोकांनी मांडलेला क्रिकेटचा बाजार असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. त्या आडून लोकांच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा उठवण्याचा कुणाचातरी डावही एव्हाना जगजाहीर झाला आहे. मूठभर लोकांचे त्यातून साधणारे हितही आताशा उजेडात आले आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळ दुर्लक्षून, चाललेला क्रिकेटचा बाजार निदान कडक उन्हाळ्यात तरी इथून इतरत्र हलवावा, या न्यायालयाच्या आदेशावरून, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड या क्रिकेटपटूंचा झालेला तिळपापड अनाकलनीय आणि बराच बोलकाही आहे. याच राज्यातले रहिवासी असूनही, इथल्या दुष्काळाबाबतची त्यांची ही कोरडी भूमिका दुर्दैवी अन् तेवढीच असमर्थनीय आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकीकडे चित्रपटजगतातील काही ‘नाम’वंतांना डोळ्यांतले अश्रू आवरता आवरत नाहीयेत्. दुष्काळ पाचवीला पूजलेल्या शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेल्या आत्महत्येच्या परिस्थितीने त्यांची मनं हेलावली आहेत. असे असताना, या राज्यातल्या क्रिकेटजगतातील लोकांना मात्र, एखाद्या सामन्यातून मिळालेली रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीत जमा करण्याची सूचना करण्याची वेळ न्यायालयावर येते, याहून दुर्दैव दुसरे ते काय असणार? त्यामुळे, गावस्कर अन् द्रविडसाहेब, तुम्ही चालू द्या तुमचा खेळ. तसेही क्रिकेट बंद करून कसं चालेल? तो तर तुमच्या-आमच्या- सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! राहिला प्रश्‍न आम्हा दुष्काळग्रस्तांचा, तर आमचं आम्ही बघून घेऊ. गरज पडली तर आम्ही आमचं जगणं थांबवू. पण, क्रिकेटचा खेळ कुठल्याही अडथळ्याविना पार पडला पाहिजे. दुष्काळाचा क्रिकेटशी काय संबंध, असा प्रश्‍न आपणच विचारू शकता गावस्करसाहेब. मूर्ख आहेत ते लोक, जे मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाने अस्वस्थ होत कोर्टात धाव घेताहेत. बळीराजाच्या नशिबी आलेल्या वेदना त्यांनी न्यायालयात मांडल्या म्हणून निदान इथे दुष्काळ असल्याची जाणीव तरी सार्‍या देशाला झाली. अन्यथा लोक तसेही तुमच्या संगतीने क्रिकेटच्या रंगात रंगायला तयार झाले आहेतच. पावसाच्या बरसण्याचं काय, नंतरही बघता येईल कधीतरी. क्रिकेटच्या मैदानावरील चौकार, षट्‌कारांची बरसात अधिक महत्त्वाची, नाही का द्रविडसाहेब?
खरे आहे गावस्करसाहेब तुमचे म्हणणे. काही लोक ऊठसूठ त्या आयपीएलच्या मागे लागतात. काय आहे ना साहेब, आयपीएल हा इथल्या काही लोकांनी मांडलेला क्रिकेटचा बाजार असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. त्या आडून लोकांच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा उठवण्याचा कुणाचातरी डावही एव्हाना जगजाहीर झाला आहे. मूठभर लोकांचे त्यातून साधणारे हितही आताशा उजेडात आले आहे. क्रिकेटपायी वेडे होणारे लोक आम्ही. पण, या देशातल्या राजकारण, उद्योग आणि चित्रपटजगतातील काही लोकांनी पाऽऽर धंदा करून टाकला आमच्या त्या वेडाचा. या धंद्यामुळे खिसे भरून वाहू लागलेला पैशाचा ओघच त्यांना सभोवतालची दुष्काळी परिस्थिती विसरायला भाग पाडतो. ज्याची जगाच्या पाठीवर कुठेही नोंद होत नाही, अशा आयपीएलचा एक सामना इथून दुसरीकडे गेला, तर राज्याच्या तिजोरीत जाणार्‍या कराचे नुकसान होईल ही भाषा, क्रिकेटच्या धंद्यातून कमावलेल्या पैशातूनच कुणाच्यातरी तोंडी आली आहे. ‘‘राज्यातला दुष्काळ गंभीरच. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या करावी ही बाबही दुर्दैवीच. पण त्याचा क्रिकेटशी काय संबंध?’’ हा गावस्करांना पडलेला प्रश्‍न क्रिकेटपटूंचे कोडगेपणा स्पष्ट करणारा आहे. तसं पाहिलं तर मग मुंबईत राहणार्‍या नाना पाटेकरांचा तरी मराठवाड्यातल्या दुष्काळाशी काय संबंध? पण, उगाच टेन्शन घेतात ते तिथल्या दुष्काळी परिस्थितीचं. उगाच जीव कासावीस होतो त्यांचा शेतकर्‍यांच्या विधवांचे उदासवाणे चेहरे बघितले की. त्यांना नाही ना जमलं साहेब, तुमच्यासारखं कोडगेपणानं वागत आपल्याच विश्‍वात रमणं. त्यामुळे तुम्ही चालू द्या तुमचं. शेतकर्‍याचं काय, तो मेला तरी चालेल, पण क्रिकेट कुठल्याही स्थितीत बंद पडता कामा नये. लोडशेडिंगमुळे गावंच्या गावं अंधारात राहिली तरी चालतील, पण क्रिकेटचा खेळ रात्रीच्या वेळी लख्ख उजेडातच व्हायला हवा. इकडे पिण्यासाठी पाणी नसलं तरी चालेल, पाण्यासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीवर लाठ्या बरसविण्याची वेळ पोलिसांवर आली तरी चालेल, पण बीअर तयार करणार्‍या कारखान्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, याची काळजी प्रशासनातले अधिकारी घेतातच की! सामान्य माणसावर उद्भवलेल्या परिस्थितीशी त्यांनातरी कुठे काय घेणेदेणे असते? तुमचाही सवाल थोड्याफार फरकाने त्याच वळणावर जाणारा आहे. स्वत:च्याच विश्‍वात रमलेल्या, उर्वरित जगाशी नाते नसलेल्या लोकांच्या तोंडी शोभावा असा. 
गेल्या तीन वर्षांपासून या सार्‍या परिसरावर निसर्गाची अवकृपा होतेय्. पाऊस नेहमीपेक्षा कमी पडतोय्. जेव्हा हवा, नेमका तेव्हा तो येत नाही आणि जेव्हा नको तेव्हा मात्र तो हमखास बरसतो. पेरण्यांच्या वेळी बरसावा म्हणून आस लावून बसावं, तर तो खात्रीने दगा देतो अन् कापणीच्या वेळी नको असताना मात्र तो तेवढ्याच दमदारपणे धो धो कोसळतो. यात कुणाचाच दोष नाही हे मान्यच. निसर्गाचा लहरीपणा मानवी शक्तीच्या मर्यादेपलीकडचा आहे, हेही खरंच. पण, उद्भवलेल्या स्थितीत कसं वागायचं, हे ठरवणं तर माणसांच्या हातात आहेच ना, गावस्कर सर! तुम्ही मुंबईत राहा की खान्देशात. चित्रपटक्षेत्रात वावरा की मग क्रिकेटच्या. पण, प्राप्त परिस्थितीत माणूस म्हणून कसं वागायचं, हे तर ठरवता आलं पाहिजेच ना प्रत्येकाला? माणसांना माणुसकीच्या पातळीवर उतरता आलं ना, की मग दुष्काळाचा क्रिकेटच्या खेळाशी काय संबंध, हा प्रश्‍नच मनात उद्भवणार नाही इथे कुणाच्या. अडचणीत असलेल्या समाजातल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचीच भाषा असेल प्रत्येकाच्या ओठावर. त्यांना मदत करा, हे सांगायला मग कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची गरज उरणार नाही. आणि खरंच सांगा गावस्कर, द्रविडसाहेब, त्या पाटेकरांच्या नाना अन् अनासपुरेंच्या मकरंदाला तरी कोणत्या न्यायालयाने आदेश दिलेत हो, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे? अलीकडच्या काळात कित्येक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत शेतकर्‍यांच्या मदतीसाठी, न्यायालयाने एका शब्दाने त्यांना काही सुचवलेले नसताना; आणि लोकांच्या जिवावर कोट्यवधी रुपये कमावणार्‍या क्रिकेट संस्थांना मात्र दुष्काळग्रस्तांना मदत करा, असे सांगावे लागते न्यायालयाला? परिस्थिती लक्षात घेऊन चार-दोन सामने दुसरीकडे घ्यायला सांगितलं तर एवढा संताप व्हावा या राज्यातल्या क्रिकेटपटूंचा? ज्यांना या महाराष्ट्रानं ‘आपले’ खेळाडू म्हणून कायम डोक्यावर घेतलं, त्यांच्या लेखी त्यांच्या महाराष्ट्रातली दुष्काळाची गंभीर स्थिती इतकी कवडीमोल ठरावी, ही बाब दुर्दैवीच म्हटली पाहिजे आणि राहिला प्रश्‍न आयपीएलचे सामने दरवेळी वादग्रस्त ठरवले जाण्याचा, तर त्याला जबाबदार कोण, याचा शोध या क्रिकेटपटूंनीच घेतला पाहिजे. आज दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यात उद्भवली असली, तरी त्याचा सामना करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्याचा क्रिकेटशी काय संबंध, क्रिकेटची मॅच न खेळल्याने प्रश्‍न सुटतील का, असले प्रतिप्रश्‍न विचारण्याची ही वेळ नव्हे. सार्‍या जगाचा पोशिंदा आपल्या अस्तित्वाची लढई लढत असताना, त्याच्या वेदना अव्हेरून कुणाला क्रिकेटच्या आनंदात रममाण व्हावेसे वाटणे, केवळ अयोग्यच. आम्ही ज्यांना कायम डोक्यावर घेतले, त्या जबाबदार क्रिकेटपटूंकडून तरी असले वागणे अपेक्षित नाही. अन्यथा, तुम्ही कशाला क्रिकेट खेळणे थांबवता, आम्हीच आमचे जगणे थांबवतो, असे म्हणण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर येईल...! 

No comments:

Post a Comment