Thursday, July 16, 2015

अन्यथा, या तमाशाला अंत नाही


कोणीही उठतो अन् यांच्या क्रिकेटवरील अफाट प्रेमाचा बाजार मांडून जातो? तरी यांना कानोकान खबर लागत नाही? संबंध काय हो शरद पवारांचा क्रिकेटशी? कोण ती प्रिती झिंटा, चित्रपट जगतात मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर क्रिकेटची एक टीम विकत घेते आणि आम्ही मूर्ख लोक तिची टीम जिंकावी म्हणून मैदानाबाहेर राहून जीवाचे रान करतो? शाहरूख खान त्याच्या आयुष्यात क्रिकेट कधी खेळला होता ठावूक नाही, पण कुठलीशी टीम विकत घेऊन तोही कोट्यवधी रुपयांचा धंदा करून जातो. बरं या हुश्शार लोकांनी व्यापाराची गणितंच अशी काही मांडलेली की यांच्या खिशात जाणार्‍या कमाईत बाधा ती नाहीच. टीम हरली काय किंवा जिंकली काय, यांचे नुकसान नाही ते नाहीच. नफ्याचे एवढे चांगले गणित ठावूक असल्यावर कोण उतरणार नाही या धंद्यात? अशात सटोड्यांनी थेट खेळाडूंनाच हाताशी धरून त्याचा गैरफायदा उचलला तर दोष कोणाला द्यायचा?

ज्याच्या मागे लोक वेडे झाले आहेत, ज्यासाठी लोक खिशातल्या पैशाची अक्षरश: उधळण करतात आणि तरीही ज्याची इतिहासात कुठेही नोंद होत नाही, अशा क्रिकेटच्या आयपीएल नामक बाजारातील एक धगधगते वास्तव नव्याने अधोरेखित झाले आहे. जो खेळ लोक निखळ आनंद मिळवण्यासाठी बघतात, जो सामना बघायला लोक स्वत:चा किंमती वेळ देऊन जातात, तो क्रिकेट नावाचा खेळ मैदानावरच्या खेळाडूंनी मात्र पैशाचा अन् त्यांच्या साथीला उभ्या राहिलेल्या सटोड्यांनी पाऽऽर जुगाराचा करून टाकला असल्याचे हे धगधगते वास्तव आहे. पैशाचा खेळ मांडून आधीच निकाल ठरवायचे, कोणत्या चेंडूवर कोण बाद होईल अन् कोणत्या चेंडूवर चौकार हाणला जाईल हेही ठरवून ठेवायचे, अन् लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटावर स्वत:चे खिसे भरायचे असा हा ‘गेम’ गेली काही वर्षे या देशात सातत्याने सुरू आहे. प्रिमिअर लीगच्या सामन्यांमध्ये चौकार, षटकारांची बरसात करून रग्गड पैसा कमावून गब्बर झालेले खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशसारख्या टीमसमोर धाराशायी का होतात हेच कळत नाही. बहुधा आयपीएलसारखी तिकडे दर चौकार, षटकारामागे पैशाची तितकीशी उधळण होत नसल्याने तसे होत असावे कदाचित!
राजकारण, चित्रपट आणि उद्योग जगतातील मंडळींनी एकत्र येऊन क्रिकेट रसिकांच्या खिशात हात घालण्यासाठी रचलेल्या या डावात रसिकवर्ग केव्हाच गारद झाला. त्याला कळलेही नाही, तो कसा मूर्ख बनला ते. तो आपला खेळाचा आनंद लुटत राहिला. फारतर गल्लीतल्या एखाद्या सामन्याएवढेच महत्त्व असलेला पण, मोठ्या खेळाडूंच्या सहभागामुळे नको तेवढे महत्त्व प्राप्त झालेल्या आयपीएलच्या पन्नास-पन्नास, सत्तर-सत्तर सामन्यांच्या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार स्वत:च्या कामाचे वेळापत्रक ठरवू लागला. एरवी एका बाजूला उभे राहून विरोधकांशी लढणार्‍या भारतीय टीमधील क्रिकेटवीर इथे एकमेकांविरुद्ध लढताना बघून आनंदाने टाळ्या पिटू लागला. पण, हा खेळ, नुसता खेळच नाही, तर निकालासह सारी स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आयोजित होते, यासारखा दुसरा विनोद नाही अन् क्रिकेट रसिकांची यासारखी दुसरी फसवणूकही नाही.
सुमारे दोन वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली आणि आयपीएल सामन्यांचे बिंग फुटू लागले. फक्त आणि फक्त पैशासाठीच खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेचे आणखीही काही पैलू उघड झाले. लोकांच्या भावनांचा खेळ करून चाललेला जुगार अधिकच स्पष्ट झाला. पैसा कमावण्यासाठी मैदानाबाहेर चालणारी या खेळाडूंची ‘दुकानदारी’ उघड झाली. कधीकाळी चेन्नई सुपर किंग्ज नामक संघाचा चेहरा असलेला, अविभाज्य भाग मानला गेलेला गुरूनाथ मयप्पन क्रिकेटच्या संदर्भात लागणार्‍या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावायचा म्हणे! आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार्‍या श्रीनिवासन यांचे जावई असण्याचा पुरेपूर ‘लाभ’ गुरूनाथ मयप्पन यांनी उचलला होता. राजस्थान रॉयल्स संघाशी संबंधित राज कुंद्रा यांनीही तोच धंदा चालवला होता.
क्रिकेट रसिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची लूट केल्यानंतर या दोघांवर आलेली बंदी तशी तकलादूच म्हटली पाहिजे. हे खरे आहे की एका माजी न्यायमूर्तींनी केलेल्या चौकशीतून निदान आरोप तरी ठेवले गेलेत या चोरांवर. पण, मुळात त्यांनी केलेली जनतेची फसवणूक आणि लुटीसाठी बंदी ही शिक्षा असूच शकत नाही. काय बिघडणार आहे त्या बंदीमुळे मयप्पन आणि कुंद्राचे? ज्या दोन क्रिकेट संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे, त्या चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघाचे तरी काय वाकडे होणार आहे या बंदीमुळे? हा नाही तर तो धंदा करतील हे लोक. या नाही तर त्या संघाकडून खेळतील ते खेळाडू. लोकांची लूट करूनही ते आपले मोकळेच! बंदी घातल्यानं कुणाचा जुगार थांबणार आहे की कुणाचे क्रिकेट खेळणे? नको तेवढा धिंगाणा घालून, लोकांची लूटमार करून हे लोक केवळ बंदीची नावापुरती ‘शिक्षा’ भोगून ‘मोकळे’ होणार असतील आणि आम्ही बापुडेही त्यातच समाधान मानणार असू, तर मग ‘शिक्षा’ या संकल्पनेचे संदर्भच बदलावे लागतील आपल्याला. कोण कुठला मयप्पन सासर्‍याच्या भरवशावर क्रिकेट विश्‍वात प्रवेश काय करतो, त्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान काय प्राप्त करतो, स्वत:च्या आणि सासर्‍याच्या प्रतिष्ठेचा गैरवापर करून पैसा काय कमावतो, लगोलग श्रीमंत काय होतो, श्रीमंतीचा वेग अधिक वाढवण्यासाठी रचलेल्या डावात सहभागी काय होतो, सारेच अजब आहे. आणि कोडगेपण बघा केवढे? ज्यांच्या छुप्या परवानगीने हा सारा प्रकार घडून आला, ज्यांचा या सार्‍या गोरखधंद्याला छुपा पाठिंबा होता, ज्यांनी भारतीय क्रिकेटरसिकांच्या भावनेची या जुगाराच्या माध्यमातून कायम अवहेलना केली, ते बीसीसीआयचे तमाम पदाधिकारी आता न्यायालयाच्या यासंदर्भातील आदेशाचा आदर करण्याची भाषा बोलताहेत! अन् ज्यांनी प्रत्यक्षात चोर्‍या केल्या, ते वरच्या न्यायालयात दाद मागण्याची गुर्मी दाखवताहेत.
या तमाशाला भारतीय क्रिकेट रसिक अधिक जबाबदार ठरवले गेले पाहिजे. कोणीही उठतो अन् यांच्या क्रिकेटवरील अफाट प्रेमाचा बाजार मांडून जातो? तरी यांना कानोकान खबर लागत नाही? संबंध काय हो शरद पवारांचा क्रिकेटशी? कोण ती प्रिती झिंटा, चित्रपट जगतात मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर क्रिकेटची एक टीम विकत घेते आणि आम्ही मूर्ख लोक तिची टीम जिंकावी म्हणून मैदानाबाहेर राहून जीवाचे रान करतो? शाहरूख खान त्याच्या आयुष्यात क्रिकेट कधी खेळला होता ठावूक नाही, पण कुठलीशी टीम विकत घेऊन तोही कोट्यवधी रुपयांचा धंदा करून जातो. बरं या हुश्शार लोकांनी व्यापाराची गणितंच अशी काही मांडलेली की यांच्या खिशात जाणार्‍या कमाईत बाधा ती नाहीच. टीम हरली काय किंवा जिंकली काय, यांचे नुकसान नाही ते नाहीच. नफ्याचे एवढे चांगले गणित ठावूक असल्यावर कोण उतरणार नाही या धंद्यात? अशात सटोड्यांनी थेट खेळाडूंनाच हाताशी धरून त्याचा गैरफायदा उचलला तर दोष कोणाला द्यायचा? अन् घडलेही तेच. लोक इकडे बॉलरने टाकलेला एकेक बॉल श्‍वास रोखून बघत राहिले अन् तो तिकडे त्याच बॉलवर खोर्‍यानं पैसे कमावीत राहिला. आम्ही आपली नित्याची कामं सोडून आमच्या आवडत्या खेळाडूच्या चौकार, षटकारांवर फिदा होत राहिलो, नंतरचा कित्येक वेळ त्यावरील चर्चेत घालवीत राहिलो, अन् ते बेटे त्यावरून फायद्याचा हिशेब करीत राहिले.
ज्याची जगात कुठेही नोंद होत नाही, ज्याचा कुठेही रेकॉर्ड ठेवला जात नाही, ज्या सामन्यांमधील शतक, अर्धशतकाला काडीची किंमत नाही, त्या स्पर्धांवर जीव ओवाळून टाकणारे, वेळ आणि पैसा व्यर्थ घालवणार्‍या लक्षावधी लोकांना मूर्खात काढायचे नाही, तर आणखी काय करायचे? समजून उमजून मूर्खासारखे वागणार्‍यांना लुटण्याचा प्लॅन तयार करणार्‍यांना तरी काय दोष द्यायचा मग? आयपीएलच्या आयोजकांनी याच्या पलीकडे दुसरे काय केले?
ही सारी मिलीभगत आहे. एखाद्दुसरा कुणीतरी पकडला गेला म्हणून, नाही तर ही लबाडी अजून कितीतरी वर्षे तशीच सुरू राहिली असती. आता कुणीतरी एखादा पकडला गेला म्हणून बाकीच्यांना काही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त होत नाही. तेही तेवढेच लबाड आहेत. मैदानावर खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूच्या हालचालींवरून बाहेर पुढच्या क्षणाच्या सट्‌ट्याची बोली लावणार्‍या लोकांना मैदानावरचे लोक सामील नाहीत, असे होऊच शकत नाही. दुर्दैव फक्त एवढेच आहे की आम्हीच त्या खेळाडूंच्या मागे वेडेपणाने धावत सुटतो. फसवेगिरीची कल्पना असतानाही सामन्यांची घोषणा होताच त्याची तिकिटे मिळविण्यासाठी गर्दी करतो. या फसवेगिरीला बळी न पडण्याचा निर्धार ज्या दिवशी भारतीय क्रिकेट रसिक ठामपणे घेतील, त्या दिवशी लोकांच्या लूटमारीचा हा नंगानाच थांबेल. अन्यथा या तमाशाला अंत नाही.

Friday, July 10, 2015

राणे निघाले लढाईला...!

राणेसाहेब, एक करा. आता मशाल खांद्यावर घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धच्या वारीला निघालाच आहात, तर जरा एकदा मागे वळून बघा. कोळसा घोटाळ्यातले डॉ. मनमोहनसिंग, कॉमन वेल्थ घोटाळ्यातले सुरेश कलमाडी, आदर्श घोटाळ्यातले अशोकराव, शेतकर्‍यांना लूटणारे आमदार, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी आलेल्या निधीतूनही खिसे भरणारे, भाकड गायी शेतकर्‍यांच्या माथी मारून निधी घशात घालणारे तत्कालीन मंत्री, कोट्यवधी रुपये खर्च करूनही तलावांची कामे अपूर्ण राहिल्याची जराही खंत न बाळगणारे अजितदादा.... आणि हो! ते आपले छगन, सुनील, गुलाबराव, सुरेशदादा, यांपैकी कुणी आपल्या या लढाईत सहभागी होतात का बघा. घ्या त्यांनाही आपल्या या लढ्यात सहभागी करून. जरा साद घाला पक्षातल्या सार्‍या सवंगड्यांना. म्हणावं या, सहभागी व्हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत. आता घोटाळा करून ‘आदर्श’ बनलेले अशोकराव अन् दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनासाठी मुंबईत एफएसआय देण्याची अभिनव कल्पना मांडणारे छगनराव या लढाईत कोणत्या तोंडाने सहभागी होतील, हा प्रश्‍न आहेच. पण, तसे असेल ना राणेसाहेब, तर मग तुम्हीही ही लढाई लढण्याच्या भानगडीत पडू नका. कारण स्वकीय भ्रष्टाचार्‍यांच्या या गर्दीत विरोधकांवर तुटून पडण्याचे बळ गवसणार नाही बघा तुम्हाला! आणि तसे झाले तर फुसका बार व्हायचा तुमच्या त्या आवेशाचा अन् लढाईचाही...


नारायण राणे बोलले. हो! दस्तुरखुद्द राणेसाहेब बोलले. म्हणाले, सारे मंत्री भ्रष्ट आहेत महाराष्ट्रातले. आता स्वत: राणेसाहेब बोलताहेत म्हटल्यावर त्यावर आक्षेप कोण नोंदवणार? गेल्या नजीकच्या काळात विधानसभेच्या दोन दोन निवडणुकी हरल्यामुळे तसेही साहेबांचे राज्याच्या कारभाराविषयीचे, कार्यपद्धतीबद्दलचे चिंतन काहीसे वाढलेले, अधिक गहिरे झालेले असणार. ज्या विलासरावांच्या, ज्या अशोकरावांच्या, ज्या पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वात त्यांनी मंत्री म्हणून काम केले, त्या काळातील एकाही भ्रष्टाचाराची नोंद साहेबांनी कधी घेतल्याचे स्मरत नाही. पण, सध्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमधील भ्रष्टाचाराचे मात्र साहेबांना अल्पावधीतच बरेच आकलन झालेले दिसते. अर्थात, म्हणून कालपर्यंतच्या भ्रष्टाचाराकडे त्यांनी कानाडोळा केल्याचा निष्कर्ष कुणी काढू नये. त्यांच्या तेव्हा मौन साधण्यावर किंवा आताच्या बरळण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया उमटणारच. साहेब त्यांच्या शैलीत त्या आरोपांचा सोक्षमोक्षही लावतील, याबाबतही कुणाच्या मनात शंका नाही. जे सोनिया गांधींना खडे बोल सुनावताना मागेपुढे पाहत नाहीत, कशाची म्हणून तमा बाळगत नाहीत, त्यांनी विरोधी पक्षाच्या सरकारवर कोरडे ओढताना कुणाची पत्रास बाळगण्याचे कारणच नाही मुळी! त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धची त्यांच्या मनात असलेली चीड, त्यांच्या मनातला प्रचंड संताप जर आता व्यक्त होणार असेल, तर तो थोपवून धरण्याची इथे कुणाचीही बिशाद नाही, हेच खरे! महाराष्ट्रभर दौरे करून, आरोपांचा तुफान मारा करून सरकारला सळो की पळो करून सोडण्याच्या त्यांनी जाहीर केलेल्या निर्धाराचीही दखल सार्‍या महाराष्ट्राला आता घ्यावीच लागणार आहे...
भाजपा-सेनेच्या नेत्यांना राज्य करता येत नाही, असा दावा आहे साहेबांचा! हे जर खरं असेल, इथे फक्त आणि फक्त कॉंग्रेसलाच राज्यकारभार चालवता येतो, असाही ओघानेच त्यांचा दावा असेल, तर खरंच सांगा राणेसाहेब, पंधरा वर्षांची सत्ता हातून का गेली मग तुमच्या? इतकी वर्षे मुजोरी करूनही कोकणातल्या निवडणुकीत पराभव का वाट्याला आला तुमच्या? आता परवाच्या मुंबईतल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांचा नकार का पदरात पडला तुमच्या? पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद पदरी पडण्याचं जवळपास नक्की झालं असताना माशी कुठे शिंकली नेमकी? बांद्र्यातल्या निवडणुकीत आपल्या विजयाच्या आड नेमके कोण आले होते, याची पुरेपूर कल्पना आली असेल ना, राणेसाहेब एव्हाना आपल्याला?
अजून स्वत:च्या पक्षाच्या घाणेरड्या राजकारणातून बाहेर पडू न शकलेले राणेसाहेब, जेव्हा इतर पक्षातल्या बारा भानगडींबाबत, तिथल्या गटबाजीबद्दल बोलू लागतात, तेव्हा तो विषय आपसूकच विनोदाचा होऊन जातो आणि राहिला प्रश्‍न भ्रष्टाचाराचा, तर त्याविरोधात बोलण्याचा आपल्याला किती नैतिक अधिकार आहे, याची चाचपणी करून घ्यावी साहेबांनी एकदा. एका गरीब शेतकर्‍याकडून पैसे उकळणार्‍या आपल्या आमदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुखांना न्यायालयाने चपराक हाणली ती, पदाचा गैरवापर केला म्हणून, हे काय राणेसाहेबांना ठाऊक नाही? त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या प्रदेशाध्यक्षांना त्या वेळी मुख्यमंत्रिपदावरून ज्या आरोपावरून हाकलण्यात आले, तो आदर्श घोटाळा म्हणजे काय सुवर्णपदक देऊन गौरव करावा अशी कामगिरी होती राणेसाहेब? मग त्या वेळी भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविण्याची भाषा बोलला नाहीत आपण कधी? मंत्रिमंडळातले आपले स्थान कायम राखण्याच्या, जमलंच तर मुख्यमंत्रिपद मिळविण्याच्या धडपडीत मशगूल राहिलात आपण तेव्हा. त्यामुळे सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या नावावर आदर्श घोटाळ्यात मुंबईतील महागड्या सरकारी जमिनीची खाजगी रीत्या झालेली सामूहिक लूट आणि ती लाटणार्‍यांच्या राजकीय नेते-सरकारी अधिकार्‍यांच्या गर्दीचा बरा विसर पडला आपल्याला? अगदी परवा-परवापर्यंत ज्यांच्या नेतृत्वात आपण काम केलंत, त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कामाची ‘गती’ काय अगदीच स्पृहणीय होती? आताच्या सरकारला सामान्य माणसाच्या विकासाशी काही घेणेदेणे नाही, असे आपले मत असेल, तर चव्हाणांच्या नेतृत्वात त्या सामान्य माणसाची खूप प्रगती झाल्याचा दावा आहे की काय आपला? आणि त्याही वेळी सामान्य माणसावर होणार्‍या अन्यायाविरुद्धचा आपल्या मनातला संताप जाहीरपणे व्यक्त झाल्याची उदाहरणे वानगीपुरतीही सापडत नाहीत हो राणेसाहेब! आणि सत्ता हातून जाताच लागलीच जनहिताचे गोडवे गाऊ लागलात आपण? अचानक लोकांच्या कामांचे स्मरण झाले आपल्याला? तुमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे अकार्यक्षम असतील, तर मग पृथ्वीराज चव्हाणांना काय त्यांच्या कर्तबगारीचे बक्षीस दिले लोकांनी त्यांच्या हातून सत्ता हिसकावून? महानगरपालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंनी मुंबई बकाल केल्याचा आपला आरोप असेल, तर कालपर्यंत राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसने त्या शहरासाठी काय केले, याचा आलेख मांडता येईल राणेसाहेब तुम्हाला कधीतरी? ऊठसूठ तुम्ही ठाकरेंना अकार्यक्षम ठरवायचे अन् त्यांनी तुम्हाला ‘कोंबडीचोर’ म्हणून हिणवायचे, या असल्या दर्जाहीन भांडणात इथे कुणालाच रस नाही. लोकांना राजकारणाची तर्‍हा पुरती ठाऊक आहे त्यांच्याही अन् तुमच्याही. त्यांना राजकारण करता येत नसल्याचा, तुमच्या भाषेत त्या दृष्टीने ते अगदीच बालिश असल्याचा तुमचा आरोप असेल, तर कणकवलीतल्या कालपर्यंतच्या निवडणुकी तुम्ही काही गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने जिंकलेल्या नाहीत, हेही सर्वज्ञात सत्य आहे.
प्रश्‍न तो नाहीच. प्रश्‍न आहे तुम्ही हाती घेतलेल्या मोहिमेचा. प्रश्‍न आहे, तो तुम्ही स्वीकारलेल्या व्रताचा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचा. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा? जे कालपर्यंत भ्रष्टाचारात आकंठ बुडाले होते, त्या कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याचा भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार? शोभत तर नाहीच, पण विश्‍वासही बसत नाही ना राव! कॉंग्रेस कुठे, साधनशुचिता कुठे? राणे कुठे, भ्रष्टाचाराला विरोध कुठे? कशाचा कशाशी काही संबंध?
राणेसाहेब, एक करा. आता मशाल खांद्यावर घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धच्या वारीला निघालाच आहात, तर जरा एकदा मागे वळून बघा. कोळसा घोटाळ्यातले डॉ. मनमोहनसिंग, कॉमन वेल्थ घोटाळ्यातले सुरेश कलमाडी, आदर्श घोटाळ्यातले अशोकराव, शेतकर्‍यांना लूटणारे आमदार, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी आलेल्या निधीतूनही खिसे भरणारे, भाकड गायी शेतकर्‍यांच्या माथी मारून निधी घशात घालणारे तत्कालीन मंत्री, कोट्यवधी रुपये खर्च करूनही तलावांची कामे अपूर्ण राहिल्याची जराही खंत न बाळगणारे अजितदादा.... आणि हो! ते आपले छगन, सुनील, गुलाबराव, सुरेशदादा, यांपैकी कुणी आपल्या या लढाईत सहभागी होतात का बघा. घ्या त्यांनाही आपल्या या लढ्यात सहभागी करून. कसं आहे ना राणेसाहेब, दरवेळी तुम्हाला एकटं पाडण्याची तर्‍हा आहे यांच्या राजकारणाची. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीची वेळ आली की तुम्ही पडता बाजूला! प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळीही तुम्ही आपले बाजूलाच. बांद्र्यात निवडून न येण्याची खात्री असताना मात्र, तोफेसमोर द्यायला नाव नारायण राणेंचं. तेव्हा यावेळी सावध व्हा! जरा साद घाला पक्षातल्या सार्‍या सवंगड्यांना. म्हणावं या, सहभागी व्हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत. आता घोटाळा करून ‘आदर्श’ बनलेले अशोकराव अन् दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनासाठी मुंबईत एफएसआय देण्याची अभिनव कल्पना मांडणारे छगनराव या लढाईत कोणत्या तोंडाने सहभागी होतील, हा प्रश्‍न आहेच. पण, तसे असेल ना राणेसाहेब, तर मग तुम्हीही ही लढाई लढण्याच्या भानगडीत पडू नका. कारण स्वकीय भ्रष्टाचार्‍यांच्या या गर्दीत विरोधकांवर तुटून पडण्याचे बळ गवसणार नाही बघा तुम्हाला! आणि तसे झाले तर फुसका बार व्हायचा तुमच्या त्या आवेशाचा अन् लढाईचाही...

Friday, July 3, 2015

कुलदीपकाच्या हट्‌टापायी...!


सारा देश विकास, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, जीडीपीच्या आकड्यांच्या रंगात रंगला असताना, आमच्या गाव-खेड्यातले चित्र मात्र अजूनही शौचालयाचा वापर अन् वंशाचा दिवा जन्माला घालण्याच्या विषयांभोवतीच फिरत राहिले असल्याचे दुर्दैवी, पण धगधगते वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. निदान आमच्या घरात तरी मुलीचा जन्म नको म्हणून चाललेल्या पुरुषप्रधान धडपडीत, वर्षाकाठी पन्नास हजार मुलींचे अस्तित्व आईच्या गर्भातच संपविणारी जमात आमची; तरी चावडीवरच्या प्रगतीच्या गप्पा संपता संपत नाहीत आमच्या. विचारांचे मागासलेपण बगलेत बांधून हिंडताना गरुडभरारीच्या वल्गना करत सुटतो आम्ही! आदिवासी म्हणवणार्‍या गडचिरोलीत मुलींचा जन्मदर समाधानकारक अन् मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मात्र तो कमालीचा घसरलेला? कुणाला प्रगत आणि कुणाला अप्रगत म्हणायचे? कुणाला सुशिक्षित म्हणायचे अन् कुणाला अशिक्षित म्हणून हिणवायचे?
चार भिंतींच्या आत चार पुस्तकं वाचली, की माणसं मोठी होतातच असं नाही, हेच खरं! क्रांती घडली, माणसाचे विचार बदलले, बदललेले विचार कृतीत उतरले, त्यातून प्रगती साधली गेली, अपेक्षित परिवर्तन घडून आले, तरच त्या शिक्षणाला अर्थ. दुर्दैवाने शिक्षणातून घडून आलेले असले परिवर्तन सहसा अनुभवायला मिळत नाही. शिकली सवरलेली माणसं जेव्हा अडाण्यांसारखी, बेताल वागू लागतात, तेव्हा शिक्षणव्यवस्थेची त्यांनी लावलेली वाट अधिकच अधोरेखित झालेली असते. अशा वेळी जुन्या परंपरेची री ओढणेही सुरूच राहते अन् कालबाह्य विचारांचे काहूरही मनात तसेच घोळत राहते. काळ झपाट्यानं बदलत चालला आहे. कालच्या झोपड्यांची जागा आजच्या गगनचुंबी इमारतींनी घेतली, गावाकडे जाणार्‍या मातीच्या रस्त्यांच्या जागी सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आले, सरकारी एसटीची जागा खाजगी कारने घेतली, लोकांचा रस्ता अडवून घरासमोर टाकलेल्या मांडवात लागणारे लग्न आता दिमाखदार मंगल कार्यालयात लागू लागले, अंगावरचे कपडेच नाही, तर पायातल्या बुटांचेदेखील ब्रॅण्डस् बदलले, अगदी हातातल्या सेलफोनच्या स्क्रीनचे कलर्ससुद्धा बदलले, तरीही मनातल्या विचारांचे बुरसटलेपण मात्र तसेच कायम राहिले आहे! कार, बंगला, कपडे, इतर सार्‍या भौतिक बाबी, ज्या आमच्या दृष्टिने प्रगतीचे मापदंड आहेत, त्या खोट्या मापदंडांच्या मागे धावताना वास्तविक विकासाची कास आम्हाला कधी धरताच आली नाही...
घरात वंशाचा दिवा हवाच, या दुराग्रहापायी घरात चौदा मुली जन्माला घालणार्‍या कुटुंबाच्या कोणत्या प्रगतीची गाथा गायची अन् त्यांच्या कोणत्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करायचे? एकीकडे मध्यप्रदेश सरकार मुलींचा जन्म लोकांनी स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या योजना जाहीर करते, तिच्या शिक्षणाचा खर्च उचलते, तिच्या लग्नाची तजवीज म्हणून लाखभर रुपयांचे डिपॉझिट मायबापाच्या स्वाधीन करते, खुद्द पंतप्रधान मुलींना शिकविण्यासाठी सार्‍या देशानं पुढाकार घ्यावा अशी ‘मन की बात’ करतात आणि या देशातल्या बीड नावाच्या गावात मुलींचे गर्भ पाडण्याचा विक्रम एका डॉक्टरच्या नावे नोंदविला जातो? झरीभुजी नावाच्या गावात मुलाच्या हव्यासापायी अठरा वर्षांत चौदा मुलींना जन्माला घालण्याचा प्रकार एका कुटुंबात घडतो? काय तमाशा चाललाय् हा? कुठे चाललो आहोत आम्ही? सारा देश विकास, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, जीडीपीच्या आकड्यांच्या रंगात रंगला असताना, आमच्या गाव-खेड्यातले चित्र मात्र अजूनही शौचालयाचा वापर अन् वंशाचा दिवा जन्माला घालण्याच्या विषयांभोवतीच फिरत राहिले असल्याचे दुर्दैवी, पण धगधगते वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. निदान आमच्या घरात तरी मुलीचा जन्म नको म्हणून चाललेल्या पुरुषप्रधान धडपडीत, वर्षाकाठी पन्नास हजार मुलींचे अस्तित्व आईच्या गर्भातच संपविणारी जमात आमची; तरी चावडीवरच्या प्रगतीच्या गप्पा संपता संपत नाहीत आमच्या. विचारांचे मागासलेपण बगलेत बांधून हिंडताना गरुडभरारीच्या वल्गना करत सुटतो आम्ही! आदिवासी म्हणवणार्‍या गडचिरोलीत मुलींचा जन्मदर समाधानकारक अन् मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मात्र तो कमालीचा घसरलेला? कुणाला प्रगत आणि कुणाला अप्रगत म्हणायचे? कुणाला सुशिक्षित म्हणायचे अन् कुणाला अशिक्षित म्हणून हिणवायचे?
गुजरातेतल्या दाहोड जिल्ह्यातल्या झरीभुजी नामक एका छोट्याशा गावातील एका पस्तीस वर्षीय इसमाचा हा प्रताप आहे. आपल्या घरात कुलदीपक जन्माला यावाच, या हट्टपायी लग्नानंतरच्या अठरा वर्षांच्या काळात तब्बल चौदा मुली जन्माला घालण्याचा या कुटुंबात घडलेला प्रकार, या देशात चाललेल्या विकासाच्या सार्‍या संकल्पनांवर पाणी फेरणारा आहे. ‘आता नको ते बाळंतपण,’ असे कधीतरी कंटाळून बोलून गेलेल्या बायकोला, सवत आणण्याची धमकी देत, दरवर्षी नव्या बाळंतपणाला सामोरे जायला भाग पाडणारा नराधम त्या कुटुंबात ‘बाप’ म्हणून तरी कसा वावरत असेल, याची कल्पनाही करवत नाही! वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा अन् जन्माला घातलेल्या मुलांचा सांभाळ करायला मुलगी. हीच आमच्या वैचारिक प्रगतीची ‘पातळी!’ दूषणे देत जुन्याच परंपरेची री ओढायची अन् वर पुन्हा व्यवस्थेला दोष देत शिव्यांची लाखोळी वाहायची. पहिल्या दोन मुलींची लग्नं करण्याची वेळ आली, तरी आईच्या पंधराव्या बाळंतपणाची तयारी सुरू करायची वेळ येते आणि ती इतक्यात बरीच अशक्त झाली म्हणून लोकांच्या चेहर्‍यावर मात्र चिंतेचे भाव असतात. मुलाचा अट्टहास तर आहेच, पण इतरही अनेकानेक प्रश्‍न या घटनेने निर्माण केले आहेत. जन्मदात्रीच्या आरोग्यापासून तर ज्या दोन मुलींची लग्न झालीत, त्यांच्या लग्नाच्या वयापर्यंतचे ते प्रश्‍न आहेत. सरकारी योजना, कुटुंबकल्याण योजनेचे त्यांनी वाजविलेले तीनतेरा, मुलांचे शिक्षण, त्यांचे पालनपोषण, कुटुंबाची विसकटलेली आर्थिक घडी... सर्वच बाबतीत अजून तरी सरकारी यंत्रणा या घरापर्यंत पोहोचलेली दिसत नाही.
मुळात, ‘मुलगाच हवा’ या हेक्यापायी हा प्रकार घडला आहे. अजूनही घडतो आहे. रूढी, परंपरा, कथित संस्कारांचे भूत मानगुटीवर बसलेले, अशा अवस्थेत जिच्या आगमनाची चाहूल लक्ष्मीच्या पावलांनी नोंदविण्याची कल्पना जिथे मांडली जाते, तिथे मुलीचा गर्भच संपविण्याचे षडयंत्र रचले जाताहेत. तिच्या रूपात लक्ष्मी घरात यावी, तिच्या आगमनाने भाग्य उजळावे, तिच्या अस्तित्वाने सारा आसमंत उजळून निघावा, अशी मनीषा बाळगणार्‍यांच्या गर्दीपलीकडच्या कुणीतरी हे षडयंत्र रचलेले असते, ही बाब त्याहून दुर्दैवी आहे. चौदा मुली तर आल्या आहेतच, आता त्यांचा भाऊ जगात यावा म्हणून धडपडणारे माय-बाप केवळ तिथेच थांबलेले नाहीत. चौदा बहिणींना एक भाऊ पुरेसा नाही म्हणून ते आता सोळावे अपत्य जगात आणण्याच्या तयारीत आहेत! ती माउलीही नवरोबाच्या या मताशी सहमत आहे म्हणे! खरंच कमाल आहे- त्या माउलीचीही अन् तिच्यावर असलेल्या संस्कारांच्या पगड्याचीही! फक्त खंत एवढीच आहे, की यापुढे बाळंतपण वाट्याला नको, असे ती अजूनही ठामपणे नवर्‍याला सांगू शकत नाहीय्. पंधरा अपत्यं जन्माला घातली तरी नवरा अजूनही सवत आणण्याची धमकी देतो आणि या माउलीला अजूनही त्या धमकीची भीती वाटते! त्याविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद ना तिच्यात आहे, ना कुणी तिला त्यासाठी बळ देत! सारेच अजब आहे.
अगदीच नाही असं नाही. परिवर्तन घडून येत आहे हळूहळू. पंतप्रधानांनी केवळ भावनाच व्यक्त केली, तर कित्येक बापांनी मुलीसमवेत फोटो काढून पटापट अपलोड केलेत फेसबूक, ट्विटरवर. जगभर प्रसिद्धी करून घेतली प्रत्येकाने स्वत:ची. स्वत:ला मूलबाळ नसलेले दाम्पत्यही मूल दत्तक घेताना ‘मुलगीच हवी’चा आग्रह धरू लागली आहेत अलीकडे. ऊर अभिमानानं भरून यावा अशीच भूमिका मानायला हवी ती. पण, म्हणून घरात मुलगी जन्माला आल्याची बातमी कानावर पडली की, नाक मुरडणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही अजून. ती संख्या कमी व्हायला हवी. सरकार एक लाख रुपये देते म्हणून मुलीचा जन्म स्वीकारणार्‍यांची गर्दी नको. स्वत:हून मुलगी स्वीकारण्याची भावना रुजायला हवी. मुलगी आमच्या घरात जन्माला येणार असेल, तर तिचे पालनपोषण सरकारी पैशातून का व्हावे, ते आमचे आम्हीच करू, अशी भूमिका स्वीकारणार्‍यांची संख्या वाढायला हवी. या देशात एक महिला राष्ट्रपती होऊ शकल्याचा अभिमान वृथा नाहीच; पण शहरांतल्या झोपडपट्‌टीत राहणारी मोलकरीण अजूनही दारुड्या नवर्‍याचा मार खात त्याच्या धाकातच जीवन जगत असल्याचे चित्र बदलणेही तितकेच गरजेचे आहे. मुलीला भाऊ हवाच, त्यापेक्षाही कुळाचे नाव कायम ठेवणारा ‘दीपक’ कुटुंबाला हवा, या हट्‌टापायी मुलाच्या जन्माची वाट बघत चौदा मुलींना जन्म देण्यास ठाम नकार देणारी ‘कनू’, लग्नाच्या अठरा वर्षांच्या काळात कधीतरी रामसिंग नावाच्या त्या नवर्‍याला भेटली असती, तर चित्र वेगळे राहिले असते कदाचित...!