शरीफ साहेब, थोडी तरी लाज बाळगा असली भन्नाट विधाने करताना! जरा आपल्या देशातील अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष दिलंत तर दडपशाही, अस्थिरता आणि अत्याचाराचे प्रमाण नेमके कुठे जास्त आहे, ते ध्यानात तरी येईल तुमच्या. तालिबानी स्वस्थ जगू देत नाहीत, राजकीय विरोधक शांतपणे सरकार चालवू देत नाही, धार्मिक नेत्यांनी मांडलेला उच्छाद तो वेगळाच, लष्कारातल्या अधिकार्यांचे वर्चस्व ते वेगळेच, महिलांचे सामाजिक स्वातंत्र्य बुरख्यात दडलेले अन् जनतेचे स्वातंत्र्य दहशतवाद्यांच्या मुठीत... कुठल्या स्वातंत्र्याची ग्वाही देत निघालात मिस्टर शरीफ तुम्ही काश्मिरातील जनतेला? जरा आपल्या देशातल्या राज्यकारभाराची घडी नीट बसवा अगोदर अन् मग शहाणपण शिकवा भारताला. दरवेळी आपले तेच काश्मीरचे तुणतुणे अन् स्वातंत्र्याची पिपाणी. स्वत:च्या देशातल्या समस्या सोडवता सोडवत नाहीत तुमच्यानं अन् निघालात भारतातल्या समस्या सोडवायला?
म्हणे, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस बनली आहे अन् काश्मीरला पाठिंबा देण्याशिवाय आता पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना म्हणे भारतातल्या काश्मिरात स्वातंत्र्याची पहाट उगवलेली बघायची आहे. ज्यांना गेल्या अडुसष्ट वर्षांत स्वत:च्या देशात अजून स्वातंत्र्याचे वातावरण निर्माण करता आलेले नाही आणि त्याची जराशीही लाज ज्या राज्यकर्त्यांना वाटत नाही, त्या तिथल्या तमाम दीडशहाण्यांना भारतातल्या एका प्रांतात स्वातंत्र्याची पहाट उगवणे अधिक महत्त्वाचे वाटते. मुजोरीची ही भाषा अन् वर पुन्हा ते निलाजरे वागणे, हे खरं तर भारतातील आजवरच्या राज्यकर्त्यांनी घातलेल्या खतपाण्याचे दुष्परिणाम आहेत.
फाळणीनंतरच्या काळात शकले पडून निर्माण झालेल्या बांगलादेशच्या बरोबरीने आता कुठे ज्यांना आपल्या देशाचा मानव विकास निर्देशांक नेता आला आहे, जिथे गरिबीची समस्या अजून आ वासून उभी आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून योजना आखूनही खाबुगिरी आणि भ्रष्टाचारामुळे जिथली गरिबीची समस्या संपता संपत नाहीय्, जिथली गरीब आणि श्रीमंतांमधली दरी एका मर्यादेच्या पलीकडे पोहोचलेल्या आर्थिक विषमतेची भीषण समस्या ज्या देशात गेल्या कित्येक वर्षांत जशीच्या तशी कायम आहे, जिथे धोक्यात असलेले महिलांचे स्वातंत्र्य हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरावा इतक्या गंभीर अवस्थेत असताना स्वत:ची सत्ता सांभाळण्याच्या नादात रमलेल्या राजकीय नेत्यांना त्याची जराशीही चिंता वाहण्याची गरज वाटत नाही, जिथे महिलांचे मागासलेपण ही सामाजिक समस्या होऊन बसली आहे, आरोग्याच्या सुविधांच्या अभावातून जिथे बालमृत्यूचे प्रमाण सार्या दक्षिण आशियातील सरासरीपेक्षाही अधिक झाले आहे... खरं सांगा शरीफ साहेब, भारतातील काश्मीर नावाच्या प्रांतातील स्वातंत्र्याची पहाट उगवणे हा तुमच्यासाठी या सार्या समस्यांपेक्षाही अधिक महत्त्वाचा आणि प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे?
ज्या काश्मीरला नेहरूंनी स्वतंत्र दर्जा बहाल केला, ज्याचे स्वातंत्र्य जपण्यासाठी सार्या भारतीय जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवून घटनेत ३७० कलमाचा अंतर्भाव केला, लोकांचा विरोध असताना एकाच देशात दोन प्रधान, दोन निशाण मान्य केले गेले, धरतीवरचा स्वर्ग म्हणून त्याची ख्याती झाली, तब्बल ६८ वर्षे तिथे इतर भारतीयांना उपर्यांची वागणूक मिळाली, काही स्थानिकांच्या मदतीने बोकाळलेल्या दहशतवादाने जिथल्या लोकांना बेघर केले, कित्येक वर्षे आश्रितांसारखे राहूनही त्यांच्या मनातली काश्मीरच्या भूमीबाबतची आस्था तसूभरही कमी झाली नाही, ज्या काश्मिरात पुराचे संकट आले तर सारा भारत हळवा होतो, त्याच्या मदतीला धावतो, सारे प्रशासन, सेना, पंतप्रधानांचे कार्यालय देखील मदतीसाठी सरसावते. संकटाच्या त्या काळात काश्मिरातील एकाही नागरिकाला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हाक द्यावीशी वाटली नाही की शरीफांनाही त्यांच्या मदतीला धावून जावेसे वाटत नाही. काश्मीर हा पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याची बाब तेव्हा आठवू नये शरीफांना? अन् आता मुझफ्फराबादमध्ये भाषण ठोकताना काश्मीरच्या आठवणींनी कंठ दाटून येतो त्यांचा?
लहानपणापासूनच काश्मिरातील जनतेशी आपली भावनिक बांधीलकी राहिली असल्याचे सांगत शरीफांनी काश्मीर परत मिळवण्याची भाषा वापरली आहे. हा प्रदेश पाकिस्तानचाच असल्याचा दावा केला आहे. पुन्हा एकदा तिथल्या जनतेच्या मतांची दखल घेण्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील जनतेवर होत असलेल्या कथित अन्यायाचे रडगाणे गात भारताचा असलेल्या काश्मीरच्या जनतेच्या भावनांची तरफदारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या निमित्ताने नव्याने केली आहे.
ज्यांना स्वत:चा असलेला प्रदेश इतकी वर्षे धड सांभाळता आला नाही, त्यांची शेजारच्या राष्ट्रातील एका भूप्रदेशासाठी चाललेली मखलाशी सार्या जगाने नोंद घ्यावी अशीच आहे. ज्यांना आपल्या जमिनीवरील दहशतवादाशी लढता आले नाही कधी, ते शहाणे काश्मिरातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करतात, तेव्हा तो हास्यास्पदच विषय असतो. पण, दुर्दैवाने महाशक्ती म्हणवणार्या जगातील प्रत्येकच बड्या देशांनी आजवर या असल्या फालतू, हास्यास्पद विषयांनाच नको तितके महत्त्व देत पाकिस्तानच्या शिरजोरीला भीक घातली आहे. बहुधा म्हणूनच हा देश अन् तिथले नेते नको तितके शेफारले आहेत. कारण नसताना भारताविरुद्ध खोडी काढण्याची सवय त्यांना त्या मुजोरीतूनच जडली आहे. त्यांच्या स्वत:च्या देशातल्या सार्या समस्या जणू काय संपल्या असल्यागत ते वारंवार काश्मीरच्या जनतेचे प्रश्न उचलून धरत असतात. वर पुन्हा काश्मीरशी जुळलेल्या भावनिक संबंधांचे गोडवे गातात. पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की, एकेकाळी संपूर्ण भारताचेही सार्या पाकिस्तानशीच भावनिक संबंध होते. त्याचा संदर्भ देत इथले लोकही सार्या पाकिस्तानावर उद्या दावा सांगू लागले तर? चालेल शरीफांना?
म्हणे, काश्मिरातील दडपशाही, अस्थिरता आणि अत्याचाराचे ढग लवकरच दूर होतील... शरीफ साहेब, थोडी तरी लाज बाळगा असली भन्नाट विधाने करताना! जरा आपल्या देशातील अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष दिलंत तर दडपशाही, अस्थिरता आणि अत्याचाराचे प्रमाण नेमके कुठे जास्त आहे, ते ध्यानात तरी येईल तुमच्या. तालिबानी स्वस्थ जगू देत नाहीत, राजकीय विरोधक शांतपणे सरकार चालवू देत नाही, धार्मिक नेत्यांनी मांडलेला उच्छाद तो वेगळाच, लष्कारातल्या अधिकार्यांचे वर्चस्व ते वेगळेच, महिलांचे सामाजिक स्वातंत्र्य बुरख्यात दडलेले अन् जनतेचे स्वातंत्र्य दहशतवाद्यांच्या मुठीत... कुठल्या स्वातंत्र्याची ग्वाही देत निघालात मिस्टर शरीफ तुम्ही काश्मिरातील जनतेला? जरा आपल्या देशातल्या राज्यकारभाराची घडी नीट बसवा अगोदर अन् मग शहाणपण शिकवा भारताला. दरवेळी आपले तेच काश्मीरचे तुणतुणे अन् स्वातंत्र्याची पिपाणी. स्वत:च्या देशातल्या समस्या सोडवता सोडवत नाहीत तुमच्यानं अन् निघालात भारतातल्या समस्या सोडवायला? पाकिस्तानात अस्तित्वात असलेल्या गरिबीपासून तर पर्यावरणापर्यंतच्या सार्या समस्यांसाठी सरकारची हतबलता, नैराश्य अन् कार्यपद्धतीला दोषी ठरविणारे जागतिक स्तरावरील संस्थांचे, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे अहवाल जरा एकदा नजरेखालून घाला नवाझ शरीफ! भविष्यात महत्त्व काश्मीरला द्यायचे की पेशावरला हे तरी ध्यानात येईल तुमच्या. मग कळेल स्वातंत्र्याची पहाट उगवण्याची गरज नेमकी कुठे आहे ते. कधी दहशतवादी घुसवायचे, कधी सीमेवर धुडगूस घालायचा, कधी गोळीबारातून नंगा नाच करायचा, तर कधी समुद्री मार्गाने आतंकवाद पसरवायचा. सतत भारताविरुद्ध कुरघोड्या करण्याशिवाय येते काय या नेत्यांना? म्हणे काश्मीरशी भावनिक नाते जुळले आहे यांचे. भारताशी नाळ तुटल्यावर नंतरच्या काळात वेगळ्या झालेल्या बांगलादेशासाठी कधी प्रेम उफाळून येत नाही यांचे? अन् भारतात धुडगूस घालण्याचे बरे बहाणे गवसतात यांना. बरं तिथले लोकही बरे भुलतात या नेत्यांच्या राजकारणाला. स्थानिक राजकारणातले अपयश झाकण्यासाठी काश्मीरच्या मुद्याचा वापर नव्हे, गैरवापर होतोय् इतकी वर्षे तरी काश्मीरचा मुद्दा आला नेत्यांच्या भाषणात की ते आपले बिचारे टाळ्याच पिटताहेत इतके दिवस! जराशी भारताविरुद्ध आग ओकली की लोक पेटून उठतात अन् राजकारणाची पोळी चांगली शेकली जाते, हे चांगलेच ध्यानात आले आहे पाकिस्तानी नेत्यांच्या. शरीफांच्या बरळण्यातून दुसरा काय अन्वयार्थ काढायचा?
भारतविरोधी भूमिका घेत आणि काश्मीर ताब्यात मिळवण्याची भाषा बोलत गेली सात दशकं पाकिस्तानात राजकारण सुरू आहे. अजून किती दिवस भारत आणि काश्मीरच्या त्याच एका मुद्यावर राजकारण करीत राहणार आहेत पाकिस्तानातील नेते? आणि असेलच काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस, तर कापून टाका म्हणावं ती नस एकदाची. आमचं आम्ही बघून घेऊन काय करायचं काश्मीरचं ते. तुम्हाला नको उगाच चिंता आमच्या भूप्रदेशाची!
No comments:
Post a Comment