Saturday, January 17, 2015

विचार भुकेल्या बांधवांचा...

इथले कित्येक लोक एकवेळचं जेवण घेऊ शकत नाही म्हणून एक वेळ उपाशी राहतात. काही अर्धपोटी झोपतात. एकीकडे पंचतारांकित हॉटेल्समधली पंचपक्वान्नाची रेलचेल अन् दुसरीकडे अठराविश्‍वे दारिद्र्य असलेल्या घरातील भांड्यांमधला अन्नाचा अभाव, ही तफावत मनाला क्लेश देणारी असली, तरी तीच वस्तुस्थिती आहे. एकीकडे कुपोषण आणि त्यातून वाढलेली बालमृत्यूची संख्या, तर दुसरीकडे जास्त झाले म्हणून रात्रीच्या पार्ट्यांनंतर कुठल्याशा उकिरड्यावर टाकला जाणारा अन्नाचा ढीग. एकीकडे बुफे पार्ट्यांनंतर नाल्यांच्या काठावर टाकून दिले जाणारे अन्न, तर दुसरीकडे त्याच अन्नातून पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली कुणाचीतरी धडपड... दोन समाजातील अंतर आणि विरोधाभास प्रतिबिंबित करणारे हे वास्तव. स्वातंत्र्याच्या गेल्या सुमारे सात दशकांच्या काळात हे चित्र इथल्या राज्यकर्त्यांना बदलता आलेले नाही, हेही धगधगते वास्तव आहे.

कधी युद्धाचे प्रसंग आले, कधी साथीचे रोग पसरले, कधी दुष्काळाने घाव घातला, तर कधी अन्य नैसर्गिक संकटांनी घात केला. मानवी समूहावर कोसळणार्‍या संकटांची मालिका तशी नवीन नाहीच. अन्नाच्या अभावातून उद्भवलेल्या भुकेच्या समस्येचे स्वरूप तेव्हाही होते अन् आजही जागतिकच आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काही दशकांत सुरू झालेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकास आणि जागतिक स्तरावरील राजकीय समन्वयातून या समस्येवर मात करण्यात काही प्रमाणात यश लाभले असले, तरी नंतरच्या काळात उद्भवलेल्या महागाई आणि जागतिक मंदीसारख्या मानवनिर्मित समस्यांची भर पडली आणि समाजातील एका वर्गाला छळणारा भुकेचा प्रश्‍न आणखीच भीषण बनला. एकूणच, सार्‍या जगात गरीब आणि श्रीमंतांमधली सतत वाढत चाललेली दरी या समस्येचे एक प्रमुख कारण ठरली आहे. श्रीमंतीच्या झगमगाटात कायम उपेक्षित राहिलेली गरिबी आणि त्यातून उद्भवलेल्या समस्यांकडे सातत्याने झालेले दुर्लक्ष, यामुळे भूक हा आज संपूर्ण विश्‍वातला एक भयानक प्रश्‍न बनला आहे. यासंदर्भात अमेरिकन अध्यक्षांनी नेमलेल्या एका आयोगाने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष तर कमालीचे धक्कादायक ठरले आहेत. या अहवालातील आकडेवारीनुसार या जगात दिवसाकाठी तब्बल १९००० लोक कुठल्याशा गंभीर आजाराने नाही, तर अन्नाच्या अभावाने मरतात. जगाच्या आजवरच्या इतिहासात १९७६ मध्ये चीनमध्ये आलेल्या भूकंपात सर्वाधित २,४२,००० लोकांचा बळी गेला होता. भूकबळींच्या संदर्भात मृत्यूची ही संख्या दर बाराव्या दिवशी गाठली जाते. भूकबळींचे भारतातील वास्तवही अतिशय भीषण असेच आहे. भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरीया या देशांमधील भूकबळींच्या संख्येवर आवर घातला, तर जगातील अर्धी समस्या तशीच संपेल, असे एक अहवाल म्हणतो. मागील काळात पृथ्वीतलावरील लोकसंख्या वाढली हे खरे असले, तरी अन्नाच्या अभावाची समस्या वाढत्या लोकसंख्येतून निर्माण झालेली नाही. कारण वाढत्या लोकसंख्येसोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, हरीतक्रांतीतून कृषिमालाचे उत्पादनही या काळात तेवढेच वाढले, हेही खरे आहे. एका अभ्यासपूर्ण अहवालातला निष्कर्ष असा आहे की, पृथ्वीतलावर प्रत्येकाच्या वाट्याला येईल एवढे अन्नधान्य उपलब्ध आहे. सुदैवाने निसर्गाची रचनाही इतकी अद्भुत आहे की, पृथ्वीतलावरचा समतोल राखतच इथे जन्म आणि मृत्यूचा खेळ चालतो. मग गणित नेमके बिघडले कुठे? गणित बिघडले ते लोकांच्या अप्पलपोटेपणामुळे, ते बिघडले ते माणसाच्या व्यापारी वृत्तीतून, पोट भरले तरी खातच राहण्याच्या आणि उद्यासाठी साठवून ठेवण्याच्या हव्यासातून. गणित बिघडले ते वाढलेल्या शहरीकरणातून आणि ओस पडलेल्या खेड्यांमधून... म्हणूनच गरज आहे ती, हा असमतोल सुधारण्याची. समतोल आणि समन्वयातून समाजातील वंचितांना आधार देण्याची. त्यांच्यासाठीच्या एका संघर्षपूर्ण लढ्याची, एका चळवळीची... नेमका हाच धागा पकडत ‘तरुण भारत’ने एक मोहीम आरंभली.
या समस्येचे भीषण वास्तव बघितल्यानंतर भुकेमुळे मरणार्‍यांची संख्या तर लक्षात येतेच, पण जगातील एका वेगळ्याच परिस्थितीचे चित्र त्यातून समोर येते. विशेषत: भारतासारख्या गरीब, विकसनशील देशातील दारिद्र्याचे परिणाम त्यातून ध्वनित होताहेत. या देशातील ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषखालील जीवन जगते. इथले कित्येक लोक एकवेळचं जेवण घेऊ शकत नाही म्हणून एक वेळ उपाशी राहतात. काही अर्धपोटी झोपतात. एकीकडे पंचतारांकित हॉटेल्समधली पंचपक्वान्नाची रेलचेल अन् दुसरीकडे अठराविश्‍वे दारिद्र्य असलेल्या घरातील भांड्यांमधला अन्नाचा अभाव, ही तफावत मनाला क्लेश देणारी असली, तरी तीच वस्तुस्थिती आहे. एकीकडे कुपोषण आणि त्यातून वाढलेली बालमृत्यूची संख्या, तर दुसरीकडे जास्त झाले म्हणून रात्रीच्या पार्ट्यांनंतर कुठल्याशा उकिरड्यावर टाकला जाणारा अन्नाचा ढीग. एकीकडे बुफे पार्ट्यांनंतर नाल्यांच्या काठावर टाकून दिले जाणारे अन्न, तर दुसरीकडे त्याच अन्नातून पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली कुणाचीतरी धडपड... दोन समाजातील अंतर आणि विरोधाभास प्रतिबिंबित करणारे हे वास्तव. स्वातंत्र्याच्या गेल्या सुमारे सात दशकांच्या काळात हे चित्र इथल्या राज्यकर्त्यांना बदलता आलेले नाही, हेही धगधगते वास्तव आहे. मुळात भुकेल्या माणसांचा विचार इथे कधी कुणाला करावासाच वाटला नाही. एखाद्वेळी कुणी तो केलाच, तर त्यालाही राजकीय गंध असतो इथे. मतांची बिदागी मिळविण्याच्या ईर्ष्येतून केल्या गेलेल्या निर्धारातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकारणार कसे? बहुधा त्यामुळेच की काय, पण हवा तो परिणाम आजवर साधता आलेला नाही कुणालाच त्यातून. आणि मग वास्तव एवढेच उरते, की याचना करून पोट भरणार्‍यांची या देशातली संख्याही काही कोटींमध्ये भरते आणि मग ‘भिकार्‍यांचा देश’ अशी त्याची ख्याती सार्‍या जगात पोहोचते. उपाशीपोटी झोपणार्‍यांच्या संख्येबाबत त्याची गणती पहिल्या क्रमांकात होते. लोक काय म्हणतात, जगात आमची प्रतिमा काय आहे, याहीपेक्षा इथे कुणीही उपाशी राहणार नाही, हा निर्धार आणि त्याच्या पूर्ततेसाठीचा संघर्ष महत्त्वाचा आहे.
लढाई याच वंचितांसाठीची आहे. संघर्ष इथल्या भुकेल्या बांधवांसाठीचा आहे. इथे कुणाला उपाशी राहण्याचा सल्ला नाही. इथे आवाहन आहे ते, ‘आहे रे’च्या गर्दीतील लोकांनी ‘नाही रे’च्या झुंडीतील लोकांचा विचार करण्याचे. शक्य झालेच तर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे. आपल्या वाट्याला आलेले जास्तीचे त्यांच्यासाठी राखून ठेवण्याचे. याच विचारांतूनच एक चळवळ ‘तरुण भारत’ने साकारली ‘मिशन अन्न वाचवा’ची. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून नागपूर आणि विदर्भात या चळवळीतून साकारलेल्या जनजागृती मोहिमेतून हाच विचार ‘तरुण भारत’ आणि मैत्री परिवारच्या कार्यकर्त्यांनी सार्‍या समाजाला दिला. या मोहिमेला लोकांमधून मिळालेला प्रतिसाद आणि त्यातून ध्वनित होऊ लागलेले बदलते जनमानस, समाजातील सकारात्मक बदलाचे साक्षीदार ठरणार आहे. या चळवळीची व्याप्ती भविष्यात राज्य आणि देशव्यापी व्हावी, हाच मनोदय आहे. या काळात ‘तरुण भारत’ आणि मैत्री परिवार या दोन संस्थांचे कार्यकर्ते शाळा-शाळांपर्यंत पोहोचले. ताटातले अन्न वाया जाऊ न देण्याची शपथ त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली. लाखो विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या शपथेतून घराघरांपर्यंत पोहोचलेला संदेश महत्त्वाचा ठरला आहे. त्यातून घडून येणारी क्रांती भुकेल्यांना न्याय देण्यास साह्यभूत ठरणार आहे. मंदिरातील महाप्रसादाचा शीत न् शीत पोटात जावा म्हणून, त्याचा एकही कण वाया जाऊ न देण्याची जी धडपड श्रद्धेतून जन्माला येते, तीच धडपड ही माणसाची नेहमीसाठीची सवय व्हावी. अन्न, मग ते मंदिरातल्या महाप्रसादातले असो वा मग लग्नसमारंभातील बुफेतील, ते एखाद्या बच्चे कंपनीच्या ‘बर्थ डे’ पार्टीमधले असो वा मग पंचतारांकित हॉटेल्समधल्या कॉकटेल पार्ट्यांमधले, ते वाया जाऊ नये एवढेच! ती धडपड प्रत्येकाची असावी. शेवटी काय, इथून तिथून सार्‍या मानवी समुदायाची वणवण पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठीची असते. सुखाचे चार घास पोटात पडावेत म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो. अशा स्थितीत केवळ जास्त झाले म्हणून एखाद्याच्या ताटातून वाया जात असेल, तर ते वाया जाणारे अन्न इतर कुणाच्या पोटात गेले तर निदान या समाजातला एक जण उपाशी राहण्यापासून वाचेल, एवढा जरी विचार प्रत्येकाने केला आणि अन्न उष्टे न टाकण्याचा, लागेल तेवढेच ताटात वाढून घेण्याचा, लागेल तेवढेच घरात शिजवण्याचा निर्धार प्रत्येकाने केला, तर अपेक्षित असलेला एक मोठा सामाजिक बदल घडून येईल. ‘तरुण भारत’चा जागर नेमका याचसाठी आहे...

No comments:

Post a Comment