आपल्या समाजात मागासलेलं म्हणून कुणालाच राहायला आवडत नाही. निदान म्हणवून घ्यायला तरी कुणालाच आवडत नाही. उलट, स्वत:ला पुढारलेले म्हणवून घेण्यात प्रत्येक जण धन्यता मानतो. त्यासाठी तर त्याची धडपड चाललेली असते. बरं, आधुनिक विचारांचे नुसते उपरणे गळ्यात घालून चालत नाही. ते मिरवत वावरायचे असते समाजात. एकवेळ पोराच्या लग्नात वधूपक्षाकडून साग्रसंगीत, पंचतारांकित सरबराईची अपेक्षा केली तरी चालेल, अगदी हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडण्याची भूमिका स्वीकारली तरी चालेल, पण सत्यनारायणाच्या पूजेला विरोध केलाच पाहिजे. कारण, वधूपक्षाकडून अपेक्षित केलेल्या बडदास्तीची चर्चा थोडीच होते कुठे? चर्चा होते ती साईबाबांना देव न म्हणण्याच्या एखाद्याच्या विधानाची! चर्चा होते, ती सत्यनारायणाच्या पूजेला केलेल्या विरोधाची! तसे केल्याने आपला आधुनिक अवतार जगासमोर येतो. कथित वैचारिक प्रगल्भतेवर मग त्यातून शिक्कामोर्तब होते. त्यामुळे या ‘मिरवण्याच्या शर्यतीत’ अग्रेसर असणार्यांची संख्या बरीच वाढू लागली आहे आताशा. शिवाय सामाजिकच वर्तणुकीवरूनच नव्हे, तर जीवनाकडे बघण्याच्या पद्धतीवरून, लैंगिकतेबाबतच्या आवडीनिवडीवरूनही विचारांची ‘उंची’ ठरू लागली आहे इतक्यात. या स्पर्धेत आपली वैचारिक पातळी इतरांच्या तुलनेत खुजी ठरू नये, म्हणून स्वैराचाराचेही कडवे समर्थन होऊ लागले आहे सध्याच्या आधुनिक युगात.
तशी तर ती एका बिस्कीट कंपनीची साधीशी जाहिरात आहे. मग खास काय आहे त्यात? खास असं की, या कंपनीची बिस्किटं काही ऐर्यागैर्यांसाठी तयार झालेली नाहीत. ती बनविण्यात आली आहेत खास ‘ओपन माईण्डेड’ लोकांसाठी! अरे व्वा! अशी विशेष लोकांसाठी विशेष उत्पादनं तयार करणार्या कंपन्याही या देशात आहेत तर! बरं. पण, हे ‘ओपन माईण्डेड’ लोक म्हणजे नेमके कोण? कशी दिसते ही मंडळी? आपल्यासारखीच सर्वसामान्य असेल का, की नाकी-डोळी नीटस असलेल्या लोकांचा स्वतंत्र वर्ग तयार झालाय् आता आपल्या समाजात. की वैचारिकदृष्ट्या प्रगत समाजासाठी सुरू झालाय् हा शब्दप्रयोग अलीकडे? असल्या कित्येक प्रश्नांची मालिका चेहर्यावर लेऊन जाहिरात पाहिली अन् मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला...
एक तरुण मित्रांच्या ग्रुपमध्ये बसलेला असतो. आपल्याला ‘गर्ल फ्रेण्ड’च मिळत नसल्याची त्याची लटकी तक्रार असते. त्यावर ग्रुपमधली एक युवती त्याला ‘गर्ल’ऐवजी ‘बॉय’फ्रेण्ड मिळवण्याची सूचना करते... आणि मग एका वाक्याची फेक... ही आहेत ओपन माईण्डेड लोकं... आणि यांच्यासाठी आहेत ‘ही’ खास बिस्किटं...
दुसरी जाहिरात. एक तरुणी आपल्या मैत्रिणीच्या नवर्याची स्तुती करते. तो अलीकडे जरा जास्तच हॅण्डसम वाटायला लागला असल्याची तिची कॉम्पिमेंट ऐकून ती मैत्रीण जेलस होत नाही. अहो, कशी होणार? ती काय सत्युगातली पतिव्रता नारी थोडीच आहे? अत्याधुनिक विचारांची झूल अंगावर पांघरलेला तो कलियुगातला अवतार आहे. एक डोळा किलकिला करत ती लागलीच म्हणते, मग? ‘शेअर’ करायचा का? पुन्हा एकदा त्याच वाक्याची फेक... ही आहेत ओपन माईण्डेड लोकं... आणि यांच्यासाठी आहेत ‘ही’ खास बिस्किटं...
पूर्वी सामाजिकदृष्ट्या जराशा पुढारलेल्या विचारांची कास धरणार्यांना पुरोगामी म्हणण्याची पद्धत होती. काळ बदलत गेला. तसतशी शब्दांची परिभाषा बदलत गेली आणि त्याच्या वापराची तर्हाही.
ओपन माईण्डेड म्हणजे खुल्या मनाची, मोकळ्या विचारांची माणसं असावीत बहुधा, हा साधा-सरळमार्गी विचारही बुरसटलेला ठरविणारी ही नवीच परिभाषा या जाहिरातीतून ध्वनित झाली आहे. ती प्रकर्षानं मांडण्याचा आणि लोकप्रिय बनविण्याचा प्रयत्नही जाणीवपूर्वक चाललेला दिसतोय्.
अधुनिकतेची कास धरायची, की बुरसटलेल्या विचारांमध्ये गुरफटून पडायचे, या प्रश्नावर फार विचार करत बसण्याची गरज नाही. पण, आधुनिक विचारांचा प्रवास असा ‘ओपन माईण्डेड’ लोकांच्या दिशेनं चालला असेल तर? नेमकं काय सुचवायचं आहे या बिस्कीट निर्मात्यांना या जाहिरातीतून?
कसं आहे बघा, आपल्या समाजात मागासलेलं म्हणून कुणालाच राहायला आवडत नाही. निदान म्हणवून घ्यायला तरी कुणालाच आवडत नाही. उलट, स्वत:ला पुढारलेले म्हणवून घेण्यात प्रत्येक जण धन्यता मानतो. त्यासाठी तर त्याची धडपड चाललेली असते. बरं, आधुनिक विचारांचे नुसते उपरणे गळ्यात घालून चालत नाही. ते मिरवत वावरायचे असते समाजात. एकवेळ पोराच्या लग्नात वधूपक्षाकडून साग्रसंगीत, पंचतारांकित सरबराईची अपेक्षा केली तरी चालेल, अगदी हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडण्याची भूमिका स्वीकारली तरी चालेल, पण सत्यनारायणाच्या पूजेला विरोध केलाच पाहिजे. कारण, वधूपक्षाकडून अपेक्षित केलेल्या बडदास्तीची चर्चा थोडीच होते कुठे? चर्चा होते ती साईबाबांना देव न म्हणण्याच्या एखाद्याच्या विधानाची! चर्चा होते, ती सत्यनारायणाच्या पूजेला केलेल्या विरोधाची! तसे केल्याने आपला आधुनिक अवतार जगासमोर येतो. कथित वैचारिक प्रगल्भतेवर मग त्यातून शिक्कामोर्तब होते. त्यामुळे या ‘मिरवण्याच्या शर्यतीत’ अग्रेसर असणार्यांची संख्या बरीच वाढू लागली आहे आताशा. शिवाय सामाजिकच वर्तणुकीवरूनच नव्हे, तर जीवनाकडे बघण्याच्या पद्धतीवरून, लैंगिकतेबाबतच्या आवडीनिवडीवरूनही विचारांची ‘उंची’ ठरू लागली आहे इतक्यात. या स्पर्धेत आपली वैचारिक पातळी इतरांच्या तुलनेत खुजी ठरू नये, म्हणून स्वैराचाराचेही कडवे समर्थन होऊ लागले आहे सध्याच्या आधुनिक युगात. नवरा ‘शेअर’ करण्याचा बायकोचा प्रस्ताव, हाच जर या जाहिरातदारांच्या लेखी ‘ओपन माईण्डेड’ असण्याचा प्रथम निकष असेल, तर मग कीव नेमकी कुणाच्या बुद्धीची करायची, हेही त्यांनीच स्पष्ट केले पाहिजे.
समाज सतत पुढेच गेला पाहिजे. पण, ती प्रगती चौफेर असली पाहिजे. विचारांच्या प्रगल्भतेची जोड मिळाली नाही, तर मग उच्च शिक्षणालाही अर्थ उरत नाही. संस्कारांअभावी आर्थिक उन्नतीही कवडीमोल ठरते अन् जमिनीवर पाय रोवून स्थिरावण्याचे महत्त्व कळलेले नसले, तर मग आकाशातली उंच भरारीही थिटी ठरते. या सर्वांची लय जुळली, तरच माणसाच्या कथित वैचारिक अधुनिकतेला अर्थ उरतो. सुटाबुटातल्या, कथित सुशिक्षितांच्या बघ्यांना उजवे ठरवायचे, की त्यांच्या गर्दीतून वाट काढत गरजवंतांच्या मदतीला प्रत्यक्षात धावून जाणार्या अडाण्याला, हे ज्याचे त्याने ठरवावे. आधुनिकतेच्या नावाखाली येत्या काळात ‘ओपन माईण्डेड’ लोकांचीच गर्दी अधिक वाढणार आहे. त्या गर्दीतून वाट काढत खर्या आधुनिक समाजाची वाट धुंडाळण्याचे काम चिंतकांना करावे लागणार आहे...
No comments:
Post a Comment