Wednesday, June 11, 2014

एक अनावृत पत्र

शरदराव, राजकारणाच्या दर्जाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही आताशा तुमच्या वागणुकीचे मापदंड लागू लागले आहेत. नका हो स्वत:चा दर्जा इतका खालच्या पातळीवर आणू. तुमच्याच काय, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य कुठल्याही नेत्याच्या तोंडून दलित, मुस्लिमांच्या हिताची भाषा निघाली की, त्याला राजकारणाचाच वास येतो आताशा. पुढ्यात निवडणुका असताना तुम्हाला त्यांचे स्मरण आवर्जून होते, हेही ठावूक झाले आहे एव्हाना जनतेला. इतकी वर्षे दिल्लीतल्या राजकारणात घालवल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे नाव तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुचू लागले आहे. ही प्रगती आहे की अवनती, हे तुमचे तुम्हीच ठरवा. तुमच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कुठून कुठे पोहोचली याचाही आढावा घ्या एकदा. जातीयवादाचा एवढा कांगावा केला तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा कितपत उपयोग होईल याचाही जरासा अंदाज घ्या. निवडणुकीसाठी आधार जातीयवादाचाच घेता अन् तरीही स्वत:ला पुरोगामी म्हणवता? अजून किती दिवस त्या एकाच मुद्यावर राजकारण करणार आहात? दुसर्‍यांना सांगता, तसे स्वत:ही जरासे चाकोरीबाहेर पडा. सार्‍या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे काही तरी हातून घडू द्या तुमच्याही...
परम् आदरणीय पवार साहेब,
साष्टांग दंडवत!
परवा आपण केलेले बहुमोल वचन ऐकून आम्ही धन्य होऊन पावलो. तशीही तुमची वचने ओंजळीत फुलं जपावीत तशी जपण्याजोगी असतात! त्यात या वचनाची भर म्हणजे जणू मुंगी-साखरेचा रवाच. दिल्लीत नरेन्द्र मोदींचे सरकार सत्तारूढ होऊन अद्याप पंधरवडाच लोटला असताना या अल्पशा कालावधीत देशातल्या जातीयवादी शक्तींनी उचल खाल्ली असल्याचा, आपण सखोल अभ्यासाअंती काढलेला निष्कर्ष जागतिक पातळीवर दखल घेण्याजोगा ठरला आहे. असली अनमोल वचने वारंवार तोंडून निघत नसतात महनीयांच्या! कुठल्याशा क्षणी अवचित, अनाहूतपणे ती उद्धृत होतात. त्यामुळे आपल्या या विधानाची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होणार आहे. साहेब! आपल्या हीन दर्जाच्या राजकारणाशी सारा महाराष्ट्र परिचित आहे. उभ्या राजकीय हयातीत आपण विविध राजकीय पक्षांशी केलेला संग, कित्येकांना दिलेला दगा, कित्येकांची केलेली सोबत अजूनही स्मरणात आहे तमाम मराठीजनांच्या. कॉंग्रेस, पुलोद, पुन्हा कॉंग्रेस, मग राष्ट्रवादी असा आपला राजकीय प्रवास अजून विसरलेला नाही हा महाराष्ट्र. अशात परवा आपण नरेन्द्र मोदींच्या पंधरा दिवसांच्या प्रशासनावर ओढलेले कोरडे मोदींना शरमेने मान खाली घालावी लागावी असेच होते. फेसबुकवर छत्रपती शिवराय आणि बाळासाहेबांसंदर्भात टाकण्यात आलेले पोस्ट आणि पुण्यात एका अभियंत्याची झालेली हत्या यावरून आपण, सार्‍या देशात या पंधरा दिवसांत जातीय शक्ती बळावल्या असल्याचा जो निष्कर्ष काढलाय्, त्याला तोड नाही बघा पवार साहेब! मोदी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि अल्पसंख्यकांवर झालेल्या अत्याचाराने आपले हळवे मन उद्विग्न झाले. स्वाभाविकच आहे ना पवार साहेब, परवाच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला जी धोबीपछाड मिळाली, त्यानंतर तुम्हाला असल्या विधानांची आवश्यकता वाटू लागणे यात तसे नवल नाहीच. शिवाय आता राज्याच्या विधानसभा निवडणुका समोर आहेत. त्यातही आपले काय हाल होणार आहेत, याची पुरेपूर कल्पना आल्यावर तर असल्या विधानांचे महत्त्व तुमच्यासारख्या चाणाक्ष आणि धूर्त नेत्याच्या लक्षात न आले तरच नवल! त्यामुळे असली वक्तव्ये करून लोकांना संभ्रमात टाकण्याचा तुम्ही टाकलेला डाव राजकीय वर्तुळात तरी वर्णनातीतच! बरं कधी नव्हे, ते महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांनीही तुमची री ओढली आहे या प्रकरणात. राज्याच्या विकासाच्या इतर कुठल्याही मुद्यावर तुमच्यातून विस्तव जात नसला, तरी मोदींच्या काळात जातीयवादी शक्ती बळावल्या असल्याचे तुमचे बोल अलगद तळहातावर झेलून जपताहेत ते....
पवार साहेब, मोदींचं जाऊ द्या. तुमच्या लेखी ते आहेतच जातीयवादी, पण एक सांगा शरदराव, महाराष्ट्रात तर अजून तुम्हा कथित पुरोगाम्यांचेच राज्य आहे. मग तुमच्या राज्यात पुण्यातल्या अभियंत्याचा खून झाला कसा? तो रोखता का नाही आला कर्तृत्ववान अन् कर्तव्यदक्ष चव्हाण साहेबांना? अन् ते तुमचे गृहमंत्री? त्यांना तर तुम्ही वारंवार सांगितले तरी कठोर पावलं उचलता आलेली नाहीयेत. कसल्या गोष्टी सांगताहेत ते, अजून त्या दाभोळकरांच्या खुन्यांना पकडता आलेले नाही यांना. त्याची जराशीही लाज वाटत नाही अन् आता आपल्या अपयशाचे खापर मोदींच्या डोक्यावर फोडायला निघालेत सारे? पंधरा दिवसांत एवढा चमत्कार घडला की, तुमची पंधरा वर्षांची सत्ता निष्प्रभ करून ते हावी ठरलेत?
आता एक करा पवार साहेब. महाराष्ट्रात तुमचीच सत्ता आहे... अजूनतरी...! मग दाभोळकरांचा खून का झाला याचे उत्तर द्या. तेव्हा तर मोदींचे सरकार सत्तेत नव्हते. महाराष्ट्राची धुराही तुमच्याच खांद्यावर होती. तो खूनही कथित जातीयवाद्यांनी केल्याचे चव्हाण साहेब छातीठोकपणे सांगत होते तेव्हाही. मग एवढे ठावूक असताना अजून ते खुनी तुमच्या हाती का लागत नाहीयेत, याचा जाब विचारा मुख्यमंत्र्यांना एकदा!
शरदराव, राजकारणाच्या दर्जाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही आताशा तुमच्या वागणुकीचे मापदंड लागू लागले आहेत. नका हो स्वत:चा दर्जा इतका खालच्या पातळीवर आणू. तुमच्याच काय, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य कुठल्याही नेत्याच्या तोंडून दलित, मुस्लिमांच्या हिताची भाषा निघाली की, त्याला राजकारणाचाच वास येतो आताशा. पुढ्यात निवडणुका असताना तुम्हाला त्यांचे स्मरण आवर्जून होते, हेही ठावूक झाले आहे एव्हाना जनतेला. इतकी वर्षे दिल्लीतल्या राजकारणात घालवल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे नाव तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुचू लागले आहे. ही प्रगती आहे की अवनती, हे तुमचे तुम्हीच ठरवा. तुमच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कुठून कुठे पोहोचली याचाही आढावा घ्या एकदा. जातीयवादाचा एवढा कांगावा केला तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा कितपत उपयोग होईल याचाही जरासा अंदाज घ्या. निवडणुकीसाठी आधार जातीयवादाचाच घेता अन् तरीही स्वत:ला पुरोगामी म्हणवता? अजून किती दिवस त्या एकाच मुद्यावर राजकारण करणार आहात? दुसर्‍यांना सांगता, तसे स्वत:ही जरासे चाकोरीबाहेर पडा. सार्‍या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे काही तरी हातून घडू द्या तुमच्याही...

आपला,
एक सामान्य चाहता

No comments:

Post a Comment