Sunday, June 30, 2013

खरं तर त्यांच्या भाषणात पांडित्यपूर्ण विधाने नव्हती. लोकांचा बुद्धिभेद करणार्‍या वक्तव्यांना स्पर्शही करण्यात आला नव्हता. क्लीष्ट शब्दांचा वापर नव्हता. अनाकलनीय तर्क नव्हते, की उपस्थितांच्या वैचारिक प्रगल्भतेला आव्हान देणारी शैली नव्हती. सारे काही सरळ, साधे, सोपे होते. दैनंदिन जीवनातली छोटी छोटी उदाहरणे होती. पण त्यातनंही राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे पितळ उघडे पाडले जात होते. जनता जनार्दनाच्या बदललेल्या मानसिकतेचे दर्शन घडवले जात होते. भाषणातले तर्क श्रोत्यांना विचार करायला भाग पाडत होते. ओळखीची वाटणारी उदाहरणे नकळत मनाला वळसा घालत होती. धारदार आवाजातली मनाला भीडणारी सत्ताधार्‍यांवरची आरोपांची सरबत्ती धमण्यातले रक्त सळसळवत होती. महागाई, भ्रष्टाचाराविरुद्ध मुठी आवळायला भाग पाडत होती....
सुराज्याचा मोदी मंत्र

मुंबईतील स्टॉक एक्स्चेंजच्या भव्य इमारतीतील भव्य सभागृह. मुंबईकरांनी गच्च भरलेले. सभागृहाबाहेरची तेवढीच गर्दी. जीवाचा कान करून भाषण ऐकायला आलेली. मोदींनीही या गर्दीला निराश केले नाही. कधी धारदार वाक्यांची फेक करत तर कधी हळूवारपणे चिमटे काढत, कधी राज्यकर्त्यांवर आसूड ओढत, तर प्रसंगी जनताजनार्दनालाही खडे बोल सुनावत त्यांचे वार चालले होते. कधी टाळ्यांचा कडकडाट, तर कधी हास्याचे कारंजे...
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे लिखित एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एका नव्या विषयाच्या चर्चेला सुरूवात झाली होती. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील व्यवस्थेचे धिंडवडे, वेशीवर टांगली गेलेली त्याची लक्तरे. मतदानाच्या दिवशी मतपेटीत पडणार्‍या एका मतपत्रिकेतून व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे स्वप्न बघाणारा मतदार आणि त्याच्या आशा, आकांक्षांना खुंटीवर टांगत त्याच्या स्वप्नांच्या पार ठिकर्‍या उडवणारे राज्यकर्ते. प्रश्‍न सुटण्याची अपेक्षा मागे टाकून निराश मनाने जगणारी इथली सामान्य माणसं. या पार्श्‍वभूमीवर त्याला दिलासा देत आशेची किरणं दाखवणारे मोदींचे भाषण...
खरं तर त्यांच्या भाषणात पांडित्यपूर्ण विधाने नव्हती. लोकांचा बुद्धिभेद करणार्‍या वक्तव्यांना स्पर्शही करण्यात आला नव्हता. क्लीष्ट शब्दांचा वापर नव्हता. अनाकलनीय तर्क नव्हते, की उपस्थितांच्या वैचारिक प्रगल्भतेला आव्हान देणारी शैली नव्हती. सारे काही सरळ, साधे, सोपे होते. दैनंदिन जीवनातली छोटी छोटी उदाहरणे होती. पण त्यातनंही राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे पितळ उघडे पाडले जात होते. जनता जनार्दनाच्या बदललेल्या मानसिकतेचे दर्शन घडवले जात होते. भाषणातले तर्क श्रोत्यांना विचार करायला भाग पाडत होते. ओळखीची वाटणारी उदाहरणे नकळत मनाला वळसा घालत होती. धारदार आवाजातली मनाला भीडणारी सत्ताधार्‍यांवरची आरोपांची सरबत्ती धमण्यातले रक्त सळसळवत होती. महागाई, भ्रष्टाचाराविरुद्ध मुठी आवळायला भाग पाडत होती.
चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही कधी शुद्धतुपाचे दुकान अशी पाटी बघितली होती? पण सध्याच्या काळात मात्र असली पाटी ठिकठिकाणी बघायला मिळते. अशुद्ध तूप विकण्यास कायद्याने परवानगी नसली तरी ते विकले जाते. त्यातून ग्राहकांची जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते. म्हणूनच शुद्धतुपाची पाटी लावण्याची वेळ काही लोकांवर येते. कुरीअरच्या सेवेचा स्वीकार बिनदिक्कतपणे केला जाणे यामागे कार्यतत्परतेचे कारण असेलही कदाचित. पण तो एकप्रकारे डाक सेवेवरचा अविश्‍वास असतो, हे सत्य अधिक बोचणारे आहे. सरकारी शाळा मोठ्या संख्येत निर्माण झाल्या असल्या तरी लोकांचा सरकारी व्यवस्थेवर विश्‍वासच राहिलेला नसल्याने तिथं आपली पोरं शिकायला पाठवायला तयारी खुद्द सरकारी अधिकार्‍यांचीही नसते. जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेली ही भावना सरकारी व्यवस्थेबाबतची अनास्था स्पष्ट करणारी असते. बरं लोकांचं तरी काय सांगावं? यांना सरकारी यंत्रणा वापरावीशी वाटली तरी आपलीकधीच वाटत नाही. स्वत:ची पंचेवीस वर्षे जुनी स्कुटर घासून, पुसून स्वच्छ करून जपून वापरणारे लोक सरकारच्या नव्या कोर्‍या बसच्या सीटवर ब्लेड चालवताना जराही चिंता करत नाहीत. कारण मुळातच सरकारी बस त्यांना आपलीवाटत नाही. सरकारीवाटते.
मोदी म्हणाले. ही परिस्थिती बदलण्याचे काम गुजरातेत झालं आहे. शासन आणि जनता या दोघांनीही आपापली भूमिका तापसण्याची, ती बदलण्याची गरज आहे. जनतेला सरकार आपलंवाटलं पाहिजे आणि सरकारलाही जनता आपलीवाटली पाहिजे. उद्या अंबानी आजारी पडले तर? तिथे सरकारचे काय काम? त्यांच्या सेवासाठी तर कित्येक मोठमोठे डॉक्टर्स तात्काळ हजर होतील. त्यामुळे सरकारी मदतीची गरज अंबानींना नाही. पण एखाद्या झोपडपट्टीतला एखादा गरीब माणूस आजारी पडला तर? त्याला मात्र सरकारच्या मदतीची गरज आहे. कारण सरकारी दवाखाना हाच त्याच्यासाठीचे एकमेव आधारस्थान आहे. त्यामुळे आपले अस्तित्व नेमके कुणासाठी आहे हे सरकारी यंत्रणेला कळलं पाहिजे.
लोकशाही व्यवस्थेने जनतेला दिलेल्या मताधिकाराची ताकद फार मोठी आहे. ही ताकद लाभलेली  जनता आणि तिने मतपेटीतून दिलेल्या कौलाच्या जोरावर सत्तारूढ होणारे सरकार यांचा परस्परांवरचा विश्‍वास कायम राहिला, वृद्धिंगत झाला तरच लोकशाही व्यवस्था बळकट होऊ शकते. गुजरातेत याच विश्‍वासाच्या बळावर लोकांच्या सहभागातून भूकंपग्रस्त भूज परिसरात सरकारी शाळा उभ्या राहिल्यात. सरकारी या शब्दाला न शोभण्याइतक्या दर्जेदार. सरकारच्या आराखड्यापेक्षाही कमी पैशात तयार झाल्या. शाळा बांधून झाल्यावर उरलेले पैसे जनतेने इमानदारीने सरकारला परत केले. इथे महिलांच्या सहभागातून पाणीवाटप संस्था तयार झाल्यात. राज्याच्या कानाकोपर्‍यात दौर्‍यावर निघालेल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला येणारे लोक मागण्यांची निवेदनं नाही, तर सरकारी कामात मदत करायला स्वत:च्या मिळकतीतून निधीचा धनादेश घेऊन येतात...
राजेशाही संपली तरी एकाच घराण्याच्या सद्दीत अडकलेली भारतीय लोकशाही. स्वत:च्या स्वत्वाचे विस्मरण झालेला आणि गांधी कुटुंबातील सदस्याशिवाय स्वत:ला असहाय समजणारा एकशे वीस कोटींचा जनसमुदाय. त्याच्यासाठी सांगितला गेलेला सुराज्याचा मोदीमंत्र  स्टॉक एक्सचेंज सभागृहातून परतणार्‍या प्रत्येकाच्या कानात कितीतरी वेळ घुमत राहिला होता...

Wednesday, June 19, 2013

‘‘हो केली मारहाण. काय करायचं ते करून घ्या. या मराठी राज्यात मराठी तरुणांना न्याय मिळणार नसेल, तर दुसरं करायचं तरी काय आम्ही? आमच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी आलेल्या परप्रांतियांना हुसकावून नाही लावायचं तर काय आरत्या ओवाळायला हव्या आम्ही त्यांच्या? आम्ही जे काही केलं, ते स्थानिक तरुणांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलं. ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो, त्या सरकारनं हात वर केल्यावर कायदा हाती घेण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता होता आमच्याकडे...?’’
 असल्या बाणेदार वाक्यांची फेक करत एरवी जाहीर सभांमधून टाळ्या मिळवणार्‍या राज ठाकरेंनी यापैकी कुठलेही वाक्य न बोलता, मी तिथे नव्हतोच, माझा त्या घटनेत सहभाग नव्हता, त्यामुळे माझ्याविरुद्धची केस मागे घेण्यात येऊन आपल्याला या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी याचना केल्याची वार्ता काल कानावर पडली आणि भारतीय राजकारणाच्या अनोख्या शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सुरूवातीला तर विश्‍वासच बसला नाही. वाटलं, छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीवर विश्‍वास असलेली माणसं ही. शिवबांच्या गनिमी काव्याचाच भाग असावा कदाचित. अन्यथा करारी बाण्याचे राज साहेब असली पुळचट विनवणी न्यायालयाला करतील? छे! कुठे तो बाणेदारपणा, कुठे ती परप्रांतियांविरुद्धच्या लढाईची भाषा, अन् कुठे ही याचना? राजसाहेबांच्या प्रतिमेला न शोभणारी. मराठीजनांच्या भावनांना ठेच पोहोचविणारी...

राज साहेब, हा कसला मराठी बाणा?

आपल्या इथल्या राजकारणाची तर्‍हा जराशी न्यारीच आहे. इथे सार्‍या यातना नेत्यांचा जयघोष करणार्‍या कार्यकर्त्याच्या वाट्यालाच येतात. कुठल्या आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या नेत्याच्या अंगावर बसल्याचे कधी कुणी ऐकले आहे? चेंगराचेंगरीत कुठल्या नेत्याला जीव गमवावा लागल्याची वार्ता कधी कुणाच्या कानावर आली आहे? दंगलीत कुठला नेता मैदानात उतरल्याचे कधी कुणी बघितले आहे? आंदोलनकर्त्या समुहावर झाडल्या गेलेल्या बंदुकीच्या गोळ्यांची दिशा आंदोलनाच्या नेतृत्वाच्या दिशेने वळल्याचे कधी आपण बघितले आहे? आंदोलनकर्त्यांना भडकावणारी नेत्यांची जमात नेमकी पोलिसांच्या लाठीहल्ल्याच्या वेळी कुठे आणि कशी गायब होते, हे गुपित अद्याप कुणाला कळलेले नाही. पण पोलिसांच्या लाठ्या असो की जमावाची दगडफेक, बंदुकीच्या गोळ्या असो की कारागृहाची शिक्षा, यातली कुठलीच बाब नेत्यांच्या, विशेषत: राजकीय नेतयांया वाट्याला कधीच येत नाही, हेच धगधगते वास्तव आहे. आणि कधी अपवादाने चुकून आलीच त्याच्या वाट्याला एखाद्वेळी शिक्षा तर मग त्यातून त्याची सोडवणूक करण्यासाठी चालणारे डावपेच सामान्य कार्यर्त्याच्या वाट्याला आल्याची उदाहरणे सहसा सापडत नाहीत.
पाच वर्षांपूर्वी रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेदरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत घातलेल्या धुडगुसाच्यावेळी आपण तिथे हजर नव्हतो, त्या प्रकरणात आपला काही रोल नाही असली कारणे पुढे करत मनसेध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:ची या प्रकरणातून सोडवणूक करवून घेण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला अर्ज तमाम मराठीजनांच्या भावना दुखावणारा ठरला आहे. मराठी जनांचा आवाज बुलंद करतात परप्रांतियांच्या विरोधात आग ओकणार्‍या राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाने रक्त सळसळलेला कार्यकर्ता पेटून उठला. राज साहेबांच्या एका आदेशाची देर, त्याने रेल्वे स्थानकावर, परीक्षा केंद्रावर जाऊन मनातल्या परप्रांतियांविरुद्धच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. कुठे त्यांना मारहाण केली, तर कुठे त्यांना परीक्षा केंद्रांवरून हुसकावून लावले. तेव्हा देशभरात हाहाकार माजला. कित्येकांनी शिव्याशाप दिलेत, तरी तमाम मराठीजनांनी या धाडसाचे कौतुक केले. राजसाहेबांची वाहवाही झाली. नेता हवा तर असा, असे शेरे मारले गेले. मराठी तरुणांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल, त्यांच्या हक्कावर गदा आणायला निघालेल्या परप्रांतियांना खदेडून लावल्याबद्दल प्रत्येक जण राज साहेबांना गळ्यातला ताईत बनवून फिरू लागला.
पाच वर्षे मागे पडली. त्या मारहाणीत सहभागी असलेल्या तब्बल वीस तरुणांविरुद्ध पोलिसांनी केसेस दाखल केल्या. न्यायालयाचे उंबरठे झिजवण्याची  वेळ त्यांच्यावर आली. त्यावेळी साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मोठ्या उत्साहाने, निडरपणे परप्रांतियांविरुद्ध मैदानात उतरलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यातली झिंग नंतर खाड्कन उतरली. पण यावेळी एक चमत्कार घडला होता. कधी नव्हे, ते पहिल्यांदाच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांसोबतच त्यांच्या नेत्याविरुद्धही खटला दाखल झाला होता. आता काय होणार म्हणून सर्वांचे लक्ष या केसकडे लागले होते. आता व्हायचे काय आहे त्यात? एरवी जाहीरपणे गरजणारा राजसाहेबांचा दणका न्यायालयाच्या कटघराही ठसा उमटवणार असल्याचा विश्‍वास होता तमाम मराठीजनांना.
‘‘हो केली मारहाण. काय करायचं ते करून घ्या. या मराठी राज्यात मराठी तरुणांना न्याय मिळणार नसेल, तर दुसरं करायचं तरी काय आम्ही? आमच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी आलेल्या परप्रांतियांना हुसकावून नाही लावायचं तर काय आरत्या ओवाळायला हव्या आम्ही त्यांच्या? आम्ही जे काही केलं, ते स्थानिक तरुणांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलं. ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो, त्या सरकारनं हात वर केल्यावर कायदा हाती घेण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता होता आमच्याकडे...?’’ असल्या बाणेदार वाक्यांची फेक करत एरवी जाहीर सभांमधून टाळ्या मिळवणार्‍या राज ठाकरेंनी यापैकी कुठलेही वाक्य न बोलता, मी तिथे नव्हतोच, माझा त्या घटनेत सहभाग नव्हता, त्यामुळे माझ्याविरुद्धची केस मागे घेण्यात येऊन आपल्याला या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी याचना केल्याची वार्ता काल कानावर पडली आणि भारतीय राजकारणाच्या अनोख्या शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सुरूवातीला तर विश्‍वासच बसला नाही. वाटलं, छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीवर विश्‍वास असलेली माणसं ही. शिवबांच्या गनिमी काव्याचाच भाग असावा कदाचित. अन्यथा करारी बाण्याचे राज साहेब असली पुळचट विनवणी न्यायालयाला करतील? छे! कुठे तो बाणेदारपणा, कुठे ती परप्रांतियांविरुद्धच्या लढाईची भाषा, अन् कुठे ही याचना? राजसाहेबांच्या प्रतिमेला न शोभणारी. मराठीजनांच्या भावनांना ठेच पोहोचविणारी...
इथल्या प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थेची ठराविक, साचेबद्ध कार्यपद्धती आहे. त्याचा लाभ घेणार्‍यांपेक्षा गैरफायदा घेणारेच अधिक आहेत. गुजरातेत नाही का तिस्टा सेटलवाड नावाच्या कथित समाजसेविकेनं नरेन्द्र मोंदींना जेरीस आणण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा पुरेपूर वापर करून घेतला..? राज ठाकरेंविरुद्धही काय कमी ठिकाणी न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आलीत, त्यांना जेरीस आणण्यासाठी? तर अशा कार्यपद्धतीला त्याच पद्धतीने, त्याच तोडीचे उत्तर देणेही कधीकधी गरजेचे असते. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर राज ठाकरे यांच्या परवाच्या या अर्जात तसे चूक काहीच नाही. मुंबईच्या चेतना महाविद्यालयात प्रसंग घडला तेव्हा ते खरोखरीच घटनास्थळी नव्हते. मग मी तिथे नव्हतो, असे म्हणत त्यांनी या केसमधून आपले नाव वगळण्याची मागणी केली तर त्यात चूक कुठाय? त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी केसेस दाखल करून मराठीसाठी चाललेल्या लढाईची मुस्कटदाबी करायला निघालेल्या लोकांना त्याच पद्धतीने उत्तर द्यायला नको?
पण हे प्रकरण केवळ तांत्रिक बाबींपुरते मर्यादीत नाही. रणांगणावरच्या लढाईत सेनापती सोबतीला असला की सैनिकांना बळ मिळते. तसेच राजकीय लढाईचे आहे. नेत्याची साथ आहे म्हटल्यावर कार्यकर्त्यांना येणारा हुरूप वर्णनातीत असतो. राजसाहेबांच्या नुसत्या भाषणांनीही भारावून, पेटून उठलेली तरुणाई परीक्षेसाठी म्हणून वर्गात बसलेल्या परप्रांतियांना हाकलून लावत धुडगूस घालते, ते कुणाच्या बळावर? आपल्या नेत्याच्याच ना? अशावेळी पाठीशी ठामपणे उभे राहात त्यांना बळ द्यायचे सोडून राज साहेब आपल्या शिलेदारांना कारवाईच्या तोफेसमोर देऊन स्वत: मात्र मोकळे होण्याचा मार्ग स्वीकारणार असतील, तर त्याचे समर्थन कसे व्हावे?
मुंबईतल्या मराठीजनांची मक्तेदारीच ठाकरे कुटुंबाने गेली चार दशकं आपल्याकडे घेतली आहे. तोडफोड तर तेव्हाही व्हायची. पण त्यातही बाळासाहेबांनी निदान कुटुंबसखी, शिववडापाव सारख्या उपक्रमातून स्थानिकांच्या पदरी काहीतरी पडेल याची व्यवस्था झाली. पण मनसेची लढाई मात्र तोडफोड आणि अरेरावीच्या पलीकडे जाताना दिसत नाही. परप्रांतियांविरुद्ध जनसमुदाय भडकावणार्‍या भाषणातून आणि मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मराठी मनं पेटून उठताना दिसतीलही. पण असल्या पळपुटेपणातून भविष्यातली आंदोलनं उभी राहण्यापूर्वीच विझतील त्याचं काय?

Sunday, June 9, 2013

या देशातले नियम, कायदे, ते पाळणार्‍यांसाठी आहेत. समाजातल्या उच्चभ्रू वर्गाला त्याचे पालन करण्याची मुळीही गरज पडणार नाही अशी व्यवस्था सर्वच क्षेत्रातील उच्चपदस्थांनी इथे परंपरेने, नकळत निर्माण करून ठेवली आहे. ग्रामीण भागात चालणार्‍या बैलांच्या शर्यतींवर आक्षेप घेणार्‍या कथित समाजसेवकांना रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यतींवर आक्षेप नोंदविण्याची कधी गरज वाटत नाही. अगदी मतदानाच्या प्रक्रियेत मतपत्रिकेवर छापण्यासाठी बोधचिन्ह म्हणून सुद्धा प्राण्यांची चित्रे छापण्यावर आक्षेप घेणार्‍या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना देशभरातील ४३ रेसकोर्सवर वर्षभर लागणार्‍या घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारा कोट्यवधीचा जुगार कधीच आक्षेपार्ह वाटला नाही....

रेसकोर्सच्या ट्रॅकवर घोड्यांऐवजी राजकीय प्यादे...!

महालक्ष्मी रेसकोर्सशी सर्वसामान्य मुंबईकरांचा संबंध किती येतो? नावालाही नाही. पण तरीही हा रेसकोर्स हवा की नाही याबाबत त्यांचे मत जाणून घेण्याची इच्छा कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. तसे घडण्याची शक्यता नेमकी किती हे कॉंग्रेसचे नेतेच जाणोत. पण स्वत:वरची जबाबदारी झटकण्यासाठी या पक्षाच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे, हे मात्र खरे. ज्याच्या एका बाजुला समुद्र, दुसर्‍या बाजुला निवृत्त शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने, तिसर्‍या बाजुला मुख्य रस्ता आणि चौथ्या बाजुला झोपडपट्टी आहे, तिथे कुणाची मते ध्यानात घेण्याच्या बाता कॉंग्रेसचे नेते मारताहेत हे तरी कळले पाहिजे. पण या मैदानावरील ट्रॅकवरून सध्या घोडे कमी आणि आणि राजकीय नेत्यांचे प्यादे अधिक दामटले जाताहेत.
कधीकाळी इंग्रजांनी त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी घोड्यांच्या शर्यतीकरता या मैदानाची निर्मती केली. इंग्रज गेले. त्यानंतर भारतीय उच्चभ्रू समाजाने ती परंपरा चालवण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. १८८३ मध्ये तयार झालेले रेसकोर्स,  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ लिमिटेड नावाच्या क्लबला कायद्याच्या कुठल्याही आडकाठीविना प्राप्त झाले. बघता बघता रेसकोर्स म्हणजे मुंबई शहराची ओळख झाली. एव्हाना हेरीटेजचा दर्जाही त्याला प्राप्त झाला. २४०० मीटर लांबीचा ट्रॅक, १४०० घोडे, सुमारे साडेसात हजार सदस्य, ६०० घोडेमालक, ४६ प्रशिक्षक, ८० घोडेस्वार असा संसार साभाळत या क्लबचा कारभार सुरू आहे. दिमतीला नावाजलेलं हॉटेल, मोठा लॉन, हेलिपॅड असा व्यापही हळूहळू वाढत चाललेला असताना या जागेची भाडेपट्टीची मुदत लवकरच संपणार असल्याची बातमी वार्‍यासारखी शहरभर पसरली. तसेही जमीनीचा विषय म्हटला की बिल्डर्स एवढीच मुंबईकर राजकीय नेत्यांचीही काने कशी लागलीच टवकारतात. इथे तर २२५ एकर जमिनीचा विषय आहे. दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरातील केवळ साडेसात हजार सदस्यांची मक्तेदारी असलेले हे क्लब काही लोकांच्या, विशेषत: राजकीय नेत्यांच्या डोळ्यात भरू लागले. जागेची, त्यातही सार्वजनिक मोकळ्या जागांची वानवा असलेल्या या शहरात २२५ एकरची एक जागा सहज उपलब्ध होणार असल्याच्या कल्पनेनेच काहींनी उंच भरारी घेतली. रेसकोर्सला या जागेच्या भाडेपटटीची मुदत वाढवून देण्यात येऊ नये, एवढी साधी मागणी केली तरीही काय काय घडू शकते, याची व्यवहारिक गणितंलक्षात घेऊन जो तो, या विषयावर बोलू लागला. कालपर्यंत ज्यांना इथल्या जुगाराबद्दल ब्र काढावासा वाटला नाही, ते कॉंग्रेसचे नेते आता अचानक जुगाराच्या कोणत्याही स्वरूपाला आपला विरोध असल्याचे छातीठोकपणे सांगू लागले. तर दुसरीकडे, जुगार तर काय पंचतारांकीत हॉटेल्समधूनही चालतो असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते थोडेसे आडवळणाने, पण रेसकोर्स कायम ठेवण्याची भाषा बोलू लागले. शिवसेनेने तिथे थीमपार्क उभारण्याची कल्पना मांडली आहे. पण त्यायोगे तेथे बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा त्यांचा छुपा अजेंडा असल्याचे लटके कारण शोधत कॉंग्रेसचे नेते शिवसेनेच्या प्रस्तावाला विरोध करू लागले आहेत.
या देशातले नियम, कायदे, ते पाळणार्‍यांसाठी आहेत. समाजातल्या उच्चभ्रू वर्गाला त्याचे पालन करण्याची मुळीही गरज पडणार नाही अशी व्यवस्था सर्वच क्षेत्रातील उच्चपदस्थांनी इथे परंपरेने, नकळत निर्माण करून ठेवली आहे. ग्रामीण भागात चालणार्‍या बैलांच्या शर्यतींवर आक्षेप घेणार्‍या कथित समाजसेवकांना रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यतींवर आक्षेप नोंदविण्याची कधी गरज वाटत नाही. अगदी मतदानाच्या प्रक्रियेत मतपत्रिकेवर छापण्यासाठी बोधचिन्ह म्हणून सुद्धा प्राण्यांची चित्रे छापण्यावर आक्षेप घेणार्‍या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना देशभरातील ४३ रेसकोर्सवर वर्षभर लागणार्‍या घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारा कोट्यवधीचा जुगार कधीच आक्षेपार्ह वाटला नाही.
एकूण, रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारा जुगार या बाबी रेसकोर्सच्या जागेच्या भाडेपट्टीची मुदत संपायला आल्यावर अचानक आक्षेपार्ह ठरू लागल्या आहेत. आता त्या जागेवरून राजकीय पक्षांमध्ये कोण पुढे पळतो, यासाठीची घोडदौड सुरू झाली आहे.  ज्या थीमपार्कचे प्रेझेंटेशन परवा शिवसेनेने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंसमोर सादर केले, त्याची तयारी गेले सुमारे वर्ष, दीड वर्ष चालली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, राजकारणापासून तर उद्योगजगतापर्यंतच्या विविध क्षेत्रातील गर्भश्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबची ही जागा शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत रेसकोर्ससाठी द्यायची नाही, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे कुणी जुगाराच्या नावाखाली रेसकोर्सला विरोध करतोय्, तर कुणी हेरीटेजच्या नावाखाली त्याचे समर्थन.
तसे म्हटले तर मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. कॉंग्रेसच्या मतानुसार जनमताचा कौलच घ्यायचा असेल तर लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संस्थेचे मत महत्त्वाचे आहे. ते स्पष्टही झाले आहे. पण कॉंग्रेसला बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाण्याची भीती आहे. ज्या बाळासाहेबांनी मुंबईतला मराठी माणूस जगवला. त्याच्यातला स्वाभिमान जागा करत त्याला बळ दिले, त्या बाळासाहेबांचे, नव्या पिढीला स्फूरण देणारे स्मारक मुंबईत उभारलेच तर कॉंग्रेसचे कोणते घोडे मरणार आहे? पण एकवेळ रेसकोर्स कायम राहिले तरी चालेल पण बाळासाहेबांचे स्मारक नको, अशी काहीशी अडेलतट्टू भूमिका घेत कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या चालीने नसले तरी रेसकोर्सचे समर्थनच चालवले आहे.
या मुद्दयावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट असली तरी, या निर्णयाची अंतिम सुत्रे हाती असलेल्या राज्य सरकारमधील नेत्यांची भूमिका सेनेच्या थीमपार्कच्या बाजूने ठामपणे उभी राहील याची, गर्भश्रीमंतांना डावलून सर्वसामान्यांची बाजू घेतली जाईल याची, लागेबांधे, हितसंबंध, राजकारण, व्यापारी नजर... या शर्यतीत जनहिताची बूज राखली जाण्याची, शक्यता नाही म्हटलं तरी जराशी कमीच आहे... पण याचा अर्थ टर्फ क्लबला ही जागा सहजासहजी मिळेल असे मात्र नाही. त्यांनाही बरीच मेहनत करावी लागेल. येत्या काळात राजकीय नेत्यांच्या दरबारात हजेरी लावावी लागेल. जे जे म्हणून विरोधात ओरडताहेत, त्यांची समजूत काढावीलागेल... (म्हणजे नेमके काय करावे लागेल, ते कळले ना?) तसे झाले तर सर्वांचे मतपरिवर्तनहोईल. येथे जुगार चालतो हा गैरसमजही आपोआप दूर होईल. १३० वर्षांचा इतिहास असलेले, मुंबईची ओळख असलेले, शहरातील एक हेरीटेज असलेले रेसकोर्स कायम ठेवल्याचा गवगवा मग हेच नेते करतील...