Saturday, May 21, 2016

उद्धवसाहेब...!

एवढा राग मनात असेल एखाद्या ‘मित्र’पक्षाबद्दल, तर त्याच्या सोबतीने सत्तेत सहभागी तरी कशाला व्हायचे उद्धवसाहेब? खुशाल विरोधात बसायचे अन् करायची शिवीगाळ. पण आपलं कसं झालं ना साहेब, या राज्याची सत्ता एकहाती गवसली नसल्याची सलही मनात बाळगायची, ती संधी हिसकावून घेतली म्हणून भाजपाबद्दल रागही मनात ठेवायचा, त्यांनी सहजपणे सत्तेत सहभागी करून घेतले नाही याची खंत आहे ती वेगळीच, अशात एकीकडे मित्रपक्षही म्हणायचे अन् दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा ओरखडेही काढायचे. स्पष्टवक्तेपणाचा मुलामा देऊन वर पुन्हा त्याचे समर्थनही करायचे, असे चालले आहे बघा शिवसेनेचे. सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्यागत वागण्याची ही तर्‍हा राजकारणात चालतेच, असे आपल्याला वाटत असेलही कदाचित. पण हिंदुत्वाच्या कडव्या समर्थनाच्या शिवसेनेच्या एकेकाळच्या तर्‍हेवर प्रेम करणार्‍यांनाही आता वागण्याच्या तुमच्या या पद्धतीचा वीट येऊ लागला आहे. ‘मातोश्री’त बसून ‘संजय’च्या नजरेतून रणांगणावरचे दृश्य बघण्यापेक्षा अन् ‘संजय’च्याच पद्धतीने राजकारणाचे आकलन करण्यापेक्षा एकदा बाळासाहेबांच्या नजरेतून, त्यांच्या तर्‍हेने या परिस्थितीचे विश्‍लेषण करून बघा! कदाचित तुमचा निष्कर्षही बदललेला असेल अन् चाहत्यांना तुमची नवी तर्‍हाही भावलेली असेल... 
आसामात सत्ता लाभली तरी देशाच्या इतर भागांत कुठे भाजपाला यश मिळालं? तिथेतर कॉंग्रेसप्रमाणे भाजपाचाही धुव्वाच उडाला ना... पाच राज्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे शिवसेना नेते सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेले हे विश्‍लेषण म्हणजे, स्वत:ला गाढे अभ्यासक म्हणवणार्‍या तमाम राजकीय विश्‍लेषकांच्या डोळ्यात त्यांनी घातलेले झणझणीत अंजनच आहे! निकाल लागल्यानंतर सर्व वाहिन्यांवर, देशभरातील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमधून या निकालांचा आपापल्या परीने अभ्यास करून त्याचे अर्थ, अन्वयार्थ सांगण्याचा प्रयत्न तमाम जनांनी करून पाहिला, पण एकालाही त्याची उद्धवसाहेबांसारखी मांडणी करता आली नाही! काय म्हणाले उद्धव साहेब? ते म्हणाले, आसामात भाजपाला यश मिळालं ते ठीक, पण केरळचं काय? तामिळनाडूत कुठे सत्ता मिळाली भाजपाला? तिकडे बंगालमध्ये ‘ममतामुक्त’ राज्याची कल्पना मांडली होती अमित शाहांनी, कुठे यश मिळाले भाजपाला तिकडेही? आणि पुद्दुचेरीत तर कॉंग्रेसचेच सरकार स्थापन होणार ना? मग भाजपाची स्थिती सुधारली कुठे? खरंय् साहेबांचं. एकूण सोळा सदस्यांचे संख्याबळ असलेल्या पुद्दुचेरी नामक एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता स्थापन होण्यासारखं मोठ्ठं यश कॉंग्रेसच्या वाट्याला आलेलं असताना त्याच्या तुलनेत चार पट संख्याबळ असलेल्या आसामात भाजपाला सत्ता मिळाल्याचं काय एवढं कौतुक करायचं? 
भाजपाच्या सोबतीने राहून निवडणुकी लढवताना कायम जास्त जागा लढविण्याच्या अटी ठेवल्या, जास्त जागा जिंकल्या म्हणून शेखी मिरवली, मुख्यमंत्री असो की विरोधी पक्षनेता, महत्त्वाची पदं आपल्या वाट्याला यावीत यासाठी कायम झगडत राहिले. दोन वर्षांपूर्वी हे गणित विस्कटलं अन् शिवसेनेची मोठीच अडचण झाली. मिळून लढायचे तेव्हापेक्षा एकट्याने जास्त जागा लढल्यावरही यश काही तितकेसे हाती लागले नाही, तेव्हापासून तर सैरभैर झालेत या पक्षाचे शीर्षस्थ नेते. कालपर्यंतचा आपलाच मित्रपक्ष आपल्याशिवायही सत्तेत येऊ शकतो, सत्तेत आपल्याला सहभागी करून घ्यायचे की नाही हे दिमाखानं ठरवतो, महाराष्ट्रात कितीतरी दिवसपर्यंत आपल्याला सत्तेबाहेर खितपत ठेवतो, ही बाब अजूनही पचनी पडत नाहीय् या पक्षाच्या नेत्यांना, हेच खरे! 
मध्यंतरीच्या राजकीय स्थित्यंतरांत स्थानिक राजकीय पक्षांचे प्राबल्य विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. देशपातळीवरील प्रमुख राजकीय पक्षांपुढेही स्थानिक पक्षांच्या सोबतीने राजकीय आराखडे तयार करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. आसामपासून तर तामिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून तर आंध्रप्रदेशपर्यंत सर्वदूर त्याचा प्रत्यय सर्वांनी अनुभवला. दिल्लीतली सत्ता टिकवताना विविध राज्यांमधल्या स्थानिक राजकीय पक्षांच्या प्राबल्याला जराही धक्का पोहोचणार नाही, याचीही काळजी नाही म्हणायला सर्वांनाच घ्यावी लागली. शिवसेनेची भाजपासोबतची मुजोरीची भाषा अधिक तीव्र व्हायला तेही एक कारण होतेच, हे साहेबांना तरी कसे नाकारता येईल? तामिळनाडूतले अम्मांचे राज्य असो की मग बंगालमधील दीदींचे, ते असे सहजासहजी उलथून लावता येईल अशी परिस्थिती असती तर मग कारसेवकांनी बाबरी ढांचा उद्ध्वस्त केला असताना त्याचे श्रेय परस्पर लाटून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या शिवसेनेचे नंतरच्या काळात उत्तरप्रदेशात सरकारच स्थापन व्हायला हवे होते, नाही का उद्धवसाहेब? पण राजकारणात असे सारेकाही सहजपणे घडत नसते. वर्षानुवर्षांचे नियोजन लागते. स्थानिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागते. अगदी खालच्या स्तरापर्यंत काम पोहोचवायचे तर तितकाच काळही जाऊ द्यावा लागतो. नुसती भाषणबाजी करून चालत नाही, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करावे लागते. प्रचंड मेहनत घेऊनही वाट्याला आलेले पराभव निमूटपणे पचवावे लागतात, हे निदान उत्तरप्रदेशातील अनुभवावरून तरी शिवसेनेच्या ध्यानात आले असेलच! मग जी उत्तरप्रदेशात स्वत:च्या बाबतीत मान्य होते, तीच बाब बंगालात भाजपाच्या बाबतीत आपल्याला मान्य होत नसेल ना उद्धवसाहेब, तर मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. एकदा आपल्या विचारांची दिशा तपासून बघाच! 
कालपर्यंत जी राज्ये पूर्णपणे डाव्या विचारांनी भारावलेली होती. जाणीवपूर्वक स्वत:ची सेक्युलर प्रतिमा निर्माण करणार्‍या कॉंग्रेसलाही बंगाल आणि केरळात सत्तांतर झालेले बघायला कितीतरी वर्षे जावी लागली. तिथे हिंदुत्वाची पताका फडकवण्यात यश मिळाले, कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपा कार्यकर्त्यांना विधानभवनातील प्रवेश खुला झाला, या यशाचे कौतुक करायचे की पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची खिल्ली उडवायची? जो पक्ष कालपर्यंत कुणाच्या स्पर्धेतही नव्हता, राजकीय विश्‍लेषक ज्याची कालपर्यंत इथल्या राजकारणात गणतीही करीत नव्हते, त्या पक्षाच्या नावापुढे आज निदान तक्त्यात टाकायला आकडे तरी गवसताहेत. हे ‘यश’ तुमच्यालेखी कवडीमोल असेल ना उद्धव साहेब, तर मग भाजपाकडे बघण्याच्या तुमच्या चष्म्याचा असूयेचा रंग बलण्याचीच गरज आता निर्माण झाली आहे! 
तसेही महाराष्ट्रातील सत्ता एकहाती मिळवण्याचे स्वप्न भंगल्यापासून तुमच्या वागण्या-बोलण्यातील तारतम्याचा अभाव सातत्याने जाणवू लागला आहे. सत्तेतील सहभागासाठीची बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अगदी क्षणभरापूर्वी स्वीकारलेले विरोधी पक्षनेतेपद सोडून आपण सत्तेत सहभागी झालो, आजतागायत ती सत्ता कायम आहे, इथल्या सरकारमध्ये शिवसेनेचेही मंत्री काम करताहेत, याचा पूर्णपणे विसर पडल्यागत बोलत आणि वागताहात तुम्ही अन् तुमचे कार्यकर्ते. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांद्वारे भाजपावर केले जातात, तेवढे आरोप तर विरोधी पक्षात असलेले कॉंग्रेसचे नेतेही करीत नसतील! आता कालच्या निवडणूक निकालांच्या विश्‍लेषणाचीही तुमची दिशा तशीच आहे. विरोधकांना शोभणारी. नव्हे, त्यांनाही लाजवणारी. पण मग एवढा राग मनात असेल एखाद्या ‘मित्र’पक्षाबद्दल, तर त्याच्या सोबतीने सत्तेत सहभागी तरी कशाला व्हायचे उद्धवसाहेब? खुशाल विरोधात बसायचे अन् करायची शिवीगाळ. पण आपलं कसं झालं ना साहेब, या राज्याची सत्ता एकहाती गवसली नसल्याची सलही मनात बाळगायची, ती संधी हिसकावून घेतली म्हणून भाजपाबद्दल रागही मनात ठेवायचा, त्यांनी सहजपणे सत्तेत सहभागी करून घेतले नाही याची खंत आहे ती वेगळीच, अशात एकीकडे मित्रपक्षही म्हणायचे अन् दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा ओरखडेही काढायचे. स्पष्टवक्तेपणाचा मुलामा देऊन वर पुन्हा त्याचे समर्थनही करायचे, असे चालले आहे बघा शिवसेनेचे. 
सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्यागत वागण्याची ही तर्‍हा राजकारणात चालतेच, असे आपल्याला वाटत असेलही कदाचित. पण हिंदुत्वाच्या कडव्या समर्थनाच्या शिवसेनेच्या एकेकाळच्या तर्‍हेवर प्रेम करणार्‍यांनाही आता वागण्याच्या तुमच्या या पद्धतीचा वीट येऊ लागला आहे. ‘मातोश्री’त बसून ‘संजय’च्या नजरेतून रणांगणावरचे दृश्य बघण्यापेक्षा अन् ‘संजय’च्याच पद्धतीने राजकारणाचे आकलन करण्यापेक्षा एकदा बाळासाहेबांच्या नजरेतून, त्यांच्या तर्‍हेने या परिस्थितीचे विश्‍लेषण करून बघा! कदाचित तुमचा निष्कर्षही बदललेला असेल अन् चाहत्यांना तुमची नवी तर्‍हाही भावलेली असेल... 

1 comment:

  1. संपूर्ण प्रतिपादन मान्य नाही करता येणार पण , लेखन आवडलं . तुझा स्तंभ दिवसे-दिवस matured होत चालला आही याचा आनंद आहे .

    ReplyDelete