Saturday, May 7, 2016

सैराट...!

मुद्दा, आम्ही लोक काय उचलून धरतो, कशाला भाव देतो, याचा आहे. आमच्या भावभावनांचा कुणीतरी त्याच्या धंद्यासाठी वापर करून घेतो, हाही मुद्दा आहेच. त्यामुळे चिंध्या विकायला सोनं पांघरून बसलेल्यांना कशाला दोष द्यायचा, दोष तर सोनं लेऊन बसणार्‍यांवर भाळणार्‍या ग्राहकांचा आहे. एखादा चित्रपट बघून आमच्या पिढ्या संस्कारित होतात किंवा कुठल्याशा चित्रपटामुळे आमची पोरं बिघडतात, हा ग्रह लोक का करून घेतात? ‘श्यामची आई’ बघून पोरं सुधारली असती, तर मग वृद्धाश्रमं दिसलीच नसती ना आज समाजात! अन् ‘बॉबी’ बघून ती बिघडली म्हणावं तर त्यावेळच्या कोवळ्या वयातली कित्येक माणसं आज समाजकार्याला वाहून घेणारी, लोकांसाठी आयुष्य वेचलं म्हणून नावारूपाला आली असल्याची उदाहरणेही आहेत! त्यामुळे एखाद्या चित्रपटातील कुठल्याशा विषयाचा किती बाऊ करायचा, त्याची किती चिंता वाहायची, त्यावरील चर्चेत किती वेळ दवडवायचा अन् त्यातून व्यापार्‍यांना कमाईची किती संधी उपलब्ध करून द्यायची हे आमचं आम्हीच ठरवण्याची वेळ आली आहे. हे उमगेल तो दिवस भारतीय जनमानसाच्या यशाचा... नाही तर यशोगाथा ‘सैराट’चीच असणार आहे...
दाखल झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘लय भारी’ अन् नाना पाटेकरांच्या ‘नटसम्राट’चा रेकॉर्ड मोडत बारा कोटींचा धंदा करणार्‍या ‘सैराट’ची प्रसिद्धी चकित करणारी आहे. एका शुक्रवारी प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट दुसर्‍या आठवड्याच्या शुक्रवारपर्यंत ‘जगप्रसिद्ध’ झालेला असतो. तो बघण्यासाठी म्हणून लोकांनी चित्रपटगृहांवर उड्या टाकलेल्या असतात. तो बघायला मिळेल की नाही असे वाटून ‘बेचैन झालेल्यांसाठी’ त्याची पायरेटेड सीडीही एव्हाना तयार झालेली असते. तशी सीडी काढणारा कुणीतरी एकजण पोलिसांकरवी पकडलाही जातो. लागलीच त्याची बातमीही होते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा त्या चित्रपटाची चर्चा होते. या चित्रपटाला किती डिमांड आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न होतो... नव्या युगात उपलब्ध असलेल्या प्रसिद्धीच्या झाडून सार्‍या तंत्रांचा सुयोग्य वापर केला, तर कसे ‘यश’ प्राप्त होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सैराट’ आहे. व्यावसायिकांनी ते करणे यात गैर काहीच नाही. त्यावर कुणी आक्षेप नोंदविण्याचेही कारण नाही. इथे मुद्दा आहे तो रसिकांच्या मानसिकतेचा. प्रश्‍न आहे तो, लोकांनी या धंदेवाईकांच्या सापळ्यात अडकण्याचा. दरवेळी कुणीतरी लोकांच्या भावभावनांचा बाजार मांडतो, त्यांच्या खिशाला कात्री लावण्याच्या योजना तयार करतो, आपला माल त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतो अन् भाबडी जनता दरवेळी कुणाच्यातरी योजनेला बळी पडते. संताप खरं तर याचा होतो. 
खरंच ‘सैराट’ इतका भन्नाट आहे? त्याच्या कथेची बीजं इतकी जगावेगळी आहेत? की कालपर्यंत कुणालाच जमली नाही अशी त्या कथानकाची मांडणी नागराज मंजुळेंनी त्यातून केली आहे? जात म्हणा वा मग पैसा, त्याआधारे निर्माण झालेल्या समाजातल्या दोन स्तरांतील मुला-मुलींचा एकमेकांवर जीव जडणे, हळुवारपणे फुलत गेलेल्या त्यांच्यातील नात्यांच्या प्रेमळ गुंफणीची तरुणाईला भुरळ पडणे, यात नवल कुठे आहे? कित्येक चित्रपटांच्या अशा कथानकातूनही काही जगावेगळे चित्र मांडले गेल्याची वस्तुस्थिती नाही. पण नव्या पिढीला भावतील, हळव्या मनाला साद घालतील अशा प्रेमकथांमधील नाजूक गुंतागुंतीला समाजातील जराशा वास्तवाची फोडणी दिली की चित्रपट हमखास चालतो, हे तर या धंद्याचे गमक आहे. जरासे मागे गेले तर बॉबी, एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक पासून तर अगदी परवाच्या रांझणापर्यंत... तरुणांच्या किंवा तरुणाईत पदार्पण करणार्‍यांच्या या चित्रपटांवर पडलेल्या उड्या अगदी तशाच आहे, जशा आज ‘सैराट’वर पडताहेत. 
हॉलीवूडशी स्पर्धा करू बघणार्‍या हिंदी चित्रपटांच्या तोडीचे चित्रीकरण, जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाने सजलेल्या स्टुडिओत झालेले त्याच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग, तसल्याच तंत्रज्ञानाच्या साह्याने झालेली सिनेमॅटोग्रॅफी, अजय-अतुलचे संगीत, चित्रपटातून झळकलेले नवे चेहरे, त्यांनी फुलवलेली प्रेमकहाणी आणि कथेचा या चित्रपटातला हृदयाला भिडणारा, अस्वस्थ करणारा शेवट... यामुळे ‘सैराट’ तुफान चालतोय्, असे कुणी म्हणत असेल, तर ते अर्धसत्य आहे. वास्तव हे आहे की या चित्रपटाच्या निर्मात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेत प्रसिद्धी मिळवणे छान जमले आहे. आणि खरे तर त्यात वावगे काहीच नाही. तमाम हिंदी चित्रपट याच पद्धतीने प्रसिद्धी मिळवून धंदा करीत असतील, तर मराठी चित्रपट निर्मात्यांनी तरी का मागे राहावे? त्यांनीही तसे का करू नये? त्यांनी ते जरूर करावे, पण... तंत्रज्ञानाचा वापर त्यांनीही करावा, धंद्यासाठी आवश्यक त्या क्लृप्त्या त्यांनीही अनुसराव्यात, प्रसिद्धीच्या या तंत्रातून कोट्यवधीची कमाई त्यांनीही करावी. फक्त एकच... असल्या क्लृप्त्या करून मिळालेले पैसे म्हणजे चित्रपटाचे, त्याच्या कथानकाचे, कलावंतांच्या अभिजात अभिनयाचे यश असल्याचे सांगण्याचा प्रयत्न मात्र कुणी करू नये! 
एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसिद्ध व्हावा, या ना त्या निमित्ताने त्याची चर्चा व्हावी, चित्रपट वादग्रस्त ठरावा म्हणून कुठल्याशा तद्दन फालतू मुद्यावर कुणीतरी कोर्टात धाव घ्यावी, या दृष्टीने निर्माता-दिग्दर्शकांनी प्रयत्न करावेत, त्याची पायरेटेड सीडी निघेल याची व्यवस्था करावी अन् त्याविरुद्धची तक्रारही त्यांनीच करावी आणि मग वेगवेगळ्या कारणांनी लोकांच्या त्यावर उड्या पडाव्या, परिणामत: निर्मात्यांचे गल्ले भरावेत, या बाबी आता नव्या राहिलेल्या नाहीत. नवलाईच्या तर मुळीच राहिलेल्या नाहीत. त्याच धर्तीवरची सैराटची सोशल मीडियावरची सकारात्मक आणि नकारात्मक प्रसिद्धी लक्षणीय ठरली आहे. लोकांनीच आपापसात चर्चा केली आणि सैराटच्या यशाचा मार्ग मोकळा करून दिला. कोवळ्या वयात मनात उमलणार्‍या भावभावनांची सैराटमधून झालेली मांडणी, नव्हे, त्यातून झालेले त्याचे उदात्तीकरण स्वीकारणार्‍यांपासून, तर ‘यातून काय संस्कार होतील नव्या पिढीवर’, असा प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांपर्यंत सारेच या चर्चेत सहभागी झाले आहेत. यात काय वावगे असे म्हणणार्‍यांपासून, तर प्रेमाच्या पलीकडे नव्या पिढीला सांगण्यासारखं आमच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही का? याच वयात सवंगड्यांची मोट बांधून शिवबाने हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला होता, याच वयात ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी रचली होती, हे नव्या पिढीला कुणी सांगायचं, असे रोख सवाल आपापल्या मित्र समूहाच्या परिघात एकमेकांना विचारणार्‍या पांढरपेशांनीही ‘सैराट’च्या प्रसिद्धीत खारीचा वाटा उचलला आहे. प्र्रत्यक्षात चित्रपटगृहापर्यंत जाऊन कितींनी सैराट बघितला ठावूक नाही, पण इतरांनी तो बघावा याची तजवीज मात्र यातील बहुतेकांनी केली. खरं तर ‘हेच’ सैराटचे यश आहे. व्हाट्‌सऍपपासून तर ट्वीटरपर्यंत एकूण एक माध्यमाचा पुरेपूर उपयोग करून घेता येणे, याबाबत ‘सैराट’च्या टीमला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. पूर्वीच्या एकाच धाटणीतल्या चित्रपटांच्या तुलनेत अलीकडे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येताहेत. खूप नवनवीन कल्पना, विषय, कथानक, आगळ्या पद्धतीची मांडणी घेऊन या चित्रपटांची निर्मिती होतेय्. त्यात सैराटचाही समावेश कुणी करू इच्छित असल्यास त्यावर आक्षेप नोंदविण्याचे कारण नाही. 
मुद्दा, आम्ही लोक काय उचलून धरतो, कशाला भाव देतो, याचा आहे. आमच्या भावभावनांचा कुणीतरी त्याच्या धंद्यासाठी वापर करून घेतो, हाही मुद्दा आहेच. त्यामुळे चिंध्या विकायला सोनं पांघरून बसलेल्यांना कशाला दोष द्यायचा, दोष तर सोनं लेऊन बसणार्‍यांवर भाळणार्‍या ग्राहकांचा आहे. एखादा चित्रपट बघून आमच्या पिढ्या संस्कारित होतात किंवा कुठल्याशा चित्रपटामुळे आमची पोरं बिघडतात, हा ग्रह लोक का करून घेतात? ‘श्यामची आई’ बघून पोरं सुधारली असती, तर मग वृद्धाश्रमं दिसलीच नसती ना आज समाजात! अन् ‘बॉबी’ बघून ती बिघडली म्हणावं तर त्यावेळच्या कोवळ्या वयातली कित्येक माणसं आज समाजकार्याला वाहून घेणारी, लोकांसाठी आयुष्य वेचलं म्हणून नावारूपाला आली असल्याची उदाहरणेही आहेत! त्यामुळे एखाद्या चित्रपटातील कुठल्याशा विषयाचा किती बाऊ करायचा, त्याची किती चिंता वाहायची, त्यावरील चर्चेत किती वेळ दवडवायचा अन् त्यातून व्यापार्‍यांना कमाईची किती संधी उपलब्ध करून द्यायची हे आमचं आम्हीच ठरवण्याची वेळ आली आहे. हे उमगेल तो दिवस भारतीय जनमानसाच्या यशाचा... नाही तर यशोगाथा ‘सैराट’चीच असणार आहे...

2 comments: