Saturday, March 26, 2016

सामान्य माणसाचा करारी बाणा!

बड्यांच्या चरणी लोटांगण घालणार्‍या, त्यांच्यापुढे विनम्रपणे नतमस्तक होणार्‍या आणि इतरांपुढे मात्र शिरजोरी करू बघणार्‍या सिस्टिमविरुद्धचा रोष त्यातून ध्वनित होतो. राज्यघटना प्रत्यक्षात अमलात आल्यानंतरच्या चौसष्ट वर्षांच्या काळात भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ आणि इथली सर्वसामान्य जनता अधिक सजग होत असल्याचे हे लक्षण मानले पाहिजे. लोक आपल्या अधिकारांबाबत प्रश्‍न विचारू लागले, सत्तेतल्या लोकांच्या चुकांकडे अंगुलिनिर्देश करू लागले की, नाही म्हणायला त्याचा त्रास होतो काही लोकांना, पण भविष्यातील त्याचे परिणाम चांगलेच हाती लागतात. ही प्रगल्भता आणि जागरूकतेचे प्रदर्शन यापूर्वीच झाले असते, तर कदाचित या देशातील यंत्रणेला मूर्ख बनवून लुटण्याची आणि त्याची फसवणूक करून पळून जाण्याची हिंमत कुण्या विजय माल्याची झाली नसती. देशातील कोट्यवधी लोकांच्या मालकीचे करोडो रुपये कुण्या एकाच्या हातात सोपवताना संबंधित बँक अधिकार्‍यांनी दहा वेळा विचार केला असता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. आणि मग चुका करणार्‍या प्रत्येकाला व्यवस्थेकडे बोट दाखवण्याची आयतीच संधी गवसली. आधी त्याच्यावर कारवाई करा मग मला हात लावा, असे म्हणण्याचा अधिकार नकळत त्याला प्राप्त झाला. त्याच्या भूमिकेचे समर्थन करण्याचे कारण नाही. पण, माल्या आणि तत्सम बड्या धेंडांना हात लावण्यात व्यवस्थेला आलेले दुर्दैवी अपयश अधोरेखित करणारी ती भूमिका आहे, हे कोण नाकारणार? 
‘जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथोपर ये लिखा था!’
‘दिवार’ मधला तो प्रसिद्ध डायलॉग आठवतो? लहानपणी हातावर कुणीतरी जबरदस्तीने गोंदवलेली ‘मेरा बाप चोर है’ ही अक्षरे दाखवून अमिताभने शशी कपूरला ऐकवलेला? अगदी त्याच धाटणीतला एक संवाद परवा एका सामान्य मुंबईकर महिलेने रेल्वेच्या तपासणी अधिकार्‍याला ऐकवला. म्हणाली, ‘जा आधी त्या विदेशात पळून गेलेल्या विजय माल्याकडून नऊ हजार कोटी रुपये घेऊन या. मग मी माझ्या दंडाचे पैसे भरेन!’ रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे एवढा एक गुन्हा सोडला तर बाकी त्या महिलेच्या बोलण्यात दम होता. म्हणूनच तिच्या या अजब मागणीची भरपूर चर्चाही झाली. प्रचलित व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थितीविरुद्ध मनात उद्भवलेला संताप व्यक्त करण्याची ही तर्‍हा योग्य की अयोग्य, स्वत: गुन्हा केलेला असताना आपल्यापेक्षा मोठ्या गुन्हेगारावर न झालेल्या कारवाईचे कारण पुढे करून आपली शिक्षा भोगण्यास नकार देण्याची एका सामान्य व्यक्तीची भूमिका योग्य की अयोग्य, हा मुद्दा आहेच. पण, जरासे ताठर होत हा करारी बाणा दाखवण्याची वेळ त्यांच्यावर का यावी, हाही प्रश्‍न आहेच की! 
एखाद्या सामान्य माणसाला पाच-पन्नास हजाराचं कर्ज द्यायचं म्हटलं तरी हजार प्रश्‍न विचारणारे, गठ्‌ठ्यानं कागदपत्रे मागणारे, त्याहीनंतर कर्ज मंजूर केलंच तर निदान शंभर कागदांवर त्याच्या सह्या घेणारे विविध बँकांचे व्यवस्थापन विजय माल्याला चकार शब्दाने विचारणा न करता, नऊ हजार कोटींचे कर्ज विनासायास देऊन मोकळे होते? तो माल्या एक दिवस हे कर्ज बुडवून, सर्वांना मूर्ख बनवून, सर्वांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला तरी त्याचे काहीही वाकडे करू न शकलेली यंत्रणा जेव्हा पाचशे रुपयांचे हेल्मेट घातले नाही म्हणून दिमाखदारपणाने अडवून शंभर रुपयांचा दंड एका सामान्य माणसाच्या खिशातून वसूल करते, तेव्हा त्याचा संताप अनावर होणे स्वाभाविकच. माल्याच्या बाबतीत कारवाई करण्यासंदर्भात हतबल ठरलेल्या यंत्रणेतील अधिकार्‍यांना एका सामान्य माणसाने रेल्वेतून विनातिकीट प्रवास केलेला मात्र अजिबात खपत नाही. त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई करायला ती पूर्ण ताकदीने सरसावते, तेव्हा त्या सामान्य माणसानं या दुटप्पी यंत्रणेवर राग व्यक्त करणेही अगदीच रास्त मानले पाहिजे. कुणीही विनातिकीट प्रवास करणे अयोग्यच. त्यामुळे, त्यासाठीचा दंड भरणे हेही त्याचे कर्तव्य ठरते. पकडले गेल्यानंतर त्या प्रवाशाकडून दंड वसूल करण्याची अधिकार्‍याची कारवाई देखील अगदी योग्य. पण मग माल्याचे काय? आधी त्याने बुडवलेले पैसे वसूल करा मग मी माझ्या वाट्याचा दंड भरेन, अशी अट कुणी घालणे, ही बाब तशी अयोग्य असली, तरी बड्यांच्या चरणी लोटांगण घालणार्‍या, त्यांच्यापुढे विनम्रपणे नतमस्तक होणार्‍या आणि इतरांपुढे मात्र शिरजोरी करू बघणार्‍या सिस्टिमविरुद्धचा रोष त्यातून ध्वनित होतो. राज्यघटना प्रत्यक्षात अमलात आल्यानंतरच्या चौसष्ट वर्षांच्या काळात भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ आणि इथली सर्वसामान्य जनता अधिक सजग होत असल्याचे हे लक्षण मानले पाहिजे. लोक आपल्या अधिकारांबाबत प्रश्‍न विचारू लागले, सत्तेतल्या लोकांच्या चुकांकडे अंगुलिनिर्देश करू लागले की, नाही म्हणायला त्याचा त्रास होतो काही लोकांना, पण भविष्यातील त्याचे परिणाम चांगलेच हाती लागतात. ही प्रगल्भता आणि जागरूकतेचे प्रदर्शन यापूर्वीच झाले असते, तर कदाचित या देशातील यंत्रणेला मूर्ख बनवून लुटण्याची आणि त्याची फसवणूक करून पळून जाण्याची हिंमत कुण्या विजय माल्याची झाली नसती. देशातील कोट्यवधी लोकांच्या मालकीचे करोडो रुपये कुण्या एकाच्या हातात सोपवताना संबंधित बँक अधिकार्‍यांनी दहा वेळा विचार केला असता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. आणि मग चुका करणार्‍या प्रत्येकाला व्यवस्थेकडे बोट दाखवण्याची आयतीच संधी गवसली. आधी त्याच्यावर कारवाई करा मग मला हात लावा, असे म्हणण्याचा अधिकार नकळत त्याला प्राप्त झाला. त्याच्या भूमिकेचे समर्थन करण्याचे कारण नाही. पण, माल्या आणि तत्सम बड्या धेंडांना हात लावण्यात व्यवस्थेला आलेले दुर्दैवी अपयश अधोरेखित करणारी ती भूमिका आहे, हे कोण नाकारणार? भविष्यात असली भूमिका स्वीकारणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे. अन्यायाविरुद्ध आवळलेल्या, आकाशाच्या दिशेने झेपावलेल्या मुठींची संख्या सातत्याने वाढणार आहे. या देशात लोकांच्या मनातला संताप क्वचितच व्यक्त होतो. पण तो व्यक्त झाला की मग भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. आणिबाणी लादणार्‍या हुकूमशहांनाही घरचा रस्ता दाखवायला मग लोक कमी करत नाहीत. आपल्या व्यवस्थेला, यंत्रणेला ही बाब समजून घ्यावी लागणार आहे. आधी माल्याला पकडून आणण्याची भाषा हा लोकांच्या मनातला उद्रेक आहे. सर्वांना वाकुल्या दाखवून माल्याचे हा देश सोडून पळून जाणे, या देशातील जनताजनार्दनाला जराही रुचलेले नसल्याचे त्यातून स्पष्ट होते. त्याबाबतचा संताप लोक या पद्धतीने व्यक्त करू लागले असल्याची बाब यंत्रणा चालविणार्‍या बड्या अधिकार्‍यांनी वेळीच ध्यानात घ्यायला हवी. लोक आता समजदार झाले आहेत. यंत्रणेद्वारे बड्यांसाठी अंथरल्या गेलेल्या पायघड्या अन् इतरांची मात्र त्यांनी चालवलेली छळवणूक, हा भेद एव्हाना लोकांच्या ध्यानात आला आहे. कालपर्यंत लोक मुकाट्यानं अन्याय सहन करायचे. मात्र, भविष्यातही तसेच होत राहील, असे होणे नाही. आता त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला लोक सरसावू लागले आहेत. 
या समाजातले काही लोक पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, बळ यांचा वापर करून कायदा पायदळी तुडवतात अन् यापैकी काहीच गाठीशी नसलेल्यांच्या वाट्याला मात्र फरफट तेवढी येते. ‘त्यांच्या’ पायाशी लोळण घेणारी सिस्टिम ‘यांच्या’बाबतीत मात्र नको तेवढी कठोर होऊन त्याच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रयत्न करते. हा फरक बघतो तेव्हा त्याच्याही नकळत सामान्य माणूस त्या कायद्याचा, तो राबविणार्‍या व्यवस्थेचा तिरस्कार करू लागतो. आधी माल्याला पकडा, आधी त्याच्याकडून पैसे वसूल करून आणा, ही विद्रोहाची भाषा आज कुण्या सर्वसामान्य महिलेच्या तोंडी असली, तरी त्यातील संताप इथल्या लक्षावधी लोकांच्या मनातील भावनांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. कशाच्या तरी बळावर व्यवस्था तुकविण्याची आणि व्यवस्थेनेही कुणातरीपुढे शरणागती पत्करण्याची पद्धत यापुढे सहन केली जाणार नसल्याचा इशाराच त्यातून ध्वनित होतो. सत्तेत कोण, सरकार कोणत्या पक्षाचे याहीपेक्षा प्रचलित व्यवस्थेविरुद्धची ती भावना असते. त्यामुळे ‘आपल्याकडून दंड वसूल करायचा असेल, तर पहिले विजय माल्याकडून नऊ हजार कोटी वसूल करून आणा’, या एका सामान्य महिलेने केलेल्या मागणीतून खरा बोध प्रचलित व्यवस्थेनेच घ्यायचा आहे. कारण आपल्या अधिकारांबाबत जागा झालेला सामान्य माणूस यापुढे अशा पद्धतीने आपल्या करारी बाण्याचे प्रदर्शन वारंवार घडवू लागला, तर त्याचा धोकाही शेवटी व्यवस्थेलाच होणार आहे...

Friday, March 18, 2016

लोकशाहीवरील डावे प्रेम!

या देशात आणिबाणी लागू झाली, तेव्हा इथल्या डाव्या चळवळीतील नेत्यांनी, संधी चालून आली असतानाही, त्या आणिबाणीतून सिद्ध झालेल्या हुकूमशाहीविरुद्ध प्राणपणाने लढा दिल्याचे दाखले इतिहासात कुठेच सापडत नाहीत. पण, आता मात्र त्यांना, त्यांच्या दृष्टीने धोक्यात आलेली लोकशाही शाबूत राखण्यासाठी रस्त्यावर उतरावेसे वाटू लागले आहे. बरं, लोकशाहीरक्षणासाठी ओरड कुणाची चालली आहे बघा! ज्या विचारवंतांच्या विचारांवर, या चळवळीचे अध्वर्यू आणि त्यातील कार्यकर्ते भारतात त्यांच्या पखाली वाहताहेत, ते तमाम जन लोकशाहीचे समर्थक असल्याचा इतिहास नाही. उलट, त्या त्या देशांच्या हुकूमशहांनी केलेल्या मानवाधिकाराच्या हननाचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. १९२० ते १९५० च्या दशकांत स्टॅलिनच्या नेतृत्वात माणसं मारली जाण्याचे प्रसंग असोत, की मग माओच्या माध्यमातून झालेला त्याहीपेक्षा मोठा नरसंहार असो... जिवंत माणसांची ही कत्तल ज्यांना मान्य आहे, त्या स्टॅलिन आणि माओच्या विचारांच्या पखाली वाहणार्‍या भोईंनी कशाला उगाच लोकशाही व्यवस्थेचे गोडवे गायचे? ज्यांना माणसांची ती कत्तल कधी गैर वाटली नाही, ज्यांना आणिबाणीच्या रूपात अंमलात आलेल्या हुकूमशाहीविरुद्ध कधी तीव्रतेने लढा द्यावासा वाटला नाही, आवाज काढावासा वाटला नाही, त्या तमाम मंडळींनी अचानक आरंभलेले लोकशाही व्यवस्थेचे कडवे समर्थन नाही म्हणायला अनाकलनीयच आहे. आता सध्याच्या काळात तर नरसंहार नाही की आणिबाणी नाही; तरीही या देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याची त्यांना अचानक होऊ लागलेली जाणीवही आश्‍चर्यजनक म्हणावी अशीच आहे. 
प्रकरण, गेल्या काही दिवसांत या देशातले वातावरण ढवळून काढण्यासाठी काही लोकांनी नियोजनबद्ध रीत्या आरंभलेल्या उपक्रमांंतर्गत सुरू झालेल्या पुरस्कार वापसीचे असो, की मग हैदराबादेतील वेमुलाच्या चितेवर काहींनी आपल्या घाणेरड्या राजकारणाची पोळी भाजण्याचे. प्रकरण, कन्हैयाच्या नेतृत्वात जेएनयूमध्ये लागलेल्या देशविरोधी घोषणांचे कडवे समर्थन करण्याचे असो की, मग नक्षल्यांच्या समर्थनार्थ खुलेपणाने रस्त्यावर उतरण्याचे... इथल्या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली, या देशातली लोकशाही कधी नव्हे एवढी धोक्यात आली असल्याची जी आवई उच्चरवात उठविणे सुरू केले आहे; डाव्या चळवळीतील नेते, कार्यकर्ते, विचारवंत ज्या तर्‍हेने लोकशाहीच्या समर्थनार्थ कंबर कसून मैदानात उतरले आहेत ते बघितल्यानंतर, त्यापैकी कुणालाच नको असलेले देशातले सध्याचे सरकार उलथवून लावण्यासाठी अंमलात येत असलेला हा कुणाचा तरी कट असल्याचा आणि अतिशय पद्धतशीरपणे तो अंमलात आणला जात असल्याचा दाट संशय मनात आल्याशिवाय राहत नाही! वेमुला असो की मग कन्हैया, कालपर्यंत अज्ञात असलेली ही नावे कुणाच्या तरी लेखी आज अचानक ‘मोठी’ झाली आहेत. एका रात्रीतून त्यांना ‘स्टार’ बनविण्याचा कुणीतरी घेतलेला ध्यास आश्‍चर्यकारक रीत्या साकार झालेला दिसतो आहे. 
खरं तर जेएनयूत विद्यार्थ्यांची मागणी असलेला कार्यक्रम नाकारला कुणी आणि त्यासाठीचा त्यांचा संताप व्यक्त झाला कुणाविरुद्ध, ही विसंगती कुणीच सांगायला तयार नाही. एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी, विद्यार्थ्यांची एखादी मागणी नाकारली, तर विद्यार्थी कुणाविरुद्ध रोष व्यक्त करतील? थेट देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध? डायरेक्ट देशाविरुद्ध? त्यांच्या अजेंड्यावर विद्यापीठाचे ते परवानगी नाकारणारे अधिकारी कुठेच नाहीत, तर त्यांच्या अजेंड्यावर थेट नरेंद्र मोदी आहेत! म्हणूनच इथे संशय निर्माण होतो. वेमूला असो की कन्हैया, या प्रकरणांतून वादळ निर्माण करण्याची कुणाची तरी योजना त्यातून अतिशय व्यवस्थितपणे आकाराला येत असल्याची बाब नकळत जाणवून जाते. योजना तयार करणार्‍यांची डोकी पडद्यामागे ठेवून, बिनचेहर्‍याची तरुणाई समोर करून, कुणाचे तरी षडयंत्र इथे कार्यप्रवण झाले असल्याच्या निष्कर्षाप्रत नाइलाजास्तव यावे लागते. 
कालपर्यंत सतत सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी, सतत सत्तेबाहेर राहिलेल्या डाव्यांशी जुळवून घेताना, त्यांना विविध संस्थांमधली पदं बेमालूमपणे बहाल केली होती. त्यामुळे सत्ते‘बाहेर’ असले, तरी सत्ते‘जवळ’ राहण्याची संधी त्यांना कायम लाभत आली होती. आता तिही संधी हिरावली जातेय् म्हटल्यावर त्यांचा तिळपापड होणे स्वाभाविकच! त्यामुळे त्यांना आता या देशातली लोकशाही व्यवस्था धोक्यात आली असल्याचे अचानक जाणवू लागले आहे. या देशात आणिबाणी लागू झाली, तेव्हा इथल्या डाव्या चळवळीतील नेत्यांनी, संधी चालून आली असतानाही, त्या आणिबाणीतून सिद्ध झालेल्या हुकूमशाहीविरुद्ध प्राणपणाने लढा दिल्याचे दाखले इतिहासात कुठेच सापडत नाहीत. पण, आता मात्र त्यांना, त्यांच्या दृष्टीने धोक्यात आलेली लोकशाही शाबूत राखण्यासाठी रस्त्यावर उतरावेसे वाटू लागले आहे. बरं, लोकशाहीरक्षणासाठी ओरड कुणाची चालली आहे बघा! ज्या विचारवंतांच्या विचारांवर, या चळवळीचे अध्वर्यू आणि त्यातील कार्यकर्ते भारतात त्यांच्या पखाली वाहताहेत, ते तमाम जन लोकशाहीचे समर्थक असल्याचा इतिहास नाही. उलट, त्या त्या देशांच्या हुकूमशहांनी केलेल्या मानवाधिकाराच्या हननाचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. १९२० ते १९५० च्या दशकांत स्टॅलिनच्या नेतृत्वात माणसं मारली जाण्याचे प्रसंग असोत, की मग माओच्या माध्यमातून झालेला त्याहीपेक्षा मोठा नरसंहार असो... जिवंत माणसांची ही कत्तल ज्यांना मान्य आहे, त्या स्टॅलिन आणि माओच्या विचारांच्या पखाली वाहणार्‍या भोईंनी कशाला उगाच लोकशाही व्यवस्थेचे गोडवे गायचे? ज्यांना माणसांची ती कत्तल कधी गैर वाटली नाही, ज्यांना आणिबाणीच्या रूपात अंमलात आलेल्या हुकूमशाहीविरुद्ध कधी तीव्रतेने लढा द्यावासा वाटला नाही, आवाज काढावासा वाटला नाही, त्या तमाम मंडळींनी अचानक आरंभलेले लोकशाही व्यवस्थेचे कडवे समर्थन नाही म्हणायला अनाकलनीयच आहे. आता सध्याच्या काळात तर नरसंहार नाही की आणिबाणी नाही; तरीही या देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याची त्यांना अचानक होऊ लागलेली जाणीवही आश्‍चर्यजनक म्हणावी अशीच आहे. 
भारतीय लोकशाही व्यवस्था गंभीर संकटात सापडली असल्याची आवई ज्या पद्धतीने स्वयंघोषित पुरोगाम्यांची जमात उठवीत आहे, ज्या तर्‍हेने या देशात अराजक माजले असल्याची बाब युवकांना पुढे करून ठासून सांगण्याचे प्रयोग चालले आहेत, भाषणातून गरळ ओकत, थेट पंतप्रधानांना आव्हान देणारा कुणीतरी एक कन्हैया नावाचा तिशीतला ‘विद्यार्थी’, ज्या योजनेतून एका क्षणात नेता होतो, हा सारा प्रकार बघितल्यानंतर या प्रकरणात ‘डोके’ कुणाचे तरी वेगळ्याचेच असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना राजकीय वार करून परास्त करू शकलो नाही, त्या दिल्लीतील विद्यमान सत्ताधार्‍यांना बिनचेहर्‍याच्या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून हादरविण्याचे हे षडयंत्र आहे. अन्यथा, पंचेचाळीस मिनिटांच्या एका भाषणातून थेट स्टार प्रचारक होण्याची संधी एखाद्याला चालून येणे, हा काही सहज जुळून आलेला योगायोग वाटत नाही. ज्यांना आणिबाणीचे वावडे वाटले नाही, त्यांना देशाविरुद्ध घोषणा देणार्‍यांविरुद्धची कारवाई म्हणजे हुकूमशाही असल्याचा भास व्हावा, ही बाबही आश्‍चर्यजनकच म्हटली पाहिजे. म्हणूनच वैचारिक मुलामा लाभलेल्या या घातक लढाईमागील चेहरे जगजाहीर झाले पाहिजेत. त्यामागील त्यांचे कारस्थान आणि हेतूही उघड झाले पाहिजेत. आज लोकशाहीच्या नावाने गळा काढणार्‍या या सर्वांना हुकूमशाहीचे वावडे केव्हापासून वाटू लागले आहे? अलीकडच्या काळात त्यांच्यात हे वैचारिक परिवर्तन घडले असेल, तर ते स्वागतार्हच आहे. पण, हे वावडे अस्तित्वातच नसलेल्या हुकूमशाहीबाबतचे असते तेव्हा त्यांची भूमिका अधिक संशयास्पद ठरते. मुळात ज्यांनी केरळात, त्यांना न पटणार्‍या विचारांच्या माणसांच्या सरेआम कत्तली केल्या, इंदिराहत्येनंतरच्या शिखांवरील अत्याचाराविरुद्ध ज्यांना ब्र काढता आला नाही, त्यांना जेएनयूमधील राष्ट्रविरोधी घोषणांविरुद्धच्या कारवाईचा, बेंबीच्या देठापासून ओरडत निषेध करावासा वाटतो, हीच बाब मुळात आक्षेपार्ह आहे. त्या वेळी ‘त्यांना’ राष्ट्रविरोधी घोषणा देताना जराशी लाज वाटली नाही, आता त्यांचे समर्थन करताना ‘यांनी’ कंबरेचे सोडलेले दिसते! बिनबोभाटपणे असला धिंगाणा घालण्याची मुभा म्हणजेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याचा त्यांचा दावा त्यांनाच लखलाभ! मात्र, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला हा दुटप्पीपणा पुरता लक्षात आला आहे. लोकशाहीबाबत यांना अचानक आलेले प्रेमाचे भरतेही कुणाच्याच नजरेतून सुटलेले नाही. त्यातील नौटंकी दुर्लक्षित राहण्याचा तर प्रश्‍नच नाही, पण हळूहळू त्यांच्या कटकारस्थानाचे पितळही आता उघडे पडू लागले आहे...

Friday, March 4, 2016

... तेथे कर माझे जुळती!

शिवना नावाच्या छोट्याशा गावातील ही घटना. दोघे भाऊ. कुटुंबाचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहताना ‘मोठा माणूस’ बनण्याचे थोरल्याचे स्वप्न केव्हाच धुळीस मिळाले होते. निदान धाकट्याने तरी त्या स्वप्नांची पूर्ती करावी, आकाशाला गवसणी घालावी, जग मुठीत घ्यावे. मूठभरच असली, तरी त्या स्वप्नांनी सारा आसमंत व्यापून टाकावा. आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी मोठ्या भावाने बघितलेल्या स्वप्नांशी पैज लावायला धाकटाही एव्हाना तयार झालेला. त्यानं स्वप्नं बघायची, यानं ती गाठण्याचा चंग बांधायचा. स्वत:च्या वाट्याला आलेली धूळधाण विसरून त्यानं, याचं आयुष्य फुलवण्याची गाठ मनाशी बांधायची. याच्या डोळ्यांनी त्यानी स्वप्नं बघायची. एकाची तर झाली, पण दुसर्‍याच्या आयुष्याची वाताहात होऊ नये म्हणून दोघांनी मिळून धडपड करायची... असं छान चाललं होतं दोन भावांचं. पण बहुधा असं सारं चांगलं चांगलं चाललेलं नियतीला कधीच भावत नाही. संधी मिळेल तेव्हा त्यात खोडा घालण्याचा डाव ती साधतेच! इथेही तसंच घडलं. धाकट्यासाठी चाललेली थोरल्याची धडपड एक दिवस थांबली. इहलोकीची त्याची यात्रा अर्ध्यावरच संपली. बरं, घडीही बघा कशी परीक्षेची निघाली, घरात मोठ्या भावाचे कलेवर पडलेले अन् दिवस लहान्याच्या दहावीच्या पहिल्या पेपरचा! गहन प्रश्‍न उभा ठाकलेला. शाळेत जाऊन पेपर सोडवायचा, की अंत्यसंस्कार पहिले आटोपायचे? बहुतेकदा बड्या व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य माणसं आपल्या समस्यांवरचे उपाय अत्यंत साधेपणाने, परिस्थितीला साजेसे असे शोधतात. कांदा महाग झाला की तो विकत कसा घ्यायचा या विवंचनेत मध्यमवर्गीय लोक सापडलेले असताना, गरीब माणूस मात्र कांद्याविना निभवण्याचा निर्णय घेऊन क्षणात मोकळा होतो.
आज पाहिले मरण
गेला भांबावून प्राण
माझ्या ज्ञानाचे कुंपण
स्मशानात...
बा. सी. मर्ढेकर म्हणतात. एखाद्या जिवलगाचा, जवळच्या माणसाचा मृत्यू मन हेलावून टाकतो. सैरभैर करतो. अंतर्मुख करतो. काय करावं काही सुचत नाही अशा प्रसंगात. पण, अशाही परिस्थितीत ज्याला मनाची स्थिती अविचल राखता आली, याही स्थितीत ज्याला अवधान राखता आले, तो खरंच ग्रेट! अविरत साधनेतून सिद्ध झालेल्या संन्यस्त जीवनात कदाचित एखाद्याला असे ठामपणे, निग्रहाने उभे राहता येईलही कदाचित, पण सामान्य माणसाचं काय? त्यातही त्याग, बलिदान, तप, साधना अशा बोजड शब्दांशी ज्यांचा किंचितसाही संबंध कधी आला नाही, अशा कोवळ्या वयातील एका बालकाने, त्याच स्थितप्रज्ञतेचा प्रत्यय घालून देण्याचा प्रसंग घडतो, तेव्हा थोड्या थोड्या गोष्टींनी बिथरणार्‍या, मृत्यूच्या घटनांचा भावनिक व्यापार मांडणार्‍या तमाम मंडळीला आपसूकच चपराक बसते. 
औरंगाबादजवळच्या शिवना नावाच्या छोट्याशा गावातील ही घटना. दोघे भाऊ. कुटुंबाचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहताना ‘मोठा माणूस’ बनण्याचे थोरल्याचे स्वप्न केव्हाच धुळीस मिळाले होते. निदान धाकट्याने तरी त्या स्वप्नांची पूर्ती करावी, आकाशाला गवसणी घालावी, जग मुठीत घ्यावे. मूठभरच असली, तरी त्या स्वप्नांनी सारा आसमंत व्यापून टाकावा. आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी मोठ्या भावाने बघितलेल्या स्वप्नांशी पैज लावायला धाकटाही एव्हाना तयार झालेला. त्यानं स्वप्नं बघायची, यानं ती गाठण्याचा चंग बांधायचा. स्वत:च्या वाट्याला आलेली धूळधाण विसरून त्यानं, याचं आयुष्य फुलवण्याची गाठ मनाशी बांधायची. याच्या डोळ्यांनी त्यानी स्वप्नं बघायची. एकाची तर झाली, पण दुसर्‍याच्या आयुष्याची वाताहात होऊ नये म्हणून दोघांनी मिळून धडपड करायची... असं छान चाललं होतं दोन भावांचं. पण बहुधा असं सारं चांगलं चांगलं चाललेलं नियतीला कधीच भावत नाही. संधी मिळेल तेव्हा त्यात खोडा घालण्याचा डाव ती साधतेच! इथेही तसंच घडलं. धाकट्यासाठी चाललेली थोरल्याची धडपड एक दिवस थांबली. इहलोकीची त्याची यात्रा अर्ध्यावरच संपली. बरं, घडीही बघा कशी परीक्षेची निघाली, घरात मोठ्या भावाचे कलेवर पडलेले अन् दिवस लहान्याच्या दहावीच्या पहिल्या पेपरचा! गहन प्रश्‍न उभा ठाकलेला. शाळेत जाऊन पेपर सोडवायचा, की अंत्यसंस्कार पहिले आटोपायचे? बहुतेकदा बड्या व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य माणसं आपल्या समस्यांवरचे उपाय अत्यंत साधेपणाने, परिस्थितीला साजेसे असे शोधतात. कांदा महाग झाला की तो विकत कसा घ्यायचा या विवंचनेत मध्यमवर्गीय लोक सापडलेले असताना, गरीब माणूस मात्र कांद्याविना निभवण्याचा निर्णय घेऊन क्षणात मोकळा होतो. कुसुमावती देशपांडे यांच्या ‘कला धोबीण’मधूनही सामान्य माणसांनी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निवडलेल्या, त्यांच्यादृष्टीने सुयोग्य अशा उपायांचा प्रत्यय येतो. कुसुमावतींच्या कथेतील कला धोबीण, नवरा मेल्यावर तिसर्‍याच दिवशी, परीटघडीचे कपडे पोहोचवायला अन् दुसरे कपडे मिळवायला घरोघरी जाऊ लागते, तेव्हा कुसुमावतींना प्रश्‍न पडतो की, एवढ्या दु:खाच्या प्रसंगात हिला कसं शक्य झालं असेल हे? पण, ती कला धोबीणच त्याचं उत्तर देते. ती म्हणते, ‘‘बाई, नवरा मेल्याच्या दु:खात दोन दिवस गेले. पण, वीतभर पोटाची खळगी भरायची, अठराविश्‍वे दारिद्‌‌र्य असलेल्या घराचा सारा डोलारा सांभाळायचा तर दु:खात रमून कसे चालेल? परिस्थितीशी लढायला पदर कंबरेला खोचून मैदानात तर उतरावेच लागेल ना?’’ कुसुमावतींनी विचार केला, आपण मध्यमवर्गीय माणसं कायम उत्सवात रमणारी. अगदी मृत्यूचाही सोहळा साजरा करायला आवडते आपल्याला. पण, ज्यांचा घास हाता-तोंडाशी असतो, त्यांना कसे परवडणार असले सोहळे अन् त्यात रमणे? म्हणूनच कला धोबिणीने शोधलेला तिच्या दु:खावरचा व्यवहारी उपाय अधिक महत्त्वाचा. तिला आणता आलेलं अवसान उसनं नव्हतंच. परिस्थितीनं तिला शिकवलं होतं. त्यातूनच तिला ती हिंमत लाभली होती. 
शिवन्यातल्या संदीप सोनवणेनंही स्वत:पुरता निर्णय घेत, वाट्याला आलेल्या संकटावर मात केली. आधी अंत्यसंस्कार की आधी परीक्षेचा पेपर, या प्रश्‍नाचे उत्तर त्याने स्वत:पुरते निश्‍चित केले होते. पहिले दहावीचा पेपर मग अंत्यसंस्कार. निर्णय झाला. त्याची अंमलबजावणीही झाली. कुठलाही तत्त्वांचा मुलामा नाही, बडेजाव नाही, घेतलेल्या निर्णयाचा गवगवा नाही. एरवी बड्याबड्या मंडळीलाही एवढा मोठा निर्णय इतक्या सहजपणे घेणे शक्य झाले नसते कदाचित! मृत्यू म्हटला की, हळवी होतात माणसं. अनेकदा बेभान होऊन वागतात अशा प्रसंगात लोक. अशा कठीण प्रसंगी अवधान राखणं सर्वांना जमतेच असं नाही. सोनवणे कुटुंबातील संदीपने मात्र धीरगंभीर वृत्तीचा परिचय दिला. आधी कर्तव्य मग भावना, असा क्रम ठरवताना त्याला जराही अडचण जाणवली नाही. 
‘मढे झाकोनिया करीती पेरणी’ या तुकोबांच्या अभंगातून ध्वनित होणारा अर्थ तरी वेगळे काय सांगतो? घरात कुणाचा मृत्यू झाला असेल, तर मढे झाकून ठेवत शेतातल्या पेरणीचे कर्तव्य प्रथम पार पाडणार्‍या बळीराजाची भूमिका, उपरोक्त प्रसंगात संदीपने पार पाडली आहे. ज्यानं जिवापाड जपलं, क्षितिजापलीकडली स्वप्नं आपल्यासाठी बघितली, ज्याची सारी धडपड केवळ आपल्यासाठी होती, त्या थोरल्या भावाच्या स्वप्नांची पूर्तता परीक्षेचा पेपर न देऊन कशी होऊ शकणार होती? संदीपनं ते जाणलं. पहिले परीक्षेचा पेपर देण्याचा निर्णय त्यानं घेतला. वय, गुण, ज्ञान, अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तीलाही हा, एरवी छोटासा वाटणारा, पण प्रत्यक्षात खूप मोठा असलेला निर्णय घेता आला असताच याची ग्वाही देता येत नाही. नियतीने निर्माण केलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे सर्वांनाच जमते असे नाही. 
केसरीचा अग्रलेख लिहीत असतानाच, आजारी पडलेल्या पत्नीच्या निधनाची वार्ता समजते. माहिती समजल्यावर माडीवरून खाली उतरलेले लोकमान्य, ‘‘परमेश्‍वराची इच्छा!’’ एवढे बोलून पुन्हा माडीवर जाऊन राहिलेला अग्रलेख पूर्ण करतात आणि लेखन पूर्ण झाल्यावर मग पार्थिवाबाबतचे अन्य विधी पूर्ण करतात. ही बाब कठीण परिस्थितीत मनाची अविचलता कायम राखण्यात मिळालेल्या एखाद्याच्या यशाचे सामर्थ्य सिद्ध करणारी असते. हे सामर्थ्य साधनेतून, अनुभवसंपन्नतेतून लाभत असेल कदाचित! टिळकांच्या ठायी ते होते. अन्यथा नुसती वार्ता एकून कुणी बेचैन झाले असते. धावाधाव, रडारड सुरू झाली असती. पण, त्याही परिस्थितीत हातातल्या कामाला प्राधान्य देऊन, प्राधान्यक्रमाने ते पूर्ण करणारे टिळक विरळाच! तुलना नाही, पण शिवन्यातला संदीप परवा असाच वागला- मोठा माणूस असल्यासारखा. एरवी त्याच्या मोठेपणाची नोंद कुणी घेईलच याची शाश्‍वती नाही. पण, सार्‍या जगाने दखल घ्यावी असंच त्याचं वागणं होतं त्या दिवशीचं- निश्‍चल. निरलस. ठाम. धीरगंभीर... एका सामान्य माणसाच्या असामान्यत्वाला सलाम करायला लावणारं! जराशा दु:खाने अस्थिर होणार्‍या, बेलगाम होत आपल्या वेदनेचा बाजार मांडणार्‍या, त्या दु:खातच रममाण होणार्‍यांच्या गर्दीला चपराक लगावणारं...!