Monday, November 23, 2015

अस्वस्थ शहरे आणि सचिंत गावे

इथल्यांना तिथल्या अव्यवस्थेचा तिटकारा तर तिथल्यांना इथल्या झगमगाटाचे आकर्षण. ते शेतावरच्या मेहनतीत रमलेले तर हे यांच्या धावपळीत. खूश कोणीच नाही. लोडशेडिंगने पिचलेलेही नाखूश अन् विजेच्या झगमगाटात रमलेलेही नाखूशच! गावाकडची युवा पिढी चौकावरच्या पान टपरीवर चकाट्या पिटत वेळेचा अपव्यय करताना दिसते, तर शहरातली तरुणाई बीयरबार किंवा हुक्का पार्लरमध्ये धूर हवेत सोडत बिनधास्तपणे पैशाचा अपव्यय करताना. ही पिढी शार्प आहे, हुशार आहे. संगणक हाताळणीत ती निपूण आहे. पण तरीही तिच्या व्यवहारकुशलतेबाबत प्रश्‍नचिन्ह आहेतच. ‘एन्जॉयमेंट’च्या पलीकडे आयुष्य जगण्याची दुसरी कुठलीच कारणे या पिढीतील सदस्यांना सापडत नसतील, सामूहिक बलात्कार हे कुणाच्या बेपर्वा वागणुकीचे परिणाम असतील, अविवाहीत मुली गर्भवती राहण्याच्या प्रमाणात झालेली आश्‍चर्यजनक वाढ हा या कथित आधुनिक युगातील ‘मोकळ्या’ वर्तणुकीचा परिणाम असेल, तर मग शहरात आलेल्या एका खेडूत शेतकर्‍याला गावातल्या ‘फसले’पेक्षाही शहरातील ‘नस्ले’ अधिक संकटात असल्याचे जाणवले असेल, तर दोष कुणाचा?
एक किसान गाव छोडकर शहर आ गया था
फिक्र वहा भी थी, फिक्र यहा भी है|
वहा तो सिर्फ फसले खतरे मे थी
यहा तो पुरी नस्ले खतरे मे है...॥

शहरी वातावरणाचे सध्याचे भीषण वास्तव मांडणार्‍या या चार ओळी कुठेतरी वाचण्यात आल्या. त्यावर जरासा विचार करावा म्हटलं तर परवा न्यायालयात महिलांवरील बलात्काराबाबत करण्यात आलेल्या एका युक्तिवादाच्या बातमीचे कात्रण कुणीतरी समोर आणून ठेवले. पूर्वीच्या काळात घातले जात नव्हते अशा, महिलांच्या आताच्या सर्व प्रकारच्या आधुनिक कपड्यांमध्ये बलात्काराची कारणे शोधण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला होता. हे सारे कमी होते की काय म्हणून एका अहवालातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. महिलांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या पुरुषांचा या देशातला वर्षाकाठचा आकडा आता दीड लाखांच्या घरात पोहोचला आहे... 
शेतकर्‍यांच्या आत्महत्या, त्यामागील कारणे, त्याची कारणमीमांसा, त्यावरचे उपाय याबाबतची चर्चा तर नेहमी होतेच अलीकडे. अशा प्रकरणात बर्‍याचदा सरकारी यंत्रणेवर दोषारोपण करून मोकळे होता येते आपल्याला. पण दिवसागणिक बिघडत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेचे दोष कुणाला द्यायचेत, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र गवसत नाही कित्येकदा. शेतकरी आत्महत्येमागे केवळ सिंचनाचा अभाव, डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, सावकारी पाश एवढीच कारणे आहेत, की दूरचित्रवाणी, चित्रपटातून सतत झळकणार्‍या स्वप्नवत झगमगाटाच्या मागे धावण्याच्या शर्यतीत पदरी पडलेल्या अपयशाचाही तो एक परिणाम आहे, याचाही विचार व्हायला हवा. जे त्याच्या कधी वाट्याला आलं नाही, जे वाट्याला येण्याची कल्पना तो स्वप्नातही करू शकत नाही ते, दिवस-रात्र काबाडकष्ट करूनही वाट्याला न आलेलं सुख इतर कुणीतरी उपभोगताना दिसलं, त्यातही राजकीय क्षेत्रातल्या नेत्यांची आपल्याच जीवावर विनासायास चाललेली चैन बघितली, सरकारी तिजोरीतल्या पैशावर चाललेली सरकारी अधिकार्‍यांची मौज बघितली की, तो नैराश्याच्या गर्तेत जाणं स्वाभाविकच. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत निदान व्यवस्थांचा अभाव, गरिबी, भ्रष्टाचार अशी वेगवेगळी कारणं तरी गवसतात. पण दीड लाख पुरुषांच्या आत्महत्यांमागे कुठली कारणं पुढे करायची? कारण यातील एक घटक सुविधांच्या आणि पैशाच्या अभावाच्या कारणांमुळे आत्महत्या करू पाहतोय्, तर दुसरा घटक त्या सार्‍या बाबी उपलब्ध असतानाही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय्.
हा दरदिवशी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे? तो केवळ पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचा परिपाक आहे? आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही आमच्याही नकळत अंगीकारलेल्या जीवनशैलीच्या परिणामस्वरूप ही स्थिती उद्भवली आहे? की विभक्त कुटुंब व्यवस्था आणि एकूणच संस्कारांच्या अभावातून घडतोय् हा सारा प्रकार?
तब्बल ६८ टक्के प्रकरणात बलात्कारांची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली जात नसलेल्या या देशात बलात्काराची दाखल झालेली प्रकरणे २.९३ लाखांच्या घरात पोहोचतात, हे कशाचे लक्षण मानायचे? इथे बाता तर सारे आधुनिकतेच्या मारतात. स्त्रीयांना समान हक्क बहाल करण्याबाबतही अलीकडे सकारात्मक भूमिका घेताना दिसतो हा समाज. तिला ‘चूल आणि मूल’च्या चौकटीबाहेर काढण्याबाबतही ना नाहीच इथे कुणाची. ‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते’चा मंत्र जपणारेही आम्हीच असतो. मग बलात्काराच्या प्रसंगात सहभागी होणार्‍या नराधमांना नाही होत यापैकी कुठल्याच गोष्टीचे स्मरण? आणि आता तर न्यायालयापुढे युक्तिवाद करताना मुलींनी अंगावर घातलेल्या कपड्यांवर ठपका ठेवत नराधमांच्या बेमूर्वतखोर वागणुकीचे आडमार्गाने समर्थन करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय्. बलात्काराच्या प्रकरणात इथला सामान्य माणूस कसा विचार करतो, हे जाणून घेण्यासाठी परवा मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रकांत पालव यांची बाजू ऐकून घेतली तेव्हा हे तर्कट न्यायाधीशांच्या कानावर पडले. हे तर्क जर खरे मानले आणि महिलांवरील बलात्काराची कारणं या एवढ्या छोट्याशा चौकटीत बंदिस्त केली तर मग, शारीरिक संबंधांना नकार देणार्‍या एका पुतण्यावर काकूने रागाच्या भरात ब्लेडने वार केल्याच्या परवाच्या त्या नालासोपार्‍यातल्या घटनेतनं कुठला अर्थ काढायचा?
एकूणच, उपरोक्त ओळीतील ‘पुरी नस्ले खतरेमे’चा इशारा देणारीच परिस्थिती आहे.
कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली. पैश्याच्या हव्यासापोटी म्हणा वा मग गरजेपोटी, पण माणसं कामासाठी घराबाहेर पडली अन् इकडे घरातली मुलं मायबापांच्याच प्रेमाला पारखी झाली. मुलांचे विश्‍व मोबाईलवरील गेम्स-इंटरनेट-टीव्हीने व्यापले, नाश्त्याची जागा जंक फूडने घेतली अन् आईची जागा आयाने. दिवसदिवसभर आई-वडील उपस्थित नसलेल्या, आजी-आजोबांचा पत्ता नसलेल्या घरात संस्कार होतील कसे? अन् ते करणार कोण? शिवाय काळाचा महिमा आहेच. जे कालपर्यंत बोलायलाही कुणी धजावत नव्हतं, ते सारं आज इंटरनेटवर बघायला सहज उपलब्ध आहे. ‘हम दो-हमारा एक’च्या कल्चरने नात्यांची वीण केव्हाच सैल केली आहे. वाचन कमी झालेले. व्यवहार काडीचा कळत नसला तरी नव्या पिढीचे मोबाईल-संगणक लीलया हाताळणे अधिक कौतुकाचे ठरू लागले. रात्री उशिराची बारमधली गर्दी आणि तरुणाईच्या नजरेत वेल्थ, वाईन, सेक्सच्या चौकटीत बंदिस्त झालेले एन्जॉयमेंटचे संदर्भ...
एकीकडे शहरातल्या माणसांना खेडी बकाल झाल्याचे जाणवते, तिथे ‘काहीच राहिले नसल्याची’ प्रतिक्रिया तो सहजपणे व्यक्त करतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठीही तो या परिस्थितीलाच दोषी मानतो आणि त्याच खेड्यातून शहरात आलेल्या माणसाला मात्र त्याच्या तुलनेत शहरातले मानवी जीवन अधिक धोक्यात आले असल्याच्या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते! इथल्यांना तिथल्या अव्यवस्थेचा तिटकारा तर तिथल्यांना इथल्या झगमगाटाचे आकर्षण. ते शेतावरच्या मेहनतीत रमलेले तर हे यांच्या धावपळीत. खूश कोणीच नाही. लोडशेडिंगने पिचलेलेही नाखूश अन् विजेच्या झगमगाटात रमलेलेही नाखूशच! गावाकडची युवा पिढी चौकावरच्या पान टपरीवर चकाट्या पिटत वेळेचा अपव्यय करताना दिसते, तर शहरातली तरुणाई बीयरबार किंवा हुक्का पार्लरमध्ये धूर हवेत सोडत बिनधास्तपणे पैशाचा अपव्यय करताना. ही पिढी शार्प आहे, हुशार आहे. संगणक हाताळणीत ती निपूण आहे. पण तरीही तिच्या व्यवहारकुशलतेबाबत प्रश्‍नचिन्ह आहेतच. ‘एन्जॉयमेंट’च्या पलीकडे आयुष्य जगण्याची दुसरी कुठलीच कारणे या पिढीतील सदस्यांना सापडत नसतील, सामूहिक बलात्कार हे कुणाच्या बेपर्वा वागणुकीचे परिणाम असतील, अविवाहीत मुली गर्भवती राहण्याच्या प्रमाणात झालेली आश्‍चर्यजनक वाढ हा या कथित आधुनिक युगातील ‘मोकळ्या’ वर्तणुकीचा परिणाम असेल, तर मग शहरात आलेल्या एका खेडूत शेतकर्‍याला गावातल्या ‘फसले’पेक्षाही शहरातील ‘नस्ले’ अधिक संकटात असल्याचे जाणवले असेल, तर दोष कुणाचा?

No comments:

Post a Comment