Tuesday, September 8, 2015

बारामतीकरांची नौटंकी!

खरंच सांगा पवार साहेब, आहेत तुमच्या जवळ खरीखुरी उत्तरं, विखे पाटलांनी विचारलेल्या प्रश्‍नांची? त्यातील प्रश्‍न न् प्रश्‍न खरा असेल, त्यावर तुम्ही अगदीच निरुत्तर झाला असाल, किंवा जनतेचे समाधान होईल अशी उत्तरं तुमच्या जवळ नसतील, तर मग सत्ता हाती असूनही जनहिताची कामं करण्यात तुम्हाला आलेल्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडायला का निघालात? या राज्याच्या जलसंपदा विभागाचा कारभार गेले किमान दशकभर तुमच्या पक्षाकडे होता. काय दिवे लावले आपल्या मंत्र्यांनी? उलट ‘कॅग’ने नाकर्तेपणाचे आरोप केले तर स्वत:च स्वत:ला प्रमाणिकपणाचे सर्टिफिकेट देऊन मोकळे झाले तुमचे पुतणे! तलावातील पाण्याबद्दलचे त्यांचे ‘जगविख्यात विधान’ विसरलात पवार साहेब आपण इतक्या लवकर? मग आता आपण स्वत: मराठवाड्यातल्या जनतेसाठी काहीच करू शकलो नाही, याची खंत बाळगायची सोडून आता जनतेच्या साथीनं सरकारविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरण्याची नौटंकी तरी कशाला करता?
जे जे म्हणून भविष्यात आपल्या विरोधात जाऊ शकतात, त्या सार्‍यांना आपल्या खेम्यात जमा करून घेण्याच्या चालबाज राजकारणात पवारांच्या विरोधात बोलणारी माणसं कुठे उरलीच नाहीत. त्यांच्या या खेळीला दाद न देता दमानं, दंड थोपटून, खंबीरपणे त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांमधे समावेश असलेले बाळकृष्ण विखे पाटील हे एक होत. परवा बाळासाहेबांनी शरद पवारांना दिलेल्या कानपिचक्या खरंच बोलक्या ठरल्या आहेत. ज्यांनी तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले, जे कित्येक वर्षे केंद्रात मंत्री राहिले, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सिंचन विभागाचा कारभार सांभाळला, तेच आता महाराष्ट्रातील दुष्काळावर नक्राश्रू ढाळत असतील, समस्या अजूनही सुटल्या नसल्याचा कांगावा करीत असतील, तर मग त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात स्वत: नेमके काय केले, असा प्रश्‍न उरतोच. पण हा रोखठोक प्रश्‍न अगदी परवा परवापर्यंत पवारांना कुणी विचारला नव्हता. असले बिकट प्रश्‍न विचारून पवारांशी वैर घेणार कोण? पण विखे पाटलांनी तो प्रश्‍न काल विचारला. नुसता प्रश्‍नच विचारला नाही, तर चांगलेच धारेवर धरले पवारांना. वर्षानुवर्षे.... अगदी कालपर्यंत आपणच इथे सत्तेवर होतो आणि इथले प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारीही आपलीच होती, पण ते प्रश्‍न सोडविण्यास आपण ना-लायक ठरलो, हे सोईस्करपणे विसरून, आता सत्ता हाती नसल्याची संधी साधून दुसर्‍यांच्या नावानं शिमगा करायला निघालेल्या बारामतीकरांना कुणीतरी या प्रकरणी ठणकावून जाब विचारणे गरजेचे झाले होते. जे राजकारणातील पवारविरोधकांनाही जमले नाही, ते शरदरावांना बेजार करण्याचे काम पाटलांनी प्रश्‍नांची ही सरबत्ती करून केले आहे. विखे पाटलांनी शरद पवारांना जाहीरपणे विचारलेल्या प्रश्‍नांमागील रोख आणि त्यामागील कारणांना या दोन कुटुंबातील परंपरागत राजकीय हाडवैराची किनार आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्याची, एकमेकांचा वचपा काढण्याची एकही संधी दोघांपैकी कुणीही कधीच सोडत नाही. विखे पाटलांनी परवा केलेले वारही त्याच वैराच्या राजकारणाचा एक भाग मानले, तरी त्यामुळे पाटलांनी उघडे पाडलेले पवारांचे पितळ काही झाकले जात नाही. उलट, कुणीतरी बोलण्याची हिंमत दाखवल्याने पवारांची राजकारणाची ‘पातळी’ तरी या निमित्ताने पुन्हा एकदा जगजाहीर झाली. तसा मराठवाड्यातला दुष्काळ हा काही काल-परवाचा प्रश्‍न नाही. पण तो कालपर्यंतच्या सत्तेतल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्‍न कधी राहिलाच नाही. जायकवाडी धरणापासून तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापर्यंतच्या प्रत्येक मुद्यात राजकीय लाभ उपटण्यात अग्रेसर कोण होते, हे भारतीय नागरिक विसरलेले नाहीत अजून. पण पवारांनी जनतेच्या भावना मनावर घेतल्याच कधी? त्यांनी तर दरवेळी त्या भावना पायदळी तुडवून स्वत:च्या राजकारणाची पोळी शेकली. दरवेळी, कुठल्याही मुद्यावर उलटसुलट विधाने करायची. त्यावरून संशयकल्लोळ निर्माण करायचा. जनतेला संभ्रमात टाकायचे. पवार नेमकी आपली बाजू घेत आहेत की आपल्याला विरोध करताहेत, हेही समोरच्याच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने बेधडक विधाने बेमालूमपणे करायची. काल केलेला निर्णय आज फिरवायचा. आणि ‘भाकरी फिरवली नाही की ती करपते’, हे तत्त्वज्ञानही स्वत:च पाजळायचे, ही त्यांच्या राजकारणाची तर्‍हा ज्ञात असूनही ‘साहेबांच्या’ विरोधात बोलण्याचे धाडस इथे कोणी सहसा करीत नाही. कारण साहेबांच्या विरोधात बोलले की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ज्यांनी ते दुष्परिणाम भोगण्याची तयारी दाखवली, ते विखे पाटलांसारखे लोक पवारांच्या तिरक्या चालीने निवडणुकीतले पराभव पचवूनही खंबीरपणे मैदानात तग धरून उभे राहिले. आणि जे त्या दुष्परिणामांच्या भीतिपोटी स्वाभिमान गहाण टाकून सावलीसारखे सोबत राहिले, त्यांना त्यांच्या लायकी आणि गरजेच्या पलीकडे जाऊन ‘लाभ’ मिळत गेला. मग नको नको ते लोक ‘मानसपुत्र’ म्हणून शेखी मिरवू लागलेत. अशा पद्धतीने पवारांच्या विरोधात बोलणार्‍यांची संख्या दिवसागणिक रोडावली. शिवसेनेपासून तर रिपाईपर्यंत आणि कॉंग्रेसपासून तर मनसेपर्यंत प्रत्येकच पक्षात त्यांच्या शब्दाला जागणारी माणसं स्वत:ला बारामतीकरांचे मित्र म्हणवून घेत कॉलर टाईट करून वावरत राहिली. पवारांच्या या खेळीतून विरोधी पक्षातले विरोधकही संपुष्टात आले. इतके की विरोधी पक्षातले अनेक निर्णय, कित्येक धोरणं, निवडणुकीतले कित्येक उमेदवार सुद्धा बारामतीकरांना हवे तसे निवडले जात असल्याच्या बातम्या कित्येकदा बाहेर येत राहिल्या. खुद्द पवारांनी या आरोपाची अनेकदा खिल्ली उडवली. तो आरोप साफ नाकारला. अनेकदा तो मुद्दा त्यांच्या लेखी हासण्यावारी निघाला. पण म्हणून त्यातील गर्भितार्थ मात्र लपून राहिला नाही.
परवा खुद्द पवारच म्हणाले होते, दुष्काळावर राजकारण नको म्हणून! आता तेच दुष्काळाचे राजकारण करायला सरसावले आहेत. वाहन चालविणे दुरापास्त झालेले मराठवाड्यातले रस्ते, वर्षानुवर्षे कायम राहिलेले तिथले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि तरीही तिथल्या बीयर उत्पादक कंपन्यांना राजकारण्यांनी कधीही जाणवू न दिलेली पाण्याची वानवा...
कुणाच्या राजकारणातून अन् कुणाच्या पुढाकारातून घडत गेला हा प्रकार? कोणाची सत्ता होती कालपर्यंत राज्यात? गेली कित्येक वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करणार्‍या मराठवाड्यातील जनतेला वार्‍यावर सोडून उसाची शेते नेमकी कोणाची पिकताहेत, हे जरा कळेल पवार साहेबांकडून गरीब जनताजनार्दनाला? गेली दोन वर्षे सतत दुष्काळाचा सामना करताना सर्वसामान्य जनतेला नाकी नव आले असताना इथल्या नेत्यांना त्याची कुठलीच झळ बसत नाही, ही जादू आहे की काय पवार साहेब? विखे पाटील म्हणतात त्याप्रमाणे भीमा स्थिरीकरण प्रकल्प ही नेमक्या कोणाच्या डोक्यातली उपज आहे. राज्यातील इतर भागाला व्यवस्थितपणे मागे ठेवून सर्वांच्या हक्काचा पैसा एकट्या पश्‍चिम महाराष्ट्राकडे वळवण्याचे पाप नेमके कोणाचे? ज्या खोर्‍यातून मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकला असता, त्या गोदावरी खोर्‍याकडे झाले ते दुर्लक्ष नेमके कोणाचे होते, पवार साहेब? एकीकडे राजकारण करू नका म्हणून लोकांना सांगायचे आणि स्वत: मात्र नेमके तेच करत पुढे निघायचे? आता पवारांचा दौरा सुरू झालाय्. निमित्त दुष्काळाचे आहे. पण या दौर्‍याच्या निमित्ताने ठिकठिकाणी होणारे महामेळावे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आहेत. सांगा ना पवार साहेब, आपण दौर्‍यावर नेमके कशासाठी निघालात. दुष्काळग्रस्तांच्या भेटीसाठी की कार्यकर्त्यांच्या? आपला हा दौरा बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे की, त्यानिमित्ताने राष्ट्रवादीची ताकद आजमावण्यासाठी? आणि खरंच सांगा पवार साहेब, आहेत तुमच्या जवळ खरीखुरी उत्तरं, विखे पाटलांनी विचारलेल्या प्रश्‍नांची? त्यातील प्रश्‍न न् प्रश्‍न खरा असेल, त्यावर तुम्ही अगदीच निरुत्तर झाला असाल, किंवा जनतेचे समाधान होईल अशी उत्तरं तुमच्या जवळ नसतील, तर मग सत्ता हाती असूनही जनहिताची कामं करण्यात तुम्हाला आलेल्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडायला का निघालात? या राज्याच्या जलसंपदा विभागाचा कारभार गेले किमान दशकभर तुमच्या पक्षाकडे होता. काय दिवे लावले आपल्या मंत्र्यांनी? उलट ‘कॅग’ने नाकर्तेपणाचे आरोप केले तर स्वत:च स्वत:ला प्रमाणिकपणाचे सर्टिफिकेट देऊन मोकळे झाले तुमचे पुतणे! तलावातील पाण्याबद्दलचे त्यांचे ‘जगविख्यात विधान’ विसरलात पवार साहेब आपण इतक्या लवकर? मग आता आपण स्वत: मराठवाड्यातल्या जनतेसाठी काहीच करू शकलो नाही, याची खंत बाळगायची सोडून आता जनतेच्या साथीनं सरकारविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरण्याची नौटंकी तरी कशाला करता?

No comments:

Post a Comment