Saturday, March 21, 2015

चला गुढी उभारू या!

सातच्या आत घरात’ची भाषा केविलवाणी ठरविणार्‍या लेटनाईट पार्ट्या भुरळ घालताहेत नव्या पिढीला. माणसाला माणूसपण विसरायला लावणारी दारूची झिंग अन् सोबतीला कानठळ्या बसविणार्‍या संगीताचा धिंगाणा. रंगात आलेल्या पार्टीत मातीत मिसळणारी मानवी मर्यादा अन् कुणाच्या तरी जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी जाणारा कोंबड्या-बकर्‍यांचा जीव. गरिबांच्या झोपडीतल्या मिणमिणत्या दिव्यांना वाकुल्या दाखवत बहरणारा इथला झगमगाट अन् त्या झगमगाटाच्या ईर्ष्येने त्याच्याशी स्पर्धा करणारा वंचितांच्या वाट्याला आलेला अंधार. गरीब आणि श्रीमंतीमधल्या या दरीचा पाठलाग करण्याच्या नादात पाश्‍चिमात्यांनाही हेवा वाटावा असे त्यांचे अंधानुकरण करत बेभान पळत सुटलीय् भारतीय जनता. त्या जनतेला ताळ्यावर आणत या देशाच्या वैभवशाली परंपरेची आणि संस्कृतीची पताका नव्याने, उंच फडकवूया! चला गुढी उभारू या!
चला गुढी उभारू या! गुढी यशाची, कीर्तीची, प्रगतीची, संपन्नतेची, वैभवाची, नवतेजाची, मांगल्याची, माधुर्याची, सामर्थ्याची, सौभाग्याची... संकल्प करू या जाती-धर्माच्या चौकटीपलीकडल्या एका सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीचा. निर्धार एका वैभवशाली देशाच्या उभारणीचा. माणसाच्या घडवणुकीचा. माणुसकीच्या जपणुकीचा...
शालिवाहन राजाने मिळविलेल्या यशाचे स्मरण करून देणारा हा क्षण मराठी नववर्षाच्या शुभारंभाचा असला, तरी तो सर्वार्थाने ‘शुभ’ आरंभाचा सोनेरी क्षण आहे. या दिवशी उगवणार्‍या रविकिरणांच्या सोनेरी छटांच्या साक्षीने घराघरांच्या उंबरठ्यावर सजणार्‍या पताका आणि तोरणांच्या सोबतीने उभी राहणारी गुढी ही मनामनात सळसळणार्‍या नवचैतन्याचे प्रतीक असते. खरं तर हा काळ पानगळीचा. झाडांवरून गळून पडलेल्या आणि जमिनीत मिसळणार्‍या पिवळ्या पानांच्या अस्तातून उद्याचा हिरवा निसर्ग अंकुरणार असतो. या काळात चैतन्याने बहरणारा निसर्ग कधी आंब्याच्या मोहोरातून डोकावतो, तर कधी कडू चवीच्या लिंबाच्या कोवळ्या पालवीतून तो झळकतो. झाडांवरच्या पिवळ्या पानांना निरोप देणारी वार्‍याची हलकीशी झुळूक कडुनिंबाच्या हिरव्या पालवीतून डोकावणार्‍या मोहोराला जेव्हा हळुवारपणे कुरवाळते, तेव्हा जमिनीवर पडणार्‍या त्याच्या छोट्या छोट्या, पांढर्‍या फुलांचीही मनाला भुरळ पडते. सडा, सारवणाचा काळ मागे पडून टाईल्सवरच्या रांगोळ्यांनी एव्हाना दारांच्या शेजारच्या जागेवर ताबा मिळवला असला, तरी गुढी दिमाखानं उभी करण्याची परंपरा मात्र अजूनही तशीच कायम टिकवून ठेवली आहे तमाम मराठीजनांनी. अगदी कालौघाचाही किंचितसाही परिणाम त्यावर झालेला नाही. निसर्गाचा हाच बहर आणि त्याची तीच जादू कायम राखण्यासाठी त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा पण करू या! चला पर्यावरणरक्षणाची गुढी उभारू या!
गेले काही दिवस या समाजातील बदलती परिस्थिती बघून मन सुन्न होऊ लागले आहे. मुंबईत समुद्राकाठी दिवस घालवणारी आणि गावात पानटपर्‍यांवर आयुष्याचा किमती वेळ वाया घालवणारी तरुणाई या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवेल याबाबत शंका वाटू लागली आहे आताशा. फेसबुक अन् व्हाट्‌स ऍपच्या विळख्यात सापडलेल्या या तरुणाईला देशापुढील आव्हानांचा विसर पडला आहे, किंबहुना तसे म्हणण्यापेक्षा त्यांना त्या आव्हानांची जाणीव तरी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. म्हणायला उच्चशिक्षित असलेली, प्रेमालापालाच अयुष्याचे अंतिम ध्येय समजून त्यामागे बेधुंद धावणारी ही पिढी सामाजिक अन् राष्ट्रीय प्रश्‍नांबाबत मात्र तितकीशी जबाबदारपणे वागताना दिसत नाही, तेव्हा मनाला अतीव वेदना होतात. बरं निर्भयावर बलात्कार करणार्‍या तरुणांकडे बघून या पिढीला बेजबाबदार ठरवायला जावं, तर निर्भया प्रकरणी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध क्षोभ व्यक्त करणारी तरुणाईही हीच होती, हे विसरता येत नाही. आणि; जरा कुठे सार्वजनिक ठिकाणी नीट वागण्याचा सल्ला कुणी दिला, तर भर रस्त्यावर उतरून ‘कीस ऑफ लव्ह’चा तमाशा मांडणारी मंडळीही हीच होती. अलीकडे चौकात मेणबत्त्या पेटवून क्षोभ व्यक्त करण्याची नवी पद्धती रूढ होतेय्. तसल्या तोंडदेखल्या आंदोलनात सहभागी होत क्रांतीचा वणवा पेटविल्याचा दावा करणार्‍यांची आणि त्यातून समाजपरिवर्तनाची अपेक्षा बाळगणार्‍या पळपुट्या सैनिकांची संख्याही खूप वाढली आहे या काळात. या विपरीत परिस्थितीवर मात करत खर्‍या क्रांतीची ठिणगी पेटवूया! चला गुढी उभारू या!
देशात आणि आपल्या मराठी मुलुखातही सत्तांतर झाले आहे नुकतेच. सत्तेत आलेल्या नव्या सरकारचा निर्धार भक्कम आहे. परिवर्तन घडवून आणण्याची तळमळही दिसून येते आहे. पण आधीच्या सत्ताधार्‍यांनी करून ठेवलेल्या घाणीचा ढीग फार मोठा आहे. सारा उकिरडाच स्वच्छ करावा लागणार आहे नव्या सत्ताधार्‍यांना. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. पण तसे असले तरी केवळ नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून आपण नामानिराळे राहात, दूर बसून परिवर्तनाची वाट बघत बसल्याने समाजात परिवर्तन घडून येईल, अशी आशा बाळगणार्‍यांच्या गर्दीतून बाहेर येत या परिवर्तनासाठी स्वत: तळमळीने झगडणार्‍यांची इथे गरज आहे. राजकारण्यांना शिवीगाळ करीत आणि राजकारणाला घाणेरडे संबोधत स्वत: त्यापासून हातभर लांब राहणार्‍यांना सार्‍या अपेक्षा मात्र राजकारण्यांकडूनच असतात आणि राजकारण्यांमुळेच या देशाचे वाटोळे झाल्याचा ठाम विश्‍वासही त्यांच्याच मनात तेवढाच ठाम असतो. तरीही त्याची फरफट सुरू असते. डॉ. मनमोहनसिंहांच्या कारभाराला कंटाळायलाही त्यांना पंधरा वर्षे लागतात अन् मोदींच्या कार्यपद्धतीचे परिणाम दिसू लागण्याच्या आतच केजरीवालांची निवड करून ते मोकळे होतात. मुळात इथे मतदानाच्या दिवशी मतदानाला जाणार्‍यांचीच वानवा आहे. आणि; मतदानातून साकारणार्‍या सरकारच्या माध्यमातून घडून येणार्‍या परिवर्तनाकडे आस लावून बसलेल्यांची भलीमोठी गर्दीही त्यांचीच आहे. स्वत: संघर्ष करायची त्यांची मुळीच तयारी नाही. तरीही समाजात बदल घडून आलेला मात्र त्यांना हवा आहे. यांची व्यक्तिगत कामे असली की ती लवकर व्हावीत म्हणून ते सरकारी बाबूला खिशातले पैसे मोजून खुशाल काम करवून घेणार. आणि; नंतर समाजातल्या या व्यवस्थेला भिकार संबोधत तेच त्याला शिव्याशाप देणार. तेच इथल्या भ्रष्टाचारावर कोरडे ओढणार अन् तेच तो भ्रष्टाचार संपावा म्हणून ओरड करणार. असल्या षंढांनी फुंकलेल्या शिट्ट्यांना प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानावरील रणशिंगाची सर कधीच येणार नाही. मृतावस्थेतल्या या व्यवस्थांविरुद्ध लुटुपुटूची नव्हे, खरीखुरी लढाई लढू या! चला गुढी उभारू या!
‘सातच्या आत घरात’ची भाषा केविलवाणी ठरविणार्‍या लेटनाईट पार्ट्या भुरळ घालताहेत नव्या पिढीला. माणसाला माणूसपण विसरायला लावणारी दारूची झिंग अन् सोबतीला कानठळ्या बसविणार्‍या संगीताचा धिंगाणा. रंगात आलेल्या पार्टीत मातीत मिसळणारी मानवी मर्यादा अन् कुणाच्या तरी जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी जाणारा कोंबड्या-बकर्‍यांचा जीव. गरिबांच्या झोपडीतल्या मिणमिणत्या दिव्यांना वाकुल्या दाखवत बहरणारा इथला झगमगाट अन् त्या झगमगाटाच्या ईर्ष्येने त्याच्याशी स्पर्धा करणारा वंचितांच्या वाट्याला आलेला अंधार. गरीब आणि श्रीमंतीमधल्या या दरीचा पाठलाग करण्याच्या नादात पाश्‍चिमात्यांनाही हेवा वाटावा असे त्यांचे अंधानुकरण करत बेभान पळत सुटलीय् भारतीय जनता. त्या जनतेला ताळ्यावर आणत या देशाच्या वैभवशाली परंपरेची आणि संस्कृतीची पताका नव्याने, उंच फडकवूया! चला गुढी उभारू या!
बिनबोभाटपणे चालणारा भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराचे लाख आरोप झालेत तरी त्यातून सहीसलामत सुटणारे राजकीय नेते, चुकून झालीच शिक्षा आणि भोगावा लागलाच कारावास तरी नंतर दिमाखाने संसदेत जाऊन मिरवणारे ए. राजासारखे नेते, चुकीच्या धोरणांच्या परिणामस्वरूप बोकाळलेली महागाई, नोकर्‍या नसल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकार असलेली तरुणाई, सुविधा आणि आरोग्य व्यवस्थांचा अभाव, रस्त्यांचे जाळे वीणण्यापेक्षाही वाहन निर्माण करणार्‍या कारखान्यांना उद्योग थाटण्याकरता आवतन देण्यात अधिक स्वारस्य दाखविणारी आर्थिक धोरणं, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांचा पाठपुरावा करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा कोंडमारा, त्याची होणारी दमछाक यातून वाटा धुंडाळताना मोठीच कसरत होतेय् आज सर्वांची. त्यातही पैशाच्या बळावर सारेकाही विकत घेण्याची भाषा बोलणार्‍यांची गर्दी वाढल्याने रांगेत उभे राहून आपल्याला काही मिळण्याची वाट बघणार्‍यांच्या हक्कावर गदा येतेय्. या वंचितांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प करूया! चला गुढी उभारू या!

No comments:

Post a Comment