Wednesday, October 29, 2014

रेहानाचं आईला पत्र


 बलात्काराचा प्रयत्न करणारा मोकाट आणि पीडितेच्या गळ्याभोवती मात्र दोरीचा फास, असे काहीसे दुर्दैवी चित्र तेहरानच्या माध्यमातून सार्‍या जगाने अनुभवले. जे समाजात अनुभवले, जे कारागृहात भोगले, जे न्यायालयात वाट्याला आले, त्याची मांडणी रेहानाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रातून एका मुलीनं आईकडे व्यक्त केलेल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावना तशा सामान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या असामान्य आहेत. मृत्यूला सामोरे जाताना व्यक्त झाल्या असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. त्यात आईच्या कुशीत दडून अश्रूंना वाट मोकळी करून देण्याची अपेक्षा आहे. मरण दाराशी उभे असल्याचे वास्तव ठावूक असतानाही वडिलांचा हात प्रेमाने हातात घेण्याची आस आहे. सार्‍या जगातील तरुणींच्या मनातल्या भावना यानिमित्ताने रेहानाच्या पत्रातून व्यक्त झाल्या आहेत. सोबतीला तिथल्या न्याय व्यवस्थेच्या चिंधड्या उडविण्याचे धारिष्ट्यही आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. आणि, आपल्या हयातीत आपण ते बदलू शकलो नसल्याची वेदनाही आहे...
आई, या जगानं मला १९ वर्षे जगण्याचा अधिकार दिला. खरं तर ‘त्या’ काळ्या रात्रीच माझी हत्या व्हायला हवी होती. मला मारून त्यांनी माझे शव शहराच्या कुठल्याही कोपर्‍यात फेकून दिले असते. मग कुणीतरी तुला बोलावून माझ्या प्रेताची ओळख पटविण्यास सांगितले असते. मग तुला कळलं असतं की, हत्येपूर्वी माझ्यावर बलात्कार सुद्धा झाला होता... माझ्यावर अनन्वित छळ करणारी ‘ती’ व्यक्ती बाहेर मोकाट फिरत राहिली असती. आपल्याकडे त्याच्यासारखी संपत्ती आणि ताकद नसल्यानं आपण त्याचं काहीही बिघडवू शकलो नसतो. तो कधीच गजाआड झाला नसता. मग तू पण त्या वेदनेत लीन होत कसंनुसं आयुष्य जगत राहिली असती. पण नंतरच्या काळात तुझाही मृत्यू याच पीडेने झाला असता. पण हे काही कुठल्या शापामुळे घडलेलं नाही. मला त्यांनी मारलं नाही किंवा माझे शव कुठल्याशा कोपर्‍यात फेकले नाही. पण गेल्या काळात तेहरानच्या इविन कारागृहातल्या काळकोठडीत दरदिवशी तोच अनुभव मी घेत राहिले. तू, ही माझ्या ललाटावरील रेष समज. कुणालाही दोष देत बसू नकोस. तुला हे चांगलं ठावूक आहे की, मृत्यू म्हणजे काही जीवनाचा अंत नाही...
आई, तूच मला म्हणायचीस ना की, माणसाला मरेपर्यंत आपल्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे म्हणून? जेव्हा मला एक खुनी, आरोपी म्हणून न्यायालयात उभं करण्यात आलं, तेव्हा मी माझ्या डोळ्यांमधून अश्रूचा एक थेंब देखील बाहेर पडू दिला नाही की अभयाची भीक मागितली नाही. तिथं असताना मोठ्यानं ओरडावं असं खूप वाटत होतं. पण मी तसं केलं नाही. का ठावूक आहे, आई? कारण मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास होता...
तुला ठावूक आहे आई, मी आयुष्यात कधी एक मच्छर सुद्धा मारला नाही. साधा काकरोचही घराबाहेर काढायचा, तर मी मारण्याऐवजी त्याच्या मिशा पकडून त्याला घराबाहेर टाकून यायचे. पण आता माझे विचार बदलले आहेत. मृत्यूपूर्वी मला तुला काही सांगायचं आहे. मृत्यूनंतर माझे शरीर मातीत दबून सडलेले मला चालणार नाही. त्यामुळे फाशीनंतर लागलीच माझ्या शरीराचे विविध अवयव गरजूंना दान देण्यात यावेत...
माझ्या लक्षात आलं आहे की, मला आता या देशातील व्यवस्थेविरुद्धच्या किस्सास नामक कायद्याचा सामना करायचा आहे. माझ्या आयुष्याचं पुस्तक आता शेवटच्या पानापर्यंत पोहोचलं आहे, हे तू समजून का घेत नाहीस? आई, तू नाराज होऊ नकोस. तू नाराज झाली ना की, मलाच माझी लाज वाटायला लागते. या क्षणी मला तुझे आणि बाबांचे हात प्रेमाने हातात घ्यायचेत...


हे पत्र आहे, इराणमधील रेहाना या सव्वीस वर्षीय युवतीचे. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला जीवे मारण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. त्या ‘गुन्ह्या’साठी जवळपास सात वर्षे ती कारागृहात राहिली. इराणमध्ये अस्तित्वात असलेल्या सध्याच्या समाजव्यवस्थेविरुद्ध वर्तणूक केली म्हणून ‘किस्सास’ कायद्यांतर्गत तिच्यावर खटला चालला. शेवटी चार दिवसांपूर्वी तिला फाशी देण्यात आली महिलांना त्यांचे नैसर्गिक अधिकार नाकारणारी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेविरुद्ध एका महिलेने दिलेला लढा, लढता लढता तिने कवटाळलेला मृत्यू आणि त्या मृत्यूचा सहज स्वीकार करण्याचे औदार्य दाखवताना आईचा भावनावेग सावरण्याचे चालवलेले प्रयत्न... सारेच अद्भुत आहे.

अनेक प्रश्‍न या प्रकरणातून उपस्थित झाले आहेत. दिल्लीतल्या एका निर्भया प्रकरणातून भारतातली तरुणाई आणि प्रशासन अद्याप सावरलेले नाही. दरम्यानच्या काळात अजूनही कितीतरी ‘निर्भया’ देशाच्या कानाकोपर्‍यात कुणाच्या तरी वासनेला बळी पडल्यात. त्यांच्यासाठी दिल्लीतल्या इंडिया गेटसमोर कुणाचे मोर्चे निघाले नाहीत, त्यांच्या हार घातलेल्या प्रतिमेसमोर मुंबईतल्या समुद्रकिनारी मेणबत्त्या पेटल्या नाहीत, एवढाच काय तो फरक. बाकी ठरल्या तर त्याही कुणाच्यातरी बलात्काराच्याच बळी! पुरोगामित्वाचे डांगोरे पिटूनही त्यांना न्याय मिळाला नाहीच. मग अजूनही प्रतिगामित्वाशीच झगडणार्‍या इराणमधील महिलांना तो न्याय सहजतेने मिळेल, अशी अपेक्षा तरी कशी करायची? तिथल्या व्यवस्थेने महिलांचे वर्चस्व साफ नाकारले. बलात्काराचा प्रयत्न करणारा मोकाट आणि पीडितेच्या गळ्याभोवती मात्र दोरीचा फास, असे काहीसे दुर्दैवी चित्र तेहरानच्या माध्यमातून सार्‍या जगाने अनुभवले. जे समाजात अनुभवले, जे कारागृहात भोगले, जे न्यायालयात वाट्याला आले, त्याची मांडणी रेहानाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रातून एका मुलीनं आईकडे व्यक्त केलेल्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावना तशा सामान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या असामान्य आहेत. मृत्यूला सामोरे जाताना व्यक्त झाल्या असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. त्यात आईच्या कुशीत दडून अश्रूंना वाट मोकळी करून देण्याची अपेक्षा आहे. मरण दाराशी उभे असल्याचे वास्तव ठावूक असतानाही वडिलांचा हात प्रेमाने हातात घेण्याची आस आहे. सार्‍या जगातील तरुणींच्या मनातल्या भावना यानिमित्ताने रेहानाच्या पत्रातून व्यक्त झाल्या आहेत. सोबतीला तिथल्या न्याय व्यवस्थेच्या चिंधड्या उडविण्याचे धारिष्ट्यही आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. आणि, आपल्या हयातीत आपण ते बदलू शकलो नसल्याची वेदनाही आहे...

Tuesday, October 14, 2014

जळफळाट अन् धास्ती

या संपूर्ण प्रकाराचा अर्थ एकच. हुतूतूच्या खेळाप्रमाणे सारे मिळून एका तगड्या गड्याला घेरताहेत. त्याच्यावर तुटून पडताहेत. प्राण कंठाशी आणून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तो मर्द गडी इरेला पेटलाय्. तो कुणालाच दाद देत नाहीय्. सर्वांना हुलकावणी देऊन, हात लावून कबड्डी, कबड्डी म्हणत मधल्या रेषेवर हात ठेवून तो आपल्या टीममध्ये परतणार याबाबत सारेच आश्‍वस्त आहेत. बॉऊंड्रीवर हात ठेवून तो परतला की पलीकडच्या चमूची दाणादाण उडणार आहे. चेहरे हिरमुसले होणार आहेत सर्वांचे. पण करणार काय? त्यांच्या आजवरच्या पापाची फळं म्हणजे यंदाच्या निवडणुकीतला त्यांचा पराभव असणार आहे. पराभव निश्‍चित असला, तो डोळ्यांदेखत दिसत असला तरी राजकारणात हातपाय गाळायचे नसतात. हार अशी सहज पत्करायची नसते. कित्येकदा पराभवाचे वास्तव पोटात दडवून विजयाचे भाव चेहर्‍यावर उमटवायचे असतात. विजयाच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंचे मनोधैर्य जमेल तेवढे खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी उसने अवसान आणायचे असते... पवारांपासून चव्हाणांपर्यंत अन् उद्धवपासून राजपर्यंत सारे तेच करताहेत सध्या...
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अजून एक दिवस आणि त्याच्या निकालाला अद्याप चार दिवस शिल्लक असले, तरी या राज्यातल्या काही राजकीय पक्षांचा ‘निकाल’ आधीच लागला असल्याचे आणि काहींचे भवितव्यही आताच ‘निकाली’ निघाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पराभवाच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेले काही नेते अक्षरश: बावचळल्यागत वागू लागले आहेत. बेताल बोलू लागले आहेत. भाजपाला, विशेषत: पंतप्रधानांना लक्ष्य करून मनातली गरळ ओकू लागले आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय्, निवडणूक निकालांचे अंदाज वर्तविणारे अहवाल जसजसे प्रसिद्ध होताहेत, तसतशी या संतापाची तीव्रता दिवसागणिक वाढतेय्. कुणाला नरेंद्र मोदींमधल्या अवगुणांचा परिचय अलीकडेच होऊ लागला आहे, तर कुणाला दिल्लीत अगदी काल-परवा सत्तेत आलेल्या सरकारचा नाकर्तेपणा अचानक तीव्रतेनं जाणवू लागला आहे. ते सरकार अपयशी ठरले असल्याचा कांगावा ते हिरिरीने करताहेत. ज्यांना आघाडीतल्या घटकपक्षांची मोट बांधून ठेवता आली नाही, पंधरा वर्षे टिकलेली आघाडी तुटण्यापासून वाचविण्याचे कसब ज्यांना पणाला लावता आले नाही, महाराष्ट्रातली सत्ता चार वर्षे नीट सांभाळता आली नाही, ते पृथ्वीराज चव्हाणही आता एकहाती सत्ता मिळाली, तर या राज्यात विकासाची किमया करून दाखवतो म्हणताहेत. मोदी आणि त्यांची टीम हा महाराष्ट्र संपवायला निघाले असल्याचा त्यांचा आरोप नव्हे, दावा आहे.
कॉंग्रेसच्या युवराजांच्या बोबड्या बोलाचे कौतुक काय वर्णावे? त्यांनाही लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वीकारलेल्या मौनव्रतानंतर परवा अचानक कंठ फुटला. फार संतापलेत ते भाजपाच्या कामावर. या शंभर दिवसात कुठं नेऊन ठेवलात देश माझा, असं विचारताहेत! प्रचंड आवेशाने हा सवाल विचारताना रागाने सारे शरीर थरथरत होते त्यांचे. म्हणाले, केंद्रातले सरकार गांधींच्या विचारांविरुद्ध वागताहे. हे बरे नव्हे! हे लोक केवळ गांधींच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. बाकी काम सारे गांधींच्या विचारांना तिलांजली वाहणारे करतात. आता, कॉंग्रेसने दिल्लीत दहा वर्षे सत्ता गाजवताना घोटाळ्यांचा जो इतिहास रचला, तो गांधी विचारांच्या कोणत्या अध्यायात बसतो, हे सांगता येईल युवराज राहुलबाबूंना? आपल्या बापजाद्यांची मालमत्ता समजून देशाची संपत्ती असलेल्या कोळसा खाणींची जी खिरापत कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वर्तुळातील मर्जीतल्या लोकांना मातीमोल भावात वाटली, ती देश लुटण्याची कृती गांधी विचारांशी कशी मेळ खाते याचे विवेचन करता येईल राहुलबाबूंना? मोदी सरकारच्या काळातील जीवनरक्षक औषधींच्या दरवाढीने झालेल्या वेदनाही त्यांनी उद्धृत केल्या आहेत. परवा परवापर्यंत दर महिन्या-दोन महिन्यात गॅस सिलेंडरचे दर वाढायचे तेव्हा कधी कॉंग्रेसच्या युवराजांनी नक्राश्रू ढाळल्याचे स्मरत नाही. पण मोदींच्या काळातील घटनाक्रमाने जीव कसा कासावीस झालाय् त्यांचा. अचानक गांधींचे, त्यांच्या विचारांचे स्मरण झाले आहे त्यांना.
एकूण काय, पायाखालची वाळू सरकू लागल्याने सर्वांचाच तीळपापड होत आहे सध्या. युती, आघाडी तोडताना नको तेवढी मुजोरी करून झाली. उभे करायला उमेदवार सापडत नाहीत, अशी दैनावस्था असताना पक्षासाठी अधिकाधिक जागा मिळवण्याच्या शर्यतीत नको तेवढे धावून झाले. आता निवडणुकीचे संभाव्य निकाल समोर दिसताहेत. त्यातून सत्तेचे गणित चुकण्याची दाट शक्यता डोळ्यांसमोर उभी राहिली आहे. त्यामुळे जीव कासावीस होतोय् सत्ताधार्‍यांचा. त्यामुळेच की काय, पण या सार्‍यांना आता अचानक महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे स्मरण होऊ लागले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या तत्त्वांची, विचारांची पोटलीही आता निवडणुकीच्या मुहूर्तावर उघडली गेली आहे. इथले घोटाळे उघडकीला आणल्याने आणि हे राज्य इतके दिवस माघारलेले राहिल्याचे पितळ उघडे पाडल्याने अकारण महाराष्ट्राची देशभरात बदनामी होत असल्याचे रडगाणे परवा पवारांनी गायले. त्यांच्या पुतण्याच्या मंत्रालयात एका दशकात सत्तर हजार कोटींचा चुराडा होऊन राज्याच्या सिंचनात एक टक्क्याचीही वाढ होऊ न शकल्याची बाब समोर आली ती काय सार्‍या देशासाठी भूषणावह होती? त्यातून नाही झाली महाराष्ट्राची बदनामी? यांनी घोटाळे केले तर देशाची शान राखली जाते अन् दुसर्‍यांनी ते उघडकीला आणले तर बदनामी होते राज्याची? अजब तर्कट आहे पवारांचे. लोकांना सिंचनाची सुविधा द्यायचे सोडून तलावात मुतण्याची निलाजरी भाषा वापरणारे दादा, लोकांना निवडणुकीनंतर बलात्कार करण्याचा सल्ला देणारे आबा काय या महाराष्ट्राची शान वाढवताहेत पवार साहेब? असल्या नेत्यांचे पितळ उघडे पाडले, तर बदनामी होते या राज्याची? अन् त्यांच्या बेताल बडबडीने कोणती बुज राखली गेली या महाराष्ट्राची?
या राज्याला खड्‌ड्यात घालणार्‍यांचा पर्दाफाश केला, तर चेहरे उघडे पडले सर्वांचे. रंग उडाला त्यांच्या चेहर्‍यांवरचा. लोक नाना प्रश्‍न विचारू लागलेत. जाब मागू लागलेत. लोकांना उत्तर देण्याची नामुष्की ओढवली, तर मोदी अन् भाजपावर बरसताहेत सारे. दिल्लीत सोडून मोदी या राज्यात प्रचाराला आले तरी पोटं दुखू लागली आहेत कित्येकांची. तिकडे पाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार सुरू आहे आणि मोदी मात्र महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असे अनमोल विधान राज ठाकरेंनी केले आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत गुजरातेत झुल्यावर झुलले, त्यावरही बालिश आक्षेप नोंदवलाय् राहुल गांधींनी. बाळासाहेबांच्या पश्‍चात् शिवसेनेचे अस्तित्व शक्य तितक्या लवकर संपविण्याचा ध्यास घेतलेले आणि त्या दिशेने कार्यही सुरू केलेले उद्धव ठाकरे यांना तर काय, मोदींमध्ये अफझलखान दिसला. त्याच ‘अफझलखानाच्या’ नेतृत्वात शिवसेनेचे अठरा सदस्य दिल्लीत किल्ला लढवताहेत याचे तरी भान राहायला हवे होते ना उद्धवजींना!
राहिला प्रश्‍न सत्ताधार्‍यांचा, तर त्यांच्याबद्दल काय बोलावे? जे त्यांना स्वत:ला दिल्लीत दहा वर्षांत अन् महाराष्ट्रात पंधरा वर्षे सत्तेत राहून करता आले नाही, तो चमत्कार मोदींकडून तीन महिन्यात घडलेला हवाय् या नतद्रष्टांना.
एकूण, महाराष्ट्रातल्या बदलत्या वार्‍याने सैरभैर झालेले दिसताहेत सारे. वार्‍याची ही दिशा ओळखत स्वत:ला सावरण्यापेक्षाही विजयाची घोडदौड करणार्‍यांचे पाय ओढण्यात गुंग झालेले दिसताहेत सारे. एखाद्या खेळात, विशेषत: राजकारणाच्या सारिपाटात, नियमाने सोंगट्या मांडायचे सोडून कुणी रडीचा डाव खेळत असेल, तर त्याचा अर्थ काय, हे सारेच जाणतात. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपाविरोधकही असाच रडीचा डाव खेळताना दिसताहेत. त्याचा अर्थ न कळण्याइतके इथे कुणी भाबडे नाही, बावळट नाही की मूर्खही नाही.
या संपूर्ण प्रकाराचा अर्थ एकच. हुतूतूच्या खेळाप्रमाणे सारे मिळून एका तगड्या गड्याला घेरताहेत. त्याच्यावर तुटून पडताहेत. प्राण कंठाशी आणून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तो मर्द गडी इरेला पेटलाय्. तो कुणालाच दाद देत नाहीय्. सर्वांना हुलकावणी देऊन, हात लावून कबड्डी, कबड्डी म्हणत मधल्या रेषेवर हात ठेवून तो आपल्या टीममध्ये परतणार याबाबत सारेच आश्‍वस्त आहेत. बॉऊंड्रीवर हात ठेवून तो परतला की पलीकडच्या चमूची दाणादाण उडणार आहे. चेहरे हिरमुसले होणार आहेत सर्वांचे. पण करणार काय? त्यांच्या आजवरच्या पापाची फळं म्हणजे यंदाच्या निवडणुकीतला त्यांचा पराभव असणार आहे. पराभव निश्‍चित असला, तो डोळ्यांदेखत दिसत असला तरी राजकारणात हातपाय गाळायचे नसतात. हार अशी सहज पत्करायची नसते. कित्येकदा पराभवाचे वास्तव पोटात दडवून विजयाचे भाव चेहर्‍यावर उमटवायचे असतात. विजयाच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंचे मनोधैर्य जमेल तेवढे खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी उसने अवसान आणायचे असते... पवारांपासून चव्हाणांपर्यंत अन् उद्धवपासून राजपर्यंत सारे तेच करताहेत सध्या...

Wednesday, October 8, 2014

दरिद्री नेमके कोण?

त्या महाभागांच्या कथित कलाकृतीची नोंदही खरं तर भारताने घेऊ नये. पण त्या हरामखोरांची कृतीच इतकी हीन होती की लाथाडण्यासाठी तरी त्याची दखल भारतीयांना घ्यावीच लागली. गायी चारणारा माणूस ‘इलाईट स्पेस क्लब’चा दरवाजा ठोठावतोय् यात त्या कार्टूनिस्टला विनोद दिसला असेलही कदाचित! पण तमाम भारतीय जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. लेकहो! तुम्ही माना अथवा मानू नका, तुमच्या सहमती वा विरोधाला जराही भीक न घालता त्या क्लबचे दरवाजे या देशासाठी केव्हाच उघडले गेले आहेत. विरोधकांच्या नाकावर टिच्चून या देशातील वैज्ञानिकांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर तिथे स्थान मिळवले आहे. आता बसायचे असेल, तर बसा आमच्या शेजारी गुमान. नाही तर जा उडत!
भारताने अतिशय कमी खर्चात यशस्वीरीत्या साकारलेल्या मंगळ मोहिमेचे कौतुक करायचे सोडून आपल्या मनात साठलेली गरळ ओकण्याचे काम काही नतद्रष्टांनी चालवले आहे. यासंदर्भात एक अपमानजनक कार्टून प्रकाशित केल्यानंतर जगभरातील तमाम भारतीयांच्या तीव्र भावना व्यक्त झाल्यानंतर न्यूयॉर्क टाईम्स सारख्या एका प्रतिष्ठित दैनिकाच्या मालकाचे डोळे उघडले आणि मग माफीनामा जाहीर झाला. अर्थात त्या माफीनाम्यामुळे त्यांचे वैचारिक खुजेपण आणि अकलेचे दिवाळे जाहीर व्हायचे काही शिल्लक राहिले नाही.
भारताची मंगळ मोहीम यशस्वी झाली. केवळ अत्यल्प खर्चातच नव्हे, तर पहिल्याच प्रयत्नात मोहीम यशस्वी करणारा तो जगातला पहिला देश ठरला. सार्‍या भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब ठरली. जगासाठीही ठरायला हवी होती. पण या दोन्ही बाबतीत अपयशी ठरलेल्या काही देशांनी आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवीत भारतावर कुत्सितपणे हसण्याची भूमिका स्वीकारली. या मोहिमेत यापूर्वी यशस्वी ठरलेल्या देशांचे लोक ‘इलाईट स्पेस क्लब’ मध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक गरीब, भिकारडा माणूस म्हणजे भारत त्या क्लबमध्ये प्रवेश मिळावा म्हणून दरवाजा ठोठावतो आहे... असे एक कार्टून कर्मदरिद्री आणि तरीही स्वत:ला शहाणे समजणार्‍या न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केले. साहजिकच त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जगभरातून त्याचा निषेध झाला. मग या बड्या वृत्तपत्राला स्वत:चीच लाज वाटली आणि त्याने भारतीयजनांची माफी मागणारा मजकूर प्रकाशित केला. सदर प्रकरणात या देशाची बूज राखणार्‍या आणि सोशल साईटवरून न्यूयॉर्क टाईम्सला त्याची जागा दाखवून देणार्‍या भारतीयांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर जगभरातील भारतीय नागरिकांचे अभिनंदन करायला हवे. स्वत:ला तिसमारखॉं समजणारे दीडशहाणे भारतीय लोकांनी बजावलेल्या कर्तबगारीचीही कशी खिल्ली उडवायला निघालेत बघा!
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या एका देशाने इथल्या समस्या, परिस्थिती, गरिबीचा सामना करत स्वत:ला प्रगत समजणार्‍या देशांच्या नाकावर टिच्चून हे अभियान यशस्वी करून दाखवल्याने तर जळफळाट झालेला नाही ना, या तमाम प्रगत देशांचा? गरिबीशी लढून कोट्यवधी रुपयांची मोहीम राबविणार्‍या देशाची जागतिक पातळीवर दखल घ्यायचे सोडून, त्याच्या गरिबीची टर उडविण्यातच धन्यता मानणार्‍या देशांना प्रगत म्हणायचे तरी कसे? आणि कशासाठी? मनं अशी खुजीच राहणार असतील, तर करायची काय ती प्रगती? स्वत:ची अस्मिता जपण्याच्या धडपडीत कायम दुसर्‍यांचा दु:स्वास करणारी...! दरिद्री ते आहेत की आपण?

कोत्या मनाचे प्रदर्शन!

मुळात हे व्यंग्यचित्र तयार करणार्‍या आणि ते प्रकाशित करणार्‍यांच्या मनात दडलेल्या अन् भारताबद्दल त्यांच्या नसानसात भिनलेल्या विखारी द्वेषाची झलक यानिमित्ताने जगजाहीर झाली आहे. खरे तर मंगळमोहिमेच्या यशस्वितेतून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासारख्या एका विकसनशील देशाने गाठलेल्या उत्तुंग शिखराचा परिचय सार्‍या जगाला झाला आहे. कालपर्यंत काही विशिष्ट देशांकडे असलेली याबाबतची मक्तेदारी मोडीत काढून भारताने हे यश संपादन केले आहे. पण, इतक्या मोठ्या यशाबद्दल साधी कौतुकाची थाप पाठीवर ठेवण्यासाठीही ज्यांचे हात सरसावले नाहीत, त्यांच्याकडून विशाल हृदयाच्या वागणुकीची अपेक्षा तरी काय करायची? ते तर थिट्या मनाचे प्रदर्शन मांडून बसलेत. एरवी नाही नाही त्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांवर कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव करणार्‍या, एटिकेट्‌स, मॅनर्स ठासून भरल्याचा दावा करणार्‍या देशांना भारताच्या इतक्या मोठ्या यशाची दखल घ्यावीशी वाटत नाही, दखल घेतलीच तरी त्याचा जाहीरपणे उल्लेख करावासा वाटत नाही, उलट असले दर्जाहीन व्यंग्यचित्र प्रकाशित करून आमच्या प्रयत्नांची थट्टा करावीशी वाटते, त्यांच्या बेदरकारीची दखल आम्ही तरी का घ्यावी?
पृथ्वीच्या पाठीवर गरीब देशांची, गरीब माणसांची संख्या कमी नाही. भारतासारख्या देशातही ती संख्या दखलपात्र प्रमाणात आहे. ते वास्तव कुणीच कधीच नाकारलेले नाही. त्याची लाज बाळगण्याचे कारण नाही. कुणी कौतुक करो वा न करो, कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण त्यातून बाहेर पडण्याचे, इथल्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना वर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न चाललेत या देशात. गेल्या काही वर्षांतली बदलती आकडेवारी हे त्याचेच निदर्शक आहे. ज्यांना त्याचा मागमूसही नाही, त्या महाभागांच्या कथित कलाकृतीची नोंदही खरं तर भारताने घेऊ नये. पण त्या हरामखोरांची कृतीच इतकी हीन होती की लाथाडण्यासाठी तरी त्याची दखल भारतीयांना घ्यावीच लागली. गायी चारणारा माणूस ‘इलाईट स्पेस क्लब’चा दरवाजा ठोठावतोय् यात त्या कार्टूनिस्टला विनोद दिसला असेलही कदाचित! पण तमाम भारतीय जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. लेकहो! तुम्ही माना अथवा मानू नका, तुमच्या सहमती वा विरोधाला जराही भीक न घालता त्या क्लबचे दरवाजे या देशासाठी केव्हाच उघडले गेले आहेत. विरोधकांच्या नाकावर टिच्चून या देशातील वैज्ञानिकांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर तिथे स्थान मिळवले आहे. आता बसायचे असेल, तर बसा आमच्या शेजारी गुमान. नाही तर जा उडत!