समस्या उपभोगवादाच्या मुळाशी रुजली आहे. पैशाच्या जोरावर संस्कारांना तिलांजली देत श्रीमंतांची बाळे त्याला खतपाणी घालताहेत. संस्कारांचे ओझे वाहण्यास नकार देत, चैनीची मुक्त उधळण हेच आज अनेकांच्या आयुष्याचे ध्येय ठरले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी गाठाव्या लागणार्या स्तराचा प्रश्न त्यांच्या लेखी गौण ठरतो. यातूनच मग संस्कारांची शिदोरी शिळी वाटू लागते. उपभोगवादापासून दूर राहण्याची शिकवण देत जगत्नियंत्याच्या भक्तिमार्गात रममाण झालेला, जगात राहूनही इथल्या भौतिकवादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचे सामर्थ्य कमावलेला विविध धर्मातील साधू, संतांचा गोतावळा उगाच अळणी जीवन जगत असल्याचा त्याचा गैरसमज होतो. त्यात दडलेली त्यागाची शक्ती अन् भक्तिरसाचा आनंद, पबमधल्या चैनीतून मिळणार्या सुखाशी तुलनाही करता येणार नाही, इतका मोठा असल्याचे वास्तव कळण्या, समजण्याइतके भान आणि समज मानवजातीतल्या प्रत्येकाच्याच वाट्याला येणे शक्य नसले, तरी ज्यावर आपला अधिकार नाही, ती गोष्ट ओरबाडून न मिळवण्याची वृत्ती मनामनांत निर्माण होण्यासाठी तरी कायद्याच्या धाकाची गरज पडू नये!
वेश्यालये बंद केली, तर भर रस्त्यांवर मुलींवर बलात्कार होतील, असे कारण देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातल्या वेश्यावस्त्यांचे नाइलाजाने समर्थन केले होते. आता इतक्या वर्षांनी केंद्र सरकारने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील साईट्सवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. अशा साईट्सवर बंदी घातली, तर मग चांगल्या, दर्जेदार साहित्यातील संबंधित शब्दांचा शोध घेणेही इंटरनेटवर शक्य होणार नाही, असे तांत्रिक कारण केंद्र सरकारने, या बंदीला नकार देताना दिले आहे.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाश्चिमात्य लोक फार पुढारलेले अन् पूर्वेकडच्या देशातले लोक माघारलेले असल्याचा गैरसमज दूर करण्यासाठीच्या धडपडीत भारतातल्या संस्कारांचे संचित केव्हा कमजोर झाले अन् पाश्चिमात्यांचा मजबूत पगडा या समाजाला, त्याच्याही नकळत कसा वेड लावून गेला, कुणाला कळलंही नाही. माजी पंतप्रधानांची भीती खोटी होती असं नाही, पण वेल्थ, वाईन आणि वूमेनच्या चक्रव्यूहात समाज इतका भरकटत अन् गुरफटत गेला, की इतक्या वर्षात वेश्यालये तर तशीच राहिली, पण भर रस्त्यांवरच्या बलात्काराची संख्या काही कमी झाली नाही! उलट त्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतेय्. कधीकाळी इंटरनेटच्या वापराच्या निमित्ताने सायबर कॅफेंमधून चालणारी थेरं अधूनमधून कानावर पडायची. पण, इंटरनेट घराघरांत पोहोचले, हातांवरच्या बोटांशी खेळू लागले, तेव्हापासून तर परिस्थिती अक्षरश: हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. इंटरनेटच्या वापरापेक्षाही त्याच्या गैरवापराचे प्रमाण वाढू लागले. हवे ते, हवे तेव्हा बघायला उपलब्ध होऊ लागल्याने स्वैराचार वाढू लागला. आधीच दूरचित्रवाहिन्यांवरच्या मालिकांमधून झळकणार्या झगमगाटाशी स्पर्धा करत जीवन जगण्याच्या ईर्ष्येने निर्माण केलेल्या समस्या भीषण रूप धारण करत असताना, या स्वैराचाराची त्यात भर पडली आहे. मुंबईच्या नरीमन पॉईंटवर दिसणारे दृश्य काय, किंवा नागपूरच्या अंबाझरी बागेत दिसणारे प्रणयरत जोडपे काय, ही परिस्थिती निदान ‘या’ बाबतीत तरी पाश्चिमात्यांशी स्पर्धा करणारीच आहे. जिथल्या आदर्श संस्कृती आणि संस्कारांचे दाखले जगभरात दिले जातात, त्या भारतात विदेशी युवतींवर होणारे बलात्कार कोणता संदेश देतात जगाला? दिल्लीतल्या निर्भयाचे प्रकरण असो वा मग मुंबईतल्या शक्ती मिल परिसरातील बलात्काराचे, हा परिणाम केवळ कायद्याच्या धाकाच्या अभावाचा आहे, बालपणापासून रुजणारे संस्कार कमी पडताहेत, की पैसा, साधन-सुविधांच्या उपलब्धतेतून बेभान होत चाललीत माणसं? अश्लील साईट्सवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारने पुढे केलेले तांत्रिक कारण खोटे आहे, असे कुणीच म्हणणार नाही. पण, त्याच्या परिणामांची चिंता वाहत, त्यावर उपाय शोधण्याची गरज वाटणारी यंत्रणाच उपलब्ध नसणे, हेच मुळात या समस्येचे मूळ आहे.
मग उपाय काय?
इंटरनेट बंद केल्याने लागलीच समाजातला स्वैराचार संपेल, बलात्कार थांबतील, अश्लील चित्रफितींचे चलन थांबेल, अशा समजात कुणी वावरण्याचे कारण नाही. मुळात समस्या बदललेल्या विचारांची आहे. फिगर बिघडेल म्हणून बाळाला दूध न पाजणार्या ‘आई’तली ‘लेडी’ आज कोणत्या थराला पोहोचलीय्, याचे दुर्दैवी उदाहरण जर्मनीतल्या रेगेंजबुर्ग इथं नुकतेच घडले आहे. मित्रांसमवेत रंगणार्या पबमधल्या रात्रींना पारखे होण्याची कल्पनाही न मानवलेल्या एका तरुणीने एका बाळाला जन्म तर दिला, पण त्याच्या पालनपोषणात वेळ वाया जाईल आणि मग आपण आयुष्य मुक्तपणे उपभोगू शकणार नाही, या भीतीने तिने पोटच्या बाळाचा जन्मानंतर काही तासांतच चाकूने भोसकून खून केला... उपभोगवादाचा प्रवास नेमका कुठे चालला आहे, याची कल्पनाही करता येऊ नये, इतके भीषण अन् धगधगते वास्तव स्पष्ट करणारी ही घटना आहे.
समस्या उपभोगवादाच्या मुळाशी रुजली आहे. पैशाच्या जोरावर संस्कारांना तिलांजली देत श्रीमंतांची बाळे त्याला खतपाणी घालताहेत. संस्कारांचे ओझे वाहण्यास नकार देत, चैनीची मुक्त उधळण हेच आज अनेकांच्या आयुष्याचे ध्येय ठरले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी गाठाव्या लागणार्या स्तराचा प्रश्न त्यांच्या लेखी गौण ठरतो. यातूनच मग संस्कारांची शिदोरी शिळी वाटू लागते. उपभोगवादापासून दूर राहण्याची शिकवण देत जगत्नियंत्याच्या भक्तिमार्गात रममाण झालेला, जगात राहूनही इथल्या भौतिकवादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचे सामर्थ्य कमावलेला विविध धर्मातील साधू, संतांचा गोतावळा उगाच अळणी जीवन जगत असल्याचा त्याचा गैरसमज होतो. त्यात दडलेली त्यागाची शक्ती अन् भक्तिरसाचा आनंद, पबमधल्या चैनीतून मिळणार्या सुखाशी तुलनाही करता येणार नाही, इतका मोठा असल्याचे वास्तव कळण्या, समजण्याइतके भान आणि समज मानवजातीतल्या प्रत्येकाच्याच वाट्याला येणे शक्य नसले, तरी ज्यावर आपला अधिकार नाही, ती गोष्ट ओरबाडून न मिळवण्याची वृत्ती मनामनांत निर्माण होण्यासाठी तरी कायद्याच्या धाकाची गरज पडू नये! मी चांगला वागलो, तर ‘सात च्या आत घरात’ची सक्ती मुलींवर लादण्याची वेळ समाजातल्या कुठल्याच घरात येणार नाही. तरच माझ्या घरातली स्त्रीही समाजात सुरक्षित राहील, एवढे आत्मभानही सामाजिक परिवर्तन घडवायला पुरेसे ठरेल. इंटरनेटची आमिषंही मग त्याला आडवी येणार नाहीत. खरं ना?
No comments:
Post a Comment