Wednesday, May 28, 2014

परराष्ट्र धोरणाची नवी दिशा

प्रत्येकच देशाच्या प्रशासकीय कारभारात परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा हे विषय हाताळणारे दोन स्वतंत्र विभाग असतात. दुसर्‍या देशाला शत्रू समजूनच वागायचे ठरले, तर मग कुठल्याच देशाला परराष्ट्र धोरणासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची गरज उरणार नाही. संरक्षण खाते तयार करून प्रत्येक देश युद्धाच्या तालमीत रमला असता. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. कारण दिवस उगवला की शत्रुराष्ट्रांशी युद्ध करत सुटायचे नसते, तसेच कुणी ठरवून आपली खोडी काढत असेल, तर त्याची खुमखुमी जिरवण्याची तयारीही ठेवायची असते, हे धोरण पुरेसे आहे. या दोन्ही विभागांच्या कामांची सरमिसळ केव्हा करायची अन् केव्हा त्यांना एकमेकांपासून दूर ठेवायचे याचा निर्णय त्या त्या देशाला योग्य वेळी घेता आला पाहिजे. ते करता आले तर मग पाकिस्तानच काय, अमेरिकेलाही भारतापुढे एक दिवस नमते घ्यावे लागेल. आज इंटरनेट आणि विज्ञान-तंत्रज्ञानाने सारे जग जवळ आणले आहे. उद्योग, व्यापाराने देशाच्या सीमा पार करत जागतिक स्तर गाठला आहे. स्वत:ची सुरक्षा, अस्मिता, ध्येय, धोरणांचा सांभाळ करत जगातील जवळपास सर्वच देश एकमेकांच्या सोबतीने विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करताहेत. अशात कुणी कूपमंडूक वृत्तीने वागून तग धरू शकत नाही. सार्‍या जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणार्‍या भारतासारख्या देशाला तर तसे मुळीच करता येणार नाही. प्रश्‍न देशाच्या सुरक्षेचा असेल, दहशतवादाशी निपटण्याचा असेल, तर तिथे पाकसमर्थकांना ठेचून काढण्याचीच भूमिका भारताला घ्यावी लागणार आहे. पण म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गट्टी फू करावी, अशी पोरकट अपेक्षाही आपल्याला करता येणार नाही. याचे भान पाकिस्तानातील लष्करी व्यवस्था आणि भारतातील तामिळ समर्थक या दोघांनीही जोपासले पाहिजे.

आयएसआयसह तमाम दहशतवादी संघटनांचे इशारे केराच्या टोपलीत टाकून, सैन्याची नकारघंटा साफ झुगारून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अखेर भारतात येण्याचा आणि इथल्या नूतन पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही देशात एकच खळबळ उडाली. मुळातच या देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी शेजारी राष्ट्रांना देण्यात आलेले निमंत्रण अनेकांना आश्‍चर्यचकित करणारे, कित्येकांना भ्रमित करणारे, बहुतेकांना आनंदित करणारे आणि सरतेशेवटी नव्या भारतीय नेतृत्वाच्या मुत्सद्देगिरीची चुणूक दाखविणारे ठरले आहे. चहुबाजूंनी असुरक्षित सीमांच्या समस्यांचे ओझे वाहत भारत गेल्या काही वर्षांत वाटचाल करतोय्. चीन, पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशने कधी आमच्या सीमा गिळंकृत करण्याची हिंमत दाखविली नसली, तरी तिथल्या लोकांच्या घुसखोरीने भारतीय सीमेत आगळी सामाजिक समस्या निर्माण केली आहे. याउलट चीनने भारतीय भूमीवरच वक्रदृष्टी ठेवत तो भूभाग बळकावण्याचे मनसुबे रचले आहेत. भारतात अस्वस्थता निर्माण करण्याची पाकिस्तानची तर्‍हा काहीशी वेगळी आहे. थेट युद्ध करून आपण जिंकू शकत नाही, हे वास्तव ध्यानात आल्यानंतर या देशाने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून भारतीय जनमानस विस्कळीत करण्याचे प्रयत्न चालविलेत. दहशतवाद हे त्यांच्या त्याच प्रत्नांचेच एक फलित आहे.
लोकसंख्या, भूप्रदेश, नैसर्गिक संसाधने, साधन-सुविधा, बुद्धिमत्ता, कौशल्य, निधी अशा सर्वच बाबतीत कमालीचा संपन्न असलेला भारत सर्वार्थाने ताकदवान असूनही जागतिक स्तरावर आपले स्वतंत्र स्थान आजवर निर्माण करू शकला नाही, हे दुर्दैवी पण धगधगते वास्तव आहे. स्वत:ची ठोस धोरणे, ठाम भूमिकेच्या अभावामुळे हे दुर्दैव भारताच्या वाट्याला आले आहे. तसेही भारताच्या परराष्ट्र धोरणांवर दरवेळी कुठल्याशा व्यक्तीचा, पक्षाचा प्रभाव राहिला आहे. कधी नेहरूंच्या व्यक्तिगत आवडीनिवडींवर आम्ही अमेरिका आणि रशिया यांच्यातून एकाची निवड केली, तर कधी भारतातील मुस्लिमांना वाईट वाटेल म्हणून पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्याची आपली हिंमत झाली नाही, तर गेल्या दशकात डॉ. मनमोहसिंहांचे अमेरिकाधार्जिणे धोरण या देशाच्या एकूणच कारभारावर प्रचंड हावी राहिले. सार्क देशांनी कधीकाळी, ज्याने आपले नेतृत्व करावे म्हणून मोठ्या आशेने बघितले, त्या भारताला त्या संधीचे सोने कधी करता आले नाही. आशियातही बलाढ्य चीनच्या बरोबरीने उभे राहण्यासाठीचा पुढाकार इथल्या नेतृत्वाने कधी घेतला नाही. परवाच्या सोहळ्यासाठी सार्क देशांच्या नेत्यांना धाडले गेलेले निमंत्रण आणि त्याला प्रतिसाद देत त्यातील बहुतांश देशांच्या नेत्यांनी लावलेली उपस्थिती बोलकी ठरावी अशीच आहे. या निमंत्रणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आगामी कार्याची दिशा स्पष्ट केली आहे, तर त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद देत शेजारी राष्ट्रांनीही भविष्यात भारतासोबतच्या सकारात्मक राजकीय संबंधांचे संकेत दिले आहेत. यात सर्वाधिक वाद होतोय् तो पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीवर. शरीफांच्या भेटीवरून वाद केवळ पाकिस्तानातच उद्भवलेत असे नाही, तर त्यांना दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून भारतातही काही कडवट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्या देशाने आमच्या सीमेवर कुरापती चालवल्या आहेत, ज्यांनी भारतातली राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था उलथविण्याचे मनसुबे रचणार्‍या दहशतवादाला थारा दिलाय्, ज्यांच्या सैन्याने आमच्या हद्दीत घुसून आमच्या सैनिकांचे शीर कापून नेले, काश्मीर पेटवला, त्यांना सन्मानाने बोलवायचे कशाला, असा प्रश्‍न भारतीय जनमानस विचारतोय्, तर लष्कराचा प्रभाव असलेल्या पाकिस्तानात शरीफांच्या भारतभेटीवर दहशतवाद्यांपासून तर लष्करी अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनीच आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानची आजवरची भारताबाबतची भूमिका लक्षात घेता भारतीय जनमानसात उमटलेला संताप अगदीच अनाठायी होता असे म्हणता येणार नाही. पण सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या, जगाचे नेतृत्व करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणार्‍या, तशी ताकद असलेल्या भारतासारख्या देशाने, त्याच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात पाकिस्तानला निमंत्रण देणे, त्या अर्थाने भारताच्या औदार्याचे जागतिक पातळीवर प्रदर्शन घडविणारी बाब म्हटली पाहिजे. तसेही या निमंत्रणाला विरोध करणार्‍या भारतीयांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येकच देशाच्या प्रशासकीय कारभारात परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा हे विषय हाताळणारे दोन स्वतंत्र विभाग असतात. दुसर्‍या देशाला शत्रू समजूनच वागायचे ठरले, तर मग कुठल्याच देशाला परराष्ट्र धोरणासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची गरज उरणार नाही. संरक्षण खाते तयार करून प्रत्येक देश युद्धाच्या तालमीत रमला असता. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. कारण दिवस उगवला की शत्रुराष्ट्रांशी युद्ध करत सुटायचे नसते, तसेच कुणी ठरवून आपली खोडी काढत असेल, तर त्याची खुमखुमी जिरवण्याची तयारीही ठेवायची असते, हे धोरण पुरेसे आहे. या दोन्ही विभागांच्या कामांची सरमिसळ केव्हा करायची अन् केव्हा त्यांना एकमेकांपासून दूर ठेवायचे याचा निर्णय त्या त्या देशाला योग्य वेळी घेता आला पाहिजे. ते करता आले तर मग पाकिस्तानच काय, अमेरिकेलाही भारतापुढे एक दिवस नमते घ्यावे लागेल.
आज इंटरनेट आणि विज्ञान-तंत्रज्ञानाने सारे जग जवळ आणले आहे. उद्योग, व्यापाराने देशाच्या सीमा पार करत जागतिक स्तर गाठला आहे. स्वत:ची सुरक्षा, अस्मिता, ध्येय, धोरणांचा सांभाळ करत जगातील जवळपास सर्वच देश एकमेकांच्या सोबतीने विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करताहेत. अशात कुणी कूपमंडूक वृत्तीने वागून तग धरू शकत नाही. सार्‍या जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणार्‍या भारतासारख्या देशाला तर तसे मुळीच करता येणार नाही. प्रश्‍न देशाच्या सुरक्षेचा असेल, दहशतवादाशी निपटण्याचा असेल, तर तिथे पाकसमर्थकांना ठेचून काढण्याचीच भूमिका भारताला घ्यावी लागणार आहे. पण म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गट्टी फू करावी, अशी पोरकट अपेक्षाही आपल्याला करता येणार नाही. याचे भान पाकिस्तानातील लष्करी व्यवस्था आणि भारतातील तामिळ समर्थक या दोघांनीही जोपासले पाहिजे. सार्क देशांच्या प्रमुखांना पाठविलेल्या निमंत्रणातून भारताच्या केवळ मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडलेले नाही, तर आमची सामंजस्याची भूमिकाही यानिमित्ताने जगजाहीर झाली आहे. केवळ त्यांचे नेतृत्व करण्याचीच नव्हे, तर या राष्ट्रांशी मधूर संबंध ठेवण्याची भारताची तयारीही त्यातून दिसून आली आहे. आता चेंडू त्या त्या देशांच्या कोर्टात आहे. भारतासोबतचे संबंध चांगले ठेवायचे किंवा कसे हे त्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. इतरांच्या तुलनेत मोठा देश म्हणून भारताने पहिले पाऊल टाकले आहे. आता भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद सकारात्मक द्यायचा की नकारात्मक, हेही त्यांनीच ठरवायचे आहे. शेवटी दोन देशांमधील संबंध चांगले ठेवण्याची जबाबदारी काही एकट्या भारताची नाही. त्या जबाबदारीचे वहन त्यांनीही तितक्याच जबाबदारीने केले पाहिजे. जागतिक शांततेसारखे मुद्दे कुण्या एकाची मक्तेदारी नसते. ती सामूहिक जबाबदारी आहे. एक मात्र खरे की, गेल्या दशकात ढेपाळलेले भारताचे परराष्ट्र धोरण नरेन्द्र मोदींच्या शपथेपूर्वीच सुदृढ होण्याच्या दिशेने पावलं पडली आहेत. भारताच्या सीमा सुरक्षेच्या, दहशतवादाच्या, देशहिताच्या मुद्यावर कुठलाही समझोता न करता या दिशेने भारताची वाटचाल भविष्यातही सुरू राहिली पाहिजे. भारतात नव्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्याचे देशवासीयांना कळले आहेच, आता ते सार्‍या जगाला कळले पाहिजे...

Sunday, May 25, 2014

मियॉंदाद चालतो, तर शरीफ का नाही?

अशा वेळी सरकारच्या स्पष्ट निर्णयाची अन् प्रशासनाच्या कठोर भूमिकेची गरज आहेच. पण, म्हणून एखाद्या गावात सार्वजनिक नळावर होतात तशी भांडणं करता येत नाहीत दुसर्‍या देशाच्या पंतप्रधानांशी अन् शेजार्‍याशी धरतात तसा अबोलाही धरता येत नाही इथे. रशियाशी मैत्री केल्याने अमेरिकेच्या रोषाचा सामना भारताला सातत्याने करावा लागला आहे. पण, म्हणून अमेरिकेच्या दौर्‍यावरच न जाण्याचा, त्यांच्याशी गट्टीफू करण्याचा निर्णय घेता आला नाही कधी या देशाला. अगदी बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळीही जगातल्या इतर देशांप्रमाणेच अमेरिकेपुढेही भारताची भूमिका मांडून आपली बाजू मजबूत करण्याची रणनीती तत्कालीन पंतप्रधानांनी रचली होती, अमेरिका भारताच्या साथीला नसल्याची पुरेपूर जाणीव असतानाही. त्या वेळी या रणनीतीचे भरपूर कौतुकही झाले होते. आताही पाकिस्तानची भूमिका कुणाला ठाऊक नाही? दर दोन दिवसांनी सीमेवर कुरघोड्या करणार्‍या पाकिस्तानबद्दलची मोदींच्या मनात असलेली भावना उद्धव ठाकरेंच्या भावनेपेक्षा वेगळी थोडीच असणार आहे? पण, म्हणून शपथविधी सोहळ्यात त्यांना निमंत्रण न धाडणे, हे वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटची पिच खोदून भारत-पाक सामना रद्द करण्यास बाध्य करण्याच्या पोरखेळाइतके सहज थोडीच आहे. शिवाय, ज्यांना जावेद मियॉंदाद बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आलेला चालतो, त्यांनी शरीफांच्या भारत भेटीवर आगपाखड करावी, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या नेमक्या मुहूर्तावर रोष व्यक्त करावा, हे जरासे अनाकलनीयच आहे. 
आंतरराष्ट्रीय राजकारणात युद्धापेक्षाही शांततेच्या काळातील एखाद्या देशाची भूमिका अधिक महत्त्वाची मानली जाते. शत्रुराष्ट्रांशी काही दररोजच युद्ध करायचे नसते अन् त्यांच्याशी होणार्‍या शांतिवार्तांवरही खूप अवलंबून राहायचे नसते. शांतिवार्ता करतानाही सीमेवरचे सैन्य युद्धासाठी सज्ज ठेवायचे असते.
पण, बहुधा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या राजकारणाची शैली शिवसेना नेत्यांना भावलेली दिसत नाहीय्. म्हणूनच की काय, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाठविलेले त्यांना म्हणे मुळीच आवडलेले नाही. त्यात नवाज शरीफांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय जाहीर केला, तो तर त्यांना जराही खपलेला नाही. त्यामुळे गरज पडली, तर शपथविधी सोहळ्यात शरीफांच्या उपस्थितीत आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी शपथ घेऊ नये, अशी कठोर भूमिका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत शिवसेना आली असल्याचेही वृत्त आहे.भावनिक पातळीवर शिवसेनेची भूमिका समर्थन करण्याजोगी असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे राजकारण करताना निर्णय भावनिक पातळीवर जाऊन घेता येत नाहीत. इथे अनेकदा चेहरा हसरा ठेवून कठोर निर्णय घ्यावे लागतात, तर कित्येकदा दु:ख पचवून चेहरा हसरा ठेवावा लागतो. सेनेच्या राजकारणात मनोहर जोशींशी ठाकरेंची वागणूक नाही का याच प्रकारात मोडत? तेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही करावे लागते.
हे खरं आहे की, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानबद्दलच्या भारतीयांच्या भावना काहीशा वेगळ्या आहेत. या दोन देशांमधील संबंधांना धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीची पार्श्‍वभूमी आहे, नंतरच्या काळात बांगलादेशाच्या रूपात पाकिस्तानची झालेली शकले अन् त्याबाबत तिथल्या लोकांच्या मनातल्या रोषाचीही जोड त्याला मिळाली आहे. दोन्ही देशांतल्या लोकांच्या मनातल्या एकमेकांबद्दलच्या भावना, क्रिकेटचा सामना असो, की काश्मीरच्या मुद्यावर दिल्या जाणार्‍या घोषणा, त्यातून व्यक्त होत असतात.
या पार्श्‍वभूमीवर ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावनांचे भावनिक आधारावर काही लोक समर्थनही करतील. पण, यापेक्षाही लोकांना मोदींचा निर्णय अधिक भावला आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी भविष्यातील त्यांच्या कार्यपद्धतीची दिशा स्पष्ट केली आहे. आज भारतीय सीमा असुरक्षित आहेत. सीमेपलीकडच्या कारवायांनी देश अस्वस्थ आहे. चीनसारख्या देशाने तर घुसखोरी करून अरुणाचलसारखा प्रांत घशात टाकण्याचे मनसुबे रचले आहेत. पाकिस्तानमधून दहशतवादाला मिळणारे प्रोत्साहन भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी केवळ सुरक्षेच्या दृष्टिनेच नाही, तर इथल्या अर्थव्यवस्थेवरील ओझ्याच्या आणि सामाजिक असमतोलाच्या दृष्टीनेही समस्येत भर घालणारी आहे. अशा वेळी सरकारच्या स्पष्ट निर्णयाची अन् प्रशासनाच्या कठोर भूमिकेची गरज आहेच. पण, म्हणून एखाद्या गावात सार्वजनिक नळावर होतात तशी भांडणं करता येत नाहीत दुसर्‍या देशाच्या पंतप्रधानांशी अन् शेजार्‍याशी धरतात तसा अबोलाही धरता येत नाही इथे. रशियाशी मैत्री केल्याने अमेरिकेच्या रोषाचा सामना भारताला सातत्याने करावा लागला आहे. पण, म्हणून अमेरिकेच्या दौर्‍यावरच न जाण्याचा, त्यांच्याशी गट्टीफू करण्याचा निर्णय घेता आला नाही कधी या देशाला. अगदी बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळीही जगातल्या इतर देशांप्रमाणेच अमेरिकेपुढेही भारताची भूमिका मांडून आपली बाजू मजबूत करण्याची रणनीती तत्कालीन पंतप्रधानांनी रचली होती, अमेरिका भारताच्या साथीला नसल्याची पुरेपूर जाणीव असतानाही. त्या वेळी या रणनीतीचे भरपूर कौतुकही झाले होते. आताही पाकिस्तानची भूमिका कुणाला ठाऊक नाही? दर दोन दिवसांनी सीमेवर कुरघोड्या करणार्‍या पाकिस्तानबद्दलची मोदींच्या मनात असलेली भावना उद्धव ठाकरेंच्या भावनेपेक्षा वेगळी थोडीच असणार आहे? पण, म्हणून शपथविधी सोहळ्यात त्यांना निमंत्रण न धाडणे, हे वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटची पिच खोदून भारत-पाक सामना रद्द करण्यास बाध्य करण्याच्या पोरखेळाइतके सहज थोडीच आहे. शिवाय, ज्यांना जावेद मियॉंदाद बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आलेला चालतो, त्यांनी शरीफांच्या भारत भेटीवर आगपाखड करावी, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या नेमक्या मुहूर्तावर रोष व्यक्त करावा, हे जरासे अनाकलनीयच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची समीकरणे वेगळी असतात. त्याची पुरेशी जाणीव असताना शिवसेनेने शपथविधी सोहळ्याच्या तोंडावर जाहीरपणे व्यक्त केलेली भावना, काल-परवाच भाजपा आणि मित्रपक्षांच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकणार्‍या मतदारांच्या मनात अकारण रोष निर्माण करणारी आहे. ठाकरेंच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा प्रश्‍न निकाली निघू शकत नाही. बरं, हा देश दूरवर कुठेतरी सातासमुद्रापलीकडे वसलेला असता, तर उद्धव म्हणतात त्याप्रमाणे त्याच्याशी कुठलेच संबंध न ठेवण्याच्या कठोर निर्णयाप्रत येता आलेही असते. पण, परिस्थिती तशी नाही. हा देश आपला शेजारी आहे. आपल्या खोड्या काढण्याची त्याची सवय माहीत असली, तरी त्याला उत्तरही मुत्सद्देगिरीनेच द्यावे लागणार आहे. एक मात्र खरे की, या संदर्भातली या आधीच्या सरकारची ढेपाळलेली मवाळ भूमिका नाकारण्याचा स्वाभिमानी निर्णय सरकारला नक्कीच घेता येणार आहे. तो घेण्यासाठी ठाकरेंनी जरूर आग्रह धरावा. देशभरातील जनतेने मोठ्या आशेने कॉंग्रेसला हुसकावून एनडीएच्या हाती सत्ता सोपविली आहे. महाराष्ट्रही त्याच लाटेच्या भरवशावर सत्तापरिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. अशात दरवेळी मतभेदाचे जाहीर प्रदर्शन मांडण्याची तर्‍हा अयोग्य असल्याची बाब एनडीएतील सर्वच घटकपक्षांनी ध्यानात घ्यायला हवी.

Wednesday, May 7, 2014

‘त्या’ साईट्‌सवर बंदी नाही!

 समस्या उपभोगवादाच्या मुळाशी रुजली आहे. पैशाच्या जोरावर संस्कारांना तिलांजली देत श्रीमंतांची बाळे त्याला खतपाणी घालताहेत. संस्कारांचे ओझे वाहण्यास नकार देत, चैनीची मुक्त उधळण हेच आज अनेकांच्या आयुष्याचे ध्येय ठरले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी गाठाव्या लागणार्‍या स्तराचा प्रश्‍न त्यांच्या लेखी गौण ठरतो. यातूनच मग संस्कारांची शिदोरी शिळी वाटू लागते. उपभोगवादापासून दूर राहण्याची शिकवण देत जगत्‌नियंत्याच्या भक्तिमार्गात रममाण झालेला, जगात राहूनही इथल्या भौतिकवादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचे सामर्थ्य कमावलेला विविध धर्मातील साधू, संतांचा गोतावळा उगाच अळणी जीवन जगत असल्याचा त्याचा गैरसमज होतो. त्यात दडलेली त्यागाची शक्ती अन् भक्तिरसाचा आनंद, पबमधल्या चैनीतून मिळणार्‍या सुखाशी तुलनाही करता येणार नाही, इतका मोठा असल्याचे वास्तव कळण्या, समजण्याइतके भान आणि समज मानवजातीतल्या प्रत्येकाच्याच वाट्याला येणे शक्य नसले, तरी ज्यावर आपला अधिकार नाही, ती गोष्ट ओरबाडून न मिळवण्याची वृत्ती मनामनांत निर्माण होण्यासाठी तरी कायद्याच्या धाकाची गरज पडू नये! 
वेश्यालये बंद केली, तर भर रस्त्यांवर मुलींवर बलात्कार होतील, असे कारण देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातल्या वेश्यावस्त्यांचे नाइलाजाने समर्थन केले होते. आता इतक्या वर्षांनी केंद्र सरकारने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्‍लील साईट्‌सवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. अशा साईट्‌सवर बंदी घातली, तर मग चांगल्या, दर्जेदार साहित्यातील संबंधित शब्दांचा शोध घेणेही इंटरनेटवर शक्य होणार नाही, असे तांत्रिक कारण केंद्र सरकारने, या बंदीला नकार देताना दिले आहे.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाश्‍चिमात्य लोक फार पुढारलेले अन् पूर्वेकडच्या देशातले लोक माघारलेले असल्याचा गैरसमज दूर करण्यासाठीच्या धडपडीत भारतातल्या संस्कारांचे संचित केव्हा कमजोर झाले अन् पाश्‍चिमात्यांचा मजबूत पगडा या समाजाला, त्याच्याही नकळत कसा वेड लावून गेला, कुणाला कळलंही नाही. माजी पंतप्रधानांची भीती खोटी होती असं नाही, पण वेल्थ, वाईन आणि वूमेनच्या चक्रव्यूहात समाज इतका भरकटत अन् गुरफटत गेला, की इतक्या वर्षात वेश्यालये तर तशीच राहिली, पण भर रस्त्यांवरच्या बलात्काराची संख्या काही कमी झाली नाही! उलट त्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतेय्. कधीकाळी इंटरनेटच्या वापराच्या निमित्ताने सायबर कॅफेंमधून चालणारी थेरं अधूनमधून कानावर पडायची. पण, इंटरनेट घराघरांत पोहोचले, हातांवरच्या बोटांशी खेळू लागले, तेव्हापासून तर परिस्थिती अक्षरश: हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. इंटरनेटच्या वापरापेक्षाही त्याच्या गैरवापराचे प्रमाण वाढू लागले. हवे ते, हवे तेव्हा बघायला उपलब्ध होऊ लागल्याने स्वैराचार वाढू लागला. आधीच दूरचित्रवाहिन्यांवरच्या मालिकांमधून झळकणार्‍या झगमगाटाशी स्पर्धा करत जीवन जगण्याच्या ईर्ष्येने निर्माण केलेल्या समस्या भीषण रूप धारण करत असताना, या स्वैराचाराची त्यात भर पडली आहे. मुंबईच्या नरीमन पॉईंटवर दिसणारे दृश्य काय, किंवा नागपूरच्या अंबाझरी बागेत दिसणारे प्रणयरत जोडपे काय, ही परिस्थिती निदान ‘या’ बाबतीत तरी पाश्‍चिमात्यांशी स्पर्धा करणारीच आहे. जिथल्या आदर्श संस्कृती आणि संस्कारांचे दाखले जगभरात दिले जातात, त्या भारतात विदेशी युवतींवर होणारे बलात्कार कोणता संदेश देतात जगाला? दिल्लीतल्या निर्भयाचे प्रकरण असो वा मग मुंबईतल्या शक्ती मिल परिसरातील बलात्काराचे, हा परिणाम केवळ कायद्याच्या धाकाच्या अभावाचा आहे, बालपणापासून रुजणारे संस्कार कमी पडताहेत, की पैसा, साधन-सुविधांच्या उपलब्धतेतून बेभान होत चाललीत माणसं? अश्‍लील साईट्‌सवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारने पुढे केलेले तांत्रिक कारण खोटे आहे, असे कुणीच म्हणणार नाही. पण, त्याच्या परिणामांची चिंता वाहत, त्यावर उपाय शोधण्याची गरज वाटणारी यंत्रणाच उपलब्ध नसणे, हेच मुळात या समस्येचे मूळ आहे.

मग उपाय काय?

इंटरनेट बंद केल्याने लागलीच समाजातला स्वैराचार संपेल, बलात्कार थांबतील, अश्‍लील चित्रफितींचे चलन थांबेल, अशा समजात कुणी वावरण्याचे कारण नाही. मुळात समस्या बदललेल्या विचारांची आहे. फिगर बिघडेल म्हणून बाळाला दूध न पाजणार्‍या ‘आई’तली ‘लेडी’ आज कोणत्या थराला पोहोचलीय्, याचे दुर्दैवी उदाहरण जर्मनीतल्या रेगेंजबुर्ग इथं नुकतेच घडले आहे. मित्रांसमवेत रंगणार्‍या पबमधल्या रात्रींना पारखे होण्याची कल्पनाही न मानवलेल्या एका तरुणीने एका बाळाला जन्म तर दिला, पण त्याच्या पालनपोषणात वेळ वाया जाईल आणि मग आपण आयुष्य मुक्तपणे उपभोगू शकणार नाही, या भीतीने तिने पोटच्या बाळाचा जन्मानंतर काही तासांतच चाकूने भोसकून खून केला... उपभोगवादाचा प्रवास नेमका कुठे चालला आहे, याची कल्पनाही करता येऊ नये, इतके भीषण अन् धगधगते वास्तव स्पष्ट करणारी ही घटना आहे.
 समस्या उपभोगवादाच्या मुळाशी रुजली आहे. पैशाच्या जोरावर संस्कारांना तिलांजली देत श्रीमंतांची बाळे त्याला खतपाणी घालताहेत. संस्कारांचे ओझे वाहण्यास नकार देत, चैनीची मुक्त उधळण हेच आज अनेकांच्या आयुष्याचे ध्येय ठरले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी गाठाव्या लागणार्‍या स्तराचा प्रश्‍न त्यांच्या लेखी गौण ठरतो. यातूनच मग संस्कारांची शिदोरी शिळी वाटू लागते. उपभोगवादापासून दूर राहण्याची शिकवण देत जगत्‌नियंत्याच्या भक्तिमार्गात रममाण झालेला, जगात राहूनही इथल्या भौतिकवादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचे सामर्थ्य कमावलेला विविध धर्मातील साधू, संतांचा गोतावळा उगाच अळणी जीवन जगत असल्याचा त्याचा गैरसमज होतो. त्यात दडलेली त्यागाची शक्ती अन् भक्तिरसाचा आनंद, पबमधल्या चैनीतून मिळणार्‍या सुखाशी तुलनाही करता येणार नाही, इतका मोठा असल्याचे वास्तव कळण्या, समजण्याइतके भान आणि समज मानवजातीतल्या प्रत्येकाच्याच वाट्याला येणे शक्य नसले, तरी ज्यावर आपला अधिकार नाही, ती गोष्ट ओरबाडून न मिळवण्याची वृत्ती मनामनांत निर्माण होण्यासाठी तरी कायद्याच्या धाकाची गरज पडू नये! मी चांगला वागलो, तर ‘सात च्या आत घरात’ची सक्ती मुलींवर लादण्याची वेळ समाजातल्या कुठल्याच घरात येणार नाही. तरच माझ्या घरातली स्त्रीही समाजात सुरक्षित राहील, एवढे आत्मभानही सामाजिक परिवर्तन घडवायला पुरेसे ठरेल. इंटरनेटची आमिषंही मग त्याला आडवी येणार नाहीत. खरं ना?