शरद पवारांच्या ज्येष्ठतेची, त्यांच्या तल्लख बुद्धीची, राजकीय चातुर्याची, सत्तेसाठी कुठलीही पातळी गाठण्याच्या त्यांच्या क्षमतेची, प्रसंग पाहून बोलण्याची, योग्य प्रसंगी मौन साधण्याची आणि प्रसंग पाहूनच बेताल बडबडण्याच्या त्यांच्या कलेची महती काय वर्णावी? देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या संघर्षाचे गोडवे गात, मोदींच्या कॉंग्रेसमुक्तीच्या संकल्पनेवर कोरडे ओढणार्या पवारांनी स्वत: कितीवेळा कॉंग्रेसला दगा दिला, याचा हिशेब कोण मांडणार? नरेंद्र मोदींची विचारधारा तुम्हाला पटत नाही, हे एकवेळ समजताही येईल. पण, निदान ते आपल्या भूमिकेशी, विचारांशी ठाम तरी आहेत. तुमची तर त्याही बाबतीत बोंबच आहे ना, पवारसाहेब! कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही ‘पुलोद’ स्थापन केली. सत्ता मिळवण्यासाठी वैचारिक मतभेदांच्या भिंती पार करून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवला. सत्तेसाठी जनसंघाचीही सोबत घ्यायला तुम्हाला त्या वेळी कमीपणा वाटला नाही आणि काही दिवसांत पुलोदचा संसार मोडीत काढून कॉंग्रेससोबत घरठाव करतानाही जराशी खंतही वाटली नाही. फार दिवस नाही झालेत पवारसाहेब! फारतर एक तप. आठवा जरा. ज्या सोनियाच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करून तुम्ही कॉंग्रेसच्या विरोधात थैमान घातले होते, नेमक्या त्याच सोनियांच्या नेतृत्वात आणि त्याच गांधींच्या पक्षासोबत आज तुम्ही सत्ता उपभोगताहात- बारा वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडताना केलेली ती बेताल बडबड विसरून! त्याग आणि बलिदानाच्या रम्य कथा कुणी आणि कुणाला सांगायच्या पवारसाहेब?
गेल्या काही दिवसांत या देशात नजरेस येऊ लागलेली कॉंग्रेस आणि त्याच्या नेतृत्वातील युपीएची दुरवस्था, त्या पक्षाच्या नेत्यांना आता कमालीची अस्वस्थ करू लागली आहे. गेली कित्येक वर्षे राबविलेली सत्ता हातून जाण्याच्या शक्यतेचे शल्य यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे झळकू लागले आहे. देशातले हे ‘बदला’चे वारे बघून पायाखालची वाळू सरकू लागलीय् यांच्या. बहुधा म्हणूनच, त्या बदलासाठी कारणीभूत ठरलेल्या नेत्याला नेस्तनाबूत करण्याचे, त्याला सार्या जगासमोर खिजवण्याचे षडयंत्र यांच्या डोक्यात घर करू लागले आहे. मतदानाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय् तसतशी या अस्वस्थतेची तीव्रता वाढतेय्. त्यातूनच शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही जिभेवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसले आहे. त्यांना आता सध्याच्या कॉंग्रेसच्या राजवटीच्या तुलनेत अटलजींचे राज्य बरे होते, असे वाटू लागले आहे. दुसरीकडे, मोदींची बडबड बकवास ठरवायलाही ते हिरिरीने सरसावले आहेत. नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला कॉंग्रेसमुक्तीचा संकल्प म्हणजे सरळसरळ वेडेपण असल्याचा त्यांचा दावा आहे. असले विधान करणार्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसच्या योगदानाचा विसर पडला असल्याचे सांगत, मोदींना पागलखान्यात भरती करण्याचा अनाहूत सल्लाही शरद पवारांनी दिला आहे!
शरद पवारांच्या ज्येष्ठतेची, त्यांच्या तल्लख बुद्धीची, राजकीय चातुर्याची, सत्तेसाठी कुठलीही पातळी गाठण्याच्या त्यांच्या क्षमतेची, प्रसंग पाहून बोलण्याची, योग्य प्रसंगी मौन साधण्याची आणि प्रसंग पाहूनच बेताल बडबडण्याच्या त्यांच्या कलेची महती काय वर्णावी? देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या संघर्षाचे गोडवे गात, मोदींच्या कॉंग्रेसमुक्तीच्या संकल्पनेवर कोरडे ओढणार्या पवारांनी स्वत: कितीवेळा कॉंग्रेसला दगा दिला, याचा हिशेब कोण मांडणार? नरेंद्र मोदींची विचारधारा तुम्हाला पटत नाही, हे एकवेळ समजताही येईल. पण, निदान ते आपल्या भूमिकेशी, विचारांशी ठाम तरी आहेत. तुमची तर त्याही बाबतीत बोंबच आहे ना, पवारसाहेब! कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही ‘पुलोद’ स्थापन केली. सत्ता मिळवण्यासाठी वैचारिक मतभेदांच्या भिंती पार करून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवला. सत्तेसाठी जनसंघाचीही सोबत घ्यायला तुम्हाला त्या वेळी कमीपणा वाटला नाही आणि काही दिवसांत पुलोदचा संसार मोडीत काढून कॉंग्रेससोबत घरठाव करतानाही जराशी खंतही वाटली नाही. फार दिवस नाही झालेत पवारसाहेब! फारतर एक तप. आठवा जरा. ज्या सोनियाच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करून तुम्ही कॉंग्रेसच्या विरोधात थैमान घातले होते, नेमक्या त्याच सोनियांच्या नेतृत्वात आणि त्याच गांधींच्या पक्षासोबत आज तुम्ही सत्ता उपभोगताहात- बारा वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडताना केलेली ती बेताल बडबड विसरून! त्याग आणि बलिदानाच्या रम्य कथा कुणी आणि कुणाला सांगायच्या पवारसाहेब? देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी कॉंग्रेस आज उरलीय् कुठे? देशासाठी प्राणांची आहुती द्यायला निघालेल्या कॉंग्रेसचे पाईक तर आज देशाचे लचके तोडायला सिद्ध झाले आहेत. घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या शर्यतील ‘आघाडी’वर आहेत सारे. केवळ मोदी म्हणतात म्हणून नाही, तर आता या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाला देश कॉंग्रेसमुक्त झालेला हवा आहे. पण, सामान्य माणसाच्या मनातली भाषा तुम्हाला कळेल तर ना? बरं! तुम्हाला ती कळत नाही, असे तरी कसे म्हणावे? तुम्हाला तर नाडीच कळली आहे महाराष्ट्राच्या जनमानसाची! तरीही मोदींना वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्याची भाषा बोलताहात आपण? चांगलेच चलाख आहात तुम्ही. लोकांच्या मनातली भाषा तुम्हाला चांगलीच उमजली आहे. येत्या काळातले सत्तापरिवर्तनही तुमच्या दृष्टिपथात आहे. हे परिवर्तन कुणामुळे घडताहे, याचीही जाण आहे तुम्हाला. बहुधा म्हणूनच परिवर्तन घडवून आणणार्यालाच बदनाम करण्याची शक्कल तुमच्या डोक्यात आकाराला येऊ लागली आहे.
पवारसाहेब, पागलखान्यात मोदींना नाही, तुम्हाला पाठविण्याची वेळ आली आहे! तुम्ही आणि तुमच्या सोबत्यांनी केलेली काळी कृत्ये, हजारो कोटी रुपयांचे घोटाळे, भ्रष्टाचार, त्यातून शिगेला पोहोचलेली महागाई, याचे पितळ उघडे पाडून जनतेच्या मनात अंगार पेटविणारे मोदी म्हणे वेडे! आणि या सर्व बाबींना साथ देणारे तुम्ही तेवढे शहाणे? पवारसाहेब, डोके नेमके कुणाचे फिरलेय्, ते जनतेला पुरते ठाऊक आहे. पागलखान्यात भरती कुणाला करण्याची गरज आहे, हेही सुजाण नागरिकांना उमजले आहे. ‘वेड पांघरून पेडगावला जाण्या’ची तुमची तर्हा ठाऊक नाही की काय जनतेला? इतकी वर्षं सत्तेत आहात, तरी लोकांना दोन वेळा मतदान करण्याचा सल्ला देता अन् वर पुन्हा कॉंग्रेसच्या चारित्र्याचे गोडवे गाता? जराशी मनाची तरी बाळगायची ना पवारसाहेब? कॉंग्रेसच्या त्याग अन् बलिदानाचे गोडवे गाण्याचा अधिकार सध्या सत्ता उपभोगणार्यांपैकी कुणालाही नाही. देशासाठी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून निधड्या छातीने बाहेर पडणारे ते लोक वेगळेच होते. आज जे लोक सत्तेभोवती घुटमळले आहेत, त्यांची जमात वेगळी आहे. स्वातंत्र्यलढ्याशी आणि देशाकरिता इंग्रजांशी झडलेल्या संघर्षाशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. या लबाडांचा वाटा असलाच, तर तो देशाच्या आजच्या भीषण दुरवस्थेत आहे. त्यांचा सहभाग असलाच, तर तो भ्रष्टाचारात आहे. घोट्याळ्यात आहे. त्यामुळे पवारसाहेब, यांच्या नावावर कॉंग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांचा त्याग खपविण्याचा खटाटोप मुळीच करू नका!
पवारांचे हे खूळ कमी होते की काय, म्हणून मुझफ्फरनगरचे ते ध्यान उठून उभं राहिलं आहे. कुणाच्याही बोलण्यातून अर्थाचा अनर्थ करायचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, त्यातून आपल्या स्वार्थाच्या राजकारणाची पोळी शेकून घ्यायची, असला ‘अव्यापारेषू व्यापार’ करण्याचा प्रकार समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी चालवला आहे. एखादं कुत्र्याचं पिलूही गाडीखाली आलं, तरी विव्हळणारं मानवी मन, माणसांवर वार करून त्यांना मारून टाकण्याची कल्पनाही करू शकणार नाही... मोदींच्या इतक्या सरळ, साध्या बोलण्याचा काय अर्थ निघू शकतो? मोदी क्रूर आहेत असा? ते मुस्लिमांच्या विरोधात आहेत असा? मोदी मुस्लिमांची तुलना कुत्र्यांशी करताहेत, असा अर्थ निघतो या वाक्याचा? पण सरळ, सोपा, साधा अर्थ काढला, तर मुस्लिमांना भडकाविता कसे येईल, ते भडकले नाहीत, तर मग त्यांच्या मतांचे राजकारण कसे करता येईल? म्हणून आझम खान म्हणतात, मोदी मुस्लिमांना कुत्र्यांची पिलं समजतात- गाडीच्या खाली चिरडली जाणारी...
परवा याच राज्यातल्या सहारणपूरच्या इमरान मसूदनं मोदींचे तुकडे तुकडे करण्याची भाषा वापरली, तेव्हा राजकारणातल्या एकाही ‘शहाण्याला’ त्याला ‘वेड्यात’ काढावेसे वाटले नाही. आता आझम खान मुस्लिम मतांच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत. मुस्लिमांना किती भडकाविता येईल आणि त्यातून मोदींचा प्रभाव किती कमी करता येईल, यासाठीची त्यांची केविलवाणी धडपड चालली आहे. गुजरातेतला विकास सांगता येत नाही, त्यामुळे अजूनही बारा वर्षांपूर्वीच्या गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीचेच तुणतुणे वाजवणे सुरू आहे यांचे! त्यानंतरच्या काळात मुस्लिमांना गुजरातेत लाभलेले स्थैर्य, सुरक्षा याची चर्चा कुणीच करत नाही इथे. कशी करावीशी वाटेल? तसे केले तर मग उत्तरप्रदेशातली परिस्थिती चव्हाट्यावर येईल ना! परवा परवा उत्तरप्रदेशातल्या मुझफ्फरनगरात झालेल्या दंगली, त्यात गेलेले बळी आणि नाकर्तेपणासाठी आझम खान यांच्या समाजवादी पार्टीवर न्यायालयाने ठेवलेला ठपका, यांपैकी कशाचीही लाज बाळगाविशी वाटत नाही यांना. पण, गुजरातेतल्या जुन्या दंगलींच्या कथा नव्याने सांगताना मात्र यांचा उत्साह जरासाही कमी होत नाही.
डोके नेमके कुणाचे फिरले, हे तर यावरून स्पष्टपणे दिसतेच आहे; तरीही हे सारे लोक स्वत:ला ‘शहाणे’ समजत मोदींना ‘वेडे’ ठरवायला निघाले आहेत. मोदींना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची भाषा वापरताहेत. वेड्यांच्या इस्पितळात कुणाला पाठवायचं, याचा निर्णय खरं तर जनताच घेणार आहे- लवकरच...!
No comments:
Post a Comment