Monday, January 20, 2014

भावनांचा बाजार मांडायचा कशाला?

का म्हणून ‘कन्फेशन पेज’ आणि ‘शेअरिंग दर्द डॉट कॉम’सारख्या साईट्‌सची गरज पडू लागली आहे समाजात? पूर्वायुष्यात केलेल्या चुकांची कबुली जाहीरपणे देण्याचे आणि मनात साचलेल्या भावनांना सार्वजनिकरीत्या वाट मोकळी करून देण्याची गरज जाणवल्यानेच कदाचित या सुविधा अस्तित्वात आल्या असतील. पण त्याचे भर चौकात प्रदर्शन मांडण्याची कल्पना मात्र अचाट आहे. खरं तर जगाच्या बदलत्या स्वरूपाचा तो परिणाम म्हटला पाहिजे. केलेल्या चुकांची कबुली द्यायला अन् मनातले दु:ख सांगायला तितकीच जवळची, जिवाभावाची माणसं सभोवताल असावी लागतात. इथे तर नातीच हरवून बसला आहे माणूस! एकमेकांच्या भेटीही चहाच्या निमित्तानं आणि मिटिंग्सही लंच, डिनरच्या सोबतीनं होऊ लागल्यात म्हटल्यावर व्यवहारापलीकडच्या शिळोप्याच्या गप्पांसाठी वेळ उरलाय् कुठे अन् कुणाजवळ? झोपड्यांमधली विवंचना मीठ-भाकरीच्या तुकड्यांच्या तजविजीपाशी येऊन थांबली. मध्यमवर्गीय बापडे फ्लॅट, कारचे लोन आणि पोरांच्या शिक्षणात थकले. तर श्रीमंतीचा थाट लेटनाईट पार्ट्यांमध्ये न्हाऊन निघाला. नकोशा झालेल्या लग्नाची जागा लिव्ह इन रिलेशनशिपच्या तात्पुरत्या समझोत्यांनी भरून काढायला निघालेल्यांना मनातल्या भावना व्यक्त करायला जागा सापडणार तरी कशी अन् वेळ मिळणार तरी कसा?


बदलत्या तंत्रज्ञानानं जग जवळ आलं पण माणसं दूर गेलीत एकमेकांपासनं. जग छोटं झालं पण माणसामाणसातली दरी मात्र मोठी झाली. जगण्यावागण्याची रीतच बदलली प्रत्येकाची. नात्यांमधल्या ओलाव्याची जागा औपचारिकतेनं घेतली. मैत्रीलाही व्यवहाराचे गालबोट लागले. कधीकाळच्या भरल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या रोडावली. अख्ख्या कुटुंबांसाठी रांधणार्‍या हातांनी लाटलेल्या कणकेच्या पोळ्याही हातावरच्या बोटांची संख्याही पार करत नाहीत आताशा.टीव्ही सियिल्समधल्या कथानकात खोलवर गुंतणारी मनं प्रत्यक्ष जीवनातल्या घडामोडीत मात्र कोरडेपणाचं प्रदर्शन मांडू लागली. खांद्यावरची झोळी सांभाळत खाकी वेशातला पोस्टमन दुरून येताना दिसला,तरी आपल्यासाठीही त्यांनं कुठला सांगावा आणला असेल का, या नुसत्या कल्पनेनंही मनात दाटणारी हुरहुर पाऽर लयाला गेलीय् आता. निदान आठवडाभर तरी पुरेल अशा त्या चार-आठ ओळींच्या पत्रांचे अस्तित्व संपवून एसएमएस आणि इ-मेल मानगुटीवर बसलं माणसाच्या...
 खरं तर जग बदललं आहे. तंत्रज्ञानानं सारीच सुखं पायाशी आणून ठेवली माणसाच्या. एका क्षणात दूरवरच्या मित्राशी संपर्क साधता येतो, साता समुद्रपार राहणार्‍या नातेवाईकांशी बोलता येतं, हजारो किलोमीटरचे अंतर अल्पावधीत पार करता येते, एक बटण दाबलं की मेहनतीविनाच, जागेवर उभं राहून इमारतीचे कित्येक मजले चढून वर जाता येते, जगातली कुठलीही माहिती एका क्षणात संगणकाच्या एका बटणावर उपलब्ध होते, पैसा मोजायची तयारी असेल तर जगातली सारी सुखं घरपोच उपलब्ध होऊ लागली आहेत एव्हाना या कॉर्पोरेट जगात. एक आई-वडील, आजी-आजोबा आणि पोरं सोडली तरी जगातली कुठलीही गोष्ट पैशानं विकत मिळू लागलीय् आता इथं. अगदी बाळाला जन्माला घालायला आईचे उदरही किरायानं उपलब्ध होऊ लागले आहे अलीकडे. मग तरीही माणसं मनातल्या वेदनांचा बाजार चव्हाट्यावर मांडायला उतावीळ का झालीत एवढी?
 का म्हणून ‘कन्फेशन पेज’ आणि ‘शेअरिंग दर्द डॉट कॉम’सारख्या साईट्‌सची गरज पडू लागली आहे समाजात? पूर्वायुष्यात केलेल्या चुकांची कबुली जाहीरपणे देण्याचे आणि मनात साचलेल्या भावनांना सार्वजनिकरीत्या वाट मोकळी करून देण्याची गरज जाणवल्यानेच कदाचित या सुविधा अस्तित्वात आल्या असतील. पण त्याचे भर चौकात प्रदर्शन मांडण्याची कल्पना मात्र अचाट आहे. खरं तर जगाच्या बदलत्या स्वरूपाचा तो परिणाम म्हटला पाहिजे. केलेल्या चुकांची कबुली द्यायला अन् मनातले दु:ख सांगायला तितकीच जवळची, जिवाभावाची माणसं सभोवताल असावी लागतात. इथे तर नातीच हरवून बसला आहे माणूस! एकमेकांच्या भेटीही चहाच्या निमित्तानं आणि मिटिंग्सही लंच, डिनरच्या सोबतीनं होऊ लागल्यात म्हटल्यावर व्यवहारापलीकडच्या शिळोप्याच्या गप्पांसाठी वेळ उरलाय् कुठे अन् कुणाजवळ? झोपड्यांमधली विवंचना मीठ-भाकरीच्या तुकड्यांच्या तजविजीपाशी येऊन थांबली. मध्यमवर्गीय बापडे फ्लॅट, कारचे लोन आणि पोरांच्या शिक्षणात थकले. तर श्रीमंतीचा थाट लेटनाईट पार्ट्यांमध्ये न्हाऊन निघाला. नकोशा झालेल्या लग्नाची जागा लिव्ह इन रिलेशनशिपच्या तात्पुरत्या समझोत्यांनी भरून काढायला निघालेल्यांना मनातल्या भावना व्यक्त करायला जागा सापडणार तरी कशी अन् वेळ मिळणार तरी कसा?
 सर्वदूर निर्माण झालेली स्पर्धा, राजकारणात डोकावू पाहणारी कॉर्पोरेट संस्कृती आणि कॉर्पोरेट जगतातले राजकारण, नोकरी मिळवण्याच्या पलीकडे आयुष्यात शिक्षणाचे दुसरे महत्त्वच नसल्याच्या थाटात शिक्षण घेणारी आणि नोकर्‍या मिळाल्या नाहीत म्हणून नाउमेद होणारी तरुणाई... कधी दारूच्या बाटलीत आपल्या समस्यांचे उत्तर शोधणारी, कधी दोरीचा फास गळ्याभोवती आवळणारी... जगाला भिऊन, जगापासून दूर पळणारी. आव्हानं झिडकारणारी...
 मनात साचलेले मळभ दूर करण्याची संधीच कधी मिळाली नाही. पुढे जाण्याच्या स्पर्धेत पळ पळ पळताहेत सारे. जवळची माणसं दूर लोटून. नको असलेल्यांचा गराडा सभोवताल जमवून. ज्यांच्यापाशी मन मोकळं करावं ती माणसं जवळ नसतात अन् जी जवळ आहेत, त्यांच्याशी व्यवहारापलीकडे बोलता येत नाही. मग मनं मोकळी करायची कुठे? राग, लोभ, द्वेष, मत्सर, प्रेम, दु:स्वास, आपुलकी, परकेपण, चांगलं, वाईट असं आतलं सारंच व्यक्त व्हायला हवं ना! ते मनातल्या मनात साचत गेलं की माणूस कुढत राहतो आतल्या आत. मनातली घुसमट सहजपणे बाहेर आली नाही की, मग जीव थार्‍यावर राहात नाही. डिप्रेशनसारख्या समस्या हळूच डोकावतात आतून. बीपी, डायबेटिस अनाहूतपणे उंबरठ्यावर येऊन उभे राहतात.
 कुठे येऊन पोहोचला बघा माणूस. पैसा भरपूर आला. सार्‍या सोयी, सुविधा पायाशी लोळण घेऊ लागल्या, विज्ञान-तंत्रज्ञानानं त्या सुविधांना आणखी अत्याधुनिक स्वरूप दिलं. पण मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देणार्‍या यंत्रांचा शोध लागला नाही अजून. त्यामुळे पैशानं विकत घेता येणार नाहीत अशा गोष्टींना अजूनही पारखीच राहिली माणसं. पण या आधुनिक जगात सार्‍याच गोष्टी बाजारात उपलब्ध करून देण्याचा घाट हुशार व्यापार्‍यांनी घातला. खुळी माणसंही पैसा फेकून जमेल तेवढे विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी करू लागली. यातून कल्पना पुढे आली ती मनातल्या दु:खाचा, वेदनांचा, भावनांचा उघड्यावर बाजार मांडण्याची. जवळची माणसं दूर लोटून बसलेले लोक या बाजाराचा हिस्सा झाले. अनोळखी माणसांपुढे भावना व्यक्त करू लागले. मळभ ओकून टाकल्यानं मन आकाशासारखं मोकळं झाल्याच्या आनंदात वावरू लागले. जिवाभावाचा सवंगडी लाभल्यागत इंटरनेटवरच्या अदृश्य माणसांपुढे भावना व्यक्त होऊ लागल्या. कुणीतरी त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं देऊ लागलं. समस्यांवर तोडगा सांगू लागलं. त्याचाही मोठा आधार वाटू लागला, सारंच गमावून बसलेल्या माणसांना...!
 कुटुंब व्यवस्था बदलली. माणसं शहरांकडे धावू लागली. शहरातल्या माणसांच्या गर्दीत हरवलेली माणसं स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडू लागली. चार पैसे कमावण्यासाठी रात्रीचा दिवस करू लागली. या धावपळीत व्यक्तिगत असं आयुष्यं कुणाचं उरलंच नाही. सामाजिक जीवन जगायला फुरसत राहिली नाही. दिवसाचे चोवीस तासही कमी पडू लागले. यातूनच मग ‘एन्जॉयमेंट’च्या कल्पना बदलल्या. ‘वो कागज की कश्ती, वो बारीश का पानी’ चित्रात पाहूनच आनंद मानून घ्यावा लागतोय् अलीकडे. गावाकडच्या पारावरच्या गप्पा अजून बर्‍यापैकी तशाच असल्या तरी तिकडेही हिरवी शेते उजाड करून, ले-आऊट पाडून सिमेंटच्या इमारती उभारण्याची स्पर्धा लागलीय् आताशा. सर्वाधिक पैसा देणार्‍या नोकर्‍यांच्या शोधात देशाच्या सीमाही मागे पडू लागल्या. या वावटळीत प्रत्येकजण स्वत:चं अस्तित्व मात्र हरवून बसला. ज्या इंडस्ट्रीत सर्वाधिक पैसा असल्याचे मानले जाते, त्या आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुणाईत डिप्रेशनच्या केसेस गेल्या काही वर्षात कितीतरी पटीने वाढल्या आहेत. एका अहवालानुसार या क्षेत्रातील किमान तीन दशलक्ष लोक आज डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त आहेत.
 काय कारण असेल याचे? नोकरी मनासारखी आहे. पैसा भरपूर आहे. मग का डिप्रेशन यावे या तरुणांना? कारण एकच आहे. मानवी जीवन केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नाही, त्याच्या कितीतरी पलीकडे त्याची व्याप्ती आहे. पण क्षितिजापलीकडे झेपावत सारा आसमंत कवेत घ्यायचे सोडून माणसं मर्यादित झाली. नोकरीसाठी लग्नच न करण्यापासून, तर पोरं जन्मालाच न घालण्यापर्यंतचे व्यवहारी निर्णय होऊ लागले. महागाई, बेरोजगारीने पिचलेला सामान्य माणूसही चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवर दिसणार्‍या झगमगाटाला भुलून त्यामागे धावू लागला. मर्यादेपलीकडचे मिळवण्याच्या धडपडीत त्याची दमछाक होऊ लागली. ठेविले अनंते तैसेचि राहावे, या ओळी कपाटात धूळ खात पडलेल्या पुस्तकातच अडकून पडल्या. निसर्गनिर्मित भावना मनातच खुंटल्या. बहुधा त्यातनंच या समस्या उद्भवल्या असाव्यात.
 मनात खुंटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणार्‍या कन्फेशन पेजचे किंवा शेअरिंग दर्द डॉट कॉम सारख्या साईटचे महत्त्व नाकारण्याचे कारण नाही. या दोन्ही ठिकाणी लोकांची उसळलेली गर्दी, तिथे व्यक्त होत असलेल्या भावना बघितल्या की त्याचे महत्त्व आणखीच स्पष्ट होऊन जाते. सरासरी साठ वर्षांचं आयुष्य जगणार्‍या एका माणसाला त्याच्या या अल्पायुष्यात भेडसावणार्‍या समस्यांचे स्वरूप किती भीषण आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्‍न त्याच्यासमोर उभे ठाकले आहेत, याची कल्पना येते. साईटशी संबंधित लोक त्याचे जमेल तसे समाधान करण्याचा प्रयत्नही करताना दिसताहेत. पण हळूहळू जागतिक स्वरूप प्राप्त होत असलेल्या मानवी जीवनातील गंभीर समस्यांचं उत्तर असल्या साईटमध्ये दडले असल्याच्या भ्रमात कुठवर वावरणार आहोत आपण? आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या समस्या, भावना, दु:ख असे चावडीवर मांडणार्‍यांना त्यांनी आपल्या आयुष्यात गमावलेल्या, दुरावलेल्या माणसांची उणीव कधी जाणवणारच नसेल, तर मग ही समस्या कायमची सुटणार कशी?
 प्यार का पहला खत
 लिखनेमे वक्त तो लगता है
 नये परिंदोको उडनेमे
 वक्त तो लगता है
 गाठ अगर पड जाए तो फिर,
 रिश्ते हो या डोरी
 लाख करे कोशीश,
 खुलनेमे वक्त तो लगता है
 जगजितसिंहांनी गायिलेल्या एका गझलेतल्या या ओळीत मानवी नात्यात निर्माण झालेल्या गाठी उकलण्याचा उल्लेख आहे. या गाठी उकलण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे.दुरावलेली माणसं जवळ करण्यासाठीच्या प्रयत्नांची गरज आहे.
 अब हर उस बुजुर्ग को
 सीने से लगानेका करता है मन
 जिसकी बुढी आखोंसे
 झाकती है मेरे बचपनकी परछाई
 रमा गोळवलकर या कवयित्रीने साकारलेल्या या ओळी प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न केला, हरवलेलं निरागस बालपण शोधण्याचा प्रयत्न झाला, माणूस म्हणून या जगात जन्माला येण्याचे महत्त्व कळले, एकट्यात हरवून जाण्यापेक्षा सभोतालच्या माणसांमध्ये रममाण होण्याची सवय जडली, भौतिक सुखांच्या पलीकडे अस्तित्वात असलेल्या आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, प्रगतीची नेमकी दिशा गवसली, की मग मन मोकळं करण्यासाठी सभोवताल जिवाभावाच्या माणसांचा अभाव जाणवणारच नाही कुणाला. जिच्या कुशीत शिरावं अशी आजी, ज्याच्या खांद्यावर विश्‍वासानं मान ठेवावी असा प्रियकर, जिच्या मांडीवर डोकं ठेवून वर आकाशाकडे निवांतपणे बघता यावं अशी प्रेयसी, मनातलं काहीही ज्याच्यापुढे विश्‍वासानं सांगता यावं असा मित्र गावला की मग मनातल्या भावनांचा बाजार मांडण्याची गरज कुणालाच उरणार नाही...

No comments:

Post a Comment