भारतीय लोकमानस आणि लोकशाही चमत्कारिक आहे. आणिबाणी लादणार्या इंदिरा गांधींवर चप्पल फेकून संताप व्यक्त करणार्यांनीच नंतर त्यांना निवडून देत डोक्यावर घेतल्याच्या घटनेचा हा सारा देश साक्षीदार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे पुंगी वाजवणार्या कुठल्याही गारुड्याच्या भोवती उभे राहण्याची इथल्या जनतेची मानसिकता आहेे. आज ही पुंगी केजरीवाल वाजवताहेत, म्हणून लोक त्यांच्या भोवती गर्दी करून उभे आहेत. यात केजरीवालांना कमी लेखण्याचा वा आम आदमी पार्टीचे नेत्रदीपक यश अव्हेरण्याचा प्रयत्न नाही. पण सोशल मीडियाच्या भरवशावर सामाजिक चळवळी उभ्या राहात नाहीत, हे निदान कारतांसारख्या वैचारिक बैठक लाभलेल्या नेत्यांनी तरी अमान्य करू नये. अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उभारलेल्या आंदोलनाला लाभलेला प्रचंड जनाधार दोनच महिन्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या त्यांच्या आंदोलनाला का लाभला नाही, या प्रश्नाचे उत्तर इथल्या जनतेच्या मानसिकतेत दडले आहे. याच विचित्र मानसिकतेने एका नवख्या पक्षाला दिल्लीत सत्तेच्या दारात नेऊन सोडले. पण एरवी फेसबुक, ट्वीटरच्या पलीकडे न जाणार्या, मतदानाच्या दिवशी मतदानाला जाण्याऐवजी सुटी एन्जॉय करणार्यांच्या भरवशावर समाजपरिवर्तनाच्या लढाया कशा उभारणार कारत साहेब?
काय वेळ आलीय् बघा भारतातल्या कम्युनिस्ट नेत्यांवर! जे कालपर्यंत सामान्य माणसाच्या हक्काची भाषा बोलत होते, त्यांच्या साठीच्या लढ्याचा एल्गार करत होते, लढाईचा शंखनाद करत होते, समाजातील ‘सर्वहारा’ घटकाला न्याय देण्यासाठी संघटनेचे अस्तित्व पणाला लावण्याचा दावा करत होते, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना ‘आम आदमी पार्टी’कडून धडे घेण्याची गरज पडावी, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिका जरा त्यांच्याकडून काही, असे म्हणण्याची वेळ दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांवर यावी, हा त्या पक्षाच्या विचारधारेचा पराभव आहे की मधल्या काळात मार्क्स, लेनीन, माओच्या विचारांपासून भरकटलेल्यांना ताळ्यावर आणण्याचा तो केविलवाणा प्रयत्न आहे, हे स्पष्ट व्हायला हवं.
ज्या पक्षाचे अस्तित्व शतकाच्या उंबरठ्यावर आहे, ज्याच्या अस्तित्वाला विचारांचा भक्कम पाया लाभला आहे, मार्क्स, लेनीनच्या विचारांच्या पायावर ज्याच्या कारभाराचा डोलारा उभा आहे, तो पायाच मुळात ठिसूळ झाला असल्याची अन् हा डोलारा केव्हाही कोसळू शकतो अशी भीती तर कम्युनिस्ट नेत्यांना अलीकडे वाटू लागलेली नाही ना?
सुमारे आठ दशकांची परंपरा लाभलेल्या एका पक्षावर काल-परवा निर्माण झालेल्या एका नवख्या राजकीय पक्षाकडून धडे गिरवण्याची वेळ यावी, यातच बहुधा सारे आले. सोशल मीडियाचा वापर करून आम आदमी पार्टीला लाभलेल्या क्षणिक यशाच्या मोहात पडण्याचा मोह बोजड विचारांच्या पखाली शतकानुशतकं वाहणार्यांनाही आवरता येऊ नये, हे कशाचे द्योतक मानायचे?
जरा त्या आम आदमी पार्टीकडून काही शिका, असा संदेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव प्रकाश कारत यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. केवळ तेरा महिन्यांचे अस्तित्व लाभलेल्या एका पक्षाला दिल्लीच्या निवडणुकीत लाभलेले घवघवीत यश अन् देशाच्या राजधानीची त्याच्या हातात गेलेली सूत्रे, याच्या मोहात पडले कारत साहेब, की हेवा वाटतोय् त्यांना ‘आप’ च्या या ‘इन्स्टंट’ यशाचा?
कम्युनिस्ट पक्षाला विचारांच्या जोरावर जे वर्षानुवर्षे करता आले नाही, ते आम आदमी पार्टीने अवघ्या काही दिवसांत करून दाखवल्याचे, त्यात सोशल मीडियाची भूमिका अत्यंत मोलाची राहिल्याचे अप्रूप त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी या सारख्या, वैचारिक बैठक लाभलेल्या पक्षांनी असल्या मोहात अडकणे मुळीच अपेक्षित नाही. शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी, त्यांना लाभलेला विचारांचा मजबूत पाया, यातून समाजपरिवर्तन घडवण्याच्या इराद्याला अलीकडे मर्यादा येताहेत, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हाच सोपा मार्ग उरला आहे, अशा निराशाजनक निष्कर्षाप्रत तर आलेले नाहीत ना, कम्युनिस्ट पक्षाचे शीर्षस्थ नेते?
कधी काळी सामान्य माणसाबद्दलची कणव, समाजातील वंचितांंना न्याय देण्याची भाषा, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्काचा लढा लढण्याची जिद्द, प्रस्थापितांविरुद्धच्या युद्धाचा हुंकार आवळलेल्या मुठीतून अन् आकाशाच्या दिशेने झेपावलेल्या लाल झेंड्यांमधून ध्वनित व्हायचा. त्याच जोरावर महिला, कामगार, युवा, शेतकरी, शेतमजुरांचे लढे रस्त्यावर उतरून लढले गेलेत. संघर्ष झडत गेला. पण दुर्दैवाने काळानुरूप या लढ्यांची धार बोथट होत गेली. विचारांची बैठक ठिसूळ होत गेली. कधीकाळच्या घमासान संघर्षाची तीव्रता कमी होत गेली, नेत्यांना पंचतारांकित व्यवस्थांचा मोह आवरता आला नाही अन् कार्यकर्त्यांना उपाशीपोटी विचारांचा डोलारा सांभाळता आला नाही. यातून मग एकीकडे शस्त्रांच्या जोरावर चाललेल्या नक्षलवाद्यांच्या माओवादी चळवळीच्या विचारांची दिशा भरकटत गेली आणि कथित सुशिक्षित पांढरपेशा कॉम्रेडांच्या गर्दीत गरिबांच्या हक्काची लढाईही वाट हरवून बसली. वंचितांना मिळवून द्यावयाच्या न्यायाचा मुद्दा या दोन्ही आघाड्यांवर केव्हाच मागे पडला अन् भरकटलेल्या या अवस्थेत आपणच हरलेल्या आपल्या लढाईची जाणीव नेत्यांना होऊ लागली. त्याच नैराश्येतून ‘आप’ची ही भलावण तोंडून निघाली असावी कदाचित कारतांच्या!
एकीकडे कम्युनिस्ट पक्षाची ही अवस्था तर, दुसरीकडे समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या पांढर्या रंगाच्या टोप्यांना, लाल रंगाच्या टोप्यांनी उत्तर देण्याचा चालवलेला प्रयत्न अनाकलनीय ठरला आहे. मुलायमसिंह यादवांपासून, अखिलेशपर्यंत ज्यांनी कालपर्यंत ‘हिरव्या’शिवाय कुठल्या रंगाला कधी पसंती दिली नाही, प्राधान्य दिले नाही, हिरव्यासाठी इतर सार्या रंगांचा कायम दु:स्वास केला, त्यांनाही अचानक लाल रंगांच्या टोप्या डोक्यावर घालून मिरवावेसे वाटले. असे केल्याने लागलीच आम आदमी पार्टीला सडेतोड उत्तर देता येईल, दिल्लीहून उत्तरप्रदेशाच्या दिशेने सुरू झालेल्या त्याच्या प्रभावाची आभा थोपवून धरता येईल, त्या पक्षाच्या पांढर्या टोप्यांना निदान आपल्या राज्यापुरता तरी पर्याय देता येईल, असा समज यादवांचा झाला असल्यास आपण बापुडे काय बोलणार त्यांच्यापुढे?
पण प्रकाश कारत आणि मुलायमसिंह यादव यांच्यासारखे नेतेही लोकप्रियतेचा ‘हाच’ मार्ग असल्याच्या निष्कर्षाप्रत आले असतील, हा ‘ट्रेंड’ बदलायचे सोडून तेही सोप्या मार्गाचा अवलंब करायला सरसावले असतील, तर ही खरोखरीच दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे. ‘आप’ला लाभले, किंवा त्या पक्षाने मिळवले ते यश आपणही त्याच मार्गाने तेवढ्याच सहजतेने मिळवू शकतो, असे या नेत्यांना वाटू लागणे हे एकतर पराभूत मानसिकतेचे द्योतक म्हटले पाहिजे किंवा ज्याच्या जोरावर त्यांनी आजवरचा खडतर प्रवास केला, त्या विचारांवर, त्या कार्यपद्धतीवर त्यांनीच व्यक्त केलेला हा अविश्वास तरी म्हटला पाहिजे.
मुलायमसिंहांना त्यांच्या कथित समाजवादी विचारांवर आणि कारतांना त्यांच्या कम्युनिस्ट विचारांवर नवख्या आम आदमी पार्टीच्या पांढर्या टोप्या हावी झाल्याचे जाणवू लागले असेल, तर हे चित्र या नेत्यांच्या आजवरच्या राजकीय साधनेवर पाणी फेरणारे आहे.
काळानुसार जगाने बदलले पाहिजे हे खरे आहे. जो काळानुसार बदलत नाही, तो भविष्यात स्वत:चे अस्तित्व गमावून बसतो, हेही तितकेच खरे आहे. पण काळानुसार बदलणे म्हणजे भविष्याचा वेध घेत स्वत:ला बदलत पुढे मार्गक्रमण करणे होय. काळानुरूनप बदलणे म्हणजे स्वत:चा इतिहास विसरणे नव्हे. पण भला मोठा इतिहास लाभलेल्या दोन राजकीय पक्षाचे, तेवढाच मोठा इतिहास लाभलेले दोन नेते आम आदमी पार्टीला लाभलेल्या यशाला पुरते भुललेले दिसताहेत. ‘आप’ चे यश पाहून हे नेते फक्त भुलले आहेत की पाऽऽर बिथरले आहेत, हे त्यांचे त्यांनाच ठावूक!
आम आदमी पार्टीला लाभलेल्या परवाच्या यशामुळे आजच भुरळ पडणे योग्य नाही. निदान मुरलेल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी तरी हा मोह आवरला पाहिजे. भारतीय लोकमानस आणि लोकशाही चमत्कारिक आहे. आणिबाणी लादणार्या इंदिरा गांधींवर चप्पल फेकून संताप व्यक्त करणार्यांनीच नंतर त्यांना निवडून देत डोक्यावर घेतल्याच्या घटनेचा हा सारा देश साक्षीदार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे पुंगी वाजवणार्या कुठल्याही गारुड्याच्या भोवती उभे राहण्याची इथल्या जनतेची मानसिकता आहेे. आज ही पुंगी केजरीवाल वाजवताहेत, म्हणून लोक त्यांच्या भोवती गर्दी करून उभे आहेत. यात केजरीवालांना कमी लेखण्याचा वा आम आदमी पार्टीचे नेत्रदीपक यश अव्हेरण्याचा प्रयत्न नाही. पण सोशल मीडियाच्या भरवशावर सामाजिक चळवळी उभ्या राहात नाहीत, हे निदान कारतांसारख्या वैचारिक बैठक लाभलेल्या नेत्यांनी तरी अमान्य करू नये. अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उभारलेल्या आंदोलनाला लाभलेला प्रचंड जनाधार दोनच महिन्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या त्यांच्या आंदोलनाला का लाभला नाही, या प्रश्नाचे उत्तर इथल्या जनतेच्या मानसिकतेत दडले आहे. याच विचित्र मानसिकतेने एका नवख्या पक्षाला दिल्लीत सत्तेच्या दारात नेऊन सोडले. पण एरवी फेसबुक, ट्वीटरच्या पलीकडे न जाणार्या, मतदानाच्या दिवशी मतदानाला जाण्याऐवजी सुटी एन्जॉय करणार्यांच्या भरवशावर समाजपरिवर्तनाच्या लढाया कशा उभारणार कारत साहेब?
चांगला वेध आहे हा ...
ReplyDeleteभारत देशातील आज ची राजकीय परिस्थिती पाहून असे वाटू लागले आहे कि परत तिसऱ्यांदा दगाबाजी होण्याची दाट शक्यता आहे ..ह्या वेळेला भाजप ची सत्ता आली नाही तर आम्हा हिंदुना भारतात हिंदू म्हणून जगणे कठीण होणार आहे
ReplyDelete