ज्याची स्थापना करायलाही एका इंग्रज व्यक्तीची गरज पडली होती, त्या कॉंग्रेस पक्षाला या देशाच्या इतिहासाचे स्मरण अलीकडे वारंवार होऊ लागले आहे. कालपर्यंत ‘गांधी’ नावाच्या पलीकडे ज्यांना कधी जावेसे वाटले नाही, त्यांना आता सरदार पटेलांपासून, तर अन्य जुन्या कर्तृत्ववान नेत्यांच्या कर्तबगारीचे आश्चर्यजनकरीत्या स्मरण होऊ लागले आहे. नेहरूंच्या तुलनेत जे पटेल कालपर्यंत यांना नेहमीच खुजे वाटले, त्या सरदारांच्या कार्यकर्तृत्वाची जाण कॉंग्रेस नेत्यांना आता अचानक होऊ लागली आहे...स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?
हा देश एकसंध ठेवण्यासाठी प्रसंगी नेहरूंशीही वैरत्व पत्करून पटेलांनी संस्थानिकांना एकत्र आणले होते. ज्यांना फाळणीचा काळा इतिहास टाळता आला नाही, त्या कर्तृत्वशून्य अन् लाचार नेत्यांना आता पटेल कॉंग्रेसचेच असल्याचा साक्षात्कार स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकांनंतर होऊ लागला आहे. कधीकाळच्या अखंड भारताचा एक एक भूभाग वेगवेगळ्या देशांच्या रूपात कसा आणि का वेगळा झाला, अगदी अलीकडच्या इतिहासात या देशाचे तुकडे कोणी केले, फाळणी नेमकी कुणी आणि का मान्य केली, पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही पंजाब-काश्मीरच्या प्रश्नांचे भिजतघोंगडे अजून कायम का आहे, काश्मीरच्या एका भागाला ‘पाकव्याप्त’ म्हणताना इतक्या वर्षांत कुणालाच कधीच जराशीही खंत कशी वाटत नाही, एक अख्खा अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून गायब होऊन शेजारच्या चीनच्या हद्दीत दाखवला जातो, तरी इथे कुणा कॉंग्रेसवाल्याचे रक्त खवळत नाही. हरामखोरीच्या या मानसिकतेवर कठोर कारवाई करायचे सोडून, चार-दोन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करून हा प्रश्न निकाली काढण्याची अफलातून तर्हा कुणी अंमलात आणली? तिबेटच्या मुद्यावर पंडित नेहरूंचे ‘ते’ जगप्रसिद्ध विधान अजून हा देश विसरलेला नाही. चीनने आपली जी जमीन गिळंकृत केली, त्या जमितीवर गवताचे पाते देखील उगवत नाही, असे संतापजनक विधान नेहरूंनी संसदेत केले होते. ज्यांना त्याचा विसर पडला, तेच दुसर्यांना इतिहास शिकवायला निघाले आता?
ज्यांना विस्मरण झालेय्, त्यांनीच लोकांना इतिहासाचा विसर पडल्याची आवई उठवायची?
मुस्लिम मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने ज्यांना शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा इतिहास जाहीरपणे सांगण्याची हिंमत होत नाही, कोथळा बाहेर काढून छत्रपतींनी ज्याला जमिनीवर लोळवला त्या अफझलखानाची प्रतापगडावरची कबर ज्यांना अजूनही अभिमानाने जपावीशी वाटते, ज्यांना राणा प्रतापांच्या शौर्याचे नेहमीच वावडे राहिले अन् रायबरेलीत दंगल पेटविणार्या तौकीर रझाचे मात्र सतत कौतुक वाटले, ती कॉंग्रेस दुसर्यांना इतिहास शिकवायला निघाली असल्याचे चित्र दुर्दैवी अन् तेवढेच वेदनादायक आहे.
सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही कॉंग्रेसचे सदस्यत्व द्यावे, असा ठराव वर्किंग कमिटीमध्ये पारित करून घेतला होता. तो नेहरूंनी मागे घेण्यास लावला. एका गणतंत्र दिनी रा. स्व. संघाला पथसंचलनात याच कॉंगेसने सहभागी करून घेतले होते. हा इतिहास कॉंग्रेस कसा लपवणार? स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?
इतिहासाचा विसर नेमका कुणाला पडला आहे, तो बदलला कुणी, कधी काळच्या एकसंध भारताच्या नकाशाची शकले पडताना बघ्याची भूमिका कुणी घेतली, हा इतिहास कुणीही विसरलेला नाही. धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांतपणे जगण्याचीही फुरसत नसलेला सामान्य माणूस याबाबत कधी काही बोलून दाखवत नाही याचा अर्थ तो या सार्या घडामोडींबाबत अनभिज्ञ आहे, असा समज कुणी करून घेत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. रावळपिंडी कुणी घालवली अन् कारगिल कुणी जिंकले, तिबेट कुणी गमावला अन् जुनागढ कुणी खेचून आणला, निवडणुकीत बाबासाहेबांना कुणी पाडले अन् भिंद्रानवालेला कुणी मोठा केला, हा इतिहास अजूनही मनामनात ताजा आहे. नव्हे, खदखदतो आहे. या वैभवशाली देशाच्या सीमारेषा नंतरच्या काळात कशा तोकड्या होत गेल्या, स्थानिकांचे हक्क डावलून बांगलादेशींना या देशात आणि इथल्या मतदारयाद्यांमध्ये स्थान कुणी दिले, हेही कुणी विसरलेले नाही इथे. जे दुसर्याला इतिहास शिकवण्याच्या गोष्टी करताहेत, त्यांनी आधी स्वत: इतिहास अभ्यासावा. नरेंद्र मोदींना सातवी, आठवीच्या इतिहासाची पुस्तकं भेट म्हणून पाठविणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर तो आवर्जून अभ्यासावा
पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आज कळली कॉंग्रेस नेत्यांना, गुजरातेत त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना तिथल्या राज्य सरकारने हाती घेतल्यानंतर? पटेल संघविरोधक होते, असे जर कॉंग्रेसवाल्यांना म्हणायचे असेल मग त्यांच्या कर्तबगारीबद्दलही कॉंग्रेसजनांना आक्षेप का असावा? पण एवढ्या उंचीच्या माणसाला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यासाठी १९९१ साल का उजाडावे लागले, या प्रश्नाचे उत्तर देईल कुणी? जवाहरलाल नेहरू यांना १९५५ मध्ये, शास्त्री १९६६, इंदिराजी १९७१ अन् पटेलांचा नंबर लागला १९९१ मध्ये? का? ज्या दिवशी या प्रश्नाचे तमाम देशवासीयांना पटेल असे तर्कशुद्ध उत्तर देता येईल ना, त्याच दिवशी डॉ. मनमोहनसिंहांनी इथल्या जनतेला इतिहासाचे दाखले द्यावेत. पटेलांनी त्यांच्या जीवनात गाठलेल्या यशाच्या उत्तुंग शिखराची शेखी त्यांनी त्याच दिवशी मिरवावी कॉंग्रेसजनांनी.
शब्दांचे अर्थ राजकीय सोयीने लावायचे, इतिहासाचे संदर्भ हवे तसे वापरायचे, माणसं आपापल्या पद्धतीने हवी तेव्हा हवी तशी छोटी किंवा मोठी करायची, ही पद्धत कॉंग्रेसने वापरायची अन् लोकांनी सारे काही ठावूक असतानाही तो प्रकार शिरसावंद्य मानायचा, हे आजवर खपून गेले. आता जनता जाणती झाली आहे. यांच्या राजकारणातले, वागण्या-बोलण्यातले बारकावे तिलाही उमगतात आताशा. आपण बनवू आणि लोक मूर्ख बनतील, या भ्रमात कुणी राहू नये. सार्या देशाच्या नजरेत खूप खूप मोठे असूनही सरदार पटेल आजवर कसे दुर्लक्षित राहिले अन् आताच कसे कॉंग्रेसजनांना त्यांचे स्मरण होऊ लागले, हे लोकांच्या चांगलेच ध्यानात आले आहे. देशाचा इतिहास अन् भूगोल बदलविण्याचे पाप कुणाचे, हे तर लोकांच्या केव्हाच लक्षात आले आहे...
No comments:
Post a Comment