Wednesday, November 27, 2013

तेजपाल तोंड का लपवीत आहेत आता ?

कुणीही कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून सार्‍या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांना आता का हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्‍वाला थिटे समजणार्‍यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे? आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन् दुसर्‍यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची कार्यपद्धती आणि दुसर्‍यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत. 


मोठ्या लोकांची तर्‍हाच काही और असते बघा. त्यांचं गाडं कधीच कुठे अडत नाही. ना प्रशासनात त्यांचे कुठले काम अडत, ना कुठला कायदा कधी त्यांच्या आड येत. सारी यंत्रणा कशी अदबशीरपणे सलाम ठोकायला सिद्ध असते. अशांवर पोलिस कारवाई होण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही. एखादवेळी चुकून, नाईलाजाने अटक झालीच तरी लागलीच छातीत कळा येतात त्यांच्या आणि सरकारी दवाखान्यातल्या आयसीयूतला पलंगही रिकामाच असतो त्यांच्यासाठी. आता आपल्या तेजपाल साहेबांचंच बघा ना. एका केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक असल्याची, एका तृणमूल खासदाराची ‘तहलका’मधील साठ टक्क्यांच्या गुंतवणुकीची नुसती बातमीच बाहेर आली, तर सारी यंत्रणा कशी मान तुकवून सेवेत हजर झालीय् त्यांच्या. सार्‍या जगाला त्यांच्या गुन्ह्याची खबर लागली असताना पोलिसांना हुलकावणी देत तेजपाल तोंड लपवत फरार होतात, त्यांच्या वतीने वकील कोर्टात येऊन जामिनाचा अर्ज सादर करतो, पण पोलिसांना मात्र, ते गवसत नाहीत. बलात्कार प्रकरणात गोवा सरकार आणि पोलिसांनी कारवाईचा निर्णय जाहीर केला खरा. पण, पीडित मुलीचा तक्रारअर्जच नसल्याने कारवाईस विलंब झाला. पण, तक्रार आली गुन्हा दाखल होताच, तेजपाल यांनी पळून जाणेच श्रेयस्कर मानले. ते निर्दोष आहेत, असे जर त्यांना वाटत असेल तर मग पोलिस चौकशीला ते कशासाठी घाबरत आहेत?
एक काळ होता की ‘तहलका’ म्हटलं की घाम फुटायचा लोकांना. कोणाकोणाच्या खाजगी आयुष्यात नाही डोकावले तरुणबाबू? याची लफडी, त्याची थेरं, एकाचा भ्रष्टाचार, दुसर्‍याचे काळे धंदे यांनी उघडे पाडायचे. स्टिंग ऑपरेशन की काय म्हणतात ते करायचे. लोकांना गाठायचे. लपूनछपून त्यांची बोलणी कॅमेराबद्ध करायची. मग त्यातून उघड होणार्‍या ‘आतल्या’ गोष्टी ‘बातमी’ म्हणून जगजाहीर करायच्या. आणि जगातली सर्वात महत्त्वाची माहिती उजेडात आणल्याच्या थाटात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. अशा पद्धतीने तेजपाल यांचा कारभार तब्बल काही वर्षे चालत राहिला. यांच्या कारनाम्यांनी लोक दबकत गेले अन् यांची माजोरी वाढत गेली. इतकी की, सहकारी पत्रकारावर बलात्कार केल्यावरही त्यांना त्याची खंत वाटेनाशी झाली. दोन जीव एकत्र आल्यावर जे व्हायचे तेच आमच्यात घडल्याचे निर्लज्जपणे सांगण्यातही त्यांना कमीपणा वाटला नाही.
आता तर त्यांना एखाद्याबाबत वावड्या उठवणे योग्य नसल्याचे शहाणपण सुचले आहे. कालपर्यंत ज्यांनी लोकांना कैचीत पकडून त्यांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली, त्यांना आता स्वत:च्या इभ्रतीबाबत मात्र तसे झालेले मुळीच नको आहे. कालपर्यंत यांनी लोकांविरुद्ध षडयंत्रं रचली ते चाललं, पण आता त्यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाया म्हणजे कारस्थान असल्याचा आरोप करत त्यांचा संताप अनावर होत चालला आहे. आपल्याविरुद्धची कारवाई म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप करणार्‍या तेजपालांनी लोकांची अंडीपिल्ली काय नियोजित कटाविनाच बाहेर काढली? फरक एवढाच आहे, की कालपर्यंत ते जे करत होते, त्यात त्यांना भूषण वाटत होते. आता बाजू त्यांच्यावर उलटल्यावर त्यांना त्यात काळेबेरे दिसू लागले आहे. त्यामागील कटाचा वास येऊ लागला आहे.
आपल्या कार्यालयातल्या एका सहकार्‍यावर बलात्कार केल्याचा आरोप स्वत: मान्य करून, त्याबाबात माफी मागून प्रकरण ‘निपटविण्याचा’ प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण त्यानेही काही जमत नाही म्हटल्यावर ते त्या मुलीवरच उलटले. तिच्यावरच प्रत्यारोप करत सुटले. कुणीही कायदा हातात घेऊ नये असे ज्यांना कालपर्यंत वाटत होते, तेच तेजपाल आता कायद्यातल्या पळवाटा शोधत आहेत. आपण कॅमेराबद्ध केला म्हणजे समोरचा माणूस गुन्हेगार ‘सिद्ध झाल्याचा’ निर्णय स्वत:च्या पातळीवर एकतर्फी जाहीर करून सार्‍या जगापुढे त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांना आता का हवीय् कायदेशीर कारवाईतली सवलत? आपण तेवढे शहाणे म्हणवत उर्वरित विश्‍वाला थिटे समजणार्‍यांना आता का पळ काढावा लागत आहे? कालपर्यंत हे उंटावर बसून शेळ्या हाकत होते आणि स्वत:वर शेकली तर तो त्यांना अन्याय वाटू लागला आहे? आता कोण उडवतोय् कायद्याची खिल्ली? यांनी रचले तर ते डावपेच अन् दुसर्‍यांनी रचले की षडयंत्र? यांची वागणूक म्हणजे पत्रकारितेची कार्यपद्धती आणि दुसर्‍यांची वर्तणूक म्हणजे काळावरचा आघात? इतके दिवस कोणाच्या जिवावर चालला तहलका? कोणी खर्च केला त्यासाठीचा पैसा? आता का कपिल सिब्बल तेजपालशी संबंध नाकारत आहेत? तहलकात साठ टक्क्यांची गुंतवणूक तृणमूलच्या खासदाराने का केली? असे कित्येक सवाल लोकांच्या मनात आहेत. लोकं मोठी असली, मंत्र्या-संत्र्यांशी त्यांचे लागेबांधे असले, मोठ्या वर्तुळातल्या चारचौघात त्यांची ऊठबस असली की मग कोणीच त्यांच्या वाट्याला जाण्याची हिंमत करत नाही. अगदी कायदा सुद्धा...! असा समज एव्हाना सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून बसला आहे. तेजपाल अगदी सहजपणे फरार होऊ शकल्याने हा समज खरा ठरण्याची शक्यता आहे. केवळ त्यांंनी कॅमेराबद्ध केले म्हणून बंगारू लक्ष्मणांचे एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद गेलेे. त्यांना हवे होते, तर मग आता एका महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून कारवाई झालेली तेजपालांना का नको आहे? ते सोडून इतर सारे कायद्यापुढे समान असल्याचा गैरसमज तर झालेला नाही त्यांना? हा समज त्यांच्या आणि लोकांच्याही मनातून काढून टाकणारी कारवाई आता पोलिस आणि न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित आहे...

Monday, November 11, 2013

बदललेला इतिहास अन् भूगोल...!

स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्‍या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्‍याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?

ज्याची स्थापना करायलाही एका इंग्रज व्यक्तीची गरज पडली होती, त्या कॉंग्रेस पक्षाला या देशाच्या इतिहासाचे स्मरण अलीकडे वारंवार होऊ लागले आहे. कालपर्यंत ‘गांधी’ नावाच्या पलीकडे ज्यांना कधी जावेसे वाटले नाही, त्यांना आता सरदार पटेलांपासून, तर अन्य जुन्या कर्तृत्ववान नेत्यांच्या कर्तबगारीचे आश्‍चर्यजनकरीत्या स्मरण होऊ लागले आहे. नेहरूंच्या तुलनेत जे पटेल कालपर्यंत यांना नेहमीच खुजे वाटले, त्या सरदारांच्या कार्यकर्तृत्वाची जाण कॉंग्रेस नेत्यांना आता अचानक होऊ लागली आहे...

हा देश एकसंध ठेवण्यासाठी प्रसंगी नेहरूंशीही वैरत्व पत्करून पटेलांनी संस्थानिकांना एकत्र आणले होते. ज्यांना फाळणीचा काळा इतिहास टाळता आला नाही, त्या कर्तृत्वशून्य अन् लाचार नेत्यांना आता पटेल कॉंग्रेसचेच असल्याचा साक्षात्कार स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकांनंतर होऊ लागला आहे. कधीकाळच्या अखंड भारताचा एक एक भूभाग वेगवेगळ्या देशांच्या रूपात कसा आणि का वेगळा झाला, अगदी अलीकडच्या इतिहासात या देशाचे तुकडे कोणी केले, फाळणी नेमकी कुणी आणि का मान्य केली, पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही पंजाब-काश्मीरच्या प्रश्‍नांचे भिजतघोंगडे अजून कायम का आहे, काश्मीरच्या एका भागाला ‘पाकव्याप्त’ म्हणताना इतक्या वर्षांत कुणालाच कधीच जराशीही खंत कशी वाटत नाही, एक अख्खा अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून गायब होऊन शेजारच्या चीनच्या हद्दीत दाखवला जातो, तरी इथे कुणा कॉंग्रेसवाल्याचे रक्त खवळत नाही. हरामखोरीच्या या मानसिकतेवर कठोर कारवाई करायचे सोडून, चार-दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून हा प्रश्‍न निकाली काढण्याची अफलातून तर्‍हा कुणी अंमलात आणली? तिबेटच्या मुद्यावर पंडित नेहरूंचे ‘ते’ जगप्रसिद्ध विधान अजून हा देश विसरलेला नाही. चीनने आपली जी जमीन गिळंकृत केली, त्या जमितीवर गवताचे पाते देखील उगवत नाही, असे संतापजनक विधान नेहरूंनी संसदेत केले होते. ज्यांना त्याचा विसर पडला, तेच दुसर्‍यांना इतिहास शिकवायला निघाले आता?

ज्यांना विस्मरण झालेय्, त्यांनीच लोकांना इतिहासाचा विसर पडल्याची आवई उठवायची?

मुस्लिम मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने ज्यांना शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा इतिहास जाहीरपणे सांगण्याची हिंमत होत नाही, कोथळा बाहेर काढून छत्रपतींनी ज्याला जमिनीवर लोळवला त्या अफझलखानाची प्रतापगडावरची कबर ज्यांना अजूनही अभिमानाने जपावीशी वाटते, ज्यांना राणा प्रतापांच्या शौर्याचे नेहमीच वावडे राहिले अन् रायबरेलीत दंगल पेटविणार्‍या तौकीर रझाचे मात्र सतत कौतुक वाटले, ती कॉंग्रेस दुसर्‍यांना इतिहास शिकवायला निघाली असल्याचे चित्र दुर्दैवी अन् तेवढेच वेदनादायक आहे.

सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही कॉंग्रेसचे सदस्यत्व द्यावे, असा ठराव वर्किंग कमिटीमध्ये पारित करून घेतला होता. तो नेहरूंनी मागे घेण्यास लावला. एका गणतंत्र दिनी रा. स्व. संघाला पथसंचलनात याच कॉंगेसने सहभागी करून घेतले होते. हा इतिहास कॉंग्रेस कसा लपवणार? स्वातंत्र्यानंतरही स्वत:ची संस्थाने खालसा करण्यास नकार देणार्‍या हैदराबादच्या निझामला अन् जुनागडच्या संस्थानाला कणखर भूमिका घेत पटेलांनी शिकवलेला धडा कधी आठवेल या नेत्यांना? पाकिस्तान, चीन, बांगलादेशसारख्या शेजारी राष्ट्रांबाबत त्याच कणखर बाण्याचे प्रदर्शन आजवर झाले असते, तर अरुणाचल भारताच्या नकाशातून गायब करण्याची अन् रात्री-बेरात्री थेट सीमेवरून या देशात दहशतवादी घुसवण्याची कुणाची बिशाद होती? पण दुर्दैवाने गांधी, नेहरूंच्या पलीकडे कुणाच्या कर्तृत्वाची जाणीव इथे झालीच नाही कधी कुणाला. एकाच्या शांततेच्या अतिरेकाने सर्वांदेखत देशाचे तुकडे झाले अन् दुसर्‍याच्या साम्यवादी धोरणाच्या प्रेमापायी देशाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली. पण या काळात ना कधी कुणाला सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती आठवली, ना सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील भूमिकेचे कधी कुणाला स्मरण झाले. टिळक, भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, राणी लक्ष्मीबाई, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, वासुदेव फडके ही तर काय बोलून चालून वाळीत टाकलेली माणसं. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारी वीरप्पंडिया कोट्टबोम्मन, माथुर्मलिंगम थेवर ही नावं तर लाख प्रयत्न करूनही आठवणार नाहीत यांना. मतांच्या राजकारणात उपयोगी पडतात म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांची नावे निदान तोंडी लावायला तरी घेतली जातात. ज्यांचे आज एवढे गुणगान चालले आहे, ज्यांच्या कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आज कॉंग्रेसजन बाळगताहेत, त्या पटेलांना राजीव गांधींच्या बरोबरीने १९९१ मध्ये भारतरत्न दिले जावे, याचा अर्थ काय? राजीव गांधींच्या फक्त एक वर्षापूर्वी नंबर लागावा एवढेच कर्तृत्व होते बाबासाहेब आंबेडकरांचे?

इतिहासाचा विसर नेमका कुणाला पडला आहे, तो बदलला कुणी, कधी काळच्या एकसंध भारताच्या नकाशाची शकले पडताना बघ्याची भूमिका कुणी घेतली, हा इतिहास कुणीही विसरलेला नाही. धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांतपणे जगण्याचीही फुरसत नसलेला सामान्य माणूस याबाबत कधी काही बोलून दाखवत नाही याचा अर्थ तो या सार्‍या घडामोडींबाबत अनभिज्ञ आहे, असा समज कुणी करून घेत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. रावळपिंडी कुणी घालवली अन् कारगिल कुणी जिंकले, तिबेट कुणी गमावला अन् जुनागढ कुणी खेचून आणला, निवडणुकीत बाबासाहेबांना कुणी पाडले अन् भिंद्रानवालेला कुणी मोठा केला, हा इतिहास अजूनही मनामनात ताजा आहे. नव्हे, खदखदतो आहे. या वैभवशाली देशाच्या सीमारेषा नंतरच्या काळात कशा तोकड्या होत गेल्या, स्थानिकांचे हक्क डावलून बांगलादेशींना या देशात आणि इथल्या मतदारयाद्यांमध्ये स्थान कुणी दिले, हेही कुणी विसरलेले नाही इथे. जे दुसर्‍याला इतिहास शिकवण्याच्या गोष्टी करताहेत, त्यांनी आधी स्वत: इतिहास अभ्यासावा. नरेंद्र मोदींना सातवी, आठवीच्या इतिहासाची पुस्तकं भेट म्हणून पाठविणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर तो आवर्जून अभ्यासावा

पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आज कळली कॉंग्रेस नेत्यांना, गुजरातेत त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना तिथल्या राज्य सरकारने हाती घेतल्यानंतर? पटेल संघविरोधक होते, असे जर कॉंग्रेसवाल्यांना म्हणायचे असेल मग त्यांच्या कर्तबगारीबद्दलही कॉंग्रेसजनांना आक्षेप का असावा? पण एवढ्या उंचीच्या माणसाला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यासाठी १९९१ साल का उजाडावे लागले, या प्रश्‍नाचे उत्तर देईल कुणी? जवाहरलाल नेहरू यांना १९५५ मध्ये, शास्त्री १९६६, इंदिराजी १९७१ अन् पटेलांचा नंबर लागला १९९१ मध्ये? का? ज्या दिवशी या प्रश्‍नाचे तमाम देशवासीयांना पटेल असे तर्कशुद्ध उत्तर देता येईल ना, त्याच दिवशी डॉ. मनमोहनसिंहांनी इथल्या जनतेला इतिहासाचे दाखले द्यावेत. पटेलांनी त्यांच्या जीवनात गाठलेल्या यशाच्या उत्तुंग शिखराची शेखी त्यांनी त्याच दिवशी मिरवावी कॉंग्रेसजनांनी.

शब्दांचे अर्थ राजकीय सोयीने लावायचे, इतिहासाचे संदर्भ हवे तसे वापरायचे, माणसं आपापल्या पद्धतीने हवी तेव्हा हवी तशी छोटी किंवा मोठी करायची, ही पद्धत कॉंग्रेसने वापरायची अन् लोकांनी सारे काही ठावूक असतानाही तो प्रकार शिरसावंद्य मानायचा, हे आजवर खपून गेले. आता जनता जाणती झाली आहे. यांच्या राजकारणातले, वागण्या-बोलण्यातले बारकावे तिलाही उमगतात आताशा. आपण बनवू आणि लोक मूर्ख बनतील, या भ्रमात कुणी राहू नये. सार्‍या देशाच्या नजरेत खूप खूप मोठे असूनही सरदार पटेल आजवर कसे दुर्लक्षित राहिले अन् आताच कसे कॉंग्रेसजनांना त्यांचे स्मरण होऊ लागले, हे लोकांच्या चांगलेच ध्यानात आले आहे. देशाचा इतिहास अन् भूगोल बदलविण्याचे पाप कुणाचे, हे तर लोकांच्या केव्हाच लक्षात आले आहे...

Monday, November 4, 2013

मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न

विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्.....

नर आणि मादीच्या पलीकडेही जगात स्त्री-पुरुषांमध्ये संबंध असू शकतात आणि ती नातीही खूप सुंदर असू शकतात. त्या नात्यांनाही विषयांच्यापलीकडले भावनिक कंगोरे असू शकतात, हे सार्‍या जगाला शिकवणार्‍या, नव्हे ठणकावून सांगणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या भारतीय समाजालाच आज त्या शिकवणुकीचा विसर पडू लागलाय् की काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्य पुस्तकांच्या पहिल्या पानावरची शपथ हळूहळू धूसर तर होत चालली नाही ना? स्त्री-पुरुषांमधली भावनिक नाती पुन्हा एकदा विषयांच्या वावटळीत घरंगळत तर चालली नाहीत ना? रक्षणाची शपथ घेत रक्षाबंधनाला बांधले गेलेले भावाच्या हातावरच्या धाग्यांचे बंधन हळूहळू क्षीण तर होत चाललेले नाहीत ना? शरद ऋतुतल्या बीजेला भावा-बहिणींच्या प्रेमात चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढ व्हावी म्हणून सुरू झालेला, बहिणीने भावाला ओवाळण्याचा प्रघात अलीकडे निरर्थक तर ठरत चाललेला नाही ना...?
मन उद्विग्न अन् अस्वस्थ करणारे प्रश्‍न आहेत हे सारे. सारा भारतीय समाज या अनुत्तरीत प्रश्‍नांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आहे सर्वदूर. ज्या देशात परस्त्री मातेसमान मानली जाते, जिथे ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते’...च्या मंत्राला वेदमंत्राच्या पंक्तीत स्थान आहे, त्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर का यावा? भर रस्त्यांवर बलात्कार का व्हावेत? रस्त्याने चाललेली कुठलीही तरुणी आपली शारीरिक भूक भागवण्यासाठीच पृथ्वीतलावर धाडण्यात आली असल्याचा ग्रह करून घेत तरुणाई बेभान आणि बेताल का वागू लागली आहे अलीकडे? दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर झाली तरी, पोलिसांच्या कारवाईचा अन् न्यायालयाच्या निकालाचा वचक निर्माण होऊन समाजातील बलात्काराच्या घटनांमध्ये विक्रमी घट झाल्याचे चित्र मात्र नाही. उलट त्या नंतरच्या काळातही बलात्काराच्या घटना सतत वाढल्याची आकडेवारी वेगवेगळ्या अहवालांमधून समोर येतेय्. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रातली महिलांची सामाजिक दुरवस्था काय वर्णावी! नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌च्या एका अहवालानुसार गेल्या काही वर्षात या राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बलात्कारापासून तर हुंडाबळीपर्यंत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
घरादारांसमोर दिव्यांची आरास मांडली जात असताना, प्रकाशाच्या झगमगाटात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना तिकडे दक्षिणेतल्या एका अभिनेत्रीने एका खासदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली आणि नंतर मागेही घेतली. हैदराबादेत एका इंजिनीअर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना अजून ताजी आहे. शेजारच्या समुद्रपुरात एका आदिवासी तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत पेटविल्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळली नाही. अशात दिंडोशीत एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे...
काय, झालंय् काय आपल्या समाजाला? कशाचा परिणाम आहे हा सारा? केवळ शारीरिक आकर्षणांमुळे भावना चाळवल्या गेल्याचा हा दुष्परिणाम आहे? दूरचित्रवाहिन्या, इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध झालेल्या माहितीच्या मार्‍याची ही परिणती आहे, की एकूणच भारतीय समाजावर आजवर झालेल्या संस्कारांवरच प्रश्‍नचिन्ह उभे करावे लागणार आहे आता? जगातले सर्वाधिक धर्म अस्तित्वात असलेल्या, त्या त्या धर्माची मानवतेची शिकवण खोलवर रुजलेल्या भारतीय समाजावरचे धार्मिक संस्कार इतके कसे तकलादू झाले? नर आणि मादीच्या पलीकडे स्त्री-पुरूषांमधले संबंध जणू मान्यच नसलेल्या पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा इतका कसा घट्ट बसतोय आपल्या मनावर? कुटुंब नावाची संस्था मजबूत करणारे इथले संस्कार कुठे गेलेत? सामाजिक बंधूभाव मनामनात रुजविणारी ती शिकवण कुठे गेली? की, वेल्थ, वाईन, वूमनच्या त्रिसूत्रीत वाहवत चाललेल्या, त्यापुढे इतर सार्‍या गोष्टी थिट्या मानू लागलेल्या या समाजात इतर सारी नाती, त्या नात्यांचे पावित्र्यही लयाला जात अल्याचे बघण्याची वेळ येणार आहे, जगद्गुरू म्हणविणार्‍या भारतावर?
विज्ञान, तंत्रज्ञानाने जग फार जवळ आले असले, तरी माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याची खंत नवी राहिलेली नाही आता. मनामनातून ती व्यक्त होतेय्. पत्रांची जागा मोबाईलवरच्या एसएमएसने घेतली. मैदानावरचे खेळ संगणकावर आले. अभिनंदन, सांत्वनाच्या भावनाही प्रत्यक्ष भेटीऐवजी ई-मेल अन् व्हाटसऍपवर व्यक्त होऊ लागल्या. पद्धत बदलली अन् बालमनावर रुजविण्याचे संस्कारही. रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत तिच्याकरवी हातात रक्षा बांधून घेण्याचा दिवस. पण, या दिवशी बाहेर पडाल तर एखादी मुलगी तुम्हाला राखी बांधेल आणि मग तुम्ही ‘भाऊ’ बनून जाल. त्यामुळे या दिवशी घरातूनच बाहेर पडू नका! पडलात तरी कुण्या मुलीच्या नजरेस पडू नका. नाही तर तुमचा ‘भाऊ’ झाल्याशिवाय राहणार नाही, असली भीती दाखवणार्‍या जाहिराती कथित लोकल एन्टरटेन्मेंट चॅनल्सवरून कानावर पडल्या की आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी कोणत्या दिशेला नेली जातेय्, याचा अंदाज येतो. जगातल्या कोणत्याही मुलीचे ‘भाऊ’ न बनण्याची शिकवण नेमके कोण अन् कशासाठी देतेय्? आई-वडिलांची शिकवण, लहानपणापासून रुजलेले संस्कार, पाठ्यपुस्तकातले सामाजिक आशय मागे पडून कानावर पडणार्‍या या जाहिरातींचा प्रभावच अधिक प्रभावशाली ठरतोय् अन् बहुधा याच लाटेत भावा-बहिणींच्या नात्याची घट्ट वीणही दिवसागणिक सैल होतेय्. या नात्याचे पावित्र्य जपण्याची, ते नव्या पिढीत रुजविण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे. रक्ताची नाती तेवढी ‘जपण्याजोगी’ अन् उरलेला समाज ‘वापरून’ फेकण्याच्या लायकीचा असल्याचा गैरसमज तमाम पुरुषजातीच्या मनातून काढून टाकण्याची जशी गरज आहे, तशीच गरज रक्ताची नाती जपणार्‍या मानवजातीतल्या संबंधातला यांत्रिक आणि व्यवहार्य भाग दूर करण्याचीही आहे. वर्षातले दोन दिवस भावा-बहिणीच्या नात्याची जपणूक करण्याचे. त्या दिवशी राखी बांधून झाली, ओवाळून झाले की उरलेले सारे दिवस समाजातल्या इतर स्त्रियांचा उद्धार करायला आपण मोकळे असल्याचा ग्रह तमाम ‘भाऊरायांच्या’ मनातून काढून टाकण्याचीही आज तेवढीच आवश्यकता आहे. खरं तर आपल्या समाजव्यवस्थेत जन्माला येताच ओघाने येणार्‍या प्रत्येकच नात्याच्या जबाबदारीचे बाळकडू आपल्याला काटेकोर चाकोरीतून नकळत मिळत असते. वेगवेगळ्या नावांची सुंदर झालर लावूनच ती नाती आपल्या वाट्याला येतात. मात्र, ज्यावेळी ही चाकोरी हरवते, झालर उसवली जाते, त्यावेळी केवळ कात तेवढी हाती उरते. अन् व्यवहाराच्या कोरड्या पखाली ओढत जगणार्‍यांची जमात तेवढी निर्माण होते....या कोरडेपणातूनच मग नाती भावा-बहिणीपेक्षाही स्त्री-पुरुषांची तयार होतात. कुठलीही जबाबदारी नको म्हणून रूळत चाललेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय किंवा बलात्कार काय, भावनाशून्य अशा कोरड्या व्यवहारातून निपजलेल्या बाबी त्या...
भावा-बहिणीचं नातं या सार्‍यांपलीकडचं आहे. भगवान श्रीकृष्णानं सुभद्रेशी जपलेलं. त्याच कृष्णाला द्रौपदीच्या मदतीला धावून जाण्यास भाग पाडणारं. रक्तापेक्षाही भावनेच्या बळावर ते शतकानुशतकं जिवंत आहे. रक्ताचं नसलं, तरीही ते मनापासून जपण्याची प्रेरणा जगातल्या कुठल्याही पुरुषाला देण्याची ताकद त्या नात्यात आहे. सध्याच्या जगरहाटीत ते नातंच हरवण्याची भीती निर्माण झाली आहे. ते हरवू न देण्याचा संकल्प आज भाऊबीजेच्या निमित्ताने सारे मिळून करू या.