Sunday, May 19, 2013

वयाची जवळपास साडेसात दशकं आता मागे पडली आहे. या काळात आलेल्या शेकडो बर्‍यावाईट अनुभवांची शिदोरी गाठीशी आहे. सार्‍या जगाला उपयोगी पडतील असे कित्येक सिद्धांत अभ्यासातून, अनुभवातून  मांडून झाले आहेत. भरपूर पुस्तकं लिहून झाली आहेत. शेतकर्‍यांच्या एकत्रीकरणातून संघटना उभी राहताना बघितली, तशी ती याच डोळ्यांनी विखुरतानाही बघावी लागली. जोडलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही समर्पित भावनेने आयुष्यभर सोबतीला राहिले. काहींनी वैचारिक मतभेदांसारखी कारणं काढून मध्येच साथ सोडत स्वतंत्र वाटा धुंडाळल्या. काहींनी समांतर संघटना काढल्या. शरद जोशींच्या तोडीचं नेतृत्त्व स्वत:त शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न त्यांना लखलाभ. आपण त्याची फार चिंता वाहायचे कारण नाही. शेतकरी संघटनेचं काम आपण केलं, असं म्हणण्यापेक्षा ते आपल्या हातून घडलं असं म्हणण्याइतपत वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. नाही म्हणायला मनातल्या विरक्तीनेही अलीकडे डोके वर काढले आहे. कालौघात तब्येतीनंही अधून मधून दगाफटका केलाय्. कधी हृदयाला सर्जरीची गरज भासली, तर कधी फ्रॅक्चर झालेल्या जबड्याने अमोघ वक्तृत्वाची वाट अडवून धरली. पण म्हणून क्रांतीकारक विचारांचा डोक्यातला अन् मनातला निखळ प्रवाह थोपवून धरण्याची ताकद थोडीच आहे कुणाची?

 शरद जोशी
धगधगणारा अंगारमळा

कित्येक वर्षे विदेशात राहिल्यानं मराठी भाषा धड न येणारा, जातीनं ब्राह्मण असलेला तरुण महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांमध्ये क्रांती करायला निघाला होता. आपला विचार शेतकर्‍यांपुढं मांडायचा असेल तर सर्वप्रथम आपण स्वत: शेती केली पाहिजे, हा विचार त्या तरुणाच्या मनात आला आणि त्यानं आंबेठाण इथं शेतीचे प्रयोग सुरू केले. बागायती शेती म्हणजे श्रीमंतांची शेती, असा ग्रह त्यावेळी मनात ठाण मांडून बसला असल्यानं शेतीही कोरडवाहू घेतली होती. पुस्तकी ज्ञानाचा वापर केला. कॅश फ्लो अ‍ॅनालिसीस केले. कमी काळात चार पैसे खिशात पडतील अशी पिकं घ्यावीत असा विचार मनात आला. प्रयोग म्हणून लवकर हाती येणारं काकडीचं पिक घेतलं. मुंबईच्या बाजारपेठेत ती विक्रीसाठी पाठवली. एक दिवस तिथल्या अडत्याचं पत्र हाती पडलं. काकडी विकून प्राप्त झालेले सातशे रुपये लवकरच मनीऑर्डरने पाठवित असल्याचा निरोप त्यातून धाडण्यात आला होता. कालपर्यंत महिन्याकाठी पगाराची लाखाच्या घरातली रक्कम हाती पडणार्‍या तरुणाच्या चेहर्‍यावर या सातशे रुपयांच्या ‘कमाई’ने उमटलेले आनंदाचे भाव वर्णनातीत होते. दुसर्‍या वेळी मात्र, निराशा हाती लागली होती. तुम्ही पाठवलेली काकडी विकली तरी हाती आलेल्या पैशातनं जुजबी खर्चही निघाला नसल्याची तक्रार करत अडत्यानंच 314 रुपयांची मागणी केली होती. शेती वाटते तेवढीही सोपी नसल्याची शिकवण या वेळच्या पत्रानं दिली होती. पण म्हणून शेतीचे प्रयोग मात्र थांबले नव्हते. शेतकर्‍यांच्या वाट्याला येणारी दाहकता त्यातून हळूहळू अनुभवाला येऊ लागली होती. शेतीचे अर्थशास्त्रही एव्हाना कळू लागले होते. शेतकर्‍यांच्या घामाच्या दामाचे महत्त्व समजू लागले होते. तावून, सुलाखून तयार झालेला, शेतकर्‍यांचा एक जागतिक दर्जाचा नेता त्या दाहक अनुभवातून साकारला होता... आता तो पूर्ण शेतकरी झाला होता. शेती करायची तर मातीत हात घालावा लागेल, मातीच्या जातीचे व्हावे लागेल, हे कळले होते. अर्थशास्त्राचे ज्ञान आणि मातीची जाण एकजीव झाली. शिक्षणाला श्रमाची जोड मिळाली आणि एक वेगळंच रसायन तयार झालं. आता त्याची जात आडवी येत नव्हती. भाषेचीही अडचण केव्हाच दूर झाली होती. स्वानुभवातून साकारलेले शेतीच्या अर्थकारणाचे जागतिक स्तरावरचे सिद्धांत तो मांडू लागला तेव्हा जीवाचा कान करून ते ऐकायला अडाणी बळीराजा राज्याच्या कानाकोपर्‍यातून धडपड करत एकत्र येऊ लागला. त्याच्या फक्त एका आदेशाची देरी असायची, की लाठ्या काठ्या खायला लोक जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरायचे. शेतीवर पोट असलेला, शेती आणि शेतकर्‍यांसाठीच आयुष्य वेचणारा एक अभ्यासू, समर्पित नेता शेतकर्‍यांना लाभला होता... नागर समाजातला कुणीतरी आपली दु:खं आपल्या शैलीत समजून घेतो आणि त्यासाठी तळमळीनं आपल्याला काही सांगतो, म्हणून कास्तकारांचा तो कंठमणी झाला.
शरद जोशी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेकंड डेव्हलपमेंट डीकेड कमिटीचा सदस्य असलेल्या या भारतीय तरुणाच्या कर्तबगारीने अधिकारी जाम खूश होते. त्याचा अभ्यास, वेगवेगळ्या विषयांवरचा त्याचा वकूब सर्वांनाच भुरळ घालायचा. कामानिमित्त वेगवेळ्या देशात फिरणं व्हायचं. कुठे आकाशाला शिवणार्‍या श्रीमंतीचा थाट, तर कुठे जमिनीवरची लाचार गरिबी. नायजेरियासारख्या देशात, देशाच्या राजधानीच्या सीमेपर्यंतच मर्यादित राहिलेला विकास आणि झगमगाट राजधानीतून बाहेर पडल्यावर अगदी वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडेगावात नावालासुद्धा दिसत नाही, ही तफावत मन कासावीस करून जायची. आपल्या देशासारखंच इथेही ‘इंडिया विरुद्ध भारत’ अशी लढाई असल्याची वस्तुस्थिती आठवली की मन आणखीच विषण्ण व्हायचं. हे चित्र बदलण्याचा ध्यास अस्वस्थ करायचा. जगातल्या सर्व भांडवलदारीचा उगम हा कमागारांच्या घामातून अन् रक्तातून होतो, हा सिद्धांत कानावरून गेला होताच. पण मानवाला मिळालेले मूळ भांडवल हे निसर्गात आणि मुख्यत्वे शेतीत दडले असल्याचा सिद्धांतही एव्हाना मनात घर करून बसला होता. तो प्रत्यक्षात साकारण्याचा निर्धार करूनच हा तरुण मायदेशी परतला...
शरद जोशींनी मांडलेला विचार आणि सिद्धांतांचा दर्जा जागतिक पातळीवरचा आहे.  मानवी जीवनाचे मूळ स्त्रोत निसर्गात आणि शेतीत आहे. जगातली इतर सर्व उत्पादनं ही शेतीतील अतिरिक्त उत्पन्नातून निर्माण होतात. एक दाणा पेरला की हजार दाणे निर्माण करणारा चमत्कार दुसर्‍या कुठल्याही क्षेत्रात घडत नाही. पण हा चमत्कार घडवणार्‍या शेतकर्‍याला मात्र दुसर्‍यांच्या दयेवर, सरकारच्या सबसिडीवर जगावे लागते, ही बाब मनाला सारखी सलायची. सरकार आणि प्रशासनातील नेतृत्वानं राबवलेली धोरणं शेतकर्‍यांच्या जीवावर उठली असल्याची वस्तुस्थिती मनात आक्रोश निर्माण करायची. या आक्रोशातूनच भविष्यात शेतकर्‍यांची आंदोलनं पेटली. कांद्यापासून उसापर्यंत अन् दुधापासून कापसापर्यंतच्या विविध वस्तूंच्या रास्त दरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू लागला. पाठीमागे लागलेल्या पोलिसांना कधी गनिमी काव्यांनी हुलकावणी देत, तर कधी त्यांच्या लाठ्या अंगावर झेलत शरद जोशी शेतकर्‍यांच्या मनातल्या वेदना जाहीरपणे मांडू लागले. शरद जोशी नावाचं वादळ आणि त्यांनी निर्माण केलेल्या शेतकरी संघटनेनं उभारलेल्या बळीराजाच्या हक्काच्या लढ्यानं एव्हाना सार्‍या महाराष्ट्रात रान उठवलं होतं...
संघटनेच्या आंदोलनाची काही वैशिष्ट्यं होती. नुसत्या आंदोलनातून नाही, तर विचारांनीही शेतकरी ताकदवान करण्याची कल्पना त्यामागे होती. त्याला आपल्या पायांवर उभे करण्याची, घेतलेले कर्ज फेडण्याची कुवत त्याच्यात निर्माण करण्याची जिद्द त्यामागे होती. बहुदा त्याचाच परिणाम असेल, पण सरकारची धोरणं कृषीक्षेत्रासाठी कशी मारक आहेत, हे आता सामान्य शेतकर्‍यालाही कळू लागले होते. शेतीच्या स्वातंत्र्याची भाषा तोही बोलू लागला होता. स्वस्त कच्चा माल, कमी दरातली मजुरी ही कारखानदारीला मिळणारी अप्रत्यक्ष सबसिडी अन् अन्न धान्याचे दर कमी करून शेतकर्‍यांच्या चाललेल्या पिळवणुकीचे षडयंत्र त्यालाही कळू लागले होते. समाजवादाच्या नावाखाली नेहरुंनी कारखानदारीला दिलेले महत्त्व, कसेल त्याची जमीन हे सूत्र नाकारण्याचा त्यांचा डाव, सत्तेची आणि अर्थकारणाची सारी सुत्रे सामाजातील एका विशिष्ट वर्गाकडे केंद्रित करण्याची प्रस्थापितांची खेळी एव्हाना सर्वांच्याच ध्यानात आली होती. आपल्या या नेत्याचे बोल सामान्यातला सामान्य शेतकरीही त्याच ताकतीने बोलू लागला होता... महात्मा गांधींनी खेडी स्वयंपृूर्ण करण्याची रामराज्याची स्वप्न पाहिली आणि नेहरूंनी यांिंत्रकीकरणाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाची वाट धरून तीच खेडी बकाल केली. किसान पोरका झाला... हे वास्तव शेतकर्‍यांना त्यांच्याच भाषेत सांगण्याचा आणि शेतकरी म्हणून त्यांना एकसंघ करण्याचा निर्धार या निमित्ताने प्रत्यक्षात साकारत होता.
शेतकर्‍यांना पटेल की नाही, त्यांना रुचेल की नाही, याहीपेक्षा त्यांच्या हिताचे काय आहे याचा विचार करून हा नेता बोलत राहिला. सुरुवातीला ते विचार काहींनी धुडकावून लावले. पण नंतरच्या काळात त्याचे महत्त्व सर्वांनी स्वीकारले. इतर सर्व लोक शेतकर्‍यांना सबसिडी देण्याची, त्यांच्या कर्जाची मर्यादा वाढवण्याची  मागणी करत असताना शरद जोशी मात्र, शेतकर्‍यांना जागतिक स्पर्धेत उतरण्याचा सल्ला देत होते. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे धाडस करायला सांगत होते. स्टॅलीनने रशियात केलेला लुटीचा प्रयोग नेहरूंनी भारतात केल्याचा, शेतकर्‍यांना त्यांच्या घामाची किंमत कधी मिळूच नये अशी व्यवस्था इथे उभारण्यात आली असल्याचा आरोप ते जाहीरपणे करीत होते. या देशात दोन प्रकारचे वैभव लोकमान्य आहेत. एक राजाचं, दुसरं साधूसंतांच्या वैराग्याचं. शेतकर्‍याकडे असलेलं वैभव संतांच्या वैराग्याचे आहे. त्याची किंमत ज्याला कळायची त्यालाच कळते, ही त्यांची भावना नकळत मनाला स्पर्श करून जायची...
आंदोलनं खूप केली. सत्ताधारी आणि प्रशासनाशी केलेल्या संघर्षाने तर पराकोटीची टोकं गाठली. हे करताना बळीराजाला स्वबळावर उभं करण्याचं  स्वप्न मनात होतं. शेतकर्‍यांची सामाजिक ताकद उभी करताना त्याच्या घरातल्या लक्ष्मीला न्याय देण्याचा प्रयत्न आवर्जून झाला. शेतीचा सातबारा पुरुषांऐवजी घरातल्या महिलेच्या नावानं करण्याच्या आवाहनाला प्रतिसादही कसा भरभरून मिळाला होता. आता शेतकरी संघटनेला महिलांची स्वतंत्र आघाडी लाभली होती. पहिल्याच अधिवेशनात निदान लाखभर महिला राज्याच्या कानाकोपर्‍यातून एकत्र आल्या होत्या. पण स्त्रीशक्तीचा हा विराट सागर बघायला लीलाताई जोशी मात्र हयात नव्हत्या. शेतकरी संघटनेत महिलांची स्वतंत्र आघाडी असावी ही कल्पना मुळात लीलाताईंची. संघटनेच्या कामाच्या व्यापात तिच्याकडे कधी लक्षच देता आलं नाही. तरीही त्या माऊलीनं कधी एका शब्दानं तक्रार केली नाही. क्रांतीदर्शी पुरुष वनवासात असताना त्याची सहधर्मचारिणी त्याला सोबत करते मात्र त्याच मर्यादापुरुषोत्तमाला राज्य मिळाले की  तिला मात्र जमिनीत गडप व्हावे लागते, या वास्तवाचा करूण अनुभव परत एकदा आला. शरद जोशी शेतकर्‍यांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले असताना लीलाताईंची साथ मात्र अर्ध्यावर सुटली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ती सोबतीला असायला हवी होती, ही भावना व्यक्त करताना आजही बळीराजाच्या ‘साहेबां’च्या डोळ्यांत नकळत पाणी तरळते. अक्षम्य दुर्लक्ष करण्याच्या आपल्या चुकीमुळेच आपण तिला गमावल्याची सल अजूनही मनाच्या कुठल्याशा कप्प्यात कायम वास्तव्य करून असते... 
शरद जोशींच्याच शब्दात सांगायचं झालं, तर चुका फक्त वैयक्तीक जीवनातच केल्यात असं नाही. सामाजिक जीवनातही त्या भरपूर झाल्यात. शेतकरी संघटनेला राजकारणाच्या आखाड्यात उतरवणे ही आपली सर्वात मोठी चूक होती. पण खरं सांगू? राजकारण हा भविष्यात केवळ बिल्डर्सच्या सोबतीने करायचा धंदा असणार आहे, मनी, मॅन आणि मसल पॉवरशिवाय ते करताच येणार नाही, याची पुसटशीही कल्पना त्यावेळी असती ना, तर मी राजकारणात उतरण्याचा निर्णय कधी घेतलाच नसता. मी बापडा आपला प्रामाणिक माणसांचा राजकीय पक्ष उभा करायला निघालो होतो. पण एका गोष्टीचं दु:ख मनात नक्कीच आहे. अन् ते कायम असणार आहे. जात, धर्म न मानणार्‍या विचारांचा शेतकरी तयार करण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला. पण स्वतंत्र भारत पक्षाच्या बाबतीतला अनुभव जरासा वेगळा आहे. या राज्यातल्या शेतकर्‍यांना त्यांचा नेता म्हणून ‘जोशी’ चालतो. पण मत देताना मात्र त्यांना ‘पवार’चा लागतो, हे न उलगडलेले कोडे मला अजूनही सोडवायचे आहे. आत्महत्या करणारा शेतकरी आणि त्याला मरणाच्या दारात लोटणारी सरकारी धोरणं बघितली की अजूनही मला माझ्या बळीराजासाठी रस्त्यावर उतरावेसे वाटते. याही परिस्थितीत एक ठाम विश्‍वास मनात आहे. या देशातला शेतकरी कर्जमुक्त झाल्याचे मी माझ्या हयातीत बघणार आहे....
वयाची जवळपास साडेसात दशकं आता मागे पडली आहे. या काळात आलेल्या शेकडो बर्‍यावाईट अनुभवांची शिदोरी गाठीशी आहे. सार्‍या जगाला उपयोगी पडतील असे कित्येक सिद्धांत अभ्यासातून, अनुभवातून  मांडून झाले आहेत. भरपूर पुस्तकं लिहून झाली आहेत. शेतकर्‍यांच्या एकत्रीकरणातून संघटना उभी राहताना बघितली, तशी ती याच डोळ्यांनी विखुरतानाही बघावी लागली. जोडलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही समर्पित भावनेने आयुष्यभर सोबतीला राहिले. काहींनी वैचारिक मतभेदांसारखी कारणं काढून मध्येच साथ सोडत स्वतंत्र वाटा धुंडाळल्या. काहींनी समांतर संघटना काढल्या. शरद जोशींच्या तोडीचं नेतृत्त्व स्वत:त शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न त्यांना लखलाभ. आपण त्याची फार चिंता वाहायचे कारण नाही. शेतकरी संघटनेचं काम आपण केलं, असं म्हणण्यापेक्षा ते आपल्या हातून घडलं असं म्हणण्याइतपत वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. नाही म्हणायला मनातल्या विरक्तीनेही अलीकडे डोके वर काढले आहे. कालौघात तब्येतीनंही अधून मधून दगाफटका केलाय्. कधी हृदयाला सर्जरीची गरज भासली, तर कधी फ्रॅक्चर झालेल्या जबड्याने अमोघ वक्तृत्वाची वाट अडवून धरली. पण म्हणून क्रांतीकारक विचारांचा डोक्यातला अन् मनातला निखळ प्रवाह थोपवून धरण्याची ताकद थोडीच आहे कुणाची? हा, नाही म्हणायला फिरण्यावर, बोलण्यावर थोडीशी बंधनं आली आहेत. पण कार्यकर्त्यांच्या भेटी अजून तशाच सुरू आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही अगदी तसंच अव्याहत सुरू आहे. मनातले विचार कागदावर उमटविण्याचे काम त्याच ताकतीने सुरू आहे.  एक मात्र आहे. कधिकाळी शेतीशी संबंधीत पुस्तकांनी भरलेल्या कपाटातली जागा आता अध्यात्मिक पुस्तकांनी घेतली आहे. ज्ञानेश्‍वरीतून आयुष्याचा अर्थ उमगण्याची धडपड चालली आहे. या देशाच्या कृषी धोरणाला आकार देणार्‍या, शेतकर्‍यांना शेतीविषयक अर्थकारणाचा मंत्र देणार्‍या, सार्‍या विश्‍वाने स्वीकारलेल्या सिद्धांतांना जन्म देणार्‍या जगविख्यात नेत्याचा प्रवास आता अध्यात्माच्या दिशेने सुरू आहे... अंगारमळा अजून धगधगतो आहे. राजकीय रेड्यांच्या तोंडून शेतकर्‍यांच्या हिताचे वेद वदवून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला. शेतकर्‍याच्या व्यथांच्या गाथा तरतील अशी इंद्रायणी तुकोबांच्या महाराष्ट्रात का नाही, हा प्रश्‍न अजूनही मनाला सतावतो. ही सल, हे चिंतन, प्रगाढ अभ्यास आणि आयुष्याच्या उत्तरार्धात स्वीकारलेला भक्तीचा मार्ग...नव्या पिढीसाठीचे हेच संचित असणार आहे...

1 comment:

  1. शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचं अतिशय मार्मिक आणि वाचनीय विश्लेषण. खूप छान लिहिलं आहे सुनील जी.

    ReplyDelete