ज्यांना साधे लघुशंकेला जातानाही केंद्रीय गृहमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असल्याचे उपहासाने बोलले जाते, ते दिल्ली पोलिस यंत्रणेतील अधिकारी स्वत:हून कारवाई करत, एका यशस्वी गुप्त मोहिमेतून आयपीएलची सट्टेबाजी चव्हाट्यावर आणतात आणि आपण सारे बापडेही मुकाट्याने त्यावर विश्वास ठेवत त्यांच्या कर्तबगारिचे गुणगान करतो. या कारवाईमागील राजकारण चव्हाट्यावर आणण्याची गरज ना पोलिसांना वाटत, ना प्रसार माध्यमांना.या प्रकरणाकडे जरासे बारकाईने बघितले की अनेक आश्चर्यजनक, अनाकलनीय बाबी घडत असल्याचे आपल्याला लक्षात येईल. एरवी क्रिकेटच्या जगतात जरासे खुट्ट झाले की प्रतिक्रिया द्यायला सरसावणारे गावसकर, शास्त्री, वेंगसरकर यासारखे दिग्ग्ज आयपीएल प्रकरणावर बोलताना कुठेही दिसत नाहीत. क्रिकेटबद्दल चाललेल्या ओंगळवाण्या घडामोडींनी व्यथीत व्हायला सचिन तेंडुलकरांनाही जवळपास दोन आठवडयांचा कालावधी लागला आहे. जवळपास पंधरवड्यापासून आयपीएलच्या सट्टेबाजीची चर्चा सुरू असताना या महान देशाच्या पंतप्रधानांना आता कुठे कंठ फुटला आहे. क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी परवा केले आहे. ज्या संस्थेच्या कार्यकारी मंडळात राजकारणाव्यतिरिक्त अपवादानेच कुणी सदस्य आहे, त्या बीसीसीआयकडून राजकारण न खेळण्याची पंतप्रधानांची अपेक्षा आकलनापलीकडची आहे. चीनने भारतीय भूमीत केलेल्या अतिक्रमणाबाबत ज्यांना बोलावेसे वाटत नाही, निषेधाचा सूरही ज्यांच्या वाणीतून निघत नाही, भारताच्या जमिनीवर उभारले गेलेले चीनी तंबू ही स्थानिक बाब असल्याचे सांगताना ज्यांची जीभ जराही कचरत नाही, ते डॉ. मनमोहन सिंह परवा राजकारणाने क्रिकेटवर केलेल्या अतिक्रमणाने पार व्यथीत झालेले सार्या देशाने अनुभवले आणि बघितले आहे.....
आयपीएल काय लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे?
जगातले
इतर सारे प्रश्न संपल्यागत सध्या आयपीएलच्या सट्टाबाजाराच्या बातम्यांचे
दळण दळणे सुरू आहे. तसेही निवडणुकी जवळ आल्या की जनहिताच्या, महत्त्वाच्या
प्रश्नांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्याच्या क्लृप्त्या राजकीय नेते
लढवत असतात. आयपीएल प्रकरण त्यातलेच एक आहे. क्रिकेटचा बाजार मांडला गेला
नाही, असे नाही. सट्टेबाजी झाली नाही, असे नाही. ते चूक तर शभंर टक्के आहेच. पण नेते आणि प्रसार माध्यमांचा ‘फोकस’ नेमका कशावर आहे? कारागृहातल्या
श्रीशांतच्या दिनचर्येवर. अंकीतवर असलेल्या त्याच्या बायकोच्या प्रेमावर.
त्याला लग्नासाठी म्हणून मिळालेल्या जामिनावर. मी अध्यक्षपदी असतो, तर असे काही झाले नसते, या
शरद पवारांच्या राजकीय बडबडीवर. आरोपांच्या इतक्या फैरी झडल्या तरी
राजीनामा न देण्याच्या श्रीनिवासन यांच्या कथित निर्धारावर. या देशातल्या
सर्वसामान्य माणसाने कशाचा विचार करावा, तोही कोणत्या दिशेने करावा, हे आताशा कुठलीतरी दुसरीच यंत्रणा ठरवते या दाव्याला दुजोरा देणारा हा सारा प्रकार आहे.
क्रिकेटचे एकवेळ सोडा पण आयपीएलशी किती लोकांचा संबंध येतो? क्रिकेटची
मॅच मग ती आंतरराष्ट्रीय असो की आणखी कोणती. ती पन्नास षटकांची की वीस
षटकांची. रसिक लोक ती बघणारच. तरीही त्याच्या डोक्यात आयपीएल भिनवण्याचा
प्रयत्न कोण आणि का करतोय? दुष्काळ, कॉंग्रेसचा भ्रष्टाचार, चीनचे आक्रमण, शेजारच्या प्रांतात झालेला नक्षल्यांचा हल्ला, असे सारे विषय मागे टाकून चर्चिण्याइतका आयपीएलचा घोटाळा मोठा आणि महत्त्वाचा आहे? आणि समजा असलाच, तर नेत्यांनी आणि माध्यमांनी त्यातल्या कुठल्या अँगलवर फोकस टाकला आहे? दूर विदेशात बसलेले लोक अपल्या देशातला सट्टा मॅनेज करू शकतात, याबाबत
कुणीच बोलायला तयार नाही. आपल्या गृहमंत्रालयाला त्याची जरााही खंत वाटत
नाही. त्यामागील सुत्रधारांना मुसक्या बांधून भारतात आणण्याची आणि त्यांना
गजाआड टाकण्याची कारवाई सोडा पण भाषाही कुणी बोलत नाही. ज्यांना साधे
लघुशंकेला जातानाही केंद्रीय गृहमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असल्याचे
उपहासाने बोलले जाते, ते दिल्ली पोलिस यंत्रणेतील अधिकारी स्वत:हून कारवाई करत, एका
यशस्वी गुप्त मोहिमेतून आयपीएलची सट्टेबाजी चव्हाट्यावर आणतात आणि आपण
सारे बापडेही मुकाट्याने त्यावर विश्वास ठेवत त्यांच्या कर्तबगारिचे
गुणगान करतो. या कारवाईमागील राजकारण चव्हाट्यावर आणण्याची गरज ना
पोलिसांना वाटत, ना प्रसार माध्यमांना.
या प्रकरणाकडे जरासे बारकाईने बघितले की अनेक आश्चर्यजनक, अनाकलनीय बाबी घडत असल्याचे आपल्याला लक्षात येईल. एरवी क्रिकेटच्या जगतात जरासे खुट्ट झाले की प्रतिक्रिया द्यायला सरसावणारे गावसकर, शास्त्री, वेंगसरकर
यासारखे दिग्ग्ज आयपीएल प्रकरणावर बोलताना कुठेही दिसत नाहीत.
क्रिकेटबद्दल चाललेल्या ओंगळवाण्या घडामोडींनी व्यथीत व्हायला सचिन
तेंडुलकरांनाही जवळपास दोन आठवडयांचा कालावधी लागला आहे. जवळपास
पंधरवड्यापासून आयपीएलच्या सट्टेबाजीची चर्चा सुरू असताना या महान देशाच्या
पंतप्रधानांना आता कुठे कंठ फुटला आहे. क्रिकेटला
राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी परवा केले आहे. ज्या संस्थेच्या
कार्यकारी मंडळात राजकारणाव्यतिरिक्त अपवादानेच कुणी सदस्य आहे, त्या
बीसीसीआयकडून राजकारण न खेळण्याची पंतप्रधानांची अपेक्षा आकलनापलीकडची
आहे. चीनने भारतीय भूमीत केलेल्या अतिक्रमणाबाबत ज्यांना बोलावेसे वाटत
नाही, निषेधाचा सूरही ज्यांच्या वाणीतून निघत नाही, भारताच्या जमिनीवर उभारले गेलेले चीनी तंबू ही स्थानिक बाब असल्याचे सांगताना ज्यांची जीभ जराही कचरत नाही, ते
डॉ. मनमोहन सिंह परवा राजकारणाने क्रिकेटवर केलेल्या अतिक्रमणाने पार
व्यथीत झालेले सार्या देशाने अनुभवले आणि बघितले आहे. दुर्दैव असले तरी, आमच्या पंतप्रधानांच्या प्राधान्य यादीत चीन कुठे आहे अन् क्रिकेट कुठे हे ही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महागाईने पिचलेला, भ्रष्टाचाराने होरपळलेला, प्रशासनाच्या खाबुगिरीने संतापलेला, घरात लागणार्या सिलेंडरवर चारशे रुपयेही अधिकचे मोजावे लागणार म्हटल्यावर घरातल्या कोसळणार्या अर्थव्यवस्थेने पुरता हादरणारा, पेट्रोलचे दर रुपया-दोन रुपयांनीही वाढले तरी संकटांची मालिकाच समोर उभी राहिल्यागत चेहरा पडणारा इथला सामान्य माणूस. त्याच्या जगण्या मरण्याचे प्रश्न काही वेगळेच आहेत. त्यांच्या विवंचनाही काहीशा निराळ्या आहेत. पण आजघडीला त्याचे सारे प्रश्न, व्यथा, विवंचना
बाजुला पडल्या आहेत. कारण आयपीएलच्या सट्टेबाजीपेक्षा सध्या दुसरे काहीही
महत्त्वाचे नसल्याचेच जणू त्याला ठासून सांगितले जात आहे. दिवसभर आयपीएलशी
संबंधित बातम्या त्याच्या तोंडावर फेकून मारल्या जाताहेत. चीनच्या
प्रकरणातील पंतप्रधानांच्या भूमिकेपेक्षाही बीसीसीआयच्या अध्यक्षांचा
राजीनामा सध्या अधिक महत्त्वाचा ठरला आहे. श्रीनिवासन यांनी चालवलेली
मुजोरी तर अजूनच महत्त्वाची ठरली आहे. गडचिरोलीतली पोलिसांची
नक्षल्यांसोबतची चकमक, चंद्रपूर जिल्ह्यातला बिबट्याचा हल्ला, मराठवाड्यातला भीषण दुष्काळ, महाराष्ट्राच्या राजकारणातील ओवेसीचा वाढता प्रभाव या सार्या बातम्यांचे महत्त्व ‘जाता जाता’ उल्लेख
करावा एवढेच उरले आहे. कारण सट्टेबाजीत अडकला तरी अंकीतशी ठरलेले लग्न
मोडणार नसल्याचा त्याच्या बायकोचा-नेहाचा निर्धार सार्या जगाने कौतुक
करावे इतका महत्त्वाचा ठरवला गेला आहे. यंदाचे वर्ष सुरू होऊन अद्याप पाचच
महिने पूर्ण झाले आहेत. तोवर राज्यातल्या शेतकर्यांच्या आत्महत्यांचा आकडा २६८ वर पोहोचला आहे. त्याची बातमी ऐकली कुणी कधी टीव्हीवर? कशी
ऐकणार. कारण इथे क्रिकेटपटू श्रीशांतचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे लफडे
त्याहून महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या चवदार लफड्यांपुढे शेतकर्यांच्या
कुजकामी जीवाला कसले आले महत्त्व?
घडणार्या घडामोडींचे महत्त्व नेमके कोण ठरवतो, त्यामागील सुत्रे काय असतात, गणिते कोणती मांडली जातात हे सारेच कल्पनातीत आहे. श्रीशांत मुंबईत पकडला गेला, तोवर ज्यांना त्याची कानोकान खबरही नव्हती, ते
महाराष्ट्राचे गृहमंत्री आता सट्टेबाजांवरील कठोर कारवायांची ग्वाही
छातीठोकपणे देताहेत. ज्यांनी स्वत:च क्रिकेटचा बाजार मांडला ते शरद पवार, आपण बीसीसीआयचे अध्यक्ष असतो तर असे घडले नसते, अशी फुशारकी मारत आहेत. लागलीच पवारांना बीसीसीआयचे अध्यक्ष करण्याची अंबानींची मागणी कानावर पडते. ती ऐकल्यावर पवारांच्या ‘मी असतो तर...’ या आधीच्या वक्तव्याचा अर्थ उमगायला लागतो. आयपीएल हा सत्तेची आणि अर्थकारणाची सुत्रे हाती असलेल्या या देशातल्या मूठभर लोकांनी, त्यांच्यापुरता मांडलेला बाजार आहे. तो काही या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. तरीही आयपीएलला तेवढे महत्त्व दिले जात आहे. लोकांना त्यावर विचार करायला, चर्चा करायला भाग पाडले जात आहे. त्याने इतर कुठल्या तरी विषयांकडे लक्ष देऊ नये यासाठीचे तर हे षडयंत्र नाही ना, याचा विचार आता जनतेनेच केला पाहिजे. आपण ज्या विषयांवर साधा विचार देखील करू नये असे या देशातल्या ‘काही लोकांना’ वाटते, ते विषय नेमके कोणते हे ही जनतेनेच हुडकून काढले पाहिजे. तसे झाले तरच ‘काही लोकांचे’ षडयंत्र निष्फळ ठरतील...