लोकांना मूर्ख बनविणारी ‘नवाबी’ तर्हा!
या देशातल्या तमाम मनूष्यप्राण्यांना चुटकीसरशी मूर्ख बनवता येते याची जणू खात्रीच पटल्यागत इथले सत्ताधारी राजकीय नेते वागू लागले आहेत. परवा देशाच्या गृहमंत्र्यांना अचानक भगव्या दशतवादाचे स्मरण झाले. त्यावरच्या वादाचा धुराळा अद्याप स्थिरावलेला नसताना राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्यांनी नवीन राजकीय वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
जनहिताच्या महत्त्वाच्या सर्व प्रश्नांचे गांभिर्य कमी करण्यासाठी आणि त्यावरचे लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी चालणार्या या प्रयोगांना प्रसारमाध्यमांकडून मिळणारे अवास्तव महत्त्व देखील त्याला कारणीभूत असेल कदाचित, पण राजकारणाच्या क्षेत्रात वावरणार्यांना असल्या बरळण्याचे ‘महत्त्व’ आताशा चांगलेच कळू लागले आहे. ते दिग्विजयसिंह असोत, सुशील कुमार शिंदे किंवा मग नवाब मलिक, या सार्यांनाच वादग्रस्त विधानांचे महत्त्व कळले आहे. आपल्या बरळण्याची सकारात्मक असो की नकारात्मक, पण ‘बातमी’ होते, याची कल्पना असल्याने ते असल्या वायफळ बडबडीची एकही संधी दवडत नाहीत.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी आतुर झालेले, त्यासाठी शिवसेनेचे संभाव्य आंदोलन चिरडून काढण्याची भाषा बोलणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आता भगव्या दहशतवादावर घसरले आहेत. तसे यात नवीन काहीच नाही, या सर्व बातम्या यापूर्वीच जगजाहीर झाल्या असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. ज्या बातम्या पूर्वीच केव्हातरी जगजाहीर झालेल्या आहेत, त्याच्या पुनरुच्चाराची गरज शिंदेंना जयपुरातल्या कॉंग्रेसच्या शिबिरात का जाणवली? पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यातील जवानाचे शीर कापून नेल्याच्या लाजीरवाण्या घटनेची जराशीही खंत मनात न बाळगता हसर्या चेह्याने भगव्या दहशतवादाची चर्चा करणे शिंदेंना राजकीयदृष्ट्या योग्य वाटत असली तरी, त्यामागचे अर्थ आणि राजकारण लोकांना कळत नाही असे थोडीच आहे?
आणि नवाब मलिकांचे काय? त्यांना तर सात वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या एका बैठकीचे स्मरण आता अचानक झाले आहे. रा. स्व. संघ आणि भाजपाच्या नेत्यांनी तालिबान्यांचे कट्टर समर्थक असलेल्या पाकिस्तानच्या तत्कालीन विरोधीपक्षनेत्यांसमवेत तीन तास बंदद्वार केल्याची ‘गोपनीय माहिती’ मलिकांनी काल अचानक उघड केली. त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली होती, याचे उत्तर मलिकांना आता हवे आहे. काय मस्त राजकीय चाली आहेत बघा या. दहशतवादी म्हणून मुस्लिमांना हिणवता का मग हा घ्या भगवा दहशतवाद! हिरव्या दहशतवादाबद्दल कधी ब्र काढण्याची हिंमत झाली नाही, त्यांना भगव्या दहशतवादावर मात्र मुक्तपणे बोलावेसे वाटू लागले. मलिकांचे तर काय, संघ, भाजपावर तुटून पडणे हा तर आवडता छंद. काल बोलताना त्यांनी भगव्या दहशतवादाचे समर्थन केले नाही. कसे करणार? एकदा भगवा दहशतवाद मान्य केला की मग हिरव्या दहशतवादाची चीरफाडही मान्य करावी लागेल ना? त्यापेक्षा दहशतवादाला धार्मिक रंग नसतात असे मोघम विधान केले की विचारांची वैश्विक पातळीही गाठल्याचा आवही आणता येतो आणि नेमके हवे ते दडवूनही ठेवता येते. मलिकांना तब्बल सात वर्षांनी ज्या बैठकीचे स्मरण झाले, त्या बैठकीबाबत इतके दिवस त्यांनी झोपा का काढल्या, असा प्रश्न इथे कुणीही आपल्याला विचारणार नाही, याची पुरती खात्री त्यांना असल्याने ते वाट्टेल ते, वाट्टेल तसे बरळले. संघ-भाजपाविरोधातली सनसनाटी बातमी हाती पडल्याच्या गगनचुंबी आनंदाच्या नुसत्या कल्पनेनेच वास्तवाचे भान सुटलेल्या मीडियाने सुसाट वेगाने पळत मलिकांच्या बरळण्याची ‘बातमी’ केली. मलिकांना हवे होते ते घडून आले. मीडियासाठी मलिकांच्या सात वर्षांचे विस्मरण महत्त्वाचे नव्हतेच, संघ आणि भाजपा नेत्यांवरचा आरोप त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. घटना किती वर्षांपूर्वी घडली याला महत्त्व नव्हते, आज त्याची ‘ब्रेकींग न्यूज’ करून लोकांना आजच्यापुरते तरी संभ्रमात टाकणे महत्त्वाचे होते.
पेट्रोल, डिझलचे आकाशाला भीडलेले दर, दिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललेली महागाई, त्यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला आलेले अपयश, दिल्लीत एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून पेटून उठलेला समाज, सीमेपलीकडील सैन्याने आपल्या हद्दीत येऊन आपल्या जवानाचे शीर कापून नेण्यासारख्या लज्जास्पद घटनेवरून जनसामान्यांमध्ये व्यक्त होऊ लागलेला क्षोभ, महाराष्ट्रातल्या सात हजार गावांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती... यावरून लोकांचे लक्ष हटविण्याची नामी शक्कल शिंदे अन् मलिकांनी शोधून काढली आहे. त्यातील एकाला भगव्या दहशतवादाचे स्मरण झाले आहे, तर दुसर्याच्या मनात पाकिस्तानातील तत्कालीन विरोधी पक्षनेत्याच्या तालिबानप्रेमाविरुद्ध अचानक संताप उफाळून आला आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना यातले काहीच कळत नाही असा या नेत्यांचा भ्रम आहे.
मौलाना फजल उल रहमान हे तालिबान्यांचे कट्टर समर्थक म्हणून भारतात आले नव्हते. ते पाकिस्तानातील तत्कालीन विरोधी पक्षनेते या नात्याने भारतात आले होते. सरकारी शिष्टाचार म्हणून त्यांचे स्वागत करायला अन् त्यांची गाठभेट घ्यायला मलिकांचा विरोध असेल तर मग महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसमवेत गुंडांचे फोटो यापूर्वी प्रकाशित झाले असल्याचे स्मरणही त्यांना कधीतरी व्हावेच. त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागणार्या पत्रांच्या फाईलींवर मंत्र्यांच्या स्वाक्षर्या महिनोन्महिने होत नाहीत आणि मग भ्रष्टाचाराचे शोधकार्य खोळंबून राहते, याचेही स्मरण त्यांना कधीतरी व्हावे. पूर्तीवर धाडी टाकायला अनाहूतपणे सरसावलेल्या आयकर विभागाकडे महाराष्ट्राच्या या मंत्र्यांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींच्या फाईलींवर धुळीचा थर साचतोय्. ती धूळ झटकण्याची गरज कधीतरी त्यांना जाणवावी.
समाज जरासा विसरभोळा आहे. त्याच्या विस्मरणाच्या सवयीचा लाभ राजकीय पक्षांना होत आल्याचे इतिहास सांगतो. हर्षद मेहता पासून तर कोळसा खाणक्षपर्यंतचे आणि आदर्शपासून तर सिंचनापर्यंतचे सारेच घोटाळे येणार्या काळात लोकांच्या विस्मृतीत जाणार आहेत. दिल्लीतला सामूहिक बलात्कारही असाच काळाच्या ओघात मागे पडेल. अन् सवलतीच्या दरातले सिलेंडर्स नऊपर्यंत मर्यादीत झाल्याची बाबही लोकांच्या सरावाची होईल. पण महत्त्वाच्या प्रश्नी लोकांची दिशाभूल करण्याचे राजकीय नेत्यांचे षडयंत्र मात्र कायम सुरू राहणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे आणि नवाब मलिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मलिकांनी तर गेल्या काही दिवसात लोकांना मूर्ख बनविण्याची ‘नवाबी’ तर्हेचे दर्शन जगाला वारंवार घडविले आहे.
No comments:
Post a Comment