अतिथी देवो भव!
राज साहेब, जय महाराष्ट्र! परवाचा तुमचा मराठी बाणा कमालीचा होता बघा. शेजारच्या पाकिस्तानबाबत तमाम भारतीय जनांच्या मनातला संताप तुम्ही व्यक्त केला तेव्हा अक्षरशः ऊर भरून आला. सूरक्षेत्रातल्या पाकड्यांच्या सहभागावरून तुम्ही दिलेला कलर्स दम मस्त होता. जाम आवडला आपल्याला. इशारा देतानाचा तुमचा तो आवेश काय वर्णावा? आशा भोसले सारख्या दिग्गज कलावंताला खडे बोल सुनावतानही जराही तमा न बाळगणारी तुमची ती तर्हा? आहाहा! दिल खूश हो गया अपना. (सॉरी! तुमच्या बाण्याचे भान ठेवून मराठीत बोलतो. मन कसं आनंदी झालं आपलं). मनात म्हटलं, नेता हवा तर असा. बड्या बड्यांना दम देणारा. क्षणात सुतासारखा सरळ करणारा. बास्स! आता बघा कशी सरळ येते ती बोनी कपूर आणि मंडळी, असं लोक बोलू लागले. सूरक्षेत्र प्रसारीत होणार नाही असं साहेब एकदा बोलले म्हटल्यावर त्यांचा शब्द अव्हेरून तो सुरू करण्याची कोणाची बिशाद आहे इथे? भारतीय जनमानसाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत कलेच्या नावावर धंदा करायला निघालेल्या कपूर कंपनीला तुम्ही दिलेली ललकारी भावली लोकांना. गेले ते आता कामातून. बुडाली त्यांची नौका अशा चर्चा चौकाचौकात, गल्लोगल्लीत, चहाच्या टपरीवर, पानाच्या दुकानांवर रंगू लागल्या. इशारा, तोही राज साहेबांनी दिलाय् म्हटल्यावर समोरच्याचा खेळ खल्लास! असं तुमचे सैनिक छातीठोकपणे सांगू लागले. भारतीयांच्या मनातल्या रसिकतेची, कलेबद्दलच्या त्यांच्या आसक्तिची लक्तरे वेशीवर टांगायला निघालेल्या निर्मात्यांना, लोकांच्या भावना पायदळी तुडवून त्यात सहभागी होणार्या आशा भोसले यांच्यासारख्या कलावंताला, केवळ पैशाच्या हव्यासापायी त्याचे प्रक्षेपण करणार्या कलर्स वाहिनीला खर्ड्या शब्दात सुनावण्याची तलवारीच्या पातीसारखी आपली तळपती आणि धारदार तर्हा कशी सर्वांना भावली होती. लोकांच्या मनातलं जाणणारा, त्या भावनांना आपल्या शब्द आणि कृतीतनं आकार देणारा हा नेता असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा तमाम मराठीजनांना आला होता. पण...एवढ्यात तुमच्या इशार्याचे सूरक्षेत्रात पानिपत झाल्याची बातमी येऊन धडकली. मन सुन्न झाले. मनात विचारांचे काहूर माजले. काय झालं असेल बरं आपल्या राज साहेबांना असं? का माघारी फिरले असतील ते आपल्या इशार्यावरून? ङङ्गकृष्णकुंज' मध्ये भेटायला आलेल्या बोनी कपूर आणि कलर्स वाहिनीच्या अधिकार्यांनी केलेल्या वार्तालापातून तुमचं मतपरिवर्तन झाल्याची बातमी सुरूवातीला खरीच वाटेना. छे! साहेब म्हणजे ठाम विचारांचं प्रतिक. साहेब म्हणजे करारी बाण्याचे ज्वलंत उदाहरण. साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. कुण्या बोनी कपूरची ते बदलण्याची बिशाद नाही आणि ताकदही नाही. पण तुमचे मतपरिवर्तन झाले हे ही खरंच होतं. पाकिस्तानी कलावंतांच्या सहभागातून तयार झालेल्या सूरक्षेत्र या गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या कलर्स वाहिनीवरील प्रक्षेपणाला कालपर्यंत आपण चालवलेला विरोध अचानक गळून पड ल्याची बातमीही खरी होती. परवा परवा पर्यंत काय सॉलीड विरोध चालला होता तुमचा. या कार्यक्रमातला सहभाग केवळ पैशासाठी असल्याबद्दल आशाताईंनाही चार शब्द सुनवायला तुम्ही कमी केले नाही. मी पण कलावंत आहे, असे ठसक्यात सांगत त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीत. हा कार्यक्रम प्रक्षेपित कराल तर याद राखा, कलर्स वाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड होईल, या तुमच्या धमक्या पोकळ नव्हत्याच. उलट अर्थपूर्ण होत्या. त्यातला अर्थ कळल्यामुळेच बोनी कपूर आणि कंपनीने लागलीच तुमची भेट घेतली. कार्र्यक्रमाचे प्रक्षेपण होऊ ा अशी गळ घातली गेली. आता आपली संस्कृतीच अतिथी देवो भव चा मंत्र सांगणारी. पाकिस्तानी कलावंतांबद्दल हा मंत्र मान्य नसला, तरी बोनी कपूर आणि मंडळीच्या स्वागताच्यावेळी मात्र तुम्ही आपल्या या संस्कृतीची जाणीव ठेवली. त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याशी झालेल्या गुजगोष्टीतून तुमचे वैचारिक परिवर्तन होत गेले आणि एका क्षणी या कार्यक्रमाला असलेला तुमचा विरोध पुरता मावळला. कमाल आहे त्या कपुरांच्या बोनीची. जे भल्या भल्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. नाही तर राज साहेबांचं मतपरिवर्तन घडवणं कुण्या येर्यागबाळ्याचं काम नोहे.
हे मतपरिवर्तन नेमकं कसं आणि कशामुळं घडलं हा आता आम्हा बापुड्यांच्या उत्सूकतेचा आणि चर्चेचा विषय आहे. आणखी काही दिवस राहिलही तो तसाच चर्चेचा आणि उत्सूकतेचा विषय. पण आम्हा सामान्य जनांचं तुम्ही नका फार मनावर घेऊ राज साहेब. आमच्या 'नातला संताप लोकल मधल्या गर्दीत धे खाण्यात आणि चौकतल्या पानटपरीवर चकाट्या पिटण्यात केव्हा विरतो ते आम्हालाही कळत नाही. तुमच्या या मतपरिवर्तनाचाही विसर पडेलच लवकरच आम्हाला...
तर सांगायचा मुद्दा असा की, कलर्स वाहिनीवरच्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाविरुद्धचा तुमचा कालपर्यंतचा तो करारी बाणा बोनी कपुरांसोबतच्या चर्चेनंतर गर्भगळीत झाल्याची बातमी अचानक कानावर पडली. असं कसं झालं असेल असा प्रश्न मनाला सतावू लागला. राजकारणात काहीही घडू शकते याची कल्पना असली तरी आमच्या मनातली तुमची प्रतिमा जराशी वेगळीच. या प्रकरणात तुम्ही तुमचा शब्द फिरवल्याची बाब काही केल्या खरी वाटेना. पण, तुम्ही परवानगी दिलीय् असं सांगत कपुरांचा बोनी हसत खेळत, दिमाखानं कृष्णकुंजतून बाहेर पडताना बघितला आणि मनाला सावरलं. भावना आवरत्या घेतल्या अन् वस्तुस्थिती स्वीकारली. पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम तयार करताना निर्मात्याने केलेल्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणुकीचे नुकसान होऊ नये अशा उदात्त हेतूने आपण त्यांची विनंती स्वीकारली आणि कार्यक्रम प्रक्षेपित करायला परवानगी बहाल केलीत. पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम तयार केल्याबद्दल त्यांनी तुमच्या निवासस्थानी सार्या देशाची माफी मागितली म्हणे. तुम्ही ठरलात विशाल हृदयी. लागलीच माफीनामा देऊन रवाना केलेत त्यांना. खरं सांगतो राज साहेब, सार्या देशाची माफी मागण्याचे एक नवीन ठिकाण या निमित्ताने तमाम भारतवासियांना कळले. शिवाय त्यांनी तुमच्या घरी येऊन सार्या देशाची माफी मागितली म्हणजे नेमके काय केले? निर्मात्याच्या आर्थिक नुकसानीचा विचार तुम्हाला आधी सूचला नाही का, निर्मात्याने माफी मागितली म्हणून पाकिस्तानी कलावंतांच्या सहभागाचा मुद्दा कुठे संपला, आणि परवानगी ायचीच होती तर मग आधी कशाला धमक्या दिल्या, असे काही बोचरे सवाल आता काही नतद्रष्टे लोक विचारतील. सार्या देशाच्या वतीने त्यांना माफ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असे विचारायलाही हे नतद्रष्टे लोक कमी करणार नाहीत. पण राज साहेब, तुम्ही नका मनावर घेऊ त्यांचं. (अर्थात, तुम्ही मनावर घेतलं असतं तर सूरक्षेत्रच्या प्रक्षेपणाला परवानगी मिळालीच नसती, हा भाग वेगळा.) यापुढे पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम कराल तर याद राखा हा तुमचा नवीन इशारा पुढील कित्येक दिवस उत्साहात लोळवत ठेवणार आहे आम्हाला. भविष्यात पुन्हा संधी मिळताचपाकिस्तानविरुद्ध बोलणार आहातच तुम्ही. इशारे तर काय आपल्याकडे ढिगभर पडले आहेत. त्याचाही काळानुरूप वापर होईलच कधी ना कधी. आम्ही बापुडे अजूनही तुमच्या तडफदार, आवेशपूर्ण शैलीतल्या नवीन इशार्याच्या प्रतिक्षेत आहोत. यंदाच्या इशार्याचे सूरक्षेत्रात पानिपत झाल्याची वस्तुस्थिती विसरून....
सुनील कुहीकर
मुंबई.
९८८१७१७८३३
No comments:
Post a Comment