Saturday, December 7, 2019

हैदराबाद चकमकीच्या आनंदाचा अन्वयार्थ!

disha_1  H x W:

 दिल्ली काय, उन्नाव काय, कठुआ काय नि हैदराबाद काय? इथली न्यायव्यवस्था पीडितांना न्याय मिळवून देते, असा दावा करण्याजोगी परिस्थिती आहे कुठे? हैदराबादमध्ये बलात्काराचे आरोपी पोलिसांकरवी मारले गेल्याचा जनमानसातला आनंद या परिस्थितीच्या पेकाटात लाथ मारणारा नाही, असे कसे म्हणता येईल? त्या आनंदापुढे एन्काऊंटरच्या खर्‍या-खोट्याचा प्रश्न दुय्यम ठरविण्याचा लोकमानस नेमके काय दर्शवितो? लोकांना झालेला हर्ष एकूणच व्यवस्थेच्या, न्यायप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. समाजातील काही अध्वर्यूंचा अपवाद वगळता, कुणालाच त्यात वावगे वाटू नये, उलट बहुतांश लोकांना शिक्षेची ‘हीच’ रीत योग्य वाटावी, याचा अन्वयार्थ व्यवस्था चालविणार्‍या धुरीणांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांत या गुन्ह्यासाठी शिक्षा देणारे कठोर कायदे अस्तित्वात आहेत. इराण, सौदी अरेबिया आदी देशांत जाहीर मृत्युदंड दिला जातो. अफगाणिस्तानसारख्या देशात, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या हातून गुन्हेगाराला सरेआम मृत्युदंड दिला जातो. एकदा असल्या एखाद्या उपायाबाबत विचार करता येईल आपल्याला? अर्थात, केवळ व्यवस्थेच्या माथी खापर फोडूनही भागणार नाही. बलात्कार करण्याची िंहमत होऊ नये यासाठीच्या कठोर कायद्यांसोबतच, ‘सातच्या आत घरात’ हा नियम स्त्रियांसाठी अंमलात आणताना, तिच्याकडे उपभोगवादाच्या परिघाबाहेर बघण्याचे पुरुषांवरील संस्कारही तितकेच महत्त्वाचे ठरतात...


गेला पंधरवडाभर गाजलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांकरवी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली अन्‌ या लोकशाहीप्रधान देशातील कथित शहाणे अन्‌ वास्तवात जगणार्‍यांच्या विचारशैलीतील दरी कधी नव्हे एवढी उघड झाली. चार आरोपी आणि पोलिसांदरम्यान घडलेली फिल्मी स्टाईलची चकमक खरी असेल, याबाबत शंका मनात असूनही त्या नराधमांना झालेली हीच शिक्षा योग्य असल्याची भावना एकीकडे, पिसाळलेल्या कुत्र्यांना असेच संपवायचे असते असे मानणारा वर्ग एकीकडे, तर झालं ते योग्य नव्हतं, कायद्याला धरून नव्हतं अशी भूमिका मांडणारा वर्ग दुसरीकडे, अशी ही दरी आहे.
 शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ या चार जणांनी एका डॉक्टर युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा जीव घेतला आणि त्याहून कहर म्हणजे नंतर तिला जाळूनही टाकले. महत्प्रयासाने ते पोलिसांच्या तावडीत सापडले. एरवी आपला समाज अचेत असतो. त्याला कशाशीच काही घेणे-देणे नसते. त्याला पोलिसांचा ससेमिरा नको असतो, कोर्टाची पायरी चढायची नसते, कुठल्या प्रकरणात साक्षीदार व्हायचे नसते, कायद्याचा कचाटा नको असतो. त्याला राजकारणाच्या फंदातही पडायचे नसते अन्‌ अन्यायाच्या कुठल्या मुद्यावर संघर्षही करायचा नसतो. अरे, तो तर महागाईनं पिचला, सरकारी यंत्रणेनं तुडवला तरी चकार शब्द काढत नाही कधी! अन्याय सहन करीत मुकाट्याने जगतो. अलीकडे मात्र तो व्यक्त होऊ लागलाय्‌. समाजमाध्यमातून उमटणारी त्याची प्रतिक्रिया तर अगदीच बोलकी असते! एखादी 26/11ची घटना, एखादे निर्भया प्रकरण घडले की मात्र तो जथ्याने एकत्र येतो. निषेध व्यक्त करतो. मेणबत्त्या पेटवून संताप व्यक्त करतो. आता हैदराबाद बलात्कार प्रकरणातही तो याच पद्धतीने अभिव्यक्त होऊ लागला होता. घटनेविरुद्धचा त्याचा संताप, रस्त्यांवरच्या मोर्चांतून व्यक्त होऊ लागला होता. बलात्कार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना मांडू लागला होता. अशात चारही आरोपी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेल्याच्या वार्तेने अचानक चर्चेला पेव फुटले. कुठे कायद्याची बूज राखण्याच्या गरजेचे प्रतिपादन, तर कुठे, झालं तेच योग्य झाल्याचं स्पष्टीकरण.
 
 भारतीय समाजाचं जाऊ द्या. फार विसरभोळा आहे तो. तो व्यक्तिपूजकही आहे. आणिबाणी लादणार्‍या नेत्यांना पराभूत करण्याइतका तो कठोरही आहे अन्‌ चार-दोन वर्षांतच त्यांना माफ करण्याइतका तो दिलदारही आहे. 2012 मध्ये घडून आलेल्या दिल्लीतील निर्भया प्रकरणात तो बराच चवताळून उठला होता. दस्तुरखुद्द पंतप्रधानांना दखल घ्यावी लागावी, असा रुद्रवातार त्याने धारण केला होता. पण, नंतरच्या सात वर्षांत निर्भया प्रकरणातील एकाही आरोपीला शिक्षा होऊ शकलेली नसल्याबद्दल कुठे उमटली नाही त्याची संतप्त प्रतिक्रिया! उलट, त्या प्रकरणाचा जणू विसर पडल्यागत वागणे चालले आहे समाजाचे. त्यात हैदराबाद प्रकरणाची भर पडली आणि लोकांच्या संतापाला मोकळी वाट मिळाली. सात वर्षांपूर्वीच्या निर्भया प्रकरणाला यानिमित्ताने नव्याने उजाळा मिळाला, एवढेच काय ते फलित.
 
 भारतीय समाज भावनेच्या लाटेत वाहून जाणारा आहे. एखाद्या नेत्याचा मृत्यू, निवडणुकीतील मतदानाचा त्याचा कल बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. भारावलेल्या अवस्थेत तो, पोलिसांनी चार आरोपींना ठार मारण्याच्या घटनेचे समर्थनही करू शकतो. या दोन्ही प्रकरणातील सारासार विचार करण्याची, योग्यायोग्यतेचे निकष निश्चित करण्याची त्याची मती कुंठित होते. कारण, मुळातच सारा बाजार भावनेचा मांडलेला असतो. हैदराबाद प्रकरणात आरोपी िंहमत बांधून, पोलिसांची शस्त्रे हिसकावून पळून जाण्याच्या बेतात होते, म्हणून त्यांचा पाठलाग करताना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यात ते मारले गेलेत, ही कहाणी खरी का खोटी, यापेक्षाही युवतीवर बलात्कार करणार्‍या आरोपींना शिक्षा झाली आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना अधिक प्रभावी ठरली. त्याचा आनंद साजरा करणारा समाज काल लोकांनी अनुभवला. अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह कित्येकांनी या संदर्भात नाराजीही जाहीर केलीय्‌. झाला प्रकार न्यायोचित नाही. पोलिस अशाप्रकारे त्यांच्या पातळीवर ‘न्याय’ करू लागले, तर सारीच व्यवस्था कोलमडून पडेल, हे या विशिष्ट प्रकरणात योग्य वाटत असले तरी इतर वेळी त्याचे समर्थन कोण, कसे करू शकणार? आणि अशा अनिर्बंध वागण्याने विस्कळीत झालेली परिस्थिती सावरणे किती जिकिरीचे होऊन बसेल, हे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षिण्याजोगे नाहीतच. त्यांच्या संयत प्रतिपादनाचे स्वतंत्र महत्त्व आहेच. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले ते नक्की या प्रकरणातील आरोपी होते का, इथपासून तर पहाटे अंधारात भर जंगलात ही चकमक कशी काय घडू शकली इथपर्यंतचे अनेकानेक सवाल अद्याप अनुत्तरीत आहेत. पण तरीही, सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त झालेला, या आरोपींच्या मृत्यूचा आनंद बोलका आहे.
 
 ही चकमक खरी की खोटी, योग्य की अयोग्य, हा भाग अलहिदा, पण आपल्या येथील न्यायव्यवस्थेवरील अविश्वास त्यातून ध्वनित होतो, तो वेगळाच. आणि का होऊ नये? ज्या तर्‍हेने आपली न्यायप्रणाली काम करते, ज्या पद्धतीने तिथे कायद्याची थट्‌टा उडविली जाते, ते बघता न्याय मिळण्याची, तो वेळेत मिळण्याची तर अपेक्षाही राहिलेलीच नाही आताशा कुणाला. सात वर्षे झालीत दिल्लीतील निर्भया प्रकरणाला. अजून आरोपींना शिक्षा झालेली नाही. निर्भयावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकली की, आजही काटा उभा राहतो अंगावर. संताप अनावर होतो. आरोपी ताब्यात आहेत, त्यांनी गुन्हा केला हे स्पष्ट झाले, तरीही त्यांना फासावर लटकवायला लागणारा उशीर अनाकलनीय आहे. खरंतर, निर्भया प्रकरणापर्यंत बलात्काराची प्रकरणं फार गांभीर्यानं घेण्याची रीत नव्हती इथे. एकतर, जिच्यावर अन्याय झाला तिलाच गुन्हेगारासारखी वागणूक देण्याची तर्‍हा. तिलाच गुन्हेगार ठरवून वाळीत टाकण्याची अफलातून पद्धत अंमलात आणत राहिलाय्‌ हा समाज असल्या प्रकरणात. त्यामुळे प्रत्यक्षात घडणार्‍या गुन्ह्यांपेक्षाही पोलिसांकडे दाखल होणार्‍या तक्ररींची संख्या तशीही कमी. त्यातही न्याय मिळण्याची शक्यता, गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण त्याहून कमी. आजही पंच्याहत्तर टक्के गुन्हेगारांना विविध कारणांमुळे शिक्षा होतच नाही. निर्भया प्रकरणानंतर द्रुतगती न्यायालये स्थापन झालीत, कठोरातील कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात झाली, तरीही परिस्थितीत जराही बदल घडून आलेला नाही. हा, पीडितांनी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचे, तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण जरूर वाढले. बलात्काराच्या निदान चाळीस टक्के प्रकरणात कोवळ्या वयाच्या मुला-मुलींवर अत्याचार होत असल्याची बाबही यातून स्पष्ट झाली. आजतारखेला बलात्काराची सुमारे दीड लाखांहून अधिक प्रकरणे न्यायालयात सुनावणीच्या प्रक्रियेत अन्‌ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, निर्भयाप्रकरणासह...
 
 दिल्ली काय, उन्नाव काय, कठुआ काय नि हैदराबाद काय? इथली न्यायव्यवस्था पीडितांना न्याय मिळवून देते, असा दावा करण्याजोगी परिस्थिती आहे कुठे? हैदराबादमध्ये बलात्काराचे आरोपी पोलिसांकरवी मारले गेल्याचा जनमानसातला आनंद या परिस्थितीच्या पेकाटात लाथ मारणारा नाही, असे कसे म्हणता येईल? त्या आनंदापुढे एन्काऊंटरच्या खर्‍या-खोट्याचा प्रश्न दुय्यम ठरविण्याचा लोकमानस नेमके काय दर्शवितो? लोकांना झालेला हर्ष एकूणच व्यवस्थेच्या, न्यायप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. समाजातील काही अध्वर्यूंचा अपवाद वगळता, कुणालाच त्यात वावगे वाटू नये, उलट बहुतांश लोकांना शिक्षेची ‘हीच’ रीत योग्य वाटावी, याचा अन्वयार्थ व्यवस्था चालविणार्‍या धुरीणांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांत या गुन्ह्यासाठी शिक्षा देणारे कठोर कायदे अस्तित्वात आहेत. इराण, सौदी अरेबिया आदी देशांत जाहीर मृत्युदंड दिला जातो. अफगाणिस्तानसारख्या देशात, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या हातून गुन्हेगाराला सरेआम मृत्युदंड दिला जातो. एकदा असल्या एखाद्या उपायाबाबत विचार करता येईल आपल्याला? अर्थात, केवळ व्यवस्थेच्या माथी खापर फोडूनही भागणार नाही. बलात्कार करण्याची िंहमत होऊ नये यासाठीच्या कठोर कायद्यांसोबतच, ‘सातच्या आत घरात’ हा नियम स्त्रियांसाठी अंमलात आणताना, तिच्याकडे उपभोगवादाच्या परिघाबाहेर बघण्याचे पुरुषांवरील संस्कारही तितकेच महत्त्वाचे ठरतात...

Friday, October 25, 2019

नेमकं काय, कुठे चुकलं?



संख्याबळाचे गणित जुळवताना काही तडजोडी निश्चितपणे कराव्या लागतात. एका मर्यादेत केलेल्या तडजोडींना कुणाचीच ना नसते. प्रश्न मर्यादाभंग झालाकीच उपस्थित होत असतो. यंदा पराभव वाट्याला आलेल्या दिग्गजांनी, याबाबतीत एकदा स्वत:ला यासंदर्भातील प्रश्न विचारून बघावेत. पदरी पडलेल्या पदांमुळे डोक्यात हवा तर शिरली नव्हती ना आपल्या, हा प्रश्न तर एकदा विचारावाच प्रत्येकाने स्वत:ला. कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीपासून तर मतदारसंघात केलेल्या कामांपर्यंत, जनसंपर्कापासून तर लोकांना वागवण्याच्या स्वत:च्या तर्‍हेपर्यंत, सार्‍याच बाबी एकदा तपासून घेण्याची गरज या निकालांनी निर्माण केली आहे. ‘पेड वर्कर्स’ची टूम निघाली आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष अन्‌ सामाजिक संघटनांमध्ये. केलेल्या कामांचा मोबदला महिन्याच्या शेवटी मोजून घेणारे ‘वर्कर्स’ ही काळाची गरज असेलही कदाचित! इतरांच्या तुलनेत त्यांना चार गोष्टी जास्त कळत असतील. कार्पोरेट कल्चरमध्ये रुळलेली ही माणसं, काही बाबी अधिक शिताफीनं अन्‌ सफाईदारपणे करू शकत असतीलही कदाचित! पण म्हणून, कधीकाळी कच्चा चिवडा खाऊन, प्रसंगी उपाशी राहून खास्ता खात ज्यांनी पक्ष बांधला, त्या ‘कार्यकर्त्यां’च्या तळमळीची सर या ‘वर्कर्स’च्या व्यवहारी वागण्याला कशी येईल सांगा? त्यामुळे या दोहोतला भेद जाणला पाहिजे सर्वांनीच. पक्ष, यातील नेमका कुणाच्या भरवशावर उभा राहात असतो, याचे उत्तर त्यातूनच गवसणार आहे शेवटी.



नेमकं काय आणि कुठे चुकलं, याचा विचार आता करावाच लागेल. विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. आता लागलेल्या निकालांचे वस्तुस्थितिदर्शक विश्लेषण, ही सर्वच पक्षांची, जय-पराजय पदरी पडलेल्या सर्व उमेदवारांची जबाबदारी ठरेल. निवडणूक लढविण्याच्या पद्धती आताशा हायटेक झाल्या आहेत, समाजमाध्यमांच्या अत्याधुनिक अस्त्रांंचा वापर कुशलतेनं करता येणं, हीदेखील आता अपरिहार्यता ठरते आहे. प्रचाराच्या तर्‍हाही एव्हाना कात टाकून नव्या स्वरूपात उभ्या ठाकल्या आहेत. पण, तरीही लोकांच्या मनाला भिडणार्‍या जनसंपर्काला, त्यांच्याशी जपल्या गेलेल्या भावनिक नात्यांना आजही पर्याय नाही, हेदेखील नाकारता येणार नाही असे वास्तव आहे. एखादी लाट, विरोधकांना परास्त करू शकतील असे मुद्दे कामी येतातच निवडणुकीत. पण, म्हणून स्वत:ची कुठलीच कर्तबगारी लागत नाही, विधानसभेत उपस्थित राहिलं काय नि न राहिलं काय, तिथे लोकांचे प्रश्न उपस्थित केले काय नि न केले काय, काही फरक पडत नाही, असा समज बाळगून बसलेल्यांना यंदा लोकांनी धडा शिकवला आहे. एकूण, मतपेट्यांच्या माध्यमातून लोकांनी सोपवलेली जबाबदारी ज्याने इमानेइतबारे पार पाडली, त्याला यश दाराशी खेचून आणणे फार जिकिरीचे ठरत नाही. अन्यथा, फक्त गुर्मीत निवडणुकी लढवणार्‍यांचा ‘उदयन राजे’ होतोे, एवढाच या निकालांचा अन्वयार्थ! कॉंग्रेसपासून तर राष्ट्रवादीपर्यंतच्या बहुतांश पक्षातील नेत्यांना यंदा भाजपाशी घरठाव करावासा वाटला. या पक्षानेही येणार्‍या सर्वांकरिता दारे सताड उघडी केली. कालपर्यंत आपल्याला शिवीगाळ करणारा, भाजपाचे संघटनकार्य रोखून धरण्यासाठी पुढाकार घेणारा नेता, डोक्यावर घेऊन मिरवण्याची वेळ तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर आली की मग लोक त्यांच्या भावना, संधी मिळाली की अशा मतपेट्यांमधून व्यक्त करतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले.
 2014 ची निवडणूक वेगळ्या पार्श्वभूमीवर लढली गेली होती. तेव्हा बर्‍याच प्रमाणात ‘मोदी लाट’ होती. भाजपाच काय, सेनेचेही बरेच लोक त्या लाटेत तरले होते तेव्हा. शिवाय, तत्कालीन सरकारच्या भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारालाही लोक कंटाळले होते. त्याचेही उत्तर लोकांनी मतपेट्यांमधून दिले. यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र काहीसे वेगळे होते. पंतप्रधानांबद्दलचा दांडगा विश्वास लोकांच्या मनात होताच, पण ज्यात कुणीही तरून जाईल अशी ‘लाट’ मात्र नव्हती कुठे. परिणामी, राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडत पुढे जायचे होते. सुरुवातीच्या काळातले अल्पमतातले सरकार, नंतर पािंठबा देताना आणि पािंठबा दिल्यावरही शिवसेनेने मांडलेला छळ, राजीनामे खिशात ठेवून फिरण्याची त्यांची मुजोर भाषा, दुष्काळाचे अस्मानी संकट या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून नेमके तेच केले. प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. दुसरीकडे, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पराभव स्वीकारावा लागणार याची पूर्ण मानसिक तयारी केली होती. जनमत चाचण्यांच्या बहुतांश अंदाजांनी, सत्तेत कोण येणार, हा प्रश्न निकाली काढला होता. संख्याबळाचा तेवढा प्रश्न शिल्लक होता. पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याने, याही परिस्थितीत हाती लागण्यासारखे काय आहे, याचा शोध घेत व्यूहरचना आखली. जर दोनशे जागा सत्ताधार्‍यांच्या वाट्याला गेल्यात, तर निदान विरोधी पक्षनेतेपद तरी आपल्या वाट्याला यावं, यासाठी आवश्यक असलेल्या 50 जागांवरील विजयाची खात्री त्यांनी निश्चित केली. त्या दृष्टीने ‘फोकस’ निश्चित केला. प्रचारार्थ राज्यभर फिरले, तरीही त्यांचे सारे लक्ष, लक्ष्य असलेल्या त्या निवडक जागांवर होते. हाती आलेल्या निकालांवर नजर टाकली, तर पवार त्यांच्या रणनीतीत यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरेंनी निदान मजबूत विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याचे नुसते आवाहन केले. पवारांनी त्या दृष्टीने प्रत्यक्षात प्रयत्न केलेत. त्या तुलनेत कॉंग्रेस मात्र पहिल्या दिवसापासूनच शस्त्र खाली ठेवून लढाई लढायला निघाली असल्याचे चित्र होते. म्हणूनच हताश मनाच्या कॉंग्रेसला मिळालेले यशही अधोरेखित करण्याजोगे आहे. कायम भूमिका बदलत राजकारण करणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेला अन्‌ समाजातील विशिष्ट समूहातील एकगठ्‌ठा मतं ही आपलीच मक्तेदारी असल्याच्या गुर्मीत कुणाच्याही खुंट्याला ती बांधण्याचा खेळ खेळणार्‍या वंचित बहुजन आघाडीला यंदा जनतेनेच धडा शिकवला आहे, हेही खरंच.
 उमेदवाराच्या विजयात महत्त्वाची भूमिका कोण बजावत असतो? तांत्रिकदृष्ट्या, ‘मतदार’ हे या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. पण, वस्तुत: कार्यकर्ता त्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत असतो. यंदाच्या निवडणुकीच्या निकालांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नेता कुठल्याही पक्षाचा असो, ज्याने मतदारसंघात संपर्क ठेवला नाही, कार्यकर्ता जोपासला नाही... अपवाद वगळता, त्या सर्वांच्या वाट्याला पराभव आला आहे. पक्षाने लादलेला बाहेरचा उमेदवार नाकारण्याचा मुद्दा असो वा स्वपक्षीय नेत्याने केलेली उपेक्षा असो, कार्यकर्त्याच्या भूमिकेत जगणार्‍यांनीही त्यांच्या परीनं, त्यांच्या पद्धतीनं सर्वांना ‘जागा’ दाखवली असल्याने, त्याला गृहीत धराल तर याद राखा, असा इशारा दिल्याचे स्पष्ट होते. भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीपासून तर वंचित बहुजन आघाडीपर्यंत... कुणीही याला अपवाद नाही. विनासायास ‘गृहप्रवेश’ झालेल्या आयारामांना परत पाठवण्यापासून तर पक्षातील बंडखोरांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यापर्यंत, सर्वदूर तोच गर्भित इशारा आहे!
निवडणुकीत विजयाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. बहुमताला डोकी मोजून मांडलेल्या आकड्यांच्या गणितापलीकडे दुसरा कुठलाही निकष नसतो. त्या परिस्थितीत संख्याबळाचे गणित जुळवताना काही तडजोडी निश्चितपणे कराव्या लागतात. एका मर्यादेत केलेल्या तडजोडींना कुणाचीच ना नसते. प्रश्न मर्यादाभंग झालाकीच उपस्थित होत असतो. यंदा पराभव वाट्याला आलेल्या दिग्गजांनी, याबाबतीत एकदा स्वत:ला यासंदर्भातील प्रश्न विचारून बघावेत. पदरी पडलेल्या पदांमुळे डोक्यात हवा तर शिरली नव्हती ना आपल्या, हा प्रश्न तर एकदा विचारावाच प्रत्येकाने स्वत:ला. कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीपासून तर मतदारसंघात केलेल्या कामांपर्यंत, जनसंपर्कापासून तर लोकांना वागवण्याच्या स्वत:च्या तर्‍हेपर्यंत, सार्‍याच बाबी एकदा तपासून घेण्याची गरज या निकालांनी निर्माण केली आहे. ‘पेड वर्कर्स’ची टूम निघाली आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष अन्‌ सामाजिक संघटनांमध्ये. केलेल्या कामांचा मोबदला महिन्याच्या शेवटी मोजून घेणारे ‘वर्कर्स’ ही काळाची गरज असेलही कदाचित! इतरांच्या तुलनेत त्यांना चार गोष्टी जास्त कळत असतील. कार्पोरेट कल्चरमध्ये रुळलेली ही माणसं, काही बाबी अधिक शिताफीनं अन्‌ सफाईदारपणे करू शकत असतीलही कदाचित! पण म्हणून, कधीकाळी कच्चा चिवडा खाऊन, प्रसंगी उपाशी राहून खास्ता खात ज्यांनी पक्ष बांधला, त्या ‘कार्यकर्त्यां’च्या तळमळीची सर या ‘वर्कर्स’च्या व्यवहारी वागण्याला कशी येईल सांगा? त्यामुळे या दोहोतला भेद जाणला पाहिजे सर्वांनीच. पक्ष, यातील नेमका कुणाच्या भरवशावर उभा राहात असतो, याचे उत्तर त्यातूनच गवसणार आहे शेवटी.
खरंतर, कॉंग्रेस-राष्ट्रवादीद्वारे मोठं करून सांगितलं जातंय्‌ तेवढं यश शरद पवारांनी खेचून आणलेलं नाही. पाऽर पराभवाच्या गर्तेत हे दोन्ही पक्ष सापडले नाहीत, एवढीच काय ती पवारांची किमया. मनसेपासून तर वंचितपर्यंत, सर्वांचेच ‘तारे जमींपर’ आले आहेत. त्या तुलनेत, तसं म्हटलं तर सत्ता हातून गेलेली नाही युतीच्या. देदीप्यमान म्हणता येईल असे नसले, तरी बहुमत मिळवण्याचे युतीचे यश तर दखल घेण्याजोगे आहे. पण, तरीही गेल्यावेळचे आकडे गाठता न आल्याने दोन्ही पक्षांसाठी हा विजयही ‘साजरा करण्याजोगा’ राहिलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांनी, त्याच्या नेत्यांनी बोध घ्यावा असे निकाल, जनमताच्या कौलातून समोर आले आहेत. सत्ता कुणाला द्यायची, हेही निश्चितपणे स्पष्ट केलं आहे आणि तसं करताना, ती किती मर्यादेत द्यायची, याबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे. हेच विरोधकांच्या बाबतीतही घडले आहे. राज ठाकरेंनी मोदींवर केलेले बेछूट आरोप ऐकताना, त्यांच्या हिमतीला टाळ्या पिटून दाद देणारी जनता, त्यांना मतांची मात्र भीकही घालत नाही, हे लक्षण मतदारांच्या सुजाणतेचे आहे. आता, आपलं नेमकं काय अन्‌ कुठे चुकलं, हे राजकीय पक्षांनी शोधायचं आहे...

Thursday, September 12, 2019

या रे या, सारे या...!


एक काळ होता, भाजपाचे लोकसभेतले संख्याबळ केवळ दोन होते. भविष्यात कधी आपण ‘त्या’ बाजूने बसू, असा विचारही तत्कालीन नेत्यांच्या मनात भीत भीतच येत असावा. हीच स्थिती कम्युनिस्टांची. बोटावर मोजण्याइतकी संख्या असायची त्यांचीही संसदेतली. इंदिरा हत्येनंतर तर सारे विरोधक एका मुठीत मावावेत एवढेच उरले होते. पण, म्हणून लढण्याची ऊर्मी संपली नाही कुणाचीच. हे विचारांसाठी, तत्त्वांसाठी लढणं वगैरे फालतू असल्याचे वाटले नाही त्यांच्यापैकी कुणालाच कधी. की, यापेक्षा काँग्रेस पक्षात प्रवेश करून सत्ता उपभोगण्याचा विचारही शिवला नाही कधी कुणाच्या मनाला. उलट, वाट्याला आलेला संघर्ष हेच प्राक्तन असल्याचे समजून, हाती असेल ते गोड मानून सत्ताधार्‍यांशी झगडत राहिलेत तत्कालीन नेते. लोकांनी खिल्ली उडवली तरी विचार सोडला नाही. पराभव समोर दिसत आहे म्हणून लढणं सोडलं नाही त्यांनी कधीच. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज उद्भवली आहे. इथे विरोधी पक्ष म्हणून कुणालाच काम करायचे नाहीय्‌. सर्वांना येनकेनप्रकारेण सत्तेत भागीदार व्हायचे आहे. सत्ता उपभोगायची आहे.


या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन्‌ आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले नव्हतेच तुम्ही कधी. त्यामुळे, कालपर्यंत ज्याला शिवीगाळ केली, ज्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली, ज्यांचं नाव निघालं तरी नाकं मुरडलीत, ज्यांच्यावर कायम जातीयवादाचा शिक्का मारला, त्यांच्या पक्षात प्रवेश करा. शेवटी काय, सत्ता महत्त्वाची! पक्ष अन्‌ विचारधारेचं काय, अंगावरची वस्त्रं बदलण्याइतकं सोपं झालंय्‌ आताशा या व्यवहारी जगात विचारधारा बदलणं. 

शिवाय त्याचे ओझे वाहायला सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत की, सर्वदूर! भल्या मोठ्या संख्येत. त्यांना भारी आकर्षण असतं बरं, त्या विचारांचं! वृथा अभिमानही असतो त्यांना, ते चालत असलेल्या कंटकाकीर्ण मार्गाचा. त्यांनी अनुसरलेल्या विचारांचा, नीती, तत्त्वांचा. त्यासाठी करावयाच्या त्याग, बलिदान, साधनेचा. पण, राजकारणात प्यादी केवळ लढण्या अन्‌ मरण्याच्या कामाची असतात. नेत्यांचं मात्र तसं नसतं. त्यांना पदं भूषवायची असतात. राज्यकारभाराचा शकट हाकायचा असतो. त्यासाठी सत्ता आवश्यक असते. काँग्रेस-राष्ट्रवादीतली कितीतरी माणसं एव्हाना तरबेज झाली आहेत या कामात. काही नावं बघाना! सत्ता कुणाची, तिथली माणसं कोणती, कुठल्या विचारांशी त्यांची बांधिलकी आहे, वगैरे सारे प्रश्न केराच्या टोपलीत टाकून त्यांनी आजवर आपल्या राजकारणाचा डोलारा सांभाळला. दिल्ली-मुंबईत हुजरेगिरी केली अन्‌ मंत्रिपदं मिळवलीत. त्यांना आता नव्याने सत्तेची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे, कालपर्यंत अंगावर पांघरलेली झूल झुगारून त्यांचा राजकीय प्रवास नव्या दिशेने सुरू झाला आहे.
 
 
वेगवेगळ्या घोटाळ्‌यांचे साक्षीदार सोबतीला घेऊन राबवलेल्या सत्तेचा दुष्परिणाम काँग्रेसने निवडणुकीतील पराजयाच्या रूपात पाच वर्षांपूर्वी भोगला. प्रचंड भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज, अशी विविधांगी कारणंही त्याला साह्यभूत ठरली. लोकांनी राज्यकारभाराची जबाबदारी सोपवत भाजपा व मित्रपक्षांवर विश्वास व्यक्त केला. प्रचंड मेहनत, सुयोग्य नियोजन, स्वच्छ कारभार, पारदर्शी शासन, विकासाचा ध्यास, हे राष्ट्र वैभवसंपन्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍यांनी तो विश्वास सार्थ ठरवत घोडदौड आरंभली. त्याचा परिणाम हा की, जनतेनेही पुन्हा एकदा सत्ता अन्‌ विश्वासाची दुरुक्ती केली. परिणामस्वरूप, सत्तेतली माणसं अधिक वेगाने, झापटल्यागत कामं करू लागली. त्याचे परिणाम स्थानिक, राष्ट्रीयच काय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसू लागले. अर्थक्षेत्रापासून तर अंतराळक्षेत्रापर्यंत त्या ध्येयवेडेपणाची छाप उमटली.
 
 
सार्‍या देशात सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले. जनमानसातला सरकारबद्दलचा विश्वास दुणावला. आता, पुढची काही वर्षे सत्तेची धुरा सांभाळणारे खांदे बदलणार नाहीत, हे दिवसागणिक स्पष्ट होऊ लागले. तशी खात्री पटू लागली तसतशी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अस्वस्थता वाढू लागली. सत्तेविण कासावीस झालेली माणसं सैरभैर झाली. वाट मिळेल तशी सुसाट पळू लागली. कालपर्यंत विरोधकांना कमजोर म्हणून हिणवणार्‍या बड्याबड्या नेत्यांवर, स्वत:च्या ताकदीवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांकडे हतबलपणे बघण्याची वेळ आली. कधीकाळी विरोधकांच्या अल्पशा संख्येवरून त्यांची खिल्ली उडवणार्‍यांना आज आपापले तंबू शाबूत ठेवणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. मुळात, ते विचारांसाठी जगलेच नव्हते कधी. नीतिमत्तेची चाड, हा तर त्यांच्यासाठी हसण्यावारी नेण्याचा विषय होता. जे नेत्यातच नाही, ते कार्यकर्त्यात कसे येणार? तेही आता कशाचीही पत्रास न बाळगता, सुसाट सुटले आहेत. ज्या पवारांनी स्वत:च काँग्रेस पक्षाची शकले करत स्वत:चा वेगळा राजकीय घरठाव मांडला, ते आता आपल्या सहकार्‍यांना कसे रोखणार? सत्तेची गणितं मांडण्यातच हयात खर्ची घातलेल्या काँग्रेसजनांना तरी स्वत:ची पडझड कशी रोखता येणार आहे?
 
 
एक काळ होता, भाजपाचे लोकसभेतले संख्याबळ केवळ दोन होते. भविष्यात कधी आपण ‘त्या’ बाजूने बसू, असा विचारही तत्कालीन नेत्यांच्या मनात भीत भीतच येत असावा. हीच स्थिती कम्युनिस्टांची. बोटावर मोजण्याइतकी संख्या असायची त्यांचीही संसदेतली. इंदिरा हत्येनंतर तर सारे विरोधक एका मुठीत मावावेत एवढेच उरले होते. पण, म्हणून लढण्याची ऊर्मी संपली नाही कुणाचीच. हे विचारांसाठी, तत्त्वांसाठी लढणं वगैरे फालतू असल्याचे वाटले नाही त्यांच्यापैकी कुणालाच कधी. की, यापेक्षा काँग्रेस पक्षात प्रवेश करून सत्ता उपभोगण्याचा विचारही शिवला नाही कधी कुणाच्या मनाला. उलट, वाट्याला आलेला संघर्ष हेच प्राक्तन असल्याचे समजून, हाती असेल ते गोड मानून सत्ताधार्‍यांशी झगडत राहिलेत तत्कालीन नेते. लोकांनी खिल्ली उडवली तरी विचार सोडला नाही. पराभव समोर दिसत आहे म्हणून लढणं सोडलं नाही त्यांनी कधीच. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज उद्भवली आहे. इथे विरोधी पक्ष म्हणून कुणालाच काम करायचे नाहीय्‌. सर्वांना येनकेनप्रकारेण सत्तेत भागीदार व्हायचे आहे. सत्ता उपभोगायची आहे.
 
 
लोकशाहीव्यवस्थेत विरोधी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे. महत्त्व आहे. त्याचीही एक ताकद आहे. जबाबदारी आहे. संख्याबळाचे गणित ज्याच्या पारड्यात त्यानं कारभार करावा. उर्वरितांनी त्याला मदत करावी. त्याच्यावर नजर ठेवावी. चुका ध्यानात आणून द्याव्यात. प्रसंगी कडवा विरोधही करावा, हेच विरोधी पक्षाचे काम. पण, आज परिस्थिती अशी की, ते नकोय्‌ कुणालाच! राजकारण सत्तेसाठी करायचे असते हे मान्य. पण, सत्ता हातात नसेल तरीही जनहितार्थ करण्याजोगी बरीच कामं असतात. विशेषत: जनतेच्या आवाजाला बळकटी देण्याची एक मोठी जबाबदारी विरोधी पक्षाची असते. आजच्या सत्ताधार्‍यांनी अगदी परवापरवापर्यंत ती जबाबदारी पार पाडली आहे. सध्या मात्र, नेमकी तीच जबाबदारी टाळण्याची धडपड चालली आहे इथे. विरोधी बाकांवरची थोडीथोडकी माणसं सोडली, तर सारीच सत्तेच्या दिशेने वाहवत सुटली आहेत. कृपाशंकर सिंह, 370 च्या मुद्यावर काँग्रेसने विरोध केला नाही म्हणून त्रागा करतात अन्‌ ते हटविण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपाच्या खेम्यात बसण्याची तयारीही दर्शवितात, ही नौटंकी तर राजकारणालाही न शोभणारी.
 
 
परवा कुणीतरी म्हणालं, या देशातला विरोधी पक्ष इतका कमजोर होणे ही हसण्यावारी नेण्याची नव्हे, तर चिंतेची बाब आहे. केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन्‌ शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण अशा संधिसाधूंमुळे संख्याबळ भलेही वाढेल. पक्ष‘बळ’ कधीच वाढणार नाही. एकतर, या दोन्ही राजकीय पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षातून ही ताकद कमावली आहे. सत्ता हाताशी नसतानाच्या काळातील त्यांची लढाई विसरणे योग्य ठरणार नाही... म्हणूनच, या रे या, सारे या! असे म्हणणे बंद झाले पाहिजे आता... 

Saturday, August 24, 2019

श्रीकृष्ण


भारतीय तत्विंचतकांनी देवत्व बहाल करूनही, एका असामान्य मनुष्याच्या रुपातच श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा आणि त्याचे तत्विंचतन जगापुढे मांडले आहे. बहुधा म्हणूनच ते लोभस रुप इतरेजनांनाही भावले आहे. मृत्यूनंतरचा काळ कल्पून त्याबरहुकूम वागण्याची शिकवण, सोबतच जिवंत असेपर्यंत कसे वागायचे हे सांगणारा कर्मसिद्धांत म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला गीतेतून उपदेश करेपर्यंतच तो ‘भगवंत’ आहे. रणांगणावर विराट रूपदर्शन घडवित असतानाच तो आपण जगन्नियंता असल्याचे सांगतो. एरवी तो सवंगड्यांसोबत शिंक्यातले लोणी पळवणारा, सत्याच्या बाजूने उभे राहणारा, मित्राच्या मदतीला धावून जाणारा, द्रौपदीच्या हाकेला ओ देणारा, अर्जुनाला कर्णाची महती सांगणारा, स्वत:च्या ताकदीची कल्पना असतानाही पांडवांना यशापयाशाचे, सुख-दु:खाचे अडथळे पार करीत परिस्थितीला, प्रसंगी युद्धाला सामोरे जाण्याचा सल्ला देणारा, त्यांच्या अरण्यवासाच्या काळात धैर्य देणारा, वेळ बाका आला तर त्यातून बाहेर पडण्याच्या क्लृप्त्या सांगणारा, सोबती असतो. तो अभयंकर असतो. तो अद्वैत असतो. तो अप्रमेय असतो. तो ज्योतिरादित्य असतो. तो केयूर असतो... त्याला राधाही कळते अन्‌ कंसही. त्याला विदुरही ठावूक असतो अन्‌ दुर्योधनही. भगवंत स्वत:चं वर्णन अर्जुनासमोर करतात, तेव्हा या सृष्टीतील जे जे म्हणून उदार, उन्नत, उत्तम, महत्मधूर असेल, ते ते ‘मी’ असल्याचे सांगतात. ऋतुत मी कुसुमाकर आहे, मासांत मागशीर्ष, पर्वतात मेरू, शिखरात कैलास, महर्षींमध्ये भृगु, सिद्ध पुरूषांत कपिल मुनी असल्याचे सांगत असताना नरांत मात्र आपण धनंजय, म्हणजेच अर्जुन असल्याचे भगवंत खुद्द अर्जुनाला सांगतात. इतर उदाहरणांच्या पंक्तीत ‘अर्जुन’ विराजमान करताना कौंतेयाची प्रतिमा, त्याचे धैर्य उन्नत करीत त्याच्यातील विश्वास जागवण्याचाही तो प्रयत्न असतो.



अमेरिकेत घडविल्या गेलेल्या जगातल्या पहिल्या अणुस्फोटाच्या चाचणीनंतर जे दृश्य साकारले ते बघितल्यावर, चाचणी करणार्‍या ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर नामक शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले मत अद्भूत आहे. महाभारतात युद्धादरम्यान, समोर उभ्या ठाकलेल्या आप्त, स्वकीयांविरुद्ध लढण्यास नकार देणार्‍या अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जे ज्ञानामृत भगवंतांनी दिले, त्यानंतर आपल्या विराट रुपाचे जे दर्शन श्रीकृष्णाने घडवले, त्याचे वर्णन अर्जुनाने केले आहे. एकाचवेळी हजारो सूर्य चमकत असल्याचा भास व्हावा इतका लख्ख प्रकाश त्यावेळी आसमंतात जाणवत होता. मीच या सृष्टीचा निर्माता, मीच त्याचा पालनकर्ता अन्‌ मीच विनाशक ... ज्युलियस रॉबर्ट म्हणतात, अणूचाचणीनंतर जो स्फोट झाला, सारा परिसर प्रकाशमय झाला, तेव्हा मला महाभारतात वर्णन असलेले श्रीकृष्णाचे विराट रुपदर्शन आठवले. अर्जुनाने विशद केलेल्या भगवंतांच्या शब्दांसह...
ते व्यक्तिमत्व खरोखरीच विलक्षण आहे. भगवंतापेक्षाही, मनुष्यरुपात सर्वसामान्य जीवन जगत तो जो, असामान्यतेचा परिचय देतो, ते तर त्याहून आगळं असतं. त्याने अधरावर धरलेल्या बासरीतून बाहेर पडणारे सप्तस्वर तर जणू सार्‍या आसमंताला मोहीनी घालतात. तो युद्धही तेवढ्याच शिताफीनं लढतो. त्याचवेळी तो हिकमतीही असतो. त्या अर्थाने तो बुद्धिवान, मुत्सद्दीही असतो. एरवी युद्धकौशल्य आणि बुद्धिचातुर्याचा संगम सहसा गवसत नाही. पण भगवंतांच्या ठायी तो मीलाफही लीलया साधला गेलाय्‌. त्याचवेळी तो भक्तवत्सल, कनवाळूही असतो. त्याला प्राणीशास्त्र कळते. गायींच्या सान्निध्यात वावरताना वर्तनातून त्याला गायही उमगते अन्‌ सारथ्याच्या भूमिकेत वावरताना घोड्याच्या वेगापासून तर रागापर्यंतच्या बाबींचाही अभ्यास झालेला असतो. खरं तर, शल्य, नकुल, सहदेवांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ते कसब सिद्ध करता आलेले नसते. मृत अभिमन्यूच्या डोक्याला लाथ मारणार्‍या जयद्रथाचे अस्तित्व संपविण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून खग्रास सूर्यग्रहणाच्या मुहूर्तानुरूप सुदर्शनचक्राआड सूर्य जाईल अन्‌ सूर्यास्त झाल्याचा भास होऊन अर्जुनाला जयद्रथावर बाण चालवता येईल याचे अचूक गणित मांडून घडलेल्या घडामोडी भगवान श्रीकृष्णाच्या खगोलशास्त्राच्या ज्ञानाचीही साक्ष देतात. स्वत:ची नारायणी सेना कौरवांच्या बाजुने उभी करून स्वत: नि:शस्त्र पांडवांच्या साथीला उभे राहण्याची भूमिका त्यांच्यातला आत्मविश्वास स्पष्ट करते. एकाचवेळी चक्र, गदा, पद्म धारण करण्याची शक्ती एव्हाना कुणाच्याही वाट्याला येईल, असे होणे अशक्यप्राय. भगवंतांनी स्वत:च्या अफाट कर्तृत्वातून, क्षमतेतून ती शक्ती कमावली होती. सृष्टीनिर्मात्याच्या विविध रुपांतले श्रीकृष्णाचे रूप मुळातच मनुष्याला भावणारे. जवळचे वाटणारे. कारण त्याच्यातल्या रसिकाग्रणीपासून तर दही-लोण्यासाठीच्या खोडकरपणापर्यंत अन्‌ राधेच्या सोबतीने वावरण्यापासून तर युद्धभूमीवर अर्जुनाला कर्मयोग सांगण्यापर्यंत... त्याचे जगणे, वागणे, त्याच्या सार्‍या भूमिका लोकांना खर्‍याखुर्‍या वाटतात. ‘आपल्या’ वाटतात.
 
स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर असे तीन भाग आहेत. व्यक्ती स्वत:, साधन सामुग्रीसह आणि इतकेच नव्हे तर स्वत:ची बुद्धिमत्ता, धैर्यादी गुणांसह एखाद्याच्या पाठीशी किंवा सोबतीने उभी राहते, ते महत्वाचे. सुदामा असो, अर्जुन असो वा मग विदुर. श्रीकृष्ण मित्र म्हणून त्यांच्या समवेत राहिले ते स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, या तीनही अंगाने. कुठेही, कशाचीही उणिव मागे न ठेवता, किंतू-परंतु न बाळगता, ठामपणे सोबतीने उभा राहणारा सखा म्हणजे कृष्ण. तो मृत्यूचे वास्तवही मांडतो अन्‌ तोच जीवनाचे मर्मही सांगतो. जीर्ण झालेली वस्त्र सहज बाजूला टाकून नवी वस्त्र परिधान करावीत तसेच आत्मा एक शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, हे गंभीर वास्तव सहजतेने मांडणारे भगवान श्रीकृष्ण दुसरीकडे जीवन हा उत्सव असल्याचे स्पष्ट करीत, ते जगण्याच्या नाना तर्‍हा अधोरेखित करतात. क्षण रंगोत्सवाचा असो, दहीहांडीचा, की मग टिपर्‍यांच्या खेळाचा... आनंदाची उधळण करत, विखुरलेल्या क्षणांची मनमुराद लयलूट करीत हृदयाच्या कप्प्यात त्याची साठवण करीत पुढे जाण्याची न्यारी तर्‍हा त्यांनी जागापुढे मांडली आहे. जीवन आणि मृत्यूची महती एकाच व्यक्तीद्वारे एकाचवेळी विवेचित होण्याची उदाहरणे अन्यथा विरळाच. पण श्रीकृष्णाने त्याचीही सांगड लीलया घातलेली दिसते. म्हणूनच की काय पण, भारतीय समाजाला केवळ जगण्याची दिशाच नव्हे तर, तत्वज्ञानाची बैठकही त्यांनी दिली असल्याचेही स्पष्ट होते. अमेरिकेत 1945मध्ये पहिली अणुचाचणी घेणार्‍या शास्त्रज्ञालाही त्याने संशोधनातून घडविलेल्या स्फोटाच्या दृश्यातून दूरस्त भारतात मान्यता पावलेल्या भगवंतांच्या प्रतिमेचे, त्यांच्या वचनाचे स्मरण व्हावे, हा परिणाम श्रीकृष्णाच्या भावलेल्या प्रतिमेचा, त्यांच्या प्रभावी विचारांचा, ओजस्वी वाणीतून प्रकटलेल्या वचनांचा असतो. न्यू मेक्सिकोतील ‘फादर ऑफ द अॅटोमिक बॉम्ब’ ही उपाधी लाभलेल्या एका शास्त्रज्ञाचे हे विधान, विज्ञानाचा मार्ग अनुसरणे म्हणजे परमेश्वरी शक्तीचे अस्तित्व झुगारण्याची पहिली पायरी असल्याचा ग्रह करून बसलेल्या तमाम भारतीय मंडळीच्या थोबाडीत हाणणारे ठरावे.
 
प्रत्येक काळाची एक भाषा असते. स्वाभाविकच महाभारत काळाचीही एक भाषा होती. गीतेतील भाषा त्या तुलनेत अर्वाचीन मानली जाते. महाभारतात साधरणपणे द्रौपदी स्वयंवराच्या आसपास अवतरणारे कृष्णाचे पात्र, हरिवंशातून उमगणारी त्याची व्यक्तिरेखा, सुबक, सुंदर, मनमोहक, सर्वगुण संपन्न, दिसायला सावळे पण तरीही तेजस्वी असे रूप. मथुरेतला जन्म. उज्जैनच्या परिसरातील सांदिपनी आश्रमात शिक्षण. ते पूर्ण करून परतल्यावर मथुरेवरची जरासंधाची किमान सतरा आक्रमणं, युद्धाची सारे कौशल्य पणाला लावून परतवण्यात यश संपादन केल्यानंतर मथुरेवरील वारंवारची संकटं टाळण्यासाठी अजून दूरवर द्वारका नगरी वसविण्याचा निर्णय... अक्रुराने दिलेल्या निमंत्रणामागील घातपाताच्या शक्यतेची पूर्ण कल्पना असतानाही, त्यांच्या सोबत जाणे, त्यांनी केलेल्या आघाताला त्याच तोडीचे प्रत्युत्तर देणे, निकराने लढणे ... सारेच अद्भूत आहे. म्हणूनच की काय, पण भारतीय तत्विंचतकांनी देवत्व बहाल करूनही, एका असामान्य मनुष्याच्या रुपातच श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा आणि त्याचे तत्विंचतन जगापुढे मांडले आहे. बहुधा म्हणूनच ते लोभस रुप इतरेजनांनाही भावले आहे. मृत्यूनंतरचा काळ कल्पून त्याबरहुकूम वागण्याची शिकवण, सोबतच जिवंत असेपर्यंत कसे वागायचे हे सांगणारा कर्मसिद्धांत म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला गीतेतून उपदेश करेपर्यंतच तो ‘भगवंत’ आहे. रणांगणावर विराट रूपदर्शन घडवित असतानाच तो आपण जगन्नियंता असल्याचे सांगतो. एरवी तो सवंगड्यांसोबत शिंक्यातले लोणी पळवणारा, सत्याच्या बाजूने उभे राहणारा, मित्राच्या मदतीला धावून जाणारा, द्रौपदीच्या हाकेला ओ देणारा, अर्जुनाला कर्णाची महती सांगणारा, स्वत:च्या ताकदीची कल्पना असतानाही पांडवांना यशापयाशाचे, सुख-दु:खाचे अडथळे पार करीत परिस्थितीला, प्रसंगी युद्धाला सामोरे जाण्याचा सल्ला देणारा, त्यांच्या अरण्यवासाच्या काळात धैर्य देणारा, वेळ बाका आला तर त्यातून बाहेर पडण्याच्या क्लृप्त्या सांगणारा, सोबती असतो. तो अभयंकर असतो. तो अद्वैत असतो. तो अप्रमेय असतो. तो ज्योतिरादित्य असतो. तो केयूर असतो... त्याला राधाही कळते अन्‌ कंसही. त्याला विदुरही ठावूक असतो अन्‌ दुर्योधनही.
 
भगवंत स्वत:चं वर्णन अर्जुनासमोर करतात, तेव्हा या सृष्टीतील जे जे म्हणून उदार, उन्नत, उत्तम, महत्मधूर असेल, ते ते ‘मी’ असल्याचे सांगतात. ऋतुत मी कुसुमाकर आहे, मासांत मागशीर्ष, पर्वतात मेरू, शिखरात कैलास, महर्षींमध्ये भृगु, सिद्ध पुरूषांत कपिल मुनी असल्याचे सांगत असताना नरांत मात्र आपण धनंजय, म्हणजेच अर्जुन असल्याचे भगवंत खुद्द अर्जुनाला सांगतात. इतर उदाहरणांच्या पंक्तीत ‘अर्जुन’ विराजमान करताना कौंतेयाची प्रतिमा, त्याचे धैर्य उन्नत करीत त्याच्यातील विश्वास जागवण्याचाही तो प्रयत्न असतो. श्रीकृष्णाच्या आयुष्यभरातील यशाचं गमक काय असेल? असं म्हणतात की श्रीकृष्णाने आपला क्रोध उजव्या पायाच्या अंगठ्यात दाबून ठेवला होता. संपूर्ण अवतारकाळात केवळ तीन वेळा तो अंगठा उंचावला गेला. जेव्हा तसं घडलं तेव्हा रणकंदनच झालं. पण एरवी, तो जगन्नियंता सार्‍या प्रश्नांना हसतमुखाने सामोरा गेला. मानवी समुहाला तरी त्याचे यापेक्षा वेगळे काय सांगणे आहे?

Friday, July 26, 2019

ढिंग एक्सप्रेस!

आपला समाज मात्र कोत्या मनाचाच निघाला. एकतर क्रिकेटच्या पलीकडेही खेळ अन्‌ खेळाडू आहेत, हे मान्य करायला त्याला खूप वेळ लागतो आणि दुसरी बाब अशी की, झगमगाटाच्या पलीकडे त्याला बघताच येत नाही. यशापयशाचे एकसारखे मापदंड तो सगळीकडे वापरतो. या पोरीला धड इंग्रजी बोलता, लिहिता येत नाही, यावरूनही तिची टर उडवली गेली. धावण्याच्या स्पर्धेतील यशामुळे ‘ढिंग एक्सप्रेस’ ठरली तरी तिचं शिक्षण कमी असण्याचा मुद्दा लोकांनी चर्चिला. जर कपिल देव, सचिन तेंडुलकरच्या यशाआड त्यांचे शिक्षण येत नाही, तर हिमाच्या यशाच्या आड तरी ते का यावे, या प्रश्नाचे उत्तर काहीकेल्या गवसत नाही. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांचे महत्त्व कमी जोखण्याच्या भारतीय जनतेच्या सवयीचा तो परिणाम मानावा? एका गुणी खेळाडूचा कालपर्यंतचा संघर्ष मातीमोल ठरवण्यासाठी आणि एकामागून एक अशी पदकं खेचून आणेपर्यंत तिच्या यशाची दखलही न घेतली जाण्यासाठी माध्यमांना जवाबदार ठरवायचे, की समाजभान हरवून बसलेल्या रसिक चाहत्यांना?


सुमारे दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आसामच्या राजधानीत आंतरजिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ॲथ्लेटिक्सच्या सहभागातून वेगवेगळ्या स्पर्धा एकामागून एक याप्रमाणे पार पडत होत्या. यातील शंभर व दोनशे मीटर दौड स्पर्धेत ‘ती’पण सहभागी झाली होती. वर्णाने सावळी, शरीरयष्टी हाडकुळी. घरच्या अठराविश्वे दारीद्र्याची साक्ष तिच्या अंगावरचे कपडेच देत होते. पायातले बूट तर क्रीडाजगताच्या प्रचलित ऐटीला न शोभणारे. स्वस्त. म्हणून परवडणारे. म्हणून विकत घेतलेले. लौकिकार्थाने चारचौघांचे लक्ष जावे असे काही नव्हतेच तिच्यात. साहजिकच सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेले ते व्यक्तिमत्त्व होते. पण... स्पर्धा सुरू झाली. धावण्याचा इशारा देणारे बिगुल वाजले. एकमेकांना मागे टाकण्याच्या ईर्ष्येने पेटून उठलेले खेळाडू जिवाच्या आकांताने पळत सुटलेत. मोजून अवघ्या काही सेकंदांची स्पर्धा ती, पण निकाल लागला आणि क्षणभरापूर्वी कुणाच्याच दृष्टीने लक्ष देण्याजोगं नसलेलं ‘ते’ व्यक्तिमत्त्व आता मात्र सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरले! कारण या दोन्ही स्पर्धा आसामच्या त्या लेकीनं जिंकल्या होत्या. नुसत्या जिंकल्या नाही, तर नवनवीन विक्रम प्रस्थापित केले तिनं. खरंतर त्या स्पर्धेनंतरच्याही काळात जयपराजयाच्या गर्तेत गटांगळ्या खात तिचा प्रवास सुरू राहिला होता. परिस्थितीवर मात करण्याची
तीच जिद्द. पुन:पुन्हा उठून उभे राहण्यासाठीची तीच धडपड. आकाशाच्या दिशेने झेप घेण्याची तीच ईर्ष्या...
हिमा दास! गेला महिनाभर भारतीय जनतेच्या तोंडी असलेले एक नाव. माणसं यशाच्या शिखरावर पोहोचली, तरच त्याची दखल घेण्याची सवय जडलेल्या भारतीय समूहाने चालवलेल्या हिमाच्या कोडकौतुकाचे आश्चर्य नाहीच इथे कुणाला. सुवर्णपदकांची एकामागून एक अशी आरास मांडत निघालेल्या हिमाच्या यशापेक्षाही, कुठल्याशा आमदाराच्या पोरीने घरून पळून जाण्याची ‘ब्रेिंकग न्यूज’ करण्यात अक्कल पाजळणार्‍या माध्यमजगतातील हुशार मंडळींच्या बुद्धीची कीव करण्यापलीकडे उरते तरी काय सामान्य बापुड्यांच्या हातात? पण, हिमाने यशाची विविधांगी क्षेत्रे पादांक्रांत केली अन्‌ सारेच चित्र बदलले. माध्यमांना त्यांच्या बातम्यांची दिशा बदलावी लागली. जागोजागी तिच्या यशाची चर्चा घडू लागली. दरम्यान, हाती पडलेल्या बक्षिसापैकी अर्धी रक्कम आपल्या राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याच्या तिच्या घोषणेने तर जणू जादू, जादू कसली, क्रांतीच केली! सारा देश तिला डोक्यावर घेऊन नाचू लागला. चाहत्यांनी बहाल केलेल्या लोकप्रियतेच्या भरवशावर कोट्यवधी रुपयांचे घबाड कमावणार्‍यांना सुचू नये ते या 19 वर्षांच्या नवख्या खेळाडूला सुचणे कौतुकास्पदच होते.
 पदकांची आरास मांडण्याचा इतिहास तिच्या कर्तबगारीतून घडत गेला, तसतसा तिच्या संघर्षाचा आलेखही जगापुढे येऊ लागला. तरुणाईला तिच्या कर्तृत्वाची भुरळ पडली. एव्हाना लोक नेटवर हिमा दास हे नाव ‘सर्च’ करून तिच्याबद्दल उत्सुकतेने जाणून घेऊ लागले. गरिबीसोबतच विपरीत परिस्थितीशी तिने दिलेली कडवी झुंज जगजाहीर होऊ लागली.
आसामातील नागाव जिल्ह्यातलं ढिंग नावाचं एक छोटंसं गाव. हिमा तिथलीच. रणजीत आणि जोनाली दास यांच्या संसारवेलीवर बहरलेलं शेंडेफळ. तिच्यासह पाच भावंडांच्या संसाराचा गाडा हाकण्याची आई-वडिलांची कसरत आणि ती करताना होणारी त्यांची दमछाक सार्‍या गावाच्या परिचयाची. पदरची ‘दो बिघा’ जमीन जोतून पिकवलेल्या धानातून कुटुंबाचं कसंबसं चाललं असताना हिमाच्या मनात फुलणारी स्वप्नं, खेळाकडे असलेली तिची ओढ कुणाच्या खिजगणतीत असणार होती? सुरुवातीला फुटबॉलचे आकर्षण वाटायचे. पण, मग धावण्याच्या क्षेत्राकडे तिचा कल वाढत गेला. समस्यांचे काय, त्या तर मार्गात सर्वदूर विखुरल्या होत्या. पण, भांडवल करण्यापेक्षा त्या समस्या पायाखाली तुडवत तिचा प्रवास अविरत सुरू राहिला. कधी फुटबॉलच्या मैदानावरील सुकलेल्या मातीवरून, तर कधी शेतातला चिखल तुडवत, धावण्याची जिद्द मार्गक्रमण करीत राहिली. सुरुवातीला तर अनवाणीच धावायची पोर. मग बुटं घालून धावण्याचा सराव सुरू झाला. इथं खायलाच पुरेसे नसताना पायातल्या बुटांसाठी जास्तीचे पैसे असणार कुठून? त्यामुळे, अंगातले कपडे, पायातले बुट यापेक्षा धावण्याकडे अधिक लक्ष दिले जाऊ लागले. त्याचा परिणाम हा होता की, आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती गोहाटीत दाखल झाली होती. तिथले तिचे बेभान धावणे, स्पर्धेत अजून कोणकोण दिग्गज उतरलेत याची जराशीही चिंता न बाळगता स्वत:च्या यशासाठी झेपावण्याची तिची जगावेगळी तर्‍हा, ती तळमळ, सामाजिक व्याप खूप मोठा राखण्याची इच्छा असली, तरी खेळाच्या मैदानावर मात्र आपला ट्रॅक अन्‌ आपण, एवढा मर्यादित विचार करायलाही ती शिकली. ही पोरगी भविष्यात नाव काढेल, हा विश्वास प्रशिक्षक निपुण दास यांच्या मनाला शिवला. गोहाटीच्या शिबिरात राहून तिने धावण्याचा शास्त्रीय पद्धतीने सराव करावा यासाठीचा त्यांचा अट्‌टहास होता. पण, तिथला खर्च पेलवणार कसा? परिस्थिती तर जणू निष्ठुरतेने क्षणाक्षणाला परीक्षा बघत होती. बरं, याही स्थितीत, संघर्षाचा इरादा इतका बुलंद की, यश हमखास गाठीशी बांधले जायचे. इथेही मार्ग निघालाच. हिमाच्या आर्थिक जबाबदारीचे ओझे निपुण दास यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतले अन्‌ प्रशिक्षणाचा तिचा मार्ग मोकळा केला. निपुण सरांनी दाराशी आणून ठेवलेल्या संधीचे सोने करणे, एवढेच तिच्या हाती होते आणि तिने ते केलेही. धावण्याचा सराव, वेग वाढू लागला. मग सरांनी मर्यादा वाढवली. दोनशे मीटरऐवजी चारशे मीटरच्या स्पर्धेसाठी तिच्याकडून तयारी करवून घेण्याचा प्रयोग एव्हाना सार्थ ठरू लागला. कधीकाळी शेतात धावणारी पोरगी आता आंतराष्ट्रीय स्पर्धेत खर्‍याखुर्‍या मैदानावर धावू लागली. सुरुवातीला अपयशाचा ससेमिरा काही सुटला नाही. तिही समर्थपणे त्याला तोंड देत राहिली- न डगमगता. यश पायाशी खेचून आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच लढण्याचे बळ दिले. त्याच्याच भरवशावर हिमा यशाचा पाठलाग करीत राहिली. इतका, की शेवटी नियतीलाही यशाचे दान तिच्या पदरात टाकावेच लागले!
 
बँकॉंकमधील युथ चॅम्पियनशिप ट्रॉफी असो, की ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्स असोत, तिथे वाट्याला आलेल्या अपयशाचा लवलेशही हिमाच्या नंतरच्या सरावादरम्यान दिसत नव्हता कुठेच. त्याचाच परिणाम असावा बहुधा, पण आता तिचे धावणे जणू पदकांसाठीच असल्याचा अलिखित नियम झाला. गेल्या एकवीस दिवसांत अॅथ्लेटिक्स स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण भारतासाठी मिळवून देण्याची किमया हिमा दास हिने केली आहे. लोकांच्या तोंडी आपले नाव यायला इतिहास निर्माण करावा लागतो. हिमाने तो केला आहे. चॅम्पियन्स वेगळेच असतात. त्यांची जिद्द, पेहराव, विचार, वर्तन... सारेच वेगळे असते. ती चॅम्पियन आहे, हे तिने या सर्वच बाबतीत सिद्ध केले आहे. खेळाच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही.
आपला समाज मात्र कोत्या मनाचाच निघाला. एकतर क्रिकेटच्या पलीकडेही खेळ अन्‌ खेळाडू आहेत, हे मान्य करायला त्याला खूप वेळ लागतो आणि दुसरी बाब अशी की, झगमगाटाच्या पलीकडे त्याला बघताच येत नाही. यशापयशाचे एकसारखे मापदंड तो सगळीकडे वापरतो. या पोरीला धड इंग्रजी बोलता, लिहिता येत नाही, यावरूनही तिची टर उडवली गेली. धावण्याच्या स्पर्धेतील यशामुळे ‘ढिंग एक्सप्रेस’ ठरली तरी तिचं शिक्षण कमी असण्याचा मुद्दा लोकांनी चर्चिला. जर कपिल देव, सचिन तेंडुलकरच्या यशाआड त्यांचे शिक्षण येत नाही, तर हिमाच्या यशाच्या आड तरी ते का यावे, या प्रश्नाचे उत्तर काहीकेल्या गवसत नाही. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांचे महत्त्व कमी जोखण्याच्या भारतीय जनतेच्या सवयीचा तो परिणाम मानावा? एका गुणी खेळाडूचा कालपर्यंतचा संघर्ष मातीमोल ठरवण्यासाठी आणि एकामागून एक अशी पदकं खेचून आणेपर्यंत तिच्या यशाची दखलही न घेतली जाण्यासाठी माध्यमांना जवाबदार ठरवायचे, की समाजभान हरवून बसलेल्या रसिक चाहत्यांना?

Friday, May 24, 2019

राजसाहेब! लावायचा का व्हिडीओ...?


म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन्‌ विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा...  सहज घडलं असेल असं? की तुमचा छुपा डाव लक्षात आला असेल जनतेच्या? निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुमच्या मनात अचानक जागलेला जनतेबद्दलचा कळवळा छद्मी असल्याची खात्री पटली असेल लोकांना? दर दोन-चार वर्षांनी बदलणारी तुमची भूमिकाही ध्यानात ठेवली असेल का लोकांनी? कधीकाळी बाळासाहेबांच्या छत्रछायेत तयार झालेलं, धनुष्यबाणासाठी प्राणपणानं मत मागणारं नेतृत्व, स्वत:वरील व्यक्तिगत अन्यायाचा जाहीर कांगावा करीत रेल्वे इंजिनसाठी मतांचे दान केव्हा मागू लागले, ते कळलेच नाही जनतेलाही. नंतरच्या काळात आणखीच कहर होत गेला. एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता तिसर्‍याच कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याची गळ घालतो अन्‌ नंतरच्याच निवडणुकीत त्या पक्षाला अजीबात मतं देऊ नका म्हणून सांगतो, असे अफलातून चित्र निर्माण करण्यात राजसाहेबांचे कसब पणाला लागले! राजसाहेब, वर्षागणिक भूमिका बदलणं, आपल्या पक्षाची ताकद दरवेळी कुणाच्यातरी खुंट्याला बांधणं, ही तुमची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण म्हणून जनतेला गृहीत धरून तिलाही स्वत:सोबत फरफटत नेत, कुणाच्यातरी दावणीला बांधण्याची तुमची तर्‍हा लोकांनी का स्वीकारायची, हे तरी सांगा!


राजसाहेब! आहात कुठे? दिसला नाहीत गेले दोन दिवस कुठेच! निवडणुकीपूर्वी प्रचारार्थ केलेल्या दौर्‍याचा शीण अजून गेला नाही वाटते! की, निवडणुकीचे निकाल ऐकून तब्येत बिघडलीय्‌ आणखी? काय तो तोरा होता राव तुमचा! किती चवताळून उठला होतात पंतप्रधानांविरुद्ध. किती आरोप. किती शिवीगाळ. आपण केलेल्या आरोपांना कुणी काडीचीही किंमत देत नाहीय्‌ म्हटल्यावर झालेला त्रागा तो केवढा. आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलण्याचीही कुणाची बिशाद राहिली नसल्याची ती शेखी. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गाजवलेल्या जाहीरसभांचा घाट. स्वत:च्या राजकीय पक्षाचा एकही उमेदवार मैदानात नसताना, सरकारविरुद्ध रान पेटवण्यासाठी कुणी ‘प्रोत्साहन’ दिले, असा नुसता सवाल विचारला गेला तरी केवढे चिडला होतात. कॉलर टाईट करून म्हणालात, ‘‘मी असल्या सुपार्‍या घेत नसतो. मोदींच्या नेतृत्वात देश संकटात चालला असताना त्याबाबत जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे.’’ त्याचा अप्रत्यक्ष ‘लाभ’ कॉंग्रेस-राष्ट्रवादीला होणार असेल, तर होऊ दे! त्याला जबाबदार मी नाही. पण, अशा कठीण प्रसंगात लोकांना परिस्थितीची जाणीव करून देणं, त्यांना जागृत करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं केवढं ठामपणे सांगितलं होतं राव तुम्ही? केवढ्या गाजल्या त्या जाहीरसभा. काय तो जल्लोश. केवढा हुरूप लोकांना तुमच्या जाहीरसभांना येण्याचा. पण, तुमच्या अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ‘फायदा’ मात्र झालेला दिसत नाही कुठेच. नरेंद्र मोदींविरुद्ध तुम्ही केलेल्या थयथयाटावर, व्यक्त केलेल्या जळफळाटावर, ओकलेल्या गरळीवर टाळ्या पिटल्या खर्‍या लोकांनी, पण प्रत्यक्षात मतांचे दान मात्र युतीच्याच पदरात टाकले. म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन्‌ विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा...
 सहज घडलं असेल असं? की तुमचा छुपा डाव लक्षात आला असेल जनतेच्या? निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुमच्या मनात अचानक जागलेला जनतेबद्दलचा कळवळा छद्मी असल्याची खात्री पटली असेल लोकांना? दर दोन-चार वर्षांनी बदलणारी तुमची भूमिकाही ध्यानात ठेवली असेल का लोकांनी? कधीकाळी बाळासाहेबांच्या छत्रछायेत तयार झालेलं, धनुष्यबाणासाठी प्राणपणानं मत मागणारं नेतृत्व, स्वत:वरील व्यक्तिगत अन्यायाचा जाहीर कांगावा करीत रेल्वे इंजिनसाठी मतांचे दान केव्हा मागू लागले, ते कळलेच नाही जनतेलाही. नंतरच्या काळात आणखीच कहर होत गेला. एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता तिसर्‍याच कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याची गळ घालतो अन्‌ नंतरच्याच निवडणुकीत त्या पक्षाला अजीबात मतं देऊ नका म्हणून सांगतो, असे अफलातून चित्र निर्माण करण्यात राजसाहेबांचे कसब पणाला लागले! राजसाहेब, वर्षागणिक भूमिका बदलणं, आपल्या पक्षाची ताकद दरवेळी कुणाच्यातरी खुंट्याला बांधणं, ही तुमची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण म्हणून जनतेला गृहीत धरून तिलाही स्वत:सोबत फरफटत नेत, कुणाच्यातरी दावणीला बांधण्याची तुमची तर्‍हा लोकांनी का स्वीकारायची, हे तरी सांगा!
तमाम जनतेला दूधखुळ्यांच्या रांगेत बसवून स्वार्थाचे राजकारण करायला निघाला होतात. मोदींनी पाच वर्षांत काहीच केलं नाही म्हणून सांगत होतात. नोटबंदी फसली काय, जीएसटीचे दुष्परिणाम भोगावे लागणार काय, सरकारच्या अपयशाची लक्तरं वेशीवर टांगण्याचा तो आवेश काय, पाच वर्षांत देश खड्‌ड्यात घातल्याचा आरोप काय... निदान डझनभर सभा घेतल्यात साहेब आपण महिनाभरात जनजागृतीचे कारण पुढे करून. जागृत झालेच नाहीत का हो लोक आपल्या प्रभावाने? कारण, निवडणुकीच्या निकालातून तरी तसे काही दिसत नाही. की हवेत भिरकावलेत लोकांनी तुमचे आरोप अन्‌ खड्‌ड्यात घातलीत तुमची मतं?
इथे प्रत्येकाच्या राजकारणाची एक तर्‍हा आहे. जे जाहीरसभेत बोललं जाते ते ण्टीचेंबरमध्ये बोललं जाईलच याची खात्री नसते. नेत्यांच्या बोलण्या-वागण्यातील तफावतीचाही सराव झालाय्‌ एव्हाना लोकांना. निवडणुकीच्या काळातील आश्वासनांची वासलात तर सवयीचा भाग झालीय्‌ त्यांच्या. बहुधा त्यामुळेच की काय, पण सरड्यांहून अधिक वेगाने रंग बदलण्याची राजकारण्यांची तर्‍हा आश्चर्याचा विषय राहिलेला नाही आताशा. कित्येकदा, बड्या लोकांची ही पद्धत आकलनापलीकडची असते सर्वसामान्य जनतेच्या. पण... एक मात्र नक्की. तिला पाहिजे तेव्हा, पाहिजे तसे आपल्या तालावर नाचवू शकतो, असा माज जर कुणाच्या डोक्यात शिरला असेल, तर तो लागलीच उतरवण्याचा बाणाही असतो साहेब जनतेच्या अंगी. आता हेच बघा ना! एवढ्या जाहीरसभा घेऊन, मोदींना मतं देऊ नका असं सांगूनही कुणी भीक घातली तुमच्या आवाहनाला? ‘ते’ देश खड्‌ड्यात घालत असल्याचे लाख सांगून पाहिलं तुम्ही, पण कुणी विश्वास नाही ठेवला नाही बघा. तुम्ही नको म्हटलं तरी भरभरून मतांचं दान त्यांच्या पदरात टाकलं मतदारांनी. लोकांना मूर्ख समजून ज्यांना छुपी मदत करायला निघाला होतात, त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोणचे घातले जनतेने अन्‌ तुमचं तर पाऽऽर भरीत केलं की हो!
राजसाहेब, खरं सांगायचं तर त्या जाहीरसभांमधून तुम्ही मांडलेले सारेच मुद्दे अगदीच खोडून काढावेत असे नव्हते. शिवाय सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे हा तर विरोधी पक्षाचा, लोकशाहीव्यवस्थेने बहाल केलेला अधिकार. त्यामुळे तुम्ही सरकारवर टीका करण्यात, नरेंद्र मोदींवर तुटून पडण्यात तसे गैर नव्हतेच काही. मग तरीही लोकांनी केराची टोपली का दाखवली तुमच्या आवाहनाला? भाषणांनंतर टाळ्यांचा कडकडाट करूनही मतदान केंद्रांवर कमळावरच बोट का ठेवले असेल लोकांनी, ठाऊकाय्‌? कारण राजसाहेब, लोकांनी तुमचा डाव ओळखला होता. त्यांच्या मतांचा तुम्ही बाजार मांडायला निघाले असल्याचे त्यांनी पुरते जाणले होते. दरवेळी वेगवेगळ्या लोकांसाठी मतं मागण्याची ठाकरी शैली तशीही भावली नव्हतीच कुणाला. यंदाही, एकवेळ स्वत:च्या पक्षासाठी मतं मागायला मैदानात उतरला असता ना, तरीही कदाचित लोक काही प्रमाणात पाठीशी उभे राहिले असते तुमच्या. पण, तुम्ही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतले होते स्वत:ला. स्वत:च्या स्वार्थासाठी जनमताचा लिलाव मांडायला निघालात. लोक मोठ्या विश्वासाने आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून त्यांना गृहीत धरण्याची चूक करून बसलात. राजसाहेब, जनता, तुम्ही समजता तेवढीही खुळी नाही हो! तिला व्यवस्थितपणे कळते कुणाच्या वागण्या-बोलण्यातून काय अर्थ काढायचा ते. आपल्या भाषण मोहिमेचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार असेल तर होऊ दे, असे म्हणून तुम्ही स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा लाख प्रयत्न केला, तरी लोकांना चांगलेच ठाऊक झाले होते की, राज ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेऊनच मैदानात उतरले आहेत. अप्रत्यक्ष रीत्या नव्हे, प्रत्यक्षपणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच राजसाहेबांची धडपड चालली आहे. त्यासाठीच त्यांचे इंजीन दिशाहीन भरकटत चालले असल्याची बाबही लपून राहिलेली नव्हतीच कुणाच्याही नजरेतून. तुमच्या लेखी तर काय, सर्वसामान्य माणसं म्हणजे मतदानापुरते गोंजारण्याचे साधन. त्यांना केव्हाही, कसेही मूर्ख बनवता येते. हो ना? असेच वाटले होते ना राजसाहेब तुम्हाला?
पण कसचे काय, या सर्वसामान्य बापुड्यांनी पुरती वाट लावली बघा साहेब तुमची! ज्यांना सत्तेतून बाहेर घालवण्याच्या बाता करत होता, तुमच्या भाषणावर टाळ्या पिटणार्‍यांनी त्या मोदींनाच पुन्हा सत्ता बहाल केली आहे. तीही एकहाती. तुमच्या नाकावर टिच्चून. तुम्ही केलेले सारे आरोप कचर्‍याच्या टोपलीत टाकून. तुम्ही ज्यांना पडद्याआडून मदत करायला निघाला होतात, त्या सर्वांचे खोबरे करून. तुम्हाला तर तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही बघा साहेब लोकांनी! खरंच कमाल आहे बरं लोकांची. गर्दी तुमच्या सभेला करतात. टाळ्या तुमच्या भाषणावर ठोकतात अन्‌ मतं तेवढी मोदींना देतात...! बरं, पण साहेब, जाता जाता तेवढं सांगून द्या! तो व्हिडीओ लावायची इच्छा बाकी आहे अजून? की...

Saturday, May 11, 2019

भिकार्‍यांच्या विश्वात...


जराशा सवडीत असलेले दोन सहप्रवाशी आपापल्या प्लेटस्‌ हातात धरून थोडेसे बाजूला उभे राहून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले होते, तोच कोवळ्या वयाची दोन पोरं जवळ येऊन उभी राहिली. काळीकुळी. घाणेरडी. केस विसकटलेली. गेल्या कित्येक दिवसांत आंघोळ केलेली नसावी बहुधा. हातातल्या प्लेटस्‌मधील पदार्थ तोंडात टाकण्यासाठी म्हणून चमच्याच घेत नाही तोच, त्या केविलवाण्या, आशाळभूत नजरांशी सामना झालेला. त्यांना पैसे द्यावेत? छे नकोच! जरा वेगळ्या पद्धतीनं जाऊ या! भूक लागलीय्‌? काही खाणार? असे विचारून, त्यांना नाश्ता देण्यासाठी म्हणून दुकानदाराला इशारा केला. पहिले तर तो कुत्सितपणे हसला. त्याच्यासाठी हा नेहमीचाच प्रकार असावा बहुधा. आणि यांच्यासारख्या ‘दानशूर’ माणसांना सहज मूर्ख बनविणारी ती भिकारडी पोरंही त्याला चांगलीच ठाऊक असावीत बहुतेक. पण गुमानपणे त्यानं, त्याच वेगानं प्लेटस्‌ तयार केल्या अन्‌ त्या पोरांच्या हातात ठेवल्या. पैसे हमखास मिळणार असल्याची शाश्वती असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. तसंही त्याच्या बाचं काहीच जाणार नव्हतं. उलट, दोन प्लेटस्‌ अनायासेच विकल्या गेल्या होत्या. इकडे, नाश्त्याच्या प्लेटस्‌ या पोरांच्या हाती पडताच, कुठून कुणास ठाऊक, पण पुन्हा काही पोरं सभोवताल येऊन उभी राहिली. तसलीच. त्याच वयाची. अवतारही तसाच काहीसा. त्याच केविलवाण्या नजरा... तेच आशाळभूत चेहरे... 



गाडी फलाटाला लागताच आतली माणसं भराभरा खाली उरतली. निदान तासभर तरी गाडीचा मुक्काम इथनं हलणार नव्हता. वेळ सकाळची. नाश्ता, चहा पटापट आटोपून घ्यावा, अशा बेताने गाडीतील प्रवाशांची गर्दी फलाटावर अवतरली होती. मिळेल त्या दुकानाभोवती माणसं जमली होती. वाफाळलेले पोहे, कढईतल्या तापलेल्या तेलातून नुकतेच तळून काढलेले बटाटेवडे... कुणी मागणी करण्याचीच देर की, दुकानदार भराभरा हात चालवत प्लेटस्‌ तयार करून त्यांच्या पुढ्यात ठेवायचा. तेवढ्या गर्दीतही कुणाकडून किती पैसे घ्यायचेत, याची न चुकणारी गणितं एव्हाना त्याच्या मनात तयार झालेली असायची. ग्राहक तिथनं बाहेर पडायच्या आत बिलाचा आकडा तोंडी सांगून पैसे पेटीत गेलेलेही असायचे.
 जराशा सवडीत असलेले दोन सहप्रवाशी आपापल्या प्लेटस्‌ हातात धरून थोडेसे बाजूला उभे राहून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले होते, तोच कोवळ्या वयाची दोन पोरं जवळ येऊन उभी राहिली. काळीकुळी. घाणेरडी. केस विसकटलेली. गेल्या कित्येक दिवसांत आंघोळ केलेली नसावी बहुधा. हातातल्या प्लेटस्‌मधील पदार्थ तोंडात टाकण्यासाठी म्हणून चमच्याच घेत नाही तोच, त्या केविलवाण्या, आशाळभूत नजरांशी सामना झालेला. त्यांना पैसे द्यावेत? छे नकोच! जरा वेगळ्या पद्धतीनं जाऊ या! भूक लागलीय्‌? काही खाणार? असे विचारून, त्यांना नाश्ता देण्यासाठी म्हणून दुकानदाराला इशारा केला. पहिले तर तो कुत्सितपणे हसला. त्याच्यासाठी हा नेहमीचाच प्रकार असावा बहुधा. आणि यांच्यासारख्या ‘दानशूर’ माणसांना सहज मूर्ख बनविणारी ती भिकारडी पोरंही त्याला चांगलीच ठाऊक असावीत बहुतेक. पण गुमानपणे त्यानं, त्याच वेगानं प्लेटस्‌ तयार केल्या अन्‌ त्या पोरांच्या हातात ठेवल्या. पैसे हमखास मिळणार असल्याची शाश्वती असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. तसंही त्याच्या बाचं काहीच जाणार नव्हतं. उलट, दोन प्लेटस्‌ अनायासेच विकल्या गेल्या होत्या. इकडे, नाश्त्याच्या प्लेटस्‌ या पोरांच्या हाती पडताच, कुठून कुणास ठाऊक, पण पुन्हा काही पोरं सभोवताल येऊन उभी राहिली. तसलीच. त्याच वयाची. अवतारही तसाच काहीसा. त्याच केविलवाण्या नजरा... तेच आशाळभूत चेहरे... त्यांच्यासाठीही नाश्त्याची आर्डर द्यावी म्हणून दुकानदाराकडे वळलं, तर आता त्याच्या चेहर्‍यावरील मगाचा कुत्सितपणा जाऊन व्यवहारी बाणा झळकत होता. ‘‘जाने दो ना साब! रोजका है इनका. एक को खिलाओगे तो दस जमा होंगे. कितनो को खिलाओगे आप?’’ प्रवासी काय, कधीतरी उतरतात या फलाटावर. तो तर गेली कित्येक वर्षं इथेच होता. त्याच्यासाठी सरावाचा भाग झाला होता हा. लोकांच्या हातातल्या पदार्थांकडे टकमक बघणारी, मोठ्या आशेनं त्यांच्यासमोर हात पसरवणारी ही पोरं... कधी हिडिसफिडिस करून दूर हाकलली जाणारी, तर कधी कुणाच्या दयेला पात्र ठरलेली... दुकानदाराला कशाचंच कौतुक नव्हतं. त्या घाणेरड्या पोरांची ब्याद शिव्यांची लाखोली वाहून दूर लोटणार्‍यांचा राग नाही, की दहा-वीस रुपयांचे खाद्यपदार्थ त्यांच्या पदरात टाकून लाखो रुपयांच्या किमतीचे पुण्य कमावल्याच्या ऐटीत तिथनं बाहेर पडणार्‍यांचा हेवाही नाही. दोघांचेही वास्तव्य काही क्षणांपुरतेच तिथे असल्याचं आणि शेवटी आपण आणि ही भिकारडी पोरं मात्र इथेच असणार असल्याच्या वास्तवाचं भान तेवढं त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं...
माणसं, हिडिसफिडिस करून, शिव्याशाप देऊन त्यांना दूर लोटणारी असोत, की पाच-पन्नास रुपये खर्च करून त्यांच्या जिवावर पुण्य कमावल्याच्या गुर्मीत जगणारी... बहुधा त्या दुकानदाराचे कुत्सितपणे हसणे म्हणजे या गुर्मीला दाखवलेल्या वाकुल्या असाव्यात. कदाचित, त्याच्यालेखी तद्दन फालतूपणा ठरलेल्या भाबडेपणावर उमटलेली ती प्रतिक्रिया असेल. त्या भिकारड्या पोरांनी कथित शहाण्यांना घातलेला गंडा, त्याच्या मनात विजयी भाव जागवत असेल? किंवा अशी नवनव्या चेहर्‍यांतून डोकावणारी ‘मूर्ख’ माणसं रोजच बघत असल्याने त्याच्या भावनाच मेल्या असतील? कुठून आले असेल हे कोडगेपण? स्वानुभवातून? आज पोटभर खाऊ घातलं तरी ही समस्या अन्‌ ते भिकारी उद्या पुन्हा आ वासून उभे राहणारच असल्याच्या निराशेतून? की आपल्याला याच परिस्थितीचा सामना रोज करायचा आहे, या धगधगत्या वास्तवातून? मग शहाणं कोण? हे झेंगटच नको म्हणून पहिल्याच टप्प्यात ते दूर लोटणारी अन्‌ त्यांच्या कसल्याच वागण्याचा स्वत:वर परिणाम होऊ न देता मोजलेल्या पैशातून स्वत: नाश्ता करून निर्विकारपणे तिथनं ज्यांना सहजपणे बाहेर पडता आलं, ती माणसं? की असं कुणाला बघितलं की, सहज मनात परोपकराची भावना जागलेली निरागस माणसं? की, मनाच्या कुठल्याशा कप्प्यात साठलेल्या पाप-पुण्याच्या कल्पनेतून पदरचे पाच-पन्नास रुपये खर्च करून पुण्य कमवायला निघालेली माणसं? की, या सर्वांच्या सोबतीने राहूनही सगळ्यांकडे तटस्थपणे बघण्याचा व्यवहारी बाणा कमावून तरबेज झालेला तो दुकानदार?
तो, या गोरगरिबांच्या समस्या अशा दहा-वीस रुपयांनी तोलणार्‍यांना कुत्सितपणे हसतो याचा अर्थ, त्यांच्यावर फुकटची दादागिरी करणार्‍यांबाबत त्याच्या मनात फार आदर असतो असे नाही. त्यांचे असे फटकून वागणेही त्याला तितकेच सलते. पण, तो स्वत:च परिस्थितीपुढे इतका हतबल असतो की, कुणाकडेतरी दुर्लक्ष करणे वा कुणाचे वागणे हसण्यावारी नेणे, यापलीकडे काही करणे त्याच्याही हातात नसते. शिवाय ही पोरं आयुष्यभर ‘अशीच’ जगणार असल्याच्या निराशाजनक निष्कर्षाप्रतही तो आलेला असतो एव्हाना. या लेकरांना पुढे करून स्वत:ची पोटं भरणारे मायबापही त्याला ठाऊक असतात अन्‌ आपल्या ठेल्याभोवती जमलेल्या ग्राहकांपुढे स्वत:च्या लाचारीचे प्रदर्शन मांडून त्यांच्या खिशातून चार पैसे उकळण्याची किमया अनुभवातून साध्य केलेली ही पोरं भविष्यात कधीतरी स्वाभिमानानं जीवन जगतील, जगू शकतील, निदान त्या दिशेनं प्रयत्न करतील, ही आशाही त्यानं सोडून दिलेली असते केव्हाच. एरवी यातल्या चार-दोन जिवांना दिवसभरात दोन घास खाऊ घालण्याची इच्छा त्याच्या मनात कधी डोकावतच नाही, असे नाही. त्याची तशी दानतही नक्कीच असते. पण, मुळातच ही समस्या आपले आकलन आणि आवाक्याबाहेरची असल्याच्या विश्वासावर तो ठाम असतो. शिवाय, त्याच्यासाठी रोजचाच तमाशा असतो हा. म्हणूनच की काय, पण ती समस्या सोडवण्यासाठीची दोन पावलंही तो पुढे टाकत नाही. अन्यथा कुणाचेही हृदय द्रवेल असा तो अवतार, मदतीसाठी साद घालणारी ती आर्जवी नजर, हृदय पिळवटून टाकणारी ती दैनावस्था... याही स्थितीत तटस्थपणे वागू शकणारा तो दुकानदार. त्याचे वागणे केवळ त्याच्या व्यापारी वृत्तीत तोलता येईल?
खरंतर या एकाच दृश्याकडे खूप वेगवेगळ्या तर्‍हेनं बघणारे लोक आहेत समाजात. स्वत:च्या पद्धतीने त्याचे आकलन करणारी माणसंही शेकड्यानं आहेत. नेहमीचीच असल्याने कुणाला त्या समस्येच्या वाटेनेच जायचे नसते, तर कुणाला याही परिस्थितीत पुण्य कमावण्याच्या वेडाने झपाटलेले. कुणी माणुसकीच्या भावनेने ओतप्रोत भरले म्हणून मदतीसाठी सरसावलेले. मदत करून निघून गेलेले... समस्या मात्र जागच्या जागीच. कुणीतरी ‘अशा’ मुलांसाठी प्लॅटफॉर्मवरची शाळा चालवीत असल्याची बातमी कौतुकाचा विषय ठरते या समाजासाठी. बाकी, त्यांचे विश्व त्यांचेच असते. जगण्याची विवंचना पाचवीला पुजलेली. चेहर्‍यावरच्या लाचारीचा भाव घरातल्या अठरा विश्वे दारिद्र्यातून उमटलेला असतो. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी कमाईचा हा एकमेव, सोपा मार्ग नजरेसमोर असतो. लोक भावनेच्या भरात वाहून जातात, हे अनुभवाने ठाऊक झाले असल्याने, त्याच भावनांचा बाजार मांडण्याचा प्रयत्न होतो. आपल्या जिवावर पुण्य कमावण्याची संधी बहाल करायला मग हीच लेकरं विचित्र अवतार लेवून सरसावतात. आपले रूप जेवढे ओंगळवाणे तेवढी कमाई जास्त, हे त्यांनी जाणलेले असते. लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठीच कोवळ्या वयाचं रडकं मूल कुणाच्यातरी कडेवर येते. कारण, त्यामुळे खिशात पडणारा भिकेचा आकडा वाढणार असतो. खरंतर हाही सरळ सरळ भावनांचा व्यापारच असतो. ‘त्या’ दुकानदाराला हे सारं ठाऊक असते म्हणून तो कशालाच बधत नाही, एवढंच. लोकांनी चोखाळलेल्या मार्गानेही ही समस्या निकाली निघणार नसल्याचीही खात्री असतेच मनात त्याच्या...

Saturday, April 27, 2019

पालकमैत्री...


शहरात बॉयफ्रेण्ड-गर्लफ्रेण्डची संकल्पना नेमकी कुठवर पोहोचली आहे, याचा अंदाज बांधायचा असेल, अंदाज कशाला वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल, तर एकदा मेडिकल शॉपच्या बाहेर उभे राहून फक्त निरीक्षण करा. कुठल्या वयाची मुलं कोंडोम्स खरेदीसाठी येतात, त्यात युवतींचे प्रमाण किती असते, याचे अवलोकन केले तर भयानक वास्तव समोर येईल. बीअरशॉपीतील तरुणांच्या गर्दीपासून, तर ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या युवकांपर्यंत... सारेच अतर्क्य, धक्कादायक आहे. सारी सुखं पैशानं विकत घेऊन पायाशी उधळण्याच्या धडपडीत पोरांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवण्याचं राहूनच चाललं असल्याचं भान मात्र हरपत चाललं आहे. आई-वडील दोघेही कमावते असलेल्या घरात तर चित्र आणखीच विदारक. स्वीगी, झोमॅटोवरून वाट्‌टेल त्या हॉटेलातून पाहिजे ते खाद्यपदार्थ मागवण्याची अन्‌ खाण्याची मुभा आहे. आईच्या हातची चव तेवढी हरवली आहे. गोष्ट सांगणार्‍या आजीची जागा आई-बाबांच्याही वाट्याला आलेली नाही. ती इंटरनेट आणि मोबाईलने मिळवली आहे कधीचीच. त्या माध्यमातून पुढ्यात नेमकं जे मांडलं जातंय्‌, ते कुणाच्याच नियंत्रणात राहिलेलं नाही आता. 



परिस्थिती अतिशय भीषण आहे. भविष्यात त्याचे पडसाद कसे उमटतील, येत्या काळात त्याचे परिणाम कसे भोगावे लागतील माहीत नाही. मराठी माध्यमातून शिकून इथवर आलेली पिढी आपल्या पाल्यांना मात्र त्या माध्यमातून शिकवायला तयार नाही. सर्वांची स्वप्नं आकाशाला भिडणारी आहेत. त्यापेक्षा कमी कुणालाच काहीच नकोय्‌. यश, अपयशाचे मापदंड ठरले आहेत. त्या चाकोरीबाहेर जायची तयारी नाही कुणाचीच. बरं, यशाचे आकर्षण इतके की, अपयश थेट युद्धातील पराजयाच्या पंक्तीत जाऊन बसलेलं. त्याच्यातर वाटेनेही जायला नको! विद्यार्थ्यांच्या बाबतीत यशापयशाचे परिमाण परीक्षेत प्राप्त होणार्‍या गुणांवरून तोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे, अपयश पदरी पडलेले सुमारे चार हजार विद्यार्थी इथे दरवर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवतात. निदान पन्नास हजार पोरं वेगवेगळ्या कारणांमुळे घरातून पळून जातात. साठ टक्के तरुणाई कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. अश्लील वेबसाईट्‌स बघणे, ही या वयोगटासाठी सामान्य बाब झाली आहे. गावखेड्यातल्या पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. तिथे जगण्याच्या विवंचनेनेच इतके घेरले आहे की, मुलांच्या भवितव्याबाबत चिंता वाहायला फुरसत होत नाही कुणाला. याउलट, शहरातील लोक इतके जागरूक झाले आहेत की, पोरांपेक्षाही आईबापालाच पोरांच्या भवितव्याची चिंता लागून राहिलेली असते. बारावीनंतर पोरानं इंजिनीअर व्हायचं की डॉक्टर, हे पालकांनीच ठरवून टाकलेले असते. स्वत:च्या स्वप्नांचे ओझे त्याच्या खांद्यावर टाकून आस लावून बसलेले असतात पालक. प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण मोठ्यातल्या मोठ्या कोिंचग क्लासमध्ये पोराला प्रवेश मिळाला पाहिजे. चांगल्यात चांगल्या महाविद्यालयात त्याला एकदा प्रवेश मिळाला की आयुष्याचं ईप्सित साध्य झाल्याच्या समाधानात न्हाऊन निघायला मोकळे सारे. आयुष्य म्हणजे जणू शर्यत होऊन बसले आहे. परिणाम सरळ आहे. जिंकण्यासाठी धावणार्‍यांची गर्दी जमली आहे सर्वदूर. मुलांनी अभ्यासात हुशार असलं पाहिजे. शिवाय त्याला क्रीडा, संगीत, नृत्यादी कलाविष्कारही साधता आला पाहिजे.
 एकूण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साध्य करण्यासाठीचा त्याचा ध्यास असला पाहिजे, यासाठी सारा अट्‌टहास. त्यासाठी हवे ते करण्याची तयारी. आपल्या आयुष्यात आपल्याला जे मिळालं नाही ते सारंकाही मुलांना देण्याच्या नादात सारेच भरकटताहेत...
शहरात बॉयफ्रेण्ड-गर्लफ्रेण्डची संकल्पना नेमकी कुठवर पोहोचली आहे, याचा अंदाज बांधायचा असेल, अंदाज कशाला वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल, तर एकदा मेडिकल शॉपच्या बाहेर उभे राहून फक्त निरीक्षण करा. कुठल्या वयाची मुलं कोंडोम्स खरेदीसाठी येतात, त्यात युवतींचे प्रमाण किती असते, याचे अवलोकन केले तर भयानक वास्तव समोर येईल. बीअरशॉपीतील तरुणांच्या गर्दीपासून, तर ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या युवकांपर्यंत... सारेच अतर्क्य, धक्कादायक आहे. सारी सुखं पैशानं विकत घेऊन पायाशी उधळण्याच्या धडपडीत पोरांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवण्याचं राहूनच चाललं असल्याचं भान मात्र हरपत चाललं आहे. आई-वडील दोघेही कमावते असलेल्या घरात तर चित्र आणखीच विदारक. स्वीगी, झोमॅटोवरून वाट्‌टेल त्या हॉटेलातून पाहिजे ते खाद्यपदार्थ मागवण्याची अन्‌ खाण्याची मुभा आहे. आईच्या हातची चव तेवढी हरवली आहे. गोष्ट सांगणार्‍या आजीची जागा आई-बाबांच्याही वाट्याला आलेली नाही. ती इंटरनेट आणि मोबाईलने मिळवली आहे कधीचीच. त्या माध्यमातून पुढ्यात नेमकं जे मांडलं जातंय्‌, ते कुणाच्याच नियंत्रणात राहिलेलं नाही आता. घडीभराची फुरसत नसलेली माणसं तासन्‌तास या मायाजाळात गुरफटलेली असतात. राहिला प्रश्न पालकांचा, तर आपण आपल्या घामाच्या पैशातून आपल्या मुलांसाठी ही सुविधा निर्माण करू शकलोय्‌, याचंच फक्त समाधान त्यांच्या चेहर्‍यावर असतं. यशाची स्पर्धा इतकी खोलवर रुजलीय्‌ की, सुमार दर्जामुळे शिक्षणाचे खोबरे झाले तरी प्रत्येकालाच इंजिनीअर किंवा  डॉक्टर व्हायचं आहे. हो! कारण त्याच्यापलीकडेही शिक्षणाची दालनं खुली असल्याच्या वस्तुस्थितीचेही भान हरपले आहे केव्हाच.
 शिक्षण... ते दर्जेदार असलंच पाहिजे, याची गरज नाही. हा, शैक्षणिक संस्था मात्र नावारूपाला आलेलीच हवी. प्रवेश तिथेच मिळायला हवा. मग पैशाचा कितीही पाऊस पाडावा लागला तरी चालेल. त्यासाठी मेहनत करावी लागली, राजकीय दबाव आणावा लागला, संबंध वापरावे लागले तरी चालेल. शिक्षणानंतर नोकरी. करीअर. लग्न. मग सुखाचा संसार. बस्स! एवढं झालं की, जणू जीवनाचे ईप्सित साध्य झाल्याचीच अनुभूती... या वावटळीत, अनेकांच्या बाबतीत तंबाखूपासून तर बीअरपर्यंत अन्‌ सिगारेटीपासून तर ड्रग्जपर्यंतचा प्रवास कुठून सुरू झाला, कुठवर येऊन पोहोचला, याचा अदमासच घेता येत नाही पालकांना.
मुलं व्यसनाधीन कशी होतात, घरून मिळणारा पैसा खूप जास्त असेल तरी िंकवा तो कमी पडत असेल तरी ती वाईट मार्गाने कशी वळतात, ती िंहसक कशी बनतात, घरून पळून जाण्याची िंहमत त्यांच्यात येते कशी... या सर्वांची कारणं परिस्थिती, पैसा, संस्कार आणि शेवटी पालकांपाशी येऊन थांबतात. सुखाची उधळण करण्याच्या नादात हवे तिथे टोकायचे राहून जाते, चुकांवर बोट न ठेवण्याची चूक भविष्यात भोवते. मुलांवर स्वत:च्या वर्तणुकीतून अप्रत्यक्षपणे संस्कार रुजविण्याच्या पद्धतीचा अभाव कित्येक प्रश्न निर्माण करून जातो. पालक आणि पाल्यांमधील संवादाच्या अभावातूनच कित्येक समस्या उद्भवलेल्या असतात खरंतर. कारण त्या संवादातूनच स्वत:कडे, समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. सभोवतालच्या लोकांना गृहीत धरण्याची, न धरण्याची तर्‍हा बदलते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठीची धडपड सुरुवातीला मनात अवतरते अन्‌ कृतीतून व्यक्त होते. आताशा समाजासाठी मूठभर काही केले की, त्याचा पसाभर गवगवा करण्यात धन्यता मानणार्‍यांची गर्दी उदंड झाली आहे. काही लोक तर, कशाशीच काहीच घेणेदेणे नसल्यागत वागतात. निर्विकार. मुद्दा, मुलं एकत नसल्याचा असो, की मग त्याने पानठेल्यावर चकाट्या पिटत दिवस वाया घालवण्याचा. विषय, त्याचे मन अभ्यासात न लागण्याचा असो, की मग त्यांनी गर्लफे्रण्ड-बॉयफ्रेण्डच्या नादात अडकण्याचा, दोष पालकांचाही तितकाच. या दाहक वास्तवातून साकारली ती पालकमैत्रीची संकल्पना- नागपूरच्या डॉ. संध्या पवार यांच्या कल्पनेतून.
 डॉ. संध्या पवार. एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व. तशा तर संध्याताई पीएच्‌. डी. झालेल्या. पण, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवतात. आता जिल्हा परिषदेची शाळा हा काय कौतुकाचा विषय? पण, त्यानिमित्ताने गावखेड्यातल्या समस्यांशी सामना झाला. तिसरी-चौथीत शिकणारी मुलं तंबाखू, गुटखा खातात. हाणामार्‍या करतात. बिनधास्तपणे चाकू-छुरे काढतात. दादागिरी करतात. अभ्यासाच्या बाबतीत पालकांनी लादलेल्या अपेक्षांचे ओझे पेलवले नाही की, महाविद्यालयातही याच पद्धतीने मर्दुमकी सिद्ध करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून होतो. या मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून रोखण्याचा प्रयत्न संध्याताईंनी केला. एक-दोन नव्हे, तब्बल तीनशे शाळांमधून जागृतीकरिता भाषणं दिली. ते करताना लक्षात असं आलं की, कित्येक घरात पालकांपासूनच या सवयीचा प्रवाह सुरू झालाय्‌. मग मुलांकरवी तो तिथेच थांबवण्याचा प्रयत्न झाला. बदलत्या काळातील मुलांच्या वाईट सवयींबाबत पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयोग सुरू झाला तो याच अनुभवातून. नंतरच्या काळात राजेश वैरागडे व इतरांची साथ लाभत गेली आणि पालकमैत्रीचा उपक्रम काळानुरूप बदलांसह अंमलात येत राहिला. या माध्यमातून शाळा-शाळा, वस्त्या-वस्त्यांमधून पालकांशी संवाद साधला जातो. नुसत्या पैशानं विकत घेतलेल्या सुविधा पदरात टाकून सुखाच्या रेघोट्या ओढत राहिलात तर परिणाम ‘हेच’ दिसतील. सुविधा पायाशी लोळण घेत असतानाही वाट्याला निराशा तेवढी येईल. त्यामुळे स्वप्नांचा बाजार मांडण्यापेक्षा मुलांना वास्तवाशी झगडण्याचे धैर्य आणि बळ देण्याची शिकवण देण्याची गळ पालकांना घातली जाते. शेवटी मुलांच्या डोक्यावर अपेक्षांचे डोंगर तर त्यांनीच उभे केलेले असते ना! पालकमैत्रीचा उपक्रम हा ते ओझे कमी करण्याचा एक प्रयत्न आहे...

Friday, April 19, 2019

राजसाहेब, पवारांनंतर तुम्हीच!


कही उमेदवार मैदानात उतरविण्याची परिस्थिती नसलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने, मतदारांनी कुणाला निवडून द्यावे, याबाबतचे ज्ञान पाजळण्याची कला खरंतर दुर्मिळच. पण, आपण ती लीलया साध्य केली आहे. राजसाहेब, आपलं किती कौतुक करावं हेच कळत नाहीय्‌ बघा! कालपर्यंत वाटत होतं, राजकारणात सरड्यासारखे रंग बदलण्याची जी कला पवारांना साधली आहे, तो वारसा भविष्यात कोण सांभाळणार? कधी कॉंग्रेसमध्ये, कधी पुलोदचा प्रयोग, मग पुन्हा कॉंग्रेसमध्ये, मग सोनियांना विरोध, मग त्याच सोनियांच्या मदतीने सत्तेत सहभाग, गेल्या निवडणुकीत तर मागितल्यास भाजपालाही पािंठबा द्यायला तयार झाले होते ते... राजकारणातले इतके विरोधाभास ज्या व्यक्तीला सहज निर्माण करता आले अन्‌ तितक्याच सहजतेने जनतेच्या गळी उतरवताही आले... हे असलं विचित्र काही घडवायला पवारच लागतात. वाटलं होतं, पवारांचा वारसा चालविणारा कुणी निर्माण होतो की नाही? पण, परवा पाडव्याच्या मुहूर्ताला तुमचं ते खास लकबीतलं भाषण ऐकलं अन्‌ डोळे पाणावले. ऊर भरून आला. वाटलं, पवारांचा वारसदार सापडला एकदाचा या महाराष्ट्राला. आता चिंता वाहण्याची अजीबात गरज नाही. नीतिमत्ता केराच्या टोपलीत टाकून, विचारधारा फुटबॉलसारखी उडवत, साथीदारांची पत्रास न बाळगता, जनतेला काल काय सांगितलं होतं हे विसरून, जणू आजच नव्याने काही सांगत असल्याचा आव आणत वार्‍याची दिशा बघून रंग बदलणारा नेता या राज्याला लाभलाय्‌ तो ‘आपल्या’ रूपाने. व्वा! राजसाहेब. त्रिवार कुर्निसात आपल्याला!




राजसाहेब,
त्रिवार कुर्निसात!
हो! गेल्या काही दिवसांत ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची सवय सुटली म्हणे आपली! ज्या लोकांच्या सेवेत सध्या आपले दिवस चालले आहेत, तिकडे हुजरेगिरीलाच प्राधान्य आहे! तेव्हा म्हटलं सरळ कुर्निसातच करावा. सध्या बरीच धावपळ चालली असणार ना राजे? किती त्या सभा, किती ते बोलणे... एकही उमेदवार मैदानात उतरविण्याची परिस्थिती नसलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने, मतदारांनी कुणाला निवडून द्यावे, याबाबतचे ज्ञान पाजळण्याची कला खरंतर दुर्मिळच. पण, आपण ती लीलया साध्य केली आहे. राजसाहेब, आपलं किती कौतुक करावं हेच कळत नाहीय्‌ बघा! कालपर्यंत वाटत होतं, राजकारणात सरड्यासारखे रंग बदलण्याची जी कला पवारांना साधली आहे, तो वारसा भविष्यात कोण सांभाळणार? कधी कॉंग्रेसमध्ये, कधी पुलोदचा प्रयोग, मग पुन्हा कॉंग्रेसमध्ये, मग सोनियांना विरोध, मग त्याच सोनियांच्या मदतीने सत्तेत सहभाग, गेल्या निवडणुकीत तर मागितल्यास भाजपालाही पािंठबा द्यायला तयार झाले होते ते... राजकारणातले इतके विरोधाभास ज्या व्यक्तीला सहज निर्माण करता आले अन्‌ तितक्याच सहजतेने जनतेच्या गळी उतरवताही आले... हे असलं विचित्र काही घडवायला पवारच लागतात. वाटलं होतं, पवारांचा वारसा चालविणारा कुणी निर्माण होतो की नाही? पण, परवा पाडव्याच्या मुहूर्ताला तुमचं ते खास लकबीतलं भाषण ऐकलं अन्‌ डोळे पाणावले. ऊर भरून आला. वाटलं, पवारांचा वारसदार सापडला एकदाचा या महाराष्ट्राला. आता चिंता वाहण्याची अजीबात गरज नाही. नीतिमत्ता केराच्या टोपलीत टाकून, विचारधारा फुटबॉलसारखी उडवत, साथीदारांची पत्रास न बाळगता, जनतेला काल काय सांगितलं होतं हे विसरून, जणू आजच नव्याने काही सांगत असल्याचा आव आणत वार्‍याची दिशा बघून रंग बदलणारा नेता या राज्याला लाभलाय्‌ तो ‘आपल्या’ रूपाने. व्वा! राजसाहेब. त्रिवार कुर्निसात आपल्याला!
 खरंतर राजकीय पक्षांनी निवडणुकी लढवायच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधिमंडळ, संसदेपर्यंत सर्वदूर आपले उमेदवार उभे करायचे. त्यांना निवडून आणण्यासाठी नेत्यांनी ताकद पणाला लावायची. प्रसंगी स्वत: मैदानात उतरायचे. जनतेला साद घालायची. हेच तर घडत आलेय्‌ आजवर. पण, इथे तर आश्चर्याचा धक्का आहे. इथे एका राजकीय पक्षाचा नेता स्वत: निवडणुकीत उभे न राहता तिसर्‍याच राजकीय पक्षाला निवडून द्या अन्‌ चौथ्याला अजीबात निवडून देऊ नका, असे सांगत सुटलाय्‌... बरं, त्याहून कहर असा की, ज्या पक्षाच्या नेत्याला तो आज झिडकारतोय्‌, त्याचे पाय धुवून पाणी पिण्याचा सल्ला याच राजसाहेबांनी गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता...
राजसाहेब, असले विरोधाभास दर्शविणारे टुकार विनोद करण्याची बिशाद आणि कसब फक्त आपलेच! ज्या तर्‍हेची भाषणं आपण मुंबई, सोलापुरात केलीत, खरंतर तसल्या अभ्यासपूर्ण भाषणाची गरज विधिमंडळ, संसदेत असते. चार महिन्यांनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आलेच कुणी चुकून आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून, तर शिकवा त्यांना, तिथे भाषण कसे करायचे, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास कसा करायचा, मुद्दा कसा मांडायचा अन्‌ खोटा असला तरी तो सिद्ध कसा करायचा असतो ते. हां, पण तोवर तुमची प्रॅक्टिस चालू द्या. जनता लय भारी आहे आपल्या देशातली. चुटकीसरशी मूर्ख बनवता येते तिला (खरं सांगा, आपल्यालाही असंच वाटतं ना?). आपलं शिवसेनेतून बाहेर पडणं, मनसेची स्थापना, ‘बाळासाहेबांचा आदर राखून’ शिवसेनेला शिव्या हासडणं, कधी भाजपाचा पदर धर, तर कधी कॉंग्रेसला मदत कर... एखाद्या मुद्यावर भाजपाच्या बाजूने, तर दुसर्‍याच क्षणी दुसर्‍या मुद्यावर विरोध, या पद्धतीने कारभार चालवला मनसेच्या तेरा सदस्यांनी गेल्या सत्रात. बहुधा म्हणूनच की काय, पण लोकांनीही तीनतेरा वाजवले! पक्षाचे जाहीर धोरणही असेच बदलत राहिले. खुद्द राजसाहेब कधी शिवसेनेसाठी, कधी त्यांच्या विरोधात, गेल्या निवडणुकीत मोदींच्या बाजूने, यंदा मोदींच्या विरोधात, गेल्या वेळी गुजरातेत जाऊन आल्याबरोबर प्रभावित झाल्याची बतावणी, यंदा मात्र त्या दौर्‍यात काही खास बघायला मिळालं नव्हतं असा कांगावा... व्वा! राजसाहेब, व्वा! अशाने तर सरड्यांनाही मागे टाकाल तुम्ही, रंग बदलण्याच्या स्पर्धेत!
पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्या पक्षाला साफ नाकारलं, हे वास्तव खिशात बाळगून ज्या ऐटीत आपण राजकारणात विनासायास वावरत आहात ना राजसाहेब, मान गये बॉस! याला म्हणतात मुजोरी. शिवसेनेशी फारकत घेऊन मनसे स्थापन केलीत, ती वैयक्तिक स्वार्थापायी. पक्षाचे प्रमुखपद वाट्याला आले नाही म्हणून. पण, नंतरच्या काळात किती म्हणून किती सोयीचे राजकारण करत आलात आपण? तुम्ही सांगणार अन्‌ लोक ऐकणार, असंच ना? ते, मुंबईत येऊन धडकणार्‍या बिहारी, उत्तरप्रदेशी तरुणांना नंतर कधी आडवे आले नाहीत आपल्या पक्षाचे सैनिक. मराठी तरुणांची रोजगाराची गरज संपली की काय आता? पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेल्या टीव्ही मालिकेला सुरुवातीला विरोध करून नंतर तिचा मार्ग मोकळा करून देण्याचा प्रकार असो, की धडाक्यात सुरू होऊन अचानक थांबलेले मनसेचे टोल नाक्यांविरुद्धचे आंदोलन असो, कायम लोकांना गृहीत धरून निर्णय बदलत राहिलात साहेब तुम्ही. परवाही स्वत:च्या बदललेल्या भूमिकेचे निलाजरे समर्थन करण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेतलात! एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती बनत असल्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा कॉंग्रेसला, असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. किती मूर्ख समजता ना तुम्ही राजकारणी लोक जनतेला? मराठी माणसाच्या हिताआड शिवसेना कॉंग्रेसच्या पाठीशी उभी राहिली, असं बाळासाहेबांनी सांगितलं अन्‌ विश्वास बसला लोकांचा लागलीच त्यावर? आता तुम्ही निघालात त्याच धर्तीवर कॉंग्रेसच्या वार्‍याला उभे राहायला? अन्‌ तुमच्यावरही लोकांचा ठाम विश्वास बसावा अशी अपेक्षा करताय्‌? जनता, तुम्ही समजता तितकीही खुळी नाही हो राजसाहेब! कळते तिला तुम्हा राजकारण्यांची लबाडी. मुंबई मनपाची सत्ता वर्षानुवर्षे शिवसेनेच्या खिशात कशी जाते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजसाहेबांच्या मनात मोदींबद्दल अचानक संताप कसा निर्माण होतो... सारंच कळते जनतेला.
आपला चाहता म्हणून एकच विनंती आहे साहेब आपल्याला. निदान मनाची तरी राखा. गेल्या निवडणुकीत ज्यांची स्तुती करून थकला नाहीत त्यांना आता शिवीगाळ करत सुटलात. निदान, स्वत:च्या पक्षाची तरी बूज राखा. लोक मोठ्या आशेनं बघताहेत तुमच्याकडे. कायम काय हो असे कुणाच्यातरी दावणीला बांधून घेता स्वत:ला? पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या शब्दावर काम करतो, याचे भान राखून तरी वापर करा आपल्या शब्दांचा. गेल्या दहा वर्षांत लोकसभेच्या चार जागा लढवण्याइतकीही परिस्थिती निर्माण करू शकला नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धड आकडा गाठू शकला नाहीत. म्हणून तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणार्‍या जनतेला कॉंग्रेसच्या दावणीला बांधायला निघालात? कोण आहेत प्रायोजक तुमच्या जाहीर सभांचे? अन्‌ म्हणे तुमचा सध्याचा निर्णय फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे? म्हणजे स्वत:ची राजकीय सोय बघून चार महिन्यांनी पुन्हा बदलणार तुमची भूमिका? त्यानुरूप आपला निर्णय बदलत जनतेनेही फरफटत यायचे तुमच्या मागे? इतके मूर्ख समजता राजसाहेब तुम्ही मराठी जनतेला? की गृहीत धरता त्यांना?
सभेत ज्याचे व्हिडीओ दाखवलेत, त्या हरिसालला कधी गेला होतात? वर्षभरापूर्वी केव्हातरी जाऊन आलात त्या भरवशावर दिली ठोकून आता. पुण्यात राहून मेळघाटात काम करणार्‍या ज्या कुण्या तुमच्या पक्षकार्यकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत प्रचार करत निघालात, एकदा वस्तुस्थिती शंभर टक्के आपण म्हणता तशीच आहे का हे तपासून तरी घ्या. सरकार म्हणते तेवढी तिथली स्थिती सुधारली नसेलही, पण आपण दाखवली तेवढीही ती वाईट नाही. हरिसालच्या पंचक्रोशीतील गावे या डिजिटलायझेशनचा उपयोग करताहेत आज. दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लवादा गावातील बांबू केंद्राची आयटीशी संबंधित कामे हरीसालमधील सुविधेच्याच भरवशावर चालली आहेत. मग खोटे का सांगताहात जनतेला? कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मदत करण्याची शपथ घेऊन बसलात की काय यंदा? म्हणून चाललाय्‌ मोदींविरुद्धचा हा थयथयाट? तुम्ही जरूर करा तुमचे राजकारण. नाहीतरी दर निवडणुकीत वेगवेगळ्या लोकांकरता मते मागण्याचा एव्हाना सराव झाला आहेच तुम्हाला. पण, जनतेला गृहीत धरून तरी राजकारण करू नका!
आपलाच,
एक चाहता
(भविष्यातही राहीलच याची खात्री नसलेला!)

Friday, March 29, 2019

हा न्यायालयीन अधीक्षेप की राजकारण?

डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे हत्याप्रकरणातील चौकशीच्या संथ गतीवरून काल न्यायालयाने मुख्यमंत्र्याच्या नावाने अक्षरश: शिमगा केला. आता यातही आम्हीच लक्ष घालायचे का, वगैरे प्रश्नांचा भडिमार त्याआडून आला. खरं तर, न्यायालयानेच मागील काही वर्षात आपल्या कार्याच्या कक्षा अकारण विस्तारल्या आहेत. लक्षावधी प्रकरणे न्यायदानासाठी वर्षानुवर्षे रखडली असताना, या न्याय व्यवस्थेला सार्वजनिक विषयांवरील अनेकानेक वादग्रस्त विषयांत लक्ष घालायला बर्‍यापैकी सवड होत असल्याचे चित्र त्यातून आपसूकच निर्माण झाले आहे. शिवाय मानवी जीवनाशी संबंधित कित्येक खाजगी विषयांवर व्यक्त होणारे न्यायालयाचे मत, दरवेळी गरजेचे असतेच असे नाही. पण तरीही अवैध संबंधांपासून तर सामाजिक मूल्यांबाबत शहाणपण शिकवणारी मतं प्रसूत होत राहतात, या व्यवस्थेकडून. गृह विभागाचा कारभार अखत्यारीत असला तरी, गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणाची चौकशी काही स्वत: मुख्यमंत्री करीत नाहीयेत्‌, हे ठावूक असतानाही जर चौकशीच्या संथ गतीवर न्यायालयाला मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढावेसे वाटत असतील, तर आजघडीला न्यायालयात निर्णयाविना पडून असलेल्या सुमारे तीन कोटी केसेसच्या बाबतीत, त्यात न्यायदानाला होत असलेल्या विलंबाबाबत कोणावर ताशेरे ओढायचे हेही स्पष्ट झाले पाहिजे.



लोकशाही व्यवस्थेचे स्तंभ मानल्या गेलेल्या न्याय प्रणालीचा इतर क्षेत्रातला कमालीचा हस्तक्षेप आक्षेपार्ह ठरू लागला असताना, साध्या साध्या, छोट्या छोट्या बाबतीत निर्देश देण्याची वेळ न्याय व्यवस्थेवर वारंवार येत असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा निलाजरा कारभार पुन्हा वारंवार अधोरेखित होतोय्‌. एक काळ होता, तालुक्याच्या झुणका भाकर केंद्रावर भाकर खाऊन गेलेल्या ग्राहकांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचे नाव दिसले तर बातमी व्हायची. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून अमिताभ बच्चन यांना धान्य वितरीत झाल्याचा किस्साही जुना झाला आता. पण संगणक युगात मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून बिअर बार आणि मुंबई मनपा आयुक्तांच्या नावाने हुक्का पार्लर जारी करणार्‍या प्रशासनाचे कौतुक करावे की चौकात उभे करून थोबाडं फोडून काढावीत एकेकाची, कळत नाही. झोपेत कामं चालली आहेत का यांची? दारू परवान्यासाठी ऑन लाईन अर्ज सादर होतात. त्याची तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. किचकट कायद्यांच्या आडून ढीगभर कागदपत्रांची मागणी करणारी बाबू नावाची जमात, त्या कागदपत्रांची तपासणी करीत नाही. नामसादृश्याची शक्यता गृहीत धरली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव नजरेखालून गेल्यावर संशय येत नाही कुणाच्याच मनात? सहजासहजी परवाने जारी होतात, त्याच नावाने? हे प्रशासन आहे की तमाशा? खिशात मावणार नाही एवढा पगार अन्‌ त्याहून दुप्पट वरकमाईवर दावा सांगणारे सारे सरकारी बाबू या असल्या तमाशासाठीच प्रसिद्ध पावले आहेत. सामान्य माणसाला दारातही उभे न करण्याची अन्‌ पैसे मोजेल त्याच्यापुढे लोटांगण घालण्याची त्यांची तर्‍हा सरकारच्या बदनामीसही कारणीभूत ठरते अनेकदा.
गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील चौकशीच्या संथ गतीवरून काल न्यायालयाने मुख्यमंत्र्याच्या नावाने अक्षरश: शिमगा केला. आता यातही आम्हीच लक्ष घालायचे का, वगैरे प्रश्नांचा भडिमार त्याआडून आला. खरं तर, न्यायालयानेच मागील काही वर्षात आपल्या कार्याच्या कक्षा अकारण विस्तारल्या आहेत. लक्षावधी प्रकरणे न्यायदानासाठी वर्षानुवर्षे रखडली असताना, या न्याय व्यवस्थेला सार्वजनिक विषयांवरील अनेकानेक वादग्रस्त विषयांत लक्ष घालायला बर्‍यापैकी सवड होत असल्याचे चित्र त्यातून आपसूकच निर्माण झाले आहे. शिवाय मानवी जीवनाशी संबंधित कित्येक खाजगी विषयांवर व्यक्त होणारे न्यायालयाचे मत, दरवेळी गरजेचे असतेच असे नाही. पण तरीही अवैध संबंधांपासून तर सामाजिक मूल्यांबाबत शहाणपण शिकवणारी मतं प्रसूत होत राहतात, या व्यवस्थेकडून. गृह विभागाचा कारभार अखत्यारीत असला तरी, गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणाची चौकशी काही स्वत: मुख्यमंत्री करीत नाहीयेत्‌, हे ठावूक असतानाही जर चौकशीच्या संथ गतीवर न्यायालयाला मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढावेसे वाटत असतील, तर आजघडीला न्यायालयात निर्णयाविना पडून असलेल्या सुमारे तीन कोटी केसेसच्या बाबतीत, त्यात न्यायदानाला होत असलेल्या विलंबाबाबत कोणावर ताशेरे ओढायचे हेही स्पष्ट झाले पाहिजे. त्या विलंबाला जर ‘व्यवस्था’ दोषी असल्याचे न्यायालयाचे मत असेल, तर एकूणच ‘सरकारी’ व्यवस्थेला धारेवर धरले पाहिजे. एरवी सर्वसामान्य माणसाने दाखल केलेल्या प्रकरणात कशा तारखांवर तारखा मिळतात अन्‌ सलमानखानवर अटकेची कारवाई होताच त्याला जामीन जारी करण्याचा निर्णय कसा विक्रमी वेळेत होतो, याचा अनुभव तर घेते आहे या देशातली जनता. समर्थन कशाचेच नाही. पण, कोर्टात दाखल झालेल्या एखाद्या प्रकरणात तब्बल वीस-वीस, पंचेवीस-पंचेवीस वर्षांनी निर्णय घोषित करताना जराही खंत न वाटणार्‍या न्यायासनाला, अन्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासातील विलंब जरासाही खपत नाही, हे नाही म्हणायला काहीसे आश्चर्यजनकच आहे.
 
भरपूर पगार, भरपूर वरकमाई, सुविधांचा पाऊस, सुट्यांची रेलचेल आणि जबाबदार्‍यांचे जराही झेंगट मागे नसलेल्या सरकारी यंत्रणेतील बाबूगिरी काय लायकीची आहे, काम करण्याची तिची काय तर्‍हा आहे, याची कल्पना न्याय व्यवस्थेला नाही असे थोडीच आहे? पण ती व्यवस्था कशासाठीच जबाबदार नसते, हे खरे दुर्दैव आहे. तिला चुकीसाठी शिक्षा नाही की झालेल्या नुकसानीसाठी दंड नाही. जनतेच्या कामाला उशिर झाल्याचा जाब देण्याची गरज नाही की, काम केले नाही म्हणून कुणी धारेवरही धरत नाही. त्यामुळे दिवसागणिक निर्धास्त, बेजबाबदार होत चालला आहे लोकशाहीचा हा स्तंभ. सामाजिक दायित्व तर सोडाच पण, ज्याच्या मोबदल्यात वेतन मिळते ते काम ईमानदारीने पूर्ण करण्याचे सौजन्यही सिद्ध करीत नाही इथे कुणी. कुणालाच खंत नसते कशाचीच.
 
मुख्यमंत्र्यांच्या, आयुक्तांच्या नावाने कुणीतरी अर्ज सादर करतो अन्‌ प्रशासकीय व्यवस्थेतून तो बिनदिक्कतपणे मंजूर होतो, हा चमत्कार का उगाच घडू शकतो या देशात? या परिस्थितीची पूर्ण कल्पना असलेल्या न्यायप्रणालीने आपल्या देशातील कार्यप्रणालीच्या कार्यपद्धतीवरही बोलले पाहिजे कधीतरी. त्याच्या मुजोरीने त्रस्त झाली आहे जनता. तिला तर भिकही घालत नाही इथे कोणीच. ना कार्यप्रणाली, ना न्याय व्यवस्था. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही म्हण खरी ठरविण्यासाठीच जणू धडपडताहेत सारे. हरवलेल्यांचा शोध घेण्याचे आदेश जारी करणे, सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय देणे, पालिका आयुक्ताच्या भूमिकेत रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे आदेश जारी करणे, हे खरंच न्यायालयाचे काम नाही. पण मग असली प्रकरणे दाखल करून का घेतली जातात? एखादा चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हा चित्रपट निर्मात्याच्या सुपीक डोक्यातून तयार झालेला, प्रसिद्धीचा अफलातून फंडा आहे, हे कळत नाही का न्याय व्यवस्थेला? मग का दुरुपयोग करू दिला जातो कुणालातरी न्याय प्रक्रियेचा? इतर प्रलंबित प्रकरणांकडे दुर्लक्ष करून या बाबींकडे लक्ष देण्याची वेळ न्यायाधीशांवर येणे ही खरं तर लाजिरवाणी बाब. पण, मुद्दा असा आहे की ही लाजिरवाणी परिस्थिती उद्धभवली कशी? कोण जबाबदार आहे त्यासाठी? का उठसूठ न्यायालयात धाव घेऊ लागले आहेत लोक आताशा? इथे न्याय मिळतो (?) हा विश्वास बळावलाय्‌ की कुणालातरी अद्दल घडवायची असेल, तर हे त्यासाठीचे हे ‘योग्य’ ठिकाण असल्याचा समज दृढ होतोय्‌ लोकांच्या मनात अलीकडे?
 
इतके घोटाळे झाले, राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे अलीकडच्या काळात उजेडात आलीत. प्रशासनातील अधिकार्‍यांच्या सहकार्याविनाच घडू शकलीत ही प्रकरणं? मुंबईतला आदर्श घोटाळा तर राजकारणी आणि प्रशासनिक अधिकार्‍यांच्या आपसातील ‘सामंजस्याच्या’ अफलातून मिलाफाचा परिपाक होता. त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर विराजमान अशोक चव्हाणांना त्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. पण किती आयएएस अधिकार्‍यांवर कारवाई झाली? घोटाळा तर त्यांनीही केला होता. वाहत्या गंगेत हात तर त्यांनीही धुवून घेतले होते. फ्लॅट्‌स तर त्यांनीही लाटले होते. पण या घोटाळ्यासाठी ते जबाबदार ठरले नाहीत.
 
या एकूणच परिस्थितीचा परिणाम असा आहे की, सामान्य माणसाला कस्पटासमान वागवणारी एक मुजोर सरकारी यंत्रणा इथे अस्तित्वात आली आहे. त्याला पाठीशी घालणारी प्रणालीही सोबतीने उभी राहिली आहे. कधी न्याय व्यवस्थेच्या आडून तर कधी राजकारण्यांच्या वरदहस्ताने. त्यामुळे कार्यपालिकेच्या मुजोर वर्तणुकीला जाब विचारणारा कोणीच नाही. आताही बघा ना, पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरण घडले या आधीच्या सरकारच्या काळात. खूप दिवसपर्यंत काहीच प्रगती दिसून येत नाही हे लक्षात आल्यावर न्यायालयाने विशेष तपास यंत्रणा नेमली. आधीच्या तपास यंत्रणेचा भोंगळ कारभार ध्यानात आल्यावरची ती कारवाई होती. आताही तपास यंत्रणेबाबत कुणीच काही बोलत नाहीय्‌. अगदी न्यायालय सुद्धा. 2013 मध्ये झालेल्या दाभोळकरांच्या हत्येप्रकरणाचे धागेदोरे गेल्या सहा वर्षात शोधू न शकलेल्या यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवायला खुद्द न्यायालयाही तयार नाही. त्यांनाही, या तपास यंत्रणेवर लक्ष ठेवणार्‍या गृहमंत्र्यांवर ताशेरे ओढून मोकळे होणे सोपे वाटले. खरंच, कोण कोणाची पाठराखण करतेय्‌ अन्‌ कोण कशाचे राजकारण करतेय्‌ हेच कळेनासे झाले आहे बघा...