Saturday, April 21, 2018

नात्यांचं सौंदर्य जपलं पाहिजे ना...?

नर आणि मादीच्या पलीकडेही स्त्री-पुरुषांमधली नाती आकार घेऊ शकतात, हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकताही हरवून बसलो आहोत आपण सारेच? चार वर्षांच्याच कशाला, अगदी तान्हुल्या बाळालाही वासनेची शिकार बनविणार्‍या राक्षसी वृत्तीचा, रस्त्याने जाता-येतानाही मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या गर्दीच्या बेताल वागण्याचाही परिणाम असेल तो कदाचित, पण म्हणून स्त्री-पुरुषांमधली निरागस, निखळ नात्यांची कल्पनाही इथल्या जनसमुदायाला मानवणार नसेल, तर संपलंच सारं! परवा चेन्नईच्या राजभवनात जे घडलं त्याचे करायचे त्यांनी जरूर राजकारण करावे. ‘त्या’ मुलीलाही घडल्या प्रकरणाचे निमित्त करून जे साधायचेय्‌ ते तिने जरूर साधावे. पण, म्हणून उर्वरित जनसमुदायानेही स्त्री-पुरुषांमधील इतर सार्‍या नात्यांची वीण कल्पनातीत ठरवून केवळ एका मार्यादेत ते नाते बंदिस्त करण्याचा प्रयत्न करावा, हे मात्र अयोग्यच. आधीच आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रीलेशनशिप’पासून तर समलैंगिक संबंधांपर्यंतच्या कित्येक बाबी सहजपणे स्वीकारून बसलेल्या सामाजाची घडी अधिक विसकटू द्यायची नसेल, तर स्त्री-पुरुषांमधील काही निरागस, निरलस नात्यांचं सौंदर्य जपायलाही शिकलं पाहिजे ना आपण...?

तामिळनाडूच्या राज्यपालांनी एका महिला पत्रकाराच्या गालावर प्रेमाने चापट मारण्याचे, काही लोकांनी पद्धतशीरपणे उभे केलेले ‘प्रकरण’ सध्या नको तेवढे गाजते आहे. नव्हे, ते गाजविण्याची व्यवस्था तितक्याच व्यवस्थितपणे केली जाते आहे. आपल्या देशात राष्ट्रपती, राज्यपाल ही पदं आणि त्या पदावरील व्यक्तींना आम्ही इतक्या वर नेऊन बसवलं आहे, की त्या पदावरील व्यक्तींनी जरासेही परिघाबाहेर येऊन वागलेले इथल्या जनतेलाच सहन होत नाही. त्यांनी राजासारखंच वागलं पाहिजे अन्‌ उर्वरित जनतेने दरबारी अदब ध्यानात ठेवून आपल्या वर्तणुकीची रीत निर्धारित करावी, हेच सर्वांना अपेक्षित आहे. बहुधा म्हणूनच कुठल्याशा देशात तिथले पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी सायकलने फिरतात म्हटल्यावर आश्चर्याने बोटे तोंडात जातात आमची. पूर्णपणे इंग्रजांकडून उधार घेतलेली ही राजेशाही रीत मोडून एका राज्यपालांनी पत्रकारांच्या घोळक्यात सहभागी होणे, कुणाशी हात मिळवणे हेदेखील ‘दरबारी’ पद्धतीवर पूर्ण विश्वास असलेल्यांसाठी अप्रूपच! त्यात बनवारीलाल पुरोहित यांनी तर एका महिला पत्रकाराच्या गालावर चापट मारलेली... पत्रकारिता आणि समाजमनाचे भान हरपलेल्या माध्यमजगताने याची ‘ब्रेिंकग न्यूज’ केली नसती तरच नवल! ज्यांना बलात्काराच्या घटनेतील पीडितेची माहिती उघड करायची नसते, ही पत्रकारितेतील प्राथमिक नीतितत्त्वे पाळण्याचीही गरज वाटत नाही, बिनदिक्कतपणे त्या पोरीचा फोटो जगजाहीर करून ते मोकळे होतात, त्या भान सुटलेल्या माध्यमांनी, तामिळनाडूच्या राजभवनातील या वृत्ताचे रसभरीत वर्णन असलेल्या बातम्या प्रसृत केल्या नसत्या तरच त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उभे झाले असते! पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. या घटनेच्या ‘बातम्या’ झाल्याच. कथित बड्या मंडळींच्या सहभागातून तद्दन फालतू स्तरावरच्या तकलादू चर्चाही या विषयावरून रंगल्या. सध्या केंद्रात सरकार भाजपाचे. बहुतांश राज्यपालही त्याच राजकीय पक्षाचे. शिवाय लोकसभा निवडणुकीचा मुहूर्तही एव्हाना नजरेच्या टप्प्यात आलेला. अशात, त्या पक्षाच्या वाइटावर टपलेली जमात भाजपाच्या बदनामीचे मुद्दे शोधतच फिरताहे. त्यामुळे चेन्नईच्या राजभवनात ही घटना घडताच जणू घबाड हाती लागल्याच्या थाटात अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. इथे तर ‘सबसे तेज’ दौडण्याची शर्यत लागली आहे. त्यामुळे, असे करणे योग्य की अयोग्य, ते पत्रकारितेच्या नीतितत्त्वात बसते की नाही वगैरे बाबींवर विचार करायला फुरसत होईलच कशी कुणाला? मग काय, सुरू झाला िंधगाणा. राज्यपालांनी त्या मुलीच्या गालावर थापटा मारण्याचा तो प्रसंग ‘फोकस’ करून करून, िंभगाने मोठा करून करून दाखवताना जणू ‘वॉटरगेट’ प्रकरण उघडकीस आणल्याचा आनंद होत असावा संबंधित माध्यमांना! ऊर अभिमानाने भरून येत असावा कदाचित त्यांचा अशा बातम्या प्रसृत करण्याची ‘कर्तबगारी’ पार पाडताना.
हे खरेच की, राज्यपाल हे वैधानिक पद आहे. आपण लोकशाही स्वीकारली असली, तरी वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून राजेशाहीचा जो प्रभाव आपल्या डोक्यात आणि मनातही भिनला आहे, त्यातून राज्यपालांनी ‘राजा’च्या मर्यादित चौकटीत जगणे-वागणे आपल्याला अपेक्षित असते. तामिळनाडूच्या राज्यपालांनी परवा ती चौकट मोडली. आपले पद विसरून ते पत्रकारांच्या जवळ गेले. एका पत्रकाराच्या गालावर त्यांनी अगदी सहजतेने चापट मारली. कदाचित ते राज्यपालाच्या पदावर नसते अन्‌ कुठल्याशा कौटुंबिक कार्यक्रमात हा प्रसंग घडला असता तर कुणी त्याकडे लक्षही दिले नसते. पण, पुरोहित ठरले राज्यपाल. त्यातही राजकीय पक्ष म्हणून भाजपाचा स्वीकार करून आधीच त्यांनी घोडचूक केलेली! त्यामुळे त्यांच्या त्या वागण्यातून चुकीचे अर्थ काढणे हा त्यांच्या राजकीय विरोधकांचा आणि एकूणच माध्यमजगताचा ‘नैतिक’ अधिकार ठरतो! गेले तीन दिवस त्या अधिकाराचाच दुरुपयोग करून यथेच्छ धुमाकूळ घातला जातोय्‌ सर्वदूर. पुरोहितांकडून ‘तसे’ वागणे अपेक्षित नसलेल्या तमाम जनांनी चालवलेल्या चर्चेचा दर्जा बघितला, तरी हे प्रकरण ओढूनताणून मोठे करण्याची धडपड किती केविलवाणी आणि ती किती खालच्या पातळीवर उतरून चालली आहे, हे ध्यानात येते.
तिच्या आजोबाच्या वयाचे असलेल्या राज्यपालांनी त्याच नात्याच्या हक्कानेदेखील त्या महिला पत्रकाराच्या गालावर चापट मारायला नको होती, त्यांनी तसं करणं आवश्यक तर नव्हतंच नव्हतं, हे मान्य केलं तरी संपूर्ण सामाजाच्या त्यानंतरच्या एकूणच वागण्यातून जो थयथयाट अनुभवास येतोय्‌, त्याचंतरी समर्थन कसं करायचं? विशेषत: नागपूर, विदर्भातले लोक, ज्यांना बनवारीलाल जवळून माहीत आहेत, राजकारण आणि समाजकारणातले पुरोहित ज्यांनी वर्षानुवर्षे अनुभवले आहेत, खाजगी दूरचित्रवाणीच्या ‘धंद्यातील’ हुशार लोकांनी जाणीवपूर्वक वारंवार दाखवलेले ते दृश्य बघूनही त्यांचा पुरोहितांवरचा विश्वास तसूभरही ढळत नाही. पण, तरीही त्या महिला पत्रकाराच्या भावनांचाही आदर केलाच पाहिजे. आजोबांनी, त्या नात्याच्या ओघाने लाभलेल्या हक्कातून या रीतीने प्रेम व्यक्त करणे तिला आवडले नसेल, तर तिचा तो नकाराधिकारही मान्य केला पाहिजे. पण, ज्या तर्‍हेने ती या घटनेबाबतच्या संतापाचे सार्वजनिक रीत्या प्रदर्शन मांडतेय्‌, नंतर आपण चार वेळा आपला चेहरा धुतल्याचे सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतेय्‌, तो मात्र सरळसरळ अतिरेक आहे. दुर्दैवाने  ‘पश्चातबुद्धी’ आणि राजकारणाचाही गंध त्यातून झळकतो.
राज्यपालांनी ‘तसे’ केले नसते तरी चालले असते हे खरेच. अगदीच सहजपणे, वडीलकीच्या हक्काने त्यांनी ते केले, हे मान्य करूनही त्याचे समर्थन कुणीच करीत नाहीय्‌. त्यांनी स्वत:देखील झाल्या प्रकरणी अगदी क्षणात माफी मागून वाद मिटविण्याची भूमिका घेतली आहे. सार्‍या जगाला माहीत व्हावे म्हणून माध्यमजगताने गेल्या दोन दिवसांत नको तितक्यांदा दाखवली, ती क्लिप बघितल्यानंतर पुरोहितांचा हेतू वाईट नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यातून वासनेचा दर्प काही स्वयंघोषित शहाण्यांना जाणवत असेलही, पण सर्वसामान्यजनांना तरी तसे मुळीच जाणवत नाही आणि तरीही या प्रकरणावरची चर्चा नेमकी ‘त्याच’ वळणावर नेऊन सोडण्याचा जो संतापजनक प्रकार काही लोक मोठ्या शिताफीनं करताहेत, तो तरी कुठे समर्थनीय ठरतो?
राज्यपालांनी माफी मागितल्यानंतरही हे प्रकरण तापवत ठेवून त्याआडून राजकारणाचे डाव खेळण्याचे काही लोकांचे छुपे षडयंत्र तर काही केल्या लपून राहू शकलेले नाही. पण, काही स्वनामधन्य लोक विविध वाहिन्यांवरील चर्चेतून जे अकलेचे तारे तोडताना दिसताहेत, तो सारा प्रकार कीव करण्याच्याच लायकीचा आहे.
खरंच, माणसं इतकी कोत्या मनाची झाली आहेत आताशा? स्त्री-पुरुषांमधील संबंधांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन इतका दर्जाहीन झाला आहे? या दोन घटकांमधली सेक्सच्या चौकटीपलीकडची नाती, भावनेची गुंतागुंत नजरेत येत नाहीच कुणाच्या इथे? की, नर आणि मादीच्या पलीकडेही स्त्री-पुरुषांमधली नाती आकार घेऊ शकतात, हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकताही हरवून बसलो आहोत आपण सारेच? चार वर्षांच्याच कशाला, अगदी तान्हुल्या बाळालाही वासनेची शिकार बनविणार्‍या राक्षसी वृत्तीचा, रस्त्याने जाता-येतानाही मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या गर्दीच्या बेताल वागण्याचाही परिणाम असेल तो कदाचित, पण म्हणून स्त्री-पुरुषांमधली निरागस, निखळ नात्यांची कल्पनाही इथल्या जनसमुदायाला मानवणार नसेल, तर संपलंच सारं! परवा चेन्नईच्या राजभवनात जे घडलं त्याचे करायचे त्यांनी जरूर राजकारण करावे. ‘त्या’ मुलीलाही घडल्या प्रकरणाचे निमित्त करून जे साधायचेय्‌ ते तिने जरूर साधावे. पण, म्हणून उर्वरित जनसमुदायानेही स्त्री-पुरुषांमधील इतर सार्‍या नात्यांची वीण कल्पनातीत ठरवून केवळ एका मार्यादेत ते नाते बंदिस्त करण्याचा प्रयत्न करावा, हे मात्र अयोग्यच. आधीच आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रीलेशनशिप’पासून तर समलैंगिक संबंधांपर्यंतच्या कित्येक बाबी सहजपणे स्वीकारून बसलेल्या सामाजाची घडी अधिक विसकटू द्यायची नसेल, तर स्त्री-पुरुषांमधील काही निरागस, निरलस नात्यांचं सौंदर्य जपायलाही शिकलं पाहिजे ना आपण...?

Saturday, April 14, 2018

पुरूषी अहंकार ठेचण्यासाठी....


बलात्काराच्या या जगावेगळ्या घटनेने कुणीही अस्वस्थ व्हावं. खरं तर हा कँडल मार्च ‘कॉंग्रेस’चा न राहता सर्वसामान्य माणसांचा असायला हवा होता. कारण त्यांना संताप अनावर होणं महत्त्वाचं. राजकीय मंडळींचं काय, त्यांच्या भावना परिस्थिती पाहून उचंबळून येतात. सोयीचं असलं की संताप अन्‌ अडचणीचं  असलं की शांतता, अशी भूमिका बदलत राहते त्यांची. पण जनताजनार्दनाचं तर तसं नाही. मग ती का मूग गिळून बसली आहे? एका चित्रपटाच्या प्रदर्शनावरून देशभर िंधगाणा घालणारा समूह हा. संपूर्ण कथानक जसेच्या तसे ठेवून केवळ मथळ्यात पद्मावती चा पद्मावत झाला तरी आंदोलन ‘यशस्वी’ झाल्याच्या आवेशात कॉलर टाईट करून वावरणारा जनसमुदाय वर नोंदवलेले प्रसंग एकून जराही अस्वस्थ होत नसेल, तर मग आपल्या समाजाचीच तब्येत तपासून बघितली पाहिजे एकदा. कारण, पीडितेवर अत्याचार करणार्‍या त्या नराधमांपेक्षाही दुर्लक्ष करून त्यांना माफ करणारा समाज अधिक दोषी अन्‌ घातक ठरतो. कारण इथे कठोर कायद्यांपेक्षाही समाजाची मानसिकता, त्याचा धाक, त्याचा वचक, एकूणच स्त्री समुहाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, या सार्‍याच बाबींवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आता काय केवळ हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापुरता उरलाय्‌ आपला समाज? मुकाट्यानं श्रद्धांजली वाहून मोकळे होणार आहेत लोक? की पाच-दहा वर्षांनी या हरामखोरांना न्यायालयात शिक्षा जाहीर होईल तेव्हा आनंदाने ढोल बडवायला सरसावेल  षंढांचा गोतावळा? 


काही दिवसांपूर्वीची गोष्ट. काबाडकष्ट करावे लागलेल्या नोकरीत हयात गेली. मुंबईतील सांताक्रुझ परिसरातल्या कुठल्याशा चाळीत तारुण्यातले उमेदीचे दिवस कसे सरले अन्‌ पोरांच्या संसारातच ‘आपले’ समाधान शोधण्याचे पर्व केव्हा सुरू झाले कळलेच नाही. चारही पोरांची लग्न लावून होताच जन्माचे सार्थक झाल्याची भावना चेहर्‍यावर नकळत समाधानाची कळी खुलवून जायची. अशातच चाळीतले घर विकून फ्लॅट विकत घेण्याचा प्रस्ताव पोरानं बापासमोर ठेवला. आता आपले म्हणून राहिलेच किती दिवस? मुलाचा तोच आपलाही संसार. तो डोळ्यांदेखत फुलताना बघण्याचे भाग्य वाट्याला येत असताना नकार द्यायचा तरी कशासाठी?...मग काय, चौघांचा तो चाळीतला संसार नव्या कोर्‍या फ्लॅटमध्ये थाटामाटात शिफ्ट झाला. सुख-सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असते, असा विचार मनात येण्याचीच देर की नशिबाचा फेरा चुकतो की काय असे वाटू लागले. मुलगा आणि सुनेची नियत दिवसागणिक बदलू लागली. ज्यांच्या आयुष्यभराच्या कमाईच्या भरवशावर स्वत:च्या संसाराचा  थाट मांडला, त्यांचीच अडचण होऊ लागली. त्यांना अडगळीत टाकण्याच्या नवनवीन क्लृप्त्या मुलगा आणि सुनेच्या मनात येऊ लागल्या. एक दिवस बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने मुलाने आई-बापाला गाडीत बसवले. भटकंती सुरू झाली. एकेक गाव मागे टाकत सारे धुळ्याला पोहोचले. तर तिथल्या बसस्थानकावर त्या दोघांना बसवून, ‘लगेच येतो’ असे सांगून मुलगा निघून गेला...आता येईल, मग येईल म्हणून मुलाची आतुरतेनं वाट बघणारे दाम्पत्य अखेर हताश झाले. तो मात्र आलाच नाही...मोठ्या खुबीनं त्यांची जबाबदारी टाळून तो निघून गेला होता. आपली नेमकी चूक काय झाली, ते ही  कळेना! बस स्थानकावरचा कॅन्टिनवाला, कुणीतरी रिक्षावाला, अशा ‘देवदुतांनी’ त्यांना एका वृद्धाश्रमात पोहोचविले. यातल्या कर्त्या माणसाचा नुकताच मृत्यू झाला. त्याबाबतचा निरोप मंबईकर मुलासह इतर तीन मुलींनाही पाठविण्यात आला होता. पण... जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची फुरसत कुणालाच न झाल्याने शेवटी वृद्धाश्रमातील ‘आप्तांनी’ अखेरचे सोपस्कार पार पाडले...
***
आयुष्यातली जेमतेम आठ वर्षे पूर्ण केलेल्या एका कोवळ्या जीवाला ओलीस ठेवून तिच्यावर कित्येक दिवस आळीपाळीने बलात्कार करीत राहिलेल्या सहा जणांनी नंतर काश्मीरातील कठुआ येथे तिचा दगडाने ठेचून खून केल्याच्या हृदयद्रावक घटनेने अस्वस्थ झालेलं मन अद्याप थार्‍यावर आलेलं नसताना उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे एक उलमती कळी अशाच काही नराधमांनी निर्दयीपणे कुस्करल्याचा आरोप आहे. यात एका राजकीय नेत्याचाही समावेश आहे म्हणतात. आरोप असलेली व्यक्ती आमदार आहे म्हणून तिला सुरूवातीला अटक झाली नाही, असाही आरोप आहे...
***
खरंच, मन सुन्न करणार्‍या घटना आहेत सार्‍या. यांत्रिक युगात वावरताना माणसं कोडगेपण लेऊन घराबाहेर पडताहेत की काय आताशा! हळव्या मनाची ती नाजुकशी गुंतागुंत दिसत नाही ती कुठेच! जीवघेण्या स्पर्धेच्या आडून आपसूकच वाट्याला आलेल्या धकाधकीच्या जीवनात माणसं बेभान होऊन पैशाच्या मागे पळत सुटलीत हे खरंच. धावण्याच्या या शर्यतीत भावनेपेक्षा व्यवहार काहीसा अधिक प्रभावी ठरतोय्‌ हेही तितकंच खरं. पण एवढा? पीडित मुलीवर बलात्कार करणारा आमदार कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, हे बघून कॉंग्रेसच्या आंदोलनाची तीव्रता ठरत असेल अन्‌ अशा प्रकरणात पीडितेचा फोटो छापायचा नसतो, एवढे साधेसे भानही पत्रकार जगतातील मी मी म्हणवणार्‍या दीड शहाण्यांना जपता येत नसेल, तर मग संपलंच सारं!
उपरोक्त प्रकरणातील एकूण एक माणसाचं वागणं म्हणजे निर्लज्जतेची हद्द अधोरेखित करणारं अन्‌ माणुसकीला काळिमा फासणारं धगधगतं वास्तव आहे. एकुलता एक मुलगा साता समुद्रापल्याड दूर कुठेतरी इंग्लंड-अमेरिकेत राहतो म्हणून एकटेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या आई-बापाची करुण कहाणी काय अन्‌ स्वत:ची सारी िंजदगानी मुलांवर उधळूनही आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात घालवण्याची वेळ आलेल्या त्या दाम्पत्याचं ताल-सूर हरवून बसलेलं जीवनकाव्य काय... वेशीवर टांगलेलं दुर्दैवच... माणसं इतकी निष्ठूर वागू शकतात, हे पुन्हा एकदा जगजाहीर झालेलं वास्तव स्वीकारण्याची हिंमतच होत नाही बघा! मन पुरते अस्वस्थ करणारं आहे सारं.
मध्यंतरी अमेरिकेतल्या एका प्रख्यात महिला संपादकाचं वक्तव्य कानावर पडलं. दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर... ‘‘जगभरातील भ्रमंती हा आवडता छंद असतानाही भारतात येण्याचं मात्र धाडस होत नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातील इस्लामाबादला जाणं आपण पसंत करू’’ , हे त्यांचं म्हणणं क्षणभर त्यांच्याबद्दल तीव्र भावना निर्माण करून गेलं. पण मग मनात विचार आला की, चूक काय त्यांची असा विचार करण्यात? इथल्या नराधमांच्या, वासनेनं वखवखलेल्या नजरेतून विदेशी पर्यटकही सुटत नसतील, मनाचा थरकाप उडविणार्‍या निर्भया हत्याकांडाने संपूर्ण जगभरात आमची छी-थू झाली असेल, तर मग दिल्लीच्या तुलनेत इस्लामाबाद अधिक सुरक्षित असल्याची त्या संपादिकेची भावना चुकीची कशी ठरवता येईल? मानवी आवरणं झुगारून पुरूषी अभिनिवेश जपतच माणसं सर्वदूर वावरणार असतील, ‘स्त्री’त्वाच्या संवेदना पायदळी तुडवून त्यात फक्त ‘मादी’ शोधण्याचीच प्रवृत्ती सर्वदूर उफाळून येणार असेल, तर या नराधमांकडे कीळसवाण्या नजरेनं बघणार्‍या जगाला तरी दोष का द्यायचा?
इवल्याशा जीवावर पाशवी बलात्काराचं ओझं लादताना कुठला असूरी आनंद मिळवला असेल त्या पिशाच्चांनी तरी? सलग काही दिवस तिच्या इभ्रतीचे लचके तोडताना अन्‌ शेवटी निर्दयीपणे तिला दगडाने ठेचताना मनं द्रवली नाहीत त्यातल्या कुणाचीच? या प्रकरणात एक शहाणा तर दूरवरच्या मिरतहून पोहोचला होता म्हणे, काश्मीरात. खास ही ‘कर्तबगारी’ बजावायला. ऐकतानाही काळीज चिरून निघावं इतका हृदयद्रावक आहे सारा घटनाक्रम.
परवा दिल्लीत राहुल गांधी, प्रियांका वढेरा यांच्या नेतृत्त्वात मध्यरात्री  मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. कठुआ आणि उन्नावमधील घटनेच्या निषेधार्थ. स्वाभाविकच आहे. बलात्काराच्या या जगावेगळ्या घटनेने कुणीही अस्वस्थ व्हावं. खरं तर हा कँडल मार्च ‘कॉंग्रेस’चा न राहता सर्वसामान्य माणसांचा असायला हवा होता. कारण त्यांना संताप अनावर होणं महत्त्वाचं. राजकीय मंडळींचं काय, त्यांच्या भावना परिस्थिती पाहून उचंबळून येतात. सोयीचं असलं की संताप अन्‌ अडचणीचं  असलं की शांतता, अशी भूमिका बदलत राहते त्यांची. पण जनताजनार्दनाचं तर तसं नाही. मग ती का मूग गिळून बसली आहे? एका चित्रपटाच्या प्रदर्शनावरून देशभर िंधगाणा घालणारा समूह हा. संपूर्ण कथानक जसेच्या तसे ठेवून केवळ मथळ्यात पद्मावती चा पद्मावत झाला तरी आंदोलन ‘यशस्वी’ झाल्याच्या आवेशात कॉलर टाईट करून वावरणारा जनसमुदाय वर नोंदवलेले प्रसंग एकून जराही अस्वस्थ होत नसेल, तर मग आपल्या समाजाचीच तब्येत तपासून बघितली पाहिजे एकदा. कारण, पीडितेवर अत्याचार करणार्‍या त्या नराधमांपेक्षाही दुर्लक्ष करून त्यांना माफ करणारा समाज अधिक दोषी अन्‌ घातक ठरतो. कारण इथे कठोर कायद्यांपेक्षाही समाजाची मानसिकता, त्याचा धाक, त्याचा वचक, एकूणच स्त्री समुहाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, या सार्‍याच बाबींवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आता काय केवळ हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापुरता उरलाय्‌ आपला समाज? मुकाट्यानं श्रद्धांजली वाहून मोकळे होणार आहेत लोक? की पाच-दहा वर्षांनी या हरामखोरांना न्यायालयात शिक्षा जाहीर होईल तेव्हा आनंदाने ढोल बडवायला सरसावेल  षंढांचा गोतावळा?
मध्यंतरी, एकाकी जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या जुजबी गरजा पूर्ण करण्याकरता, प्रसंगी फावल्या वेळात त्यांच्याशी गप्पा मारण्याकरता पोलिसदलात एक गट तयार करण्याची कल्पना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मांडली होती. मानवी समाजातील पुरूषी अहंकार, त्यांची राक्षसी वृत्ती नष्ट करण्यासाठी कायद्याच्या पलीकडचा असाच एखादा उपाय अंमलात आणण्याच्या गरजेचाही विचार व्हावा ना कधीतरी...! 

Friday, April 6, 2018

मुजोर सलमानचे मूर्ख समर्थक...


ते तर त्या बिष्णोई समाजातील निडर साक्षीदारांचे निसर्गप्रेम तगडे आहे म्हणून, नाही तर खुनाच्या आरोपातून ‘निर्दोष’ सुटलेला सलमान, काळवीट शिकारीच्या या प्रकरणातही ‘पुराव्यांअभावी’ तसाच बाहेर पडला असता- बाइज्जत- सहीसलामत- निर्दोष...! याही वेळी पुन्हा एकदा सबब तीच सांगितली गेली असती. पुराव्यांच्या अभावाची. मग कोर्टातून दिमाखाने मिरवत सलमान बाहेर पडला असता आपल्या ‘स्वॅग’चे प्रदर्शन मांडत. त्यातही कुणालाच काही वावगं वाटलं नसतं. कारण मुळातच सर्वांना तेच अपेक्षित होतं. गुन्हा करूनही सलमान निर्दोष सुटलेला. फक्त कायदा तेवढा राहिला असता मलूल चेहर्‍यानं कोपर्‍यात पडलेला. हो ना! कायद्याचे तंतोतंत पालन करायला सलमान काय सामान्य माणूस आहे? केवढी मोठी असामी ती. तिनं काय कागदावर छापलेल्या नियमांच्या चौकटीतलं फडतूस जीवन जगायचं?  छे! छे! ती चौकट असते गोरगरिबांसाठी. सलमानने तर ती धुडकावणेच अपेक्षित आहे इथल्या सर्वांना. व्यवस्थेलाही अन्‌ त्याच्या मूर्ख समर्थकांनाही. अन्यथा त्याला कारावास सुनावणार्‍या कोर्टाविरुद्ध रोष व्यक्त करायला कुणी धजावण्याचे अन्य कारण तरी गवसत नाही कुठेच.  कीस पाडत, कायद्याचा वाट्‌टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. त्यात आश्चर्य ते नाहीच. आश्चर्य, त्याचे हे विकत घेतेले निर्दोषत्व मान्य करीत जनतेने त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे आहे. आणि तेच दुर्दैवी आहे...


सलमान खान हा गुन्हा करण्याचा अधिकार प्राप्त करूनच पृथ्वीवर अवतरला आहे. त्याच्या सर्व कारनाम्यांना फक्त आणि फक्त माफीच आहे. त्याने दारूच्या नशेत, फुटपाथवर झोपलेल्या लोकांंच्या अंगावरून गाडी नेली काय अन्‌ राजस्थानातल्या जंगलात काळविटांची अवैध शिकार करून वर पुन्हा मुजोरी केली काय, त्याला शिक्षा नाही म्हणजे नाहीच!  परवा जोधपूरच्या न्यायालयात त्याला शिक्षा सुनावून न्यायालयाने जणू कहरच केल्याचा कांगावा करीत त्याचे फॅन्स ज्या तर्‍हेने नक्राश्रू ढाळत होते, ते बघितल्यानंतर या देशातले सामान्य जीव कीव करण्याच्याच लायकीचे उरले असल्याच्या वास्तवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. बलात्काराच्या एका प्रकरणात सच्चा डेराच्या प्रमुखाला शिक्षा सुनावण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त करणार्‍या जनसमूहाने, पंचकुलाच्या रस्त्यांवर उतरून घातलेला धिंगाणा असो, की सलमानला शिक्षा झाली म्हणून बावचळलेली त्याच्या समर्थकांची जमात, यांच्यामुळेच इथल्या बड्या धेंडांची मुजोरी वाढली आहे. ती तर घटनाकारांची मेहरबानी आहे, नाहीतर इथल्या प्रत्येक राजकारण्याला, श्रीमंत माणसाला, उद्योजकाला, क्रिकेट खेळाडूला, चित्रपट कलावंताला त्यानं केलेल्या गुन्ह्यातून सूट देण्याची प्रथा केव्हाच रूढ झाली असती.  मग कायद्याचा बडगा उगारला गेला असता तो केवळ गरिबांवर. शिक्षाबिक्षा काय झाली असती ती फक्त सर्वसामान्यांना. पण, त्यांच्या दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. कायद्याच्या तरतुदींनी कधी नव्हे ते सहारा कंपनीच्या मालकापासून तर संजय दत्तपर्यंत आणि ए. राजापासून तर सलमान खानपर्यंत सर्वांना त्यांच्या काळ्या कृत्याची शिक्षा भोगण्यास बाध्य केले आहे. अन्यथा, चित्र किती भयानक राहिले असते, याची तर कल्पनाही करवत नाही.
सर्वांसाठी समान असलेला कायदा, पैसा आणि ताकदीच्या भरवशावर आपल्याला हवा तसा तुकवण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात वेळोवेळी झालेले प्रयत्न तर हा देश उघड्या डोळ्यांनी बघत आला आहे. त्यांनी चालवलेली कायद्याची थट्‌टाही तो प्रत्यक्षात अनुभवतो आहे. कोट्यवधी रुपयांची लूट करून विदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या व नीरव मोदी तिकडे आरामात बसून तमाम भारतीयांना वाकुल्या दाखवीत आहेत, ती खरंतर त्यांनी उडवलेली कायद्याची खिल्लीच आहे. एका निष्पाप माणसाचा बळी घेऊनही नरुल्ला हत्याकांड प्रकरणात सलमान ज्या तर्‍हेने ‘पुराव्यांअभावी’ निर्दोष सुटला होता, तोही पैशाच्या बळावर कुणीतरी कायद्याची टर उडविण्याचा, नव्हे, व्यवस्थेतील प्रत्येक दुवा खरेदी केला जाऊ शकतो, हे निर्लज्जपणे सिद्ध करण्याचा प्रकार होता. शिक्षा जाहीर झाल्यानंतरही संजय दत्त ज्या सहजतेने कारागृहातून बाहेर निघू शकतो- पुन्हा आत जाऊ शकतो िंकवा सुब्रत रॉय यांना जेलमध्ये जी पंचतारांकित सुविधा उपलब्ध होते, तीही कायदा पायदळी तुडविण्याची श्रीमंतांनी लीलया रुजवलेली माजोरी तर्‍हा आहे.
श्रीमंतांनी त्यांच्याजवळ असलेल्या पैशाच्या ताकदीवर, राजकारण्यांनी हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर, खेळाडू व कलावंतांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या भरवशावर कायद्याची ऐसीतैसी करणे, किमान तसे प्रयत्न करणे एकवेळ समजताही येईल. कारण कायदा आपल्यासाठी नाहीच, अशा आविर्भावात ते जगत असतात. परिणामी, नियमांचा पालापाचोळा करून तो केराच्या टोपलीत टाकण्याचा स्वभाव झालाय्‌ त्यांचा. परवा न्यायालयानं पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतरही जोधपूरच्या पोलिस ठाण्यात सलमान खान नावाचा एक लोकप्रिय कलावंत ज्या गुर्मीत वावरत होता, आपण सध्या आरोपी आहोत हे विसरून ज्या थाटात तो पोलिस अधिकार्‍यांसमोरच्या खुर्चीवर बसला होता, ते बघितल्यानंतर तो इथल्या एकूणच व्यवस्थेला किती ‘चिल्लर’ समजतो, त्या यंत्रणेला तो जराही भीक घालत नाही, हे लक्षात येते. पाच वर्षं? अरे हट्‌! बघा मी पुढच्या चार-दोन दिवसांत तुमच्या सर्वांच्या नाकावर टिच्चून कसा बाहेर पडतो ते! हे सांगणारी गुर्मीच त्याच्या एकूण वागण्यातून व्यक्त होत होती. एक, चित्रपट कलावंताचे बिरूद नावासमोरून हटवले तर कोण आहे हो सलमान? एक समान्य माणूसच ना? अन्‌ चित्रपटातली कलाकारी काय फुकट करतो का तो? की अर्थार्जनातून दानधर्म करण्यासाठीचा लौकिक आहे त्याचा, की लोकोपकारासाठी ख्याती आहे त्याची जगभर? लोकांच्या जिवावर कमावलेल्या रग्गड पैशाच्या भरवशावर अकड दाखवत फिरणारा एक मगरूर माणूस तो अन्‌ त्याचे फॅन्स तरीही फिदा होतात त्याच्यावर!
यात दोष सलमानचा नाहीच बघा! त्याचा अॅटिट्यूड तर लोकांच्या जिवावर कमावलेल्या इभ्रतीतून आला आहे. आपण कसलाही िंधगाणा घातला तरी लोक टाळ्याच पिटणार असल्याचा दुर्दम्य विश्वास त्याच्या मनात आहे. खुनाचा आरोप अंगावर असल्यामुळे न्यायासनासमोर उपस्थित राहण्यासाठी म्हणून कोर्टात आलेला असताना, आपल्या कृत्याबद्दल जराही संताप मनात नसलेल्या, उलट हात उंचावून पाठबळ देणार्‍या जनसमूहाच्या आधारे त्याला तो विश्वास मिळाला आहे. इथे दोष आहे, सलमानपुढे कायदा कवडीमोल ठरविणार्‍या त्याच्या समर्थकांचा. दोषी आहेत ते रसिक, ज्यांना एक कलावंत आणि खुनाचा आरोप असलेल्या एका बेमुर्वतखोर आरोपीत भेद करता येत नाही. दोषी ती व्यवस्था आहे, जी कायदा पायाखाली तुडवणे हा सलमानसारख्या बड्या धेंडांचा जन्मसिद्ध अधिकारच असल्याचा गैरसमज करून बसली आहे, त्यांनी नियमांची पायमल्ली करण्यात यांना काहीच वाटत नाही. उलट, केलेल्या पायमल्लीबद्दल सलमानला शिक्षा ठोठावणार्‍या न्याययंत्रणेविरुद्ध त्याचा संताप अनावर होतो... काल, काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावून न्यायालयाने जणू सलमानवर प्रचंड अन्याय केला असल्याच्या थाटात काही लोकांचे जे बरळणे चालले होते, तो लवकरच बाहेर येईल असा दृढ विश्वास, जो, मूर्खांच्या नंदनवनात वावरणार्‍या काही दीड शहाण्यांकडून व्यक्त होत होता, त्यावरून अजून काय वेगळा निष्कर्ष काढायचा सांगा?
समाजातील काही लोकांना देवत्व बहाल करून मोकळे झालेल्या या समूहाचे थार्‍यावर येणे ही अशक्यप्राय कोटीतील बाब ठरते की काय, असे वाटू लागले आहे आताशा. ते तर त्या बिष्णोई समाजातील निडर साक्षीदारांचे निसर्गप्रेम तगडे आहे म्हणून, नाही तर खुनाच्या आरोपातून ‘निर्दोष’ सुटलेला सलमान, काळवीट शिकारीच्या या प्रकरणातही ‘पुराव्यांअभावी’ तसाच बाहेर पडला असता- बाइज्जत- सहीसलामत- निर्दोष...! याही वेळी पुन्हा एकदा सबब तीच सांगितली गेली असती. पुराव्यांच्या अभावाची. मग कोर्टातून दिमाखाने मिरवत सलमान बाहेर पडला असता आपल्या ‘स्वॅग’चे प्रदर्शन मांडत. त्यातही कुणालाच काही वावगं वाटलं नसतं. कारण मुळातच सर्वांना तेच अपेक्षित होतं. गुन्हा करूनही सलमान निर्दोष सुटलेला. फक्त कायदा तेवढा राहिला असता मलूल चेहर्‍यानं कोपर्‍यात पडलेला. हो ना! कायद्याचे तंतोतंत पालन करायला सलमान काय सामान्य माणूस आहे? केवढी मोठी असामी ती. तिनं काय कागदावर छापलेल्या नियमांच्या चौकटीतलं फडतूस जीवन जगायचं?  छे! छे! ती चौकट असते गोरगरिबांसाठी. सलमानने तर ती धुडकावणेच अपेक्षित आहे इथल्या सर्वांना. व्यवस्थेलाही अन्‌ त्याच्या मूर्ख समर्थकांनाही. अन्यथा त्याला कारावास सुनावणार्‍या कोर्टाविरुद्ध रोष व्यक्त करायला कुणी धजावण्याचे अन्य कारण तरी गवसत नाही कुठेच.
कीस पाडत, कायद्याचा वाट्‌टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. त्यात आश्चर्य ते नाहीच. आश्चर्य, त्याचे हे विकत घेतेले निर्दोषत्व मान्य करीत जनतेने त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे आहे. आणि तेच दुर्दैवी आहे...