Saturday, March 31, 2018

गंगा जमुना...


काही वर्षांपूर्वीची ती घटना आहे. शहरातल्या एका परिसरातून एका मुलीचे अपहरण झाले होते. खूप शोधाशोध झाली, पण ती काही सापडली नाही. काहीशी मंदबुद्धीची, पण दिसायला सुंदर अशी एक मुलगी आपण गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून ते कुटुंब जगू लागले. योगायोग म्हणावा की दुर्दैव कुणास ठाऊक, पण एक दिवस त्या घरातल्या मुलाला त्या बदनाम वस्तीत त्याची ती हरवलेली बहीण गवसली. जवळच्याच कुणीतरी दगाबाजी करून तिचे अपहरण आणि मग तिला या व्यवसायात लोटण्याचा घृणास्पद प्रकार केला होता... गोष्ट इथे संपत नाही. खरंतर ती तिथून सुरू होते. आपली बहीण वेश्या व्यवसायात लोटली गेली असून, गेल्या तीन वर्षांपासून ती शहरातल्या एका वेश्यावस्तीत राहात असल्याचे धगधगते वास्तव जेव्हा त्याने घरात उघड केले, तेव्हा सर्वांच्याच धैर्याचा कस लागला होता अन्‌ दुर्दैवाने सारेच त्यात नापास झाले होते. गेली तीन वर्षे जिवाच्या आकांताने तिचा शोध घेत राहिलेल्या तिच्या जन्मदात्या माय-बापालाही आता तिचा स्वीकार करण्याची हिमंत होत नव्हती. नाही म्हणायला लेकीवरच्या प्रेमाखातर आईचा जीव तिळतिळ तुटला. पण बाईची जात ती. तिच्या मताला मोजतो कोण इथे? तिची आर्जवं हवेत विरली अन्‌ समाजाच्या भीतीने एका कुटुंबाने रक्ताच्या नात्यातला एक जीव नव्याने वार्‍यावर सोडला...

कथित सभ्य समाजाच्या लेखी केवळ उपभोगापुरत्याच उपयोगाच्या असलेल्या आणि तरीही उपहास आणि उपेक्षेचा विषय ठरलेल्या वस्त्या त्या. तिथली माणसंही तशीच अन्‌ त्यांच्या पोटी जन्माला आलेली लेकरंही त्याच धाटणीत जगणारी. कधीकाळच्या गावकुसाबाहेरच्या त्या वस्त्या बेवारस होत्याच कधीपासूनच. नंतरच्या काळात अत्यावश्यक ठरून त्या शहराचा भाग केव्हा झाल्या, हे तर खुद्द शहरालाही समजले नाही! वस्त्या मात्र तशाच राहिल्या. शहराचा एक भाग असूनही स्वत:चे वेगळेपण जपत. कित्येकांना हव्या असतानाही कुणालाच नको असल्याच्या तोंडदेखलेपणाचा तो देखावा. वस्त्यांमधील संघर्षमय जीवनाचे भीषण वास्तव खरंतर अगदीच दाहक. त्यांच्यावर बितणारी परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी. वाट्याला येणार्‍या वेदनाही मनाला भिडणार्‍या. सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्या समाजात असभ्यतेचा टिळा कपाळी लावून अस्तित्व राखण्यासाठी चाललेला त्यांचा संघर्ष कुणीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय्‌. तो शब्दांतून मांडण्याचा आणि उर्वरित समाजापुढे मांडण्याचीही धडपड त्यानं चालवली आहे...
नवरगावचे सदानंद बोरकर. एक हरहुन्नरी कलावंत. त्यांनी कुंचल्यातून केलेली रंगांची उधळण त्यांच्याही नकळत कुठलीशी अर्थपूर्ण कलाकृती साकारून जाते. आपल्या प्रभावी अभिनयातून त्यांनी अनेक नाटकं गाजवलीत आजवर. नवरगावातल्या घराच्या अंगणातील झाडांच्या ठेवणीपासून तर दिवाणखान्यातल्या वस्तूंच्या रचनेपर्यंत, सार्‍याच बाबी त्यांच्या अभिनव कलात्मकतेची साक्ष देत दिमाखानं मिरवतात. त्याच कल्पकतेतून तिथल्या ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे संचालन चालले आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात विखुरलेले विद्यार्थी. कुणी झाडाखाली चित्र काढत बसलेलं, तर कुणी रंगांची साथसंगत करीत मनातल्या कुठल्याशा कल्पनेला कागदावर आकार देत असलेलं. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या अनिर्बंध वावरालाही निदान पंचेवीस वर्षे होतील एव्हाना. त्यातला निदान अर्धा काळ त्यांनी विविध नाटकांचं लिखाणही केलं आहे. ‘माझं कुंकू मीच पुसलं’पासून तर सध्या गाजत असलेल्या ‘असला नवरा नको गं बाई’पर्यंत. एकूण सात नाटकं लिहिलीत. लिखाणासोबतच त्यांच्या आणि सहकार्‍यांच्या उत्कृष्ट अभिनयातून त्याचे प्रयोग सर्वदूर साकारलेत. रसिकांनी ते स्वीकारलेही. अगदी डोक्यावर घेतले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा मुद्दा, त्यांच्या उशाशी बांधलेलं समस्यांचं बांडगुळ नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याच्या प्रयत्नांची दखल तर अगदी सरकार दरबारी घेतली गेली अन्‌ सदानंद बोरकरांचं ‘आत्महत्या’ हे नाटक ‘सार्क’च्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारताच्या वतीने सादर झालं. गेल्या पंचेवीस वर्षांत नाटकांची एक चळवळच उभी केलीय्‌ या ध्येयवेड्या अभिजात कलावंतानं. अंधश्रद्धेपासून तर ग्रामीण भागात बिनदिक्कतपणे नाकारले जाणारे मुलींचे शिक्षण, असे कितीतरी सामाजिक विषय त्यांनी रंगभूमीवरून हाताळलेत. या चळवळीला आकार देत असताना, वेश्यांच्या जीवनावरही कधीतरी लिहावं असं वाटून गेलं. ‘गंगा जमुना’ ही त्या ऊर्मीतूनच साकारलेली एक नाट्यकलाकृती...
‘गंगा जमुना’ ही नागपुरातली ख्याती पावलेली एक बदनाम वस्ती. नाटक लिहायचं तर वेश्यांचं जीवन जवळून बघायला हवं, म्हणून एका महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले सदानंद बोरकर नागपुरातल्या या बदनाम वस्तीत काही दिवस वावरले. तिथलं भावविश्व जवळून अनुभवण्याचा प्रयत्न केला. किमान दोन हजार वारांगनांचे वास्तव्य असलेला हा परिसर. कुठल्याही देखाव्याच्या वाट्याला न जाता वास्तवात जगण्याचा वेश्यांचा प्रयत्न, त्यांचा संघर्ष, त्यांची फरफट, उर्वरित समाजाशी जरासाही न जमणारा त्यांचा ताळमेळ, ती जुळवण्यासाठी चाललेली जिवाची घालमेल, आपण तर गुंतलो या जगात, पण निदान आपली पोरं तरी यापासून दूर राहिली पाहिजेत म्हणून चाललेला त्यांचा आटापिटा, पोरांचं भविष्य घडविण्यासाठीची ती धडपड, पोलिसांसकट उर्वरित समाजाने ओरबाडून घेण्याच्या मानसिकतेतून चालवलेला छळवाद... सारंकाही जवळून बघितल्यानंतर शब्दांतून त्यांची बांधणी करण्याचा प्रयत्न झाला. अन्‌ त्यातून साकारले एका वास्तववादी जीवनाचे यथार्थ चित्रण- गंगा जमुना...!
काही वर्षांपूर्वीची ती घटना आहे. शहरातल्या एका परिसरातून एका मुलीचे अपहरण झाले होते. खूप शोधाशोध झाली, पण ती काही सापडली नाही. काहीशी मंदबुद्धीची, पण दिसायला सुंदर अशी एक मुलगी आपण गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून ते कुटुंब जगू लागले. योगायोग म्हणावा की दुर्दैव कुणास ठाऊक, पण एक दिवस त्या घरातल्या मुलाला त्या बदनाम वस्तीत त्याची ती हरवलेली बहीण गवसली. जवळच्याच कुणीतरी दगाबाजी करून तिचे अपहरण आणि मग तिला या व्यवसायात लोटण्याचा घृणास्पद प्रकार केला होता... गोष्ट इथे संपत नाही. खरंतर ती तिथून सुरू होते. आपली बहीण वेश्या व्यवसायात लोटली गेली असून, गेल्या तीन वर्षांपासून ती शहरातल्या एका वेश्यावस्तीत राहात असल्याचे धगधगते वास्तव जेव्हा त्याने घरात उघड केले, तेव्हा सर्वांच्याच धैर्याचा कस लागला होता अन्‌ दुर्दैवाने सारेच त्यात नापास झाले होते. गेली तीन वर्षे जिवाच्या आकांताने तिचा शोध घेत राहिलेल्या तिच्या जन्मदात्या माय-बापालाही आता तिचा स्वीकार करण्याची हिमंत होत नव्हती. नाही म्हणायला लेकीवरच्या प्रेमाखातर आईचा जीव तिळतिळ तुटला. पण बाईची जात ती. तिच्या मताला मोजतो कोण इथे? तिची आर्जवं हवेत विरली अन्‌ समाजाच्या भीतीने एका कुटुंबाने रक्ताच्या नात्यातला एक जीव नव्याने वार्‍यावर सोडला...
काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग बोरकरांच्या नाटकाचे कथाबीज ठरला. वसतीत राहून अनुभवलेला थरार, चौकीदारीच्या नावाखाली पोलिसांनी चालवलेली लुबाडणूक, एकमेकांसोबतच्या साध्याशा बोलण्यातलीही ती शिवराळ भाषा, ती प्रेमाची नाटकं अन्‌ खरीखुरी भांडणं... केवळ गरजेपुरता ‘वापरून’ सोडून देऊन स्वत: साळसूदपणे नामानिराळा राहिलेला समाज. सभ्यतेचे आवरण पांघरून आणि तरीही बदनामी मात्र या वस्त्यांच्या वाट्याला आलेली. जगण्यासाठीचा संघर्ष केवळ त्यांच्या पारड्यात पडला. उपेक्षेचे जीणे आले तेही त्यांच्याच नशिबी...
हो, निघायचेय्‌ आम्हाला या विश्वाबाहेर. पण इथनं निघून जाणार कुठे सांगा!  तुम्ही कराल स्वीकार आमचा? हो, करायचेय्‌ आम्हालाही लग्न. आम्हालाही थाटायचाय्‌ तुमच्यासारखाच संसार. कराल तुम्ही लग्न आमच्यातल्या कुण्या मुलीशी? या वस्तीत जन्माला आलेल्या पोरांना कवटाळण्याची इच्छा आणि िंहमत होईल तुम्हाला कधीतरी? अहो साहेब, आम्ही या वस्तीत राहतो म्हणून आमच्या व्यवसायासाठी ओळखले तरी जातो. तुमच्या समाजात किती लोक हा व्यवसाय करतात एकदा शोध घ्या. इथल्यापेक्षा जास्त संख्या तर तिकडे सापडेल. बोला आहे िंहमत त्यांना शहाणपण शिकवण्याची...? वस्तीतल्या एका तरुणीने केलेल्या, निरुत्तर करणार्‍या असल्या कित्येक प्रश्नांच्या भडिमाराने सुन्न झालेलं मन ताळ्यावर यायचं नावच घेईना! त्याच अस्वस्थतेतून ‘गंगा जमुना’ साकारलं. नाटकाचे पन्नासाहून अधिक प्रयोग झालेत गेल्या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत. आणखी एक प्रयोग रविवारी नागपुरात साकारणार आहे. त्याचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण फक्त एवढंच की, या प्रयोगातून संकलित होणारा संपूर्ण निधी नागपुरात वारांगनांच्या मुलांसाठी काम करणार्‍या राम इंगोले यांच्या संस्थेच्या मदतीकरिता दिला जाणार आहे. सामाजिक आशयाचे भान जपत नाटकांची चळवळ उभी करणार्‍या, अलीकडच्या काळात अभिनयासोबतच आपल्या दमदार लेखणीतून ही चळवळ अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून कायम अस्वस्थ राहणार्‍या, ऐरणीवरच्या समस्यांना चौकट मोडून मंच प्राप्त करून देणार्‍या एका कार्यकर्त्याची धडपड या निमित्ताने खर्‍या अर्थाने अर्थपूर्ण होऊ घातली आहे... त्या धडपडीला सलाम! त्या अस्वस्थतेला कुर्निसात...!!