Saturday, July 29, 2017

शहीदांच्या स्वकीयांच्या भावनांची उकल…

नोकरीवर रुजू होऊन तसा खूप काळ मागे पडला नव्हता. एटापल्ली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी डेरा टाकला असल्याची खबर मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता, रोशनकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांची टीम सज्ज झाली. फारतर आठ-दहा घरांचे ते ‘गाव.’ दूरवर धानाची शेतं विखुरलेली. त्या रात्रीचं म्हणाल, तर पाऊस धो धो बरसत होता. पावसाची सोबत अन् काळ्याकुट्‌ट अंधाराच्या साक्षीनं लढलेली लढाई पोलिसांनी जिंकली होती. पोलिस विभागाच्या सेवेतलं पहिलंच बक्षीस पदरी पडलं होतं. कधीमधी रस्त्यानं जाताना शाळकरी पोरांनी गमतीनं सॅल्यूट ठोकला, तरी जंगलातल्या प्रतिकूल परिस्थितीत चाललेल्या संघर्षाचा क्षणभर विसर पडून चेहर्‍यावर नकळत स्मित उमटायचं. तसं म्हटलं तर रोशनकुमारचं व्यक्तिमत्त्वच निराळं होतं. सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं. लोभसवाणं. कुणाच्याही मदतीला तत्परतेनं धावून जाणारं. लग्न झालं. कालौघात संसारवेलीवर एक छानसं फूल उगवलं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच असावं बहुदा… नक्षल्यांविरुद्धच्या एका अभियानासाठी एक कुमक चामोर्शीच्या दिशेनं निघाली होती. परतीचं आश्‍वासन देऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडला होता. पण, नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात या ताफ्यातील एका वाहनाच्या पाऽऽर चिंधड्या उडाल्या… अर्थात, त्यात बसलेल्या रोशनकुमारच्या शरीराच्या अन् त्याच्या स्वप्नांच्याही… भातुकलीच्या खेळामधला ‘राजा’ डाव अर्ध्यावर मोडून निघून गेला होता…

आता नक्षलवाद्यांचे नावही कुणी काढलं ना की, धमण्यांतले रक्त सळसळायला लागते. हाताच्या मुठी नकळत आवळल्या जातात. न्यायाच्या नावाखाली चाललेला तो धिंगाणा थांबला पाहिजे, असं मनोमन वाटून जातं. आमचीच पोलिस ठाणी लुटून शस्त्रं जमा करायची अन् त्याच शस्त्रांचा वापर करून आमच्याच पोलिसांचा जीव घ्यायचा… अजून किती दिवस चालणार हा तमाशा? त्यांच्याशी लढताना शहीद झालेल्या नवर्‍याच्या, हार घातलेल्या तसबिरीसमोर उभं राहताना मनात जागणार्‍या आठवणींनी त्या संतापाची धार अधिकच तीव्र होते. पापण्यांच्या आडून अश्रूंचा लपंडाव सुरू होतो. घरातला कर्ता पुरुष गमावल्याच्या दु:खाने आपण पुरते खचून गेलो असल्याचे वास्तव धगधगते असले, तरी अजून लहान असलेल्या मुलांसमोर आपल्या वेदनांचे प्रदर्शन नको म्हणून पापण्यांच्या ओलावलेल्या कडांना आपसूकच पदर लागतो अन् सारे बळ एकवटून  ‘ती’ धैर्याने कामाला लागते…
लहानपणीच वडिलांची छत्रछाया गमावून बसलेली प्रिया म्हणते, त्यांच्या प्रेमाला पारखं होण्याची सल तर अजूनही मनात आहे. पण, नक्षल्यांशी लढताना वीरमरण आल्यानंतर तिरंग्यात विसावलेले बाबांचे पार्थिव बघितले तेव्हा मन सैरभैर झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. अश्रूंच्या धारा, प्रयत्न केलातरी थांबत नव्हत्या. पण, राष्ट्रध्वजाने झाकलेल्या शहीदांना दिली जात असलेली ती सलामी बघितली, तो मान बघितला अन् ऊर भरून आला. भरमसाट पैसा गाठीशी असलेल्यांच्या वाट्यालाही न येणारा सन्मान, शहीद झालेल्या माझ्या बाबांच्या वाट्याला आला होता… नंतर सरकारी मदतही दाराशी आली. बाबांच्या जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबाच्या, किमान गरजा पूर्ण होतील याची तजवीज त्यातून झाली. पण बाबांची उणीव? कितीही पैसा ओतला तरी ती कशी भरून निघेल? पण, एक मात्र खरंच. पोलिस विभागात एका साध्या शिपायाच्या रूपात वावरलेले बाबा आम्हाला खूप काही शिकवून गेले. जगायचं कसं ते अन् मरायचं कसं तेही…
नोकरीवर रुजू होऊन तसा खूप काळ मागे पडला नव्हता. एटापल्ली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी डेरा टाकला असल्याची खबर मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता, रोशनकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांची टीम सज्ज झाली. फारतर आठ-दहा घरांचे ते ‘गाव.’ दूरवर धानाची शेतं विखुरलेली. त्या रात्रीचं म्हणाल, तर पाऊस धो धो बरसत होता. पावसाची सोबत अन् काळ्याकुट्‌ट अंधाराच्या साक्षीनं लढलेली लढाई पोलिसांनी जिंकली होती. पोलिस विभागाच्या सेवेतलं पहिलंच बक्षीस पदरी पडलं होतं. कधीमधी रस्त्यानं जाताना शाळकरी पोरांनी गमतीनं सॅल्यूट ठोकला, तरी जंगलातल्या प्रतिकूल परिस्थितीत चाललेल्या संघर्षाचा क्षणभर विसर पडून चेहर्‍यावर नकळत स्मित उमटायचं. तसं म्हटलं तर रोशनकुमारचं व्यक्तिमत्त्वच निराळं होतं. सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं. लोभसवाणं. कुणाच्याही मदतीला तत्परतेनं धावून जाणारं. लग्न झालं. कालौघात संसारवेलीवर एक छानसं फूल उगवलं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच असावं बहुदा… नक्षल्यांविरुद्धच्या एका अभियानासाठी एक कुमक चामोर्शीच्या दिशेनं निघाली होती. परतीचं आश्‍वासन देऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडला होता. पण, नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात या ताफ्यातील एका वाहनाच्या पाऽऽर चिंधड्या उडाल्या… अर्थात, त्यात बसलेल्या रोशनकुमारच्या शरीराच्या अन् त्याच्या स्वप्नांच्याही… भातुकलीच्या खेळामधला ‘राजा’ डाव अर्ध्यावर मोडून निघून गेला होता…
चार वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवस गुढीपाडव्याचा. आज स्वरूपकुमारचा उत्साह काही औरच होता. दाराला तोरणं लावण्यापासून तर आईला स्वयंपाकात मदत करण्यापर्यंत, कशी धावपळ चालली होती त्याची! उद्यापासून चार दिवसांकरिता एका मोहिमेवर जायचं. तिथनं परतलो की एक ट्रेनिंग. पण, त्यापूर्वी घरात एक चारचाकी आणायची… त्याच्या मनातल्या भविष्यातल्या योजनांचा जणू पाऊस बरसत होता. खरं तर यापूर्वीही त्यानं त्या अनेकदा बोलून दाखवल्या होत्या. पण, आज त्याची उजळणी करताना त्याचा उत्साह मात्र जणू सारंकाही तो पहिल्यांदाच सांगत असल्याच्या थाटातला होता. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी तो मोहिमेवर रवाना झाला. अद्याप चोवीस तासही मागे पडायचे होते, तर बातमी येऊन धडकली… गुड्‌डू गेल्याची. हिक्केरच्या जंगलात झडलेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पोलिस दलाने गमावलेल्या वीर जवानांच्या यादीत गुड्‌डूपण होता. उराशी बाळगलेली स्वप्नं तशीच राहिली होती. अधुरी. पोराच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार बघताना पोरकं होण्याची वेळ इथे आईवरच आली होती…
‘शहादत’ची महती कोण नाकारेल? प्राणांवर उदार होऊन देशासाठी लढले तर ‘ते’, पण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून समाजात आमच्यासाठी व्यक्त होणारा आदर वर्णनातीतच. पण, त्यानं जगण्याची विवंचना थोडीच संपते. भावनिक प्रश्‍न सुटत नाही ते नाहीतच. एकत्र कुटुंबात नात्यागोत्यातली, आपल्या वडिलांच्या दिशेनं धाव घेणारी पोरं बघितली की, आपल्या मुलांच्या पोरकेपणाची जाणीव अधिकच तीव्रतेनं होते. प्रेमात दंग असलेलेच कशाला, अगदी रस्त्यानं सोबतीने जाणारे जोडीदार बघितले, तरी आपल्या जीवनातली त्याची उणीव जाणवण्याइतपत ठळक होऊन जाते. रात्री उशिरा घरी परतल्यावर झोपेत हात चुकूनही कपाळावर दिसला, तरी ‘‘तब्येत बरी नाही का?’’, असं काळजीनं विचारणारं हक्काचं माणूस आपण गमावलं असल्याची सल, जाता जात नाही…
….या सगळ्या भावना आहेत, महाराष्ट्राच्या एका टोकावर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील सदस्यांच्या. समाजाच्या रक्षणासाठी जिवावर उदार होत नक्षलवाद्यांशी लढताना मरण पत्करणार्‍यांचा आदर राखला जात असला, तरी त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय कसे जगत असतील? त्यांना कुठनं मिळत असेल संघर्षासाठीचे बळ? घरचा कर्ता माणूस गमावल्याच्या वेदना सतत उराशी बाळगून वावरणं इतकं का सोपं असतं? अशा, अस्वस्थ करणार्‍या कित्येक प्रश्‍नांच्या उत्तराच्या शोधात निघालेल्या काही धडपड्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून, गेल्या किमान चार वर्षांपासून इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जाताहेत. म्हणायला उपक्रम तसे छोटे आहेत, पण त्यांच्या परिणामांची व्याप्ती मात्र मोठी आहे. कुठे नक्षलपीडितांच्या मुलांना सायकलींचे वाटप, तर कुठे अंधारातल्या शाळांना सोलार लाईट उपलब्ध करून देणे, कुठे ओसाड पडलेली वाचनालये पुस्तकांनी सजवण्याचा, तर कुठे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. बल्लारपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार आणि पुण्यातील आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांच्या पुढाकारातून हे उपक्रम राबविले जात असतानाच, शहीदांच्या कुटुंबीयांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून झाला. सुमारे पस्तीस शहीद वीरांच्या कुटुंबीयांनी त्या स्पर्धेत भाग घेत आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. कुठे पेटून उठायला लावणारा संताप, तर कुठे डोळ्यांतून झरकन् पाणी पडेल अशा ओलावलेल्या भावना. कुठे, बजावलेल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान, तर कुठे आयुष्याचा दुवाच हरवल्याची खंत… अशी भावभावनांची सरमिसळ या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त झालेली. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या भावनांचं संकलन एका पुस्तकाच्या माध्यमातून लवकरच होत आहे. नागपूरच्या समाजसेविका डॉ. संध्या पवार या पुस्तकाचं संपादन करताहेत. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या पूर्वी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारागृहातल्या कैद्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेतून ‘कारागृह : एक वेगळे विश्‍व’ हे पुस्तक साकारले होते. यंदा त्यांच्या अभिनव उपक्रमाला शहीदांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आधार लाभला आहे…

Friday, July 21, 2017

दुर्दैवी!… मन्मथचा मृत्यू अन् समाजाचे वागणेही…!

हे खरंच आहे की, आई-वडील दोघेही नोकरी करतात, अशा घरातल्या मुलांची समस्या आणि मानसिकता काहीशी वेगळी असते. सारेच प्रश्‍न पैशाने सोडवता येत नाहीत. कित्येकदा हळवेपणातूनही काही समस्यांची उकल करावी लागते. हाताच्या बोटांवर उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या आडून अनेक नव्याच समस्यांनी घर केले आहे अलीकडे. पण, या वयातल्या भावनिक गुंतागुंतीचे संदर्भ तर तिथेही सापडत नाहीत. समाज प्रगत होत चाललाय् हे खरंच आहे. पण, म्हणून कालचे सारेच प्रश्‍न आज सुटल्यात जमा झाल्याचे चित्र थोडीच निर्माण झालेय् अद्याप? आर्थिक स्तर बदलले. नाश्त्यात पोह्यांच्या जागी पिझ्झा आला. खायला केएफसी, पनीनोचे ब्रॅण्डेड पदार्थ हातात आले. घरात, जराशा मोठ्या झालेल्या मुलांच्या वाट्याला स्वतंत्र बेडरूमही येऊ लागलीय् एव्हाना. हो! वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ लागलोय् ना आम्ही! पण, मासिक पाळीबाबत मुलींनी आणि पौगंडावस्थेतील बदलांबाबत मुलांनी हक्कानं, विश्‍वासानं नेमकं कुणाशी बोलावं, या प्रश्‍नाचं उत्तर मात्र अजूनही गवसत नाही, त्याचं काय? घरात चर्चा व्हावी असे हे मुद्देच नसल्याचे ठाम मत असलेले लोकच उजळ माथ्याने समाजाच्या वैचारिक प्रगतीच्या गप्पा हाणण्यात मग्न आहेत अन् तेच मन्मथच्या मृत्यूवरील उथळ चर्चेतही हिरिरीने सहभागी झाले आहेत.

समस्या असो वा मग एखादी वस्तू, ती दुसर्‍याची असेल, तर हाताळायला फार सोपी वाटते लोकांना. त्या संदर्भातील तर्क-वितर्कांचे फुगे फुगवायला सारेच सरसावलेले असतात. अनेकांमधला तज्ज्ञ, तत्त्ववेत्ता, सल्लागार जागा होतो अचानक अन् फुकटचे सल्ले देणार्‍यांची बघा कशी रांग लागते मग. दुसर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत विचार करण्याची आणि ते तडीस नेण्याचीही समाजाची स्वत:ची एक रीत असते. ‘माझा’ असेल तर चिंता अधिक गहन होत जाते. विचार सखोल होत जातात, पण तोच प्रश्‍न ‘दुसर्‍याचा’ असला तर मात्र वागण्याच्या पद्धतीत नको तेवढा फरक पडतो. महाराष्ट्र सरकारमध्ये उच्चपदस्थ सनदी अधिकारी असलेल्या एका दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आत्महत्या केल्याच्या, परवाच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही दिवसांत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत सोशल मीडियावरील सर्वाजनिक चर्चेतून जो उच्छाद मांडला गेला, तो बघितल्यानंतर तर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित होते. सारी सुखं दाराशी लोळण घालीत असताना ऐन उमेदीच्या उंबरठ्यावरच आयुष्य संपविणार्‍या त्या कोवळ्या जिवासाठी दु:ख व्यक्त करण्याच्या निमित्ताने कित्येकांनी जे अकलेचे तारे तोडले, कुटुंबव्यवस्थेवर, पालकांच्या कथित बेजबाबदारीवर, करीअर सांभाळण्याच्या नादात मुलांकडे होणार्‍या दुर्लक्षावर, तरुणाईच्या उच्छृंखलपणावर अगदी ठामपणे जी मतं व्यक्त झालीत, कोरडे ओढण्यात आलेत… या मुद्यावर समाज जबाबदारीनं वागत, बोलत असल्याचं जाणवलं नाही कुठेच, हा सारा तमाशा बघून!
पुढील शिक्षणासाठी म्हणून अगदी कालपरवाच पुण्यात दाखल झालेला मन्मथ मुंबईत आला असताना एका इमारतीवरून उडी घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवतो, ही बाब दुर्दैवीच. पण, त्याची कित्येक कारणं असू शकतात ना! ती सर्वांनाच ठाऊक असतील असं कुठे आहे? पण सोशल मीडियात, सकृद्दर्शनी दिसणार्‍या प्राथमिक दर्जाच्या संभाव्य कारणांवरच दर्जाहीन चर्चा करून मोकळे झाले कित्येक लोक. ‘बातमी’ सांगण्याची घाई झालेल्यांनीही तोच धिंगाणा घातला. लागलीच चर्चेच्या फेर्‍या झडल्या. ‘तो’ अशा बड्या अधिकार्‍यांच्या घरातला पोरगा असल्याने त्याच्या आत्महत्येची ‘बातमी’ होणे स्वाभाविक असेलही कदाचित. पण, त्यावरील चर्चेचा सूर आळवताना मात्र संवेदना हरवून बसल्यासारखे वागले सारे लोक. नव्हे, अजूनही तसेच वागताहेत. अशा प्रकरणात कसं वागू, बोलू नये याचं ‘आदर्श’ उदाहरण घालून देण्यासाठीच जणू धडपड चालली आहे प्रत्येकाची. इतकंच कशाला, इथे तर कारणांचा शोध घेण्यापूर्वीच निष्कर्ष काढून मोकळे झालेत लोक. त्या कुटुंबाशी संबंधित, असंबंधित, असे सारेच सहभागी झाले मग, चर्चेच्या या वारीत.
अठरा वर्षाचं पोर ज्यांनी गमावलं त्याचं दु:ख, त्या वेदनांचा दाह ज्यांनी सोसला त्यांनाच ठाऊक. समाजानं अगदीच दखल घेऊ नये वा त्यावर चर्चाही करू नये, असं कोण म्हणेल? तो एका उच्चपदस्थ अधिकारी दाम्पत्याचा मुलगा होता म्हणूनच नव्हे, तर तो अगदी एका सामान्य घरातला असता तरी या घटनेवर समाजाने चिंता वाहायलाच हवी होती. हो! अगदी खोलवर विचार करायला हवा होता. उद्ध्वस्त होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेपासून तर आई-वडील दोघेही नोकरी करतात अशा घरातल्या मुलांच्या मानसिकतेपर्यंत, नव्या पिढीच्या विचार करण्याच्या तर्‍हेपासून तर त्यांच्या समस्यांपर्यंत, सुविधा उपलब्ध करून देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जगावेगळ्या समस्यांपासून तर ‘मूल एकच हवं’च्या हेक्याबाबत निर्माण झालेल्या पुनर्विचाराच्या गरजेपर्यंतचे अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेत यायला हवे होते. पण, ते करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा या दाम्पत्यावर दोषारोपण करून मोकळं होणं सोपं वाटलं अनेकांना. कित्येकांनी, ‘मुलीचं प्रकरण असेल’ असा सरळ, साधा निष्कर्ष लागलीच काढून टाकला. त्यावर चर्चेच्या फेर्‍याही झडल्या. प्रेम प्रकरणापासून तर इतर वाईट सवयींपर्यंतही जाऊन पोहोचले लोक… पण, आता जी माहिती समोर येतेय्, त्यावरून इतर सर्व बाबींपेक्षा काहीशा भावनिक पातळीवर या घटनेचे संदर्भ जोडले जाताहेत. शिक्षणासाठी म्हणून आई-बाबांपासून दूर राहावे लागणार असल्याच्या विचारांनी मन्मथच्या मनात माजलेलं काहूर… ती कालवाकालव… ती घालमेल… या कारणांबाबतही तपासयंत्रणा विचार करते आहे…
पण… इथे तर या घटनेचे सामाजिक कंगोरे शोधून, त्यावर चर्चा करायची सोडून, दु:ख व्यक्त करण्याच्या निमित्ताने एखाद्याच्या खाजगी जीवनात डोकावण्याची संधी साधण्याचा प्रयत्न करून पाहिलेला दिसतोय् अनेकांनी. जे व्हायला नको होतं. कारण या प्रयत्नांत मग पातळी राखण्याचे भान राहिलेच नाही अनेकांना. परिणामी, चर्चेची दिशा भरकटत गेली. किंबहुना या निमित्ताने ज्या मुद्यांवर विचार व्हायला हवा होता, त्या मुद्यांवर तो झालाच नाही. अगदीच थातुरमातुर, वरवरची मतं व्यक्त करत थेट निष्कर्षाप्रत येण्याचीच घाई झालेली प्रत्येकाला.
हे खरंच आहे की, आई-वडील दोघेही नोकरी करतात, अशा घरातल्या मुलांची समस्या आणि मानसिकता काहीशी वेगळी असते. सारेच प्रश्‍न पैशाने सोडवता येत नाहीत. कित्येकदा हळवेपणातूनही काही समस्यांची उकल करावी लागते. हाताच्या बोटांवर उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या आडून अनेक नव्याच समस्यांनी घर केले आहे अलीकडे. पण, या वयातल्या भावनिक गुंतागुंतीचे संदर्भ तर तिथेही सापडत नाहीत. समाज प्रगत होत चाललाय् हे खरंच आहे. पण, म्हणून कालचे सारेच प्रश्‍न आज सुटल्यात जमा झाल्याचे चित्र थोडीच निर्माण झालेय् अद्याप? आर्थिक स्तर बदलले. नाश्त्यात पोह्यांच्या जागी पिझ्झा आला. खायला केएफसी, पनीनोचे ब्रॅण्डेड पदार्थ हातात आले. घरात, जराशा मोठ्या झालेल्या मुलांच्या वाट्याला स्वतंत्र बेडरूमही येऊ लागलीय् एव्हाना. हो! वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ लागलोय् ना आम्ही! पण, मासिक पाळीबाबत मुलींनी आणि पौगंडावस्थेतील बदलांबाबत मुलांनी हक्कानं, विश्‍वासानं नेमकं कुणाशी बोलावं, या प्रश्‍नाचं उत्तर मात्र अजूनही गवसत नाही, त्याचं काय? घरात चर्चा व्हावी असे हे मुद्देच नसल्याचे ठाम मत असलेले लोकच उजळ माथ्याने समाजाच्या वैचारिक प्रगतीच्या गप्पा हाणण्यात मग्न आहेत अन् तेच मन्मथच्या मृत्यूवरील उथळ चर्चेतही हिरिरीने सहभागी झाले आहेत.
खरंच आपला समाज गांभीर्याने बघू शकला आहे या घटनेकडे? की समस्या ‘माझी’ नसल्याने ती अगदीच सहजपणे सोडवायला निघालोय् आपण सारे? फार खोलात न शिरता… पुन्हा कुणी मन्मथ ‘या’ मार्गाने जाऊन स्वत:चे आयुष्य संपविणार नाही, अशी व्यवस्था, तशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची? करीअरच्या मागे धावण्याची गरज, त्यात होणारी फरफट, ‘हम दो हमारे दो’चे सूत्र झुगारून ‘एकच मूल’ होऊ देण्याच्या ठाम निर्धारामागील कटु सत्य, ते एकुलते एक मूलही जगाच्या स्पर्धेत उतरावे, टिकावे म्हणून करावी लागणारी धडपड, शिक्षणापासून तर खाद्यपदार्थांपर्यंत… त्याला सारेकाही दर्जेदारच देता यावे म्हणून होणारी कसरत, त्यामुळे होणारी दमछाक… जगाने आखून दिलेल्या मापदंडात त्याचे यश तोलण्याच्या नादात होणारी घालमेल, त्या घालमेलीत एकट्या मन्मथचीच नव्हे, तर तरुणाईचे प्रतिनिधित्व करणार्‍या, नव्या पिढीतील तमाम जनांची होणारी कुतरओढ… सारंच अजब आहे. पण, गांभीर्याने त्याच्या खोलात शिरायचेच नाही कुणाला इथे. प्रत्येक जण समस्या ‘आपली’ नसल्याच्या थाटातच तटस्थपणे बघतोय् त्याकडे. मन्मथच्या मृत्यूनंतर झडलेल्या चर्चेच्या उथळपणाला ही वृत्तीच कारणीभूत आहे, असं नाही वाटत…?

Friday, July 14, 2017

व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट!

या देशातील तमाम बड्या असामी या जनतेच्या जिवावर राज्य करण्यासाठीच जन्माला आल्या आहेत. गुन्हे केले तरी त्यांना त्याची शिक्षा ही ‘अशी’च मिळणार- व्हीआयपी दर्जाची. नावापुरती. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारी…! मंडालेच्या तुरुंगात टिळक अन् अंदमानात सावरकर… अशी नुसती कल्पना केली, तरी त्यांच्यासारख्या देशभक्तांच्या वाट्याला आलेल्या यातनांची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी ठरते. त्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात चोरांच्या वाट्याला येत असलेला राजेशाही थाट मग आपसूकच संतापजनक ठरतो. पण, चिडून उपयोग नाही ना राव! इथे गुन्हा करणार्‍या माणसाची पार्श्‍वभूमी अधिक महत्त्वाची असते. मिळणार्‍या शिक्षेच्या धारेची तीव्रता त्यावरून ठरते. गुन्हेगार ठरलेल्या सामान्यजनांसाठी घाणेरड्या अंधारकोठड्या आहेतच- भरपूर मच्छरांचा वावर असलेल्या. पण, जर का समोरचा माणूस सुब्रत रॉय असेल, तर त्याच्यासाठीची पंचतारांकित व्यवस्था उभारण्याची परवानगी मग खुद्द न्यायालयच बहाल करते- अगदी कुठल्याही आडकाठीविना! तो सलमान खान असेल, तर त्याचा कुठलाच कसूर नसल्याचे सिद्ध करायला तर काय वकिलांची फौजच सिद्ध होते. शिकार सलमानने केली नव्हती, तर मग त्याच्या खिशातून काढून त्या काळविटानेच आपल्या कानशिलावर लावून घेतली होती का बंदूक, हा प्रश्‍न तुम्हा-आम्हा बापुड्यांना पडतो, न्यायव्यवस्थेला नाही! 

अण्णाद्रमुक पक्षाच्या सचिव शशिकला यांना बंगळुरूच्या कारागृहात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटची बातमी ऐकून उसळणे अपेक्षित असलेल्या संतापाच्या लाटेपेक्षाही निरर्थक चर्चेचा जो धुराळा उडतोय्, तो बसेलच येत्या काही दिवसांत खाली! ज्या त्वेषाने लोक या प्रकरणी अद्वातद्वा बोलत सुटलेत, त्या शब्दांची धारही बोथट होईलच थोडा काळ मागे पडला की! कारण, आपल्या लोकांना सवय आहे असल्या प्रकरणात तळमळीने बोलण्याची अन् कितीही मोठी घटना असली, तरी काळाच्या ओघात ती विसरून जाण्याची. आणि तसेही, नवे काय घडले या प्रकरणात? राजकारण, चित्रपट, क्रिकेट, उद्योग… या, लोकांनी डोक्यावर घेतलेल्या क्षेत्रातील लोकांना शिक्षा होते कुठे आपल्या देशात? अन् झालीच कधी चुकून, तर ती भोगतो कोण? कायदा पायदळी तुडवण्याइतका पैसा खिशात असताना कारागृहात खितपत पडायचं या नामांकित बड्या लोकांनी? छे! त्यांना स्वत:ला सोडा, आपल्या देशातल्या सामान्य जनतेलाही वाटत नाही तसं. पालन तर सोडाच, पण कायदा त्यांच्यासाठी नसतोच, असे गृहीत धरून चालतात ते आणि इतर लोकही. शिवाय बाजार मांडून व्यवस्थेच्या चिंधड्या उडवायला तर शेकड्यानं माणसं उपलब्ध आहेत इथे. मग कोण कशाला भोगेल कारावास? चार दमड्या फेकून व्यवस्था विकत घेण्याची सोय सहज उपलब्ध असताना? देशद्रोही कारवायांचा आरोप असलेल्या संजय दत्तपासून, तर गुरांचा चारा खाणार्‍या लालूप्रसाद यादवांपर्यंत अन् सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयपासून तर कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनातून मलाई खाणार्‍या सुरेश कलमाडींपर्यंत… सांगा, कुणाला झाल्या वेदना कारावासाच्या? केलेला गुन्हा, वर्षानुवर्षांच्या प्रक्रियेनंतर सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगण्यासाठी सुब्रत रॉय यांच्यासाठी वातानुकूलित खोलीची स्वतंत्र व्यवस्था करून त्यांची बडदास्त ठेवली जात असेल अन् दस्तुरखुद्द न्यायालयालाही ते मान्य असेल, तर मग संपलंच सगळं. श्रीमंती अन् प्रसिद्धी लाभलेल्यांना तसेही जगणे सोपे आहेच या देशात. आता शिक्षेच्या नावाखाली होणारा कारागृहातला त्यांचा वावरही सुकर करण्याची निलाजरी धडपड चालली असेल, तर स्पष्टपणे जाहीर करून टाका ना एकदा की, इथे कुण्याही गर्भश्रीमंत-प्रसिद्ध व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही म्हणून. हो! उगाच लोकलाजेस्तव कायदेपालनाची नौटंकी हवी कशाला? टु-जीचा भला मोठा घोटाळा करूनही ए. राजा कारागृहातून बाहेर पडल्यावर तेवढ्याच सन्मानाने, कॉलर टाईट करून संसदेत बसू शकत असेल आणि दारावरचे भालदार, चोपदार, त्याचा गुन्हा, त्याने भोगलेली शिक्षा विसरून एका गुन्हेगाराला सलाम ठोकत असतील, तर मग अर्थ काय उरतो त्या शिक्षेला? तो संजय दत्त तर जणू न्यायव्यवस्थेवर उपकार केल्याच्या थाटात कारागृहात चक्कर मारून येतो अधूनमधून! ज्या सहजतेने तो शिक्षेच्या कालावधीत कारागृहातून बाहेर येऊ शकतो, ते बघितल्यानंतर तो न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत असल्याचं कोण म्हणेल? लालूप्रसाद यादव कारागृहातून बाहेर पडतानाही हसर्‍या चेहर्‍याने व्हिक्टरीचा ‘व्ही’ मिरवत विजयाच्या उन्मादात कॅमेर्‍यापुढे जात असतील, तर आत जेलमध्ये त्यांनी खरोखरीच ‘शिक्षा’ भोगल्याचा निष्कर्ष कसा अन् का काढायचा सामान्यजनांनी?
इथे खाकी वर्दीतला शिपाई नुसता बघितला तरी जागेवर थबकतात लोक. अगदी चौकात पोलिस दिसले तरी तारांबळ उडते त्यांची. न्यायालयाची तर पायरीही न चढण्याची जणू शपथ घेतलेली असते प्रत्येकाने. त्यामुळे जमेल तेवढे कायद्याच्या चौकटीतच जगण्याचा प्रयत्न करते जनता. पोलिस ठाणे अन् न्यायालयाच्या वाटेने तर जाणेही नको असते कुणाला. अशा, कायद्याच्या धाकात वावरणार्‍यांच्या गर्दीत काही बडी धेंडं मात्र सर्वांदेखत त्याच कायद्याची सहज खिल्ली उडवून जातात. सुब्रत रॉय यांच्यासाठी कारागृहात उभारण्यात आलेली पंचतारांकित अलिशान निवास व्यवस्था असेल किंवा मग कर्तव्याशी बेईमान झालेल्या कुठल्याशा अधिकार्‍याच्या मदतीने बंगळुरूच्या कारागृहात शशिकलांसाठी उपलब्ध झालेली व्हीआयपी सुविधा असेल, यापैकी कशाचेच आश्‍चर्य वाटत नाही आताशा इथे कुणाला. अहो, लोकांना तर बँका कोट्यवधी रुपयांनी लुटून विजय माल्ल्याच्या विदेशात पळून जाण्याचेही फारसे आश्‍चर्य वाटलेले नाही. उलट, हेच घडेल असे वाटत होते सगळ्यांना. आता तो शहाणा, तिकडे विदेशातून स्वत:च्या निर्दोषत्वाची ग्वाही देतोय्. सार्‍या देशाने त्याच्यावर विश्‍वास ठेवावा, अशी अपेक्षाही आहे त्याची. या देशाच्या न्यायव्यवस्थेला वाकुल्या दाखवत तिकडच्या न्यायव्यवस्थेचे दाखले देतोय् तो आता. निर्दोष होता तर मग देश सोडून पळून का गेला, हा प्रश्‍न कुणी विचारायचा? त्यालाही अन् इथल्या व्यवस्थेलाही?
तर सांगायचा मुद्दा असा की, एका राजकीय पक्षाच्या प्रमुख असलेल्या शशिकलांना कारागृहात शिक्षा भोगत असतानाच्या कालावधीत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या मुद्यावर सुरू झालेला गदारोळ हा मुळातच राजकीय नौटंकीचा एक भाग आहे. त्यांना तशी सुविधा तर जेलमध्ये दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मिळत होती. बातमी लीक झाली अन् बिंग आता फुटले एवढेच. पण, जणूकाय या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असेकाही विपरीत घडले असल्याच्या थाटात त्यावर वादळी चर्चा सुरू आहे. पूर्वी असे कधी घडलेच नव्हते की, कोणत्या गुन्हेगार व्हीआयपीला अशी खास वागणूक मिळालीच नव्हती का कधी, ते तरी सांगा? या देशातील तमाम बड्या असामी या जनतेच्या जिवावर राज्य करण्यासाठीच जन्माला आल्या आहेत. गुन्हे केले तरी त्यांना त्याची शिक्षा ही ‘अशी’च मिळणार- व्हीआयपी दर्जाची. नावापुरती. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारी…!
मंडालेच्या तुरुंगात टिळक अन् अंदमानात सावरकर… अशी नुसती कल्पना केली, तरी त्यांच्यासारख्या देशभक्तांच्या वाट्याला आलेल्या यातनांची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी ठरते. त्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात चोरांच्या वाट्याला येत असलेला राजेशाही थाट मग आपसूकच संतापजनक ठरतो. पण, चिडून उपयोग नाही ना राव! इथे गुन्हा करणार्‍या माणसाची पार्श्‍वभूमी अधिक महत्त्वाची असते. मिळणार्‍या शिक्षेच्या धारेची तीव्रता त्यावरून ठरते. गुन्हेगार ठरलेल्या सामान्यजनांसाठी घाणेरड्या अंधारकोठड्या आहेतच- भरपूर मच्छरांचा वावर असलेल्या. पण, जर का समोरचा माणूस सुब्रत रॉय असेल, तर त्याच्यासाठीची पंचतारांकित व्यवस्था उभारण्याची परवानगी मग खुद्द न्यायालयच बहाल करते- अगदी कुठल्याही आडकाठीविना! तो सलमान खान असेल, तर त्याचा कुठलाच कसूर नसल्याचे सिद्ध करायला तर काय वकिलांची फौजच सिद्ध होते. शिकार सलमानने केली नव्हती, तर मग त्याच्या खिशातून काढून त्या काळविटानेच आपल्या कानशिलावर लावून घेतली होती का बंदूक, हा प्रश्‍न तुम्हा-आम्हा बापुड्यांना पडतो, न्यायव्यवस्थेला नाही! बरं, प्रभाव वापरून, पैसा फेकून व्यवस्था पायदळी तुडवणार्‍यांनाच दोष कशाला द्यायचा? दोष तर व्यवस्थेचा बाजार मांडून बसलेल्यांचाही तेवढाच आहे ना! आरोपीच्या पिंजर्‍यात ते कधीच उभे राहात नाहीत. तरीही, न्यायासमोर सगळे समान असल्याची तुतारी वाजवायला मोकळे असतात सारे… कायद्याचा जरब राहिला नसल्याची ओरड होते ती वेगळीच…
राहत इंदोरींच्या शब्दांत सांगायचं तर, 
‘गुनाह करनेवाले मुजरीम 
इतनेभी बुरे नही होते
लेकीन, सजा ना देकर
अदालत उन्हे बिगाड देती हैं…’

Wednesday, July 12, 2017

विनोदाची ठाकरी शैली!

बाळासाहेबांच्या घरातला जन्म आणि (केवळ त्यामुळेच लाभलेले) एका राजकीय पक्षाचे प्रमुखपद, यामुळे इतरांच्या तुलनेत तुमची राष्ट्रभक्ती नाही म्हणायला काकणभर सरसच असणार! त्यामुळे झाल्या घटनेच्या, तुम्हाला आलेल्या रागाची तीव्रता इतरांपेक्षा अधिक असणंही ओघानंच आलं. काल ते सार्‍या देशानं अनुभवलं. बापरे! कसला तो राग. मानलं बुवा तुम्हाला. वाटलं, बस्स! आत्ताच्या आत्ता तरातरा सरकारमधून बाहेर पडणार आणि दहशतवाद्यांना ठिकाणावर लावूनच दम घेणार तुम्ही! सारा देश चमत्कारिक नजरेनं नुसता बघत राहिला होता तुमच्याकडे. तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे बघायला. तर काय, पुन्हा एकदा लोकरंजनाचा तोच ‘घिसापीटा’ कार्यक्रम. एव्हाना सरावातून सिद्ध झालेली, सरकारला शिव्या घालण्याची तीच रटाळ परिपाठी. पण एक मात्र खरं हं साहेब! हसायला येत असलं ना तरी उसने आणलेले तुमचे ते अवसान, प्रत्यक्षात नसतानाही जो असल्याचे दाखवण्यासाठी आपण धडपडता, तो करारी बाणा, बघण्याची मजा काही वेगळीच बघा! खरं तर तुम्ही पण सरकारचाच एक भाग आहात (असं काही लोक अजूनही मानतात!) त्यामुळे दहशतवाद्यांशी लढण्याची जबाबदारी मोदींएवढीच तुमचीही आहेच की! पण तुमचं धोरण बघता, जबाबदारीशी तुम्हाला काही घेणंदेणं असल्याचं दिसत नाही कुठे. जबाबदारी बासनात गुंडाळून, आपणही सरकारमध्ये आहोत ही बाब जाणीवपूर्वक विसरून, संतापाचा जो तमाशा आपण मांडता ना… तो तर एकदम लाजवाब! व्वा. क्या बात है! म्हणजे कसं बघा, मंत्रिपद, सरकारी बंगले, त्या आडून मिळणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे, सारं काही शिवसेनेनंही लाटायचं. पण, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी मात्र एकट्या फडणवीसांची! दहशवाद्यांशी दोन हात करायचे ते मोदींनी! अन् तुम्ही? आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरणार? सत्तेतल्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहणार? स्वत:ची जबाबदारी कीक मारून उडवण्याची ही तर्‍हा एकदम खासच आहे बघा साहेब तुमची! अगदी त्या पवारांनाही लाजविणारी.

‘‘एक वेळ मोदींमध्ये हिटलर संचारला तरी चालेल, पण त्यांनी हाती तलवार घेऊन दहशतवादाचे निर्दालन केलेच पाहिजे…’’ हो! दस्तुरखुद्द ‘साहेब’ म्हणालेत असं! खुद्द बाळासाहेबांचा वारसा चालविणार्‍या साहेबांचे वचन म्हणजे त्रिलोकातील त्रिकालाबाधित सत्य. त्याची अंमलबजावणी न झाली तरच नवल! काय पण तो करारी बाणा अन् कसला म्हणून तो त्वेष. दहशतवाद्याचीही पुरती दाणादाण उडाली असणार परवा त्यांचे ते विधान ऐकून. या देशात गेली निदान चार दशकं दहशतवाद आपले अस्तित्व राखून आहे. पण, त्याच्याशी लढण्याची जी घाई साहेबांना आता झालेली दिसतेय् ना, ती यापूर्वी कधी म्हणून कधी बघायला मिळाली नव्हती. विशेषत:, देशातल्या यंदाच्या सत्ताबदलानंतर साहेबांच्या अंगात संचारलेला जोश… वा. व्वा! काय वर्णन करावे त्याचे. अगदी विरोधकांवर तुटून पडावे एवढ्या त्वेषाने ते मोदींच्या सरकारवर वार करून जाताहेत. हं. हं. असं हसण्यावारी नेऊ नका त्यांचं म्हणणं. अरे, केवढी कसरत करावी लागत असेल त्यांना असं करताना. सोपं आहे का, आपणच सहभागी असलेल्या सरकारविरुद्ध रान पेटवणं? एकीकडे सरकारमध्ये सहभागी व्हायचं, त्याचे सारे लाभ उचलायचे, त्याच्या यशातही सहभागी व्हायचं. पण, जरा कुठे काही विपरीत घडलं की मग कशाचाही मुलाहिजा न बाळगता, नेतृत्व करणार्‍या माणसाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं. आपला त्याच्याशी काडीचाही संबंध नसल्याच्या थाटात शिव्याशाप द्यायच्या. खरंच! साहेब, कमाल आहे बरं तुमची! देशात सर्वदूर, केवळ नावालाच शिल्लक राहिलेल्या विरोधी पक्षालाही जे जमलं नाही ना, ते सत्तेत राहूनही अगदी सराईतपणे करताहात तुम्ही. लोकांना वाटतं, हाच खरा मर्द गडी! सत्तेत असूनही सरकारविरुद्ध बोलायला जराही घाबरत नाही. छाती ठोकून नेत्यांविरुद्ध बोलतो. प्रसंगी त्यांना दम देतो. पण सत्ता मात्र सोडत नाही, ही बाब अलहिदा! तर साहेब, सांगायचा मुद्दा असा की, स्वत: सहभागी असलेल्या सरकारविरुद्ध बरळण्याचा एव्हाना तुम्हाला चांगलाच सराव झाला असणार. त्यामुळे अलीकडे तर तुमच्या बोलण्याची धारही तीव्र होऊ लागली आहे. अगदी तलवारीच्या चकाकत्या पातीसारखी! करारी बाण्याची ती नौटंकीही छानच साधली आहे बघा तुम्हाला. अहो, प्रत्यक्षात नसला म्हणून काय झालं, बाळासाहेबांचं नुसतं नाव घेतलं तरी आवेश संचारतो शिवसैनिकांत. तुम्ही तर त्यांचे खरेखुरे वारसदार आहात. त्यांच्या नावाने तुम्हाला स्फुरण चढणे तर स्वाभाविकच. अजून किती दिवस त्यांचं नाव घेऊन राजकारण कराल, असा बोचरा प्रश्‍न विचारतात काही लोक, पण आपण कशाला लक्ष द्यायचं त्यांच्याकडे? असल्या गैरसोयीच्या प्रश्‍नांची उत्तरं थोडीच द्यायची असतात, एवढं का कळत नाही तुम्हाला? पण काही नतद्रष्टे लोक उगाच चिमटे काढतात. म्हणतात, एवढाच विरोध आहे तर मग सरकारमधून बाहेर का पडत नाही. आता त्यांना कोण सांगणार की, ही सगळी नौटंकी राजकीय असते. राजकारणात राहायचं तर करावी लागतात असली नाटकं. कित्येकदा आवाक्याबहेर चाललेल्या स्वकीयांना सांभाळण्यासाठीही करायची असते असली बेताल बडबड. द्यावे लागतात इशारे. पण आपले पंतप्रधान फार समजदार. त्यांना चांगलीच कळते बरं का तुमची अडचण! त्यामुळे, तुम्ही एवढे बरळलात तरी कधी म्हणून चकार शब्द काढत नाहीत ते. उलट मित्रपक्षांच्या बैठकीत तेवढ्याच सन्मानाने भोजनाचे निमंत्रण असते तुम्हाला. पण तुम्ही पडलात स्वाभिमानी. त्या सन्मानापोटी काय, देशहित पणाला लावायचं? छे! मग तिथनं बाहेर पडलं की लागलीच पुन्हा एकदा तो करारी बाणा जागा होतो. हसरा चेहरा पुन्हा गंभीर होतो. सरकारवर वार करायला पुन्हा सज्ज होता तुम्ही. काय पण मस्त अभिनय करता साहेब तुम्ही. व्वा! दिल खुश होतो बघा एकदम. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर बोलताना सरकारला काय हाणायचे तुम्ही. व्वा! बहोतखुब! आता, काश्मीरच्या मुद्यावरच बघाना. केवढे संतापलात तुम्ही परवा. मग काय? अमरनाथला जाणार्‍या यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झालाय् म्हटल्यावर राग नाही का येणार तुम्हाला? हे खरे आहे की, या हल्ल्यामुळे सारा देश संतापला आहे. पेटून उठला आहे. हल्लेखोरांना बखुटं धरून, चौकात उभं करून गोळ्यांनी उडवलं पाहिजे, अशी भावनाही सर्वांचीच आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांत काश्मिरातील समस्या केंद्र सरकार वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे. पण करणार काय, तिथली परिस्थितीच विपरीत आहे. राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न पडावा असं चित्र आहे. भारतात राहूनही, हातातली घड्याळं पाकिस्तानच्या वेळेशी जुळवून वावरणार्‍यांच्या गर्दीतून दहशतवादी हुडकून काढायचे आहेत. हो! हेच वास्तव आहे. त्यामुळे राजकारण आणि धर्माच्या पलीकडे विचार करूनच ही समस्या हाताळण्याची गरज आहे. हे आव्हान पेलणे फार सोपे आहे, असं वाटणं वेगळं आणि प्रत्यक्षात ते पेलताना, ज्याचा सामना करावा लागतो, ती वस्तुस्थिती वेगळी. पण एवढ्या उच्च पातळीवर सरकारची बाजू समजून घ्यायला तुम्ही कुठे सरकारचा भाग आहात? बाळासाहेबांच्या घरातला जन्म आणि (केवळ त्यामुळेच लाभलेले) एका राजकीय पक्षाचे प्रमुखपद, यामुळे इतरांच्या तुलनेत तुमची राष्ट्रभक्ती नाही म्हणायला काकणभर सरसच असणार! त्यामुळे झाल्या घटनेच्या, तुम्हाला आलेल्या रागाची तीव्रता इतरांपेक्षा अधिक असणंही ओघानंच आलं. काल ते सार्‍या देशानं अनुभवलं. बापरे! कसला तो राग. मानलं बुवा तुम्हाला. वाटलं, बस्स! आत्ताच्या आत्ता तरातरा सरकारमधून बाहेर पडणार आणि दहशतवाद्यांना ठिकाणावर लावूनच दम घेणार तुम्ही! सारा देश चमत्कारिक नजरेनं नुसता बघत राहिला होता तुमच्याकडे. तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे बघायला. तर काय, पुन्हा एकदा लोकरंजनाचा तोच ‘घिसापीटा’ कार्यक्रम. एव्हाना सरावातून सिद्ध झालेली, सरकारला शिव्या घालण्याची तीच रटाळ परिपाठी. पण एक मात्र खरं हं साहेब! हसायला येत असलं ना तरी उसने आणलेले तुमचे ते अवसान, प्रत्यक्षात नसतानाही जो असल्याचे दाखवण्यासाठी आपण धडपडता, तो करारी बाणा, बघण्याची मजा काही वेगळीच बघा! खरं तर तुम्ही पण सरकारचाच एक भाग आहात (असं काही लोक अजूनही मानतात!) त्यामुळे दहशतवाद्यांशी लढण्याची जबाबदारी मोदींएवढीच तुमचीही आहेच की! पण तुमचं धोरण बघता, जबाबदारीशी तुम्हाला काही घेणंदेणं असल्याचं दिसत नाही कुठे. जबाबदारी बासनात गुंडाळून, आपणही सरकारमध्ये आहोत ही बाब जाणीवपूर्वक विसरून, संतापाचा जो तमाशा आपण मांडता ना… तो तर एकदम लाजवाब! व्वा. क्या बात है! म्हणजे कसं बघा, मंत्रिपद, सरकारी बंगले, त्या आडून मिळणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे, सारं काही शिवसेनेनंही लाटायचं. पण, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी मात्र एकट्या फडणवीसांची! दहशवाद्यांशी दोन हात करायचे ते मोदींनी! अन् तुम्ही? आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरणार? सत्तेतल्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहणार? स्वत:ची जबाबदारी कीक मारून उडवण्याची ही तर्‍हा एकदम खासच आहे बघा साहेब तुमची! अगदी त्या पवारांनाही लाजविणारी. राहिला प्रश्‍न मोदींनी हिटलरी बाणा अंगीकारून दहशतवाद्यांना चारीमुंड्या चीत करावे, या तुमच्या अपेक्षेचा, तर त्यावरून, दहशतवाद्यांच्या जागतिक पातळीवर दिवसागणिक विस्तारत चाललेल्या समस्येचा गाढा अभ्यास आपण केला असल्याचेच निष्पन्न होते! त्यामुळे तो निपटण्याची आपण सुचविलेली तर्‍हाही एकदम लाजवाब! साहेब, यासाठी तर आपल्याला साष्टांग दंडवतच घातला पाहिजे… सत्ता हातून जाऊ न देता, आपल्याच सरकारला विरोधकांप्रमाणे झोडपून काढण्याची, त्यांना शिव्याशाप देण्याची रीत आपण भविष्यातही अशीच कायम ठेवावी ही तमाम देशवासीयांच्या वतीने आपल्याला मन:पूर्वक विनंती. हो! मनोरंजनाचे हे साधन आमच्यापासून हिरावून घेऊ नये, अशी आग्रही मागणी आहे त्यांची…!

Saturday, July 1, 2017

लघुशंकेचे कवित्व!

आपल्या देशाचा एक वयोवृद्ध मंत्री एका नैसर्गिक गरजेची पूर्तता करण्यासाठी उभा असताना त्याचे चित्रीकरण करून वर पुन्हा सार्‍या जगाला ‘दाखवण्यासाठी’ ते व्हायरल करणार्‍या त्या हुश्शार माणसाला तर काय, दादच द्यायला हवी! त्याच्या बुद्धिमत्तेलाही कुर्निसातच केला पाहिजे! या अभिनव कर्तबगारीसाठी जमल्यास जाहीर सत्कारही व्हावा त्याचा! असले दृश्य चित्रित न करण्याचे आणि केले तरी ते इतर कुणासमोर उघड न करण्याचे साधे संकेत पाळण्याचे भान ज्याला जपता आले नाही, दुर्दैवाने त्या दीडशहाण्याच्या कृत्यावर कुठेही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही अद्याप. ना नाराजी, ना संताप. पण, मंत्र्यांच्या कृत्यावर मात्र राजकारण करायला निघालेत सारे. स्वत: कधीही रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंकेची नैसर्गिक क्रिया पार पाडली नसल्याच्या थाटात त्यांना शहाणपणाचे डोस पाजायला उठलेत लोक! पंतप्रधानांनी आरंभलेल्या स्वच्छता मोहिमेची या एका कृत्यामुळे पाऽऽर ऐशीतैशी झाली असल्याची मल्लिनाथी करायलाही विसरलं नाही इथे कुणी. खरं तर मंत्र्यांच्या त्या कृत्याची नवलाई नाहीच इथे कुणाला. कशी असेल सांगा? या देशाला अपूर्वाई फक्त, एका मंत्र्याने उघड्यावर लघुशंका उरकण्याची आहे. लाल दिव्याच्या गाडीत फिरणार्‍या, वातानुकूलित वातावरणात वावरणार्‍या, अलिशान जीवन जगणार्‍या माणसानंही तेच करावं, जे आम्ही रोज करतो? एवढीच एक बाब आश्‍चर्याची आहे सर्वांच्या लेखी. राहिला प्रश्‍न उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्याचा, तर त्याचे कुणाला फारसे आश्‍चर्य वाटण्याचेही कारण नाही इथे. कारण हजारो लोक याच पद्धतीने विधी उरकतात या देशात. कोण फोटो काढतो अन् कोण व्हायरल करतो हो ती दृश्यं?

छे! छे! राधामोहनसिंह साहेब, चुकलंच तुमचं! अहो, केंद्रात मंत्री असलेल्या माणसानं असं करायचं? चक्क रस्त्याच्या कडेला लघुशंकेला जायचं? छे! काहीतरीच. केवढं वाईट वाटलं या देशातल्या लोकांना! आम्हा बापुड्यांचं ठीक. सामान्य लोक आम्ही. रस्त्याच्या कडेला काय नि नदी-नाल्यांच्या काठावर काय, चालून जातं आमचं! पण, तुम्ही तर दस्तुरखुद्द मंत्री! तुम्ही असं करायचं? शिवं शिवं… कुठे चाललाय् हा देश? तिकडे बघा, सारा समाज कसा चवताळून उठलाय् तुमच्या या वागण्याविरुद्ध. जणूकाय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग घडलेला बघितला लोकांनी. माणसं केवढी पेटून उठली! म्हणाली, तुम्ही पंतप्रधानांच्या स्च्छता मोहिमेचा पार बट्‌ट्याबोळ केलाय्. लाज आणली, ही मोहीम राबवणार्‍या सरकारला. हो! स्वत: अतिशय काटेकोरपणे वागणारी माणसं आहेत बरं का ती, तुमच्यावर चवताळून उठलेली. त्यांच्यापैकी एकानेही उभ्या आयुष्यात कधी असले ‘लाजिरवाणे’ कृत्य केलेले नाही. अगदी शपथेवर सांगू शकेल, त्यातला प्रत्येक माणूस हे! खरं तर नरेंद्र मोदींनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेची प्रेरणाच मुळात ही तमाम मंडळी आहे- स्वच्छतेचा वसा घेतलेली! परवा व्हायरल झालेली मंत्र्यांची ‘ती’ चित्रफीत बघून खवळलेल्या, टीका करायला सरसावलेल्या एकेका माणसावर नजर टाकून बघा! धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आढळेल एकेक जण. त्यातला कुणी ना कधी रस्त्यावर थुंकला, ना कधी कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण केली! त्यामुळे इतरांवर चिखल उडविण्याचा तर हमखास परवाना लाभलाय् त्यांना! तेच करायला सरसावलेत सारे.
नाहीत आपल्या देशात असल्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध सर्वदूर. बड्या शहरांचंतरी थोडंफार बरं आहे. तिकडे गावाकडे तर परिस्थिती फारच बिकट आहे ना राजेहो! तिकडे तर सारंच उघड्यावर… पण, ‘या’ मंडळीला अजीबात रुचत नाही तसला प्रकार. विशेषत: भाजपा विरोधकांना तर जराही खपलेले नाही ते. एका मंत्र्याने उघड्यावर निसर्गविधी उरकणे, अजीबात रुचलेले नाही काहींना. मग काय, केवढा संताप झाला त्यांचा! अरे, केवढ्या सुविधा उभारून ठेवल्यात त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्याच्या सात दशकांत! शौचालंयं काय, मुतार्‍या काय, स्वच्छतागृहे काय, कशाची म्हणून कशाचीच वानवा नाही इथे. लोकंच खुळे. भरपूर शौचालयं अस्तित्वात असताना उगाच भर रस्त्यावर लज्जेचे प्रदर्शन मांडायला बसतात. तर सांगायचा मुद्दा असा की, वैयक्तिक जीवनात स्वच्छतेची मोहीम फत्ते करूनच मग राधामोहनसिंहांवर टीकेची सरबत्ती करायला पुढे आलेत बघा हे लोक!
आपल्या देशाचा एक वयोवृद्ध मंत्री एका नैसर्गिक गरजेची पूर्तता करण्यासाठी उभा असताना त्याचे चित्रीकरण करून वर पुन्हा सार्‍या जगाला ‘दाखवण्यासाठी’ ते व्हायरल करणार्‍या त्या हुश्शार माणसाला तर काय, दादच द्यायला हवी! त्याच्या बुद्धिमत्तेलाही कुर्निसातच केला पाहिजे! या अभिनव कर्तबगारीसाठी जमल्यास जाहीर सत्कारही व्हावा त्याचा! असले दृश्य चित्रित न करण्याचे आणि केले तरी ते इतर कुणासमोर उघड न करण्याचे साधे संकेत पाळण्याचे भान ज्याला जपता आले नाही, दुर्दैवाने त्या दीडशहाण्याच्या कृत्यावर कुठेही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही अद्याप. ना नाराजी, ना संताप. पण, मंत्र्यांच्या कृत्यावर मात्र राजकारण करायला निघालेत सारे. स्वत: कधीही रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंकेची नैसर्गिक क्रिया पार पाडली नसल्याच्या थाटात त्यांना शहाणपणाचे डोस पाजायला उठलेत लोक! पंतप्रधानांनी आरंभलेल्या स्वच्छता मोहिमेची या एका कृत्यामुळे पाऽऽर ऐशीतैशी झाली असल्याची मल्लिनाथी करायलाही विसरलं नाही इथे कुणी.
खरं तर मंत्र्यांच्या त्या कृत्याची नवलाई नाहीच इथे कुणाला. कशी असेल सांगा? या देशाला अपूर्वाई फक्त, एका मंत्र्याने उघड्यावर लघुशंका उरकण्याची आहे. लाल दिव्याच्या गाडीत फिरणार्‍या, वातानुकूलित वातावरणात वावरणार्‍या, अलिशान जीवन जगणार्‍या माणसानंही तेच करावं, जे आम्ही रोज करतो? एवढीच एक बाब आश्‍चर्याची आहे सर्वांच्या लेखी. राहिला प्रश्‍न उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्याचा, तर त्याचे कुणाला फारसे आश्‍चर्य वाटण्याचेही कारण नाही इथे. कारण हजारो लोक याच पद्धतीने विधी उरकतात या देशात. कोण फोटो काढतो अन् कोण व्हायरल करतो हो ती दृश्यं? हजारो लोक तसे करताहेत म्हटल्यावर कोण उठतो पोटतिडिकीने बोलायला अन् कुणाला वाटते की, ही बाब स्वच्छतेच्या मोहिमेत बाधा पोहोचवते म्हणून? गावं गोदरीमुक्त झाल्याचा दावा करणार्‍यांनी सकाळच्या वेळी एक फेरफटका मुंबईच्या लोकलमधून मारून यावा अन् बघावे रुळाशेजारचे चित्र. म्हणजे, खुद्द देशाच्या आर्थिक राजधानीतली वस्तुस्थिती जराशी तरी ध्यानात येईल त्यांच्याही. हो! हे तमाम लोक स्वच्छता मोहिमेचा बट्‌ट्याबोळच करताहेत. पण, दोष कुणाला द्यायचा? व्यवस्थेच्या अभावाला, की…
दिल्लीतले मंत्री असो की मग गावाकडची माणसं, निसर्गाच्या पलीकडे कुणीच नाही. पण, त्या गरजांच्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. ज्या आहेत, त्याचा दर्जा चांगला नाही. गावातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय म्हणावी अशी असते. इतकंच कशाला, अगदी मेट्रो सिटी चेन्नईच्या प्रसिद्ध मरीना बीचवर उभारलेल्या स्च्छतागृहाची एकविसाव्या शतकातली अवस्थाही, वापर न करता, नाक बंद करून बाहेर पडण्याच्या लायकीची आहे. ज्या देशातल्या ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातल्या झोपडपट्‌ट्यांमधील ७० टक्के घरातही शौचालय नाही, तिथल्या सार्वजनिक स्वच्छताघरांची अवस्था ही ‘अशी’ असताना, कोण कशाला हसतंय् मंत्र्यांनी उघड्यावर लघुशंका केली म्हणून? ही व्यक्ती केंद्रात मंत्री नसती तर? मग चाललं असतं त्यांनी तसं केलेलं? व्यवस्थेच्या अभावात एका मंत्र्यांवर ही वेळ आली. या समाजातल्या महिलांची स्थिती काय होत असेल, कधी कल्पना तरी करू शकू आपण?
मंत्र्यांनी जे केलं त्याचं समर्थन नाहीच करणार कुणी. एखाद्या स्वच्छतागृहाचा शोध त्यांनी घ्यायला हवा होता, हेही खरंच! पण, तसा प्रयत्न झालाच नसेल, या निष्कर्षाप्रत इतक्या घाईगर्दीनं कशाला यायचं? दिमतीला असलेल्या चाकरमान्यांनी, सुरक्षारक्षकांनीही साहेबांची गरज ओळखून धावपळ करत शोधाशोध केली असणारच की! त्याउपरही मंत्र्यांना असे उघड्यावर जावे लागले, याचा सरळ, साधा अर्थ एवढाच की, तिथे स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नव्हती. यावरून एवढे अकांडतांडव कशासाठी चाललेय्? सुविधांच्या अभावाची ही परिस्थिती योग्य नाही. पण, तेच धगधगते वास्तव आहे. ते बदलण्याचाच तर प्रयत्न स्वच्छतेच्या मोहिमेतून साकारायचा आहे. ते करायचं सोडून या प्रकरणात, फुशारक्या मारत तुटून पडलेले लोक मुळातच या मुद्याचे राजकारण करू बघताहेत. त्यांना दुरून तमाशा बघायचा आहे. आता ‘मोदी मास्तर’ आपल्या वर्गातल्या या विद्यार्थ्याला कसा दम देतात, त्याला छड्यांचा कसा मार बसतो, हे बघण्यात स्वारस्य असलेली ही मंडळी आहे. अरे, स्वत:च्या घरासमोरचं अंगण आणि त्यापुढचा जरासा रस्ता स्वच्छ ठेवा, हे सांगायलाही ज्यांना एक ‘मोदी’ लागतो, असे लोक आहोत आम्ही! जागा मिळेल तिथे पचापचा थुंकणारे, पान खाऊन लिफ्टच्या कोपर्‍यात पिचकार्‍या मारणारे, केळी खाऊन त्याची सालं बसल्या जागेवरून जमेल त्या दिशेने भिरकावणारे, स्वत: जवळच्या कचर्‍यातून जमेल तिथे उकिरडे निर्माण करणारे… अन् तरीही केवढा गहजब चालला आहे बघा स्वच्छतेच्या मुद्यावर! खरंच काही कळत नाहीय्… हा देश खरंच सुधारतोय्, का जरा जास्तच राजकारणी होतो आहे…!