Friday, January 27, 2017

बेजबाबदार शाहरुख अन्‌ मूर्ख जनता

अलीकडच्या काळातील काही चित्रपटांनी कोट्यवधीचा धंदा केल्याचे सांगतात. यातील एकही चित्रपट कुठल्याही चित्रपटगृहात विक्रमी वेळेसाठी प्रदर्शित होत राहिल्याची बातमी मात्र कुठेच ऐकायला मिळाली नाही. या चित्रपटांनी रोैप्यमहोत्सव वगैरे साजरा केल्याची वार्ता तर दूरदूरपर्यंत ऐकिवात नाही. लोकांनी इतक्या उड्या घातलेला, लोकांना इतका आवडलेला चित्रपट थिएटरमध्ये मात्र फार दिवस प्रदर्शित होत नाही, हे जरा आश्‍चर्यच ना! याउलट ज्यांनी आपल्या काळात प्रदर्शनाचे विक्रम नोंदवले त्या बॉबी, शोले, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जय संतोषी मॉं, या सारख्या गाजलेल्या अन् लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांना मात्र असल्या प्रमोशनची कधी गरज पडल्याचाही इथे कुणाला अनुभव नाही. रौप्य महोत्सव साजरा करणार्‍या चित्रपटांची मालिकाच रसिकांपुढे सादर करण्याचा ज्यांचा विक्रम गिनिज बुकात नोंदवला गेला, त्या दादा कोंडकेंनाही कधी अशा तद्दन फालतू मार्गाने आपल्या चित्रपटांचा प्रचार करावा लागला नव्हता. कथानकात ताकद असली, अभिनय-गीत-संगीत त्या तोडीचे असले, निर्मिती तेवढी दर्जेदार असली की रसिकांचा प्रतिसाद मिळतोच त्या निर्मितीला. शाहरुख तर सुपरस्टार म्हणवून घेतो स्वत:ला. त्याला का गरज पडावी असल्या टुकार मार्गाने स्वत:च्या चित्रपटाचा प्रचार करण्याची? 

हा किस्सा प्रसिद्ध सिनेकलावंत दिलीप कुमार यांच्या संदर्भातला आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानात गेलेले असताना त्यांना, पेशावरमध्ये जेथे त्यांचा जन्म झाला ते घर बघायचे होते. प्रचंड गोपनीयता राखून पाकिस्तान सरकारने त्यांच्यासाठी तशी व्यवस्था उभारून दिली होती. पूर्वजांच्या घराला ते देणार असलेल्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता राखण्यात आली होती. पण कशी कुणास ठावूक, लोकांना कुणकुण लागलीच. दिलीप कुमार यांची गाडी पोहोचली तेव्हा त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी तिथे जमली होती. गाडी ‘त्या’ घरासमोर नुसती उभीच राहिली, तर लोकांनी गराडा घातला गाडीला. तेथे उपस्थित मोजक्या पोलिसांना ही गर्दी, प्रयत्न केले तरी आवरणार नाही, याची कल्पना येताच खालीही न उतरता गाडी तिथून काढून घेण्याची सूचना दिलीप कुमार यांनी त्यांच्या चालकाला केली. आपण तिथे थांबलो असतो तर अकारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असता, हे त्यांनी नंतर दिलेले स्पष्टीकरण आणि केवळ तेवढ्यासाठी आपले ‘पुश्तैनी’ घर बघण्याचा मोह आवरण्याची त्यांची भूमिका त्यांच्या प्रगल्भतेची साक्ष ठरावी अशीच आहे. कलावंतांनी राखावयाच्या सामाजिक भानाचे ते एक आगळे उदाहरण होते. एक कलावंत म्हणून जे दिलीप कुमार यांना त्या क्षणी उमजले ते शाहरुखला कळू देखील नये?
‘रईस’ नावाचा कुठलासा चित्रपट तयार करून या टीमने देशावर उपकार वगैरे केलेत की, देशहितार्थ नोंद व्हावी असा कुठला पराक्रम केला शाहरुख खानने? धंद्यासाठी म्हणून तयार केलेला स्वत:चा एक चित्रपट विकण्यासाठी त्यांनी स्वीकारलेली प्रचाराची ही कथित आधुनिक तर्‍हा स्वीकारार्ह कशी ठरवायची? सर्वसामान्य लोकांना आणि रेल्वेच्या इतर प्रवाशांना वेठीस धरून आपल्या उत्पादनाच्या प्रचाराचा त्यांनी मांडलेला तमाशा प्रशासनाच्या परवानगीने दणक्यात आयोजित व्हावा ही तर त्याहून दुर्दैवी बाब. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान आणि रईसची टीम मुंबईहून दिल्लीला रेल्वेने निघाली. शाहरुखच्या या प्रवासाची रीतसर घोषणा करण्यात आली. हो! त्याशिवाय लोक कसे जमले असते जागोजागी फलाटांवर? यांना बघण्यासाठी म्हणून जमलेल्या फुकटच्या गर्दीसमोर भाषण ठोकून हे लोक आपल्या चित्रपटाचा प्रचार करणार अन् मग कोट्यवधी रुपये कमावणार. पण त्या गर्दीमुळे इतर प्रवाशांचे हाल झाले, त्याची जबाबदारी कोणाची? वडोदरा स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एक तरुण दगावला, त्याला जबाबदार कोण? दिल्लीत पोहोचल्यावर त्या कुटुंबाप्रती चार शब्दात शोक संवेदना व्यक्त केल्याने संपली शाहरुखची जबाबदारी? या प्रवासादरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला. का मार खायचा चाहत्यांनी? कशाची शिक्षा दिली गेली या रसिकांना? शाहरुखसह, ‘रईस’ची निर्मिती करणार्‍या टीमला या देशातल्या कायदा आणि सुव्यस्थेशी काही देणेघेणे असण्याचा प्रश्‍नच नाही. कारण त्यांना त्यांचे गल्ले भरण्याशी मतलब. मग त्यासाठी अतिशय सुमार मार्गांचा अवलंब करण्यातही कुठला कमीपणा त्यांना वाटण्याचेही कारण नाही. पण असल्या फालतुगिरीसाठी त्यांना परवानगी देणार्‍या प्रशासनाचे काय? अशी परवानगी दिल्यानंतर पुरेशी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची काळजी न घेणार्‍या अधिकार्‍यांचे काय?
ज्याला वानखेडे स्टेडियमवरच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याशी कसे वागावे हे कळत नाही. अमेरिकेतील व्यवस्थेसमोर तोंड उघडत नसले तरी भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा झालेला त्रास मात्र त्याला जराही खपत नाही आणि तरीही खिशात भरायला पैसे मात्र फक्त भारतातलेच हवे असतात, अशा एका कलावंताने सामाजिक भान जपण्याची अपेक्षा तर चूकच ठरेल कदाचित. पण, त्याने त्याच्या एका खाजगी व्यावसायिक उत्पादनाच्या प्रमोशनसाठी मांडलेला सार्वजनिक उच्छाद प्रशासनाने का सहन करावा? उद्या इतरांनी असाच धिंगाणा घातलेला चालणार आहे? मग शाहरुखला ही सवलत कशासाठी?
अलीकडच्या काळातील काही चित्रपटांनी कोट्यवधीचा धंदा केल्याचे सांगतात. यातील एकही चित्रपट कुठल्याही चित्रपटगृहात विक्रमी वेळेसाठी प्रदर्शित होत राहिल्याची बातमी मात्र कुठेच ऐकायला मिळाली नाही. या चित्रपटांनी रोैप्यमहोत्सव वगैरे साजरा केल्याची वार्ता तर दूरदूरपर्यंत ऐकिवात नाही. लोकांनी इतक्या उड्या घातलेला, लोकांना इतका आवडलेला चित्रपट थिएटरमध्ये मात्र फार दिवस प्रदर्शित होत नाही, हे जरा आश्‍चर्यच ना! याउलट ज्यांनी आपल्या काळात प्रदर्शनाचे विक्रम नोंदवले त्या बॉबी, शोले, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जय संतोषी मॉं, या सारख्या गाजलेल्या अन् लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांना मात्र असल्या प्रमोशनची कधी गरज पडल्याचाही इथे कुणाला अनुभव नाही. रौप्य महोत्सव साजरा करणार्‍या चित्रपटांची मालिकाच रसिकांपुढे सादर करण्याचा ज्यांचा विक्रम गिनिज बुकात नोंदवला गेला, त्या दादा कोंडकेंनाही कधी अशा तद्दन फालतू मार्गाने आपल्या चित्रपटांचा प्रचार करावा लागला नव्हता. कथानकात ताकद असली, अभिनय-गीत-संगीत त्या तोडीचे असले, निर्मिती तेवढी दर्जेदार असली की रसिकांचा प्रतिसाद मिळतोच त्या निर्मितीला. शाहरुख तर सुपरस्टार म्हणवून घेतो स्वत:ला. त्याला का गरज पडावी असल्या टुकार मार्गाने स्वत:च्या चित्रपटाचा प्रचार करण्याची? की, चित्रपटात दम नाही असा अर्थ काढायचा याचा? त्याहीउपर, या देशातल्या चित्रपट कलावंतांनी काय फक्त लोकांच्या जिवावर स्वत:चे खिसे भरायचे? सामाजिक जबाबदारीशी काहीच घेणेदेणे नसावे त्यांना? नागरिकांच्या जिवाची पर्वा त्यांनी करायचीच नाही का?
चला मान्य करूया की आताशा दिवस बदलले आहेत. तंत्रज्ञानानेही प्रतिगामित्वाची कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. त्यामुळे असले तमाशे करून चित्रपटाचा प्रचार करणे ही ‘काळाची गरज’ वगैरे काय म्हणतात ती झाली असेलही… पण माणुसकी? त्याचे काय? की तीही लयाला गेली काळाच्या ओघात? घ्यायची ना एखाद्या मैदानावर जाहीर सभा अन् तिथे करायचे प्रमोशन आपल्या चित्रपटाचे. आधीच सोयींचा अभाव आणि दर्जाची बोंब असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का वेठीला धरायची त्यासाठी? आम जनतेची गैरसोय करून आपला धंदा करण्याची ही कुठली तर्‍हा झाली?
खरं तर लोकच मूर्ख आहेत. नाही तर काय? ज्याला रसिकांची काडीची किंमत नाही अशा कलावंताला बघण्यासाठी धडपडत गर्दी करणार्‍यांना आणखी काय म्हणायचे? सोबतच्या फोटोतला हा कलावंत बघा! हो! तुम्ही-आम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलेला शाहरुख खानच आहे तो. वाटते याला बघून हा सभ्य माणूस आहे म्हणून? ज्याला रेल्वेतल्या बर्थवर बसायचे कसे हे कळत नाही, ज्याला आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या माणसाशी वागायचे कसे हे कळत नाही, त्याला बघायला उड्या पडाव्यात लोकांच्या? याला बघण्यासाठी जीव गमावला फरीद खान नावाच्या तरुणाने त्या वडोदराच्या रेल्वे स्थानकावर? असं काय केलं या माणसानं या समाजासाठी, या देशासाठी की लोकांनी जीव ओवाळून टाकावा त्याच्यावर? फक्त चित्रपटात काम करणारा एक कलावंत म्हणून हा दर्जा बहाल करून बसलेत लोक शाहरुखला? एवढा एकच निकष उरला आहे या देशात लोकांच्या मनात स्थान मिळवण्याचा? असेल तसेच काहीसे कदाचित! म्हणूनच इथे लोक चित्रपटात काम मिळावे म्हणून धडपडतात अन् सैन्यात भरती होण्याची मात्र तयारी नसते कुणाची!

Saturday, January 21, 2017

पेकाटात लाथ हाणा त्या ऍमॅझॉनच्या!

ऍमॅझॉनने थेट चपलांवरच गांधींचे चित्र छापून प्रत्येकाच्याच पायाखाली त्यांना तुडविण्याचे षडयंत्र रचले, वर पुन्हा धंद्याच्या नावाखाली त्याचे समर्थन करण्याचा निर्लज्ज प्रकारही केला, तरी इथे कुणाची माथी भडकल्याची वार्ता नाही. हाच अश्‍लाघ्य प्रकार त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबाबतही करण्याचा प्रयत्न केला, तरी थोडाबहुत अपवाद वगळता कुणी त्याविरुद्ध चवताळून उठल्याचेही चित्रही कुठे बघायला मिळाले नाही. फारतर चार-दोन लोकांचा टिवटिवाट, एखाद्या मंत्र्यांचा इशारा, ‘यांच्यावर तर बहिष्कारच घातला पाहिजे,’ अशा मवाळ शब्दांतली कुणाची तरी मल्लिनाथी, यापलीकडे निषेधाचा धारदार सूर उमटलाच नाही कुठे. असल्या वागण्याचे ‘परिणाम’ त्यांना भोगावे लागणे तर सोडाच, उलट तमाम भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या आमच्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा मुद्दा त्यांच्या एका माफीनाम्यावर निकाली निघाला. आम्हीही उदार मनाने माफ केले त्यांना. आता गांधींचे चित्र असलेल्या चपलांचे उत्पादनही बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करतील ते. अन् तमाम मुर्दाडांचे समाधानही होईल तेवढ्याने! ना त्यांच्या धंद्यावर कुठला परिणाम ना आमच्या व्यवहारावर. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील आमच्या भावनांचे परीघ एवढे मर्यादित असताना आम्हाला सहज टपली मारून निघून जाण्याची संधी कोण कशाला सोडेल? गांधींच्या जागी मोदींचे नुसते चित्र बघितले तरी भडकलेले लोक, गांधी चपलांवर बघून शांत कसे राहिले? त्यांनी तिरंगा पायपुसण्यांवर रंगवला तरी धमण्यांतले रक्त सळसळले कसे नाही त्यांच्या? की या मुद्यावर राजकारण करायला तितकासा वाव नसल्याने तोंडं शिवली गेलीत सर्वांची? 


जिथे लोकांच्या जिवावर करोडो रुपयांचा धंदा करता येतो, त्या देशातल्या नागरिकांच्या भावना कळत नाहीत त्यांना? या देशाचा तिरंगा पायपुसण्यांवर अन् महात्मा गांधींचे चित्र पायातल्या वाहाणांवर वापरताना जराशी लाज वाटली नाही त्यांना? ‘इंडियाज् लार्जेस्ट ऑनलाईन स्टोेअर’चा ठप्पा स्वत:च्या कपाळावर मारून घेत ‘इंडिया’मध्येच मोठ्या दिमाखाने मिरवणार्‍या अन् दिवसाकाठी कोट्यवधीचा गल्ला भरणार्‍या या कंपनीला भारतीय अस्मितेच्या प्रतीकांची किंमत कळू नये? या प्रतीकांचा त्यांना एवढाच तिटकारा आला असेल अन् पदोपदी त्यांचा अवमान करण्याचा निर्धार करूनच ते बेलगाम वागत सुटले असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी इथल्या सरकारने आणि त्याहीपेक्षा जनतेने उचलली पाहिजे. भारताकडे केवळ आणि केवळ एका बाजारपेठेच्या दृष्टीने बघणारी जमात ही. यांना अंतर्वस्त्रांवर छापायला भारतीय जनतेची आस्था असलेल्या देवी-देवतांची चित्रे लागतात अन् पायपुसण्यांवर वापरायला भारताचा तिरंगा! यावरून थोबाडीत हाणली गेली ती कमी होती की काय, म्हणून परवा त्यांनी महामा गांधींचे चित्र असलेल्या चपला विकायला आणल्या बाजारात!
कोण कुठली ऍमॅझॉन नावाची एक अमेरिकन कंपनी २०१३ मध्ये भारतात दाखल होते. तीन-साडेतीन वर्षांतच तिच्या कारभाराची व्याप्ती देशभर पसरते. इथल्या बाजारपेठांची प्रस्थापित व्यवस्था पुरती ध्वस्त करत, त्यात रुळलेली रोजगाराची परिपाठी पाऽऽर मोडीत काढत ऍमॅझॉनचा ‘बाजार’ उभा राहिला. स्पर्धेत आधीपासून अस्तित्व राखून असलेल्या स्नॅपडील अन् फ्लिपकार्डला धक्का देत इथली ऑनलाईन बाजारपेठ काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे आकारास येऊ लागले. इंटरनेटच्या वाढत्या वापराचा परिणाम असेल तो कदाचित, पण या ‘दुकाना’ला भारतीय जनतेचा पाठिंबा त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने मिळू लागला. अल्पशा कालावधीत विस्तारलेल्या त्याच्या व्यापात लोकांचे योगदान फार मोठे आहे. ‘आमच्या’च लोकांनी तयार केलेल्या वस्तू एकत्र करून आम्हालाच विकण्याची ‘त्यांची’ कल्पना का उगाच भन्नाट ठरली! यातून भारतीय जनतेबद्दल, नव्हे, एकूणच या देशाबद्दल आस्थेची, आदराची भावना तरी निर्माण व्हायला हवी ना त्यांच्या मनात? पण, इथे तर चित्र वेगळेच आहे. ज्यांच्या भरवशावर जगतोय्, ज्यांना लुबाडून आपला गल्ला भरतोय्, त्या भारतीय जनतेच्याच भावना पायदळी तुडवण्याचा उपद्‌व्याप चाललाय् त्यांचा. आमचा तिरंगा पायाखाली अन् गांधीही पायाशी हवाय् त्यांना.
कुणाच्या सडक्या मेंदूची पैदास आहे ही? कायम बाजारपेठ म्हणून वापर करत राहिलेत ते भारताचा अन् भारतीय जनतेचा ग्राहक म्हणून! त्यांना त्यांच्या देशाच्या नेत्यांचे, तिथल्या राष्ट्रध्वजाचे चित्र सापडत नाही असल्या वस्तूंवर टाकायला. जॉन केनेडींचा फोटो टाकलेल्या चपला कधी विकल्या आहेत ऍमॅझॉनने अमेरिकेच्या बाजारात? की तिथल्या राष्ट्रध्वजाचे चित्र टाकावेसे वाटले कधी त्यांना त्यांच्या दारातल्या पायपुसण्यांवर? मग भारतीय जनतेच्या नाकावर टिच्चून इथल्याच प्रतीकांची किंमत मातीमोल करायला का कायम सरसावलेले असतात ते?
अर्थात, त्यांची अशी हिंमत व्हायला आमची मानसिकताही तेवढीच कारणीभूत आहे. कुठल्या एका संस्थेच्या कॅलेंडरवरील चित्रात चरख्यावर सूत कातताना गांधींऐवजी मोदी दिसले, तर केवढा भडका उडाला काही लोकांचा! लागलीच कुणी कविता केल्या, कुणी काळ्या पट्‌ट्या लावल्या तोंडावर. कुणी निषेधाचा सूर आळवला, तर कुणी गांधींच्या तुलनेत मोदींचे खुजेपण सिद्ध करण्यात तोंडाची वाफ दवडली. पण, ऍमॅझॉनने थेट चपलांवरच गांधींचे चित्र छापून प्रत्येकाच्याच पायाखाली त्यांना तुडविण्याचे षडयंत्र रचले, वर पुन्हा धंद्याच्या नावाखाली त्याचे समर्थन करण्याचा निर्लज्ज प्रकारही केला, तरी इथे कुणाची माथी भडकल्याची वार्ता नाही. हाच अश्‍लाघ्य प्रकार त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबाबतही करण्याचा प्रयत्न केला, तरी थोडाबहुत अपवाद वगळता कुणी त्याविरुद्ध चवताळून उठल्याचेही चित्रही कुठे बघायला मिळाले नाही. फारतर चार-दोन लोकांचा टिवटिवाट, एखाद्या मंत्र्यांचा इशारा, ‘यांच्यावर तर बहिष्कारच घातला पाहिजे,’ अशा मवाळ शब्दांतली कुणाची तरी मल्लिनाथी, यापलीकडे निषेधाचा धारदार सूर उमटलाच नाही कुठे. असल्या वागण्याचे ‘परिणाम’ त्यांना भोगावे लागणे तर सोडाच, उलट तमाम भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या आमच्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा मुद्दा त्यांच्या एका माफीनाम्यावर निकाली निघाला. आम्हीही उदार मनाने माफ केले त्यांना. आता गांधींचे चित्र असलेल्या चपलांचे उत्पादनही बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करतील ते. अन् तमाम मुर्दाडांचे समाधानही होईल तेवढ्याने! ना त्यांच्या धंद्यावर कुठला परिणाम ना आमच्या व्यवहारावर. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील आमच्या भावनांचे परीघ एवढे मर्यादित असताना आम्हाला सहज टपली मारून निघून जाण्याची संधी कोण कशाला सोडेल? गांधींच्या जागी मोदींचे नुसते चित्र बघितले तरी भडकलेले लोक, गांधी चपलांवर बघून शांत कसे राहिले? त्यांनी तिरंगा पायपुसण्यांवर रंगवला तरी धमण्यांतले रक्त सळसळले कसे नाही त्यांच्या? की या मुद्यावर राजकारण करायला तितकासा वाव नसल्याने तोंडं शिवली गेलीत सर्वांची? अर्थात, त्यांच्या राजकारणाचा भाग सोडला, तरी या प्रकरणात क्षोभ व्यक्त करण्याची जबाबदारी काही त्यांच्या एकट्याची नाही. सारा देश पेटून उठायला हवा या प्रकरणी. आमच्या भावनांशी खेळण्याची पुन्हा कधी कुणाची हिंमत होणार नाही, असा धडा शिकवला गेला पाहिजे त्या ऍमॅझॉनच्या निलाजर्‍या अधिकार्‍यांना.
हा चमत्कार सर्वसामान्य नागरिकांनी उगारलेल्या बहिष्काराच्या अस्त्राद्वारेच घडू शकतो. आमच्या मानचिन्हांची किंमत त्यांना मान्य नसेल, तर पेकाटात लाथ हाणा त्यांच्या. पण ते घडणार कसे? कसे शक्य आहे ते? आम्हाला तर हाताच्या बोटांच्या हालचालीतून घरबसल्या हव्यात सार्‍या वस्तू. घरातून बाहेर पडून बाजारात जायला नको, की खरेदीसाठी आपला अमूल्य वेळ दवडायला नको. एका विदेशी कंपनीच्या या व्यवहारात आमच्या गावातल्या बाजारपेठेची पुरती वाट लागली, तरी आम्हाला कुठे सोयरसुतक आहे त्याचे! मग तिरंग्याचा अवमान झाला काय नि त्या महात्म्याचे चित्र वहाणांवर आले काय, कुणाचेच काहीच बिघडत नाही इथे. नाही म्हणायला चार-दोन लोकांनी केला थोडाबहुत कलकलाट. मंत्र्यांनी खडे बोल सुनावले त्यांना. मग त्यांनी माफी मागितली. प्रकरण मिटले. जनता मोकळी- पुन्हा ऍमॅझॉन नावाच्या त्या अमेरिकन कंपनीकडे ‘आपल्या’ मागण्या नोंदवायला! असंच होतं आपलं. दिशाहीन राजकारणात वाहावत गेलेल्या अन् स्वाभिमान गहाण टाकलेल्या लोकांची गर्दी सगळी. हा देश सुधरवायला इंग्रज अजून काही वर्षं इथं राहायला हवे होते, असं मनापासून वाटणार्‍या बेशरमांची जमात अजूनही शाबूत आहे इथे. त्यांच्या लेखी, तिरंगा आकाशात दिमाखानं उंच फडकला काय अन् दारातल्या पायपुसण्यांवर उमटला काय, कुणाला काय फरक पडतो? अशा छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्यायला फुरसत आहे कुणाला इथे? चित्रातल्या चरख्यामागे गांधींऐवजी मोदी दिसले म्हणून खवळलेली गर्दी, ऍमॅझॉनच्या चपलांवर गांधी बघून जेव्हा खवळेल अन् बोटांवरच्या मार्केटिंगमध्ये रमलेल्या तरुणाईला गावातल्या बाजारपेठेच्या अस्तित्वामुळे अबाधित राहिलेल्या अर्थव्यवस्थेचे मर्म जेव्हा कळेल, तो सुदिन! नाहीतर ऍमॅझॉनने केलेल्या अपमानाचे चटके आहेतच आमच्या वाट्याला…

Wednesday, January 18, 2017

सलमान तू ग्रेट आहेस!

 तसेही फूटपाथ ही काय झोपण्याची जागा आहे? रात्री अपरात्री दारू ढोसून (सॉरी! पार्टी एन्जॉय करून) सलमान खान या रस्त्याने जाणार म्हटल्यावर सावध राहायला नको होतं त्यांनी स्वत:च? पण झोपले राहिले निर्धास्तपणे ते लोक सार्वजनिक फूटपाथवर. तू तर साधा, भोळा, सोवळा, सज्जन माणूस. तुझ्यावर आळ घेतलेला कसा चालेल बरं! त्यावेळी सेशन कोर्टाला तुझी ताकद लक्षात आली नसेल कदाचित! नाही तर तुझ्यासारख्या हिरो ला सक्त मजुरीची शिक्षा कधीच दिली नसती त्यांनी. पण हरकत नाही. त्या कोर्टाची ‘चूक’ वरच्या कोर्टाने दुरुस्त केली. आणि तू बाईज्जत बरी झालास! या प्रकरणात दगावलेल्या त्या मजुराला निदान नरुल्ला की कायसं नाव तरी होतं. पण राजस्थानातल्या जंगलातल्या त्या काळवीटाला तर नाव नाही की गाव नाही. तशीही जंगलातल्या कळपात कितीतरी काळवीटं, हरणं असतात. त्यातल्या एखाद्याला तू उडवलाच तुझ्या बंदुकीनं, तर कोणाच्या बा चं काय गेलं? जंगल उजाड थोडीच झालं ते एक जनावर कमी झाल्यानं? पण नाही. प्राण्यांवरही दयामाया दाखवतात या देशातले काही लोक! अरे जिथे तू माणसांचीच कदर करीत नाहीस, तिथे एका काळवीटाची काय बिशाद, एवढी साधी बाब कळू नये त्यांना? पण जळतात रे तुझ्यावर सारे. संधी गवसली की तुला अडकवायला बघतात लोक. पण तू कुठे भीक घालतो त्या दीडदमडीच्या लोकांना. पैशाच्या बळावर व्यवस्था कशा विकत घ्यायच्या नि सिस्टीम कशी तुकवायची हे एव्हाना चांगलंच लक्षात आलं आहे तुझ्या. न्यायालयाचा कालचा निकाल बघितल्यानंतर तर यासंदर्भातले कौशल्य तू फार चांगल्या तर्‍हेने सिद्ध केल्याचे स्पष्टच झाले आहे.


सलमान तू खरोखरीच भाग्यवान आहेस बाबा! काय नशीब घेऊन जन्माला आला आहेस तू? गुन्हा केला तरी तो न  केल्याचे सिद्ध करणारी वकीलांची फौज उभी करण्याची ताकद काय गवसली, तुला तर कायदा पायदळी तुडवण्याचा परवानाच मिळाला गड्या. तू दारूच्या नशेत, रस्ता सोडून फूटपाथवरून गाडी चालवली, जिवंत माणसांच्या अंगावरून ती गाडी गेली, काही लोक जखमी झाले, एक जण दगावला, सेशन कोर्टाने पाच वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षाही ठोठावली तरी वरिष्ठ न्यायालयात बाईज्जत बरी झालास तू. अन्‌ आता पुन्हा एकदा सहीसलामत सुटलास काळवीट शिकारीच्या प्रकरणात. असेल असेल! त्यावेळी गाडीही तू चालवलेली नसणार अन्‌ राजस्थानातल्या जंगलातल्या त्या काळवीटानं तर तुझ्या हातातली बंदूक घेऊन स्वत:च स्वत:वर गोळी झाडून घेतली असणार! तुझ्यासारखा एवढा मोठा माणूस जंगलात आलाय्‌ म्हटल्यावर शिकारीच्या तुझ्या छंदाचा अंदाज आला असणार त्यालाही. भविष्यात काही नतद्रष्ट लोक यावरून कोर्टात खेचून तुझा अकारण छळ करणार याचीही खात्री असणार त्या काळवीटाला. त्या घटनेत तो जिवंत राहिला असता ना, तर स्वत:च कोर्टात येऊन साक्ष दिली असती त्यानं, तू निर्दोष असल्याची. पण हरकत नाही काळवीटाचे काम आता इथल्या न्याय व्यवस्थेने केले आहे. माणूस श्रीमंत असला, सेलिब्रीटी असला की तसेही या देशात त्यांचे फारसे कोणी काही बिघडवू शकत नाही. सलमान, तुझ्या निमित्ताने परवा ही बाब नव्याने सिद्ध झाली आहे. या देशातला कुठलाच कायदा बड्या धेंडांना लागू होत नाही बहुधा! कायद्याचा बडगा उगारण्यासाठी गोरगरीब, सर्वसामान्य लोकांची मोठी गर्दी उपलब्ध असताना तुझ्यासारख्या सेलिब्रीटीच्या मानेभोवती कोण आवळणार रे कायद्याचा फास? त्यामुळे तू रस्त्याने फिरताना माणसांचा बळी घेतला काय िंकवा जंगलात जाऊन जनावरांची शिकार केली काय, तुझ्या केसालाही कधी धक्का लागणार नाही बघ इथे. अरे कायद्याची पत्रास बाळगायला तू काय सामान्य माणूस आहेस? हिरो आहेस तू हिरो. या देशातले लोक डोक्यावर घेऊन नाचतात तुला. चित्रपटात नुसता अंगातला शर्ट काडून िंहडला तरी पोरी फिदा होतात लेका तुझ्यावर. त्याच सर्वसामान्यांच्या जीवावर करोडो रुपये कमावून तू मुजोरी केली नाहीस तरच नवल! तशी ती तू करतोसही. काय तो तोरा असतो बाबा तुझा! काय तुझी ती स्टाईल. कुठला तो ‘बिग बॉस’ नावाचा तद्दन फालतू कार्यक्रम. पण स्वत:च्या जीवावर पाऽऽर लोकप्रिय केलास तू. पब्लिक जाम खूश आहे मित्रा तुझ्यावर! आपल्या देशातल्या झाडून सार्‍या व्यवस्था अशा बड्या लोकांच्या चरणी लीन होण्यासाठीच अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे सलमान खान नावाची एक सेलिब्रीटी संकटात सापडलीय्‌ म्हटल्यावर सर्वानी तुझ्या मदतीला धावून येणे तर क्रमप्राप्तच होते. तू त्या फूटपाथवरच्या निष्पाप लोकांच्या अंगावरून गाडी चालवली. नरुल्ला नावाचा एक मजूर दगावला त्यात. तू दारू पिऊन बेधूंद अवस्थेत गाडी चालवत होतास म्हणे त्यावेळी? पण खरं सांग, काही बिघडलं तुझं? काडीचाही परिणाम झाला तुझ्यावर? तेरा वर्षे केस चालली. तरी तू आपला मोकळाच. या काळात किती गाजलेले चित्रपट काढलेस, चिक्कार पैसा कमावला. त्यातून न्याय व्यवस्था विकत घेण्याचे कौशल्य आणि बळ कमावले. केस चालत राहिली कोर्टात. तू दारू प्यायलेला नव्हताच इथपासून तर गाडी तू चालवत नव्हतासच, इथपर्यंतची विधानं हा हा म्हणता बदलली तुझ्या बाजुच्या अन्‌ विरोधातल्या साक्षीदारांनी. या देशात दारू तयारच होत नाही तर तू पिणार कुठून, असे म्हणायलाही कमी करणार नाही इथली सिस्टीम अन्‌ ठामपणे उभी राहील बघ तुझ्या पाठीशी. तसेही फूटपाथ ही काय झोपण्याची जागा आहे? रात्री अपरात्री दारू ढोसून (सॉरी! पार्टी एन्जॉय करून) सलमान खान या रस्त्याने जाणार म्हटल्यावर सावध राहायला नको होतं त्यांनी स्वत:च? पण झोपले राहिले निर्धास्तपणे ते लोक सार्वजनिक फूटपाथवर. तू तर साधा, भोळा, सोवळा, सज्जन माणूस. तुझ्यावर आळ घेतलेला कसा चालेल बरं! त्यावेळी सेशन कोर्टाला तुझी ताकद लक्षात आली नसेल कदाचित! नाही तर तुझ्यासारख्या हिरो ला सक्त मजुरीची शिक्षा कधीच दिली नसती त्यांनी. पण हरकत नाही. त्या कोर्टाची ‘चूक’ वरच्या कोर्टाने दुरुस्त केली. आणि तू बाईज्जत बरी झालास! या प्रकरणात दगावलेल्या त्या मजुराला निदान नरुल्ला की कायसं नाव तरी होतं. पण राजस्थानातल्या जंगलातल्या त्या काळवीटाला तर नाव नाही की गाव नाही. तशीही जंगलातल्या कळपात कितीतरी काळवीटं, हरणं असतात. त्यातल्या एखाद्याला तू उडवलाच तुझ्या बंदुकीनं, तर कोणाच्या बा चं काय गेलं? जंगल उजाड थोडीच झालं ते एक जनावर कमी झाल्यानं? पण नाही. प्राण्यांवरही दयामाया दाखवतात या देशातले काही लोक! अरे जिथे तू माणसांचीच कदर करीत नाहीस, तिथे एका काळवीटाची काय बिशाद, एवढी साधी बाब कळू नये त्यांना? पण जळतात रे तुझ्यावर सारे. संधी गवसली की तुला अडकवायला बघतात लोक. पण तू कुठे भीक घालतो त्या दीडदमडीच्या लोकांना. पैशाच्या बळावर व्यवस्था कशा विकत घ्यायच्या नि सिस्टीम कशी तुकवायची हे एव्हाना चांगलंच लक्षात आलं आहे तुझ्या. न्यायालयाचा कालचा निकाल बघितल्यानंतर तर यासंदर्भातले कौशल्य तू फार चांगल्या तर्‍हेने सिद्ध केल्याचे स्पष्टच झाले आहे. ते साहेब म्हणाले, तो काळवीट तूच मारल्याचं सिद्ध होत नाही. पुरावेच मिळाले नाहीत बघ कोर्टाला! आहे ना मज्जा! अरे तो नरुल्ला मेला तुझ्या गाडीखाली. तेव्हाही कुठे पुरावे सापडले होते कोर्टाला? फारच विचित्र आहे ना इथली न्याय व्यवस्था? तुलाही गम्मतच वाटली असणार. मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या असतील तुला तर निकाल ऐकल्यावर. आपण कसं मूर्ख बनवलं या न्याय व्यवस्थेला, हे आठवून तर दिलखुलास हसला असशील तू. मूर्खात काढलं असशील सर्वांना. हो ना! सलमान, अरे तू अस िंकवा संजय दत्त, तुम्हाला काय फरक पडतो रे चार-दोन दिवसांच्या जेलच्या हवेनं. मोठी माणसं तुम्ही. कारागृहात जाणे म्हणजे काय शिक्षा असते तुमच्यासाठी? थोड्या दिवसांची पिकनिक ती. तेरा वर्षांच्या काळात ज्या न्याय व्यवस्थेला, तू त्या दिवशी दारू प्यायला होता की नाही, गाडी तू चालवित होतास की नाही एवढं देखील कळू शकलं नाही, अठरा वर्षांच्या काळात बेकायदा शस्त्र बाळगल्याची बाब ज्या न्यायालयात सिद्ध होऊ शकली नाही, की शिकार तू केल्याची बाब कुणाला पटली नाही, तिथल्या न्याय व्यवस्थेची कशाला रे िंचता वाहायची तुझ्यासारख्या मातब्बरांनी? लोक म्हणतात तू कायदा पायदळी तुडवला. व्यवस्था विकत घेतली. दरवेळीच कसे तुझ्याविरुद्धचे पुरावे सिद्ध होत नाहीत न्यायालयात? अन्‌ प्रत्येकचवेळी तुला कसा मिळतो संशयाचा फायदा? पैशाच्या बळावरच ना! की सेलिब्रीटी आहेस म्हणून? जाम लकी आहेस लेका सलमान तू! गुन्हा केला तरी संशयाच्या बळावर ‘बाईज्ज्त बरी’ व्हायला अन्‌ वर पुन्हा कॉलर टाईट करून दिमाखानं मिरवायला गट्‌स लागतात ना राव. मानलं बुवा सलमान तुला. ग्रेट आहेस तू. आता तुझ्यासारख्याला ग्रेट म्हटल्यावर आपल्या न्याय व्यवस्थेला काय म्हणायचं हे काय वेगळ्यानं सांगायला हवं रे गड्या? 

Friday, January 6, 2017

काही हळवे किस्से!

तशी तर ती एका कंपनीची जाहिरात आहे. पण भलतीच इमोशनल आहे. या कंपनीच्या माणसाला एकदा एका मुलीचा फोन येतो. घरातला नादुरुस्त टीव्ही दुरुस्त करण्यासाठी. काहीही झालं तरी हा टीव्ही आज सायंकाळी सातच्या आत सुधरायलाच हवा असा तिचा आग्रह. शेवटी काय ‘ग्राहका’चा आदेश. तो शिरसावंद्य मानून कंपनीचा माणूस होकार देतो. जिथे टीव्ही दुरुस्त करायला जायचं ते घर खूप दूर असतं. कुठेतरी पहाडावर. पण दिलेला शब्द पूर्ण करायचाच, या निर्धारानं त्याचा त्या घराच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. आणि मग सुरू होते ती अडथळ्यांची शर्यत. कुठे रस्त्यात झाड कोसळून पडलेले तर कुठे सायंकाळी घराकडे परतणारा जनावरांचा कळप आडवा आलेला. होत असलेल्या उशिराने अस्वस्थ झालेल्या त्या मुलीचा पुन्हा फोन. लागलीच थोड्या वेळाने पुन्हा पाठपुरावा. दुरुस्तीसाठी पोहोचण्याचा आग्रह. महत्प्रयासाने तो त्या घरी पोहोचतो. तर एक आंधळी मुलगी त्याचे स्वागत करते. टीव्ही कुठे आहे ते सांगते. जुजबी दुरुस्त्या होऊन टीव्ही सुरू होतो. आता ती मुलगी घंटा वाजवून सर्वांना बोलावते. हॉस्टेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमधून बरीच पोरं एकत्र येतात. सारेच आंधळे. सारे टीव्हीसमोर बसतात. खरं तर टीव्हीवरचं दिसणार कुणालाच काहीच नसतं. पण आज त्यांच्यातलीच एक आंधळी मुलगी टीव्हीवरच्या गाण्याच्या एका स्पर्धेत सहभागी होणार असते. तो कार्यक्रम असतो सायंकाळी सात वाजता. तिचे गाणे जिवाचा कान करून ऐकता यावे एवढ्यासाठीच ही सारी धडपड असते…


तीन प्रसंग. कोणीतरी सांगितलेले. कुठेतरी एखादी व्हिडीओ क्लीप बघितलेली. तसा त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही; आणि असलाच तर फक्त माणुसकीचा आहे. सारेच प्रसंग हळव्या मनाला साद घालणारे. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे. आपापल्या व्यापात गुंतलेल्यांना क्षणभर थांबून विचार करायला लावणारे…
प्रसंग पहिला
रस्त्याने जाणारी एक व्यक्ती. अत्यंत साधारण. चार घास खावेत म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलकडे बाईक वळते. गाडी स्टँडवर उभी करून आत शिरण्याच्या तयारीत असताना बाहेर भीक मागत बसलेल्या एका आई आणि तिच्या दोन मुलांकडे त्याचे लक्ष जाते. इतरांसारखाच तोही त्यांना मागे टाकून आत जातो. त्या माउलीला यात नवल वाटण्याचे काही कारण नव्हते. रोजचाच अनुभव तो. आत जाताना कुणी या भिकार्‍यांची दखल घेण्याचे प्रयोजन नसतेच. हं! बाहेर पडताना जाणवलंच कधी तर खिशात गेलेले हात दानासाठी सरसावतात. मग कधी कलदार तर कधी बंदा रुपया पदरी पडतो. त्यामुळे बाईक उभी करून आत गेलेल्या चाळीशीतल्या त्या व्यक्तीच्या वागणुकीचे नवल तसे नव्हतेच. दरम्यान, इकडे ही आत गेलेली व्यक्ती एक टेबल मिळवून ऑर्डर देण्याच्या तयारीत असताना, अचानक वेटरला थांबण्याचा इशारा करून बाहेर येते. भीक मागत बसलेल्या त्या मुलांना हात धरून आत घेऊन जाते. अर्थात आईलाही आवतन होतंच. चार जणांसाठी व्यवस्था असलेल्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर आता हे चौघेही बसलेले. मुलांना काय हवे ते विचारून ऑर्डर दिली जाते.
अगदीच एखाद्याने उदार मनाने मोठ्या रकमेची नोट झोळीत टाकण्याचा अनुभव क्वचितप्रसंगी वाट्याला यायचा. एखाद्वेळी कुणी तिथनं खरेदी केलेल्या खाद्य पदार्थांचं एखादं पुडकं समोरच्या भांड्यात टाकून निघून जायचं. पण हे असं? झगमगाटात हरवलेल्या त्या हॉटेलातला प्रवेशही नाही म्हणायला नवलाईचाच होता त्यांच्यासाठी! इथेच बाहेर बसून रोज भीक मागतो आपण आणि आज थेट आत बाकड्यांवर? ही जाणीव मनाचा संकोच काही थांबू देईना! एवढ्यात वेटर खाण्याचे पदार्थ घेऊन आला. पोरं तर भरलेल्या प्लेट्‌स समोर बघून नुसती तुटून पडली. हा आपला कौतुकानं बघतोय् नुसता त्यांच्याकडे. तोच कशाला, तिकडे दूर गल्ल्यावर बसलेल्या मालकाचेही या प्रकाराचे मोठ्या कुतूहलाने निरीक्षण चाललेले. श्रीमंती थाटातल्या या रेस्टॉरंटमध्ये हा कोण भिकार्‍यांना सोबतीला बसवून खाऊ-पिऊ घालतोय्… असा भाव मात्र कुठेही नव्हता! उलट त्याने मागितलेला प्रत्येक पदार्थ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या, ते व्यवस्थितपणे वाढण्याच्या सूचना देणे चालले होते त्यांचे आपल्या कर्मचार्‍यांना.
खाणे संपले. पोरांच्या चेहर्‍यांवर उमटलेला प्रसन्न भाव टिपताना ती माउली तर जणू कृतकृत्य झाली होती. गेल्या कित्येक दिवसांत असे घडले नव्हते. ‘त्या’ व्यक्तीसाठी मात्र ही बाब नवी नसावी बहुधा. कारण, आपण काही जगावेगळे केले असल्याच्या भावनेचा लवलेशही त्याच्या चेहर्‍यावर नव्हता. काहीच घडले नसल्याच्या थाटात तो काऊंटरवर गेला. बिल अदा करायला म्हणून त्याने स्वत:चे वॉलेट उघडले. कित्येकांच्या लक्षातही न आलेला, ज्यांच्या आला ते कौतुकाने बघत असलेले, असा हा प्रसंग. मालकाने संगणकावर बिल तयार केले. घेतल्या गेलेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद त्यावर होती. बिलाच्या एकूण रकमेचा आकडाही अर्थातच त्यावर होता. फक्त ते बिल त्या व्यक्तीच्या हातात देण्यापूर्वी मालकाने जवळचा एक स्टँप त्यावर मारला. ‘फ्री’ असा उल्लेख असलेला… या बिलातला एक पैसाही हॉटेल मालकाने घेतला नव्हता. ‘त्या’ व्यक्तीच्या निर्विकार चेहर्‍यावर आता मात्र भाव उमटले होते… आश्‍चर्य अन् आनंदाचेही… जगात चांगल्या माणसांची वानवा नाही, एवढाच त्याचा मथितार्थ होता…
प्रसंग दुसरा
कुठल्याशा झोपडपट्टीत राहणारा एक शाळकरी मुलगा. अंगावर मळकट कपडे. जमेल तिथे ठिगळ लावलेले. पायातली स्लीपर कायम दगा देणारी. कधी या, तर कधी त्या पायातल्या चपलेचा निघालेला पट्टा लावण्यासाठी थांबताना नुसता त्रागा होतो मनाचा. आताही चपलेचे झेंगट सांभाळतच पायपीट चाललेली. आज स्वारी रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळली होती. फलाटावर येत असताना चपलेचा पट्टा पुन्हा एकदा निघाला. खाली बसून तो नीट लावण्याची धडपड चालली होती. तेवढ्यात त्याचे लक्ष तिथल्या एका बाकड्यावर बसलेल्या, त्याच्याच वयाच्या एका मुलाच्या पायातील बुटांकडे जाते. काळेशार, चकाकणारे त्याचे ते बुट अन् याच्या पायातली तुटकी चप्पल. तुलनाच नव्हती दोघांत. याची नजर त्या बुटांवरून हलता हलत नाही.
एवढ्यात गाडी फलाटावर येते. उतरणार्‍यांच्या गर्दीतून वाट काढत गाडीत चढण्यासाठीची काहींची धडपड. बुटं घातलेला तो मुलगाही सोबतच्या व्यक्तीचा हात धरून गाडीत चढण्यासाठी धडपडतोय्. त्या धडपडीत त्याच्या एका पायातला बुट निसटतो. इकडे गाडी सुटण्याची वेळ झालेली. अशात मागे जाऊन, निसटलेला तो बुट पुन्हा पायात घालण्यासाठी तर वेळच उरला नव्हता. बुट की गाडी? या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल गाडीची निवड होते. गाडी सुरू झाली. चढल्यावरही गाडीच्या दाराशीच उभ्या राहिलेल्या मुलाच्या चेहर्‍यावर इतका चांगला बुट गमावल्याचे दु:ख. त्याच्या बुटांकडेच लक्ष असलेला तो गरीब मुलगा आता सरसावतो. दूर कुठेतरी जाऊन पडलेला तो एक बुट त्याच्या ‘मालकाला’ देण्यासाठी. गाडीचा वेग हळूहळू वाढत असल्याने बुट घेऊन धावण्याचा त्याचाही वेग वाढलेला. इकडे दाराशी उभ्या असलेल्या मुलाच्या मनातही बुट मिळण्याची आशा बळावलेली. पण त्या मुलाच्या पळण्याच्या अन् गाडीच्या वाढत चाललेल्या वेगाचा मेळ काही जमेना… आता तर दोघांमधले अंतरही वाढत चाललेले… अशात, तो बुट आपल्याला मिळणे शक्य नाही ही बाब एका क्षणी गाडीतल्या मुलाच्या लक्षात येते आणि मग तो एकच करतो. आपल्या दुसर्‍या पायातला बुट काढून त्या मुलाच्या दिशेने फेकतो. निदान त्याला तरी ते वापरता यावेत म्हणून… काही वेळापूर्वी ज्याकडे नुसता टक लावून बघत होता, ती दोन्ही बुटं आता त्या मुलाच्या हातात असतात. गाडी तर एव्हाना दूर निघून गेलेली. हातातल्या त्या चकाकणार्‍या बुटांकडे तो फक्त बघत राहतो. कितीतरी वेळ. पायातल्या तुटलेल्या चपलांना आता पर्याय गवसलेला असतो….
प्रसंग तिसरा
तशी तर ती एका कंपनीची जाहिरात आहे. पण भलतीच इमोशनल आहे. या कंपनीच्या माणसाला एकदा एका मुलीचा फोन येतो. घरातला नादुरुस्त टीव्ही दुरुस्त करण्यासाठी. काहीही झालं तरी हा टीव्ही आज सायंकाळी सातच्या आत सुधरायलाच हवा असा तिचा आग्रह. शेवटी काय ‘ग्राहका’चा आदेश. तो शिरसावंद्य मानून कंपनीचा माणूस होकार देतो. जिथे टीव्ही दुरुस्त करायला जायचं ते घर खूप दूर असतं. कुठेतरी पहाडावर. पण दिलेला शब्द पूर्ण करायचाच, या निर्धारानं त्याचा त्या घराच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. आणि मग सुरू होते ती अडथळ्यांची शर्यत. कुठे रस्त्यात झाड कोसळून पडलेले तर कुठे सायंकाळी घराकडे परतणारा जनावरांचा कळप आडवा आलेला. होत असलेल्या उशिराने अस्वस्थ झालेल्या त्या मुलीचा पुन्हा फोन. लागलीच थोड्या वेळाने पुन्हा पाठपुरावा. दुरुस्तीसाठी पोहोचण्याचा आग्रह. महत्प्रयासाने तो त्या घरी पोहोचतो. तर एक आंधळी मुलगी त्याचे स्वागत करते. टीव्ही कुठे आहे ते सांगते. जुजबी दुरुस्त्या होऊन टीव्ही सुरू होतो. आता ती मुलगी घंटा वाजवून सर्वांना बोलावते. हॉस्टेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमधून बरीच पोरं एकत्र येतात. सारेच आंधळे. सारे टीव्हीसमोर बसतात. खरं तर टीव्हीवरचं दिसणार कुणालाच काहीच नसतं. पण आज त्यांच्यातलीच एक आंधळी मुलगी टीव्हीवरच्या गाण्याच्या एका स्पर्धेत सहभागी होणार असते. तो कार्यक्रम असतो सायंकाळी सात वाजता. तिचे गाणे जिवाचा कान करून ऐकता यावे एवढ्यासाठीच ही सारी धडपड असते…