Wednesday, August 19, 2015

नेमाडे सर.....

नेमाडे सर ज्या ‘मोकळ्या’ संबंधांचे समर्थन करीत सुटले आहेत, त्याचा अनुभव घेऊनही पाश्‍चिमात्य देशात बलात्काराची समस्या भीषण होऊन बसली आहे आज. आपल्याकडे निदान समाजाच्या भीतीमुळे तरी त्यांच्या तुलनेत या समस्येवर बरेचसे नियंत्रण आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, ‘मोकळ्या’ संबंधांना मान्यता देऊनही त्यांच्या समस्या सुटलेल्या दिसत नाहीत. उलट सामाजिक स्वास्थ्याचे कोडे अधिक गुंतागुंतीचे ठरत चालले आहे तिकडे. मग त्या उपायातून आपल्या देशात ती सुटेल हे भाकीत नेमाडे सर नेमके कशाच्या भरवशावर करताहेत? असले काही बरळणे हा आपल्याकडे नेहमीच बातमीचा अन् चर्चेचा विषय होतो. लोक चार दिवस चवीने चर्चा करतात त्याची. चघळायला हवेच असतात लोकांना असले विषय. पण या वाचाळवीरांच्या भरवशावर समस्या प्रत्यक्षात कशा सुटतील नेमाडे सर?
नेमाडे सरांचं कौतुक करावं की त्यांच्या नावानं बोटे मोडावीत हेच कळत नाही. त्यांनी मांडलेल्या मताचे समर्थन करावे की त्याचा तिरस्कार करावा, हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण त्यांच्यासारखा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता साहित्यिक जेव्हा समाजाची घडी विस्कटवायला निघतो, तेव्हा ती बाब अधिक चिंतेची ठरते. कधीकाळी इंदिरा गांधींनी, बलात्कार रोखण्यासाठी म्हणून समाजातील कुंटणखान्यांची आवश्यकता प्रतिपादित केली होती. आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी त्याच कारणासाठी विवाहबाह्य संबंधांच्या समर्थनाचे नवेच सूत्र मांडले आहे. सेक्स रेशो अबाधित राहिला तर समाजात बलात्कार, व्यभिचाराचे प्रकार थांबतील, हा त्यांचा निष्कर्षच मुळात अनाकलनीय आहे. कुंटणखाने जसेचे तसे आहेत, म्हणून बलात्काराचे प्रमाण थांबल्याचे दाखले सापडत नाहीत समाजात. मग नवरा-बायकोला पे्रयसी अन् प्रियकर ठेवण्याची परवानगी दिली तर हे प्रश्‍न सुटतील, या निष्कर्षाप्रत तरी कसे यायचे?
विवाह आणि कुटुंब नामक व्यवस्थांचे अस्तित्व आणि त्यातून समाजस्वास्थ्य कायम राखण्यासाठी द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आणताना संबंधितांनी काहीतरी विचार केला असणारच ना? इतिहासकालीन राजघराण्यातील तीन-तीन राण्यांची परंपरा, महाभारतकालीन द्रौपदीचे उदाहरण काय तो कायदा तयार करणार्‍यांना ठावूक नसणार? मग तरीही या कायद्याची गरज ज्या व्यवस्थेला वाटली त्याला काही तरी अर्थ असणारच ना. शिवाय त्यावर नंतरच्या एवढ्या काळात कुणी आक्षेप नोंदविल्याची उदाहरणे शोधून सापडत नाहीत. उलट भारतीय विवाह आणि कुटुंब व्यवस्था सार्‍या जगासमोर एक आदर्श उदाहरण ठरली आहे. अगदी, ‘या’संदर्भात अनिर्बंध वागणार्‍या पाश्‍चिमात्यांसाठी सुद्धा! ज्या द्रौपदीचे उदाहरण देत ‘मोकळ्या’ संबंधांचे समर्थन नेमाडे सर करताहेत, ‘त्या’ द्रौपदीचे अनुकरण करण्याचे धाडस इथे कधी कुणी केल्याचेही ऐकिवात नाही.
नेमाडे सर, कुणी लाख नाकारले तरी आज आपल्या समाजात विवाहबाह्य संबंध अस्तित्वात नाहीत, असे कुठाय्? ते फार पूर्वीपासून अस्तित्वात असतीलही. अगदी अलीकडच्या काळात तर असल्या संबंधांनी थैमान घातले आहे. सार्वजनिक बगीच्यांमध्ये झाडाआड बसलेली जोडपी, लिव्ह इन रीलेशपशिपचे वाढते प्रस्थ इथपासून, तर घटस्फोटांच्या वाढत्या संख्येपर्यंत सारे त्याचेच परिणाम आहेत. मग हे विवाहबाह्य संबंध अस्तित्वात असतानाही बलात्काराचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र नाही ना दिसत नेमाडे सर कुठेच. मग त्यांना कुठनं जाणवलं की प्रत्येक विवाहित जोडप्यातील एकेकाला एकेक प्रियकर आणि एकेक प्रेयसी असली की ही समस्या सुटेल म्हणून? बहुधा असली धाडसी विधाने हा प्रसिद्धीचा सोपा मार्ग झाला आहे अलीकडे. शिवाय पातळी कुठलीही असली, तरी विचारांचे पुरोगामित्व सिद्ध करण्यास असली धाडसी विधाने पुरेशी ठरतात आताशा. सनसनाटी बातम्यांच्या मागे धावणार्‍या मीडियालाही पुरेसे खाद्य उपलब्ध होते त्यामुळे अन् प्रसिद्धीचा योगही मग अनायासेच जुळून येतो
सरांनीही तीच पद्धत अनुसरली असावी बहुधा. वर पुन्हा टोचणारे लिखाण करणारे असल्याने आपण लोकप्रिय नसल्याचे सांगत आपली बाजू भावनिकदृष्ट्या सक्षम करून घेण्याचा मार्गही त्यांनी चोखाळला आहे. ते समाजाची घडी बसवायला निघाले आहेत की विस्कटवायला हे त्यांचे तेच जाणोत. पण एखादी सामाजिक समस्या सोडविण्याचा एवढा जालीम उपाय इथे आजवर कुणालाच सुचला नाही हे मात्र खरे. बहुधा नेमाडे सरांच्या ‘विचारांची उंची’ गाठून कुणाला त्या दिशेने विचारच करता आला नसावा आजवर. पण निदान आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची उंची सरांनी तरी ध्यानात ठेवायला हवी होती असले काही बरळताना, असे मात्र सहज वाटून जातेे. या असल्या कृत्यांचे जाहीरपणे समर्थनच करायचे असेल, तर मग आसाराम बापूंच्या वागण्यावर तरी आक्षेप कसा आणि का नोंदवायचा? आणि दिल्लीतल्या त्या गाजलेल्या प्रकरणातील आरोपींना तरी शिक्षा कशी द्यायची? बेलगाम वागण्याची अधिकृत परवानगीच मिळतेय् म्हटल्यावर नियंत्रण कुणी, कुणावर, कसे ठेवायचे?
नेमाडे सर ज्या ‘मोकळ्या’ संबंधांचे समर्थन करीत सुटले आहेत, त्याचा अनुभव घेऊनही पाश्‍चिमात्य देशात बलात्काराची समस्या भीषण होऊन बसली आहे आज. आपल्याकडे निदान समाजाच्या भीतीमुळे तरी त्यांच्या तुलनेत या समस्येवर बरेचसे नियंत्रण आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, ‘मोकळ्या’ संबंधांना मान्यता देऊनही त्यांच्या समस्या सुटलेल्या दिसत नाहीत. उलट सामाजिक स्वास्थ्याचे कोडे अधिक गुंतागुंतीचे ठरत चालले आहे तिकडे. मग त्या उपायातून आपल्या देशात ती सुटेल हे भाकीत नेमाडे सर नेमके कशाच्या भरवशावर करताहेत?
असले काही बरळणे हा आपल्याकडे नेहमीच बातमीचा अन् चर्चेचा विषय होतो. लोक चार दिवस चवीने चर्चा करतात त्याची. चघळायला हवेच असतात लोकांना असले विषय. पण या वाचाळवीरांच्या भरवशावर समस्या प्रत्यक्षात कशा सुटतील नेमाडे सर? ज्यांनी सामाजिक समस्यांचे भान जपायचे, सखोल चिंतनातून त्यावरची उत्तरे शोधायची, त्याबाबत समाजाला मार्गदर्शन करायचे, दिशा दाखवायची, ते साहित्यिकच जर असली अफलातून उत्तरे त्या समस्यांसाठी शोधू लागले, वर पुन्हा त्याचे निलाजरे समर्थन करू लागले, तर समाजाने आशेने बघायचे कुणाकडे?