Tuesday, October 15, 2013

मोहन धारिया... तपस्वी जीवनाचा अस्त!

त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केले. जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यातला विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आघाडीवर असलेल्यांपैकी एक प्रमुख नाव मोहन धारिया यांचे होते. पण आणिबाणी लागू करण्याच्या त्याच इंदिराजींच्या आततायी निर्णयाला स्पष्ट अन् जाहीर विरोध करताना ते तसूभरही मागे सरले नाहीत. इंदिरा गांधींनी आणलेली ३८वी घटनादुरुस्ती म्हणजे संसदीय लोकशाहीचा मुडदा पाडून हुकूमशाहीला दिलेले आवतन असल्याचे सांगताना त्यांची जीभ जराही अडखळली नाही. इंदिराजी म्हणतील तीच पूर्व दिशा मानणार्‍या लाळघोट्यांच्या गोतावळ्यापासून स्वत:ला दूर ठेवत आणिबाणीच्या मुद्यावरून त्यांनी एका क्षणात कॉंग्रेसचा त्याग केला. कधीकाळी महाराष्ट्र आणि देशपातळीवरही कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीचा साक्षीदार राहिलेल्या या कार्यकर्त्याने नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री म्हणून काम केले.
महाड तालुक्यातला एक तरुण डॉक्टर बनण्यासाठी म्हणून मोठ्या उमेदीनं घराबाहेर पडला होता. महाविद्यालयात प्रवेश घेऊन झाला होता. बस्स! पाच वर्षे संपली की वैद्यकीय शिक्षण घेऊन तो बाहेर पडणार; आणि एकदा का तो डॉक्टर झाला की मग बघायलाच नको, अशी त्याच्या परतीच्या प्रवासाची स्वप्नं एव्हाना घरच्यांच्या मनात रुंजी घालू लागली होती. पण इकडे त्या तरुणाच्या मनात खदखदणारा लाव्हा मात्र, दुसर्‍याच वाटा धुंडाळीत होता. डॉक्टर होण्यासाठी हाती पुस्तकं घेऊन किती दिवस झाले असतील कुणास ठावूक, पण इंग्रजांना ‘भारत छोडो’ चा इशारा देत महात्मा गांधींनी देशभरातल्या तरुणाईला दिलेली हाक तेवढी कानावर पडली अन् हा तरुण पुस्तकं बाजूला टाकून १९४२ च्या लढ्यात उतरण्यासाठी म्हणून पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बाहेर पडला. तशीही, त्या भारावलेल्या क्षणी शिक्षणाची चिंता होती कुणाला? सळसळत्या तरुणाईला एकाच ध्येयाने झपाटले होते. स्वातंत्र्याच्या... त्यात, हाक महात्म्यानं दिली होती. सारं काही मागे टाकून घराबाहेर पडणार्‍या तरुणांचे अक्षरश: लोंढे रस्त्यावर उतरले होते. ‘या’ तरुणानेही त्याच त्वेरेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती...
१९७१ ची गोष्ट असेल. पुण्यात अटलजींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलजी आले होते. जिवाचा कान करून त्यांचे भाषण ऐकायला मोठा जनसागर उसळला होता. तत्कालीन जनसंघाचे उमेदवार रामभाऊ म्हाळगी यांचा प्रचार करताना त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या कॉंग्रेस उमेदवारावर तुटून पडायचे होते. आपल्या आगळ्या शैलीतून अटलजी ते करत होतेच. पण त्यांच्या या ‘तुटून पडण्याला’ही एक ‘उंची’ होती. आरोपांना धार असली तरी, त्यालाही एक दर्जा होता. अलीकडच्या राजकारणात अभावानेच बघायला मिळणारा... त्यात व्यक्तिगत पातळीवरील टीका जाणीवपूर्वक टाळण्यात आली होती. मुळातच तो स्वभावातला गुण असला, तरी त्या दिवशी अटलजी ते जाणीवपूर्वक करत असावेत बहुधा... कारण कॉंग्रेसतर्फे मैदानात उतरलेला उमेदवारही त्याच ‘उंची’चा, त्याच तोडीचा होता. त्यांच्याविरुद्ध कुणीही पातळी सोडून बोलण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नव्हता. अटलजींनी तर नाहीच नाही. कॉंग्रेसचे ते उमेदवार होते मोहन धारिया...
स्वातंत्र्यलढ्याने धारियांच्या जीवनाची दिशाच पुरती बदलून टाकली होती. डॉक्टर व्हायला म्हणून घराबाहेर पडलेला हा तरुण प्रत्यक्षात वकील झाला. आपल्या समर्थ नेतृत्वातून कामगार चळवळीलाही त्यानं चांगलाच आकार दिला. कित्येक कामगार संघटना तयार केल्या. जंजिरामुक्तीचा लढाही त्याने त्यापूर्वीच लोकसहभागातून उभारला होता. भविष्यात त्यांनी राजकीय क्षेत्रात नाव केले. कॉंग्रेसच्या वतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्वही केले. महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय कॉंग्रेस समितीत वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्या. पण, जीवन व्यक्तिगत असो, वा मग सार्वजनिक, हा माणूस प्रत्यक्षात फक्त ‘गांधी’च जगला. गांधीजींच्या आचार-विचारांचा त्यांनी कधीच विसर पडू दिला नाही. अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत...
त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केले. जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यातला विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आघाडीवर असलेल्यांपैकी एक प्रमुख नाव मोहन धारिया यांचे होते. पण आणिबाणी लागू करण्याच्या त्याच इंदिराजींच्या आततायी निर्णयाला स्पष्ट अन् जाहीर विरोध करताना ते तसूभरही मागे सरले नाहीत. इंदिरा गांधींनी आणलेली ३८वी घटनादुरुस्ती म्हणजे संसदीय लोकशाहीचा मुडदा पाडून हुकूमशाहीला दिलेले आवतन असल्याचे सांगताना त्यांची जीभ जराही अडखळली नाही. इंदिराजी म्हणतील तीच पूर्व दिशा मानणार्‍या लाळघोट्यांच्या गोतावळ्यापासून स्वत:ला दूर ठेवत आणिबाणीच्या मुद्यावरून त्यांनी एका क्षणात कॉंग्रेसचा त्याग केला. कधीकाळी महाराष्ट्र आणि देशपातळीवरही कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीचा साक्षीदार राहिलेल्या या कार्यकर्त्याने नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री म्हणून काम केले.
खरं तर, साधी राहणी, शांत, सुस्वभावी, आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नसलेले, राजकारणात न शोभणारे हे व्यक्तिमत्त्व. ‘गांधी’ रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलेले. नंतरच्या काळात त्यांनी कित्येक पदं भूषवली. पद्मविभूषणसारख्या कित्येक मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला. त्याची दखल घेतली गेली. पण पुण्याच्या महानगरपालिकेचे साधे सदस्यपद असेल किंवा मग योजना आयोगाचे महत्त्वाचे असे उपाध्यक्षपद, या प्रत्येकच पदावरून काम करताना मोहन धारियांच्या नजरेसमोर राहिला तो सामान्य माणूस. प्रत्येक वेळी त्यांनी विचार केला तो बळीराजाचा. तब्बल पाच दशकं राजकारणात घालवल्यानंतर मोहन धारियांनी पर्यावरण रक्षण हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानले; आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते त्यासाठी लढत राहिले. पर्यावरणाच्या रक्षणासोबतच हा माणूस शेतकर्‍यांसाठीही त्याच हिरिरीने अन् त्याच ताकदीने लढत राहिला. देशभरातल्या शेकडो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ झालेल्या मोहन धारियांनी सरकारी धोरणांवर बोट ठेवत वयाच्या ८२व्या वर्षी उपोषणाची घोषणा केली, तेव्हा दिल्लीतले सरकार पुरते हादरले. खुद्द पंतप्रधानांना त्या उपोषणाची दखल घ्यावी लागली.
‘वनराई’ आणि मोहन धारिया हे गेल्या तीन दशकांत सार्‍या देशाला ठावूक झालेलं समीकरण आहे. लोकजागृती, जनसहभागातून ओसाड जमिनीचा विकास, सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये रेती भरायची अन् त्या पोत्यांनी नदी, नाल्यामंधून वाहून जाणारे पाणी अडवून कमी पैशात गावासाठी सिंचन साकारण्याची किमया त्यांनी करून दाखवली. आजघडीला सार्‍या देशात असे किमान तीन लाख वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सुमारे सहा हजार कार्यकर्ते या चळवळीशी प्रत्यक्ष रूपात जुळले आहेत. नंतरच्या काळात विषयांची व्याप्ती वाढत गेली अन् चळवळीचेही एका वटवृक्षात रूपांतर झाले. कधी तिने रक्तदानाच्या उपक्रमांना गवसणी घातली, तर कधी सहकाराला स्पर्श केला. कधी महिलांच्या बचतगटाची बांधणी त्यातून झाली, तर कधी ग्रामीण भागाच्या प्रगतीच्या संकल्पाचे मनोरे त्यातून उभारले गेलेत. गावडेवाडी, वरांध, झरी या गावांतून कधीकाळी रोजगारासाठी बाहेर पडलेल्या तरुणाईला पुन्हा गावाकडे खेचून आणण्याची किमया आपल्या उपक्रमांमधून साधत, गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ च्या आर्त हाकेला कृतीतून प्रतिसाद देण्याची त्यांची तर्‍हा म्हणूनच अनुकरणीय ठरली आहे.
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे सामाजिक आणि राजकीय जीवनक्षेत्र व्यापणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व मोहन धारिया यांच्या रूपाने आज लोप पावले आहे. समाजवादी विचारांचा एक पथिक आज अनंताच्या प्रवासाला निघाला आहे. आयुष्यभर तत्त्वांसाठी लढलेल्या, झगडलेल्या अन् जगलेल्या एका लढवय्याचे निर्वाण कित्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावणारे ठरणार आहे. सुमारे नऊ दशकांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर सोबतीला आलेल्या, विविध कारणांनी मध्येच साथ सोडून गेलेल्या, इतकेच काय पण, कधीच साथीला न आलेल्याही माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा हा आशयघन मृत्यू आहे. कठोर साधनेतून साकारलेल्या आयुष्याच्या या ‘शेवटातून’ निर्मळ समाजकारणाची आणि नीतिमत्तेच्या राजकीय युगाची पुन्हा एकदा ‘सुरुवात’ व्हावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसोबतच, प्रसंगी शांत स्वभावाचे गाठोडे खुंटीवर टांगून आणिबाणीच्या निर्णयातून प्रत्ययाला येणारी मगरुरी उलथवून टाकण्याची धारियांची तर्‍हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरो, हीच या निमित्ताने नियंत्याकडे प्रार्थना...