
सुमारे पाव शतकापूर्वीचा तो प्रसंग. स्थळ नागपुरातले. डिसेंबर महिन्याच्या ऐन थंडीत एका मैदानात मंडप टाकून एक मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्तिक आणि मार्गशीर्षाचा संगम पावसाच्या अकाली हजेरीने खुलला होता खरं तर! पण आयोजकांसाठी मात्र परीक्षेची घडी होती. कमालीच्या त्या थंडीतही कानसेन मात्र गर्दी करून राहिले होते. एव्हाना पाऊस थांबला असला तरी त्याचा प्रभाव अजून कायम होता. सरोदाची तार जुळवता जुळवता आणि त्यातून अपेक्षित सूर प्रतिध्वनित करता करता दमछाक होत होती साथसंगत करण्यासाठी म्हणून आलेल्या कलावंतांची. एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. मंडपाच्या कापडातून गळणार्या पाण्याच्या धारांपासून स्वत:चा बचाव करत, स्वत:ला नखशिखांत झाकून घेत थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला श्रोतृवर्ग बघून पंडित जसराज भारावले नसते तरच नवल. अगदी थोड्यावेळापूर्वीपर्यंत धो धो बरसलेला पाऊस अन् गारठायला व्हावं इतकी थंडी असूनही संगीतसाधनेला दाद द्यायला उपस्थित झालेला मोठ्या संख्येतला रसिक बघून, शेवटी ते म्हणाले, मी आज पैशासाठी गाणार नाहीय्. मी आज गाणार आहे, ते या मायबाप रसिकांसाठी... आणि मग पंडितजींचे सूर आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची गायकी अन् रसिकांची दाद, असाच क्रम सुरू राहिला. इतक्या दिवसांची तपश्चर्या जणू आज फळाला आली होती. एकामागून एक अशा बहारदार गीतांना सूर-तालाचा साज चढत होता आणि कानसेन तृप्त होत होते. फर्माइशीवर फर्माइशी होत होत्या. रंगलेल्या मैफलीला भैरवीचा साज चढला तेव्हा रात्रीचा काळोख उगवतीच्या दिशेने झेपावू लागला होता...
पंडित जसराज गेले... वादन आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रातील अजरामर कलाकृतीतून संगीतक्षेत्राला श्रीमंती बहाल करणारा जयपुरातील मेवाती घराण्यातला दीपस्तंभ हरपला. सौंदर्यदृष्टी असलेले, उच्चकोटीचे रसिकत्व ल्यालेले, संगीत क्षेत्रातील एक चालते-बोलते संस्थान असलेले संगीत मार्तंड परवा स्मृतिशेष झाले. विश्वख्यातीच्या या कलावंताचा मृत्यू सातासमुद्रा पलीकडे, दूरस्थ न्यू जर्सीत झाला; पण पोरकेपण मात्र भारतीय संगीत जगताच्या वाट्याला आले. खरं तर पंडित जसराज हे मुळात तबलावादक होते. वेगवेगळ्या मैफलीत गायकाचं गाणं सुरेल अन् श्रवणीय करण्यासाठी आवश्यक असलेली साथसंगत त्यांनी कित्येकदा साकारली होती. पण, गायकाच्या तुलनेत, ही साथसंगत करणार्यांना मिळणारी दुय्यम, िंकबहुना तुच्छ वागणूक मनाच्या कुठल्याशा कोपर्यात घर करून जायची. खंतावून जायची. कलासाधनेत गायनाइतकेच महत्त्व असलेल्या वादनाला कमी लेखण्याची ही तर्हा चटका लावून जायची. शेवटी एक दिवस त्यांनी ठरवलं. आपणही गायचं. थोरले बंधू मणिरामजी जसराज तेवढ्याच खंबीरपणे त्यांच्या साथीला उभे राहिले. गायनाच्या जगतातले बारकावे त्यांनी शिकवले आणि मग सुरू झाला, एका तबलावादकाचा गायनाच्या वाटेवरचा प्रवास. कालपर्यंत, तबल्यावरून फिरताच ताल आणि लयीची जादू सिद्ध करायला हाताची बोटं सरसवायची. आता गळ्यात भिजलेला सूर कमाल दाखवू लागला होता. एका तबला वादकातला गायक, वेगवेगळ्या रागांमधून शब्दांची बांधणीरसिकजनांसाठी आगळ्या पद्धतीनं मांडू लागला. एक तबलजी म्हणून ताल आणि लयीचा झालेला अभ्यास त्यांना गायनासाठी साह्यभूत ठरू लागला. कालपर्यंत गाणार्यांच्या सूरात तबल्याची साथ बंदिस्त करणारा वादक आता स्वत:च गायक झाला होता.
ईश्वरीय तत्वाला आवाहन करण्यासाठी उत्पत्ती झालेल्या सामवेदाचा आधुनिक अविष्कार घडविण्याचे श्रेय देता येईल इतके मोठे योगदान पंडितजींनी भारतीय संगीत क्षेत्राला दिले आहे. ऋचांतील अर्थपूर्ण अक्षरांना संगिताची साथ मिळाली अन् पंडितजींच्या गळ्यातून ताला-सूरात त्याची बांधणी झाली की मग तर विचारायलाच नको. त्यांना संगीत मार्तंडाची उपाधी बहाल झाली ती, घनगंभीर गायकीसाठी. या क्षेत्रातील त्यांच्या कित्येक दशकांच्या साधनेसाठी. नाही म्हणायला जसराजांना संगिताचा वारसा लाभला होता. राजस्थानातील मेवाती घराणं त्याचसाठी प्रसिद्धी पावलं होतं. वडील पंडित मोतीराम राजदरबारात गायचे. भावाने तर त्यांना गायकीचे धडे दिले होते. इतर बंधूवर्गही उत्तम गायक आहेत. फक्त व्यावसायिक वाटेनं जाता न आल्याने प्रसिद्धीयोग त्यांच्या पदरी पडला नाही एवढेच. मुलगा शारंगदेव आणि मुलगी दुर्गाही कलेच्या याच दरबारात साधना करताहेत. संस्कृत श्लोक असोत, वेदांतील ऋचा असोत की, पुराणातील मंत्र, पंडितजींनी ते आपल्या मधूर गायकीतून अजरामर केले आहेत. नव्या युगात, पैसा कमावण्यासाठी म्हणून ‘सारे काही’ गाण्याची तयारी असलेले कलावंत वेगळे आणि ज्या काळात ‘यातून’ पैसा मिळेलही की नाही सांगता येत नव्हते, अशा स्थितीत शास्त्रीय आणि भक्तीसंगीतासाठी आपली अभिजात कलासंपन्नता पणाला लावण्याचे धाडस जसराजांनी केले.
आपल्या अमोघ वाणीतून, गोड गळ्यातून, संगीताच्या सखोल ज्ञानातून, तपश्चर्येतून त्यांनी भक्तीसंगीत एका उंचीवर नेऊन ठेवले. ‘‘और राग सब बने बाराती, दुल्हा राग बना बसंत’’ असो की , भैरवी रागातले ‘‘सुमिरन कर ले’’, ‘‘ ओम नमो भगवते...’’ असो की हनुमान चालीसाचे आगळ्या रीतीने त्यांनी केलेले सादरीकरण असो... देवी कालिकेचे भजन असो की शिवाची आराधना, तीच तल्लीनता, तीच भावोत्कटता प्रकटते त्यांच्या संगीतातून. रसिकदरबारात भक्तीसंगीत अत्युच्च स्थानी विराजमान करण्याचे श्रेय पंडितजींना द्यावे, ते याचसाठी. सुमारे पाव शतकापूर्वीचा तो प्रसंग. स्थळ नागपुरातले. डिसेंबर महिन्याच्या ऐन थंडीत एका मैदानात मंडप टाकून एक मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्तिक आणि मार्गशीर्षाचा संगम पावसाच्या अकाली हजेरीने खुलला होता खरं तर! पण आयोजकांसाठी मात्र परीक्षेची घडी होती. कमालीच्या त्या थंडीतही कानसेन मात्र गर्दी करून राहिले होते. एव्हाना पाऊस थांबला असला तरी त्याचा प्रभाव अजून कायम होता. सरोदाची तार जुळवता जुळवता आणि त्यातून अपेक्षित सूर प्रतिध्वनित करता करता दमछाक होत होती साथसंगत करण्यासाठी म्हणून आलेल्या कलावंतांची.
एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. मंडपाच्या कापडातून गळणार्या पाण्याच्या धारांपासून स्वत:चा बचाव करत, स्वत:ला नखशिखांत झाकून घेत थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला श्रोतृवर्ग बघून पंडित जसराज भारावले नसते तरच नवल. अगदी थोड्यावेळापूर्वीपर्यंत धो धो बरसलेला पाऊस अन् गारठायला व्हावं इतकी थंडी असूनही संगीतसाधनेला दाद द्यायला उपस्थित झालेला मोठ्या संख्येतला रसिक बघून, शेवटी ते म्हणाले, मी आज पैशासाठी गाणार नाहीय्. मी आज गाणार आहे, ते या मायबाप रसिकांसाठी... आणि मग पंडितजींचे सूर आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची गायकी अन् रसिकांची दाद, असाच क्रम सुरू राहिला. इतक्या दिवसांची तपश्चर्या जणू आज फळाला आली होती. एकामागून एक अशा बहारदार गीतांना सूर-तालाचा साज चढत होता आणि कानसेन तृप्त होत होते. फर्माइशीवर फर्माइशी होत होत्या. रंगलेल्या मैफलीला भैरवीचा साज चढला तेव्हा रात्रीचा काळोख उगवतीच्या दिशेने झेपावू लागला होता...
पंडित जसराज म्हणजे व्ही. शांताराम यांचे जावई. शांताराम यांची कन्या मधुरा आणि जसराज यांचा प्रेमविवाह झालेला. एकदा व्ही. शांताराम आजारी असताना, जसराज रुग्णालयात त्यांच्या सुश्रृषेसाठी थांबले होते. तेव्हाचे माहिती आणि नभोवाणी मंत्री वसंतराव साठे एकदा शांताराम यांना भेटायला रुग्णालयात गेले. त्याही स्थितीत गप्पांचा फड रंगात आला होता. अशात तिथे जसराजांना बघून वसंतराव म्हणाले, ‘‘अरे तुम्ही इथे कसे?’’. त्यावर शांतारामांनीच उत्तर दिलं,.‘‘ अहो जावई आहेत ते माझे. ’’ ‘‘इतका मोठा जावई?’’ ...साठेंच्या भावना आणि आश्चर्य अवघ्या तीन शब्दांच्या त्या प्रश्नातून व्यक्त झाले होते. त्याला व्ही. शांतारामांनी दिलेलं उत्तरही तितकंच बाणेदार होतं. ते म्हणाले, ‘‘अहो, जावयाचं काय घेऊन बसलात, सासरा बघा की किती मोठा आहे ते...’’ व्ही. शांताराम यांचं मोठेपण कोण नाकारेल? पण, जसराजांचं व्यक्तीमत्व मात्र, वसंतराव साठेंच्या ‘‘इतका मोठा जावई?’’ या प्रश्नाला साजेसंच होतं, हे ही तितकंच खरं.
तबला सोडून गायनविश्वात मुशाफिरी करताना सर्वात खालचा स्वर म्हणजे खर्ज कसा लागतो, याचा अभ्यास करण्यात तासन्तास घालवणारे पंडित जसराज नंतरच्या काळात संगीत अकादमीपासून तर पद्मविभूषणपर्यंतच्या कितीतरी पुरस्कारांचे मानकरी ठरले. मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या एका नव्या ग्र्रहाला त्यांचे नाव देण्याचा आंतरराष्ट्रीय खगोल संघाचा निर्णय, पंडितजींचे संगीत जगतातील योगदान अधोरेखित करणारे आहे. अवघे रसिकविश्व आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे, भक्ती संगीताला केवळ प्रतिष्ठाच प्राप्त करून दिली असे नाही तर ते अजरामर करणारे, तबलजी असताना गाणार्याच्या सुरात तबला वाजविणारे आणि गात असताना सोबत्यांच्या वादनाच्या लयीने सूर प्रवाहीत करणारे पंडितजी आयुष्याच्या उत्तरार्धात भारतात का नव्हते, तेच कशाला बव्हतांश भारतीय कलावंत मैफली भारतात आणि जीवन व्यापन युरोप-अमेरिकेत का करतात, हा काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. असो. एक खडतर, पण अविस्मरणीय अशी संगीत साधना आता थांबली आहे. एक संगीत मार्तंड कायमचा विसावला आहे. भारतातल्या हिस्सार जिल्ह्यातील पिली मांदोरी इथनं सुरू झालेला एक प्रवास न्यू जर्सीत स्थिरावला आहे. बाराती नव्हे, तर ‘दुल्हा’ असलेला राग ‘बसंत’ यापुढे त्यांच्या स्वरांतून बहरणार नाही. वेदांतील ऋचांना, पुराणातील मंत्रांना पुन्हा स्वरसाज चढणार नाही.





